Saturday, 24 May 2025

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव...!

"पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र म्हणून जगात सिद्ध झालंय. पुलवामातला जवानांवरचा हल्ला अद्याप शोधला गेला नाही. पहलगाम नागरी हल्ल्याचा तपास तरी लागेल का? केवळ हल्लेखोरांची ओळख पटलीय असं म्हणून चालणार नाही. दाऊद, टायगर मेमन, मौलाना अझर मसूद, लष्कर ए तैय्यबचा हाफिज महंमद सईद, झाकी ऊर रहेमान लखवीचा खात्मा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये अमेरिकेसारखं ऑपरेशन लादेन आपण करू शकतो का? संरक्षण क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी सांगतात की, भारतासाठी हे कठीण मिशन आहे. कारण आपल्या राजकीय नेत्यांकडे इतकं धैर्य नाही किंवा त्यांची इच्छाच नाही. पण अशा स्थितीतही भारताकडे काही पर्याय आहेत. त्याचा अवलंब करण्याची राजकीय शक्ती हवीय!"
----------------------------------------
दोन पहेलवान तरुण कुस्तीसाठी मैदानात उतरतात. त्यातला एक पहेलवान तरुण मोठा वस्ताद. प्रत्येक खेळाप्रमाणे कुस्तीतही काही नियम असतात. समोरच्या पहेलवानाला कुठं मारावं, कुठं मारू नये याबाबतचे ते नियम असतात. पण तो पहेलवान या नियमांचं सतत उल्लंघन करतो आणि त्याचा कोचही त्याला साथ देतो. त्याचा कोच म्हणतो, नियम-उसूल याला मार गोळी. तुझा इरादा फक्त समोरच्याला रक्तबंबाळ करायचाच असायला हवा. काहीही कर, पण समोरच्या स्पर्धकाला संपवून टाक...! तर दुसरा पहेलवान तरुण अतिशय संयमी. खेळाचे प्रत्येक नियम इमानेइतबारे पाळणारा. त्यात त्याचा गुरू या तरुणाला नियमांच्या बंधनात अडकवून ठेवतो. गुरू त्याला म्हणतो बघ, समोरचा तरुण तुझा लहान भाऊ आहे, तू मार खायचा. पण तुझ्या भावाला लागणार नाही, याची काळजी घ्यायची...! आणि जेव्हा जेव्हा कुस्तीचा सामना होतो, तेव्हा तेव्हा नियमांचं पालन करणारा हा तरुण पहेलवान ताकदवान असूनही समोरच्या कमकुवत स्पर्धकाचा मार खातो. प्रतिस्पर्धी पहेलवान त्याला कुठंही मारून त्याच्यावर हसतो. पण संयमी पहेलवान सारं काही सहन करून त्याला काहीही करत नाही. त्याच्या गुरूनं अनेक नियम आणि अटीत त्याला अडकवून ठेवलेलंय, अशी त्याची स्थिती आहे.
आता या दोन तरुण पहेलवानांच्या जागी आपण पाकिस्तान आणि भारताला ठेवू...! पाकिस्तान म्हणजे नियमांचं उल्लंघन करणारा तरुण. त्यानं खेळाचे सर्व नीती-नियम पायदळी तुडवलेत आणि भारत म्हणजे शिस्तप्रिय, जो स्वतःच्या संयमामुळं सतत पाकिस्तानचा मार खात असतो. पाकिस्तान सतत कपटानं, क्रूरपणे भारतीयांवर दहशतवाद्यांकडून हल्ले करवतो आणि आपण त्यातले नसल्याचा मुखवटा धारण करतो. पाकिस्तानचा हा नाटकीपणा मात्र अमेरिकेनं नेमका हेरला. अमेरिकेनं मागे एकदा पाकिस्तानात आपले कमांडो पाठवून दहशतवादी संघटना अल् कायदाचा नेता ओसामा बिन लादेनला ठार केलं आणि जगासमोर पाकिस्तानचा बुरखा फाडून खरा चेहरा आणला. लादेननं आमच्या भूमीवर पाय ठेवलेला नाही असा पाढा बोलणाऱ्या पाकिस्तानचं ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर बिंग फुटलं. त्यामुळं शरमेनं मान खाली घालण्याऐवजी पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री युसुफ रझा गिलाणी आणि विदेश सचिव सलमान बशीर दमबाजी करत होते की, खबरदार, जर पुन्हा कुणी आमच्या धरतीवर पाय ठेवून अशी हिंमत करेल तर... त्यांना फार महागात पडेल. पाकिस्तानच्या नेत्यांची ही दमबाजी तेव्हा भारताला उद्देशून होती.
