Wednesday, 15 July 2026

स्वरयोगिनी जानकी अम्मा

सिस्टला श्रीराममूर्ती जानकी म्हणजेच एस. जानकी या नावाने सुप्रसिध्द असलेल्या प्रसिध्द पार्श्वगायिका जानकीअम्मा यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी म्हैसूर येथे शनिवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत विश्वातला आणखी एक तेजस्वी तारा निखळला आहे. सहा दशकांहूनही अधिक काळ एस. जानकी यांनी आपल्या अद्वितीय स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. 
२३ एप्रिल १९३८ रोजी आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर येथे जन्मलेल्या या थोर गायिकेने शास्त्रीय गायन वा संगीताचे कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता केवळ आपल्या उपजत गानकौशल्याच्या बळावर मिळवलेली अफाट लोकप्रियता विस्मयचकित करणारीच म्हणावी लागेल. आपल्या गायनकारकिर्दीत त्यांनी कन्नड, तमिळ, तेलुगू, तुळू, मल्याळम, हिंदी, कोकणी अशा वीसच्यावर भारतीय भाषांमधून गाणी गायली आहेत. इंग्रजी, जपानी, जर्मन आणि फ्रेंच इत्यादी विदेशी भाषांमधील गाणीसुध्दा त्यांनी गायिली होती. तब्बल ४८ हजारांच्या वर गाणी गाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. दक्षिण चित्रपटसृष्टीतील इलैयाराजा, एम. एस. विश्वनाथन ते ए. आर. रहमान अशा जुन्या नव्या नामवंत संगीतकारांसोबत त्यांनी काम केले. कन्नड भाषेत त्यांनी सर्वाधिक गाणी गायली आहेत. हेमवती या कन्नड चित्रपटातील 'शिव शिव एन्नदा' हे गीत आपल्या गायन प्रवासातले सर्वात कठीण गीत होते असे त्या सांगत असत. २०१३ साली भारत सरकारकडून जाहीर झालेला पद्मभूषण पुरस्कार त्यांनी नम्रपणे नाकारला होता, जानकी अम्मांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकीय आणि चित्रपट तसेच कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाच्या एक महत्त्वपूर्ण साक्षीदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा आवाज आजही रेडिओ, दूरदर्शन, संगीतमैफिली आणि डिजिटल माध्यमातून रसिकांच्या मनाला स्पर्श करतो. काळ बदलला, संगीतशैली बदलली, तंत्रज्ञानही बदलले पण जानकीअम्मांच्या आवाजातील जादू आजही तितकीच ताजी आणि भावस्पर्शी आहे. आवाजावर विलक्षण पकड असलेल्या एस. जानकी यांनी प्रेमगीत, विरहगीत, भक्तिगीत, लोकगीत, अंगाईगीत, शास्त्रीय गीत अशा अनेक प्रकारच्या गाण्यांमधून स्वतःची गायकी सिध्द केली होती. चारवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी तसेच कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश राज्यांकडून अनेक राज्य पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. २०१७ साली म्हैसूर येथे आयोजित एका संगीत कार्यक्रमात त्यांनी एक मल्याळम अंगाई गीत गाऊन साठ वर्षांच्या आपल्या गायन कारकिर्दीला विराम दिला होता. जानकीअम्मांचा आवाज संगीत प्रेर्मीच्या आठवणीत आणि भारतीय संस्कृतीच्या सामूहिक स्मरणात कायम गुंजत राहाणार आहे. 
चोल, पल्लव आणि विजयनगर साम्राज्य काळात एस. जानकी जन्मल्या असत्या तर त्यांचा इतिहास आतापेक्षा अधिक वेगळ्या आणि ओजस्वी शब्दांत लिहिला गेला असता. राजा बुक्क राया याच्या कलावंतांच्या ताफ्यातील रामप्पा ह्या महान शिल्पकाराने जानकी यांचेही उत्कट आर्त शिल्प बनवले असते! शतकानु शतकांपासून उत्तरेकडील राज्यात नाचगाणं व्हायचं मात्र ते कोठयावर चालायचं. त्या बदनाम गल्ल्यात जाऊन गाणी ऐकणारी दोनच प्रकारची माणसं होती, एक म्हणजे अट्टल शौकीन आणि दुसरे म्हणजे अय्याश कदरदान! 
