चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्री महेश मांजरेकर यांनी त्यांच्या नव्यानं सुरू केलेल्या पॉडकास्टवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत दोन अडीच महिन्यापूर्वी घेतली होती. त्यात महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकत्र येण्याची तयारी राज यांनी दर्शवली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, आता तुमचा इगो बस्स झाला. आपण आपला अहंकार सोडा अन् महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र या. दोघांच्याही सुपीक डोक्यात महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा संपूर्ण आराखडा रोड मॅप तयार आहे. तो अमलात आणण्यासाठी तुम्ही दोघांनी सर्व मतभेद, गीले-शिकवे विसरुन, झालं गेलं गंगेला मिळालं, असं समजून राज्यातल्या समाजाच्या, महाराष्ट्राच्या भल्यासाठी, सर्व घटकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी भगीरथ बनून एकत्र या.
विधानसभेच्या निकाल हे धक्कादायक, अनपेक्षित, आश्चर्यकारक असल्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र आल्यात. मराठी माणसाच्या अन् तुमच्याही त्याच प्रतिक्रिया आहेत. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला २८८ जागांपैकी तब्बल २३० जागा मिळाल्या आणि हे यश मिळतांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला २०, कॉंग्रेसला १६ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० अशा एकूण केवळ ४६ जागा मिळाल्यात. लोकसभेतल्या यशावर अक्षरशः पाणी फिरवून महाआघाडीचं चक्क पानीपत झालं. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांचं बंड झालं. आणि ३० जून २०२२ रोजी भाजपच्या वळचणीला गेलेल्या शिंदेंच्या गळ्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. त्यानंतर अजितदादांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेत शिंदे फडणवीस सरकारमध्ये स्थान पटकावलं. सर्वोच्च न्यायालयानं या दोन्ही पक्षांच्या संदर्भात अद्यापही निर्णय दिलेला नाही. हा निर्णय देण्यापूर्वीच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे निवृत्त झालेत. विधानसभेच्या या निवडणुकीनं अनेकाना अनेक धक्के बसलेत. महत्वाचं म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे, कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जबरदस्त फटका बसला. शंभराहून जास्त जागा लढवूनही राज ठाकरे यांना भोपळाही फोडता आला नाही. लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला १३, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ९, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ८ जागा मिळाल्या तर भारतीय जनता पक्षाला ९, शिंदेंच्या शिवसेनेला ७ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ एक जागा मिळाली होती. एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघ या प्रमाणे कालच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी किमान ५४, शरद पवार यांच्या पक्षाला ४८ आणि कॉंग्रेस पक्षाच्या वाट्याला ७८ यायला हव्या होत्या. ढोबळमानानं हा हिशोब केला तर महाविकास आघाडी सहज सत्तेवर यायला हवी होती. परंतु लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या सरकारनं मतदारांना प्रलोभनं दाखविणारे प्रचंड निर्णय घेतले, शासन निर्णयांच्या जीआरचा विक्रम केला. सत्ताधाऱ्यांना मतदार 'लाडके' झाले आणि २८८ पैकी तब्बल २३० जागा जिंकून निर्विवाद सत्ता हस्तगत केली. पक्षाला विधानसभेच्या एक दशांश जागा ज्या पक्षाला मिळतील त्या पक्षाला विरोधीपक्षनेतेपद मिळू शकतं. परंतु उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार आणि कॉंग्रेस मिळून केवळ ४६ जागा मिळाल्यानं कोणत्याही एका पक्षाकडे विरोधीपक्षनेते पद येऊ शकलेले नाही. अर्थात तिघे मिळून एकत्र येऊन दावा करु शकतात आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हे विरोधीपक्षनेते पद मिळू शकतं. हा झाला निवडणुकीतल्या निकालावरचा वस्तुस्थिती दर्शक आढावा. आपला मूळ मुद्दा वेगळाच आहे. तो आहे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन करण्यात आलेल्या शिवसेनेचा आणि मुंबईसह महाराष्ट्रात याच शिवसेनेच्या अस्तित्वाचा. