ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्र आणि मराठेशाहीच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक, लेखक आणि प्रभावी वक्ते निनाद गंगाधर बेडेकर यांचं १० मे २०१५ रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीनं बोलणाऱ्या अभ्यासकांच्या प्रभावळीमध्ये निनाद बेडेकर यांनी आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं. वयाची साठी पूर्ण झाल्यावर २००९ मध्ये बेडेकर यांनी युवक आणि गडप्रेमींना घेऊन ६१ किल्ल्यांवर भ्रमंती करण्याचा संकल्प केला होता. मात्र, त्या वर्षभरात त्यांनी १०१ किल्ल्यांना भेटी दिल्या. या त्यांच्या भ्रमंतीमुळं झालेल्या दगदगीचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. बेडेकर यांना किडनीविकार जडला होता.
---------------------------------------
शिवचरित्राचे सव्यसाची अभ्यासक छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीनं बोलू शकणारे निनाद बेडेकर यांची शिवचरित्राचे सव्यसाची अभ्यासक अशी ख्याती होती. इतिहास संशोधनाच्या कार्यात रममाण होण्यासाठी त्यांनी किर्लोस्कर कमिन्समधल्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. गड-किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या समितीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर यांची नियुक्ती झाली होती. निनाद बेडेकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४९ रोजी पुण्यात झाला. मॉडर्न शाळेतल्या शिक्षणानंतर त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन इथून अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांच्या मातोश्री या सरदार रास्ते घराण्यातल्या होत्या. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी महिलांचं संघटन केलं होतं. हाच वारसा निनाद बेडेकर यांच्याकडे आला. शिवचरित्राची गोडी लागल्यानं बेडेकर इतिहास संशोधनाकडे वळाले. इतिहासाच्या अभ्यासासाठी त्यांनी मोडी, फार्सी, उर्दू या लिपींवर प्रभुत्व मिळविलं होतं. या लिपीमध्ये असलेल्या हस्तलिखितं आणि कागदपत्रांचं वाचन करून त्यांनी साहित्यनिर्मिती केली. त्याचबरोबरीनं बेडेकर यांनी पर्शियन, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रजी या परकीय भाषा आत्मसात केल्या. शिवचरित्र आणि १८ व्या शतकात देशभर विस्तारलेलं मराठी साम्राज्य या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. राज्यातल्या आणि देशातल्या किल्ल्यांवर भ्रमंती करून शिवकालीन इतिहासात ते रममाण झाले होते. शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून लेखन केलं होतं. शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी या पैलूंचा स्वतंत्रपणे अभ्यास करून त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण लेखन केलं होतं. शिवरायांची व्यवस्थापकीय कौशल्ये हा विषय ते एमबीएच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतून समजावून सांगत. लालित्यपूर्ण शैलीमध्ये ऐतिहासिक लेखन करणाऱ्या बेडेकर यांची ‘शिवभूषण...’, ‘थोरलं राजं सांगून गेलं...’, ‘गजकथा...’, ‘हसरा इतिहास...’, ‘दुर्गकथा...’, ‘विजयदुर्गचे रहस्य...’, ‘समरांगण...’ आणि ‘झंझावात...’ ही निनाद बेडेकर यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांनी ३५ हून अधिक पुस्तकांसह शेकडो लेख आणि शोधनिबंध लिहिलेत. त्यांचे ‘अजरामर उद्गार...’ हे अखेरचं पुस्तक प्रकाशित झालं होतं. तर, वसंत व्याख्यानमालेमध्ये २८ एप्रिल २०१५ रोजी ‘महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र...’ या विषयावर त्याचं झालेलं व्याख्यान हा बेडेकर यांचा अखेरचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला. भारत इतिहास संशोधक मंडळ, श्री रायगड स्मारक मंडळ, श्री राजगड स्मारक मंडळ, गोनीदा दुर्गप्रेमी मंडळ या संस्थांशी संबंधित असलेले बेडेकर हे पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाचे आयोजन करणाऱ्या ‘महाराष्ट्रीय कलोपासक’ संस्थेचे अध्यक्ष होते. निनाद बेडेकर यांना शिवभूषण, दुर्ग साहित्य पुरस्कार, जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार, पुराण पुरुष पुरस्कार, शिवपुण्यतिथी रायगड पुरस्कार या आणि अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं. शनिवारवाडा इथल्या ध्वनिप्रकाश योजनेमध्ये दाखविल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी बेडेकर यांनी संहितालेखन केले होते.
