Wednesday, 15 July 2026

वैचारिक स्वायत्तता की राजकीय सुरक्षितता *विस्कटलेली राष्ट्रवादी...!*

थकलो आहे जरी l अजून मी झुकलो नाही ll
जिंकलो नसलो तरी l अजून मी हरलो नाही ll
अरे संकटांनो, अजून दम लावा l
कारण कमी पडलो असलो तरी l
अजून मी संपलो नाही ll
अशा शब्दांत शरद पवारांनी पक्षाच्या फुटीनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसला मुळातच केडरबेस नाही. हा पक्षच साखरसम्राट, शिक्षणसम्राट, सूतसम्राट अशा सम्राट लोकांचा! 'सत्तेसाठी बांधलेली मोट' असं त्याचं वर्णन राज ठाकरे करत असतात. अशा लोकांमध्ये मग त्याग, सेवा, समर्पण या भावना येणार कुठून? १९९९ ला पक्षाची स्थापना करताना पवारांनी सगळेच सम्राट उचलले अन् दावणीला बांधले. ज्यांच्याकडं साखर कारखाने, शिक्षणसंस्था, सुतगिरण्या, सहकारी बँका आहेत. ज्यांची संस्कृती ही वतनदार वा जहागिरदारांसारखी होती असेच लोक राष्ट्रवादीशी जोडले गेले. त्यावेऴी पवार हे नाव राज्याच्या राजकारणात चलणी नाणं होतं. पवारांचा करिष्मा होता. त्यामुऴे हे सगळे सहकारी सम्राट त्यांच्या छत्रछायेखाली आले. सोनिया गांधीच्या परदेशी मुद्द्यावर, त्यांना विरोध म्हणून स्थापन झालेला हा पक्ष! पण जेव्हा सत्ता उबविण्यासाठी  काँग्रेसच्या सोनियांना पाठींबा दिला तेव्हाच हे सारे मुद्दे गैरलागू झाले. मग आज पक्षाचे अस्तित्व नेमकं कुठल्या आधारावर आहे? पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नक्की कुठला अजेंडा घेऊन लोकांच्या घरी जायचं? बेगडी पुरोगामीत्व घेऊन जायचं तर २०१४ च्या विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्यावेळी साहेबांनी बिनशर्त पाठींबा देऊन भाजपचं सरकार सत्तेत आणलं होतं. त्यापूर्वीही जनसंघाच्या पाठींब्यावरच पवार पहिल्यांदा पुलोदचे मुख्यमंत्री झाले होते. त्यामुऴे पुरोगामीत्व हा काही त्यांचा विचार होऊ शकत नाही. मग नेमका विचार काय राष्ट्रवादीचा? त्यांची वैचारिक भूमिका कोणती? राज्यातले सगळे सहकारी सम्राट, सगळे टगे त्यांची थाटामाटाची संस्कृती हीच पक्षाची संस्कृती झालीय. थाटमाट, बडेजाव, संपत्तीचा झगमगाट, दादागिरी या गोष्टी राष्ट्रवादीला जन्मापासून चिकटलेल्यात. पवार कार्यकर्त्यांना ध्येयवाद द्यायला कमी पडले. पण कमी पडले म्हणण्यापेक्षा त्यांनी तो दिलाच नाही. केवळ सत्ता हाच राष्ट्रवादीचा विचार, ध्येयवाद आणि आधार आहे. त्यामुळंच आजची ही स्थिती झालीय. पण त्यांची उभारी घेण्याची जिद्द मात्र कायम आहे. शरद पवारांसारख्या अनुभवी, कुशल नेतृत्वाची कारकिर्दीच्या अखेरच्या क्षणी इतकी वाईट अवस्था होणं हे खरं तर शोकांतिकेसारखेच! केवळ साखरसम्राट, शिक्षणसम्राटांच्या गढ्या सांभाळायच्या, जातीय तेढ निर्माण होईल अशी विधाने, कुरापती करायच्या त्यावर राजशकट हाकायचं, हा पवारांचा आजवरचा खाक्या राहिलाय. आपल्या लावालावीच्या खेळ्या आताच्या काळात उपयोगाच्या नाहीत, हेही त्यांना समजलेलं नाही. ते आपल्या जुन्याच उद्योगांच्या आधारानं सत्तापदांवर पोहोचण्याची स्वप्नं पाहत राहिले आणि राष्ट्रीयच नव्हे तर राज्याच्या सत्ताकारणातूनही ते बेदखल झालेत. आपल्या पक्षाची आणि नेतृत्वाची ही दशा झाल्यावर हा दैवानं उगवलेला सूड म्हणायला हवा! तरीही पवार आज सत्तेत जाण्याचा मार्ग चाचपडताहेत. 
महाराष्ट्राच्या राजकारणाने अनेक घडामोडी, वळणं, बंड, फाटाफुटी पाहिल्यात, पण एक नाव केंद्रस्थानी कायम राहिलंय ते म्हणजे शरद पवार...! आता पुन्हा त्याच नावाभोवती कुजबुज सुरू झालीय, भाषा बदलली तरी अर्थ तोच आहे. 'सत्तेच्या जवळ राहणं!' हेच शरद पवार यांचं तत्त्वज्ञान आहे. मुंबईत जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची भेट झालीय. जयंत पाटील हे पवार यांचे विश्वासू सहकारी, ज्यांच्यावर पवारांनी नेहमीच पडद्यामागच्या बोलणीची जबाबदारी सोपवलीय. विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस, दिल्लीतल्या वरिष्ठ नेतृत्वाशी थेट संपर्क असणारे. या दोघांची भेट ही केवळ सौजन्य असू शकत नाही. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे या भेटीची वेळ. याच काळात मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर होते. हा योगायोग असेलही, पण या भेटीच्या आधी आणि नंतर जे तर्क समोर येताहेत, ते समजून घेण्यासाठी केंद्रातलं राजकारण लक्षात घ्यावं लागेल. मतदारसंघ पुनर्रचनेचं, म्हणजे डीलिमिटेशन विधेयक संसदेत येऊ घातलंय, यासाठी सरकारला आवश्यक तेवढं संख्याबळ हवंय. हे जमवण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या रूपांत दिसत आलीय. उद्धव ठाकरे शिवसेनेचे सहा खासदार शिंदे शिवसेनेत गेले, तेव्हाच हे स्पष्ट झालं की, खासदारांची जुळवाजुळव ही राज्यस्तरीय राजकारणाची गोष्ट नाही, तर ती दिल्लीतल्या मोठ्या गणिताचा भाग आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ खासदार याच गणितात एक महत्त्वाचा आकडा बनलेत. राज्यातल्या महायुती सरकारला नव्या मित्रपक्षाची गरज नाही. मग हा सगळा खटाटोप कशासाठी, याचं उत्तर दिल्लीत आहे. केंद्राला जी विधेयके मंजूर करून घ्यायचीत, त्यासाठीची बेगमी सुरूय, या बेगमीत शरद पवार गटाचे ८-९ खासदार हे मोदी शहा यांच्यासाठी एक मोलाचा हिस्सा ठरू शकतात. शरद पवार यांचं १९९९ नंतरचं राजकारण पाहिलं, तर सत्तेपासून दूर राहणं हे शरद पवार यांच्या स्वभावाला मानवणारं कधीच नव्हतं. २०१४ ते १९ या पाच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेबाहेर राहिली, तेव्हा भाजपने त्या पक्षात केवढी मोठी गळती घडवून आणली, हे महाराष्ट्राने पाहिलंय. खुद्द डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासारखे नातलगही पक्षापासून दुरावले. सत्तेच्या परिघाबाहेर राहिलं की पक्षाचं अस्तित्वच धोक्यात येतं, हा धडा शरद पवार यांनी अनुभवातून शिकलेलाय, तोच धडा आज त्यांना पुन्हा अस्वस्थ करत असावा.
अजित पवार स्वतः वारंवार सांगत आले की, भाजपच्या दारापर्यंत जाऊन बेल वाजवली, अन् मागं वळून पाहिलं तर शरद पवार तिथं नव्हते, ते आधीच निघून गेले होते. मग पुढं जाण्याशिवाय गत्यंतर उरलं नाही, म्हणून सत्तेत सहभागी झालो, खुद्द शरद पवार यांनीही कबूल केलं होतं की, पहाटेच्या शपथविधीमागे आपली संमती होती, आपण गुगली टाकली होती. याचा अर्थ इतकाच की, शरद पवार आणि भाजप यांच्यातली दारे कधीच पूर्णपणे बंद झालेली नव्हती. दारं केवळ लोटलेली होती. आता त्याच दाराशी पुन्हा हालचाल दिसतेय, पण यावेळी समीकरण थोडं वेगळंय. चर्चा अशी आहे की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांना वगळून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजित पवार गटातले काही नेते, आमदार यांची अस्वस्थता या मागे आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका जिंकणं अवघड जाईल, अशी भीती त्यांच्या मनात आहे. पार्थ पवार यांच्यासारख्या तुलनेने नवख्या नेत्याचे आदेश स्वीकारणं ज्येष्ठ मंत्री, आमदारांना रुचलेलं नाही. याचा फायदा घेत नेतृत्वबदलाची शक्यता समोर आणली जातेय. 
याचा अर्थ इतका सरळसोट नाही की शरद पवार उद्याच भाजपच्या व्यासपीठावर उभे राहतील. फडणवीस आणि अजित पवार यांच्यातली मैत्री ही  राजकीय सोयीपुरती नव्हती, ती विश्वासाची होती. अजित पवार गटातल्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना नेतृत्व म्हणून स्वीकारलं असलं, तरी त्यांनी फडणवीस यांनाच आपलं खरं नेतृत्व मानलंय. अशा स्थितीत जर शरद पवार गटाचे खासदार थेट भाजपशी जुळले, तर त्याचा फटका बसेल तो फडणवीस यांना, कारण राष्ट्रवादीवरचं त्यांचं नियंत्रण सैल होईल, म्हणूनच फडणवीस यांनी सांगितलंय की, एनडीएमध्ये नव्या पक्षाची गरज नाही. इथंच विनोद तावडे यांच्या नावाला वजन प्राप्त होतं. ही बोलणी अमित शहा यांच्या पातळीवरून जर होत असतील अन् त्यासाठी मध्यस्थी म्हणून तावडे यांची निवड झाली असेल, तर त्याचा एक अर्थ असाही निघतो की, ही चर्चा फडणवीस यांना वगळून, थेट दिल्लीतून हाताळली जातेय. याचे दोन उद्देश असू शकतात. एक, शरद पवार यांचे आठनऊ खासदार एनडीएच्या पारड्यात आणणं, आणि दुसरं, अजित पवार गटाची उपयोगिता हळूहळू कमी करणं अन्, राज्यातल्या मराठा, पश्चिम महाराष्ट्रातल्या मतपेढीवर शरद पवार यांच्या माध्यमातून वर्चस्व मिळवणं. अजित पवार गटाचा चेहरा जरी मराठा असला, तरी छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांसारखे या गटाचे नेते मराठा नाहीत, पश्चिम महाराष्ट्राबाहेरचे आहेत. राष्ट्रवादीची ताकद मराठा समाज आणि पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारी यांच्यात रुजलेलीय, तिथं अजित पवार यांची राष्ट्रवादी तितकीशी प्रभावी ठरत नाही, हे वास्तव भाजपच्या धुरिणांनाही उमगलेलं असावं. त्यामुळे शरद पवार यांची साथ भाजपसाठी केवळ आकड्यांचा प्रश्न नाही, तर मतपेढीच्या पुनर्रचनेचीही दूरदृष्टी आहे.
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. विक्रमी बहुमताने निवडून येऊनही काँग्रेस गुजरातमध्ये पूर्णपणे संपली नव्हती, ती सहकारी संस्थांच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आडोशाला होती. अमित शहा यांनी नेमक्या याच आडोशांवर घाव घालत काँग्रेसला तिथून उखडून काढलं आणि गुजरात भाजपमय केला. महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची अवस्था काहीशी तशीच आहे. पक्ष कमकुवत दिसत असला, तरी साखर कारखान्यांच्या, जिल्हा बँकांच्या, सहकारी संस्थांच्या रूपाने त्याची मुळं खोलवर रुजलेलीत. भाजपच्या नेतृत्वाला ही मुळं भविष्यात डोईजड होण्याआधीच आपल्या बाजूने वळवून घ्यायची असतील, तर शरद पवार यांच्याशी जुळवून घेणं हा एक व्यूहरचनात्मक मार्ग ठरतो. पण या सगळ्या समीकरणात दोन नाव आडवं येतंय ते सुप्रिया सुळे आणि रोहीत पवार यांचं. शरद पवार यांचे निर्णय आता त्यांच्या एकट्याचे राहिलेले नाहीत. पक्षाचं भवितव्य पूर्णतः सुप्रिया सुळे यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. सुप्रियाताईंना भाजपसोबत जाणं त्यांना राजकीयदृष्ट्या मानवणारं नाही. भाजपसोबत गेल्यास केंद्रात कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद, २०२९ ला बारामती लोकसभेच्या उमेदवारीची निश्चिती हे सगळे लाभ सुप्रियाताईंच्याच वाट्याला येऊ शकतात. एका बाजूला वैचारिक स्वायत्ततेची भूमिका, दुसऱ्या बाजूला व्यावहारिक राजकीय सुरक्षितता, या  ओढाताणीत सुप्रिया सुळे कुठं उभ्या राहतात, यावरच शरद पवार यांचा निर्णय अवलंबून असेल.
शरद पवार यांच्या राजकारणाची खरी ओळख नेहमीच दुहेरी राहिलीय.  काँग्रेसशी जवळीक दाखवतानाच भाजपशी संवादाचे दोर सैलसर ठेवायचे. देशपातळीवर काँग्रेससोबत काम करणं अडचणीचं ठरतेय कारण संघर्षाची पवारांना सवय नाही अन् हे वास्तव शरद पवार यांनी अचूक जोखलेलंय. दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आणून सत्तेचा वाटा मिळवणं, हा त्यांच्यासाठी अधिक व्यवहार्य पर्याय वाटू शकतो. जयंत पाटील, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, राजेश टोपे यांसारख्या अनेक मराठा नेत्यांनी पक्षफुटीनंतरही शरद पवार यांची साथ सोडलेली नाही. या निष्ठावंतांना पुन्हा एकदा सत्तेच्या उबेत आणून बसवण्याचा विचारही असू शकतो, जर शरद पवार एनडीएच्या दिशेने झुकले, तर महाराष्ट्रातली विरोधी पक्षाची जागा कोण भरून काढणार? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व आधीच मर्यादांनी वेढलेलंय. उरतो तो फक्त काँग्रेस पक्ष, प्रदेश नेतृत्व प्रयत्न करत असले, तरी योग्य साथीदारांविना विरोधी पक्षाची पोकळी भरून काढणं त्यांनाही अवघड जातेय. अशा परिस्थितीत सत्ताधारी आणि विरोधी बाकावरचे सत्ताधारी असे एकसुरी चित्र निर्माण होण्याचा धोका उभा राहतो. वयाची पंच्याऐंशी गाठलेला शरद पवार हा नेता आजही महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणाचा अपरिहार्य केंद्रबिंदू राहिलाय. महाराष्ट्राचे सत्तासमीकरण, विरोधी पक्षाचं अस्तित्व, सहकार चळवळीपासून मराठा राजकारणापर्यंतचे धागे नव्याने विणले जातील. 
शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसला जवळपास एखाद्या कॉर्पोरेट मालमत्तेप्रमाणे वागवतात. प्रस्ताव समोर ठेवा, स्पर्धात्मक प्रस्ताव मागवा आणि जो सर्वाधिक मूल्य देईल तो निवडा अशी त्यांची नीती राहिलीय. राष्ट्रवादी पक्षाने विलीनीकरणाची शक्यता पडताळण्यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांशी संपर्क साधलाय. जर हे खरं असेल, तर सुप्रिया सुळे आणि उर्वरित नेतृत्वासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम भविष्य देतो? पक्षाच्या दहा आमदारांपैकी पाच-सहा आमदार काँग्रेसऐवजी भाजपमध्ये विलीन होण्याच्या बाजूने आहेत. काही ज्येष्ठ नेतेही त्याच बाजूने आहेत, तर केवळ एक छोटा गट काँग्रेसच्या बाजूने आहे. केवळ राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, काँग्रेससोबतचं विलीनीकरण दीर्घकाळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर नेते काँग्रेसमध्ये राहूनही महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं महत्त्व टिकवून ठेवू शकतील. पण भाजपमध्ये, आधीच गर्दीने भरलेल्या नेतृत्व रचनेत सामील होतील का? जिथं तशीच राजकीय जागा निर्माण करणं अधिक कठीण असू शकतं. मात्र, भाजप अशी एक गोष्ट देऊ करतं, ज्याची बरोबरी काँग्रेस नजीकच्या भविष्यात करू शकत नाही. ती म्हणजे सत्ता...! केंद्र आणि महाराष्ट्रात मंत्रिपदाची एक वास्तववादी शक्यता. हे असे ठोस फायदे आहेत जे लवकर मिळवता येऊ शकतात. याच कारणामुळे, जर शरद पवारांनी अखेरीस भाजपची निवड केली, तर आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना, त्यांनी कदाचित आधीच आपला निर्णय घेतला असेल. त्यांना माहित आहे की, पक्षाला अखेरीस त्यांच्या उपस्थितीशिवाय काम करावं लागेल. त्या टप्प्यावर, दीर्घकालीन संघटनात्मक धोरणापेक्षा त्यांच्या मुलीची आणि त्यांच्या निष्ठावंतांची तात्काळ राजकीय सुरक्षा अधिक महत्त्वाची ठरू शकते. जर खरोखरच हा हिशोब असेल, तर हा निर्णय विचारधारेबद्दल नसेल. तो उत्तराधिकार, अस्तित्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या पुढच्या पिढीसाठी शक्य तितके मजबूत भविष्य सुरक्षित करण्याबद्दल असेल....!
हरीश केंची,
९४२२३१०६०

