Monday, 18 May 2026

यशापेक्षा अपयशाची चिकित्सा

"भारतातला कोणताही राजकीय पक्ष केवळ 'वोट चोरी'च्या जोरावर निवडणूक जिंकू शकत नाही. फार तर, हेराफेरीमुळे काही जागांवर प्रभाव पडू शकतो, जे अत्यंत चुकीचं अन् धोकादायक आहे. पण प्रचंड जनादेश जनतेच्या मनःस्थितीतून येतो. जेव्हा लोक बदल हवाय असं ठरवतात, तेव्हा सरकारे हरतात. शासनाबद्दल प्रशंसा होऊनही एम.के.स्टॅलिन, ममता बॅनर्जी जर स्वतःच्याच जागेवर हरले, तर याचा अर्थ मतदारांनी याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलेय. निवडणुका रहिवाशांद्वारे ठरवल्या जातात, बाहेरील कथा, सोशल मीडियावरील ट्रेंड वा टेलिव्हिजन वरील चर्चांद्वारे नाही. पण आज लोकांना निवडणुकीतील पराभव स्वीकारायला का त्रास होतो. अल्गोरिदम नागरिकांना राजकीय वास्तवाची एकच आवृत्ती सतत दाखवत राहतात, तेव्हा पराभव हा सामान्य लोकशाही निकाल वाटत नाही. तो विश्वातला दोष वाटतो. लोक आता ज्या डिजिटल बुडबुड्यांमध्ये राहतात, त्याचाच एक उप-उत्पादन म्हणून सत्याचा इन्कार केला जातोय. हीच लोकशाही आहे!"
........................................................
*प्र*त्येक अनुभव माणसासाठी एक धडा असतो. कधी तो वाईट असतो तर कधी चांगला असतो. त्या अनुभवात चांगले वा सोपे असेल त्या़च्या आहारी जाणार्‍यांना त्यातून धडा घेता येत नाही. तर वाईट अनुभवाने खच्ची होणार्‍यांनाही काही शिकता येत नाही. प्रामुख्याने आपल्या यशातही काही त्रुटी राहिली असेल तर ती शोधणारा अनुभवातून शिकत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा त्या़ वर्गातले आहेत. म्हणूनच त्यांनी राजकारणच बदलून टाकलेय. काही वर्षापुर्वी टिंगल वा टिकेचा विषय असलेली ही जोडगोळी, आज भल्याभल्या राजकीय अभ्यासक विश्लेषकांना न सुटणारं कोडं होऊन बसलंय. कारण अशा अभ्यासकांना अजूनही त्यांची कार्यपद्धती, शैली समजून घेण्याची इच्छाही झालेली नाही. २०१४ च्या लोकसभा मतदानाने निवडणूकांची मोजपट्टी बदलून टाकलीय. जुन्या कालबाह्य मोजमापांनी नव्या राजकारणाची गणिते मांडता येत नाहीत, की समिकरणे सोडवता येणार नाहीत. पण विश्लेषकांच्या कालबाह्य विवेचनात गुरफ़टून बसलेल्या अनेक पक्षांना मात्र, त्याचे चटके बसत असतात. २०१४ च्या अपुर्व यशानंतर दोनचार राज्यातही भाजपने यश मिळवले आणि मोदीलाट कधी अन् कोण रोखणार; अशी चर्चा रंगलेली होती. अशावेळी दिल्ली विधानसभेत केजरीवाल यांच्या पक्षाने मोठे यश मिळवले. बिहारमध्ये नितीश-लालूंनी काँग्रेसला सोबत घेत भाजपचा विजयरथ रोखला. त्यामुळे आता मोदीलाट संपली वा ओसरली, असा निष्कर्ष काढला गेला. पण तो लौकरच खोटा पडला. किंबहूना अमित शहांनी तो खोटा पाडून दाखवला. कारण तो विरोधकांचा विजय नव्हता तर शहा यांनी केलेल्या चुकांची ती किंमत होती. नंतर शहांनी चुक सुधारली आणि सर्वांना पुन्हा मोदीलाट भेडसावू लागली. 