मराठी भाषेचा, इतिहासाचा प्रगाढ अभ्यास करणारा इतिहास संशोधक बेडेकर यांच्यासारखे अभ्यासक, इतिहास संशोधक निर्माण व्हावेत यासाठी विद्यापीठ आणि इतिहास संशोधक मंडळानं प्रयत्न करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. शिवचरित्रापासून प्रेरणा घेतलेल्या मराठ्यांनी हिंदुस्थानवर निर्माण केलेल्या साम्राज्याच्या इतिहासाचे साक्षेपी भाष्यकार ही ओळख असलेले बेडेकर यांनी देशभरात आणि परदेशात शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठेशाहीतल्या अज्ञात वीरांचा इतिहास लोकांसमोर नेण्याचं महत्वाचं कार्य त्यांनी केलं. त्यांच्या निधनानं इतिहास संशोधन क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीच्या इतिहास लेखनाची, इतिहासकारांची एक मोठी परंपरा आहे. कविराज भुषण यांनी शिवरायांवर केलेल्या काव्यातली सौंदर्यस्थळे उलगडून दाखवणं तसंच शिवरायांचं व्यवस्थापन कौशल्य अशा विषयांवर पुस्तकं लिहिण्याचा बेडेकर यांचा मानस होता, त्यासाठी त्यांनी जुळवाजुळव देखील केली होती. शिवस्मरणानं भारलेले उत्तम लेखक आणि फर्डा वक्ता असलेले निनाद बेडेकर हे महाराष्ट्राला लाभलेलं एक मोठं व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राला केवळ भूगोल नाही, तर देदीप्यमान इतिहासही आहे, असं म्हणण्याची एक परंपरा आहे. महाराष्ट्रातला मध्ययुगीन इतिहास हा विविध प्रकारच्या संघर्षानं भरलेला आणि भारलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्य स्थापना, त्यांनी उभारलेले किल्ले, गनिमी काव्याचं तंत्र वापरून केलेल्या लढाया हे सारं रोमांचकारी आहेच. शिवरायांनंतरही मराठी साम्राज्याचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारला गेला. १८१८ साली मराठेशाही इंग्रजांनी बुडविली. त्याला कारणीभूत ठरले ते अत्यंत अत्याचारी असे पेशवे आणि सत्तेच्या कैफात राहिलेले भ्रष्ट आचारी मराठा सरदार! नव्या युगाचा मंत्र आणि शत्रूची चाल हीच त्यांना कळली नाही. गेल्या ४०० वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवून महाराष्ट्रात अनेक आदर्श उपक्रम रचले गेले तसंच त्यांच्या नावाचा वापर अन् गैरवापर करून आपली तुंबडी भरणारे, मराठी माणसांना अजून संकुचित करून ठेवणारे अनेक नेतेही पैदा झाले. छत्रपती शिवराय हे फक्त मराठ्यांचे असा प्रचार सुरू झाला तर उच्चवर्णीय इतिहासकारांनी शिवरायांना ‘गोब्राह्मण प्रतिपालक...’ बनवून त्यांना एका विशिष्ट जातीचं संरक्षक बनविलं! सुसंस्कृत महाराष्ट्रात हे सारं का चाललंय? छत्रपती शिवाजी महाराजांनंतर इतका उत्तम आयकॉन कोणी निर्माणच झाला नाही का? छत्रपती शिवराय यांच्याबद्दल आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही घटनेबाबत इतिहासकारांना सध्या चिकित्सा करणं कठीण होऊन बसलंय. इतिहासकार काय प्रतिपादन करतो यापेक्षा त्याची जात कोणती यातच काही जणांना रस असतो. अशानं तटस्थ इतिहास लेखन कधीही होऊ शकणार नाही. महाराष्ट्रात वा. सी. बेंद्रे, प्रबोधनकार ठाकरे, त्र्यं. ज. शेजवलकर, ग. ह. खरे, पां. वा. काणे, न्या. महादेव