Wednesday, 15 July 2026

ममता बॅनर्जी यांचे संघ, भाजपशी साटेलोटे!

सुमारे २९ वर्षांपूर्वी, १९९७ मध्ये जेव्हा ममता बॅनर्जी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून मुकुल रॉय यांच्यासोबत 'तृणमूल काँग्रेस'ची स्थापना केली, तेव्हा त्यांनी सीपीएम, सीपीआय आणि काँग्रेसला संपवण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये भाजपचा प्रवेश सुलभ केला. मुकुल रॉय नंतर भारतीय जनता पक्षात सामील झाले.
१९९९ मध्ये, ममता बॅनर्जी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए सरकारमध्ये सामील झाल्या आणि रेल्वेमंत्री बनल्या. २००१ च्या सुरुवातीला, जेव्हा 'ऑपरेशन वेस्ट एंड'ने संरक्षण करारांमधलं मोठे लाचखोरीचे प्रकरण उघडकीला आणले, तेव्हा ममता बॅनर्जी एनडीए सरकारमधून बाहेर पडल्या. ऑगस्ट २००१ मध्ये एका मुलाखतीत, जेव्हा ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आले की, त्यांच्या पक्षाच्या एनडीए मध्ये परत येण्याची काही शक्यता आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, "होय, टीएमसीच्या जाहीरनाम्यानुसार, भाजप आमचा 'नैसर्गिक मित्रपक्ष' आहे....!" 
२००३ मध्ये, ममता बॅनर्जी एनडीए सरकारमध्ये पुन्हा सामील झाल्या, परंतु अनेक महिने त्या बिनखात्याच्या मंत्री राहिल्या.
२००३ मध्ये, ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र 'पांचजन्य'चे तत्कालीन संपादक तरुण विजय यांच्या 'कम्युनिस्ट टेररिझम'-साम्यवादी दहशतवाद या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली होती. तरुण विजय यांनी त्यांचे स्वागत करताना त्यांना 'बंगालची दुर्गा' म्हटले होते.
सभागृहात बोलताना, भाजपचे राज्यसभा खासदार बलबीर पुंज ममता बॅनर्जींबद्दल म्हणाले, "आमच्या लाडक्या ममता दीदी म्हणजे दुर्गेचा अवतार आहेत..." अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच पुंज यांचे निधन झाले होते.
आरएसएसने ममता बॅनर्जी यांना 'बंगालची दुर्गा' असेही संबोधले आणि डाव्यांविरुद्धच्या त्यांच्या लढ्याला 'प्रखर पाठिंबा' व्यक्त केला.
आपल्या एका भाषणात, ममता बॅनर्जी यांनी आरएसएसचे मोहन भागवत, शेषाद्री चारी आणि मदनदास देवी यांचा उल्लेख करत म्हटले, "मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक नेत्यांना ओळखत नाही, पण त्यापैकी काहींना मी वैयक्तिकरित्या भेटले आहे. तुम्ही खरे देशभक्त आहात. मला माहीत आहे की तुमचे तुमच्या देशावर खरे प्रेम आहे...." २०१२ मध्ये, आरएसएसचे मुखपत्र 'पांचजन्य'ने ममता बॅनर्जींच्या साध्या जीवनशैलीची प्रशंसा करणारा एक लेख लिहिला होता. त्यात म्हटले होते, "ममता अशा दुर्मिळ राजकारण्यांपैकी एक आहेत, ज्यांनी पैसा कमावण्यासाठी राजकारणाचा वापर केलेला नाही. देशात असे अधिक राजकारणी असते तर किती बरे झाले असते...." २०१९ मध्ये, ममता बॅनर्जींनी एनआरसी आणि सीएएच्या विरोधात अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले. तथापि, जेव्हा संसदेत सीएएवर मतदान झाले, तेव्हा टीएमसीचे आठ खासदार रहस्यमयरीत्या अनुपस्थित होते, ज्यामुळे विधेयक मंजूर झाले. ममता बॅनर्जींनी या खासदारांना माफ केले आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
२७ जानेवारी २०२० रोजी, जेव्हा भाजप सरकारमधील तत्कालीन अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या भाषणात "हरामखोरांना गोळ्या घाला..." अशी घोषणा दिली, तेव्हा टीएमसी नेते शेख आलम यांनी मुर्शिदाबादमध्ये सीएएला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर गोळीबार केला.