मांजरांचं भांडण, सत्तेचं लोणी अन् माकडाचा लाभ

घराणेशाहीचे राजकारण, किंवा पक्षांतर्गत भाई-भतीजावाद, ही काही नवीन गोष्ट नाही. तसेच, ती कोणत्याही एकच एक पक्षापुरती मर्यादितही नाही, प्रमाण वेगवेगळे असले तरी पॅटर्न हाच. नवीन म्हणावी अशी गोष्ट आता घडताना दिसतेय ती ही की एकच राजकीय पक्षातल्या घराणेशाहीतल्या संघर्षात अंतर्गत स्फोट घडून येत आहे. गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून, राज्य विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात. पक्षाच्या या पराभवासाठी बंडखोर नेत्यांनी थेट नेतृत्व बदलाला जबाबदार धरलेय. ज्येष्ठ नेत्यांना पद्धतशीरपणे बाजूला सारून, ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या हाती पक्षाची सूत्रे सोपवण्यात आलीय, हेच या पराभवाचे मुख्य कारण असल्याचा आरोप बंडखोरांकडून केला जातोय. हा छुपा राजकीय डाव कसा खेळला जातोय, याची स्पष्ट झलक ८ जून रोजी नवी दिल्लीत पाहायला मिळाली
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी थेट केंद्रीय मंत्री आणि भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी धाव घेतली. या प्रमुख नेत्यांच्या मेळाव्यातून तृणमूलमधली अंतर्गत बंडाळी अन् भाजपची पडद्यामागची रणनीती आता उघड झालीय.
केंद्रात अन् राज्यात एकाचवेळी तृणमूल काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीने राजकीय तज्ज्ञही चक्रावून गेलेत. पक्षात अंतर्गत असंतोषाची कोणतीही चिन्हे दिसत नसताना अचानक हे मोठे बंड समोर आले कसे याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. एकीकडे आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांनी ८० पैकी ५८ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला, तर दुसरीकडे लोकसभा खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी पक्षाच्या २८ पैकी २० खासदारांची साथ असल्याचा दावा केला. या अंतर्गत वादाची ठिणगी मे महिन्यातच पडली होती, जेव्हा काकोली घोष दस्तीदार यांना हटवून कल्याण बॅनर्जी यांची मुख्य प्रतोद पदी नियुक्ती करण्यात आली. कल्याण बॅनर्जी यांच्या या नेमणुकीनंतर काकोली घोष दस्तीदार यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. आता याच कल्याण बॅनर्जी यांनी थेट ममता बॅनर्जी यांना अल्टिमेटम दिला आहे. 'अभिषेक बॅनर्जी यांनी पक्ष उद्ध्वस्त केलाय....', असा थेट आरोप करत त्यांनी ममता बॅनर्जी यांना एकतर अभिषेक वा मग पक्षातले ज्येष्ठ नेते, यापैकी एकाची निवड करण्याचेच जणू आव्हान दिलेय. अभिषेक यांच्याकडून पक्षातली सर्व महत्त्वाची पदं काढून न घेतल्यास राजीनामा देण्याची धमकीही त्यांनी दिलीय. इतर बंडखोर नेत्यांनीही हाच सूर लावत, तृणमूलमधील या संपूर्ण गोंधळाला अभिषेक बॅनर्जी यांचा अहंकार आणि पक्षातली त्यांची हुकूमशाही कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. मात्र, तृणमूलच्या राज्यसभा खासदार सागरिका घोष यांनी या आरोपांची तीव्र शब्दांत खिल्ली उडवली आहे. "जर तृणमूल काँग्रेसने राज्य निवडणूक जिंकली असती, तर बंडखोर सदस्यांनी अशीच वक्तव्ये करण्याची हिंमत दाखवली असती का...?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. "ममता बॅनर्जींशिवाय तृणमूल काँग्रेस अस्तित्वातच असू शकत नाही, कारण ममता बॅनर्जी म्हणजेच तृणमूल आहे...," अशा ठाम शब्दांत त्यांनी बंडखोरांना सुनावले.
पक्षात एकापाठोपाठ एक राजीनाम्यांची मालिका सुरू असताना, पक्षाचे लोकसभा खासदार कीर्ती आझाद आणि शत्रुघ्न सिन्हा, तसेच राज्यसभा खासदार बाबुल सुप्रियो यांच्यासह इतर अनेक प्रमुख नेत्यांनी मात्र ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास दाखवत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
तृणमूल काँग्रेसमधील संभाव्य फुटीसाठी थेट अभिषेक बॅनर्जी यांना किती जबाबदार धरावे, हे जरी अस्पष्ट असले, तरी केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडून बंडखोरांना दिले जाणारे प्रोत्साहन मात्र अगदी !स्पष्टपणे समोर आले आहे. पश्चिम बंगालमधील ही राजकीय उलथापालथ महाराष्ट्रातील २०२२ च्या शिवसेना बंडाची आठवण करून देते. त्यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ऐतिहासिक बंड पुकारले होते. त्यांनी ठाकरे सरकार तर पाडलेच, पण बहुसंख्य आमदार आणि खासदारांच्या पाठिंब्याच्या बळजोरीवर मूळ पक्षाचे नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्हही पळवले. यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत युती करत उर्वरित कार्यकाळासाठी राजरोस मुख्यमंत्रीपद भूषवले. पुढे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विजय मिळवल्यानंतर, राजकीय समीकरणांनुसार भाजपने मुख्यमंत्रीपद आपल्याकडे हिसकावून घेतले.
महाराष्ट्रात राजकीय पक्षांमध्ये फूट पाडण्याच्या किंवा बंडखोरांना ताकद देण्याच्या खेळात भाजप केवळ २०२२ च्या शिवसेना बंडाच्या वेळीच नव्हे, तर २००६ पासूनच सक्रिय राहिल्याचे दिसते. २००६ मध्ये जेव्हा राज ठाकरे यांनी आपले चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवण्यास विरोध करत 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची' (मनसे) स्थापना केली, तेव्हापासूनच भाजपने या बंडखोर नेत्याला आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते आणि वेळोवेळी त्यांची जाहीर प्रशंसाही केली. पुढे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मात्र, २०२५ पासून उद्धव आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा सलोखा वाढू लागल्याची चिन्हे दिसताहेत. विशेष म्हणजे, २०२१ मधील माध्यम अहवालानुसार, हिंदू धर्मगुरू कांचन गिरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना भाजपसोबत हातमिळवणी करण्याचा सल्ला दिला होता. या राजकीय जवळीकीवर एका वर्षानंतर टीका करताना शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी खोचक टिप्पणी केली होती की, मनसेला सध्या भाजपकडूनच 'बूस्टर डोस' मिळत आहे.
जुलै २०२३ मध्ये जेव्हा अजित पवार आपल्या काकांच्या शरद पवार नेतृत्वापासून वेगळे झाले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, तेव्हा भाजपने त्यांचे खुल्या दिलाने स्वागत केले. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये त्यांना थेट उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. यापूर्वी, २०१९ मध्येही भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी उरकत सरकार स्थापन करण्याच्या अजित पवारांच्या प्रयत्नांना पूर्ण पाठबळ दिले होते. मात्र, आवश्यक बहुमत मिळवता न आल्याने ते सरकार अवघ्या ८० तासांत कोसळले होते. थोडक्यात सांगायचे तर, २०१९ मध्ये सुरू झालेला हा राजकीय खेळ अखेरीस २०२३ मध्ये यशस्वी झाला.
बिहारमधील २०२१ मधील राजकीय घडामोडींमध्येही अशीच रणनीती पाहायला मिळाली. दिवंगत रामविलास पासवान यांचे बंधू पशुपती कुमार पारस यांनी पक्षाच्या ६ पैकी ५ लोकसभा खासदारांना सोबत घेऊन बंड केले आणि भाजपनेही त्यांना तत्काळ केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देऊन पुरस्कृत केले. मात्र, २०२४ पर्यंत भाजपच्या लक्षात आले की जनसमर्थन चिराग पासवान यांच्याकडे झुकले आहे त्यामुळे भाजपने लगेचच चिराग यांच्याशी सलोखा करत पारस यांना वाऱ्यावर सोडले. कठीण काळात चिराग पासवान वारंवार आपली राजकीय व्यथा व्यक्त करत राहिले, पण तरीही त्यांनी मोदींप्रति आपली निष्ठा जाहीर करत राहणे यात खंड पडू दिला नाही. चिराग यांना सुरुवातीला बाजूला सारण्यात आणि नंतर त्यांचे दणक्यात पुनरागमन घडवून आणण्यात भाजपचा पडद्यामागचा सूत्रधार हात स्पष्टपणे दिसत होता. त्याचप्रमाणे, २०१६ मध्ये जेव्हा मुलायमसिंह यादव यांचे सुपुत्र अखिलेश आणि बंधू शिवपाल यादव यांच्यातील कौटुंबिक व राजकीय वाद चव्हाट्यावर आला होता, तेव्हाही भाजपने केवळ बघ्याची भूमिका घेतली नाही. भाजपने पडद्यामागून शिवपाल यादव यांना सक्रियपणे प्रोत्साहन दिले. मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर, २०२२ मध्ये अखेरीस या काका-पुतण्यांमध्ये अखिलेश आणि शिवपाल समेट झाला; मात्र या सलोख्याच्या आधी आणि त्यानंतरही भाजपचे हे पडद्यामागून राजकीय डावपेच खेळणे सातत्याने सुरूच राहिले. २०१७ मध्ये भाजप उत्तर प्रदेशात आधीच सत्तेवर आला होता, कारण सत्ताधारी समाजवादी पक्ष राज्याचा विकास आणि शासन करण्याऐवजी केवळ आपापसातील गटबाजी आणि भांडणातच व्यस्त आहेत, असा संदेश मतदारांमध्ये गेला होता. तो पोचवणारे कोण होते ते निराळे सांगायला नको. 
मे २०२२ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांचे आदर्श जिवंत ठेवल्याबद्दल शिवपाल यादव यांची जाहीर प्रशंसा केली होती. दुसरीकडे, एप्रिल २०२४ मध्ये भाजप नेते रामशंकर कठेरिया यांनी थेट शिवपाल यांना भाजपमध्ये येण्याची जाहीर ऑफर दिली. यावरून हे स्पष्ट होते की, या काका-पुतण्यांमधील अखिलेश आणि शिवपाल राजकीय दरी जितकी रुंद राहील, तितका स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्याची रणनीती भाजप सातत्याने आखत आहे. २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी, मुलायमसिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वास्तविक पाहता, अखिलेश यादव यांच्याशी झालेल्या जाहीर मतभेदानंतर भाजप बऱ्याच काळापासून त्यांच्या संपर्कात होता. अपर्णा या मुलायमसिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे चिरंजीव प्रतीक यादव यांच्या पत्नी आहेत. या कौटुंबिक संबंधांचा राजकीय वापर करून समाजवादी पक्षाच्या पारंपरिक 'ओबीसी' मतपेढीत मोठी फूट पाडण्याची भाजपची रणनीती आहे.
बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील अंतर्गत कलह उफाळून आल्यानंतर, भाजपने त्यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांना तातडीने राजकीय पाठिंबा आणि सहानुभूती दर्शवण्यास सुरुवात केली. या वाढत्या जवळीकीची झलक या वर्षी मे महिन्यात पाहायला मिळाली, जेव्हा उत्तर प्रदेशातील विंध्याचल या धार्मिक क्षेत्राच्या दौऱ्यावर असताना तेज प्रताप यांनी अखिलेश यादव यांच्याऐवजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्याची उघड घोषणा केली. त्यापूर्वी, नोव्हेंबर २०२५ मध्ये गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन यांच्यासोबत जाहीरपणे एकत्र दिसल्याने त्यांच्यातील पडद्यामागच्या संबंधांना अधिकच बळ मिळाले होते. तसेच, तेज प्रताप यांना मिळालेल्या 'वाय' श्रेणीच्या सुरक्षेचे जी नंतर मागे घेण्यात आली, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी जाहीर समर्थन केले होते. तेज प्रताप यांनी अद्याप भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलेला नसला, तरी ते 'जनशक्ती जनता दल' या आपल्या स्वतंत्र पक्षाचे नेतृत्व करताहेत; आणि याच पक्षाने बिहारमधील यादवबहुल मतदारसंघांमध्ये २१ जागांवर निवडणूक लढवून राष्ट्रीय जनता दलाच्या पारंपरिक मतपेढीचे मोठे नुकसान केले आहे.
तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत फूट जसजशी उघड होत आहे, तसतसे बंडखोर गट पक्षाचे अधिकृत चिन्ह आणि स्वतःच 'खरी तृणमूल' असल्याचा कायदेशीर दावा ठोकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकेकाळी तृणमूलच्या नेत्यांसाठी आपले दरवाजे बंद असल्याचे सांगणाऱ्या भाजपने आता बंडखोरांचे स्वागत करण्यासाठी आपल्या सर्व खिडक्याही उघडल्या आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आता एकच मोठा प्रश्न उपस्थित होत आहे; तो म्हणजे हे बंडखोर तृणमूल सदस्य शेवटी भाजपमध्ये स्वतःला विलीन करून घेतील, की भाजपने महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या यशस्वी प्रयोगाप्रमाणेच येथेही या बंडखोरांना एक 'पर्यायी तृणमूल' म्हणून स्वतंत्र अस्तित्वासह कायम ठेवेल.
भाजपसाठी हा केवळ सत्तास्थापनेचा खेळ नसून, विरोधकांच्या 'घराणेशाही' या कमकुवत दुव्यावर थेट प्रहार करण्याची रणनीती आहे. बंडखोर नेत्यांना प्रोत्साहन देऊन भाजप मतदारांना हा संदेश देतो की, प्रादेशिक पक्ष केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित आहेत. यामुळे विरोधकांची जनमानसातील प्रतिमा डागाळण्यास मदत होते. भाजप केवळ प्रादेशिक पक्षात असणाऱ्या फुटीचा फायदा घेत नाही तर पक्षांतर्गत घराणेशाहीमुळे असलेली दरी ओळखून ती रूंदावण्याचे राजकारण हे जणू त्यांचे मुख्य वैशिष्ट्य बनलेय.


मीनाक्षी नटराजन

मीनाक्षी नटराजन यांना मार्च २०२२ मध्ये पोचमपल्लीला पहिल्यांदा भेटलो होतो. तेव्हा त्या 'राजीव गांधी पंचायत राज मिशन'च्या अध्यक्ष होत्या. पोचमपल्ली ते सेवाग्राम अशी 'सर्वोदय संकल्प यात्रा' निघाली होती. तेलंगणातल्या पोचमपल्ली येथे विनोबांना रामचंद्र रेड्डी यांच्याकडून पहिलं भूदान मिळालं होतं. भूदान आंदोलनाची सुरूवात तिथून झाली. गागोद्याचं 'विनोबा जन्मस्थान प्रतिष्ठान' आणि 'राजीव गांधी पंचायत राज मिशन' दोघांनी संयुक्तपणे पदयात्रेचं आयोजन केलं होतं. हर्षवर्धन सकपाळ तेव्हा 'राजीव गांधी पंचायत राज मिशन'चे उपाध्यक्ष होते. तेही पदयात्रेत सामील झाले होते. विनोबा जन्मस्थान प्रतिष्ठानतर्फे विजय दिवाण, नीला आपटे, माधव सहस्त्रबुद्धे आणि इतर मंडळी होती. महाराष्ट्रातले सर्वोदयी कार्यकर्ते सामील झाले होते. 
मीनाक्षी नटराजन लेखकही आहेत याची मला कल्पना होती. 'अपने अपने कुरूक्षेत्र....' ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. '१८५७ - भारतीय परिप्रेक्ष्य...' हे त्यांचं संशोधनात्मक पुस्तकही प्रसिद्ध झालेलं आहे. पदयात्रेला सुरूवात होताना त्यांच्याशी औपचारिक ओळख झाली होती
पुढे तेलंगणाच्या वेगवेगळ्या गावांमधून जाताना त्यांचे स्थानिकांशी होणारे संवाद ऐकत होतो. त्यांच्याशी बोलतही होतो. बारीक अंगकाठीच्या, सुती साडी-चष्मा-खांद्यावर शबनम असा साधा, प्राध्यापकी पेहराव असलेल्या 'मीनाक्षीदीदी' अगदी सौम्य आणि मृदू दिसतात; पण त्या बोलायला लागल्या की त्यांची 'कमांड' जाणवायला लागते. त्या भागातल्या वेगवेगळ्या प्रश्नांचा, विशेषतः जमिनीशी संबंधित प्रश्नांचा, त्यांचा चांगलाच अभ्यास होता. मला विशेष वाटल्या त्या दोन गोष्टी. त्या दर सोमवारी की मंगळवारी मौन पाळायच्या आणि नियमित सूतकताई करायच्या. मौन ही एक ग्रेट गोष्ट आहे याचा शोध मला गेल्या वर्षी विपश्यना केल्यापासून लागला. आणि गांधी विचारांच्या परिवारातला असूनही हे आपल्याला आधी का कळलं नाही याची थोडी खंतही वाटली. संपूर्ण पदयात्रेत मीनाक्षीदीदींनी ठरलेल्या दिवशी कसोशीने मौन पाळलं होतं. 
पदयात्रेदरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी सूतकताई हा एक नियमित कार्यक्रम असायचा. माधवदादा सूतकताईतले उस्ताद. मीनाक्षी नटराजन, माधवदादा, नीला, विजयकाका, सरिताताई, इतर सहकारी सूत कातायला लागले की लोक गोळा व्हायचे. त्यातून एक डायलॉग सुरू व्हायचा. पण मला त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण होण्याला आणखी एक, वेगळंच कारण घडलं. आणि ते म्हणजे सिनेमा! एकदा संध्याकाळी गप्पा मारताना कुठूनतरी सिनेमाचा विषय निघाल्यावर त्या भरभरून बोलायला लागल्या आणि मी चाटच पडलो! अमिताभ बच्चनच्या सिनेमांवर वगैरे बोलत होतो आम्ही! गांधी आणि सिनेमा अशी दोन म्हटलं तर विजोड टोकं धरलेली माणसं मला जाम आवडतात. इथे एक सांगायला पाहिजे. सर्वोदयी मंडळींमध्येदेखील रसिकता नसते असा एक समज आहे. पण विजय त्याला अपवाद आहेत. विनोबांइतकाच जुनी हिंदी गाणी, चित्रपट, मराठी साहित्य हा त्यांचा वीक पॉईंट आहे. त्याबद्दल एकदा वेगळं लिहावं लागेल. त्यामुळे मीनाक्षीदीदींचं सिनेमाप्रेम हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. आणि अर्थातच ते नुसतं प्रेम नव्हतं. सिनेमा आवडणं हा एक भाग झाला. सिनेमा बहुतेक सगळ्यांनाच आवडतो. पण त्याबद्दल आपलं काहीतरी म्हणणं असणं, आपण सिनेमाबाबत चिकित्सक असणं महत्त्वाचं. मीनाक्षीदीदी त्या पंथातल्या आहेत.  
अलीकडे त्यांचा राज्यसभेची उमेदवारी अर्ज फेटाळल्या गेल्यानंतर पदयात्रेतल्या आठवणी जाग्या झाल्या. राजकारणात अशी एक अंतर्बाह्य साधी, खऱ्या अर्थाने गांधीविचार आत्मसात केलेली आणि कलासक्त व्यक्ती असू शकते यावर आज विश्वास ठेवणं कठीण आहे. पण मीनाक्षी नटराजन म्हणजे याचं चालतं-बोलतं उदाहरण आहे.  
बाकी त्यांच्याबाबत जे झालं त्याबद्दल वेगळं बोलावं असं काही नाही. जिथे सत्तावीस लाख मतदारांचा मतदानाचा हक्क डावलला जातो आणि 'ते पुढच्या वेळी मतदान करतील' हे ऐकवलं जातं, निवडणूक आयोग उघडपणे सत्ताधारी पक्षाला फायद्याचं होईल असं ट्वीट करतो तिथे मीनाक्षी नटराजन यांचं ऐकलं जाईल ही आशा व्यर्थ आहे. काही वेगळं घडलं तरच आश्चर्य!  
मीनाक्षी नटराजन १९९९ ते २००२ एनएसयूआयच्या अध्यक्ष होत्या. २००२ ते २००५ मध्य प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. २००८ मध्ये एआयसीसीच्या सचिव होत्या. २००९ ते २०१४ लोकसभा खासदार होत्या. नंतर काँग्रेसमध्ये कुठल्या ना कुठल्या रोलमध्ये होत्याच. त्यांची वैचारिक कमिटमेंट दांडगी आहे आणि फिल्डवरची तयारीही. त्यामुळे आज भारतात लोकशाही किती उरली आहे माहीत नाही; पण मीनाक्षी नटराजन नावाच्या बाई उभ्या असणार आहेत आणि पुरून उरणार आहेत. आणि हे खूप आहे! 