मोदीलाट म्हणजे तरी काय? वास्तवात मोदीलाट वगैरे काहीही अस्तित्वात नाही. हे खुद्द मोदी जाणतात. शहांनाही त्या़ची खात्री आहे. विरोधकांनी ज्याचा बागुलबुवा तयार केलाय, त्याला विरोधकच घाबरत असतील, तर मोदी-शहांनी गैरसमज दूर करण्याचा विचारही करण्याची गरज नसते. उलट त्याच भितीला आपले बलस्थान बनवून विजयाकडे झेप घ्यायची असते. तीच या जोडगोळीची रणनिती होऊन बसलीय. विरोधकांनी कितीही तयारी वा बेरीज वजाबाक्या कराव्यात, आपण त्यावर मात करायची, असे गणित मोदी-शहांनी मांडलेलंय. अर्थात तेच अन्य पक्षांचेही गणित असते. पण त्यातला फ़रक थोडा लक्षणिय आहे. विरोधक नेहमी आपल्या बलस्थानावर विसंबून राहातात आणि दुर्बळतेचा अजिबात विचार करत नाहीत. शहांची निती अन् चाल नेमकी उलट आहे. ते बलस्थाने गृहीत धरतात. दुबळेपणा कुठे किती आहे, त्यावरून समिकरणे मांडतात. आपली शक्ती मर्यादित आहे अन् ती सर्वत्र सारखीच लावली; तर अपव्यय होत असतो. जिथे आपण प्रबळ आहोत, तिथे किरकोळ शक्ती लावायची अन् त्यातली उचलून दुर्बळ जागी अधिक शक्ती लावायची, अशी त्यांची रणनिती असते. परिणामी दुर्बळ जागीही जिंकण्याची शक्यता वाढते. जिथे जिंकणे सहजशक्य आहे, तिथे शक्तीचा अपव्यय होत नाही. निवडणूका नुसत्या विजय पराजयाची कथा नसते. त्यात प्रत्येक पक्ष वा उमेदवाराचे बलाबल स्पष्टपणे समोर आलेले असते. त्या आकडेवारीचा अभ्यास करून बलस्थाने आणि दुर्बळस्थाने निश्चीत करता येत असतात. म्हणून तर शहा यांनी आता दोन वर्षे आधीच २०२९ च्या लोकसभेची तयारी आरंभलीय. त्यांचे लक्ष दुर्बळ स्थानावर आहे. त्यांनी देशव्यापी दौरा आखलाय. त्यात अशा दुबळ्या जागी, संघटना उभी करण्याला प्राधान्य दिलेलेय. रणनिती वा युद्धनिती म्हणजे तरी काय असते? त्यात जिंकायचे असते. त्यासाठी जे डावपेच खेळले जातात, त्यात एक सुसुत्र धोरण असते. त्याला रणनिती म्हणतात. अशा रणनितीमध्ये विरोधक वा शत्रूच्या दुर्बळ जागी हल्ला चढवून, त्याला बेजार करायची योजना असते. तशीच आपल्या बलस्थानी कमकुवतपणा येऊ नये याचीही काळजी घेतली जात असते. शहा यांनी भाजपची सुत्रे हाती घेतल्यापासून देशव्यापी पक्षाचा विस्तार करण्याचा पवित्रा घेतलाय. त्याचे कारण कुठल्याही राज्यामध्ये आपल्याला अन्य कुणाशी युती आघाडी करून परावलंबी राहायची अगतिकता शिल्लक राहू नये. अशी त्यांची निती आहे. त्यातला महत्वाचा भाग असा, की मित्रपक्ष म्हणून जवळ घेतलेल्या पक्षांचा लाभ यश मिळवण्यासाठी करायचा. पण नुसत्या यशावर खुश राहायचे नाही, तर आपला प्रभाव वाढवून स्वबळावर यशस्वी होण्याची सज्जता निर्माण करायची. यात आपल्या दुर्बळ जागा बलवान करणे, हीच रणनिती असू शकते. 
गेल्या लोकसभा निवडणूकीत २४२ जागा अन् बहूमत भाजपने मिळवले तरी उर्वरित जागी यश मिळालेले नाही. त्यात काही जागा मित्रपक्षांच्या आहेत तर काही जागी भाजपने अपयश पचवलेले आहे. अशा जागी पक्षाला मजबूत करणे, ही रणनिती त्यांनी आखलेली आहे. त्यात बंगाल, ओडिशा, तामिळनाडु, आंध्रप्रदेश, केरळ अशा राज्यांचा समावेश होतो. अशा जागी पक्षाची भक्कम संघटना उभी करण्याला, हा पक्ष प्राधान्य देतो आहे. त्याच्या नेमके उलट काँग्रेस वा इतर विरोधी पक्ष, आपापली शक्ती एकजुट करून मोदींना रोखण्याची स्वप्ने रंगवत आहेत. त्यांच्या एकत्र येण्याची चिंता मोदी-शहांना सतावत नाही. त्यांना आपला पक्ष कुठे दुर्बळ आहे, तिथे मजबूत करण्याची चिंता