Monday, 6 July 2026

लव्ह, सेक्स आणि धोका !!!

"प्रेम आंधळं असू शकतं, पण जेव्हा विवेक मरतो तेव्हा माणूस स्वतःच राक्षस बनतो. पुण्यातल्या 'केतन अग्रवाल मर्डर केस'ने देश हादरलाय. केतनची हत्या त्याची होणारी बायको सिया गोयल हिने तिचा प्रियकर चेतन चौधरीला सोबत घेऊन, लोहगडावरून केतनला दरीत ढकलून हा खून केलाय. पण लग्नाला नकार देऊन त्यावर सियाला ठाम राहता आलं असतं, सियाने केतनचा खून तर केलाच पण स्वतःचंही चारित्र्य डागाळून घेतलंय. या दुर्घटनेला दोन्हीकडचे पालक तितकेच जबाबदार आहेत. शिक्षा काय या देशात कोणालाही होतच नाहीये. नुकतंच लोकल ट्रेन मधल्या वादातून तरुणाचा खून झाला, लोक बघत बसले. जीव खूपच स्वस्त झालाय मग ती तरुण वा लहान पोर का असेना. त्यातून नसरापूर प्रकरणाकडे डोळे आहेत. या पिढीचीच काय हल्ली कोणाचीच मानसिकता काय असेल हे समजू शकत नाही. नैतिकता हरवत चाललीय. कायदा हा गुन्हेगारांसाठी काम करतोय. असं वाटतंय!"
...........................................
*पु*ण्यातला लोहगड हत्याकांडाचा तपास जसजसा पुढे सरकतोय, तसतशी नवनवीन तथ्ये समोर येताहेत. पोलीस मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीची तपासणी करताहेत. सिया गोयल पुण्यात गुलटेकडी गंगाधाम भागात न्यू एरा सोसायटीमध्ये राहते. तिच्यासोबत कुटुंबात आई-वडील, एक भाऊ आहे. तिचे वडील, प्रवीण गोयल, सुकामेवा, मसाल्यांच्या व्यवसायात आहेत .समाजात या कुटुंबाची प्रतिमा प्रतिष्ठित मानली जाते. चेतन चौधरी आणि सियाचा मोठा भाऊ साहिल गोयलची मैत्री क्रिकेटमुळे झाली. चेतन आणि साहिलने एकत्र क्रिकेट सामने खेळले आहेत. सिया साहिलसोबत क्रिकेट सामने बघण्यासाठी जायची. सिया अन् चेतन चौधरी यांची पहिली भेट गेल्या वर्षी दिवाळीत झालेल्या एका पार्टीत झाली. या भेटीनंतर त्यांचा संपर्क वाढत गेला. पोलीस त्यांच्या या नात्याशी संबंधित माहिती, कॉल रेकॉर्ड्स, भेटीगाठी अन् संवादांची चौकशी करताहेत. केतन अग्रवालच्या मृत्यूने देशभर खळबळ उडालीय. लोहगडावर ट्रेकिंग करत असताना या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तो कड्यावरून पडून मरण पावला. सुरुवातीला हा एक अपघात मानला जात होता. पण नंतर हे उघड झालं की, त्याची होणारी पत्नी सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केतनला लोहगडावरून खाली ढकललं होतं. सियाला काय हवं होतं? केतन अग्रवाल ज्याच्याशी ती काही महिन्यांत लग्न करणार होती. गेल्या सहा महिन्यांत सिया अन् चेतन यांनी २,००४ कॉल केलेत, ज्यात एकूण अंदाजे २३८ तासांचे संभाषण झालंय. काही कॉल सलग दोन ते तीन तास चाललेत. हे दीर्घ संभाषण कथित कटाच्या तयारीचा एक भाग असू शकतो. याचकाळात सियाच्या कुटुंबीयांनीही तिच्यासाठी जीवनसाथी शोधायला सुरुवात केली होती. यातूनच अग्रवाल कुटुंबाशी तिचं लग्न जुळलं. ११ फेब्रुवारीला भेट झाली, १९ तारखेला साखरपुडा झाला. लग्नाची तारीख २५ नोव्हेंबर निश्चित झाली. घरात तयारीला सुरुवात झाली होती. भविष्याची स्वप्ने विणली जात होती. केतनला जसं टक्कल होतं आणि बोलताना तो चाचरायचा, तसंच ती मुलगी बारावी नापास होती आणि दारू प्यायची असे एका यू ट्यूब व्हिडिओ मध्ये दिसतंय, ऐकलंय. म्हणूनच बहुतेक त्या मुलाचे वडील देखील लवकर हे लग्न व्हावं ह्यासाठी आग्रही होते. या अरेंज मॅरेजमध्येही तडजोड होती. जर सियाने दोन तीन वर्षे धीर धरला असता आणि तिचे उद्योग पुन्हा सुरू केले असते तर नवरा, सासरा दोघांचं त्याकडं लक्षही गेलं नसतं, एवढं हे लोक पैशाच्या मागे धावत असतात. एरव्ही आजुबाजूला आपण बघतोच की, बऱ्याच लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये जिथं नवरा बायको दोघेही मिळवती असतात, दोघांचीही इतर बायका अन् पुरुषांबरोबर मैत्री असतेच की. दोघेही त्याकडे लग्न, नोकरी टिकून राहावी, मुलांची शिक्षण वगैरे ह्या गोष्टींसाठी कानाडोळा करतात. सियासारख्या मुलीने सुद्धा काहीतरी मार्ग नक्कीच काढला असता. नाहक नको ते करून बसली. 
कुटुंबीय सांगतात की, सिया केवळ नावापुरती सून नव्हती, तर ती कुटुंबाचाच एक भाग बनली होती. ती अनेकदा त्यांच्या घरी यायची, पूजा-अर्चा करायची, संपूर्ण दिवस कुटुंबासोबत घालवायची. बोलताना प्रेमळ आपुलकी दाखवायची. तिच्या मनात काहीतरी वेगळं आहे, असा कोणालाही संशय आला नाही. केतनच्या आईने सियाला सून म्हणून स्वीकारलं होतं. ती घरी येऊन कुटुंबात मिसळायची, त्यांच्या नात्याचं खरं स्वरूप आधीच उघड झालं असतं, तर त्यांचा मुलगा कदाचित अजूनही जिवंत असता. लग्नाची तयारी सुरू असताना, सिया आणि चेतन सतत संपर्कात असल्याचं तपासात उघड झालंय. तपासाशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरताहेत, ज्यात ते दोघे एकत्र दिसताहेत. चेतनने बीबीए बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास सुरू केला होता, पण तो अर्धवट सोडून दिला. तपास यंत्रणा यातले डिजिटल पुरावे, कॉल डिटेल रेकॉर्ड्स आणि इतर कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे संपूर्ण घटनाक्रम एकत्र जोडण्याचं काम करताहेत. १४ जून रोजी सिया केतनला लोहगडावर घेऊन गेली. त्यादिवशी लोहगडाच्या एका कडावर उभे असताना केतनला मागे ढकलण्यात आलं. तो खाली घसरला, पण त्याचा हात झुडपात अडकल्याने त्याचा जीव वाचला. नंतर सियाने 'साप येतोय... साप येतोय..!' असा कांगावा करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सियाचा वाढदिवस १९ जूनला होता. १८ जूनला, वाढदिवस साजरा करण्यासाठी तिने केतनला लोहगडावर नेले. ते दोघे सकाळी साडेआठ वाजता निघाले. १०:४५ वाजता, केतन लोहगडावर दरीत पडल्याची माहिती देणारा फोन आला. कुटुंब तात्काळ घटनास्थळी पोहोचले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. केतनचा मृत्यू झाला होता. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना हा अपघात आहे यावर विश्वास बसला नाही.