ममता बॅनर्जी यांचे संघ, भाजपशी साटेलोटे!

सुमारे २९ वर्षांपूर्वी, १९९७ मध्ये जेव्हा ममता बॅनर्जी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून मुकुल रॉय यांच्यासोबत 'तृणमूल काँग्रेस'ची स्थापना केली, तेव्हा त्यांनी सीपीएम, सीपीआय आणि काँग्रेसला संपवण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये भाजपचा प्रवेश सुलभ केला. मुकुल रॉय नंतर भारतीय जनता पक्षात सामील झाले.
१९९९ मध्ये, ममता बॅनर्जी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए सरकारमध्ये सामील झाल्या आणि रेल्वेमंत्री बनल्या. २००१ च्या सुरुवातीला, जेव्हा 'ऑपरेशन वेस्ट एंड'ने संरक्षण करारांमधलं मोठे लाचखोरीचे प्रकरण उघडकीला आणले, तेव्हा ममता बॅनर्जी एनडीए सरकारमधून बाहेर पडल्या. ऑगस्ट २००१ मध्ये एका मुलाखतीत, जेव्हा ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आले की, त्यांच्या पक्षाच्या एनडीए मध्ये परत येण्याची काही शक्यता आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, "होय, टीएमसीच्या जाहीरनाम्यानुसार, भाजप आमचा 'नैसर्गिक मित्रपक्ष' आहे....!" 
२००३ मध्ये, ममता बॅनर्जी एनडीए सरकारमध्ये पुन्हा सामील झाल्या, परंतु अनेक महिने त्या बिनखात्याच्या मंत्री राहिल्या.
२००३ मध्ये, ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र 'पांचजन्य'चे तत्कालीन संपादक तरुण विजय यांच्या 'कम्युनिस्ट टेररिझम'-साम्यवादी दहशतवाद या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली होती. तरुण विजय यांनी त्यांचे स्वागत करताना त्यांना 'बंगालची दुर्गा' म्हटले होते.
सभागृहात बोलताना, भाजपचे राज्यसभा खासदार बलबीर पुंज ममता बॅनर्जींबद्दल म्हणाले, "आमच्या लाडक्या ममता दीदी म्हणजे दुर्गेचा अवतार आहेत..." अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच पुंज यांचे निधन झाले होते.
आरएसएसने ममता बॅनर्जी यांना 'बंगालची दुर्गा' असेही संबोधले आणि डाव्यांविरुद्धच्या त्यांच्या लढ्याला 'प्रखर पाठिंबा' व्यक्त केला.
आपल्या एका भाषणात, ममता बॅनर्जी यांनी आरएसएसचे मोहन भागवत, शेषाद्री चारी आणि मदनदास देवी यांचा उल्लेख करत म्हटले, "मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक नेत्यांना ओळखत नाही, पण त्यापैकी काहींना मी वैयक्तिकरित्या भेटले आहे. तुम्ही खरे देशभक्त आहात. मला माहीत आहे की तुमचे तुमच्या देशावर खरे प्रेम आहे...." २०१२ मध्ये, आरएसएसचे मुखपत्र 'पांचजन्य'ने ममता बॅनर्जींच्या साध्या जीवनशैलीची प्रशंसा करणारा एक लेख लिहिला होता. त्यात म्हटले होते, "ममता अशा दुर्मिळ राजकारण्यांपैकी एक आहेत, ज्यांनी पैसा कमावण्यासाठी राजकारणाचा वापर केलेला नाही. देशात असे अधिक राजकारणी असते तर किती बरे झाले असते...." २०१९ मध्ये, ममता बॅनर्जींनी एनआरसी आणि सीएएच्या विरोधात अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले. तथापि, जेव्हा संसदेत सीएएवर मतदान झाले, तेव्हा टीएमसीचे आठ खासदार रहस्यमयरीत्या अनुपस्थित होते, ज्यामुळे विधेयक मंजूर झाले. ममता बॅनर्जींनी या खासदारांना माफ केले आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
२७ जानेवारी २०२० रोजी, जेव्हा भाजप सरकारमधील तत्कालीन अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या भाषणात "हरामखोरांना गोळ्या घाला..." अशी घोषणा दिली, तेव्हा टीएमसी नेते शेख आलम यांनी मुर्शिदाबादमध्ये सीएएला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर गोळीबार केला.
२०१७ मध्ये भाजपमध्ये सामील झालेले मुकुल रॉय, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीमध्ये परतले आणि ममता बॅनर्जींनी त्यांचे आनंदाने स्वागत केले. निवडणुकीदरम्यान, मुकुल यांनी पत्रकारांना सांगितले की भाजप टीएमसीच्या बरोबरीचा आहे!
जुलै २०२२ मध्ये, ममता बॅनर्जींनी उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देण्यास नकार दिला. त्यानंतर ममता बॅनर्जींच्या खासदारांनी मतदानात भाग घेतला नाही. जगदीप धनखर विजयी झाले. बंगालच्या राज्यपाल असताना धनखर यांनी ममता बॅनर्जींचे राजकीय आयुष्य कठीण केले होते, त्यामुळे ममता बॅनर्जींनी त्यांना मदत केली. अलीकडेच, सप्टेंबर २०२२ मध्ये, ममता बॅनर्जींनी आरएसएसची भरभरून प्रशंसा करत म्हटले, "संघामध्ये अनेक खूप चांगले लोक आहेत. संघ एक चांगली संघटना आहे...." ममता बॅनर्जी यांनी २०२४ पूर्वी नितीश कुमार यांनी स्थापन केलेल्या इंडिया अलायन्सच्या संयोजकपदी त्यांच्या नियुक्तीला तीव्र विरोध केला. यामुळे नाराज झालेल्या नितीश कुमार यांनी भाजपशी युती केली.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, ममता बॅनर्जी यांनी इंडिया अलायन्ससोबत निवडणूक लढवण्यास नकार दिला आणि आपण एकट्यानेच निवडणूक लढवू अशी घोषणा केली. नरेंद्र मोदी २०२४ ची लोकसभा निवडणूक पुन्हा जिंकले... आणि अशाप्रकारे, बीजेडी, बसपा, शिवसेना, जेडीयू, टीआरएस, वायएसआर, पीडीपी आणि आप यांच्यानंतर, भाजप नावाच्या त्याच ड्रॅगनने टीएमसीला गिळून टाकलं. ममता बॅनर्जी यांनी जे पेरले होते, तेच आता त्या उगवलं आहे. इंडिया अलायन्स तोडून, ​​त्यांनी जे केलं त्याचा अनुभव त्या घेताहेत. आता त्यांच्या पक्षाचे खासदार नक्कीच राघव चड्ढांसारखे असतील...



तर काय झालं असतं..? 
देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस आणि त्या पक्षाचे नेते यांचा सर्वात मोठा त्याग आहे, प्रत्यक्ष सहभाग आहे, ही वस्तुस्थिती नाकारणं म्हणजे मुजोरीशिवाय दुसरं काही नाही. कॉंग्रेसच्याबाबतित धोरणात्मक मतभेद असू शकतात. काँग्रेसचे नेते शंभर टक्के प्रामाणिक आहेत, असं कुणी म्हणणार नाही. पण कम्युनिस्ट पक्षाचा अपवाद सोडला तर इतर पक्षांचे नेते भ्रष्टाचाराच्या बाबतित काँग्रेसच्याही बरेच पुढे आहेत, हे देखील नाकारता येणार नाही! अर्थात.. काही अपवाद सर्वत्रच असतात! भ्रष्टाचाराच्याबाबतीत भारतीय जनता पार्टी निर्विवादपणे पहिल्या नंबरची पार्टी आहे. याबाबतीत तिचा रेकार्ड फक्त तीच मोडू शकते. कुणी काहीही कांगावा केला तरी 'सर्वसमावेशकता' हा कॉंग्रेसच्या धोरणाचा आत्मा होता, आहे आणि राहील. जसजशी काँग्रेस मुळ विचारधारेपासून दूर जाईल.. तसं तसं तिचं अस्तित्व देखिल धोक्यात येईल.ज्यांनी ज्यांनी काँग्रेसला 'बुडतं जहाज' वगैरे म्हणून स्वार्थापोटी हिणवण्याचा प्रयत्न केला, त्या पक्षांची अवस्था आज काय आहे? कुठल्यातरी कोपऱ्यात आपली उपस्थिती असणं, यापलिकडे त्यांचं अस्तित्व काय आहे? बसता उठता कॉंग्रेसच्या नावाने गरळ ओकणारे अनेक पक्ष तर जवळपास नामशेष झालेले आहेत. काहींचे प्रतिनिधित्व कधीही दखलपात्र नव्हते. आताही नाही. 'मेरी मुर्गी की एकही टांग' म्हणत बोंबा मारणं एवढंच त्यांचं कर्तृत्व! अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखिल आज काँग्रेसचे १०० खासदार लोकसभेत आहेत. भविष्यात देखिल काँग्रेसच्या विरोधात असलेला एकतरी पक्ष काँग्रेस एवढ्या संख्येच्या जवळपास पोचण्याची शक्यता आहे का? 'काँग्रेस आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत' असं तुणतुणं वाजवणाऱ्या लोकांची कीव करावीशी वाटते. या पक्षांना देखिल विस्ताराचं स्वातंत्र्य आणि संधी काँग्रेसच्या उदार आणि लोकशाहीवादी भूमिकेमुळेच मिळाली आहे, हे ही वास्तव आहे! आज भाजप जशी वागते तशी काँग्रेस किंवा मोदी-शहा जसे वागतात तसे गांधी-नेहरू विरोधकासोबत वागले असते तर? काँग्रेसच्या नावानं खडे फोडणाऱ्या लोकांच्या हातात काय मिळालं असतं? कुणाची काय ताकद होती? काँग्रेसकडे काय थातूरमातूर मेजाॅरिटी होती का? त्यांना कुणाची काही गरज होती का? किंवा पहिलं सरकार जर भाजपसारख्या पक्षाचं असतं.. तर आज इतर काँग्रेसविरोधी पक्षांची काय अवस्था राहीली असती? भाजप ही पार्टी नव्हे, ती एक विकृती आहे. काँग्रेस मधे काही दोष आहेत, मर्यादा आहेत.. पण ती या देशातली सर्वसमावेशक अशी राजकीय संस्कृती आहे. याचं भान नसलेला कोणताही विचार एकांगी आहे, अपरिपक्व आहे, भाजपाला मदत करणारा आहे. याचा अर्थ.. सर्वांनी काँग्रेसच्या मागं फरफटत जावं, असा मुळीच नाही. कॉंग्रेसच्या चुकिचा विरोध केलाच पाहिजे. पण तो करतांना त्याला विकृती किंवा द्वेषाचा वास असता कामा नये. सकारात्मक विरोधाचं काँग्रेसनंही स्वागतच केलं पाहिजे! कॉंग्रेसला मोकाट रान मिळू नये, यासाठी सकारात्मक आणि सर्वसमावेशक असा आणि भाजपाला ठोस विरोधी असा तिसरा पर्याय देखिल उपलब्ध असला पाहिजे. निदान महाराष्ट्रात तरी सध्या तसं काही दिसत नाही. पण प्रयत्न सुरू असलेच पाहिजेत. बघू या!  मुळात काही अत्यल्प सन्माननीय अपवाद वगळता बहुतांशी प्रादेशिक पक्ष काँग्रेसी राजकारणाला परस्पर छेद देण्यासाठीच निर्माण केले गेले.
मूळ प्रेरणा पूर्वीचा जनसंघ आणि आताचा संघरूपी भाजप....
सुरुवातीला काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला प्रदेश. हळूहळू कम्युनिस्ट केडर बळकट असलेने कम्युनिस्टांचा अभेद्य गड बनला तरीही पश्चिम बंगालमध्ये डाव्यांशी काँग्रेसचे मिळतेजुळते धोरण असायचं काँग्रेसमध्ये २६ वर्षे सक्रिय राजकारणाचा अबकड शिकलेल्या ममता बॅनर्जी नामक अती महत्वकांक्षी महिलेची घुसमट व्हायला लागली. कट्टर कम्युनिस्ट आणि बऱ्यापैकी काँग्रेसी वरचष्मा असलेल्या राज्यात भाजपला अजिबात स्थान नव्हतं. संघीय संधीची वाट पाहत दबा धरून बसलेले. त्यांनी ममता बॅनर्जी यांची अस्वस्थता हेरली. त्यांच्या अहंकाराला खतपाणी घातलं. काँग्रेस कम्युनिस्टांना झुकते माप देते या सदराखाली. ममता बॅनर्जी यांनी १९९७ मध्ये काँग्रेस पक्ष सोडला आणि १९९८ साली तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना केली. इथेच भाजपच्या वंगभूमीतील प्रवेशाची पायभरणी  झाली.
नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे या मराठी म्हणीची प्रकर्षाने आठवण झाली.
१९९९ मध्ये ममता बॅनर्जी भाजप प्रणित नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट मध्ये सामील झाल्या. त्या अट्टल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये रेल्वेमंत्री बनल्या.
२००१ मध्ये त्यांनी भाजप आपला स्वाभाविक सहकारी पक्ष असल्याचं जाहीर सभेत सांगितलं.
आज मुस्लिमांच्या स्वयंघोषित कैवारी बनलेल्या ममता बॅनर्जी २००२ गुजरातमधील गोधरा येथे मुस्लिमांची कत्तल होत असताना केंद्रात कोळसा आणि खाण मंत्रिपद भूषवत होत्या. भाजपच्या संघीय वर्तुळात बंगालची दुर्गा असं ममता बॅनर्जी यांना गौरवले जायचं. हीच ऐतिहासिक चूक त्यांच्या मुळावर उठणार होती. जुलमी नागरिकता विधेयकाच्या CAA & NRC वेळी रस्त्यावर उतरलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे ८ सदस्य संसदेत जुलमी नागरिकता विधेयक मंजूर व्हायच्या वेळी गैरहजर राहिले. हीच खेळी महाराष्ट्रातील शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्षाने सुद्धा त्यावेळी केली होती असो. ममता बॅनर्जी यांचे अत्यंत जवळचे मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी त्यांनी तृणमूल काँग्रेसचा संपूर्ण राजकारणाचे गुपित भाजपला सांगितलं. आश्चर्य म्हणा किंवा धूर्त कावेबाज खेळी म्हणा पुन्हा २०२१ मध्ये मुकुल रॉय स्वगृही तृणमूल काँग्रेस मध्ये परतले.
मुकुल रॉय यांच्या मते, BJP is equal to TMC...
खात्री करून घ्यायची असेल तर त्यांचे हे स्टेटमेंट यूट्यूब वर ऐकायला मिळेल. असो..
२०२४ लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या, एरवी भाजप विरोधाची पुंगी वाजवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीत सामील व्हायला खूप आढेवेढे घेतले. हो नाही करत सामील व्हायला तयार पण झाल्या. कुठे माशी शिंकली माहीत नाही ममता बॅनर्जी यांनी भाजप विरोधी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला हूल दिली. आणि ऐनवेळी घुमजाव करत एकला चलो रे ची अडेलतट्टू भूमिका घेतली. आणि २०२४ लोकसभा निवडणुका लढवल्या. हाच कित्ता बिहारमधील नितीशकुमार यांनी गिरवला. जे इंडिया आघाडीचे निमंत्रक होते. याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाला. बीजू जनता दल, बहुजन समाज पार्टी, जनता दल युनायटेड, तेलंगणा राष्ट्रसमिती, आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेना या आतून भाजपबद्दल ममत्व असलेल्या प्रादेशिक पक्षांची पुढं जाऊन भाजपने काय हालत केली हे सगळा देश जाणतो आहे. पुढचा नंबर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाचा असणार लिहून ठेवा.
असंगाशी संग म्हणजे प्राणाशी गाठ होय. ज्या भाजपच्या मदतीने ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला वाकुल्या दाखवल्या त्याच भाजपने त्यांची राजकारणातील सद्दी संपुष्टात आणली. ममता बॅनर्जी यांनी ज्या भाजपासाठी सलग ३५ वर्षे सत्तेत असलेल्या पश्चिम बंगालमधील कम्युनिस्ट पक्षाला घरघर लावली. त्याच भाजपने आज ममता बॅनर्जी यांना रस्त्यावर आणलं. कालाय तस्मै नमः ...! तुम्ही म्हणाल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाशी आघाडी का केली नाही? तर मित्रहो!! ममता बॅनर्जी कधीही विश्वासास पात्र नव्हत्या नाहीत आणि भविष्यातही नसतील. त्या काँग्रेसला खिजगणतीत धरत नाहीत. मग उगीच पाठी पडण्यात काय अर्थ?
जिथं तुम्हाला गृहितच धरलं जात नाही तिथं कसली युती? कसली आघाडी? कसलं गठबंधन? आज तृणमूल काँग्रेस पक्षाचा पराभव हे ममता बॅनर्जी यांच्या २९ वर्षाच्या संधीसाधू अहंकारी राजकारणाचा परिपाक आहे. भाजपने मतदारांची SIR नामक गोंडस नावाखाली निवडणूक आयोगाला हाताशी धरून  केलेली छाटणी ही बाब पण ममता बॅनर्जी यांच्या दारूण पराभवाला कारणीभूत ठरली. ही बाब कुणीही नाकारू शकत नाही. ज्या ९० मतदारसंघात मतदार छाटणी केली गेली निवडणूक आयोगाने SIR नावाखाली तिथं भाजपचे उमेदवार निवडून आले. ही ठरवून केलेली राजकीय हरामखोरी आहे. ही मत चोरी नव्हे मत दरोडा आहे यात वादच नाही. पण म्हणून ममता बॅनर्जी यांनी केलेल्या अर्थशून्य राजकीय तडजोडी आणि पडद्यामागील खेळ्या कधीही समर्थनीय असूच शकत नाहीत. जे पेराल तेच उगवेल हा सृष्टीचा नियम सर्वव्यापी लागू होतो. जननायक पंडित राहुल गांधी यांच्या शब्दात,
एकवेळ तुम्ही भाजप समर्थक असता किंवा भाजप विरोधक अधले मधले काठावरचे असं काहीही नसतं.
येत्या काही काळात हे असे काठावरचे, दोन्ही दरडी वर पाय ठेवून असलेले हवसे नवसे गवसे भाजपच्या इडी, CBI, निवडणूक आयोग यांच्या मदतीने राजकारणातून पालापाचोळ्या सारखे उडून गेलेले दिसतील.