गोविंद रानडे, वि. का. राजवाडे, शंकर नारायण जोशी अशा अनेक महान इतिहासकारांनी परंपरा निर्माण केलीय. शिवाय ग्रँड डफसारख्या ब्रिटिश इतिहासकारांनीही शिवाजी महाराजांविषयी लिहून ठेवलंय. ब्रिटिश इतिहासकारांनी ‘जेत्याच्या’ भूमिकेतून महाराष्ट्राचा इतिहास मांडताना शिवरायांबद्दल अनुदार उद्गार काढले असून ते क्षम्य नाहीत. परंतु ‘राष्ट्रीय’ दृष्टिकोनातून इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी छत्रपती शिवरायांची थोरवी नेटकेपणानं मांडलीय. शिवरायांनंतर मराठी साम्राज्याचा आणखी झालेला विस्तार आणि कालप्रवाहांनुसार या राज्यात शिरलेल्या वाईट प्रवृत्ती यांचंही परखड चित्रण केलंय. इतिहास लेखनात ‘सबल्टन हिस्ट्री’ म्हणजे समाजातल्या तळागाळातल्या कष्टकरी-कामकरी लोकांच्या दृष्टिकोनातून इतिहास लिहिणं असा एक प्रवाह आहे. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शरद पाटील यांसारख्या विद्वानांनी घेतलेला वेध हा ‘सबल्टन हिस्ट्री’चाच प्रकार आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी शाहिरी परंपरा जोजवत शिवरायांचा इतिहास सांगितला. विद्यमान काळात गजाननराव मेहेंदळे हे इतिहासकार शिवरायांवर अतिशय परिश्रमपूर्वक ग्रंथनिर्मिती करताहेत. हे सर्व इतक्या विस्तारानं सांगण्याचं कारण महाराष्ट्राच्या इतिहासकारांच्या परंपरेतलं अजून एक वैशिष्ट्यपूर्ण आणि श्रद्धेचं नाव म्हणजे निनाद बेडेकर...! शिवरायांवरचं त्यांचं चिकित्सक लेखन आणि उत्तम शैलीत दिलेली अभ्यासपूर्ण व्याख्यानं यामुळं निनाद बेडेकर यांचं नाव सर्वच स्तरातून दुमदुमत होतं. इतिहास ग्रंथलेखनाचंही त्यांचे मनसुबे होते. ते एक वेगळ्या वाटेवरचे इतिहासकार होते, जे शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून ते त्यावर लेखन करतात, भाषणं देतात. शिवाजी महाराज नव्या ‘एमबीए’ पिढीला कळावे म्हणून शिवाजी महाराजांमध्ये ‘व्यवस्थापकीय’ कौशल्य असा विषय घेऊन व्यवस्थापन संस्थांमध्ये इंग्रजीतून भाषणं दिली आहेत. नव्या युगातला मंत्र, अस्त्रांचा वापर करून शिवाजी महाराज हे व्यक्तित्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारे निनाद बेडेकर हे अशाप्रकारचे वेगळे इतिहासकार होते. निनाद बेडेकर सांगत होते की, ‘‘पेशव्यांचे नातेवाईक असलेल्या सरदार रास्ते यांच्या घराण्याशी माझे नातेसंबंध आहेत. माझ्या आजीचे नाव गिरिजाबाई रास्ते. पुण्यातल्या शिवपुरी आणि नंतर रास्तापेठ असं नामकरण झालेल्या भागातल्या रास्तेवाड्यात माझं बालपण गेलं. रास्तेवाडा हा सरदार रास्तेंचा असल्यानं तिथं कारकुनी फड, इच्छा-भोजन असा सगळा माहोल होता. रास्ते यांचं स्वत:चं सुसज्ज असं ग्रंथालय होतं. हा काळ आहे १९५० ते १९५६ या दरम्यानचा. रास्तेवाड्यात इतिहासकार दत्तो वामन पोतदारांप्रमाणेच अनेक इतिहासकार येत असत. त्यांच्या होणाऱ्या चर्चामधून इतिहासासंदर्भात अनेक उत्तम गोष्टी कानावर पडत होत्या. मी पहिलीत शिकत असताना बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘दख्खनची दौलत’ हे पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्यातल्या चित्रमयी शैलीनं मला आकर्षून घेतलं..!' ’’बेडेकरांचा विचार पुढे सुरूच राहतो. ‘‘१९६१ साली पानशेतचं धरण फुटलं आणि पुण्यात मोठा पूर आला. मला चांगलं आठवतं त्यावेळी शाळा तीन-चार महिने बंद होत्या. याकाळात बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर कोल्हापूर भागात जाणं झालं. तिथल्या विशाळगड, पन्हाळगड यांचं ऐतिहासिक महत्त्व बाबासाहेबांनी समजावून सांगितलं. याच दौऱ्यात महाबळेश्वर, प्रतापगड अशी भ्रमंती झाली. शालेय जीवनात तसंच टेक्निकल स्कूल अन् पुढे मेकॅनिकल इंजिनीयरिंगचा डिप्लोमा करीत असताना बाबासाहेब पुरंदरे आणि गो. नी. दांडेकर यांच्याबरोबर गड-किल्ल्यांवर विशेष भ्रमंती केली. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत होतोच पण अशा भ्रमंतीतून तो इतिहास मनात अधिक रुजत गेला. गड-किल्ल्यांवर भ्रमंती करताना तिथले अवशेष, त्यांची बांधणी याबद्दल विवेचन करण्याकडे गो. नी. दांडेकर विशेष लक्ष देत असत. १९७१-७२ साली ‘कमिन्स’मध्ये नोकरी लागली. त्यानंतरही सवंगड्यांसह गडभ्रमंती सुरूच राहिली. मी चौथीत असताना ध्रुव वाचनालय काढलं होतं. पानशेतच्या पुरात हे ग्रंथालयही वाहून गेलं, मात्र वाचनाची ओढ भविष्यातही कायम राहिली. शिवाजी महाराज, मराठा, मुघल साम्राज्य आणि इतर शाह्या यांच्याविषयी स्वदेशी आणि विदेशी इतिहासकारांनी लिहिलेल्या दुर्मिळ ग्रंथात १६ व्या शतकापासून महाराष्ट्रात अनेक कारणांनी आलेल्या विदेशी प्रवाशांनी शिवाजी महाराज, मुघलांविषयी मतं नोंदविलेली प्रवासवर्णनं, अनेक मोठमोठे राजे-रजवाडे, बादशाह यांचे पत्रव्यवहार संकलित केलेले ग्रंथ अशा प्रकारची पुस्तकं जमवायचा छंदच लागला. आजच्या घडीला माझ्या वैयक्तिक संग्रहात अशी ५ हजाराहून अधिक पुस्तकं आहेत. त्यातली बहुतांश पुस्तकं ही दुर्मिळ आहेत. इतिहासलेखन ही काही सोपी प्रक्रिया नाही....!’’ निनाद बेडेकरांनी आपलं विवेचन पुढं सुरू ठेवलं. ‘‘मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी पर्शियन, अरेबिक भाषा येणं अत्यंत आवश्यक आहे. त्या काळातला आपल्या इथला बहुतांश पत्रव्यवहार याच भाषेत आहे. त्यामुळं या दोन भाषा मी आधी शिकून घेतल्या. त्याचा फायदा असा झाला की, अस्सल पत्रे मुळाबरहुकूम वाचून त्यांचा नीटस अन्वयार्थ लावता येऊ लागला. इतिहासकारांमध्ये गजाननराव मेहेंदळे यांचा माझ्यावर सर्वाधिक प्रभाव आहे. शिवचरित्र लिहिण्यासाठी मेहेंदळे यांनी जे अफाट परिश्रम घेतलेत त्याला तोडच नाही. गजाननराव मेहेंदळे हे कोणतंही विधान करताना त्याच्या पुष्ट्यर्थ अनेक तळटीपा देतात. त्यांचं विवेचन करतात. ही शास्त्रशुद्ध संशोधनाची पद्धत मला अत्यंत आवडतं. मेहेंदळे यांच्याबरोबर शिवचरित्रासाठी सहाय्य करत असताना आम्ही विविध शाह्यांची अस्सल पत्रं वाचली. त्यांचे संदर्भ शोधले. त्यामुळं नवीन गोष्टीही या शिवचरित्रात येऊ शकल्या. औरंगजेबाच्या ७०० पत्रांचा समावेश असलेल्या ‘अदाब-इ-आलमगिरी’चा थेट उपयोग