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भले निवडणूक आयोगानं नांव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं असलं आणि पक्षोपपक्षात पर्यटन करुन आलेले अनेक जण त्या पक्षात जाऊन वरची पदं उपभोगत असतील तरी निष्ठावंतांना मानणारी जनता उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असल्याचं मानते. ज्यांनी मातोश्रीच्या दरवाजावर कधी पाय ठेवला नाही, ज्यांनी कधी बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेतलेले नाहीत, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे हे शिवाजी महाराजांपेक्षा मोठे आहेत काय? असा सवाल केला आहे ते बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याची भाषा करताहेत. इतकंच नव्हे तर ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचं दु:साहस केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताहेत. धर्मवीर आनंद दिघे यांना कुणी पाहिलं नाही, त्यांचं सान्निध्य, आशीर्वाद, मार्गदर्शन ज्यांना लाभलं नाही ते धर्मवीरांचे गोडवे गाताहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर बंडू शिंगरे, हेमचंद्र गुप्ते, दत्ता प्रधान छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक आणि राज ठाकरे हे शिवसेना सोडून गेले हे अनेक धक्के पचवून बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांनी पक्षाला एका उंचीवर नेऊन ठेवलं. शिवसेनेचा आठ वर्षांपूर्वी सुवर्णमहोत्सव झाला. त्यावेळी मी लिहिलं होतं की, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले, अन् या दोन्ही भावांनी जर एकत्रितपणे अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला तर मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा होऊ शकतो. उभा महाराष्ट्र या दोघांची प्रतीक्षा करतोय. १५ डिसेंबर १९८८ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी दैनिक सामनासाठी मातोश्री बंगल्यावर माझी मुलाखत घेतली आणि माझी पुणे प्रतिनिधी या पदावर नियुक्ती केली. तेंव्हापासून शिवसेनेच्या अनेक घडामोडींचा मी साक्षीदार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी १९९० च्या विधानसभा निवडणुकीत गिरगांव चौपाटीवर केलेल्या भाषणात "महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराथी, बंगालमध्ये राहतो तो बंगाली या न्यायानं हिंदुस्थानात राहतो तो हिंदू...!" ही हिंदुत्वाची व्याख्या केली होती. ही व्याख्या मुंबई उच्च न्यायालयात मनोहर जोशी यांच्या निवडणूक खटल्यात माझ्या साक्षीत न्या. सॅम वरियावा यांच्या समोर आली. या व्याख्येमुळे ११ डिसेंबर १९९५ रोजी न्या. जे. एस. वर्मा यांनी मनोहर जोशी यांना निर्दोष मुक्त केलं. छगन भुजबळ यांच्या हकालपट्टीचं निवेदन बाळासाहेब ठाकरे यांनी मला लिहून घ्यायला सांगून ते सामनामधून सर्व वर्तमानपत्रात द्यायला लावलं. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्या संपूर्ण कालावधीत मातोश्री इथं वृत्तांकन करण्यासाठी मला सामना मधून पाठविण्यात आलं होतं. त्यावेळी सकाळी साडे अकरा वाजता बाळा नांदगावकर हे मातोश्री आणि दुपारी बारा वाजता ते कृष्णकुंज येथे उपस्थित राहून उद्धव आणि राज यांच्यात दुवा म्हणून काम करीत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या दृष्टीने तो अतिशय कठीण काळ होता उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मोटारीला एकच स्टेअरिंग असतं एक तर ते स्टेअरिंग राजनं घ्यावं अथवा मी मोटार चालवावी. एकच स्टेअरिंग दोन जण कसं चालविणार? राज ठाकरे यांनीही 'राजकारण आणि कुटुंब यापैकी एकाची निवड