सुनने की भी क्षमता रखीये.....!

"सत्तेच्या मस्तीत शब्दांचं भान सुटलं की पद मोठं असूनही व्यक्तिमत्त्व छोटं दिसतं. महाराष्ट्राला शिवराळ भाषा नाही, तर सुसंस्कृत नेतृत्व अपेक्षित आहे. विरोधकांना 'कुत्रे ', 'भाड्याचे टट्टे', 'एकेकाला बघून घेऊ' म्हणण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्या. भाषा जितकी घसरते, तितकी राजकारणाची पातळीही घसरते. मुख्यमंत्रीपद हे राज्याच्या संस्कृतीचं प्रतीक असतं. त्या खुर्चीतून अपमानास्पद भाषा शोभत नाही. महाराष्ट्र उत्तर देतो, पण सभ्यतेने. ज्यांच्याकडे उत्तरं नसतात, तेच टीकाकारांवर वैयक्तिक हल्ले करतात. लोकशाहीत प्रश्न विचारणारा 'भाडोत्री' नसतो, तर जागरूक नागरिक असतो. महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री पाहिले; पण विरोधकांना अशा भाषेत हिणवणारे मुख्यमंत्री पाहून खरोखर खंत वाटते. शब्द माणसाची उंची दाखवतात. जनतेचा आवाज 'भुंकणं' वाटत असेल, तर लोकशाहीची व्याख्याच बदलावी लागेल. मतभेदांचा आदर करणं हेच लोकशाहीचं सौंदर्य आहे. अहंकाराची भाषा काही दिवस चालते; पण शेवटी निर्णय जनताच देते. महाराष्ट्राने यापूर्वीही अहंकाराचा पराभव केलाय अन् पुढेही करेल! मुख्यमंत्र्यांवर, सरकारवर टीका म्हणजे महाराष्ट्राची बदनामी नव्हे! तेव्हा सुनने की भी क्षमता रखीये...!
  ......................................................
*वि*धानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण ऐकलं. अपेक्षित होतं की, महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था, पेपर फुटी, महिला सुरक्षा, आझाद मैदानावर विद्यार्थी अन् कर्मचारी आपापल्या प्रश्नांना घेऊन भर पावसात करत असलेली आंदोलने या सगळ्यांवर मुख्यमंत्री विस्तृतपणे मांडणी करतील. पण चर्चेचा मुख्य विषय होता तो मिसिंग लिंक. तो असायला हरकत नाही कारण एवढा मोठा गवगवा झालेला महत्त्वकांक्षी प्रकल्प जर वादाच्या भोवऱ्यात सापडत असेल तर मुख्यमंत्री म्हणून भूमिका मांडणं अतिशय स्वाभाविक आहे. पण ती भूमिका मांडताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी विचारलेले प्रश्न खेळकर वृत्तीने घेण्यापेक्षा कुत्ते, भाडे के टट्टू, एक कोटी खोटे बोलणारे लोक मेल्यानंतर अशा खोटारड्यांचा जन्म होतो वगैरे वगैरे संसदीय कामकाजाला अशोभनीय भाषा वापरत शेरेबाजी केली. शेरेबाजी अर्थातच भक्तांना प्रचंड आवडली असेल. पण हे अतिशय नम्रपणे लक्षात आणून दिलं पाहिजे की, मिसिंग लिंकवर भाष्य करताना त्या संपूर्ण मांडणीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अपेक्षित असणारा विवेक मात्र इथं "मिसिंग" होता. महाराष्ट्रभरातले अनेक पक्ष, संघटना, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी विचारलेले प्रश्न याचं उत्तर  देणं ही मुख्यमंत्र्यांची नाैतिक जबाबदारी. ती उत्तरं देणं अपेक्षित आहे. ना की त्यांना कुत्रे, भाड्याचे टट्टू ही भाषा वापरणं! महाराष्ट्रातले प्रकल्प, कंत्राटे अदानी, अंबानी यांना दिलेत म्हणून विरोधक पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांवर टीका करत असतात. रस्त्याची कामे, कनेक्टिंग लिंक आणि अन्य प्रकल्पातला कथित भ्रष्टाचार, घोटाळे यावरून राज्य सरकारवर ही टीका होतेय. त्यात काही गैर नाही. काँग्रेस सत्तेवर असताना भाजपही अशी टीका अन् आरोप करत असे. पण तेव्हा मुख्यमंत्र्यांना कोणीही बदनाम केलेलं नाही. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न तर एकाही विरोधीपक्ष नेत्याने केलेला नाही. फडणवीस मात्र स्वतःवरची टीका म्हणजे राज्याची बदनामी असा दावा वा कांगावा करताहेत. त्यांच्यापेक्षा महाराष्ट्र प्रचंड मोठा आहे. महाराष्ट्राच्या विकासात अन् तो घडवण्यात सर्वच राजकीय पक्षांचे भाजपपेक्षाही खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे 'महाराष्ट्राची बदनामी अजिबात सहन करणार नाही!' हे फडणवीस यांचं विधान बाष्कळ, हास्यास्पद आहे. शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रयत्न, गुजराती आणि अन्य प्रांतातल्या लोकांमुळे मुंबईचा विकास झाला, असली विधाने आणि रामदास नसते तर शिवाजीला कोणी विचारलं असतं का, असा सवाल करणारे भाजपचे नेतेच महाराष्ट्रद्रोही आहेत, महाराष्ट्राची बदनामी त्यांनीच चालवलीय वा केलीय. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला, असा प्रकार कोणीच, विशेषतः सत्ताधारी नेत्यांनी तरी करू नये.
आठवतं का, २०२२ साली फडणवीस विरोधी पक्ष नेते म्हणून मांडणी करत असताना असे म्हणाले होते की, 'कृपया सत्ताधाऱ्यांनी हा गैरसमज काढून टाकावा की, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आहात..!' देवेंद्रजी आता हाच नियम तुम्हाला लागू होत नाही का? की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही आहात...!मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणं हा महाराष्ट्राचा अपमान कसा काय होऊ शकतो? ज्या मिसिंग लिंकवरून दिवसभरात लाखो लोक प्रवास करतात. त्या मिसिंग लिंकवर जर काही अघटीत घडलं असतं. जीवित हानी झाली असती तर त्याची जबाबदारी कुणाची होती? आणि लोकांनी प्रश्न विचारूच नयेत असं मुख्यमंत्री कसं काय म्हणू शकतात? मिसिंग लिंकचं लोकार्पण सोहळा करताना हा प्रकल्प मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी उभा केला असं म्हणत जर याचं श्रेय घेण्यासाठी चढाओढ होत असेल तर यात काही दोष निघाले तर ते स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री मनाचा उमदेपणा का दाखवत नाहीत. 'ताशी २५० किमी वेगाने वारे वाहिले तरीसुद्धा या प्रकल्पाला धक्काही लागणार नाही...!' हे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांचेच होते ना? मग एक कोटी खोटे बोलणाऱ्या लोकानंतर कुणाचा जन्म झालाय? मग नेमका त्याच संदर्भाने जर प्रश्न विचारला तर बिघडलं कुठे? कारण या मिसिंग लींकसाठी जे ७ हजार १२० कोटी रुपये खर्च झालेत ते पैसे कुठल्याही एका लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या खाजगी मालमत्तेतून खर्च केलेले नाहीत तर ते पैसे महाराष्ट्राच्या जनतेने भरलेल्या करातून झालेले आहेत! आता लोकांच्या पैशातून लोकांसाठी उभा राहिलेला उपक्रम जर लोकांच्या जीवावर बेतेल अशा परिस्थितीत काही घडत असेल तर लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारू नयेत..? लोकांनी प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री त्यांना कुत्रे आणि भाडे के टट्टू म्हणणार का..! म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीभोवती सतत फक्त आणि फक्त स्तुतीपाठकांचा गराडा असायला हवा. विरोधक म्हणून कोणी आरसा दाखवूच नये का? अन् दाखवला तर तुम्ही त्यांना कुत्रे आणि भाडे की टट्टू म्हणणार? तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राचा अपमान तर होत नाहीच नाही परंतु एका जबाबदार पदावरची व्यक्ती म्हणून तुम्हाला प्रश्न विचारणं म्हणजे तरी तुमचा अपमान असं तुम्ही कसं गृहीत धरता? जर विरोधकांनी तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारायचा नाही तर मग अधिवेशन आणि हे सगळे प्रश्न-उत्तर याचा फार्स तरी कशासाठी केला जातो? खरंतर तुम्ही ज्या त्वेषाने बोलत होतात हा त्वेष, हा आवेग, हा संताप व्यक्त करण्याची जागा आणि वेळ चुकलीय हे कोणीतरी सांगायची गरज आहे. 
काँग्रेसच्या राजवटीत मंत्री, खासदार, आमदार घोटाळे करत होते. कंत्राटदारांना, कर्मचार्‍यांना हाताशी धरून भानगडी करत. एखादा घोटाळा उघडकीस आला तर काँग्रेस त्या प्रकरणात स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी चौकशी समिती नेमत. त्या समितीच्या अहवालात कर्मचारी, कंत्राटदारच दोषी आढळे, मग काँग्रेसनेते वजन वापरून त्यांना कमीत कमी शिक्षा, आर्थिक दंड होईल याची काळजी घेत. याउलट भाजपचं आहे. भ्रष्टाचार शब्द आला तरी ते नाकाने वांगी सोलतात. आम्ही निष्पक्ष, गुणवत्तेलाच प्राधान्य देणारे, अशा गप्पा मारू लागतात. चुकीचं काम करताना दिसला तर ब्लॅक लिस्ट करू अशा धमक्या देतात परंतु हे सगळं नाटक असतं. मीडिया आणि लोकांना मूर्ख बनवण्याची ट्रिक असते. याचं बिंग कधी ना कधी फुटतंच. ते फुटलं की भ्रष्टाचार, गैरप्रकार, गुणवत्तेशी तडजोड हे उघड झाल्यावर भाजपची एक धोरणात्मक चूक होते. पहिल्यांदा त्यांचा आयटी सेल भ्रष्टाचार उघड करणार्‍या व्यक्तीचं, संस्थेचं, पक्षाचं चारित्र्यहनन करायला करतो. त्यानंतर आमचा नेता किती महान, त्यागी आहे, जीवन किती साधं आहे याच्या गप्पा सुरू होतात. ज्या मुद्द्यावर जनक्षोभ आहे त्यावर कोणीच बोलत नाही. शेवटी मग नेता अवतरतो. हे सगळं काम योग्य पद्धतीने झालंय. विरोधक, मीडिया आणि सोशल मीडियाने उठवलंय असं सांगून यावर पडदा टाकतो. यात कंत्राटदार, सरकारी कर्मचारी वाचवले जातात. हे प्रकरण दाबण्यात यशस्वी झालोत हा भ्रम असतो. लोकांच्या मनात नकारात्मक प्रतिमा निर्माण झालेली असते. कनेक्टिंग लिंक प्रकरणी फडणवीस प्रकरण दाबताहेत हा आक्षेप लोक घेतात, तो चुकीचा नाही. भाजपच्या या कार्यशैलीमुळे ते लोकांच्या मनातून वेगाने उतरत आहेत. कर्मचारी, कंत्राटदारांना वाचवणं म्हणजे हे सुद्धा या भ्रष्टाचारात आकंठ बुडालेत म्हणून पाहिलं जातंय. भ्रष्ट कर्मचारी, कंत्राटदार त्यांच्या मरणाने मरतील, परंतु त्यांना वाचवण्याच्या नादात भाजप प्रतिमा डागाळून घेतेय, इतकंच नाही तर राजकीय भवितव्य धोक्यात घालतेय हे नेत्यांना सांगणं आवश्यक आहे.
जेव्हा राज्याचे आराध्य दैवत असणारे, राज्यातल्या २० कोटी जनतेच्या नसानसात वाहणारा विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज...! महाराजांचा पुतळा समुद्रकिनारी पडतो तेव्हा खरा महाराष्ट्राचा अपमान होतो. या आराध्य दैवताबद्दल राज्यपाल कोशारी अपशब्द काढतात, कोरटकर अपमान करतो, तेव्हा तो महाराष्ट्राचा अपमान असतो. राज्यात परीक्षांचे पेपर फुटतात, राज्यातले शिक्षण खाते वा स्पर्धा परीक्षा घेणारा विभाग यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतात तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो. विधिमंडळ परिसरात आमदार एकमेकांच्या अंगावर धावून जातात, अर्वाच्य शिवीगाळ करतात तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो, लोकप्रतिनिधी एखाद्या प्रकाशकाला आईबहिणी वरून शिवीगाळ करतो तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो, तीन-चार वर्षांच्या निष्पाप कळ्या खुलण्याआधी कुस्करून टाकल्या जातात, त्यांच्या सुरक्षिततेसाठी गृहखाते अपयशी ठरतं तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो..! महिलांचं लैंगिक शोषण होतं, त्यात महिला आयोगाच्या अध्यक्षाला खुर्ची गमवावी लागते तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो. उपमुख्यमंत्र्यांचं अपघाती निधन होतं मात्र त्यांचीच एफआयआर एकही पोलीस स्टेशन नोंदवून घेत नाही तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो. ड्रग्सचे साठे सापडतात मात्र त्याची पाळमुळं खणून काढली जात नाहीत आणि महाराष्ट्राचा उल्लेख "उडता महाराष्ट्र" होतो तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो. वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअर बस, बल्क ड्रग पार्क, असे प्रकल्प बाहेर जातात तेव्हा महाराष्ट्राचा अवमान होतो. महाराष्ट्रात मराठी माणसाची जगण्याची कोंडी होते, त्याला त्याच्याच राज्यात राहायला घर देण्यासाठी नाकारलं जातं तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो... महाराष्ट्राचा अपमान झालेले असे अनेक क्षण, अशा अनेक घटना ज्यावर अत्यंत त्वेषाने व्यक्त होणं अपेक्षित होतं तेव्हा मात्र मुख्यमंत्री मूग गिळून  गप्प राहिले अन् जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा मात्र महाराष्ट्र धर्माच्या पांघरूणाआड लपण्याचा प्रयत्न होतोय हे खरं नव्हे. मुख्यमंत्री नार्सिसिझम आत्ममुग्धताच्या विकाराचे बळी ठरताहेत का? सभागृहात विरोधी पक्ष नेताच नको, विरोधी स्वर नको, टिका नको असं असेल तर हे सारं चिंताजनक आहे. हे कुठल्याही द्वेषापोटी वा रागापोटी नाही तर अत्यंत सम्यक विचार करत हे मांडतोय. आज हे आवर्जून लिहावंसं वाटलं त्याचं कारण सभागृहाच्या पटलावरून ज्या तिरस्कृत, हिणकस पद्धतीने, अहंभावाने जनतेला कुत्ते, भाडे के टट्टू, बघून घेऊ म्हणालात यावरून मुख्यमंत्र्यांनि महाराष्ट्राचा अपमान नक्की केलाय. हे महाराष्ट्रासमोर, समर्थक स्तुतीपाठकांच्या समोर जरी मान्य केलं नाही तरी जेव्हा कधी एकांतात आरशासमोर मुख्यमंत्री उभे राहतील तेव्हा निश्चितपणे त्यांचं अंतर्मन मान्य करेल की होय, आज आपण सभागृहात महाराष्ट्राचा अपमान केलाय असो.....! 
चौकट
मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला तेव्हा किती आनंद झाला होता? पण राज्यप्रमुखांनी विधीमंडळात मातृभाषेचा जो वापर केला अन् आपलं म्हणणं परिणामकारक व्हावं म्हणून उर्दूत शेरोशायरी केली. मराठीतून भावना व्यक्त करतांना त्रुटी राहू नये याची दक्षता घेतांना विरोधकांवर जे आसूड ओढलेत त्याचं समर्थन कोण करील? हे आसूड नव्हे तर सूडबुद्धीने केलेली शेरेबाजी होती. माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तर ती अधिकच खटकली. जी भाषा पंतप्रधान मोदींनाही शोभत नाही ती मुख्यमंत्र्यांना कशी शोभेल? याचाही विचार करायलाच हवा होता. सत्तारूढ पक्षाकडून होणाऱ्या अक्षम्य चुका उघड करून त्यावर कडवट टीका करणं हे प्रतिपक्षाचं कामच आहे त्यात लक्ष घालून दुरुस्ती करण्याऐवजी भावनाप्रधान होण्यात काय हंशील आहे? एकदा पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावर फेरफटका मारून या. पोटातले पाणीही हलणार नाही. गेली त्रेपन्न वर्षे पुणेकर याचा अनुभव घेताहेत. जंगली महाराज रस्ता बांधला तेव्हा १९७६ साली मुख्यमंत्री कदाचित शाळकरी विद्यार्थी असतील. ज्या आसनांवर बसून मुक्ताफळे उधळली ते आसन अफाट कर्तुत्वामुळे मिळालंय अशी भ्रामक कल्पना असेल तर प्रश्नच मिटला. त्या आसनावर यापूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, अब्दुल रहमान अंतुले, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, मनोहर जोशी हे सुसंस्कृत राज्यप्रमुख बसले होते. याचं स्मरण करुन योग्य भाषा वापरणं यात महाराष्ट्राची संस्कृती दिसेल. कोण कोणाला विचारतं याचा फैसला आगामी निवडणुकीत जनता-जनार्दन करेलच अर्थात निवडणुका घेतल्या तर, नाहीतर लोकप्रतिनिधींचा बाजार चालूच आहे. पक्षांतर करणारे बाजारू लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा ठेवावी? अशा खरेदी केलेल्या बहुमताच्या जोरावर उर्मट भाषा वापरणार असाल तर महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध पेटून उठणं ही काळाची गरज आहे. उलट त्याचं लंगडं  समर्थन करणं हे सत्तारूढ पक्षाकडून अपेक्षित नाही...!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