लागलेली आहे. हाच मोठा फ़रक आहे. तिथेच मोदीना पराभूत करण्यात विरोधक तोकडे पडताहेत. सध्या देशात विविध पक्षांची बडी आघाडी उभी करून मोदींना रोखण्याची गणिते मांडली जाताहेत. त्यात कुठे कोण नेता वा कुठला पक्ष बलवान आहे, त्याचे हिशोब मांडले जात असतात. उलट दौरा करायला निघालेल्या अमित शहांनी भाजपची स्थिती जिथे दुबळी आहे, अशा मतदारसंघांची निवड केली आहे. मागल्या लोकसभेत ज्या मतदारसंघात भाजपला चांगली मते मिळवता आली नाहीत, तिथे पुढल्या दोन वर्षात लक्ष केंद्रीत करण्याचा विचार या अध्यक्षाच्या मनामध्ये घोळतोय. पण काँग्रेससहीत अन्य पक्ष आपण कुठल्या भागात व जागी दुबळे आहोत, तिथे मजबूत होण्याचा विचारही करायला तयार नाहीत. आपली त्रुटी भरून काढण्यासाठी अन्य पक्षाला सोबत घेण्याची पळवाट शोधण्यात प्रत्येक विरोधक गर्क आहे. असे गणित मांडण्यातच पराभूत मनोवृत्ती दिसते. आपण स्वबळावर भाजपशी लढू शकत नसल्याची, ही अप्रत्यक्ष कबुलीच असते. ती लढण्याची इच्छा मारून टाकत असते. निवडणूकांचे रणमैदान जवळ आल्यावर जागावाटप वा आघाडीची कल्पना समजू शकते. पक्षाची संघटना बांधायला तेव्हा सवड नसते. पण लोकसभा निवडणुकांना दोन वर्षे बाकी असताना, संघटना बांधणे वा असलेली संघटना मजबूत करण्याचा विचारही ज्यांना सुचत नाही, ते लढणार म्हणजे काय? उसनवारीने लढता येत नाही आणि दुसर्‍याच्या खांद्यावर बंदुका ठेवून लढाया जिंकता येत नसतात. याचे भानही नसल्यांना मोदी-शहा म्हणूनच घाबरत नाहीत. ते यश मिळाल्यानंतरही त्यात रममाण होण्यापेक्षा कुठे कमी पडलो, त्याचा शोध घेतात. त्यामुळेच त्यांची रणनिती यशस्वी होताना दिसतेय आणि विरोधकांना त्यांच्या विरोधातली रणनिती आखणेही अशक्य होत चाललेय. राजकारणाची ही नवी दिशा भाजपचे नवे नेतृत्व घेऊन आले आहे आणि त्याच्याची टक्कर देऊ शकतील, त्यांनाच राजकारणात टिकून रहाता येईल. नुसत्या शिव्याशाप देऊन वा टिकेच्या तोफ़ा डागून काहीही उपयोग नाही. त्यातून केजरीवाल होता येते. मोदी होणे कदापी शक्य नाही.
राजकारण व्यक्तिमत्त्वांच्या इतके आहारी का गेले आहे, तर दुसरीकडे सार्वजनिक चर्चेतून विचारधारा हळूहळू नाहीशी होतेय. प्रत्येक निवडणूक चेहरे, घोषणा, देखावा, सोशल मीडियाच्या प्रभावावर चाललेली दिसते. नेत्यांचे ब्रँडप्रमाणे मार्केटिंग केले जाते. राजकीय वादविवाद हे चाहत्यांच्या युद्धासारखे झालेत. या सर्व देखाव्याच्या मध्यभागी, एक मूलभूत प्रश्न क्वचितच विचारला जातो: एखादा पक्ष नेमका कशासाठी उभा आहे? कारण विचारधारे शिवायचे राजकारण अखेरीस दिशाहीन सत्तासंघर्ष बनते. विचारधारा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. ती विश्वासांची एक चौकट आहे, जी सरकार अर्थव्यवस्था, लोककल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक न्याय आणि वैयक्तिक स्वातंत्र्य याकडे कसे पाहते हे ठरवते. ती प्राधान्यक्रम निश्चित करते. राजकारण हे केवळ एक साधन आहे, ज्याद्वारे त्या प्राधान्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. जेव्हा विचारधारेची जागा अस्मिता वा व्यक्तिमत्त्व पूजेने घेतली जाते, तेव्हा खरा धोका सुरू होतो. केवळ जात, धर्म, घराणेशाही, भाषा वा भावनिक ओढीच्या दृष्टिकोनातून मतदान करणं लोकशाही विचारांना कमकुवत करते. अस्मिता ही वारसा हक्काने मिळते. विचारधारा जाणीवपूर्वक निवडली जाते. हा फरक सर्व काही बदलून टाकतो.