केतनचा मृतदेह पाहिल्यावरही सियाच्या चेहऱ्यावर दुःखाचं कोणतंही चिन्ह नव्हतं. केतनची आई म्हणते की, ज्या मुलाचं तिने खूप लाड केलं होतं, ज्याच्या लग्नाची तयारी सुरू होती, तो अचानक तिच्यापासून हिरावला गेला. केतन तिला सर्व काही सांगायचा, पण कदाचित त्याच्या आजूबाजूला काय घडतंय हे त्यालाही कळलं नसेल. जर चेतन चौधरी सियाच्या आयुष्यात होता, तोच ज्याच्यावर तिचं प्रेम होतं, तर तिने केतनशी लग्न करायला होकार का दिला? तिला नेमकं काय हवं होतं, याचा तपास पोलीस आता करताहेत. ३१ मे रोजी सिया आणि केतन अग्रवाल हे लोहगड किल्ल्यावर गेले होते. तिथे केतन हा एका धोक्याच्या ठिकाणी बसलेला होता. तो केव्हाही दरीत कोसळेल अशी भीती होती. त्याविषयी दोघात चर्चाही झाली. पण केतनने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हाच सियाच्या मनात पहिल्यांदा केतनला याच किल्ल्याच्या कठड्यावरून दरीत ढकलण्याची कल्पना सुचली आणि तिने त्यानंतर त्याला संपवण्याचे तीन अयशस्वी प्रयत्न केले. 
पोलिस तपासात सिया गोयलने तिच्या वाग्दत्त वराचा खून केला त्याचं कारण केतनला टक्कल होतं. तो विग घालायचा. शिवाय बोलताना तो अडखळलायचा हकलायचा. असं सांगितलंय. तिची लाईफस्टाईल, पार्टीजमध्ये रमणारा स्वभाव यात केतनचं कुटुंब साजेसं नव्हतं. त्याच्या आईने तिला बजावलंही होतं की, लग्नानंतर या सगळ्या पार्टीज बंद! केतनचं  दिसणं, त्याची वागण्याची शैली तिला आवडत नव्हती. नवऱ्याबाबत तिच्या काही अपेक्षा होत्या ज्यात तो फिट बसत नव्हता. दोन्ही कुटुंबं प्रचंड श्रीमंत होती तरीही तिचं कुटुंब अन् त्याचं कुटुंब याच्या आर्थिक स्थितीत तफावत होती, केतनचं कुटुंब सियाच्या कुटुंबापेक्षा दसपटीने श्रीमंत होतं. तिच्या वडिलांना आर्थिक आधार, व्यापारी वर्तुळ याचं अप्रूप होतं, मात्र तिला त्यात इंटरेस्ट नव्हता. त्यांनी तिला बेकरीचा व्यवसाय काढून देण्याचा प्रयत्नही केला होता. तिचं प्रेम ज्याच्यासोबत होतं, तो तिच्या कुटुंबाच्या समान आर्थिक पातळीवरचा होता; तिला जसा पुरूष हवा होता तसा तो होता. याबाबत जर आपण आई वडिलांना केतन पसंत नसल्याचं सांगितलं तर त्यांची स्वप्ने तुटतील, ते दुःखी होतील अन् आयुष्यभर त्याचं खापर आपल्यावर फुटेल हे तिला नको होतं. ती खून करायला तयार झाली मात्र आईवडिलांना सांगायची तिची हिंमत झाली नाही; असं नाही. तिची हिंमत कुठेही कमी पडली नाही, तिने आपल्यावर आईवडिलांच्या दुःखाचे आरोप येऊ नयेत म्हणून थंड डोक्याने त्याला संपवलं. आता ती आणि तिचा प्रियकर एकमेकावर सूत्रधार असल्याचा आरोप करताहेत. ती स्वतःला सूत्रधार म्हणवत नसली तरी तिचे जबाब अधिक स्पष्ट आहेत, तिने चौकशीत जे काही सांगितलंय ते तर धक्कादायक आहेत. तिच्यासाठी त्याचं मन, त्याच्या भावना, आदर, सोबत अथवा प्रेम इतकं महत्वाचं नव्हतं! त्याचं ते बाह्यरूप, त्याचं दिसणं अन् त्याचं व्यक्तिमत्व तिला अधिक खटकलं, महत्वाचं वाटलं.