स्वरयोगिनी जानकी अम्मा

सिस्टला श्रीराममूर्ती जानकी म्हणजेच एस. जानकी या नावाने सुप्रसिध्द असलेल्या प्रसिध्द पार्श्वगायिका जानकीअम्मा यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी म्हैसूर येथे शनिवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत विश्वातला आणखी एक तेजस्वी तारा निखळला आहे. सहा दशकांहूनही अधिक काळ एस. जानकी यांनी आपल्या अद्वितीय स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. 
२३ एप्रिल १९३८ रोजी आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर येथे जन्मलेल्या या थोर गायिकेने शास्त्रीय गायन वा संगीताचे कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता केवळ आपल्या उपजत गानकौशल्याच्या बळावर मिळवलेली अफाट लोकप्रियता विस्मयचकित करणारीच म्हणावी लागेल. आपल्या गायनकारकिर्दीत त्यांनी कन्नड, तमिळ, तेलुगू, तुळू, मल्याळम, हिंदी, कोकणी अशा वीसच्यावर भारतीय भाषांमधून गाणी गायली आहेत. इंग्रजी, जपानी, जर्मन आणि फ्रेंच इत्यादी विदेशी भाषांमधील गाणीसुध्दा त्यांनी गायिली होती. तब्बल ४८ हजारांच्या वर गाणी गाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. दक्षिण चित्रपटसृष्टीतील इलैयाराजा, एम. एस. विश्वनाथन ते ए. आर. रहमान अशा जुन्या नव्या नामवंत संगीतकारांसोबत त्यांनी काम केले. कन्नड भाषेत त्यांनी सर्वाधिक गाणी गायली आहेत. हेमवती या कन्नड चित्रपटातील 'शिव शिव एन्नदा' हे गीत आपल्या गायन प्रवासातले सर्वात कठीण गीत होते असे त्या सांगत असत. २०१३ साली भारत सरकारकडून जाहीर झालेला पद्मभूषण पुरस्कार त्यांनी नम्रपणे नाकारला होता, जानकी अम्मांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकीय आणि चित्रपट तसेच कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाच्या एक महत्त्वपूर्ण साक्षीदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा आवाज आजही रेडिओ, दूरदर्शन, संगीतमैफिली आणि डिजिटल माध्यमातून रसिकांच्या मनाला स्पर्श करतो. काळ बदलला, संगीतशैली बदलली, तंत्रज्ञानही बदलले पण जानकीअम्मांच्या आवाजातील जादू आजही तितकीच ताजी आणि भावस्पर्शी आहे. आवाजावर विलक्षण पकड असलेल्या एस. जानकी यांनी प्रेमगीत, विरहगीत, भक्तिगीत, लोकगीत, अंगाईगीत, शास्त्रीय गीत अशा अनेक प्रकारच्या गाण्यांमधून स्वतःची गायकी सिध्द केली होती. चारवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी तसेच कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश राज्यांकडून अनेक राज्य पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. २०१७ साली म्हैसूर येथे आयोजित एका संगीत कार्यक्रमात त्यांनी एक मल्याळम अंगाई गीत गाऊन साठ वर्षांच्या आपल्या गायन कारकिर्दीला विराम दिला होता. जानकीअम्मांचा आवाज संगीत प्रेर्मीच्या आठवणीत आणि भारतीय संस्कृतीच्या सामूहिक स्मरणात कायम गुंजत राहाणार आहे. 
चोल, पल्लव आणि विजयनगर साम्राज्य काळात एस. जानकी जन्मल्या असत्या तर त्यांचा इतिहास आतापेक्षा अधिक वेगळ्या आणि ओजस्वी शब्दांत लिहिला गेला असता. राजा बुक्क राया याच्या कलावंतांच्या ताफ्यातील रामप्पा ह्या महान शिल्पकाराने जानकी यांचेही उत्कट आर्त शिल्प बनवले असते! शतकानु शतकांपासून उत्तरेकडील राज्यात नाचगाणं व्हायचं मात्र ते कोठयावर चालायचं. त्या बदनाम गल्ल्यात जाऊन गाणी ऐकणारी दोनच प्रकारची माणसं होती, एक म्हणजे अट्टल शौकीन आणि दुसरे म्हणजे अय्याश कदरदान! 
मात्र दक्षिणेकडील इतिहास पाहिला तर असं लक्षात येतं की तिकडे तवायफ आणि कोठे नव्हते! मात्र तिथे वेगळा पर्याय होता, आणि तो देवदासी परंपरेचा होता! या परंपरेतील स्त्रियांना नाचगाणं करण्यास भाग पाडले जाई. पुढे जाऊन हे सगळं त्यांच्या अंगवळणी पडलं की त्या बायका त्यात मुरत असत! नाचगाणं त्यांच्या रोमरोमात भिनत असे आणि त्यांचे एक वेगळेच रूप समोर यायचे. सद्र कचेरी किंवा सदर कचेरी ह्या नावाने याला तत्कालीन राजेशाहीतही मान्यता असे. पुढे जाऊन मंदिर, सभागृह आदी ठिकाणी देखील देवदासी नाचू लागल्या  गायकी सादर करू लागल्या. हयात प्रामुख्याने पदम आणि जावळी हे दोन प्रकार असत. अत्यंत संथ लय असलेली, शृंगारिक आणि भावपूर्ण गाणी पदम श्रेणीत असत. यामध्ये नायक आणि नायिकेमधील प्रेम, विरह आणि मिलन यांचे वर्णन असे. जावळी हा गाण्याचा प्रकार 'ठुमरी'शी अत्यंत साधर्म्य असणारा. जावळी ही जलद लयीत गायली जाणारी, काहीशी चंचल, थेट आणि थेट शृंगारिक भावना व्यक्त करणारी गाणी असत. ही गाणी प्रादेशिक भाषांमध्ये तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम असत. 
ह्या गायकीत ख्यातनाम होण्यासाठी ज्या प्रकारचा स्वर, ज्या प्रकारचे आलाप घेणं अपेक्षित असे, आरोह अवरोहवरची हुकूमत आवश्यक मानली जाई त्यात जानकी यांचा आवाज अगदी परफेक्ट सूट होतो. अशी वैशिष्ट्ये असलेली त्यांनी गायलेली गाणी नजरेसमोर आणली तर हे नक्की पटेल. विशेषतः त्यांची कन्नड आणि तमिळ गाणी अधिक चपखल ठरतील. 'सत्यमेव जयते' ह्या हिंदी सिनेमामधलं दिल में हो तुम.. आंखो में तुम' हे गाणं नव्याने ऐका, तुम्हालाही उमगेल. असो. दाक्षिणात्य भाषांमध्ये विपुल गायन केलेल्या विख्यात गायिका एस. जानकी यांचे काल निधन झालं. त्यांच्याविषयी अनेकांनी उत्तम लेखन केलंय. एस. जानकी यांच्याविषयीच्या काही नोंदींची दखल घेतली पाहिजे असं मनोमन वाटते. साऊथच्या फिल्म आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जानकीअम्मा ह्या नावानेच त्या ओळखल्या जायच्या. त्यांच्या क्लिप्स किंवा फोटो पाहिले तर लक्षात येईल की एके काळी त्या रंगीत साडी घालून, साधाच पण नेटका शृंगार करून गायनाला उभ्या असत. मात्र मागील तीन दशकातले त्यांचे फोटो, व्हिडीओ क्लिप्स पाहिल्या तर त्यांचे राहणीमान आणि वेशभूषा लक्षणीय बदलल्याचे जाणवते. 
कपाळावर आडवा शिवगंध लावलेल्या आणि पांढुरक्या शेडच्या साडीत त्या सर्रास दिसू लागल्या. कसलाही साजशृंगार नाही की, कसला लेप नाही! जे आहे ते असे आहे अशा पद्धतीचे त्यांचे दर्शन होई. इतकेच नव्हे तर एस. जानकींची पहिल्या पाच दशकातली गाणी आणि शेवटच्या दोन दशकातली गाणी पाहिली तर एक फरक नक्की लक्षात येईल की, त्यांनी शांत शीतल मधुर गाणी नंतरच्या काळात अधिक गायलीत. ह्या सगळ्यामागे एक गोष्ट होती..  
एस. जानकींची विरह गीते अधिक फेमस झालीत. त्यांच्या आवाजाचा खास स्वर आणि कोमलता त्यात अधिक गहिरी जाणवते. कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या चारही भाषेत त्यांनी हिट गाणी दिली आहेत. एस. पी. बालसुब्रमण्यम आणि येसुदास हे त्यांचे आवडते सहगायक. इलायराजाने त्यांच्या गायकीला हिऱ्याचे पैलू पाडले. 
एस. जानकी यांचा जन्म गुंटूर येथील पल्लापटला, रेपल्ले गावात एका तेलगू भाषिक ब्राह्मण कुटुंबातला. करीमनगर जिल्ह्यातील सिरसिला येथे डिस्पेन्सरी चालवणारे त्यांचे वडील शिष्टला श्रीराममूर्ती हे शिक्षक आणि आयुर्वेदिक डॉक्टर होते. जानकींना लहानपणापासूनच संगीताची आवड होती आणि त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी सादरीकरण करण्यास सुरुवात केली. त्यांनी नादस्वरम विद्वान श्री पैडीस्वामी यांच्याकडून फक्त एक वर्ष संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी कोव्वूर येथे वाराणसी बलरामय्या यांच्याकडून काही गाणीही शिकली. त्यांना चित्रपट संगीताची प्रेरणा मिळाली आणि चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्या रंगमंचावर लता मंगेशकर, पी. लीला, जिक्की आणि पी. सुशीला यांची गाणी सादर करत असत. मात्र ह्या सगळ्याहून अधिक प्रेरणा त्यांना एका व्यक्तीने दिली आणि ते म्हणजे त्यांचे मित्र, गुरु, हितैषी आणि प्रियकर असणारे व्ही. रामप्रसाद! रामप्रसाद यांनी जानकींच्या करियरला खरा आकार दिला. पुढे जाऊन ते दोघे विवाहबद्ध झाले. प्रभू रामचंद्र यांच्या पत्नीचे नाव जानकी होते आणि रामप्रसाद यांच्या पत्नीचे नावही जानकीच होते! एक जान है हम अशा पद्धतीचे त्यांचे प्रेम होते. मुरली कृष्णा हे त्यांचे एकुलते एक अपत्य! ह्या त्रिकोणी संसारात अफाट सुख होते. मात्र १९९६ मध्ये रामप्रसाद यांचे निधन झाले आणि जानकी अम्मानी काही काळ स्वतःला कोंडून घेतलं. आपल्या रामाशिवाय जगणं त्यांना मान्य नव्हतं. अखेर त्यांची समजूत काढण्यात आली. 
सर्वांना वाटलं, लवकरच सारं सुरळीत होईल. काही अंशी गाडी मार्गी लागली देखील, मात्र काही ओरखडे तसेच राहिले जे जगाला दिसले नाहीत मात्र  जानकीच्या काळजावर त्याचे चरे कायम राहिले. त्यांचे बाह्यवर्तन पद्म गायकी गाणाऱ्या गायिकेसारखे झाले! त्यांनी आयुष्यातले सर्व रंग वर्ज्य केले. शृंगार कायमचा त्यागला. एखाद्या संन्यस्त गायिकेसारख्या त्या दिसू लागल्या. त्यांच्या चाहत्यांनी समजून घेतलं की, जानकीने रामाचं निर्गमन काळजाला लावून घेतलंय! ह्यानंतर त्यांची गायकीही धीरगंभीर शांतशीतल होत गेली. दरम्यान वाढत्या वयाने त्यांना शारीरिक थकवा येऊ लागला. भरतनाट्यम मध्ये निपुण असणाऱ्या उमासोबत मुरली कृष्णचे लग्न झाले. मुरली कृष्णने गायन संगीत अभिनय क्षेत्र निवडण्याऐवजी नृत्याविष्कारावर जीव लावला. त्यात त्याने नाव कमावले. उमा आणि मुरली यांना दोन मुली झाल्या, त्याही उत्तम नर्तिका आहेत. अलीकडील काळात जानकी अम्मा ह्या सुखात रमल्या होत्या मात्र पुन्हा एकदा त्यांना वियोगाचा सामना करावा लागला. सहा महिन्यापूर्वीच त्यांचा एकुलता एक मुलगा मुरली कृष्ण याचे वयाच्या ६५ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. जानकी अम्मा कायमच्या कोलमडून गेल्या. त्यांनी सार्वजनिक जीवनातून स्वतःला अलग केलं. आधी पती आणि नंतर एकुलता एक मुलगा ह्यांच्या जाण्याने त्यांची उमेद नष्ट झाली आणि त्यातच त्यांचे काल निधन झाले. त्यांच्या आवाजातले गगनवो येल्लू हे कन्नड गाणं ज्यांनी ऐकले असेल त्यांना एस. जानकी यांच्या आवाजाचा खरा टोन नक्की उमजेल. 
मुरुगन हे दक्षिणेकडचे आद्य दैवत! मुरुगनचे एकही मंदिर नसेल जिथे एस. जानकीचे सिंगार वेळनि देवा हे गाणं लावलं जात नसेल! मुरुगन, एस. जानकी आणि हे गाणं यांचं एक अजब समीकरण आहे! पोस्टच्या सुरुवातीला चोल पल्लव यांचा उल्लेख त्यांना किती तंतोतंत लागू होतो हे कुणाला जाणून घ्यायचे असेल तर त्याने हे गाणे जरूर ऐकावे. दुसरी गोष्ट एस. जानकी यांच्या चाहत्यांची! जेन झेड पासून ते शंभरी गाठलेले चाहते मिळण्याचे भाग्य असणारी विविध भाषांमध्ये हिट गायकी सादर करणारी चतुरस्त्र गायिका सद्यकाळात तर दृष्टीक्षेपात नाहीये. कदाचित चित्रा यांचे नाव त्यात असू शकेल, मात्र चित्रा स्वतःच जानकी भक्त आहेत!     
एका सुवर्णकार कुटुंबात जन्माला येऊनही वयाच्या अठराव्या वर्षी आईचे निधन झाल्यावर घर सोडून परागंदा झालेल्या फारूक कैसरने त्याची पत्नी आयेशा हिच्यासाठी एक गाणं लिहिलेलं - दिल में हो तुम, आँखो में तुम! सत्यमेव जयते चित्रपटात विनोद खन्ना आणि अनिता राज यांच्यावर हे गाणं चित्रित झालं. बप्पीदा आणि जानकी यांनी हे अप्रतिम गाणं गायलं. चित्रपट रिलीज झाल्यानंतर बरोबर सहा महिन्यात फारूक कैसरचे निधन झाले. त्यांच्या दोन मुलांचेही निधन झाले. हे गाणं नीट ऐकलं तर लक्षात येईल की, ही तर एस. जानकी यांच्या आयुष्याची कथा आहे! त्यांच्या निधनाने एका पर्वाची सांगता झालीय. एस. जानकी यांच्या जाण्याचं सर्वाधिक दुःख चित्रा यांनाच झालं असेल, त्यांचं औदासिन्य लवकर दूर होवो! स्वरयोगिनी जानकीअम्मा यांना भावपूर्ण आदरांजली.

Monday, 6 July 2026

राम नाम जपना, पराया माल अपना...!