आम्ही या शिवचरित्रात केलाय. विविध पातशाह्यांची पत्रं ही शिकस्त लिपीत लिहिलेली असतात. ती लिपी वाचायला अत्यंत कठीण आहे. ती लिपीही मी शिकून घेतलीय. अरेबिक, उर्दू लिपीच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्या लिपीतली पत्रंही वाचायला शिकलो. इतिहास लेखनात प्रायमरी सोर्सेस- प्रथम दर्जाची साधनं यांना फार महत्त्व असतं. अशा या पत्रांच्या वाचनातून मी, गजानन मेहेंदळे, रवींद्र लोणकर या तिघांनी संयुक्तपणे ‘आदिलशाही फर्मान...’ हे पुस्तक साकारलं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकात छापलेल्या अस्सल पत्रांचं डीटीपी कामही आम्हीच केलंय. ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर अनेक पराक्रमी पेशवे, मराठा सरदार यांच्या युद्धकौशल्य आणि नेतृत्वाचा अभ्यास देशांच्या लष्करी प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये केला जातो. माझ्या माहितीप्रमाणे जगभरातल्या २० ते २५ देशांमध्ये छत्रपती शिवरायांच्या लष्करी पैलू आणि नेतृत्वाचा अभ्यास होतो. अमेरिकेतल्या लष्करी प्रशिक्षण अभ्यासक्रमात दोन लढायांची मॉडेल्स ठेवलेली आहेत. १६६९ साली शिवरायांनी अफझलखानाविरुद्धची प्रतापगडाजवळ केलेली लढाई आणि १७२९ मध्ये निजाम-उल-मुल्क याच्या विरोधात दुसऱ्या बाजीरावानं पालखेड इथं केलेली लढाई अर्थात प्रत्येक देशाचा लष्करी प्रशिक्षण अभ्यासक्रम हा गोपनीय असतो. त्यामुळं शिवरायांवर आणखी कुठं आणि कसा अभ्यास सुरू आहे ते तपशीलवार सांगणं कठीण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू आहेत. त्यांचं युद्धनेतृत्व, दुर्गबांधणी, आरमार, सैनिकी शिस्त, महसूल आकारणी अशा प्रत्येक पैलूचा बारकाईनं विचार करून त्यावर लिहिणं आणि भाषणं करणं असा उपक्रम मी सुरू केला..!.’’ निनाद बेडेकर सांगतात, ‘‘शिवाजी महाराजाचं व्यवस्थापन कौशल्य या विषयावर मी व्यवस्थापन शिक्षण संस्थांतून नव्या पिढीसमोर ‘एमबीए’च्या विद्यार्थ्यापुढं भाषणे केली आहेत. शिवरायांच्या विविध १८ ते १९ गुणांसंदर्भात आतापर्यंत अशा व्याख्यानांतून विवेचन केलंय. पण शिवरायांच्या व्यक्तित्वातल्या १०० गुणांपर्यंत आपला अभ्यास वाढवणं आणि त्यावर लेखन, भाषणं करणं असा माझा संकल्प आहे. शिवरायांच्या व्यवस्थापकीय कौशल्याचं सारसूत्र मांडणारं एक पुस्तक लवकरच लिहिणार आहे. या अंगानं महाराजांसंदर्भात नव्या पिढीच्या माहितीसाठी लेखन होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातले गड-कोट-किल्ले यांच्या बांधणीत वैविध्य आहे. देवगिरीचे यादव, बहामनी, आदिलशाही, मुघल, शिवाजी महाराज, पोर्तुगीज, इंग्रजांनी बांधलेले किल्ले असे नाना प्रकार त्यात आढळतील. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातला एक तरी किल्ला या भ्रमंतीत असावा, असा कटाक्ष ठेवण्यात आलाय. मात्र नक्षलवाद्यांच्या समस्येमुळे चंद्रपूर, गोंदियासारख्या चार जिल्ह्यातले किल्ले आम्हाला या यादीतून वगळावे लागले. नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांत सर्वाधिक किल्ले आहेत. राज्यातल्या सर्वच किल्ल्यांचे उत्तम पद्धतीनं कसं जतन व्हावं यावर नव्या पिढीचं लक्ष केंद्रित करण्याचा या किल्लेभ्रमंतीतून माझा प्रयत्न राहणार आहे! नव्या पिढीतली अनेक मुलं मला इतिहास संशोधनाच्या कामी मदत करतात. इंटरनेटवर शिवाजी महाराज यांच्यासंदर्भातले तसेच मराठा, मुघल साम्राज्य आणि अन्य पातशाह्यांबद्दल अनेक पुस्तकं डाऊनलोड केलेली आहेत. अशा ६०० पुस्तकांची यादी एका मुलानं माझ्या हाती दिली. अशा इतिहासप्रेमींचे काही गट आम्ही तयार केलेत. ते शिवरायांच्या इतिहासाच्या विविध पैलूंवर काम करत असतात. माझ्यावर शंकर नारायण जोशी यांच्या इतिहास लेखनाचाही प्रभाव आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीनं इतिहास लेखन कसं करावं हे त्यांच्या ग्रंथांतून मी शिकलो. त्यातूनच मी शर्थीचे शिलेदार, दुर्गकथा, शिवाजी महाराजांच्या ४० लढाया, समरांगण, साक्ष इतिहासाची, ऐतिहासिक कथा, थोरले राजे गेले सांगून, गजकथा, विजयदुर्गचे रहस्य आदी पुस्तकं लिहिली आहेत. कविश्रेष्ठ भूषण यांनी शिवरायांची महती गायलेलं काव्य मला मुखोद्गत आहे. या काव्यातले सौंदर्य आणि अन्वयार्थ स्पष्ट करणारं एक पुस्तक लिहिण्याचा माझा विचार आहे. ते पुस्तकही लवकरच प्रकाशित होईल! शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतरच्या मराठा साम्राज्याबद्दल जर्मन, फ्रेंच, इटली, इंग्रजी, स्पॅनिश भाषेतल्या कागदपत्रांत अशा अनेक नोंदी आहेत की, ज्या अजून अनुवादित झालेल्या नाहीत. मध्यमयुगीन काळात या भाषांतली क्लिष्टता लक्षात घेता अनुवादाचं हे काम इतकं सोपं नाही. भारतीय इतिहास संशोधन मंडळातर्फे मोडी लिपीचे वर्ग चालविले जातात. त्याला तरुणांनी मोठा प्रतिसाद दिलाय. त्यातून दुर्मिळ कागदांचं वाचन, संशोधन मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल. मिर्झाराजेंनी शिवरायांकडून पुरंदर तहाच्या वेळी ताब्यात आलेल्या २३ किल्ल्यांचे बनवून घेतलेले नकाशे अशाच प्रयत्नांतून आमच्या हाती लागलेत. त्यामुळे सर्व २३ किल्ल्यांची नावं नक्की करणं शक्य झालं. इतिहासलेखन करणाऱ्यांपैकी सध्या विशिष्ट गटाच्या लोकांवर टीका केली जातेय. ज्ञानाची भांडारं हल्ला करून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होतोय. माझ्या मते ऐतिहासिक साधनांची अधिकाधिक माहिती मिळवून त्यांचे कठोर परीक्षण करून जो निष्पक्षपणे इतिहास लिहितो तो खरा इतिहासकार. त्याला कोणत्याही वर्ग, जाती, जमातीच्या बंधनात अडकवू नका...!’’ निनाद बेडेकर कळकळीचं आवाहन करतात. आंतरराष्ट्रीय अभ्यास पद्धतीचा, नवतंत्रज्ञानाचा अवलंब करून छत्रपती शिवराय आणि मराठेशाही संदर्भात इतिहासाचं परिशीलन गेली अनेक वर्षे करणारे निनाद बेडेकर आज हयात नसल्यानं यापुढे भावीपिढ्यांना असेच मार्गदर्शन लाभलं असतं पण त्यापासून ते वंचित राहिलेत. शिवशाहीच्या इतिहासाचा हा ‘निनाद’ सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत यापुढेही असाच घुमत राहायला हवा तो त्यांच्या स्मृतीतून.....!!
No comments:
Post a Comment