अशा या बहुतांश घटनांच्या मुळाशी विवाहबाह्य संबंध हे प्रमुख कारण असल्याचं दिसतं. मात्र त्यामागे केवळ शारीरिक आकर्षण नसून भावनिक, मानसिक, सामाजिक अशा अनेक कारणांचा गुंता आहे. सेक्स आणि रिलेशनशिप तज्ज्ञ यांच्या मते, विवाहबाह्य संबंध ही स्त्री किंवा पुरुषाची नव्हे, तर मानवी मानसिकतेची समस्या आहे. नात्यातली अपूर्णता, भावनिक तुटलेपणा, संवादाचा अभाव यामुळे अनेकजण अशा संबंधांकडे वळतात. एकत्र कुटुंबपद्धतीचा ऱ्हास, विभक्त कुटुंबांचं वाढतं प्रमाण, कमी होत चाललेला कौटुंबिक संवाद यामुळेही ही समस्या अधिक तीव्र होत असल्याचे मत व्यक्त केलंय. तर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, महिलांचं शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, बदलती सामाजिक भूमिका यामुळे कुटुंबातल्या संघर्षांचं स्वरूप बदललंय. त्यामुळे महिलांकडून घडणाऱ्या हिंसक घटनांकडे केवळ गुन्हा म्हणून नव्हे, तर बदलत्या सामाजिक वास्तवाच्या संदर्भातही पाहण्याची गरज आहे. नातं नाकारण्याचा मार्ग उपलब्ध असतानाही  खुनासारखा टोकाचा मार्ग का स्वीकारतात? याबाबत वकिलांशी चर्चा केली असता दोन कारणे प्रकर्षाने समोर आली. पहिलं म्हणजे, वेळखाऊ किचकट वाटणाऱ्या न्यायप्रक्रियेबद्दलची अनास्था. दुसरं, सामाजिक कलंक. कोर्टाच्या फेऱ्या, आर्थिक खर्च, मानसिक ताण, ‘लोक काय म्हणतील’ या भीतीमुळे अनेकजण नात्यातून बाहेर पडण्याऐवजी चुकीचा गुन्हेगारी मार्ग स्वीकारतात. काहींच्या मनात जोडीदार कायमचा दूर झाला, तर नवीन आयुष्य सुरू करणं सोपं जाईल, अशी विकृत मानसिकताही तयार होत असल्याचे दिसून येते. अशा गुन्ह्यांमध्ये बहुतेक वेळा थंड डोक्याने नियोजन केलेलं असतं. गुन्हा करून आपण सहज सुटू, असा त्यांचा ठाम विश्वास असतो. कालांतराने हत्या ही त्यांच्यासाठी भावनाविरहित 'काम' बनतं. भीती, अपराधीपणा, भविष्यातील परिणामांची जाणीव बोथट होत जाते.
आजकाल कमावत्या स्त्रिया, मुली आपल्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्या म्हणजे जेोडीदार मजबूत, हवं ते अन् तसं सुख देणारा हवाय, त्याचं दिसणं, त्याचं व्यक्तिमत्व उठून दिसणारं हवं. हवा तसा आणि हवे ते सुख देणारा जोडीदार हवाय असं आता त्या उघड उघड सांगू लागल्यात. मागील काही दशकात सियासारखी कृती करतात. स्त्रियांनी, मुलींनी आपल्या नवऱ्याचे, प्रियकराचे मित्राचे खून करण्याच्या जितक्याही घटना उघडकीस आल्यात त्याच्या मुळाशी याच भावना दिसतात. आवडीच्या जोडीदारासाठी नात्यातल्या पुरुषाला मारायची ही प्रवृत्ती वाढतेय. या बाबतीत नवी पिढी तर अगदीच ठाम आहे. पार्टनर बेडमध्ये किती टाइम तग धरतो इथंपर्यंत ही पिढी स्पष्ट आहे. अशी आईवडिलांनी ठरवलेली लग्ने आता कालबाह्य होत जातील हे वेगळं सांगायला नको. 'आमचं आम्ही बघून घेऊ आणि निस्तरू', ही वृत्ती वाढताना दिसते. 