लादेनचा खात्मा अमेरिकेने केलं; त्यानंतर दिल्लीत पत्रकारांनी तेव्हाचे लष्कर प्रमुख व्ही.के.सिंह यांना विचारलं की, पाकिस्तानात लादेनला शोधून अमेरिकेनं ठार केलं तसं आपलं लष्कर करू शकत नाही का? दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन, मौलाना अजहर मसूद, सैयद सलाहुद्दीन, हफिज मोहम्मद सईद, झाकी-उर-रहेमान लखवी, भटकळ बंधू... यांच्यासह देशातल्या अनेक ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांत तसंच काश्मीरपासून इतरत्र अनेक ठिकाणी घडलेल्या दहशतवादी कारवायांत आपल्याला हवे असलेले दहशतवादी पाकिस्तानात आहेत. पाकिस्तान त्यांना भारताकडे सोपवण्यास तयार नाही. तसंच त्यांच्या तिथं त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही करत नाही. अशा अनेक गुन्हेगारांनी पाकिस्तानचा आसरा घेतलाय, हे सत्यही पाकिस्तान स्वीकारत नाहीय. अशा स्थितीत भारतीय लष्कराचे कमांडो पाकिस्तानात घुसून या दहशतवाद्यांची शिकार करू शकतात का? याचं उत्तर देताना जनरल व्ही.के.सिंह म्हणाले होते, नक्कीच करू शकतात...! त्यानंतर एअर फोर्सचे प्रमुखही म्हणाले की, आवश्यकता भासल्यास भारत लढाऊ विमानंही पाकिस्तानात पाठवू शकतो या दोन्ही लष्कर प्रमुखांच्या इशाऱ्यानं पाकिस्तानी नेत्यांचे धाबे दणाणले होते. त्यांनी भारताचं नाव न घेता इशारा दिला की, कोणत्याही देशाने असं पाऊल उचलल्यास, त्याला जशास तसं उत्तर देऊ ! पाकिस्तानने असं म्हणणं स्वाभाविकच आहे. कारण पाकिस्तानच्या अब्रूचे पार धिंडवडे निघाले होते. पण आपल्यासाठी असा प्रश्न निर्माण होतो की, खरोखरच भारत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करू शकतो का? की आपल्याला खूश करण्यासाठी आपले अधिकारी असं बोलताहेत?
संरक्षण आणि इतर व्यूहात्मक बाबतीतले तज्ज्ञ  म्हणतात, 'इथं प्रश्न फक्त भारतीय सैन्याच्या क्षमतेचा नाही. तर प्रश्न आपल्या राजकीय इच्छाशक्तीचा आहे अन् आपल्याला या इच्छाशक्तीचा अभावच जास्त नडतोय. त्यामुळंच सध्या तरी आपले सैनिक पाकिस्तानात जाऊन अशी एखादी कामगिरी यशस्वीपणे पार पाडतील, असं वाटत नाही..!' राजकीय इच्छेशिवाय आपलं सैन्यही काहीही करू शकत नाही. त्यामुळं आपल्या सैन्याचे हातही बांधलेले आहेत. 