२०१७ मध्ये भाजपमध्ये सामील झालेले मुकुल रॉय, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीमध्ये परतले आणि ममता बॅनर्जींनी त्यांचे आनंदाने स्वागत केले. निवडणुकीदरम्यान, मुकुल यांनी पत्रकारांना सांगितले की भाजप टीएमसीच्या बरोबरीचा आहे!
जुलै २०२२ मध्ये, ममता बॅनर्जींनी उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देण्यास नकार दिला. त्यानंतर ममता बॅनर्जींच्या खासदारांनी मतदानात भाग घेतला नाही. जगदीप धनखर विजयी झाले. बंगालच्या राज्यपाल असताना धनखर यांनी ममता बॅनर्जींचे राजकीय आयुष्य कठीण केले होते, त्यामुळे ममता बॅनर्जींनी त्यांना मदत केली. अलीकडेच, सप्टेंबर २०२२ मध्ये, ममता बॅनर्जींनी आरएसएसची भरभरून प्रशंसा करत म्हटले, "संघामध्ये अनेक खूप चांगले लोक आहेत. संघ एक चांगली संघटना आहे...." ममता बॅनर्जी यांनी २०२४ पूर्वी नितीश कुमार यांनी स्थापन केलेल्या इंडिया अलायन्सच्या संयोजकपदी त्यांच्या नियुक्तीला तीव्र विरोध केला. यामुळे नाराज झालेल्या नितीश कुमार यांनी भाजपशी युती केली.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, ममता बॅनर्जी यांनी इंडिया अलायन्ससोबत निवडणूक लढवण्यास नकार दिला आणि आपण एकट्यानेच निवडणूक लढवू अशी घोषणा केली. नरेंद्र मोदी २०२४ ची लोकसभा निवडणूक पुन्हा जिंकले... आणि अशाप्रकारे, बीजेडी, बसपा, शिवसेना, जेडीयू, टीआरएस, वायएसआर, पीडीपी आणि आप यांच्यानंतर, भाजप नावाच्या त्याच ड्रॅगनने टीएमसीला गिळून टाकलं. ममता बॅनर्जी यांनी जे पेरले होते, तेच आता त्या उगवलं आहे. इंडिया अलायन्स तोडून, ​​त्यांनी जे केलं त्याचा अनुभव त्या घेताहेत. आता त्यांच्या पक्षाचे खासदार नक्कीच राघव चड्ढांसारखे असतील...



तर काय झालं असतं..? 
देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस आणि त्या पक्षाचे नेते यांचा सर्वात मोठा त्याग आहे, प्रत्यक्ष सहभाग आहे, ही वस्तुस्थिती नाकारणं म्हणजे मुजोरीशिवाय दुसरं काही नाही. कॉंग्रेसच्याबाबतित धोरणात्मक मतभेद असू शकतात. काँग्रेसचे नेते शंभर टक्के प्रामाणिक आहेत, असं कुणी म्हणणार नाही. पण कम्युनिस्ट पक्षाचा अपवाद सोडला तर इतर पक्षांचे नेते भ्रष्टाचाराच्या बाबतित काँग्रेसच्याही बरेच पुढे आहेत, हे देखील नाकारता येणार नाही! अर्थात.. काही अपवाद सर्वत्रच असतात! भ्रष्टाचाराच्याबाबतीत भारतीय जनता पार्टी निर्विवादपणे पहिल्या नंबरची पार्टी आहे. याबाबतीत तिचा रेकार्ड फक्त तीच मोडू शकते. कुणी काहीही कांगावा केला तरी 'सर्वसमावेशकता' हा कॉंग्रेसच्या धोरणाचा आत्मा होता, आहे आणि राहील. जसजशी काँग्रेस मुळ विचारधारेपासून दूर जाईल.. तसं तसं तिचं अस्तित्व देखिल धोक्यात येईल.ज्यांनी ज्यांनी काँग्रेसला 'बुडतं जहाज' वगैरे म्हणून स्वार्थापोटी हिणवण्याचा प्रयत्न केला, त्या पक्षांची अवस्था आज काय आहे? कुठल्यातरी कोपऱ्यात आपली उपस्थिती असणं, यापलिकडे त्यांचं अस्तित्व काय आहे? बसता उठता कॉंग्रेसच्या नावाने गरळ ओकणारे अनेक पक्ष तर जवळपास नामशेष झालेले आहेत. काहींचे प्रतिनिधित्व कधीही दखलपात्र नव्हते. आताही नाही. 'मेरी मुर्गी की एकही टांग' म्हणत बोंबा मारणं एवढंच त्यांचं कर्तृत्व! अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखिल आज काँग्रेसचे १०० खासदार लोकसभेत आहेत. भविष्यात देखिल काँग्रेसच्या विरोधात असलेला एकतरी पक्ष काँग्रेस एवढ्या संख्येच्या जवळपास पोचण्याची शक्यता आहे का? 'काँग्रेस आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत' असं तुणतुणं वाजवणाऱ्या लोकांची कीव करावीशी वाटते. या पक्षांना देखिल विस्ताराचं स्वातंत्र्य आणि संधी काँग्रेसच्या उदार आणि लोकशाहीवादी भूमिकेमुळेच मिळाली आहे, हे ही वास्तव आहे! आज भाजप जशी वागते तशी काँग्रेस किंवा मोदी-शहा जसे वागतात तसे गांधी-नेहरू विरोधकासोबत वागले असते तर? काँग्रेसच्या नावानं खडे फोडणाऱ्या लोकांच्या हातात काय मिळालं असतं? कुणाची काय ताकद होती? काँग्रेसकडे काय थातूरमातूर मेजाॅरिटी होती का? त्यांना कुणाची काही गरज होती का? किंवा पहिलं सरकार जर भाजपसारख्या पक्षाचं असतं.. तर आज इतर काँग्रेसविरोधी पक्षांची काय अवस्था राहीली असती? भाजप ही पार्टी नव्हे, ती एक विकृती आहे. काँग्रेस मधे काही दोष आहेत, मर्यादा आहेत.. पण ती या देशातली सर्वसमावेशक अशी राजकीय संस्कृती आहे. याचं भान नसलेला कोणताही विचार एकांगी आहे, अपरिपक्व आहे, भाजपाला मदत करणारा आहे. याचा अर्थ.. सर्वांनी काँग्रेसच्या मागं फरफटत जावं, असा मुळीच नाही. कॉंग्रेसच्या चुकिचा विरोध केलाच पाहिजे. पण तो करतांना त्याला विकृती किंवा द्वेषाचा वास असता कामा नये. सकारात्मक विरोधाचं काँग्रेसनंही स्वागतच केलं पाहिजे! कॉंग्रेसला मोकाट रान मिळू नये, यासाठी सकारात्मक आणि सर्वसमावेशक असा आणि भाजपाला ठोस विरोधी असा तिसरा पर्याय देखिल उपलब्ध असला पाहिजे. निदान महाराष्ट्रात तरी सध्या तसं काही दिसत नाही. पण प्रयत्न सुरू असलेच पाहिजेत. बघू या!  मुळात काही अत्यल्प सन्माननीय अपवाद वगळता बहुतांशी प्रादेशिक पक्ष काँग्रेसी राजकारणाला परस्पर छेद देण्यासाठीच निर्माण केले गेले.