विचारधारेने प्रेरित झालेला नागरिक धोरणे, संस्था, दीर्घकालीन राष्ट्रीय दिशा यांचे मूल्यांकन करतो. केवळ व्यक्तींच्या प्रभावाखाली असलेला नागरिक, नेत्यांची कामगिरी वा त्यांच्यातला विरोधाभास विचारात न घेता, अनेकदा त्यांच्या बचावासाठी भावनिकदृष्ट्या गुंतून जातो. केवळ व्यक्तींभोवती उभारलेल्या चळवळी, एकदा का महत्त्वाकांक्षा, उत्तराधिकारासाठीचे संघर्ष वा राजकीय दबाव निर्माण झाला की कमकुवत होतात. परंतु विचारधारा राजकीय चळवळींना सातत्य देते. ती अंतर्गत शिस्त निर्माण करते. महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा नेते मूळ तत्त्वांपासून दूर जातात, तेव्हा ती सामान्य कार्यकर्त्यांना, समर्थकांना त्यांना प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार देते. आज भारतीय राजकारण याच ठिकाणी एका मोठ्या संकटाचा सामना करतेय. सर्व पक्षांमध्ये, राजकीय चर्चेवर युती, पक्षांतर, जातीय समीकरणे, निवडणूक व्यवस्थापन आणि कौटुंबिक उत्तराधिकार यांचे वर्चस्व वाढत चाललेय. वैचारिक स्पष्टता अनेकदा दुय्यम ठरतेय. निष्ठा हीच एक व्यवहार बनलीय.
याचा परिणाम संपूर्ण व्यवस्थेत दिसून येतो. राजकीय डावपेचांच्या तुलनेत प्रशासनावरील चर्चांकडे कमी लक्ष दिले जाते. बाह्य देखाव्यामुळे मूळ मुद्द्यांवर पडदा पडतो. सार्वजनिक चर्चा कोण कोणाला सामील झाले, कोणी कोणाला दगा दिला आणि सत्तेवर कोणाचे नियंत्रण आहे यावर केंद्रित झालीय. पण कायमस्वरूपी राजकीय उत्साहामुळे लोकशाही अधिक मजबूत होत नाही. ती तेव्हा अधिक मजबूत होते, जेव्हा नागरिक वैचारिक सुसंगतता धोरणात्मक स्पष्टतेची मागणी करू लागतात. एखादा पक्ष कोणत्या आर्थिक तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवतो, तो कोणत्या संस्थात्मक मूल्यांचे रक्षण करतो, तो लोककल्याण आणि विकास यांच्यात संतुलन कसे साधतो, त्याची दीर्घकालीन राष्ट्रीय दूरदृष्टी काय आहे, हे असे प्रश्न आहेत जे राजकीय अनुयायांऐवजी सुजाण नागरिक घडवतात. कदाचित भारतीय राजकारणाला केवळ नवीन नेत्यांची गरज नाही. त्याला वैचारिक गांभीर्याच्या पुनरागमनाची गरज आहे. कारण सरतेशेवटी, राष्ट्रे ही व्यक्तींच्या महत्त्वाकांक्षेपेक्षा त्यांच्या पलीकडे टिकून राहणाऱ्या विचारांच्या सामर्थ्याने घडतात.
आपण वास्तवाला नाकारत आहोत असं वाटतंय.
वर्षानुवर्षे, राजकारणी वास्तवाला नाकारताहेत याची चिंता वाटत होती. पण राजकारण्यांकडून शेवटपर्यंत आपली कारकीर्द जपण्याची, कथानकावर नियंत्रण ठेवण्याची, जनतेचा रोष मान्य करणं हे टाळण्याची अपेक्षा केली जाते. विधानसभा निवडणुकीनंतर खऱ्या अर्थाने चिंता वाटली ती एका वेगळ्याच गोष्टीची. सामान्य मतदार इतर मतदारांचा कौल स्वीकारण्यास नकार देत होते. हे धोकादायक आहे.
ममता बॅनर्जी हरल्या याचा अर्थ असा की बंगालच्या मतदारांना बदल हवा होता. केवळ एसआयआर नाही, केवळ 'वोट चोरी' नाही, केवळ षडयंत्राचे सिद्धांत नाहीत. एसआयआरमुळे फायदा झाला असेल हे नाकारता येत नाही. पण सत्ताविरोधी लाटही खरी होती. तेही नाकारता येणार नाही.  भावनिक युक्तिवादांनी या पराभवांचे समर्थन करणाऱ्या असंख्य प्रतिक्रिया, संदेश आणि मेल्स पाहायला मिळाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यातले बरेचसे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नव्हते, तर राजकीय प्रवक्त्यांप्रमाणे वागणाऱ्या सामान्य नागरिकांकडून होते. आपण सर्वप्रथम नागरिक आहोत, राजकीय पक्षांचे विनावेतन रक्षक नाही. आपल्याला न आवडणाऱ्या प्रत्येक निवडणुकीच्या निकालावर जर आपोआपच फेरफार वा फसवणूक असा शिक्का मारला गेला, तर लोकशाही टिकू शकत नाही. राजकीय पक्ष सत्ता मिळवण्यासाठी तर नागरिक सत्तेला जबाबदार धरण्यासाठी अस्तित्वात असतात. ज्या क्षणी मतदार भावनिकरित्या पक्षांशी एकरूप होतात, त्या क्षणी स्वतंत्र विचार नाहीसा होतो. राजकारण हे शासनप्रणालीपुरते मर्यादित न राहता, गटनिष्ठेचे स्वरूप घेऊ लागते. आणि एकदा का ही मानसिकता सर्वत्र पसरली की, भारत अशा प्रकारे बदलतो, जे अनेकांना अजूनही पूर्णपणे समजलेले नाही
हरीश केंची,
९४२२३१०६०९.