आपल्या देशावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांची यादी पाहा -कारगिलचं युद्ध..., इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण..., संसद भवनवरील हल्ला..., जम्मूची लष्करी छावणी..., श्रीनगर एअरपोर्ट आणि सैन्याच्या स्थानिक मुख्य केंद्रावरील दहशतवादी हल्ला..., मधल्या काळातील दिल्ली-बंगलोर-अहमदाबाद-वाराणसीसारख्या अनेक शहरांवरील टेरर अॅटॅक..., मुंबईतील सात ट्रेनमध्ये एकाचवेळी झालेले बॉम्बस्फोट आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईवर झालेला पाकिस्तानी आत्मघातकी दहशतवाद्यांचा हल्ला... बालाकोटवर झालेला हल्ला, पुलवामा इथं लष्करी जवानांवर बॉम्बस्फोट, काश्मीर पहलगामला झालेला नागरी हल्ला इतकं सारं होऊन भारताने संयमीपणाचं धोरण पत्करलं होतं. यापूर्वी पंजाबमध्ये दहशतवाद फैलावण्यास पाकिस्तानचा मोठा हात होता. ही वस्तुस्थिती बाजूला ठेवली, तरी गेल्या वीस वर्षांपासून पाकिस्तानी दहशतवादी छोटे-मोठे हल्ले करतच आहेत. तरीही आपण त्यांच्या विरोधात काहीही करत नाही. दहशतवाद्यांसमोर आपला कमकुवतपणा सिद्ध होतोय. बॉम्बस्फोटात पुलवामात ४० जवान ठार झाले. ते कुणी कसे कोणत्या दहशवाद्यांनी केले हे आजवर उघड झालेलं नाही. पहलगामला २६ पर्यटकांना गोळ्या घातल्या गेल्या. ते चार दहशतवादी आज कुठं आहेत? ते भारतात आहेत की, पाकिस्तानात निघून गेलेत याची उत्तरं द्यावी लागतील! पाकिस्ताननं दहशतवादाला आपली राष्ट्रीय नीती बनवलंय. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांसमोर आपण आक्रमक पवित्रा घेत नाही. त्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप एक कमकुवत देश अशीच राहिलीय. असा देश की जो स्वतःवरील आक्रमणही थोपवू शकत नाही...! आज आपण हल्ले करून पाकड्यांची काही ठिकाणं उध्वस्त केल्याच्या बातम्या आल्यात पण अमेरिकेनं सीझफायर घोषणा परस्पर केली. अन् आपण थंडावलो. अंतर्गत हेर संस्था इंटेलिजन्स ब्यूरो आयबीचे माजी सहाय्यक डिरेक्टर यांच्या मते, 'अमेरिकेनं ओसामाला मारण्यासाठी पाकिस्तानात त्यांचे कमांडो पाठवले. त्याप्रमाणेच आपणही तिथं असाच हल्ला करायला हवा, ही कल्पना सामान्य माणसाला रुचेल अशी आहे. पण त्यामुळं दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे. अशावेळी परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय कमांडोंनी गुपचूप पाकिस्तानात घुसून पाच-सहा दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला असता, तर पाकिस्तान खडबडून जागा झाला असता आणि त्याला हल्ल्याचं उत्तर देण्याआधी दहा वेळा विचार करावा लागला असता...!' पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्याची ही संधी आपण सोडली. त्यामुळं आता आपण पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अड्डे शोधण्यात काही अर्थ नाही. विशेष म्हणजे, असे हल्ले कुणाला सांगून होत नाहीत. विदेशी धरतीवर असं कोणतंही कृत्य करण्याआधी व्यवस्थित प्लानिंग असायला हवं. दाऊद आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफीज सईद यांच्याबाबतही होऊ शकतं, आपण त्यांना भारण्याची योजना आखेपर्यंत ते पाकिस्तानातच इतर ठिकाणी निसटले तर?