मात्र दक्षिणेकडील इतिहास पाहिला तर असं लक्षात येतं की तिकडे तवायफ आणि कोठे नव्हते! मात्र तिथे वेगळा पर्याय होता, आणि तो देवदासी परंपरेचा होता! या परंपरेतील स्त्रियांना नाचगाणं करण्यास भाग पाडले जाई. पुढे जाऊन हे सगळं त्यांच्या अंगवळणी पडलं की त्या बायका त्यात मुरत असत! नाचगाणं त्यांच्या रोमरोमात भिनत असे आणि त्यांचे एक वेगळेच रूप समोर यायचे. सद्र कचेरी किंवा सदर कचेरी ह्या नावाने याला तत्कालीन राजेशाहीतही मान्यता असे. पुढे जाऊन मंदिर, सभागृह आदी ठिकाणी देखील देवदासी नाचू लागल्या  गायकी सादर करू लागल्या. हयात प्रामुख्याने पदम आणि जावळी हे दोन प्रकार असत. अत्यंत संथ लय असलेली, शृंगारिक आणि भावपूर्ण गाणी पदम श्रेणीत असत. यामध्ये नायक आणि नायिकेमधील प्रेम, विरह आणि मिलन यांचे वर्णन असे. जावळी हा गाण्याचा प्रकार 'ठुमरी'शी अत्यंत साधर्म्य असणारा. जावळी ही जलद लयीत गायली जाणारी, काहीशी चंचल, थेट आणि थेट शृंगारिक भावना व्यक्त करणारी गाणी असत. ही गाणी प्रादेशिक भाषांमध्ये तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम असत. 
ह्या गायकीत ख्यातनाम होण्यासाठी ज्या प्रकारचा स्वर, ज्या प्रकारचे आलाप घेणं अपेक्षित असे, आरोह अवरोहवरची हुकूमत आवश्यक मानली जाई त्यात जानकी यांचा आवाज अगदी परफेक्ट सूट होतो. अशी वैशिष्ट्ये असलेली त्यांनी गायलेली गाणी नजरेसमोर आणली तर हे नक्की पटेल. विशेषतः त्यांची कन्नड आणि तमिळ गाणी अधिक चपखल ठरतील. 'सत्यमेव जयते' ह्या हिंदी सिनेमामधलं दिल में हो तुम.. आंखो में तुम' हे गाणं नव्याने ऐका, तुम्हालाही उमगेल. असो. दाक्षिणात्य भाषांमध्ये विपुल गायन केलेल्या विख्यात गायिका एस. जानकी यांचे काल निधन झालं. त्यांच्याविषयी अनेकांनी उत्तम लेखन केलंय. एस. जानकी यांच्याविषयीच्या काही नोंदींची दखल घेतली पाहिजे असं मनोमन वाटते. साऊथच्या फिल्म आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जानकीअम्मा ह्या नावानेच त्या ओळखल्या जायच्या. त्यांच्या क्लिप्स किंवा फोटो पाहिले तर लक्षात येईल की एके काळी त्या रंगीत साडी घालून, साधाच पण नेटका शृंगार करून गायनाला उभ्या असत. मात्र मागील तीन दशकातले त्यांचे फोटो, व्हिडीओ क्लिप्स पाहिल्या तर त्यांचे राहणीमान आणि वेशभूषा लक्षणीय बदलल्याचे जाणवते. 