Sunday, 10 May 2026

नसरापूरचा नरकासुर.....!

"चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होतो, थिजलेल्या नजरांनी, शुष्क भावनांनी, संवेदना संपलेला समाज जागा झाला. त्या बिचाऱ्या अजाण मुलीला तिचा देह ही भोगाची खाण आहे ह्याचीच काय, पण आपण स्त्रीलिंगी आहोत म्हणजे काय आहोत, याचीही कल्पना नसेल, एवढ्या छोट्या वयात अत्याचार झालाय. लिंगपिसाटाच्या विकृत वासनेपायी सारं बालपण-जीवन उद्ध्वस्त करून घ्यावं लागावं यासारखी लांच्छनास्पद गोष्ट नाही. पण दुर्दैवानं ह्या लांच्छनालासुद्धा मोहोर फुटलाय, नसरापूरसारख्या पाशवी घटना जागोजागी घडताहेत. बलात्काऱ्यांना, अत्याचार करणाऱ्यांना चेचण्यासाठी महिला रणरागिणी बनून रस्त्यावर यायला हव्यात. संतापाने खदखदत लेकीबाळींना बरबाद करणाऱ्यांविरुद्ध  हजारोंच्या संख्येनं पुन:पुन: रस्त्यावर यायला हवंय, कालीमातेचा अवतार बनून या कामासुरांना, दामासुरांना, नरकासुरांना पालथं पाडून त्यांच्या उरावर थयाथया नाचायला हवंय...!" 
---------------------------------------------
पुणे शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या नसरापूर परिसरात शंकराचं भव्य पुरातन बनेश्वर मंदिर आहे, जवळच राज्य शासनाचं बनेश्वर वन उद्यान, खळाळत्या पाण्याचे धबधबे, सुप्रसिद्ध नेकलेस पॉईंट, भव्य असं त्रिमंदीर, शिवाय वर्वे लेक व्ह्यू पॉईंट अशी निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळं आहेत. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. अशा नसरापूरात, धायरीत राहणारी अन् आजोळी नसरापूरला आलेल्या चार वर्षांच्या मुलीवर ६५ वर्षीय भीमराव कांबळे या लिंगपिसाट नराधमाने अत्याचार केले. तिला दगडाने ठेचून ठार मारलं अन् तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरला. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद उमटले. नसरापूर ग्रामस्थांनी नवले पुलावर आंदोलन केलं. नसरापूर बंद ठेवलं. चिमुकली खेळता खेळता बेपत्ता झाली म्हणून तिच्या आजीने शोध सुरू केला. गावकरी मदतीला आले. तिला शोधताना गावकऱ्यांसोबत हा भीमाजी कामळेही होता. भीमराव कांबळेकडे विचारणा केली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थांना संशय आला. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. भीमराव कांबळे याने आधीही दोन गुन्हे केले होते, ते छेडछाडीचे, महिलांसंबंधी होते. भीमाजी कामळेला या विकृतपणामुळे त्याच्या मूळ गावामधून २० वर्षांपूर्वी गावबंदी करून हाकललं होतं. हा भोर तालुक्यातील साळवडे गावातला. गावामधून हाकलल्यानंतर तो नसरापूर इथं राहत होता. आजूबाजूला गावामध्ये छोटी मोठी कामं करून तिथं तो राहत होता. घटनेदिवशी पीडित मुलगी मंदिराजवळ खेळत होती, त्यावेळी भीमराव कांबळे विटा वाहण्याचं काम करत होता. त्याने मुलीला आमिष दाखवून गोठ्यामध्ये नेलं. त्यावेळी गावातली लाईट गेलेली होती. बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद झाले होते. मात्र, मंदिरासमोरील घरातला सीसीटीव्ही बॅटरीवर सुरू होता. त्या कँमेऱ्यात आरोपी कैद झाला आणि घटनेचा उलगडा झाला. जिच्यावर अत्याचार झालाय, ती चिमुरडी इथल्या बनेश्वर शंकर मंदिरातल्या पुजाऱ्याची ही नात आहे. असं समजतं. 
