Saturday, 10 May 2025

मनसेची धरसोडवृत्ती...!

टिळा टोपी घालुनि माळा, म्हणती आम्ही साधु
दयाधर्म चित्तीं नाहीं । ते जाणावे भोंदु
पर्याय नाही असं दर्शवलं जातंय. पण आघाडीत जायची गरज वंचित किंवा मनसेला खरोखरच आहे? त्यातून फायदा कुणाचा होणार? याचं उत्तर अखिलेश यादव नीट देऊ शकतात! एकदा त्यांनी काँग्रेसशी आघाडी करून तोंड पोळून घेतलं, नंतर ताक फुंकून पीत मायावतींशी आघाडी करून आगीतून फुफाट्यात. तेच तेजस्वी यादवचं आणि चंद्राबाबूंचं! अशा स्थितीत वंचित आणि मनसे यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणं श्रेयस्कर. मतदारांना दोन नवे विकल्प मिळतील. निवडणुका चौरंगी, पंचरंगी झाल्या तरी बेहत्तर, पण या पक्षांना त्यांच्या विस्ताराची शक्यता तर निश्चित तपासता येईल.
*राज्यातील ५०-६० मतदार संघावर प्रभाव*
गेल्या दहा-बारा वर्षांत वेगवेगळ्या निवडणुकीत मनसेचा थोडाफार प्रभाव सुमारे पन्नास-साठ मतदारसंघांत पडलेला आहे. तिथंच त्यांनी लक्ष केंद्रीत करायचं ठरविलंय. लोकसभा निवडणुकीत आघाडीत मनसेला घ्यायला काँग्रेसनं विरोध केला होता. ते प्रामुख्यानं मुंबईतल्या उत्तरप्रदेशी नेतृत्वानं. मात्र, राज ठाकरे यांच्यासारखा प्रभावी वक्ता त्यांना आता प्रचारासाठी हवाय. केंद्रातील सत्ता निश्‍चित झालीय. विधानसभेच्या निवडणुकीचा फड रंगू लागलाय. लोकसभा निवडणुकीतच अनेकांनी विधानसभेचे मतदारसंघ बांधण्यास सुरवात केलीय. लोकसभेला पाठिंबा म्हणजे विधानसभेला पाठिंबा आहे, असे नाही, विधानसभेचे त्यावेळी ठरविण्यात येईल, असे राज ठाकरे यांनी पहिल्याच भाषणात स्पष्ट केलं होतं. मनसेची विधानसभेची तयारी सुरू झालीय. संघटनात्मक बांधणी भक्कम केल्यास आणि चांगले स्थानिक उमेदवार रिंगणात उतरविल्यास, मनसेला यश मिळेलही.
*विरोधीपक्षांची भूमिका बजावता येईल*
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विरोधीपक्षाची पोकळी जाणवतेय. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात लढण्याची उमेद राहिलेली दिसत नाही. अशावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे या दोघांचं नेतृत्व राज्यात सध्या रिकामी असलेली विरोधी पक्षाची जागा त्यांच्या पक्षांना मिळवून देऊ शकतात. या दोन्ही नेतृत्वांचा पूर्वेतिहास, राजकीय वैचारिक वारसा आणि स्वभाव पाहता, ते म्हणणार की, विरोधी पक्षासाठी निवडणूक होत नाही. सत्ताधारी होण्यासाठीच निवडणूक लढवली जाते. त्यात यशस्वी झालो नाही तर विरोधी पक्षाची भूमिका निभवावी लागते. लोकसभा निवडणुकीत वाढलेल्या मतांनी जरी एकच जागा मिळाली असली तरी वंचित बहुजन आघाडी राजकीय चर्चेच्या मुख्यस्थानी आलीय. त्यांच्यावर भाजपची ‘बी टीम’ असा आरोप केला जातो. गंमत म्हणजे विरोधी पक्ष म्हणून शून्य कामगिरी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पराभवाचं खापर वंचित बहुजन आघाडीवर फोडत ‘बी टीम’चा सिद्धान्त अनेकांनी अधोरेखित केलाय. योगायोग पहा २००९ साली असाच आरोप मनसेवर त्यावेळी पराभूत झालेल्या युतीनं केला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं की, ‘मग २००४ साली का हरले हे, तेव्हा मनसे नव्हती!’ तेच आता आंबेडकर विचारताहेत की,“२०१४ साली वंचित नव्हती, तरी का पराभूत झाले?" याचा अर्थ वंचित व मनसे यांच्याकडे आज काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा जनतेसमोर जाण्यासाठी आजच्या घडीला आवश्यक ते राजकीय चरित्र व चारित्र्य आहे. आणि त्यामुळेच हे दोन्ही पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे मित्रपक्ष म्हणून आघाडीत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत, तशा वावड्या उठत आहेत किंवा आघाडीला
चौकट.....*फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घ्यावी*
महाराष्ट्रात सगळ्याच पक्षात मुख्य पदावर अनेक वर्षे ठराविक नेते जागा अडवून बसले आहेत. त्यामुळे दुसरी फळी संधीच्या अभावी निराश आहेत. त्यांना जाणीवपूर्वक मनसेत आणले पाहिजे. त्यांना कामाची संधी दिली पाहिजे. राज ठाकरे यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार मांडले पाहिजेत. त्यामुळे बहुजन तरुणांना एक आशावादी नेतृत्व मिळेल. मुस्लिम तरुणांनासुद्धा काही विधायक कार्यक्रम मनसेनं दिला पाहिजे. सुशिक्षित मुस्लिम युवकांसाठी मनसे हा योग्य पर्याय ठरू शकतो. फक्त मनसेच्या झेंडयात निळा, हिरवा रंग असून चालणार नाही. त्या वर्गाला योग्य संदेश गेला पाहिजे. एक राज्यव्यापी अधिवेशन