अमेरिकेला पाकिस्तानात लादेनचा सुगावा लावणं आणि त्याच्यावर हल्ला करणं सहज शक्य झालं, कारण अमेरिकेनं तिथं अनेक वर्षांपासून हवाई अड्डा बनवलाय, तसंच शेकडो पाकिस्तान्यांना स्वतःचं एजंट बनवलंय, तसंच अमेरिकेचेही अनेक हेर पाकिस्तानात आहेत, पाकिस्तान अमेरिकेसाठी मोकळं मैदानच आहे, असं म्हणता येईल, लादेनला मारण्यासाठी कमांडोंना घेऊन अफगाणिस्तानच्या बेझवरून अमेरिकन हेलिकॉप्टरनी उड्डाण केलं, तेव्हा अमेरिकेनं अफगाण-पाक सीमेवरचं रडार बंदच केलं होतं. पाकिस्तानची निम्मी अर्थव्यवस्था अमेरिका चालवते. पाकिस्तान अमेरिकेविरोधात याबाबतीत ब्र काढू शकत नाही. असो. भारताबाबत बोलायचं तर आपण पाकिस्तानात कमांडो पाठवून दहशतवाद्यांना शोधण्याचं काम अतिशय कठीण आहे. त्याचं कारण असं की, गेल्या वीस वर्षांपासून आपण पाकिस्तान मधलं 'कोवर्ट ऑपरेशन' बंद केलंय. कोवर्ट ऑपरेशन म्हणजे एका देशानं दुसऱ्या राष्ट्राचं खासगीपणे, गुप्तपणे एखादं काम करणं. उदाहरणार्थ, स्पर्धक देशाच्या प्रजेला तिथल्या सरकारविरोधात भडकवणं, तिथल्या विरोधकांना शस्त्रांचं प्रशिक्षण देणं, त्या देशातली महत्त्वाची ठिकाणं स्थान अथवा व्यक्त्तीबाबत खाजगी माहिती मिळवणं, तिथल्या लोकांचा स्वतःच्या कामासाठी वापर करणं आणि डोईजड झाल्यावर त्यांचा खात्मा करणं, हे सर्व या कोवर्ट ऑपरेशनमध्ये येतं. पाकिस्तान आपल्या इथं अशा दहशतवादी कारवाया करतो, हे त्याच्या कोवर्ट ऑपरेशनचं यशच म्हणावं लागेल. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान आपल्याकडच्या असंतुष्ट लोकांच्या मदतीनं हे दहशतवादी हल्ले करत असतो. पंजाब किंवा काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यापासून मुंबई किंवा अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यापर्यंत पाकिस्तानला इथल्याच अनेक लोकांची मदत मिळत असते. हेच लोक मोठी प्राणहानी होईल अशी ठिकाणं त्यांना शोधून देतात, आणि स्फोटक पदार्थही ठेवण्याचं कामही करतात. अनेक मोठ्या व्यक्तींच्या हालचालींची खबरही हे लोकच देतात.
इंदिरा गांधी या देशाच्या प्रधानमंत्री झाल्यानंतर पाकिस्तानात असं कोवर्ट ऑपरेशन करण्यास मुभा देण्यात आली होती. त्यासाठी भारतानं रॉ - रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग हे नाव असलेली हेर संस्था बनवली. या संस्थेच्या कामाशी आपण सहमत असो अथवा नसो, पण हकीकत अशी की, या संस्थेनं अनेक वर्षं पाकिस्तानाला देशांतर्गतच गुंतवलं होतं. रॉनं पाकिस्तानातच अनेक एजंट बनवले होते. ते आपल्याला नियमितपणे तिथल्या अंतर्गत गोष्टींची माहिती द्यायचे. साहजिकच त्यासाठी त्यांना आपण भरपूर पैसा द्यायचो. सेंटर फॉर लँड वॉरफेर स्टडीज नावाची संस्था चालवणारे भारतीय सैन्याचे निवृत्त म्हणतात, '१९९७ मध्ये देशाच्या प्रधानमंत्रीपदावर आलेल्या इन्दरकुमार गुजराल यांनी पाकिस्तानात चालणाऱ्या आपल्या कोवर्ट ऑपरेशन्सवर लगाम लावला. रातोरात आपल्या एजंटांना मिळणारी रक्कम बंद झाली. परिणामी, त्यांनी भारतासाठी काम करणं, पाकिस्तानची गोपनीय माहिती पुरवणं बंद केलं. अनेक वर्षांच्या मेहनतीवर एका अयोग्य राजकीय निर्णयानं पाणी फेरलं. सर्वात वाईट हालत तर भारतातून पाकिस्तानात जासूसी करण्यासाठी गेलेल्या लोकांची झाली. आपल्याकडून मिळणारी मदत एकाएकी बंद झाल्यानं अनेक जण पाकिस्तानातच अडकले आणि अखेर पाकिस्तानी सत्ताधाऱ्याऱ्यांच्या हाती लागले...!' तेव्हापासून आजपर्यंत भारताची स्थिती अवघड झाली. बिघडलेली स्थिती सुधारण्यासाठी नंतर भारतानं भरपूर प्रयत्न केले. पण अद्यापि, पाकिस्तानात स्वतःचं हेर तंत्र उभं करण्यास भारताला यश आलेलं नाही. नव्यानं पाकिस्तानात जासूसी तंत्र उभं करायला काही वर्ष लागतील. पाकिस्तानात मजहबी आतंकवाद फार वाढलाय. त्यामुळं हा पर्यायही आपल्या विरोधात आहे!