बलात्काराच्या घटनेने सारा महाराष्ट्र हादरून गेलाय. जीवनाचा आनंद घेऊ पाहण्याऱ्या अजाण कळीला लिंगपिसाटाने कुस्करून टाकलंय. राज्यात अशा अनेक कळ्यांना विकृत वासनेला क्रूरपणे बळी पाडलं जातंय. या कुकर्माचं धिक्कार करायचं सोडून मुख्यमंत्री अन् मंत्र्यांसह अनेक नेते त्यांचं राजकारण होतंय असं रडगाणं गाताहेत. १ मे ला ही दुर्दैवी  घटना घडलीय. चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्या लिंगपिसाटाने वासनेचं बळी बनवलंय. आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की, पीडित चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झालीय. तिचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, तो सुन्न करणारा, हादरून टाकणारा आहे. चिमुकली ओरडू नये म्हणून तिच्या तोंडांत त्याचा घाणेरडा सॉक्स कोंबलेला आढळला. त्या आधी त्यानं चिमुरडीच्या छातीत बुक्की मारल्याचं आढळून आलंय. मुलीसोबत जे काही घडलंय ते अंगावर काटा आणणारं आहे. ज्यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरलाय. फक्त सोशल मीडियातच नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावरही आक्रोश उमटतोय. डोकं सुन्न करणारी अशी प्रकरणं दररोज घडताहेत. बिळात दडलेल्या जनावराला बाहेर काढण्यासाठी मिरच्या पेटवून त्याची धुरी दिली जाते. तशी जनक्षोभाची धुरी धगधगत ठेवून बलात्काऱ्यांना, अत्याचार करणाऱ्यांना बाहेर खेचण्यासाठी महिला रणरागिणी बनून रस्त्यावर यायला हव्यात. लेकीबाळींना बरबाद करणाऱ्यांविरुद्ध संतापानं खदखदत हजारोंच्या संख्येनं पुन: पुन: रस्त्यावर येऊन त्यांना चेचून सरळ करायला हवंय. 
घटना नसरापुरात घडली. पुण्यात लोक रस्त्यावर आले. बंगलोर महामार्ग बंद पाडला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केला. जणू अशा घाणेरड्या प्रकारच्या विरोधात प्रक्षोभ कुणी व्यक्त करूच नये. कोणत्या वातावरणात जगतो आहोत आपण? या नीच घटनेने चिमुकलीच्या आई बाबांचं काळीज पिळवटून निघालं असणार. आपल्या लेकराला असं भोगावं लागलं, काय वाटलं असंल त्या बिचाऱ्यांना! त्या मुलींचे पालक म्हणत असतील की, *"आम्हाला हे असलं रामराज्य नकोय, कारण इथं कायदा आहे तो असुरांना पाठीशी घालण्यासाठीचा...! मग रावण राज्य आलं तरी चालेल, कारण रावण लाख वाईट होता पण तिथं सीता सुरक्षित तरी होती...!"*  नसरापुरातली आंदोलनकर्ते मंडळी ही स्थानिक माणसंच होती, तो जनतेचा स्वयंस्फुर्तीने व्यक्त झालेला संताप होता, प्रक्षोभ होता, आक्रोश होता. त्या अजाण, असहाय चिमुकल्यांच्या प्रचंड यातनांपेक्षा पोलिसांना आपली प्रतिमा महत्वाची वाटली! रास्ता रोको आंदोलन ही काही केवळ त्या एका घटनेची प्रतिक्रिया होती असं नाही. तर अलीकडच्या अनेक घटनांबद्दलची जनतेच्या मनातल्या संतापाची एकत्रित अन् प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती. सामूहिकपणे दिलेला तो इशारा होता. राज्यातल्या कोणत्याही शहरात जा, कायद्याचा, खाकी वर्दीचा मुळीच धाक उरलेला नाही हे सर्वसामान्यांचं मत बनलंय. काल हा जमाव असा मनातून पेटला नसता तर सरकार तरी फास्ट ट्रॅक एवढं वेगानं हललं असतं का? ज्या दिवशी आंदोलन झालं, त्याच दिवशी एका बलात्कार प्रकरणाचा निकाल ३२ वर्षांनंतर लागल्याची बातमी होती. म्हणजे न्यायालय, कायदे यावरचा विश्वास कमी होत चाललाय. न्यायालयात होणारा विलंब म्हणजे न्याय न मिळण्यासारखंच आहे. याचा अनुभव लोकांना येतोय, म्हणून आंदोलनकर्त्यांनी आरोपीला आमच्या हाती द्या अशी मागणी केली. ती गैर असली तरी ती त्यांना करावीशी वाटणं हे गंभीर आहे. याचाही विचार व्हायला हवाय! असंच होत राहिलं अन् सहनशक्तीचा अंत झाला, तर लोक कायदा हाती घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. अशा नराधमांना कायद्याचा धाक बसावा यासाठी राज्य सरकारनं २०२२ मध्ये निर्माण केलेला 'शक्ती कायदा' केंद्रात पडून आहे. तो अंमलात आणायला हवा. राज्यात एक ना दोन अशी अनेक प्रकरणे आहेत, ज्यांचा निकाल प्रलंबित आहे.
महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. लहानग्या मुली, चिमुकली मुलं सुद्धा सुरक्षित नाहीत. अजून किती वेळा हे सिद्ध व्हायला हवंय? बदलापूर-ठाणे नंतर डोंगराळे-मालेगाव, वडगाव पान- संगमनेर,  नसरापूर-भोर, चाकण-पुणे, पर्वती-पुणे, थेऊर-पुणे, जोडभावी पेठ-सोलापूर.... जवळपास दिवसागणिक एक शिसारी यावी अशा घटना राज्यात सतत घडताहेत. आणखीन किती वेळा अशा भयानक घटना घडण्याची वाट पहायची? राज्यकर्ते नेहमीप्रमाणेच कडक कारवाई करणार, फाशी देणार, यंव करणार अन् तंव करणार असले फिल्मी डायलॉग मिडियासमोर मारण्यातच मग्न आहेत. करत काहीच नाहीत. एकामागोमाग एक निष्पाप आयुष्यं उद्ध्वस्त होताहेत. कोणाला काय पडलंय? बदलापूर प्रकरणातला आरोपी संस्थाचालक तुषार आपटे याला तर भाजपने थेट स्वीकृत नगरसेवक म्हणूनच निवडलं होतं. निव्वळ बेशरमपणा! तुमचे जीव जाऊ द्यात, आम्ही आमचं राजकारण पुढे रेटत राहतो. भयंकर आहे सगळं. लाज, लज्जा, शरम जनाची नसली तरी मनाची असेल, तर 'तत्काळ राजीनामा द्या...!' अशी कीर्तने, प्रवचने देताना आम्ही फडणवीस यांना पूर्वी बरेचदा पाहिलंय. गृहमंत्री अन् मुख्यमंत्री म्हणून सातत्याने ते ठार अपयशी ठरलेत. कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालाय, अकार्यक्षम नि असंवेदनशील लोक आहेत. ही घटना काही तासात विसरली जाइल , बातमी म्हणून चार दिवस लोकही चघळतील, कारण शेजारच्या घरात झालेलं दुःख आम्हाला होत नाही, आता तर भावकी पण १३ दिवसाची वाट पाहत नाही, दुःखाचा डोंगर मुलीच्या कुटुंबियांच्या आयुष्यात आलाय, बाकी वेदनांवर फुंकर घालेल जरी हा काळ तरी मुलीचं 
काय चुकलं हे शोधण्याचं काळीज होत नाही, काल कोणी दुसरं आज या चिमुरडीवर उद्या आणखी कोणी तिसऱ्यावर हा प्रसंग येतच राहणार. कारण व्यवस्थेत बसलेले आंधळे नि बहिरे तर आहेतच पण लुळे नि लंगडे ही झालेत, त्यांचा वचक राहिलाच नाही म्हणून तर एकानंतर दुसरं दुसऱ्यानंतर तिसरं प्रकरण बाहेर येत जातंय, कोणाला भीतीच राहिली नाही, सारं काही घडत जातंय बिनधास्त बेफिकिरपणे! चौरंगा नाही भर चौकात जिवंत जाळलं पाहिजे. नराधमाने चार वर्षांचं लेकरू हंबा बघायला नेलं नि अत्याचार करून शेणात पुरलं, एवढी हैवानी मानसिकता येते कुठून...? गुन्हेगारी पार्श्वभूमीची कुत्री सुटतात कशी मोकाट...सरकार, आता सरळ ठोका, कायदाच करा तसा, तरच जरब बसेल...!