कपाळावर आडवा शिवगंध लावलेल्या आणि पांढुरक्या शेडच्या साडीत त्या सर्रास दिसू लागल्या. कसलाही साजशृंगार नाही की, कसला लेप नाही! जे आहे ते असे आहे अशा पद्धतीचे त्यांचे दर्शन होई. इतकेच नव्हे तर एस. जानकींची पहिल्या पाच दशकातली गाणी आणि शेवटच्या दोन दशकातली गाणी पाहिली तर एक फरक नक्की लक्षात येईल की, त्यांनी शांत शीतल मधुर गाणी नंतरच्या काळात अधिक गायलीत. ह्या सगळ्यामागे एक गोष्ट होती..  
एस. जानकींची विरह गीते अधिक फेमस झालीत. त्यांच्या आवाजाचा खास स्वर आणि कोमलता त्यात अधिक गहिरी जाणवते. कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या चारही भाषेत त्यांनी हिट गाणी दिली आहेत. एस. पी. बालसुब्रमण्यम आणि येसुदास हे त्यांचे आवडते सहगायक. इलायराजाने त्यांच्या गायकीला हिऱ्याचे पैलू पाडले. 
एस. जानकी यांचा जन्म गुंटूर येथील पल्लापटला, रेपल्ले गावात एका तेलगू भाषिक ब्राह्मण कुटुंबातला. करीमनगर जिल्ह्यातील सिरसिला येथे डिस्पेन्सरी चालवणारे त्यांचे वडील शिष्टला श्रीराममूर्ती हे शिक्षक आणि आयुर्वेदिक डॉक्टर होते. जानकींना लहानपणापासूनच संगीताची आवड होती आणि त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी सादरीकरण करण्यास सुरुवात केली. त्यांनी नादस्वरम विद्वान श्री पैडीस्वामी यांच्याकडून फक्त एक वर्ष संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी कोव्वूर येथे वाराणसी बलरामय्या यांच्याकडून काही गाणीही शिकली. त्यांना चित्रपट संगीताची प्रेरणा मिळाली आणि चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्या रंगमंचावर लता मंगेशकर, पी. लीला, जिक्की आणि पी. सुशीला यांची गाणी सादर करत असत. मात्र ह्या सगळ्याहून अधिक प्रेरणा त्यांना एका व्यक्तीने दिली आणि ते म्हणजे त्यांचे मित्र, गुरु, हितैषी आणि प्रियकर असणारे व्ही. रामप्रसाद! रामप्रसाद यांनी जानकींच्या करियरला खरा आकार दिला. पुढे जाऊन ते दोघे विवाहबद्ध झाले. प्रभू रामचंद्र यांच्या पत्नीचे नाव जानकी होते आणि रामप्रसाद यांच्या पत्नीचे नावही जानकीच होते! एक जान है हम अशा पद्धतीचे त्यांचे प्रेम होते. मुरली कृष्णा हे त्यांचे एकुलते एक अपत्य! ह्या त्रिकोणी संसारात अफाट सुख होते. मात्र १९९६ मध्ये रामप्रसाद यांचे निधन झाले आणि जानकी अम्मानी काही काळ स्वतःला कोंडून घेतलं. आपल्या रामाशिवाय जगणं त्यांना मान्य नव्हतं. अखेर त्यांची समजूत काढण्यात आली. 