सध्या तरी पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणं भारतासाठी कठीण आहे. दाऊदबाबतही आपल्याकडे अनेक वर्षांपासून इतकीच माहिती आहे की, तो कराचीच्या व्हाइट हाऊस नावाच्या बंगल्यात राहातो. दाऊदला एकाच ठिकाणी १५ वर्ष ठेवण्याइतके त्याला आश्रय देणारे मूर्ख असतील का? एखाद्या देशातली संपूर्ण माहिती असताना अमेरिकेप्रमाणे आपले कमांडो दाऊद किंवा इतर वाँटेड गुन्हेगारांना शोधून त्यांचे अड्डे उध्वस्त करू शकतील का? एखाद्या नेमक्या टार्गेटवर हल्ला करायचा असेल, तर त्याला लष्करी भाषेत सर्जिकल स्ट्राइक अथवा प्रिसिजन अॅटॅक म्हटलं जातं. हवाई दलाचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, 'आपलं लष्कर यासाठी सक्षम आहे. पाकिस्तानात कोणकोणत्या ठिकाणी अॅटॅक करायचा याची यादीही अग्रक्रमानुसार आपण अपडेट करत असतो. होय, पण असे हल्ले करण्याआधी आपल्याला पर्यायही ठेवायला हवेत. तसंच त्यामुळे उ‌द्भवणाऱ्या धोक्यांचाही विचार करायला हवा. कारण त्यामुळं आपलं नुकसानही होऊ शकतं!' एका दोघांना ठार मारण्यासाठी दुसऱ्या देशात केलेल्या किरकोळ हल्ल्यामुळं युद्धाचं स्वरूप येऊ नये म्हणून हल्ल्याचा उद्देशही साफ असायला हवा. म्हणजे एखादी व्यक्ती अथवा एखादी दहशतवादी छावणी उध्वस्त करताना आजूबाजूचं होणारं नुकसान आणि प्राणहानी टाळायला हवी. कारण अशा हल्ल्याचा उद्देश मोठं नुकसान करण्याचा नसावा. पाकिस्तानातलं असं नेमकं लक्ष्य गाठण्याचं काम आपल्या एअरफोर्सची विमानंही करू शकतात. पण त्यासाठी देशाच्या हवाई सीमेचं उल्लंघन करावं लागेल, आपल्या लष्कराने असंही स्पष्टीकरण दिलंय की, पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक करण्याचा भारताचा कोणताही इरादा नाहीये. यासंदर्भात एक शॉर्टकट अथवा मधला उपाय म्हणून भारत लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाडोत्री मारेकरी मर्सिनरी वापरू शकतो. ही पद्धत अमेरिकेसारखा समर्थ देशही अवलंबतो.