अशा घटना घडणार नाहीत, याबाबत समाजानंच आत्मचिंतन करायला हवंय. वाढती लैंगिकता फक्त राजकारणाशी, सत्तेशी गुरफटलेली नाही. तिनं नानाप्रकारे तुमच्या मुलाबाळांना घेरलंय. इंग्रजीच नव्हे तर हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटातून तर गाणी आणि नृत्य यांच्या साह्यानं मैथुनच पडद्यावर दाखवलं जातं. नट्याचं अंग हलवणं, असासे-उसासे टाकणं हे केवळ तरुणांचीच नव्हे, तर म्हाताऱ्यांचीही विकृत वासना चाळवण्यासाठीच असते. कायद्याचे रक्षक पोलीस, वकील, न्यायाधीश अन् ज्यांच्याबद्धल परंपरेनं आदरभाव जोपासला जातो, अशा शिक्षक, प्राध्यापक, मार्गदर्शक व्यक्ती यांचं अत्यंत गैरचित्रण पद्धतशीरपणे हिंदी चित्रपटातून, साहित्यातून होत असतं आणि त्याबद्धल कुणीही, कधीही संताप व्यक्त केलेला नाही. वासनाकांडे धगधगली वा धगधगताहेत ती बघितल्यावर चित्रपटांनी समाजमनाला किती विकृत वळण दिलंय, हे दिसून येतं. दुरदर्शनपुढे आई-बाप-मुलं या सगळ्यांत रंगू लागलीत, तर आपल्या घराचा सिनेमा का होणार नाही? जे हरामखोर यात गुंतलेत. त्यांना जगणं हराम व्हावं, एवढा उग्र संताप खदखदत ठेवण्यासाठी समाज का पुढाकार घेत नाही? मुलीबाळींच्या असहायतेचा गैरफायदा उठविणाऱ्याला स्त्रियांच्या धगधगत्या संतापाची तीव्रता अनुभवायला लावणंच योग्य ठरेल. बलात्कार करणाऱ्याचा कुठलाही अवयव कधीच फुरफुरत उठू नये एवढा चोप त्या बलात्काऱ्याला देण्याची संधी समाजानं का घेऊ नये. महिलांनी, समाजानं गुपचूप चढाई करून 'बडवून' काढलं तर समस्त महिला वर्गाला आनंद होईल. प्रसिद्धीमाध्यमं अशा बाबी रवंथ करत बसतात. समाजही थंड संवेदनाहीन बनू लागलाय. काही गैर घडलं तर गुपचूप न बसता जाहीरपणे बोंब ठोकून अत्याचाऱ्याला अद्दल घडविण्याची हिंमत मुली, महिलांनी दाखवायला हवी. ही गोष्ट काळजात दुःखाचा वणवा उठवणारी आहे. मस्तकात आग पेटवणारी आहे. सामाजिक संवेदना तर केव्हाच मेल्यात. अशा प्रकारानंतर प्रतिक्रिया उमटायला हव्या होत्या पण तसं झालंच नाही. घराचं थिएटर अन् टीव्हीवरचा नंगानाच सहकुटुंब सहपरिवार पाहणाऱ्या समाजाला त्यातली बीभत्सता कशी जाणवणार? त्या निरागस मुलीवर झालेला अत्याचार हा माणुसकीला काळिमा फासणारा आहे. चिमुरडीवर झालेला अत्याचार या गोष्टी समाज किती सडलाय, रसातळाला गेलाय हे दर्शवतो. 
चौकट....   *पौरुष्यच कापायला हवंय!*
बलात्कारासारखा नीच प्रकार करण्याचं धाडस... धाडस कसलं ते कुकर्म करताना पोलीस, कायदा, समाज यांची कसलीच भीती त्यांना वाटत नाही? या साऱ्या नीच प्रकाराविरुद्ध स्त्रियांनी, त्यांच्या संघटनांनी, विविध पक्षात काम करणाऱ्या स्त्रियांनी राजकारण बाजूला ठेऊन एकत्र यायला हवं. लिंगपिसाटाच्या, अत्याचारी पुरुषांच्या छाताडावर काली होऊन स्त्रीशक्ती थयथया नाचू शकते. हे दाखवून द्यायला हवं. जोवर आपल्या अब्रूच्या अंगारानं ज्वाला ओकत स्त्री उभी राहत नाही तोवर अशांना भीती वाटणार नाही. अब्रू लुटली गेली की, स्त्री असहाय होते, मन मारून जगते. इंद्र भोगून जातो आणि अहिल्या दगड होऊन पडते. ही नुसती पुराणकथा नाही तर ती आता वर्तमान कथाही आहे. 'माझी अब्रू तू लुटलीस तुझी अब्रू मी चव्हाट्यावर लुटणार...!' म्हणून स्त्री बेडरपणे उभी राहिली, तर भल्याभल्याची पाचावर धारण बसेल. आज ना उद्या हे होणारच आहे! अत्याचारी, लिंगपिसाट पुरुषाचं पौरुष्य कापून टाकण्याचा प्रकार घडल्याचं अधूनमधून वृत्तपत्रातून वाचनात येतं. डिंपल कपाडिया-नाना पाटेकर असलेल्या कुठल्यातरी हिंदी सिनेमात हे प्रकर्षानं दाखवलं होतं. जयवंत दळवींच्या 'पुरुष' मराठी नाटकात तर हे केव्हाच सांगितलं आहे!
-हरीश केंची
९४२२३१०६०९

राजकारण लई वंगाळ झालंय...!

"ज्याची निष्ठा मूल्यांशी नसते, पैशाशी असते; तो केवळ पक्षाशीच नव्हे तर राष्ट्राशीही गद्दारी करू शकतो! गद्दारी ही...