सर्वांना वाटलं, लवकरच सारं सुरळीत होईल. काही अंशी गाडी मार्गी लागली देखील, मात्र काही ओरखडे तसेच राहिले जे जगाला दिसले नाहीत मात्र  जानकीच्या काळजावर त्याचे चरे कायम राहिले. त्यांचे बाह्यवर्तन पद्म गायकी गाणाऱ्या गायिकेसारखे झाले! त्यांनी आयुष्यातले सर्व रंग वर्ज्य केले. शृंगार कायमचा त्यागला. एखाद्या संन्यस्त गायिकेसारख्या त्या दिसू लागल्या. त्यांच्या चाहत्यांनी समजून घेतलं की, जानकीने रामाचं निर्गमन काळजाला लावून घेतलंय! ह्यानंतर त्यांची गायकीही धीरगंभीर शांतशीतल होत गेली. दरम्यान वाढत्या वयाने त्यांना शारीरिक थकवा येऊ लागला. भरतनाट्यम मध्ये निपुण असणाऱ्या उमासोबत मुरली कृष्णचे लग्न झाले. मुरली कृष्णने गायन संगीत अभिनय क्षेत्र निवडण्याऐवजी नृत्याविष्कारावर जीव लावला. त्यात त्याने नाव कमावले. उमा आणि मुरली यांना दोन मुली झाल्या, त्याही उत्तम नर्तिका आहेत. अलीकडील काळात जानकी अम्मा ह्या सुखात रमल्या होत्या मात्र पुन्हा एकदा त्यांना वियोगाचा सामना करावा लागला. सहा महिन्यापूर्वीच त्यांचा एकुलता एक मुलगा मुरली कृष्ण याचे वयाच्या ६५ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. जानकी अम्मा कायमच्या कोलमडून गेल्या. त्यांनी सार्वजनिक जीवनातून स्वतःला अलग केलं. आधी पती आणि नंतर एकुलता एक मुलगा ह्यांच्या जाण्याने त्यांची उमेद नष्ट झाली आणि त्यातच त्यांचे काल निधन झाले. त्यांच्या आवाजातले गगनवो येल्लू हे कन्नड गाणं ज्यांनी ऐकले असेल त्यांना एस. जानकी यांच्या आवाजाचा खरा टोन नक्की उमजेल. 
मुरुगन हे दक्षिणेकडचे आद्य दैवत! मुरुगनचे एकही मंदिर नसेल जिथे एस. जानकीचे सिंगार वेळनि देवा हे गाणं लावलं जात नसेल! मुरुगन, एस. जानकी आणि हे गाणं यांचं एक अजब समीकरण आहे! पोस्टच्या सुरुवातीला चोल पल्लव यांचा उल्लेख त्यांना किती तंतोतंत लागू होतो हे कुणाला जाणून घ्यायचे असेल तर त्याने हे गाणे जरूर ऐकावे. दुसरी गोष्ट एस. जानकी यांच्या चाहत्यांची! जेन झेड पासून ते शंभरी गाठलेले चाहते मिळण्याचे भाग्य असणारी विविध भाषांमध्ये हिट गायकी सादर करणारी चतुरस्त्र गायिका सद्यकाळात तर दृष्टीक्षेपात नाहीये. कदाचित चित्रा यांचे नाव त्यात असू शकेल, मात्र चित्रा स्वतःच जानकी भक्त आहेत!     
एका सुवर्णकार कुटुंबात जन्माला येऊनही वयाच्या अठराव्या वर्षी आईचे निधन झाल्यावर घर सोडून परागंदा झालेल्या फारूक कैसरने त्याची पत्नी आयेशा हिच्यासाठी एक गाणं लिहिलेलं - दिल में हो तुम, आँखो में तुम! सत्यमेव जयते चित्रपटात विनोद खन्ना आणि अनिता राज यांच्यावर हे गाणं चित्रित झालं. बप्पीदा आणि जानकी यांनी हे अप्रतिम गाणं गायलं. चित्रपट रिलीज झाल्यानंतर बरोबर सहा महिन्यात फारूक कैसरचे निधन झाले. त्यांच्या दोन मुलांचेही निधन झाले. हे गाणं नीट ऐकलं तर लक्षात येईल की, ही तर एस. जानकी यांच्या आयुष्याची कथा आहे! त्यांच्या निधनाने एका पर्वाची सांगता झालीय. एस. जानकी यांच्या जाण्याचं सर्वाधिक दुःख चित्रा यांनाच झालं असेल, त्यांचं औदासिन्य लवकर दूर होवो! स्वरयोगिनी जानकीअम्मा यांना भावपूर्ण आदरांजली.

No comments:

Post a Comment

वैचारिक स्वायत्तता की राजकीय सुरक्षितता *विस्कटलेली राष्ट्रवादी...!*

थकलो आहे जरी l अजून मी झुकलो नाही ll जिंकलो नसलो तरी l अजून मी हरलो नाही ll अरे संकटांनो, अजून दम लावा l कारण कमी पडलो असलो तरी ...