"कोट्यवधींचं दान, दागिने, चांदीच्या, सोन्याच्या, जडजवाहीराच्या विटा अयोध्येच्या राम मंदिरातून गायब झाल्यात. त्याची चौकशी सुरू आहे. मात्र सूत्रधाराला अजून हात लावला गेला नाही. हे जर विरोधकांच्या काळात झालं असता तर आगडोंब उसळला असता. चर्चेचा, आरोपांचा धुरळा उडाला असता. अगणित दान चोरीचा एवढा बभ्रा झाला पण सगळ्यांना अचानक न्यायिक प्रक्रियेची आठवण झालीय. अगदी प्रभू रामसुद्धा वर बसून विचार करत असतील, बंधूंनो, तुम्ही माझ्या नावाने निवडणुका लढवल्या, रथयात्रा काढल्या, संसदेत भाषणे दिली आणि टीव्हीवर चर्चा केली, पण आता जेव्हा मला अर्पण केलेल्या देणग्यांचा हिशोब विचारला जातोय, तेव्हा सगळ्यांचा आवाज का गेलाय? प्रभू रामाची मूर्ती बोलत नाही. जर ती बोलली असती, तर तिनेच सर्वात आधी विचारलं असतं, भक्तांचे पैसे कुठे गेले? पण आपले नेते भाग्यवान आहेत की मूर्ती प्रश्न विचारत नाहीत, फक्त जनताच विचारतेय. आणि जनतेचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्याकडे प्रवक्ते, निवेदक, आयटी सेल, ट्रोल आर्मी, राष्ट्रवाद, परकीय कट, शहरी नक्षलवादी, तुकडे तुकडे गँग सगळं काही आहे. फक्त एकच गोष्ट कमी आहे, ती म्हणजे हिशेब!"
................................................
*क*बीराच्या नावानं एक दोहा सांगितला जातो
लूट सके तो लूट ले, राम नाम की लूट।
पाछे फिर पछताओगे, प्राण जाहि जब छूट॥
राम नाम की लूट है, लूट सके तो लूट।
अंतकाल पछतायेगा, जब प्राण जायेंगे छूट॥
अरे, रामाच्या नावानं लूट चालली आहे, यात हात धुवून तू देखील लुटून घे. मरायला टेकशील, तेव्हा आपण पुढच्या पिढ्यांना मालामाल करण्यात कसूर केली असं जाणवून तुला पश्चात्ताप होईल! तसंही याला समर्थन म्हणून अलीकडच्या इतिहासात कवी अंजान म्हणून गेले आहेतच, 
आपका तो लगता है बस यही सपना।
राम नाम जपना, पराया माल अपना॥
चोर हुशार होते. त्यांना अचानक होणाऱ्या झडतीचा आधीच सुगावा लागला होता. त्या दिवशी, त्यांनी एकेक करून नोटांचे बंडल पिशवीत लपवण्यासाठी शौचालयात प्रवेश केला. अयोध्येतल्या प्रसिद्ध रामलल्ला मंदिराच्या स्वच्छतागृहात एका सफाई कर्मचाऱ्याला नोटांच्या बंडलांनी भरलेली एक बॅग सापडल्यावर ही चोरी उघडकीस आली आणि पैशांचे बंडल कसे लाटले जात होते, याबद्दल धक्कादायक खुलासे आता समोर आले आहेत. यात शंका नाही की ते चोर एका टोळीचा भाग म्हणून काम करत होते आणि लुटलेला माल आपापसात वाटून घेत होते. ते हुशार आणि चलाख होते, आणि अचानक झडती घेण्याचे आदेश दिल्यास पकडले जाण्यापासून कसं वाचायचं हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. या चोरीच्या कथेची सुरुवात जूनच्या पहिल्या आठवड्यात होते. दानपेटी मोजणीसाठी एक मोठी खोली आहे, जिथं मंदिरातल्या दानपेट्या उघडल्या जातात आणि चार टेबलांवर चलनी नोटा अन् नाणी टाकली जातात. तिथं चार खुर्च्या असलेले एक मुख्य टेबल आहे, ज्यावर मोजणी कर्मचारी चलनी नोटा मोजण्यासाठी, त्यांचे ढीग आणि गठ्ठे बनवण्यासाठी बसतात. इथेच दान मोजणी कर्मचारी नोटांची बंडल, गठ्ठे आपल्या खिशात आणि अगदी मोज्यांमध्येही कोंबत असत. इथं एका पाळीत बावीस जण काम करतात मात्र  कोणाचीही झडती घेतली जात नव्हती. ते दुहेरी खिसे असलेले शर्ट आणि पॅन्ट घालून येत असत. हिशोब ठेवणं्यासाठी असलेल्या खोलीत खाण्याचे पदार्थ आणण्यासाठी मनाई असताना आणले जात होते. सरावलेले चोर झपाट्याने श्रीमंत होत होते. इथं पहिल्या दिवसापासूनच सर्व नियम धाब्यावर बसवले गेले. कार्यपद्धती अशी होती...! प्रत्येक कर्मचाऱ्याची दररोज झडती, खिसे असलेले कपडे घालण्यावर बंदी, मोजणीच्या खोलीत खाण्यावर बंदी, मोजणी चालू असताना खोलीबाहेर जाण्यास मनाई असे नियम आहेत.पण प्रत्येक नियम इथं धुडकावून लावला गेला. दानमोजणीवर देखरेख करण्याची जबाबदारी असलेले सुभाष श्रीवास्तव यांनीच सर्वात आधी हा नियम मोडला. पहिल्याच दिवशी, जेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांची झडती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते त्यांच्यावर ओरडले, 'आम्ही स्वयंसेवक आहोत, आमच्यावर संशय कसा घेऊ शकतो?' चंपत राय यांनी मग ते नियमच तातडीने बदलले. त्यांनी निर्देश दिले की, दररोज झडती घेतली जाणार नाही. झडती घेणं हे अयोध्यातल्या पोलिसांचे काम होतं, परंतु पोलिसांना या अर्पण नाणीे मोजणी कक्षाजवळ येऊ दिलं नाही. मोजणी कक्ष वगळता, मंदिराच्या परिसरातले सारे सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आलेत. दान पेटीतल्या नोटा, अर्पण वस्तू यांची मोजणी सुरळीतपणे पार पडावी हे अनिल मिश्रा यांचं कर्तव्य होतं. मोजणी करणारे सारे कर्मचारी अनिल मिश्रा यांचे नातेवाईक आणि चंपत राय यांचे उजवे हात असलेले टिन्नू यादव होते. यांना कुणाची अन् कोणतीही भीती नव्हती. सूत्रधारांचे ते जवळचे नातेवाईक होते. नोटांचे ढीग मोजून त्यांचे गठ्ठे बनवले जात असताना चोर एक-दोन गठ्ठे आपल्या पॅन्टमध्ये, अगदी मोज्यांमध्येही सरकवत असत. ते सीसीटीव्हीच्या कक्षेत आहेत याची त्यांनी पर्वा केली नाही. मग ही चोरी लक्षात कशी आली? तर जूनच्या पहिल्या आठवड्यात, हिशोब विभागातला एक कर्मचारी हा सारा प्रकार उघडकीस आणणारा ठरला. त्याने चंपत राय यांच्याकडे दान चोरी, पैशांची अफरातफर होत असल्याची तक्रार केली. चंपत राय यांनी मोजणी कक्षात अचानक झडती घेण्याचं ठरवलं. चोर हुशार होते. त्यांना या अचानक झडतीचा आधीच सुगावा लागला होता. त्या दिवशी, त्यांनी नोटांचे बंडल पिशवीत ठेवून त्या पिशव्या शौचालयात लपवल्या. या झडतीत त्यांना काहीही आढळलं नाही. चंपत राय यांनी माहिती देणाऱ्याला फटकारले. त्याने सांगितलं की, मोजणी करणारे कर्मचारी त्यांच्या खिशात नोटा कोंबत असल्याचं त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. नेमकं तेव्हाच सफाई कर्मचाऱ्याला बाथरूममध्ये लपवलेली नोटा असलेली पिशवी सापडली आणि हे सगळं मोठे प्रकरण उघडकीस आलं. चंपत राय यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं; त्यात त्यांना दिसलं की, मोजणी करणारे कर्मचारी अनेक वेळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या टप्प्याबाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते. तसंच, दोन-चार जण बंडलं खिशात कोंबत होते. ते पाहून चंपत राय थक्क झाले. त्यांनि सुरक्षारक्षकांना सोबत घेतलं, आणि एका मोजणी कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन ११०० अमेरिकन डॉलर्ससह जवळपास ८० लाख रुपयांची रोकड, त्यांच्या बँक खात्यांमधून २० लाख रुपये जप्त केले. एकूण एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात आली. चंपत राय संतप्त झाले, चिंतित आणि निराशही होते. पण तरीही ते हे प्रकरण पोलिसांच्या हवाली करण्यास तयार नव्हते. चंपत राय यांनी कबूल केलं की, या लोकांनी गुन्हा केलाय, पण जर हे प्रकरण पोलिसांकडं सोपवलं गेलं तर त्यांचं करिअर खराब होईल. राय यांचा युक्तिवाद असा होता की, आता पैसे परत मिळाले आहेत, त्यामुळे या लोकांना माफ करून त्यांना दुसरं काहीतरी काम दिलं पाहिजे.
तोपर्यंत या घटनांची बातमी सार्वजनिक झाली होती. या दानचोरीचा बोभाटा झाला होता. मग मोठ्या दबावानंतर चंपत राय एसआयटी चौकशीसाठी सहमत झाले. एसआयटीने शक्य तितके पुरावे गोळा केले. सुभाष श्रीवास्तव, टिन्नू यादव आणि इतर जवळपास ७० जणांची चौकशी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर एसआयटीला सत्य समजलं. त्यानंतर लगेचच, ट्रस्टला महागडे दागिने, देणग्या दान केलेल्या देणगीदारांच्या तक्रारींबद्दल टीव्ही चॅनलवर बातम्या येऊ लागल्या. राजू मनवाणी म्हणाले की, त्यांनी जागतिक सिंधी  असोसिएशनच्या वतीने २०० चांदीच्या विटा दान केल्या आहेत. ऑल इंडिया बुलियन ट्रेडर्स असोसिएशनचे उत्तर भारत प्रमुख अनुराग रस्तोगी म्हणाले की, त्यांनी चंपत राय यांना एक चांदीचा दिवा आणि चांदीच्या विटा दान केल्या आहेत. दुसऱ्या भक्त अनिता भारद्वाज यांनी चांदीची कागभूषुंडी दान केली होती, तर हैदराबादचे श्रीनिवास शास्त्री यांनी ट्रस्टला चांदीच्या चरण पादुका, चांदीच्या विटा आणि सोन्याचा मुलामा दिलेले चांदीचे धनुष्य दान केल्याचं सांगितलं.
दानपेट्यांची जागा लहान असल्यामुळे, या देणग्या वैयक्तिकरित्या सुपूर्द करण्यात आल्या. पण त्याची नोंद झालेली दिसत नाही. राम मंदिरात एक काउंटर आहे जिथे अशा देणग्या स्वीकारल्या जातात. एसआयटीला काही महागडे दागिने चंपत राय यांच्या निवासस्थानी सापडले. त्याच्याकडे त्या अर्पणांची यादीही होती. पण बाकीच्या भेटवस्तू कुठे ठेवल्या आहेत हे त्याला आठवत नव्हतं. चंपत राय यांनी जप्त केलेली ८० लाख रुपयांची रोकड आपल्या तिजोरीत ठेवली होती. तोपर्यंत चोरांनी पैसे कसे चोरले हे कबूल केलं होतं. आता प्रश्न असा आहे की, किती रोख रक्कम आणि दागिन्यांचा हिशोब अजून लागलेला नाही? जानेवारी २०२५ मध्ये प्रयागराज कुंभमेळ्यादरम्यान अयोध्येत भाविकांची प्रचंड गर्दी झाल्यावर चोऱ्या वाढल्या पर्यवेक्षकच चोरांशी संगनमत करत असल्यामुळे बऱ्याच काळापासून चोरी सुरू होती. मौल्यवान सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे मूल्यांकन मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून केलं जाणार होतं. मिंटिंग कॉर्पोरेशनचे कर्मचारी आले ते ४५ दिवस याच परिसरात राहिले. त्यांनी चांदी वितळवून मूल्यांकन केलं, परंतु मिंटिंग कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना नियुक्त करणं खर्चिक ठरेल अशी तक्रार चंपत राय यांनी केली आणि हे अधिकारी अयोध्या सोडून निघून गेले. खरं तर, चंपत राय यांना मंदिराच्या आवारात मिंटिंग कॉर्पोरेशन, पोलीस, बँकेचे अधिकारी किंवा कोणताही सीईओ नको होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ३६ महिन्यांपूर्वी चंपत राय यांना एक योग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यास सांगितलं होतं. त्यासाठी व्यावसायिकांना नियुक्त करण्याचा सल्लाही दिला होता, पण चंपत राय आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांना आता जाणवलंय की, चंपत राय यांची समजूत घालण्यात वेळ वाया घालवायला नको होता, पण त्यांना तो संदेश कठोरपणे पोहोचवण्याचं धाडस कोणामध्येच नव्हतं. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे बहुतेक सदस्य वयोवृद्ध असल्यामुळे चंपत राय यांची हुकूमशाही सुरूच राहिली. संस्थापक सदस्य, ज्येष्ठ वकील के. परासरन हे ट्रस्टचे सदस्य आहेत. ते ९९ वर्षांचे असून सभांना उपस्थित राहू शकत नाहीत. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास ८८ वर्षांचे आहेत. अयोध्येत राहतात, पण ते ट्रस्टच्या कामात क्वचितच हस्तक्षेप करतात. एकाण्णव वर्षीय स्वामी परमानंदजी हे हरिद्वारमध्ये राहतात, पण ते प्रवास करू शकत नाहीत. स्वामी वासुदेवानंद सरस्वती, जे ८० वर्षांहून अधिक वयाचे आहेत, प्रयागराजमध्ये राहतात. ते देखील नियमितपणे सभांना उपस्थित राहू शकत नाहीत. कर्नाटकातील पेजावर मठाचे प्रमुख स्वामी विश्वप्रसन्न तीर्थ हे उडुपी येथे राहतात. खजिनदार, स्वामी गोविंद देव जी महाराज, पुण्यात राहतात आणि त्यांनी बहुतांश आर्थिक काम हे या वादळाच्या केंद्रस्थानी असलेल्या अनिल मिश्रा यांच्यावर सोपवलंय. केवळ चंपत राय, अनिल मिश्रा आणि निर्मोही आखाड्याचे प्रमुख स्वामी दिनेंद्र दास हे तीन विश्वस्त अयोध्येत राहतात. स्वामी दिनेंद्र दास आजारी असतात. ट्रस्टची संपूर्ण जबाबदारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्यावर पडली. त्यांना जे आवडलं ते ठरवलं; त्यांनी आपल्या आवडीनिवडी आणि लहरीनुसार नियम बदलले. ज्यांनी प्रभू रामाचा पैसा चोरून पाप केलं, न्यायालयाकडून त्यांच्या योग्यतेनुसार शिक्षा मिळेल. संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते आता जागे झाले असून, उद्या सोमवारी ६ जुलै रोजी होणाऱ्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या जागी नवीन नियुक्त्या केल्या जाणार आहेत. अयोध्येच्या माजी सत्ताधारी घराण्यातील विमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा यांचे निधन झाले असून त्यांचे पद रिक्त झाले आहे. तीन नवीन विश्वस्तांची नियुक्ती केली जाईल.  बँकिंग, वित्त आणि प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तींना विश्वस्त म्हणून नियुक्त करणं अधिक चांगलं होईल. राम मंदिराला कामकाज सांभाळण्यासाठी एका व्यावसायिक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची-सीइओची सुद्धा गरज आहे. तिरुपती तिरुमला देवस्थानममध्ये देणगीच्या रकमेची मोजणी बँकेचे कर्मचारी आणि निवृत्त बँक अधिकारी करतात. मोजणीच्या वेळी त्यांना एकच धोतर परिधान करण्याची परवानगी असते आणि ही मोजणी सर्वांच्या उपस्थितीत केली जाते. राम मंदिरालाही अशाच प्रणालीची गरज आहे. मंदिरात एक मुख्य दक्षता अधिकारी असावा, जो स्वतंत्र असावा आणि ज्याच्या सचोटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होता कामा नये. प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांची अजिबात कमतरता नाही.
असं म्हटलं जातं की, रामराज्यात राजा रामाने एका धोब्याच्या प्रश्नाचंही उत्तर दिलं होतं. कलियुगाच्या या नव्या रामराज्यात लाखो भक्त प्रश्न विचारताहेत आणि प्रत्युत्तरादाखल त्यांना टीव्हीवरची चर्चासत्रे, पत्रकार परिषदा, राष्ट्रवादाचे पॅकेज दिलं जातंय. प्रकरण अगदी सोपे आहे. त्या भक्ताला वाटलं होतं की, त्याने अर्पण केलेली शंभर रुपयांची नोट, त्याच्या वृद्ध आईच्या गल्ल्यातले दहा रुपयांचे नाणे आणि मुलीच्या खिशातले खाऊचे पैसे प्रभू रामजींच्या चरणी पोहोचतील. सुरुवातीला नेते म्हणाले, हे राम मंदिर आहे, इथं प्रश्न विचारू नका! मग, जेव्हा प्रश्न वाढले, तेव्हा ते म्हणाले, हा हिंदूंच्या श्रद्धेवर हल्ला आहे! जेव्हा त्याचाही उपयोग झाला नाही, तेव्हा ते म्हणाले, चौकशी होऊ द्या! दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, तुम्ही प्रश्न विचारले तर, आधी तुम्हाला देशद्रोही, मग जातीयवादी अन् शेवटी एक सहनशील नागरिक ठरवलं जातं. सर्वात गमतीशीर गोष्ट ही की, जे लोक कालपर्यंत गल्लीबोळात, वस्तीत नैतिकतेचा व्यापार करत होते, ज्यांनी स्वतःला हिंदू धर्म, राम आणि राम मंदिराचे संरक्षक घोषित केलं होतं, ते अचानक कायद्यात इतके पारंगत झालेत की, ते प्रत्येक वाक्याची सुरुवात 'चौकशी पूर्ण होऊ द्या!' या वाक्याने करतात. हे तेच लोक आहेत जे, एखाद्या विरोधी पक्षनेत्याच्या घरातून जुनी ब्रीफकेस जरी सापडली, तरी संध्याकाळपर्यंत त्याला अब्जावधींच्या घोटाळ्याचा सूत्रधार घोषित करतात. जर असे गंभीर आरोप एखाद्या विद्यापीठावर, कामगार संघटनेवर, अल्पसंख्याक संस्थेवर वा विरोधी पक्षावर झाले असते, तर नेत्यांनी 'चौकशीची वाट पाहण्याचा' सल्ला दिला असता का? की त्यांनी सर्वत्र गोंधळ घातला असता? आरोपीला आतापर्यंत जमावाने मारलंही असतं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय की, जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत आरोपांना तथ्य मानलं जाऊ नये. हे तत्त्व योग्य आहे. पण जेव्हा पूर्ण चौकशी न करता विरोधी नेत्यांना भ्रष्टाचाराचे प्रतीक म्हणून हिणवलं गेलं, तेव्हा हे तत्त्व कुठं होतं? आंदोलनादरम्यान लोकांना तुरुंगात टाकलं गेलं का? पण इथली परिस्थिती वेगळी आहे. 
हरीश केंची,
९४२२३१०६०९.








लव्ह, सेक्स आणि धोका !!!