मूळ प्रेरणा पूर्वीचा जनसंघ आणि आताचा संघरूपी भाजप....
सुरुवातीला काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला प्रदेश. हळूहळू कम्युनिस्ट केडर बळकट असलेने कम्युनिस्टांचा अभेद्य गड बनला तरीही पश्चिम बंगालमध्ये डाव्यांशी काँग्रेसचे मिळतेजुळते धोरण असायचं काँग्रेसमध्ये २६ वर्षे सक्रिय राजकारणाचा अबकड शिकलेल्या ममता बॅनर्जी नामक अती महत्वकांक्षी महिलेची घुसमट व्हायला लागली. कट्टर कम्युनिस्ट आणि बऱ्यापैकी काँग्रेसी वरचष्मा असलेल्या राज्यात भाजपला अजिबात स्थान नव्हतं. संघीय संधीची वाट पाहत दबा धरून बसलेले. त्यांनी ममता बॅनर्जी यांची अस्वस्थता हेरली. त्यांच्या अहंकाराला खतपाणी घातलं. काँग्रेस कम्युनिस्टांना झुकते माप देते या सदराखाली. ममता बॅनर्जी यांनी १९९७ मध्ये काँग्रेस पक्ष सोडला आणि १९९८ साली तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना केली. इथेच भाजपच्या वंगभूमीतील प्रवेशाची पायभरणी  झाली.
नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे या मराठी म्हणीची प्रकर्षाने आठवण झाली.
१९९९ मध्ये ममता बॅनर्जी भाजप प्रणित नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट मध्ये सामील झाल्या. त्या अट्टल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये रेल्वेमंत्री बनल्या.
२००१ मध्ये त्यांनी भाजप आपला स्वाभाविक सहकारी पक्ष असल्याचं जाहीर सभेत सांगितलं.
आज मुस्लिमांच्या स्वयंघोषित कैवारी बनलेल्या ममता बॅनर्जी २००२ गुजरातमधील गोधरा येथे मुस्लिमांची कत्तल होत असताना केंद्रात कोळसा आणि खाण मंत्रिपद भूषवत होत्या. भाजपच्या संघीय वर्तुळात बंगालची दुर्गा असं ममता बॅनर्जी यांना गौरवले जायचं. हीच ऐतिहासिक चूक त्यांच्या मुळावर उठणार होती. जुलमी नागरिकता विधेयकाच्या CAA & NRC वेळी रस्त्यावर उतरलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे ८ सदस्य संसदेत जुलमी नागरिकता विधेयक मंजूर व्हायच्या वेळी गैरहजर राहिले. हीच खेळी महाराष्ट्रातील शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्षाने सुद्धा त्यावेळी केली होती असो. ममता बॅनर्जी यांचे अत्यंत जवळचे मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी त्यांनी तृणमूल काँग्रेसचा संपूर्ण राजकारणाचे गुपित भाजपला सांगितलं. आश्चर्य म्हणा किंवा धूर्त कावेबाज खेळी म्हणा पुन्हा २०२१ मध्ये मुकुल रॉय स्वगृही तृणमूल काँग्रेस मध्ये परतले.
मुकुल रॉय यांच्या मते, BJP is equal to TMC...
खात्री करून घ्यायची असेल तर त्यांचे हे स्टेटमेंट यूट्यूब वर ऐकायला मिळेल. असो..