करायची झाल्यास मी कुटुंबाची निवड करीन. राजकारणामुळे कुटुंब तुटू देणार नाही...!' परंतु दुर्दैवानं विचार विमर्श, चर्चा वाटाघाटीनंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. काही नतद्रष्टांनी मातोश्रीहून कृष्णकुंजवर जाऊन शिवसेना नेस्तनाबूत करण्यासाठी राज ठाकरे यांना साकडं घातलं त्यांना शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आहे, माझे भले मतभेद असतील पण मी शिवसेना नेस्तनाबूत करण्यासाठी बाहेर पडलेलो नाही, असं ठणकावून सांगत त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात समेट घडविण्यासाठी मनोहर जोशी आणि संजय राऊत हे दोघे कृष्णकुंजवर गेले. परंतु ती मनोहर शिष्टाई निष्फळ ठरली तेंव्हा राज समर्थकांनी राऊत यांच्या मोटारीचा चेंदामेंदा केल्याच्या बातम्या आल्या होत्या. एक कट्टर शिवसैनिक शाम वाळुंज या कार्यकर्त्यानं कृष्णकुंज ते मातोश्री अशी पदयात्रा काढून ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले पण त्याला वेड्यात काढून कशाला वेळ वाया घालवताय असा सल्लाही देण्यात आला. २००९ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या इंजिनानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या भल्या भल्या नेत्यांना घरी पाठविलं. अपवाद फक्त कल्याणचा ठरला. तिथं दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांचे सुपुत्र आनंद परांजपे यांनी मनसेच्या वैशाली दरेकर रिंगणात असतांनाही वसंतराव डावखरे यांना पराभवाची धूळ चारली होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे संबंध अतिशय कौटुंबिक आहेत. लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या, शस्त्रक्रिया झालेल्या ज्या उद्धव ठाकरे यांना स्वतः मोटार चालवत राज ठाकरे हे मातोश्रीवर सुखरुपपणे सोडायला जाऊ शकतात त्या उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक घेण्यासाठी कार्यकर्त्याची गरज भासते किंबहुना राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या समवेत संवाद साधण्यासाठी मध्यस्थाची आवश्यकता वाटते, यावर शेंबडे पोर तरी विश्वास ठेवेल का? मराठीचा मुद्दा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर फक्त, फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच अधिकार आहे. शिवसेनेचा भगवा हा निखळ संपूर्ण भगवाच आहे जो श्रीरामाचा, शिवरायांचा, हिंदुत्वाचा आहे. या झेंड्याला हिरवी किनार नाही. १९८७ ची विलेपार्ले इथल्या विधानसभेची हंसराज भुग्रा यांच्या निधनानं झालेली पोटनिवडणूक शिवसेनेच्या डॉ. रमेश प्रभू यांनी लढवली होती त्यावेळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं शिवसेनेला पाठिंबा दिला होता आणि जनता दलाच्या प्राणलाल व्होरा यांना भारतीय जनता पक्षानं पाठिंबा दिला होता. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली तेंव्हा भारतीय जनता पक्षाचे चाणक्य म्हणवले जाणारे नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनाप्रमुख हे हिंदुत्वावर निवडणूक जिंकू शकतात, हे जाणून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती १९८९ च्या लोकसभा आणि १९९० च्या विधानसभा निवडणुकीत घडवून आणली. विलेपार्ले विधानसभेची पोटनिवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढविली म्हणून काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रभाकर कुंटे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वासाठी सहा वर्षे मताधिकार काढून घेण्यात आला. रमेश प्रभू यांना आमदारकीवर पाणी सोडावं लागलं. एवढा त्याग शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेने हिंदुत्वासाठी केला. त्यावेळी हिंदुत्वाचा प्रचार करायला भाजप घाबरत होती. त्यासाठी त्यांनी गांधीवादी समाजवाद स्वीकारला होता. भाजपमध्ये हिंदुत्वाचा अंगार शिवसेनेने दाखवून दिल्यानं त्यांनी युती केली हे वास्तव आहे पण ते सोयीस्कर डावललं जातं.