"प्रेम आंधळं असू शकतं, पण जेव्हा विवेक मरतो तेव्हा माणूस स्वतःच राक्षस बनतो. पुण्यातल्या 'केतन अग्रवाल मर्डर केस'ने देश हादरलाय. केतनची हत्या त्याची होणारी बायको सिया गोयल हिने तिचा प्रियकर चेतन चौधरीला सोबत घेऊन, लोहगडावरून केतनला दरीत ढकलून हा खून केलाय. पण लग्नाला नकार देऊन त्यावर सियाला ठाम राहता आलं असतं, सियाने केतनचा खून तर केलाच पण स्वतःचंही चारित्र्य डागाळून घेतलंय. या दुर्घटनेला दोन्हीकडचे पालक तितकेच जबाबदार आहेत. शिक्षा काय या देशात कोणालाही होतच नाहीये. नुकतंच लोकल ट्रेन मधल्या वादातून तरुणाचा खून झाला, लोक बघत बसले. जीव खूपच स्वस्त झालाय मग ती तरुण वा लहान पोर का असेना. त्यातून नसरापूर प्रकरणाकडे डोळे आहेत. या पिढीचीच काय हल्ली कोणाचीच मानसिकता काय असेल हे समजू शकत नाही. नैतिकता हरवत चाललीय. कायदा हा गुन्हेगारांसाठी काम करतोय. असं वाटतंय!"
...........................................
*पु*ण्यातला लोहगड हत्याकांडाचा तपास जसजसा पुढे सरकतोय, तसतशी नवनवीन तथ्ये समोर येताहेत. पोलीस मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीची तपासणी करताहेत. सिया गोयल पुण्यात गुलटेकडी गंगाधाम भागात न्यू एरा सोसायटीमध्ये राहते. तिच्यासोबत कुटुंबात आई-वडील, एक भाऊ आहे. तिचे वडील, प्रवीण गोयल, सुकामेवा, मसाल्यांच्या व्यवसायात आहेत .समाजात या कुटुंबाची प्रतिमा प्रतिष्ठित मानली जाते. चेतन चौधरी आणि सियाचा मोठा भाऊ साहिल गोयलची मैत्री क्रिकेटमुळे झाली. चेतन आणि साहिलने एकत्र क्रिकेट सामने खेळले आहेत. सिया साहिलसोबत क्रिकेट सामने बघण्यासाठी जायची. सिया अन् चेतन चौधरी यांची पहिली भेट गेल्या वर्षी दिवाळीत झालेल्या एका पार्टीत झाली. या भेटीनंतर त्यांचा संपर्क वाढत गेला. पोलीस त्यांच्या या नात्याशी संबंधित माहिती, कॉल रेकॉर्ड्स, भेटीगाठी अन् संवादांची चौकशी करताहेत. केतन अग्रवालच्या मृत्यूने देशभर खळबळ उडालीय. लोहगडावर ट्रेकिंग करत असताना या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तो कड्यावरून पडून मरण पावला. सुरुवातीला हा एक अपघात मानला जात होता. पण नंतर हे उघड झालं की, त्याची होणारी पत्नी सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केतनला लोहगडावरून खाली ढकललं होतं. सियाला काय हवं होतं? केतन अग्रवाल ज्याच्याशी ती काही महिन्यांत लग्न करणार होती. गेल्या सहा महिन्यांत सिया अन् चेतन यांनी २,००४ कॉल केलेत, ज्यात एकूण अंदाजे २३८ तासांचे संभाषण झालंय. काही कॉल सलग दोन ते तीन तास चाललेत. हे दीर्घ संभाषण कथित कटाच्या तयारीचा एक भाग असू शकतो. याचकाळात सियाच्या कुटुंबीयांनीही तिच्यासाठी जीवनसाथी शोधायला सुरुवात केली होती. यातूनच अग्रवाल कुटुंबाशी तिचं लग्न जुळलं. ११ फेब्रुवारीला भेट झाली, १९ तारखेला साखरपुडा झाला. लग्नाची तारीख २५ नोव्हेंबर निश्चित झाली. घरात तयारीला सुरुवात झाली होती. भविष्याची स्वप्ने विणली जात होती. केतनला जसं टक्कल होतं आणि बोलताना तो चाचरायचा, तसंच ती मुलगी बारावी नापास होती आणि दारू प्यायची असे एका यू ट्यूब व्हिडिओ मध्ये दिसतंय, ऐकलंय. म्हणूनच बहुतेक त्या मुलाचे वडील देखील लवकर हे लग्न व्हावं ह्यासाठी आग्रही होते. या अरेंज मॅरेजमध्येही तडजोड होती. जर सियाने दोन तीन वर्षे धीर धरला असता आणि तिचे उद्योग पुन्हा सुरू केले असते तर नवरा, सासरा दोघांचं त्याकडं लक्षही गेलं नसतं, एवढं हे लोक पैशाच्या मागे धावत असतात. एरव्ही आजुबाजूला आपण बघतोच की, बऱ्याच लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये जिथं नवरा बायको दोघेही मिळवती असतात, दोघांचीही इतर बायका अन् पुरुषांबरोबर मैत्री असतेच की. दोघेही त्याकडे लग्न, नोकरी टिकून राहावी, मुलांची शिक्षण वगैरे ह्या गोष्टींसाठी कानाडोळा करतात. सियासारख्या मुलीने सुद्धा काहीतरी मार्ग नक्कीच काढला असता. नाहक नको ते करून बसली. 
कुटुंबीय सांगतात की, सिया केवळ नावापुरती सून नव्हती, तर ती कुटुंबाचाच एक भाग बनली होती. ती अनेकदा त्यांच्या घरी यायची, पूजा-अर्चा करायची, संपूर्ण दिवस कुटुंबासोबत घालवायची. बोलताना प्रेमळ आपुलकी दाखवायची. तिच्या मनात काहीतरी वेगळं आहे, असा कोणालाही संशय आला नाही. केतनच्या आईने सियाला सून म्हणून स्वीकारलं होतं. ती घरी येऊन कुटुंबात मिसळायची, त्यांच्या नात्याचं खरं स्वरूप आधीच उघड झालं असतं, तर त्यांचा मुलगा कदाचित अजूनही जिवंत असता. लग्नाची तयारी सुरू असताना, सिया आणि चेतन सतत संपर्कात असल्याचं तपासात उघड झालंय. तपासाशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरताहेत, ज्यात ते दोघे एकत्र दिसताहेत. चेतनने बीबीए बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास सुरू केला होता, पण तो अर्धवट सोडून दिला. तपास यंत्रणा यातले डिजिटल पुरावे, कॉल डिटेल रेकॉर्ड्स आणि इतर कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे संपूर्ण घटनाक्रम एकत्र जोडण्याचं काम करताहेत. १४ जून रोजी सिया केतनला लोहगडावर घेऊन गेली. त्यादिवशी लोहगडाच्या एका कडावर उभे असताना केतनला मागे ढकलण्यात आलं. तो खाली घसरला, पण त्याचा हात झुडपात अडकल्याने त्याचा जीव वाचला. नंतर सियाने 'साप येतोय... साप येतोय..!' असा कांगावा करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सियाचा वाढदिवस १९ जूनला होता. १८ जूनला, वाढदिवस साजरा करण्यासाठी तिने केतनला लोहगडावर नेले. ते दोघे सकाळी साडेआठ वाजता निघाले. १०:४५ वाजता, केतन लोहगडावर दरीत पडल्याची माहिती देणारा फोन आला. कुटुंब तात्काळ घटनास्थळी पोहोचले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. केतनचा मृत्यू झाला होता. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना हा अपघात आहे यावर विश्वास बसला नाही.केतनचा मृतदेह पाहिल्यावरही सियाच्या चेहऱ्यावर दुःखाचं कोणतंही चिन्ह नव्हतं. केतनची आई म्हणते की, ज्या मुलाचं तिने खूप लाड केलं होतं, ज्याच्या लग्नाची तयारी सुरू होती, तो अचानक तिच्यापासून हिरावला गेला. केतन तिला सर्व काही सांगायचा, पण कदाचित त्याच्या आजूबाजूला काय घडतंय हे त्यालाही कळलं नसेल. जर चेतन चौधरी सियाच्या आयुष्यात होता, तोच ज्याच्यावर तिचं प्रेम होतं, तर तिने केतनशी लग्न करायला होकार का दिला? तिला नेमकं काय हवं होतं, याचा तपास पोलीस आता करताहेत. ३१ मे रोजी सिया आणि केतन अग्रवाल हे लोहगड किल्ल्यावर गेले होते. तिथे केतन हा एका धोक्याच्या ठिकाणी बसलेला होता. तो केव्हाही दरीत कोसळेल अशी भीती होती. त्याविषयी दोघात चर्चाही झाली. पण केतनने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हाच सियाच्या मनात पहिल्यांदा केतनला याच किल्ल्याच्या कठड्यावरून दरीत ढकलण्याची कल्पना सुचली आणि तिने त्यानंतर त्याला संपवण्याचे तीन अयशस्वी प्रयत्न केले. 
पोलिस तपासात सिया गोयलने तिच्या वाग्दत्त वराचा खून केला त्याचं कारण केतनला टक्कल होतं. तो विग घालायचा. शिवाय बोलताना तो अडखळलायचा हकलायचा. असं सांगितलंय. तिची लाईफस्टाईल, पार्टीजमध्ये रमणारा स्वभाव यात केतनचं कुटुंब साजेसं नव्हतं. त्याच्या आईने तिला बजावलंही होतं की, लग्नानंतर या सगळ्या पार्टीज बंद! केतनचं  दिसणं, त्याची वागण्याची शैली तिला आवडत नव्हती. नवऱ्याबाबत तिच्या काही अपेक्षा होत्या ज्यात तो फिट बसत नव्हता. दोन्ही कुटुंबं प्रचंड श्रीमंत होती तरीही तिचं कुटुंब अन् त्याचं कुटुंब याच्या आर्थिक स्थितीत तफावत होती, केतनचं कुटुंब सियाच्या कुटुंबापेक्षा दसपटीने श्रीमंत होतं. तिच्या वडिलांना आर्थिक आधार, व्यापारी वर्तुळ याचं अप्रूप होतं, मात्र तिला त्यात इंटरेस्ट नव्हता. त्यांनी तिला बेकरीचा व्यवसाय काढून देण्याचा प्रयत्नही केला होता. तिचं प्रेम ज्याच्यासोबत होतं, तो तिच्या कुटुंबाच्या समान आर्थिक पातळीवरचा होता; तिला जसा पुरूष हवा होता तसा तो होता. याबाबत जर आपण आई वडिलांना केतन पसंत नसल्याचं सांगितलं तर त्यांची स्वप्ने तुटतील, ते दुःखी होतील अन् आयुष्यभर त्याचं खापर आपल्यावर फुटेल हे तिला नको होतं. ती खून करायला तयार झाली मात्र आईवडिलांना सांगायची तिची हिंमत झाली नाही; असं नाही. तिची हिंमत कुठेही कमी पडली नाही, तिने आपल्यावर आईवडिलांच्या दुःखाचे आरोप येऊ नयेत म्हणून थंड डोक्याने त्याला संपवलं. आता ती आणि तिचा प्रियकर एकमेकावर सूत्रधार असल्याचा आरोप करताहेत. ती स्वतःला सूत्रधार म्हणवत नसली तरी तिचे जबाब अधिक स्पष्ट आहेत, तिने चौकशीत जे काही सांगितलंय ते तर धक्कादायक आहेत. तिच्यासाठी त्याचं मन, त्याच्या भावना, आदर, सोबत अथवा प्रेम इतकं महत्वाचं नव्हतं! त्याचं ते बाह्यरूप, त्याचं दिसणं अन् त्याचं व्यक्तिमत्व तिला अधिक खटकलं, महत्वाचं वाटलं.
अशा या बहुतांश घटनांच्या मुळाशी विवाहबाह्य संबंध हे प्रमुख कारण असल्याचं दिसतं. मात्र त्यामागे केवळ शारीरिक आकर्षण नसून भावनिक, मानसिक, सामाजिक अशा अनेक कारणांचा गुंता आहे. सेक्स आणि रिलेशनशिप तज्ज्ञ यांच्या मते, विवाहबाह्य संबंध ही स्त्री किंवा पुरुषाची नव्हे, तर मानवी मानसिकतेची समस्या आहे. नात्यातली अपूर्णता, भावनिक तुटलेपणा, संवादाचा अभाव यामुळे अनेकजण अशा संबंधांकडे वळतात. एकत्र कुटुंबपद्धतीचा ऱ्हास, विभक्त कुटुंबांचं वाढतं प्रमाण, कमी होत चाललेला कौटुंबिक संवाद यामुळेही ही समस्या अधिक तीव्र होत असल्याचे मत व्यक्त केलंय. तर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, महिलांचं शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, बदलती सामाजिक भूमिका यामुळे कुटुंबातल्या संघर्षांचं स्वरूप बदललंय. त्यामुळे महिलांकडून घडणाऱ्या हिंसक घटनांकडे केवळ गुन्हा म्हणून नव्हे, तर बदलत्या सामाजिक वास्तवाच्या संदर्भातही पाहण्याची गरज आहे. नातं नाकारण्याचा मार्ग उपलब्ध असतानाही  खुनासारखा टोकाचा मार्ग का स्वीकारतात? याबाबत वकिलांशी चर्चा केली असता दोन कारणे प्रकर्षाने समोर आली. पहिलं म्हणजे, वेळखाऊ किचकट वाटणाऱ्या न्यायप्रक्रियेबद्दलची अनास्था. दुसरं, सामाजिक कलंक. कोर्टाच्या फेऱ्या, आर्थिक खर्च, मानसिक ताण, ‘लोक काय म्हणतील’ या भीतीमुळे अनेकजण नात्यातून बाहेर पडण्याऐवजी चुकीचा गुन्हेगारी मार्ग स्वीकारतात. काहींच्या मनात जोडीदार कायमचा दूर झाला, तर नवीन आयुष्य सुरू करणं सोपं जाईल, अशी विकृत मानसिकताही तयार होत असल्याचे दिसून येते. अशा गुन्ह्यांमध्ये बहुतेक वेळा थंड डोक्याने नियोजन केलेलं असतं. गुन्हा करून आपण सहज सुटू, असा त्यांचा ठाम विश्वास असतो. कालांतराने हत्या ही त्यांच्यासाठी भावनाविरहित 'काम' बनतं. भीती, अपराधीपणा, भविष्यातील परिणामांची जाणीव बोथट होत जाते.
आजकाल कमावत्या स्त्रिया, मुली आपल्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्या म्हणजे जेोडीदार मजबूत, हवं ते अन् तसं सुख देणारा हवाय, त्याचं दिसणं, त्याचं व्यक्तिमत्व उठून दिसणारं हवं. हवा तसा आणि हवे ते सुख देणारा जोडीदार हवाय असं आता त्या उघड उघड सांगू लागल्यात. मागील काही दशकात सियासारखी कृती करतात. स्त्रियांनी, मुलींनी आपल्या नवऱ्याचे, प्रियकराचे मित्राचे खून करण्याच्या जितक्याही घटना उघडकीस आल्यात त्याच्या मुळाशी याच भावना दिसतात. आवडीच्या जोडीदारासाठी नात्यातल्या पुरुषाला मारायची ही प्रवृत्ती वाढतेय. या बाबतीत नवी पिढी तर अगदीच ठाम आहे. पार्टनर बेडमध्ये किती टाइम तग धरतो इथंपर्यंत ही पिढी स्पष्ट आहे. अशी आईवडिलांनी ठरवलेली लग्ने आता कालबाह्य होत जातील हे वेगळं सांगायला नको. 'आमचं आम्ही बघून घेऊ आणि निस्तरू', ही वृत्ती वाढताना दिसते. 
अशा घटना नकळत नव्या पिढीला दोन्ही बाजूंचे मुद्दे ध्यानात आणून देत असतात. पर्यायाने निश्चय निर्धार आणखी ठाम होत जातील आणि हा मार्ग आपणही वापरून बघायला हरकत नाही हा विचार बळावत जाईल.
विवाहबाह्य संबंधांच्या काही घटनांच्या मुळाशी लग्नापूर्वीची अपुरी राहिलेली प्रेमप्रकरणेही दिसून येतात. कुटुंबाच्या दबावाखाली झालेले विवाह आणि त्यानंतर न संपलेले जुने प्रेम अनेकदा गंभीर गुन्ह्यांना कारणीभूत ठरते. इच्छेविरुद्ध झालेल्या विवाहाचे विपरीत परिणाम दिसून येतात. प्रेमप्रकरणाला कलंक मानून मुलीच्या इच्छेला दुय्यम स्थान देत घाईघाईने विवाह लावून देण्याची मानसिकता आजही समाजात आहे. मात्र अशा नात्यांमध्ये प्रेम, विश्वास, परस्पर संमतीचा अभाव राहिल्यास त्यातून तणाव, गुंतागुंत, काही वेळा हिंसाचारालाही खतपाणी मिळते. मात्र प्रत्येक विवाहबाह्य संबंधाचा शेवट हिंसाचारातच होतो असं नाही. उत्तर प्रदेशात निगोही, अमेठी, रसुलाबाद, वाराणसी इथं काही पतींनी सूड किंवा हिंसेचा मार्ग न स्वीकारता पत्नीला तिच्या प्रियकरासोबत कायदेशीररीत्या वेगळं होऊन नवं आयुष्य सुरू करून दिलंय. अशी उदाहरणे संख्येने कमी असली, तरी नात्यातील संघर्षाला खुनाऐवजी संवाद, परस्पर संमतीनेही उत्तर देता येतं. अंधार कितीही गडद असला, तरी अशा काही घटना समाजासाठी आशेचा किरण ठरतात. इंदूरच्या सोनम रघुवंशीपासून ते सध्या चर्चेत असलेल्या सिया गोयल प्रकरणापर्यंतच्या घटना ही केवळ काही व्यक्तींची विकृती नाही; त्या बदलत्या सामाजिक मानसिकतेचा इशारा आहेत. या घटना सांगतात की, प्रेम, विश्वास, संवाद आणि कुटुंबसंस्था यांचा पाया ढासळू लागला की त्याची जागा संशय, स्वार्थ आणि हिंसा घेतात. कोणत्याही नात्याचा शेवट खून नसून कायदा, संवाद आणि सन्मानाने वेगळे होण्यात असायला हवा. “प्रेम ही जीव लावण्याची गोष्ट आहे, जीव घेण्याची नाही” हा साधा पण मूलभूत संदेश आजच्या समाजाने पुन्हा एकदा स्वतःला आणि पुढच्या पिढीला देण्याची गरज आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९


‘द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’

मुंबईची एशियाटिक सोसायटी ही, भारत आणि पौर्वात्य देशांविषयीचे ज्ञान निर्माण करण्यासाठी, ते पद्धतशीर करण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी ब्रिटिशांनी तयार केलेल्या संस्थांच्या जाळ्याचा एक भाग आहे. माहिती, शिक्षण आणि ज्ञानाचा हा एक विशाल आणि संचयी साठा पुढे 'इंडोलॉजी' (भारतविद्या) या क्षेत्रात संघटित झाला. त्याची व्याप्ती विश्वकोशीय होती, ज्यात नाणकशास्त्र, शिलालेखशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास, पुरातत्वशास्त्र, भाषाशास्त्र, भाषाविज्ञान, नैसर्गिक इतिहास, भूगर्भशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य आणि धर्मशास्त्र यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश होता.
एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची स्थापना सर जेम्स मॅकिंटॉश यांनी केली होती. ते इंग्लंडमधील एक प्रतिष्ठित वकील, कायदेपंडित आणि सार्वजनिक व्यक्तिमत्व होते, जे पुढे मुंबईचे रेकॉर्डर किंवा राजाचे न्यायाधीश बनले. त्यावेळी 'लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेची पहिली बैठक २६ नोव्हेंबर १८०४ रोजी झाली आणि "उपयुक्त ज्ञानाचा, विशेषतः जे आता भारताशी थेट संबंधित आहे, अशा ज्ञानाचा प्रसार करणे" हे तिचे उद्दिष्ट होते. पौर्वात्य कला, विज्ञान आणि साहित्याचे अन्वेषण आणि प्रोत्साहन देणे हे तिचे औपचारिकपणे घोषित केलेले उद्दिष्ट होते. या उपक्रमात, मॅकिंटॉश सर विल्यम जोन्स यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते, ज्यांनी दोन दशकांपूर्वी 'एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल'ची स्थापना केली होती. 
लिटररी सोसायटीने १७८९ मध्ये स्थापन झालेल्या 'मेडिकल अँड लिटररी लायब्ररी' या खाजगी ग्रंथालयाचा संग्रह विकत घेतला आणि हाच या ग्रंथालयाचा गाभा बनला. १८२६ मध्ये, लिटररी सोसायटीचे नुकत्याच स्थापन झालेल्या 'रॉयल ​​सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड' (RAS) मध्ये विलीनीकरण झाले आणि तिची 'रॉयल ​​एशियाटिक सोसायटीची मुंबई शाखा' (BBRAS) म्हणून ओळखली जाऊ लागली. १८३० मध्ये, ते टाऊन हॉल इमारतीत स्थलांतरित झाले, ज्याच्या बांधकामासाठी संस्थेने १०,०००/- रुपयांचे योगदान दिले. १८७३ मध्ये, जिओग्राफिकल सोसायटी ऑफ बॉम्बे आणि १८९६ मध्ये अँथ्रोपोलॉजिकल सोसायटी ऑफ बॉम्बे यांचे बीबीआरएएसमध्ये विलीनीकरण झाले आणि त्यांनी त्यांचे संग्रह संस्थेत आणले.
१८४१ मध्ये, संस्थेने 'जर्नल ऑफ द बॉम्बे ब्रांच ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी' नावाचे नियतकालिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली, जे आजही 'जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई' या नावाने प्रकाशित होत आहे. त्याच वर्षी संस्थेने भारतीयांना सदस्य म्हणून प्रवेश देण्यास सुरुवात केली. १९५४ मध्ये, ती आरएएसपासून वेगळी झाली आणि तिचे नाव बदलून 'द एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे' असे ठेवले आणि २००० मध्ये 'द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई' असे ठेवले. 
संस्थेच्या सुरुवातीच्या काळात तिच्याशी जवळून संबंधित असलेल्या व्यक्तींमध्ये प्रशासक, कायदेपंडित, शिक्षणतज्ज्ञ, धर्मप्रसारक यांचा समावेश होता, ज्यापैकी अनेक जण विद्वानही होते. त्यापैकी अनेकांनी भारतीय पुनर्जागरणात महत्त्वपूर्ण योगदान दिले. अनेक जण सार्वजनिक जीवनात सक्रिय आणि प्रभावशाली होते, आणि त्यांनी सामाजिक सुधारणा व राष्ट्रवादाच्या मुद्द्यांवर काम केले. संस्थेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट असलेले विषय आणि तिच्याशी संबंधित ब्रिटिश व भारतीय व्यक्तिमत्त्वांमुळे, आपल्या दोन शतकांच्या अस्तित्वात ही संस्था राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण बौद्धिक प्रवाहांच्या जवळ राहिली आहे, हे अपरिहार्य आहे.
एशियाटिक सोसायटीच्या प्रवेशद्वारात आणि दरबार हॉलमध्ये त्या उत्कृष्ट विद्वान, प्रशासक आणि परोपकारी व्यक्तींचे पुतळे, अर्धपुतळे आणि व्यक्तिचित्रे आहेत, ज्यांनी आपल्या शोधनिबंधांद्वारे, आर्थिक देणगी देऊन आणि दुर्मिळ पुस्तके, हस्तलिखिते व इतर पुरातन वस्तूंच्या संग्रहाद्वारे संस्थेला योगदान दिले.
एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे कार्यालय असलेली टाऊन हॉल ही एक वारसा इमारत आहे, जी शहराच्या ऐतिहासिक फोर्ट परिसरात वसाहतकालीन भूगोल, वास्तुकला आणि शिल्पकलेने आकारलेली आहे. बॉम्बे ग्रीनवर बांधलेल्या या इमारतीची रचना अक्षीय असून तिचे तोंड पश्चिमेकडे आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या जिन्याच्या सर्वात वरच्या पायरीवर उभे राहिल्यावर, समोर पसरलेले शहराचे भव्य दृश्य, जर बारकाईने पाहिले तर, इतिहासाचा एक तुकडाच दाखवते. समोरचे गोलाकार एल्फिन्स्टन गार्डन (आता हॉर्निमन सर्कल), पलीकडे सेंट थॉमस कॅथेड्रल आणि फ्लोरा फाउंटन (आता हुतात्मा चौक), मुंबई समाचारची इमारत, परिसरातील सर्वात जुनी आगियारी आणि इतर सुंदर निवासी व कार्यालयीन इमारतींमुळे या परिसरात फिरणे हा भूतकाळ आणि वर्तमानकाळाच्या गुंफलेल्या छटांनी परिपूर्ण असा अनुभव ठरतो. टाऊन हॉलच्या ३० पायऱ्यांची भव्य रचना, आठ डोरिक स्तंभांसह असलेले त्रिकोणी दर्शनी भागाचे प्रवेशद्वार, व्हॅस्टिब्युलकडे (प्रवेशद्वाराकडे) जाणारे घडवलेल्या लोखंडी जाळीचे रीजन्सी पद्धतीचे कठडे, नियतकालिक कक्षातील आरामखुर्च्या आणि त्यांच्यासोबतची पायपुसणी जी पाने चाळण्यास सोयीस्कर ठरतात, आणि भव्य दरबार हॉल, या सर्वांमुळे असा ठसा उमटतो की, ही संस्था वसाहतकालीन इतिहासाच्या माध्यमातून आपल्या सभोवतालच्या परिसराशी सेंद्रियपणे जोडलेली आहे, आणि तरीही ती तिचे सर्वोच्च रत्न आहे. “अभिरुची आणि औदार्य यांचा संगम होऊन भारतात आतापर्यंत उभारलेली ही सर्वात भव्य वास्तू आहे”, असे १९३० मध्ये मुंबईचे गव्हर्नर सर जॉन माल्कम म्हणाले होते..(संग्रहित)