अशा घटना नकळत नव्या पिढीला दोन्ही बाजूंचे मुद्दे ध्यानात आणून देत असतात. पर्यायाने निश्चय निर्धार आणखी ठाम होत जातील आणि हा मार्ग आपणही वापरून बघायला हरकत नाही हा विचार बळावत जाईल.
विवाहबाह्य संबंधांच्या काही घटनांच्या मुळाशी लग्नापूर्वीची अपुरी राहिलेली प्रेमप्रकरणेही दिसून येतात. कुटुंबाच्या दबावाखाली झालेले विवाह आणि त्यानंतर न संपलेले जुने प्रेम अनेकदा गंभीर गुन्ह्यांना कारणीभूत ठरते. इच्छेविरुद्ध झालेल्या विवाहाचे विपरीत परिणाम दिसून येतात. प्रेमप्रकरणाला कलंक मानून मुलीच्या इच्छेला दुय्यम स्थान देत घाईघाईने विवाह लावून देण्याची मानसिकता आजही समाजात आहे. मात्र अशा नात्यांमध्ये प्रेम, विश्वास, परस्पर संमतीचा अभाव राहिल्यास त्यातून तणाव, गुंतागुंत, काही वेळा हिंसाचारालाही खतपाणी मिळते. मात्र प्रत्येक विवाहबाह्य संबंधाचा शेवट हिंसाचारातच होतो असं नाही. उत्तर प्रदेशात निगोही, अमेठी, रसुलाबाद, वाराणसी इथं काही पतींनी सूड किंवा हिंसेचा मार्ग न स्वीकारता पत्नीला तिच्या प्रियकरासोबत कायदेशीररीत्या वेगळं होऊन नवं आयुष्य सुरू करून दिलंय. अशी उदाहरणे संख्येने कमी असली, तरी नात्यातील संघर्षाला खुनाऐवजी संवाद, परस्पर संमतीनेही उत्तर देता येतं. अंधार कितीही गडद असला, तरी अशा काही घटना समाजासाठी आशेचा किरण ठरतात. इंदूरच्या सोनम रघुवंशीपासून ते सध्या चर्चेत असलेल्या सिया गोयल प्रकरणापर्यंतच्या घटना ही केवळ काही व्यक्तींची विकृती नाही; त्या बदलत्या सामाजिक मानसिकतेचा इशारा आहेत. या घटना सांगतात की, प्रेम, विश्वास, संवाद आणि कुटुंबसंस्था यांचा पाया ढासळू लागला की त्याची जागा संशय, स्वार्थ आणि हिंसा घेतात. कोणत्याही नात्याचा शेवट खून नसून कायदा, संवाद आणि सन्मानाने वेगळे होण्यात असायला हवा. “प्रेम ही जीव लावण्याची गोष्ट आहे, जीव घेण्याची नाही” हा साधा पण मूलभूत संदेश आजच्या समाजाने पुन्हा एकदा स्वतःला आणि पुढच्या पिढीला देण्याची गरज आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९


No comments:

Post a Comment

राम नाम जपना, पराया माल अपना...!

"कोट्यवधींचं दान, दागिने, चांदीच्या, सोन्याच्या, जडजवाहीराच्या विटा अयोध्येच्या राम मंदिरातून गायब झाल्यात. त्याची चौकशी सु...