खरं तर भारतीय गुप्तचर संस्थेने गेल्या दहा वर्षांदरम्यान कमीत कमी दोन वेळा 'लोहा लोहे को काटता है...!' या न्यायानं पाकिस्तानात दाऊदला मारण्याचं काम त्याचा मुंबईतला कट्टर शत्रू गैंगस्टर छोटा राजनवर सोपवलं होतं. भारतीय गुप्तचर संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, 'पाकिस्तानात कमांडोंच्या सुरक्षेत असलेल्या दाऊदपर्यंत पोहोचण्याची छोटा राजनसाठी दोनदा संधी चालून आली होती. त्यावेळी असा प्लान करण्यात आला होता की, शुक्रवारी दुपारी नमाज पढण्यासाठी दाऊद घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या मशिदीत जाईल, तेव्हा रस्त्यात त्याच्या कारवर हल्ला करून त्याला ठार करायचं...!' ही २००१ मधील गोष्ट आहे. पण हा प्लान अंमलात येण्याच्या दोन दिवसआधी आपल्या गुप्तचर संस्थेला कुठून तरी हे ऑपरेशन न करण्यासाठी सूचना आली आणि ऑपरेशन दाऊद बाजूला ठेवावं लागलं. आता नव्यानं आपल्याला असा प्लान करायचा असेल, तर अशाच भाडोत्री मारेकऱ्यांचा शोध घ्यावा लागेल. एका लष्करी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 'आपल्या सरकारनं पुन्हा पाकिस्तानसारख्या देशांमध्ये कोवर्ट ऑपरेशनसाठी जासूसी नेटवर्क उभं करायला हवं. हे हेर दुसऱ्या देशात आपल्या सरकारसाठी आवश्यक माहोलही उभा करतील, पाकिस्तानबाबतीत तर सर्व नियम धाब्यावर बसवून हे व्हायलाच हवं. पाकिस्तानकडेही आता अणुक्षमता आहे आणि आपल्या या शेजारी देशानं भारताप्रमाणे स्वतः पहिल्यांदा अणुक्षमतेचा वापर करणार नाही, असं वचन दिलेलं नाही. त्यामुळं या देशाविरोधात केलेल्या किरकोळ कारवाईचंही अणुयुद्धात रूपांतर होऊ शकतं. ही शक्यताही लक्षात घ्यायला हवी.'
कोवर्ट ऑपरेशनच्या नावे भारत पाकिस्तानात दुसरं काय करू शकतो? या प्रश्नाचं उत्तर असं की, पाकिस्तानात बहुसंख्य असलेल्या मुस्लीम समाजातही अनेक वाद आहेत. पाकिस्तान आपल्या इथं जसं सतत मुस्लिमांवरील अन्यायाच्या नावे बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यांच्यात वाद निर्माण करतो. तसंच भारतही त्यांच्यातल्या वादाचा लाभ घेऊ शकतो. अशाच प्रकारे तिथं प्रांतवादही आहे. पाकिस्तानात प्रत्येक क्षेत्रात पंजाबींचं वर्चस्व आहे. त्याच्या विरोधात असलेल्या दुसऱ्या प्रजेचाही म्हणजे सिंधी, बलुची, पठाण वगैरे भारत फायदा घेऊ शकतो. पाणीवाटपावरून तर तिथल्या सिंध आणि पंजाबमध्ये अनेक वर्षांपासून जणू लढाईच चालते. पुढे पुढे हा वाद अधिकाधिक चिघळला जाणार आहे. पाण्याच्या वादातही भारत काडी टाकून आग लावू शकतो. हे वास्तव आहे. एक सुसंस्कृत प्रजा म्हणून आपण असा विचारही मनात आणता कामा नये. पण पाकिस्तान अनेक वर्षापासून आपल्याशी असंच वागतोय. पाकिस्तान हा असा देश आहे, ज्यानं आपल्या देशातल्या एका पिढीत सतत भयग्रस्त अवस्था निर्माण केलीय. त्यामुळं आपणही या देशाशी असंच वागण्यात वावगं काही नाही. कारण प्रेम आणि युद्धात सारं काही माफ असतं!