लोकशाहीत संघाला नियमांतून सूट

लोकशाही देशात कार्यरत असलेल्या कोणत्याही संस्थेने पारदर्शकतेचे मूलभूत निकष पाळणे आवश्यक असते. तिने स्वतःची कायदेशीर नोंदणी करणे गरजेचे असते. तिला मिळणाऱ्या निधीचा स्रोत जाहीर करणे भाग असते. तिने लेखापरीक्षण केलेले आर्थिक हिशोब प्रकाशित करणे आवश्यक असते. थोडक्यात सांगायचे तर, तिला केवळ स्वतःच्या नेतृत्वापुरते मर्यादित न राहता इतरांनाही उदा. जनता किंवा नियामक संस्थांना उत्तरदायी असणे गरजेचे असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यापैकी कोणतीही गोष्ट करत नाही. ही काही अनवधानाने घडलेली चूक नाही. हा एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे जो एका शतकाहून अधिक काळापासून आजतागायत तसाच राहिला आहे. या निर्णयास भारताच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली राजकीय पक्षाचा किंवा सत्तेचा प्रदीर्घ पाठिंबा मिळत राहिला आहे.
२०२६ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १०१ वर्षांचा झाला. या काळात, तो जगातील सर्वात मोठ्या नागरी संघटनांपैकी एक बनला आहे. मार्च २०२६ पर्यंत, ही संघटना भारतभर ८८ हजार ९४९ शाखा, दैनंदिन कवायत केंद्रे चालवत होती. त्याच्या आदल्या वर्षी ही संख्या ८३ हजार १२९ इतकी होती. संघाचे भारतात अस्तित्व ५५ हजार ६८३ हून अधिक ठिकाणी आहे. संघाचे अंदाजे ४० लाख म्हणजे ४ दशलक्ष सक्रिय सदस्य आहेत. केवळ कर्नाटकातच, ही संघटना ४ हजार१२७ दैनंदिन शाखा, १ हजार ३८९ साप्ताहिक मेळावे आणि ६० मासिक बैठका चालवते. ही आकडेवारी एखाद्या सांस्कृतिक मंडळाचे वर्णन असू शकत नाही. तर, ती एका शिस्तबद्ध, श्रेणीबद्ध आणि वेगाने विस्तारणाऱ्या राष्ट्रीय जाळ्याची निदर्शक आहे, ज्याची संघटनात्मक व्याप्ती भारतातल्या अनेक राजकीय पक्षांनाही गाठता येणार नाही. तरीही, संघ स्वतःला केवळ व्यक्तींचा एक स्वयंसेवी समूह असल्याचे सांगते आणि याच दाव्याचा आधार घेऊन कायदेशीर नोंदणी करायला टाळाटाळ करते, आपले खरे नेतृत्व जाहीर करणे टाळते आणि कोणतेही आर्थिक तपशील प्रकाशित करायचे तर बोलणेच नको.
जून २०२६ मध्ये, कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी मागणी केली की संघाने कायदेशीर संस्था म्हणून नोंदणी करावी, आपल्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करावीत आणि आपला आर्थिक तपशील सार्वजनिक छाननीसाठी खुला करावा. संघ प्रमुख मोहन भागवत यांनी या मागणीला 'राजकीय स्टंट' राजकीय खेळी असे संबोधले. त्या प्रतिसादाचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. संघ दरवर्षी 'गुरुदक्षिणा' देणग्यांच्या माध्यमातून अंदाजे ५०० ते १,००० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक निधी जमा करते. या देणग्या निनावी असतात. त्यांचे लेखापरीक्षण-ऑडिट केले जात नाही. त्यांची कोणतीही सार्वजनिक नोंद उपलब्ध नाही. संघाकडे भारतभर मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहे, ज्यामध्ये नवी दिल्लीतील कोट्यवधी रुपयांच्या 'केशव कुंज' संकुलाचाही समावेश आहे. ती एक जागतिक स्तरावरील यंत्रणा चालवते. वॉशिंग्टनमधील धोरणकर्त्यांवर प्रभाव टाकण्यासाठी त्यांनी जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या काळात अमेरिकन लॉबिंग फर्म 'स्क्वायर पॅटन बॉग्स' - Squire Patton Boggs ला ३ लाख ३० हजार डॉलर्सची रक्कम दिली होती. जी संस्था अमेरिकेतील एका मोठ्या लॉबिंग कराराचा खर्च पेलू शकते आणि त्याचवेळी आपल्याला कोणताही केंद्रीय निधी किंवा परकीय पैसा मिळत नाही असा दावाही करते, तिचा हा दावा प्राथमिक पडताळणीतही टिकत नाही. अशा परिस्थितीत, पारदर्शकतेच्या मागणीला केवळ एक 'प्रसिद्धीचा स्टंट' - गिमिक ठरवणे, हे कर्नाटक सरकारपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलच अधिक काहीतरी दाखवून देतं.
संघाच्या संगठनात्मक जाळ्याच्या आंतरराष्ट्रीय पैलूंकडे अनेकदा तितकेसे  गांभीर्याने पाहिले जात नाही, ज्याची खरंतर खूप गरज आहे. आरएसएसची परदेशातील शाखा असलेली 'हिंदू स्वयंसेवक संघ' १५६ देशांमध्ये कार्यरत असून तिची ३ हजार २०० हून अधिक केंद्रे - शाखा चालतात. अमेरिका, ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांमध्ये ही संघटना सर्वाधिक मजबूत आहे. २०२५ आणि २०२६ मध्ये करण्यात आलेल्या एका व्यापक सर्वेक्षणात 'संघ' विचारसरणीशी किंवा परिसंस्थेशी - ecosystem जोडल्या गेलेल्या जागतिक स्तरावरील २ हजारb५०० हून अधिक संस्थांची नोंद घेण्यात आली. यापैकी २ हजार २४० संस्था भारतात कार्यरत आहेत, तर उर्वरित संस्था ३९ देशांमध्ये पसरलेल्या आहेत; केवळ अमेरिकेतच अशा १०७ संलग्न संस्था कार्यरत आहेत. 'सेवा इंटरनॅशनल' आणि 'एकल विद्यालय' यांसारख्या अमेरिकन संस्थांनी देणगीच्या स्वरूपात लाखो डॉलर्स भारतात पाठवले आहेत. कोविड-१९ महामारीच्या काळात, या गटांनी भारतीय-अमेरिकनांकडून मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला आणि काही प्रकरणांमध्ये त्यांना अमेरिकेच्या सरकारकडून मदतनिधीही मिळाला. यातील अनेक उपक्रम राबवण्यात आरएसएसचे प्रचारक थेट सहभागी होते. एका प्रगत संघटनात्मक रचनेद्वारे हा पैसा आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे हस्तांतरित केला जातो. एकप्रकारे हवालासारखेच या संपूर्ण साखळीत कुठेही या व्यवहारांची पारदर्शक लेखापरीक्षण होत नाही.
२०२६ मध्ये, 'युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम' -;USCIRFने एक असाधारण पाऊल उचलले. त्यांच्या वार्षिक अहवालात आरएसएस आणि भारताची बाह्य गुप्तचर संस्था 'रॉ' या दोघांवरही विशिष्ट निर्बंध घालण्याची शिफारस करण्यात आली. धार्मिक स्वातंत्र्याचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी जबाबदार असल्याचा ठपका ठेवून ही शिफारस करण्यात आली होती. एखाद्या नागरी संघटनेला आणि एखाद्या देशाच्या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेला एकाच वेळी निर्बंधांच्या शिफारशीत समाविष्ट करणे ही काही सामान्य बाब नाही. संघ आणि भारतीय सरकारी यंत्रणेतील काही घटक यांच्यात घनिष्ठ समन्वय असून, त्यांच्या कारवाया धार्मिक अल्पसंख्याकांसाठी हानिकारक ठरत आहेत, असे USCIRF चे निरीक्षण यातून दिसून येते. भारत सरकारने हा अहवाल पक्षपाती असल्याचे सांगून फेटाळून लावला. तरीही, अमेरिकन सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या कुठल्याही वैधानिक संस्था ठोस आणि लिखित पुराव्याशिवाय इतक्या कडक निर्बंधांची शिफारस करत नाहीत. या निष्कर्षांचे भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर असे परिणाम होऊ शकतात, जे केवळ भारत सरकारने ती गोष्ट फेटाळून लावल्याने निस्तरू शकत नाहीत.
भारतात हिंसेशी संबंधित आकडेवारीकडे थेट लक्ष देणे आवश्यक आहे. 'इंडिया हेट लॅब'च्या २०२५ च्या अहवालात, त्या वर्षात भारतभर धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य करणाऱ्या 'द्वेषपूर्ण भाषणांच्या' - hate speech १ हजार ३१८ घटनांची नोंद करण्यात आलीय. संघ परिवारातील 'विश्व हिंदू परिषद' आणि 'बजरंग दल' या संघटनांचा यापैकी २८९ घटनांशी म्हणजेच एकूण घटनांच्या २२ टक्के प्रकरणांशी संबंध असल्याचे आढळून आले. २०२४ आणि २०२५ या काळात ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य करणाऱ्या द्वेषपूर्ण भाषणाच्या - hate speech घटनांमध्ये ४१ टक्क्यांनी वाढ झाली; या घटनांची संख्या ११५ वरून १६२ वर पोहोचली. २०२५ च्या ख्रिसमस काळात देशभरात ८० हून अधिक हिंसक घटनांची नोंद झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या गटांनी चर्च, शाळा आणि व्यावसायिक आस्थापनांवर हल्ले केले. आसाममधील नलबारी येथे 'सेंट मेरी स्कूल'मधील येशूच्या जन्माचे दृश्य दर्शवणारे देखावे - nativity scenes जाळण्यात आले. छत्तीसगडमधील रायपूर येथे एका शॉपिंग मॉलमध्ये ख्रिसमसची सजावट नष्ट करण्यात आली आणि कर्मचाऱ्यांवर शारीरिक हल्ला करण्यात आला. या घटनांमध्ये काही समान वैशिष्ट्ये दिसून येतात: यात तीच संलग्न संघटना सहभागी असते, त्या एकाच पॅटर्नचे अनुसरण करतात आणि त्या दरवर्षी सातत्याने घडताना दिसतात.
दीर्घकालीन ऐतिहासिक नोंदी या कार्यपद्धतीला दुजोरा देतात. १९४८ मध्ये महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा संघाचा माजी सदस्य होता. त्या हत्येनंतर लगेचच या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या हिंसाचारात, ज्यामध्ये एक हजाराहून अधिक मुस्लिमांचा बळी गेला, संघाशी संबंधित संघटनांचा सहभाग होता; त्यावेळी राज्याचे नेतृत्व नरेंद्र मोदी करत होते, जे आयुष्यभर संघाचे प्रचारक राहिले आहेत. २००६ ते २००८ या काळात मालेगाव, समझौता एक्सप्रेस, अजमेर दर्गा आणि मक्का मशीद येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत आरएसएसच्या नेटवर्कशी संबंधित व्यक्तींना दोषी ठरवण्यात आले. केरळमध्ये अनेक राजकीय हत्यांच्या प्रकरणात आरएसएसच्या सदस्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. २०२० च्या दिल्ली दंगलीदरम्यान आरएसएसच्या किमान सोळा सदस्यांना अटक करण्यात आली होती. अशा प्रत्येक घटनेवर संघाची नेहमीची प्रतिक्रिया अशी असते की, संबंधित व्यक्तींनी वैयक्तिक पातळीवर कृती केली होती किंवा हे निष्कर्ष राजकीय हेतूने प्रेरित आहेत. पण पण पण, अनेक दशकांपासून साचत गेलेले दोषी ठरवण्याचे आदेश, अटकेच्या घटना आणि उपलब्ध पुरावे पाहता, हा खुलासा स्वीकारणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे.
संघ आणि भाजप यांच्यातील संबंध एक पूर्ण चित्र आपल्यासमोर ठेवतात. भाजपचे हजारो मंत्री, खासदार आणि वरिष्ठ अधिकारी हे आजीवन आरएसएसचे प्रचारक आहेत. संघ उघडपणे सांगते की ते भाजपची वैचारिक दिशा ठरवते. दोन्ही संघटनांच्या मते, भारताचा सत्ताधारी पक्ष हा आरएसएसच्या अजेंड्याची - उघड आणि छुपे दोन्ही राजकीय अभिव्यक्ती आहे. याचा अर्थ असा की, जी संघटना स्वतःची रीतसर नोंदणी - रजिस्ट्रेशन करत नाही, पैशांचा हिशोब जाहीर करत नाही आणि कोणालाही उत्तरदायी नसते, तीच संघटना भारताच्या सरकारी धोरणांना आणि नोकरशाहीतील अधिकार्‍यांना नेमण्याचे काम करते. हे नागरी समाज आणि सरकार यांच्यातील वेगळेपण नाही. संघ ही संघटना आता देशाचे निर्णय घेणाऱ्या सत्ताधारी सरकारसोबत पूर्णपणे एकरूप होऊन गेली आहे. 
कर्नाटक सरकारने संघाकडे कायदेशीर नोंदणी करण्याची आणि त्यांच्या पैशांचा हिशोब - आर्थिक पारदर्शकता जाहीर करण्याची जी मागणी केली आहे, ती एका निरोगी लोकशाही व्यवस्थेत अत्यंत मूलभूत आणि गरजेची गोष्ट आहे; कारण कोणत्याही चांगल्या लोकशाहीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या प्रत्येक संस्थेला हे कायदे आणि नियम पाळावेच लागतात. परंतु, संघाने या नियमांचे पालन करण्यास साफ नकार दिला आहे आणि विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप पक्ष त्यांच्या या नकाराचे उघडपणे समर्थन करत आहे, ज्यावरून ही संपूर्ण राजकीय व्यवस्था नेमकी कोणासाठी आणि कशी काम करत आहे हे स्पष्टपणे दिसून येते. वास्तविक पाहता, ज्या संघटनेच्या संपूर्ण देशात जवळपास ९० हजार शाखा चालतात, ज्यांच्याकडे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा गुप्त - निनावी निधी येतो, ज्यांचे जगभरात लॉबिंगचे - राजकीय प्रभाव पाडण्याचे मोठे जाळे पसरलेले आहे आणि ज्यांच्या नावावर गेल्या शंभर वर्षांत हिंसाचार आणि लोकांना शिक्षा दिल्याचा दस्तऐवजीकरण केलेला लेखी इतिहास आहे, तिला आपण केवळ एक साधी 'स्वयंसेवी सांस्कृतिक संस्था' म्हणूच शकत नाही. ही सरळ सरळ एक प्रचंड मोठी 'सत्ता संरचना' - पॉवर स्ट्रक्चर आहे आणि लोकशाहीचा नियम असा सांगतो की, कोणतीही सत्ता रचना ही नेहमी देशातील जनतेला आणि कायद्याला उत्तरदायी असली पाहिजे. मात्र, आरएसएसने आपली ही कायदेशीर जबाबदारी व उत्तरदायित्व टाळण्यातच आपली गेल्या १०१ वर्षांची वाटचाल घालवली आहे; त्यामुळे आता खरा प्रश्न हा उरतो की, भारतातील लोकशाही संस्थांमध्ये या शक्तिशाली व्यवस्थेला जाब विचारण्याची आणि त्यांच्याकडून उत्तरदायित्वाची मागणी करण्याची हिंमत व इच्छाशक्ती अजूनही शिल्लक राहिली आहे का?
हरीश केंची,
९४२२३१०६०९

पवन नहीं आंधी है...!

पवन कल्याणनं बदललं आंध्रातलं राजकारण देशात आणि राज्यात सत्तारूढ झालेल्या तेलुगू देशम - टीडीपी, भाजप, जनसेना युतीच्या यशात महत्त्वाची भूमिका ...