६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली तेंव्हा भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांना पत्रकारांनी प्रश्न केला की, बाबरी किसने गिरायी? त्यावर सुंदरसिंह भंडारी म्हणाले, "नहीं वह बीजेपी के नहीं थे, आरएसएस के नहीं थे, बजरंग दल के नहीं थे, व्हीएचपी के नहीं थे". त्यावर पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारला, की फिर वह कौन थे? तेंव्हा भंडारी यांनी, "शायद वह शिवसेनाके होंगे, क्योंकी वोह सारे मराठी में बातचीत कर रहे थे...!", असं सांगत काखावर केल्या. त्याचवेळी वांद्र्याच्या कलानगरातून वाघानं डरकाळी फोडत, "जर ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे...!" असं ठणकावून सांगितलं. हा वाघ दुसरा तिसरा कोणी नसून ते होते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे.....! हेच बाळासाहेब ठाकरे यांचे कडवे हिंदुत्व. १९९२-९३ च्या दंगलीत, बॉम्बस्फोटानंतर उसळलेल्या दंगलीत मुंबई महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला, समस्त हिंदूंना संरक्षण देण्याचं शिवधनुष्य पेलण्याचं काम शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. शिवसेनेची कॉंग्रेस होऊ देणार नाही, अशा आशयाचे फलक आणि जाहिराती देऊन लोकांना संभ्रमित करण्याचं काम शिवसेना द्वेष्ट्यांनी, उद्धव द्वैष्ट्यांनी केलं परंतु शिवसेनेचा जन्म झाला तेंव्हा ही माणसे होती कुठं? १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर १९६७ साली कॉंग्रेसचे स. गो. बर्वे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. हे स. गो. बर्वे सनदी अधिकारी होते. त्यांना यशवंतराव चव्हाण यांनी कॉंग्रेसमध्ये आणून इशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिली होती. याच स.गो. बर्वे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली होती. याच आधारावर गुजरातमध्ये जीआयडीसी स्थापन करण्यात आली. स. गो. बर्वे यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या भगिनी ताराबाई सप्रे यांनाही इशान्य मुंबई लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. ज्या आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीतून एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेवर निवडून आलेल्या माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांना उभे केले होते त्याच मिलिंद देवरा यांचे तीर्थरूप मुरली देवरा तब्बल बावीस वर्षे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष राहिलेले यांना महापौर बनविले ते बाळासाहेब ठाकरे यांनीच...! १३ ऑगस्ट १९६० रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्याने भल्या भल्यांना वठणीवर आणणाऱ्या मार्मिक या जागतिक कीर्तीच्या पहिल्या मराठी व्यंगचित्र साप्ताहिकाचे प्रकाशन मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते झाले होते. पहिल्या महिला मराठी राष्ट्रपती काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील, कॉंग्रेसचेच प्रणव मुखर्जी यांनाही राष्ट्रपती पदासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. या दोन्ही वेळा शिवसेना ही भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत होती. डॉ . ए. पी. जे. अब्दुल कलाम हे राष्ट्रपती आणि अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना डॉ. मनोहर जोशी हे लोकसभेचे अध्यक्ष होते आणि याच काळात संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे चित्रकर्ती सौ. चंद्रकला कुमार कदम यांनी तयार केलेलं भव्य तैलचित्र लावण्यात आलं. या अभूतपूर्व ऐतिहासिक कार्यक्रमाच्यावेळी 'राम' म्हणून ओळखण्यात येणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी यांचे 'लक्ष्मण' श्री. प्रमोद महाजन हे कां उपस्थित नव्हते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सुपूत्र विश्वासराव सावरकर आणि त्यांच्या सहधर्मचारिणीना कशा परिस्थिती मध्ये दिल्लीत नेण्यात आले याचा साद्यंत वृत्तांत ज्येष्ठ पत्रकार, शिवसेनाप्रमुखांच्या सान्निध्यात प्रारंभापासून असलेल्या ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याकडून जाणून घ्यावा. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सहकारी असलेल्या शिवसेनेशी युती २४ सप्टेंबर २०१४ रोजी एकनाथ खडसे यांनी कुणाच्या सांगण्यावरून तोडली हेही जाणून घ्या आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र लढले. पण शरद पवार यांच्या अदृष्य हातांनी देवेंद्र फडणवीस यांचं अल्पमतातलं सरकार वाचवल्यानंतर २२ वर्षात जेवढी बदनामी सहन करावी लागली नाही तेवढी बदनामी १२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४ या २२ दिवसांत सहन करावी लागली, असे सांगून धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील यांना मातोश्रीच्या दरवाजावर पाठविण्याचे काम करीत आणि उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळवून २०१९ पर्यंत पाच वर्षे निर्धोक सत्ता देवेंद्र फडणवीस यांनी राबविली. ५ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी विरोधीपक्षनेते असलेले एकनाथ संभाजी शिंदे उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिल्याने सायंकाळी मंत्री झाले. २०१९ ला राजकीय समीकरणे बदलली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केवळ उद्धव ठाकरे यांना विरोध करण्यासाठी आपल्या इंजिनाची दिशा फिरती ठेवली मग कधी भारताच्या राजकीय क्षीतिजावरुन मोदी शाह यांना हद्दपार करण्यासाठी राज गर्जना झली तर कधी हिंदुत्ववादी शाल पांघरून नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर जाऊन महायुतीची सहानुभूती मिळविली. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी ज्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी मातोश्री कुंदाताई उर्फ मधुवंती ठाकरे यांच्या सह राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहिले त्याच राज ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर पडल्याचे विस्मरण होत यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा 'खरा गद्दार' असा केलेला उद्धार मातोश्री कुंदाताईंसह तमाम मराठी आणि हिंदूंना घायाळ करुन गेला. आज उद्धव आणि राज ठाकरे या दोघांनी समोरचा गारदी ओळखून हातात हात घालून, खांद्याला खांदा मिळवून, तंगड्यात तंगड्या न घालता शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक यांना सोबत घेत महाराष्ट्र धुंडाळून काढण्याची गरज आहे, काळाची मागणी आहे, मराठी माणूस, हिंदू बांधव वाट पहातोय. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज विजयी उमेवारापेक्षा जास्त होते याचे ठसठशीत उदाहरण ठाणे विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या राजन विचारे शिवसेना आणि अविनाश जाधव मनसे यांच्या मतांची बेरीज संजय केळकर यांच्या मतांपेक्षा जास्त दिसून येते. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होतो. हे टाळण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. बेगडी हिंदुत्ववादी राजकारण्यांचा बुरखा टराटरा फाडून, राजकीय पर्यटन करणाऱ्या वाचाळवीरांना खड्यासारखे बाजूला टाकून पुनश्च हरी ओम करीत उभे रहा, ठाकरे बंधूंनी एकमेकांना साद घालण्याची, टाळी देण्यासाठी कोण पुढाकार घेईल याची वाट न पाहता मातोश्री ते शिवतीर्थ हे अंतर तोडून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील त्यांच्या पायाशी विसावलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर त्यांच्या आवडत्या चाफ्याच्या फुलांचा वर्षाव करीत चांदा ते बांदा कूच करावी. आई तुळजाभवानीचे आणि आई एकवीरेचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. उचला तो बेल भंडार आणि चला जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी. बांधावरच्या शेतकऱ्यापासून तर चक्र चालवणाऱ्या मजूरापर्यंत आणि दीन दलित, दुबळ्या, रंजलेल्या, गांजलेल्या समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत, आदिवासी, महिला सर्वांना तुमची आस आहे, सर्वांना तुमच्यावर विश्वास आहे तो सार्थ ठरविण्यासाठीची हीच योग्य वेळ आहे. मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी सेनापती बापट म्हणाले होते,
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले|
महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले|
खरा वीर वैरी पराधीनतेचा |
महाराष्ट्र आधार हा भारताचा |'
हेच लक्षात ठेवून करु या वाटचाल. जय महाराष्ट्र !
No comments:
Post a Comment