२०२४ लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या, एरवी भाजप विरोधाची पुंगी वाजवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीत सामील व्हायला खूप आढेवेढे घेतले. हो नाही करत सामील व्हायला तयार पण झाल्या. कुठे माशी शिंकली माहीत नाही ममता बॅनर्जी यांनी भाजप विरोधी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला हूल दिली. आणि ऐनवेळी घुमजाव करत एकला चलो रे ची अडेलतट्टू भूमिका घेतली. आणि २०२४ लोकसभा निवडणुका लढवल्या. हाच कित्ता बिहारमधील नितीशकुमार यांनी गिरवला. जे इंडिया आघाडीचे निमंत्रक होते. याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाला. बीजू जनता दल, बहुजन समाज पार्टी, जनता दल युनायटेड, तेलंगणा राष्ट्रसमिती, आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेना या आतून भाजपबद्दल ममत्व असलेल्या प्रादेशिक पक्षांची पुढं जाऊन भाजपने काय हालत केली हे सगळा देश जाणतो आहे. पुढचा नंबर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाचा असणार लिहून ठेवा.
असंगाशी संग म्हणजे प्राणाशी गाठ होय. ज्या भाजपच्या मदतीने ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला वाकुल्या दाखवल्या त्याच भाजपने त्यांची राजकारणातील सद्दी संपुष्टात आणली. ममता बॅनर्जी यांनी ज्या भाजपासाठी सलग ३५ वर्षे सत्तेत असलेल्या पश्चिम बंगालमधील कम्युनिस्ट पक्षाला घरघर लावली. त्याच भाजपने आज ममता बॅनर्जी यांना रस्त्यावर आणलं. कालाय तस्मै नमः ...! तुम्ही म्हणाल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाशी आघाडी का केली नाही? तर मित्रहो!! ममता बॅनर्जी कधीही विश्वासास पात्र नव्हत्या नाहीत आणि भविष्यातही नसतील. त्या काँग्रेसला खिजगणतीत धरत नाहीत. मग उगीच पाठी पडण्यात काय अर्थ?
जिथं तुम्हाला गृहितच धरलं जात नाही तिथं कसली युती? कसली आघाडी? कसलं गठबंधन? आज तृणमूल काँग्रेस पक्षाचा पराभव हे ममता बॅनर्जी यांच्या २९ वर्षाच्या संधीसाधू अहंकारी राजकारणाचा परिपाक आहे. भाजपने मतदारांची SIR नामक गोंडस नावाखाली निवडणूक आयोगाला हाताशी धरून  केलेली छाटणी ही बाब पण ममता बॅनर्जी यांच्या दारूण पराभवाला कारणीभूत ठरली. ही बाब कुणीही नाकारू शकत नाही. ज्या ९० मतदारसंघात मतदार छाटणी केली गेली निवडणूक आयोगाने SIR नावाखाली तिथं भाजपचे उमेदवार निवडून आले. ही ठरवून केलेली राजकीय हरामखोरी आहे. ही मत चोरी नव्हे मत दरोडा आहे यात वादच नाही. पण म्हणून ममता बॅनर्जी यांनी केलेल्या अर्थशून्य राजकीय तडजोडी आणि पडद्यामागील खेळ्या कधीही समर्थनीय असूच शकत नाहीत. जे पेराल तेच उगवेल हा सृष्टीचा नियम सर्वव्यापी लागू होतो. जननायक पंडित राहुल गांधी यांच्या शब्दात,
एकवेळ तुम्ही भाजप समर्थक असता किंवा भाजप विरोधक अधले मधले काठावरचे असं काहीही नसतं.
येत्या काही काळात हे असे काठावरचे, दोन्ही दरडी वर पाय ठेवून असलेले हवसे नवसे गवसे भाजपच्या इडी, CBI, निवडणूक आयोग यांच्या मदतीने राजकारणातून पालापाचोळ्या सारखे उडून गेलेले दिसतील.



No comments:

Post a Comment

वैचारिक स्वायत्तता की राजकीय सुरक्षितता *विस्कटलेली राष्ट्रवादी...!*

थकलो आहे जरी l अजून मी झुकलो नाही ll जिंकलो नसलो तरी l अजून मी हरलो नाही ll अरे संकटांनो, अजून दम लावा l कारण कमी पडलो असलो तरी ...