घेऊन नव्याने भूमिका मांडली पाहिजे. राज ठाकरे यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा भरारी घेतली पाहिजे, असं आज महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना वाटतंय. महाराष्ट्राचे हित जपणारा पहिला प्रादेशिक नेता सत्तेत यावा असं शहरी आणि ग्रामीण जनतेला वाटतंय. मोदी-शाह यांच्या समोर देशातील सगळेच नेते शेपूट घालून बसले असताना राज ठाकरे यांनी सडेतोड भूमिका घेतली ती प्रत्येक मराठी माणसाला भावून गेलीय. महाराष्ट्र वाट बघतो आहे, एका नवीन दमदार नेतृत्वाची, मराठी हितासाठी सर्वसमावेशक स्वच्छ भूमिका मांडणारा. जरी चूक झाली तर दुरुस्त करणारा. आडपडदा न ठेवता पडद्यावर जाहीर पोलखोल करणारा, त्या राज ठाकरे यांची नव्याने वाट पाहतो आहे.
राज यांच्या शिवसेना त्यागानंतरची त्यांची आणि त्यांच्या मनसेची वाटचाल प्रारंभी अतिशय आक्रमक झाली. तेरा आमदार, लोकसभेत चांगली मते, अनेक महापालिकांमध्ये नगरसेवक, नाशिक महापालिकेत सत्ता अशी स्थिती २००९ ते २०१२ मध्ये होती. काँग्रेस विरोधी वातावरण, आक्रमक, शैलीची तरुणांची संघटना याचा फायदा मनसेला झाला. संघटनात्मक बांधणीत मात्र राज ठाकरे कमी पडल्याचं दिसलं. मोदी काँग्रेस विरोधी वातावरणाचा लाभ उठवित विकासाचा नारा देत सत्तेवरही आले. २०१४ मध्ये राज ठाकरे यांनी मोदी यांना पाठिंबा देताना सहा मतदारसंघात निवडणूक लढविली. मात्र, तोपर्यंत मतांचं ध्रुवीकरण झालं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध शिवसेना-भाजप युती या लढाईत मनसेला स्थान मिळालं नाही. त्यावेळी मनसे युतीत सहभागी होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, विधानसभेला चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले. आघाडी विरोधाचा फायदा, तसेच मोदी लाट यामुळं भाजप सर्वांत मोठा पक्ष बनला. पुढे दुसऱ्या क्रमांकावर असलेली शिवसेनाही त्यांना मिळाली. लोकसभेपाठोपाठ झालेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही मनसेचा धुव्वा उडाला. मनसेचा केवळ एकच आमदार निवडून आला, नंतर तोही पक्ष सोडून गेला. महापालिका निवडणुकांमध्ये चार नगरसेवकांचा प्रभाग ही कल्पना भाजपनं अंमलात आणली, आणि त्यात भाजपनं सर्वांधिक, तर त्या पाठोपाठ शिवसेनेनं अनेक महापालिकांत यश मिळविलं. मनसेचे नगरसेवक अगदी बोटावर मोजण्याएवढेच आले. भाजपनं गेल्या पांच वर्षांत शिवसेनेलाच सत्तेत फारसा वाटा दिला नाही, त्यामुळे मनसेनं दिलेल्या पाठिंब्याचा विचारही त्यांनी केला नाही. मनसे हळूहळू आकसत गेली. युतीतील वाद, देशातील राजकीय वातावरण याचा फायदा घेत मनसे पुन्हा आक्रमक भूमिका निभावण्याच्या तयारीला लागली. मोदी लाटेत भाजपचे १२२ आमदार, तर शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले. काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार निवडून आले. युती आणि आघाडीच्या लढतीत गेल्या वेळच्या चौरंगी लढती आता दुरंगी होतील. लोकसभा निवडणुकीचे पडसाद त्यावर पडतील. युतीच्या आमदारांची संख्या घटण्याची शक्‍यता दिसत नाही. आघाडीला सत्तेपर्यंत पोहोचण्यास अंतर्गत वाद अडचणीचे ठरतील. त्यांना विरोधीपक्षाचा दर्जा तरी राखता येईल का? अशी स्थिती निर्माण झालीय. या परिस्थितीत निर्माण होणारी विरोधीपक्षांची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न मनसे करील. कोणाला बहुमत न मिळाल्यास आणि मनसेला काही जागा मिळाल्यास, त्यांना राज्याच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होईल. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे यांची वाटचाल सुरू झालीय!




तुका म्हणे
टिळा टोपी घालुनि माळा, म्हणती आम्ही साधु
दयाधर्म चित्तीं नाहीं । ते जाणावे भोंदु




तो परत येतोय -
माईक आणि भोंगा घेऊन- सुपारी वाजवयाला
तो परत येतोय-आजोबानी सांगितलेला इतिहास सोडुन पेठेतला इतिहास सांगायला
तो परत येतोय -
मूळ प्रश्न सोडून जनहिताचे मुद्दे भरकटवायाला
तो परत येतोय - हिंदू मुस्लिम करायला
तो परत येतोय - शून्य जागा लढवून बोगस सभा घ्यायला

एक ठाकरे जागा देणारा,
तर एक ठाकरे दिल्लीत जाऊन जागा मागणारा!!
"ऐसे कैसे झाले भोंदू / कर्म करूनि म्हणती साधु //
अंगा लावूनिया राख / डोळे झाकून करती पाप //
दावूनि वैराग्याची कळा / भोगी विषयाचा सोहळा //
तुका म्हणे सांगू किती / जळॊ तयाची संगती //"

तुकाराम

No comments:

Post a Comment

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...