पाकिस्तानच्या दहशतवादी कुरापतखोरीचा आता कायमचा हिशोब करण्याच्या मूडमध्ये होता. पहलगामच्या घटनेचा बदला घेण्यासाठी सिंधू करार स्थगित केला. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला. आयात-निर्यात थांबवली, व्यापार बंद केला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ ठिकाणांवर एअर स्ट्राईक केले. पाकनं १५ शहरांवर ड्रोन हल्ले केल्यानंतर सीमेवर गोळीबार, धार्मिक स्थळांवर हल्ले सुरू आहेत. याला भारताने प्रत्युत्तर दिलंय. लाहोरमधली एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त केली. कराची बंदराचा कोळसा केला. आता पाकिस्तानच्या मर्मस्थळीच घाव घालावा लागेल, हे ओळखून सरकारने त्या दृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केली. भारत -पाक युद्ध स्थिती तयार झाली.१७ वर्षांपूर्वी म्हणजे २००८ मध्ये जगभरातली अर्थव्यवस्था खिळखिळ्या होत होत्या. त्याचवेळी २६/११ च्या पाकच्या दहशतवादी हल्ल्यानं मुंबई हादरली होती. त्यावेळी मनमोहन सिंग सरकारने युद्धाचे आव्हान टाळून पाकिस्तानला कूटनीतीने जगापुढे लज्जित करण्यावर भर दिला. आताही त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसतेय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातशुल्क धोरणामुळे जगावर मंदीचे सावट पसरणार, अशी भीती व्यक्त होतेय. त्याचवेळी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याने भारताच्या आत्म्यावर आघात केलाय. यावेळी मात्र भारताने कूटनीती सोबतच सैन्य ताकदीचा वापर करण्यावर भर दिला. भारत-पाक युद्ध झालेच तर ते कारगील युद्धाप्रमाणे झटपट संपेल की दीर्घकाळ चालेल, याची शाश्वती नव्हती. त्यामुळेच यावेळीही युद्ध टाळण्याच सल्ला अनेक देश देत होते. पण युद्ध झालेच तर पाकिस्तान, तिथले लष्कर आणि आयएसआय समर्थित दहशतवाद्यांचा कायमचा बीमोड करणे हे भारतापुढचे लक्ष्य होतं. मात्र अमेरिकेनं परस्पर पाकिस्तानच्या विनंतीवरून युद्धबंदीची घोषणा केली. अन् भारताचा नाईलाज झाला.
हरीश केंची,
९४२२३१०६०९
चौकट 
*रक्त नव्हे, तर गरम सिंदूर वाहतेय....!*
“भारतमातेचा सुपुत्र मोदी छाती फुगवून येथे उभा आहे. मोदीचं मन थंड आहे; पण त्याचं रक्त गरम आहे. मोदीच्या नसांतून रक्त नव्हे, तर गरम सिंदूर वाहत आहे....!”
"ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले. जेव्हा सिंदूर स्फोटकाचं रूप घेतं, तेव्हा काय परिणाम होतात, हे संपूर्ण जगानं आणि देशाच्या शत्रूनं पाहिलंय....!" 
"आता पाकिस्तानशी ना व्यापार, ना चर्चा. अणुबॉम्बच्या धमक्यांनाही भीक घालणार नाही. दहशतवाद्यांनी बहिणींचं कुंकू पुसलंय. त्यांनी धर्म विचारला अन् गोळ्या झाडल्या. पहलगामचा हल्ला ही भारतीयांच्या हृदयाला झालेली जखम आहे...!”
देशात मोदींच्या भाषणातून हा इशारा दिला जात असतानाच सैन्यानं केलेल्या यशोगाथा देशासमोर मांडली जातेय. श्रेयाची धडपड सुरू आहे.  सर्वपक्षीय शिष्टमंडळाची तीन पथकं परदेशी रवाना झालीत. पाकिस्तानकडून ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत पसरवली जात असलेली चुकीची माहिती खोडून काढली जाणारंय. सिंधू जलसंधी करारावरची भूमिकाही स्पष्ट केली जाणारंय. दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या ‘नवीन सामान्य’ धोरणाची माहिती जागतिक स्तरावर दिली जाणारंय.

No comments:

Post a Comment

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...