Saturday, 10 May 2025

महाराष्ट्र मातला तुम्हा कारणे...!

"आज महाराष्ट्र धर्म ही संकल्पना जात-पात, धर्म-पंथ, गरीब-श्रीमंत यांच्यापलीकडे जाणारी आणि सर्वस्तरावरच्या समानतेशी संबंधित आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत महाराष्ट्राची जी प्रगती झाली ती या भावनेनं काम केल्यानं झाली, कारण हा धर्म हीच इथली प्रकृती आहे. या प्रकृतीची मशागत करण्याचं काम फुले-शाहू-आंबेडकरांनी केलं. त्याहीपूर्वी महाराष्ट्र धर्माचा आविष्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जनतेला अनुभवता आला. एकेकाळी महाराष्ट्र धर्म वाढला होता. आता तो खुरटा झालाय. त्याची कारणं अनेक आहेत, उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये हे वाक्य पुराणकथांनी जोडलं गेलं. तो वसा टाकला तरी काहीच होत नाही. मात्र, यातून खऱ्या प्रगतीचा, कल्याणाचा वसा टाकला की काय होतं... आजचं वर्तमान भोगाला आलं आहे ते यामुळंच !"
-------------------------------------------
आजचा महाराष्ट्र देश म्हणजे मूलनिवासी आणि आक्रमकांची संस्कृती स्वतंत्रपणे संकरानं वाढली ती माती! या देशात आणखी काही देश आहेत द्रविडाचं नेतृत्व करून आर्यावतांना रोखण्याची क्षमता या महाराष्ट्रात होती. या भूमीनं अनेक शांत, अशांत नरसिंहाना जन्म दिलाय, प्रत्येक पन्नास वर्षांनंतर या भूमीला एक नेता लाभलाय. महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं कर्तृत्व प्रत्येक पन्नास वर्षानंतर फुललं हा वारसा चालविण्याचा प्रयत्न यशवंतराव चव्हाणांनी समर्थपणे चालवला. पण तो तोकडा ठरला, मात्र त्याच काळात सह्याद्रीला पोखरण्याचं कृष्णा, गोदावरी, वैनगंगा, नर्मदेचा प्रवाह आटवण्याचं काम झालं. विदर्भ, देवगिरी, देश, कोकण, तळकोकण हे भेदाभेद तीव्र झाले. महाराष्ट्र धर्माला कुंठित करण्याचं काम बाहेरच्या शक्तीपेक्षा इथूनच झालं, टेकड्यांना पर्वत आणि ओढ्या-नाल्यांना महानदीची उपमा देण्याची भाषा निव्वळ लांगूलचालन करणाऱ्याच्या तोंडी राहिलेली नाही. तर संपूर्ण समाजाचीही तीच मानसिकता बनलीय. ही समयबधिरता कुणा एकामुळे आणि एकाएकी आलेली जराही नाही. फार नाही, अगदी दहा वर्षांपूर्वी देशात पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचा निर्देशांक दिवसेंदिवस घसरण्याचं अपश्रेय या सर्वांमुळे, महाराष्ट्र धर्म मातला आहे तो या कारणाने!
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६५ वर्षे होऊन गेली आहेत. एक भाषिक पण भिन्न प्रवृत्तीच्या या प्रदेशाचा व्याप मोठा आहे. हे राज्य स्थापन होताना समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं. महाराष्ट्रातल्या मुंबईचा विकास भौगालिक आणि ऐतिहासिक कारणांमुळेच झाला आहे. ते श्रेय देशी राजकर्त्यांचं नाही. मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्रही आम्ही प्रगतीवर नेला, असा सर्वच पक्षांच्या राज्यकर्त्यांचा दावा आहे, तो खोटा आहे. मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्याचा औद्योगिक परिसर नाशिक, औरंगाबाद यांचा औद्योगिक विकास झालाय खरं. पण कोल्हापूर, नागपूरचं शहरीकरण वेगानं झालं, हेही सत्यच आहे मात्र, ही शहरं सोडली आणि कायदा सुव्यवस्थेचा एवढा एक मुद्दा सोडला, तर महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांची विकासाबाबतची अवस्था विशाल उत्तरप्रदेशापेक्षा फारशी चांगली नाही. देशाबरोबरच राज्याची लोकसंख्या तिपटीनं वाढलीय. केरळ, हिमाचल प्रदेशसारख्या राज्यात एवढी वाढ नाही. ७० वर्षांपूर्वी नागरी लोकसंख्येचं प्रमाण २८ टक्के होतं. आता ते ६२ टक्के झालंय. नागरीकरणाचा वेग हा आधुनिकीकरणाचा भाग म्हणून मिरवण्याचा असला तरी तो खऱ्या विकासाचा मानक नाही. कारण कोणतेही शहर स्वयंपूर्ण नाही. स्वयंपूर्ण खेड्याचं शोषण करून, त्याला उदध्वस्त करुन शहर उभी राहिली आहेत. १९६२ मध्ये आपल्याकडे ६ हजार ८७८ कारखाने होते, आता त्यात तिपटीनं वाढ झालीय. मात्र तिपटीच्या लोकसंख्येला पुरेल एवढा रोजगार देण्याची क्षमता या कारखान्यांमध्ये नाही, मुख्यतः अनुदानावरच जगणारी कारखानदारी आता मरणपंथावर लुळी होऊन पडलीय. पूर्वी राज्याचा शेती उत्पादनातला वाटा ३६ टक्के होता. १६ टक्के सिंचन वाढलं. लागवडीचं क्षेत्र ३२ लाख हेक्टरांनी वाढलं, तरीही राज्याच्या उत्पादनातल्या शेतीचा वाटा २५ टक्केच आहे. ऊसाच्या शेतीवर मोठी प्रगती केल्याचा दावा राज्यकर्ते आणि साखर सम्राट करत असतात. ऊसाच्या क्षेत्रफळाचीच वाढ झालीय. ऊसाची उंची आणि त्यातली साखर काही वाढतच नाही सरकारी नोकऱ्यांचा पगार २५ हजार रुपयांपासून ७५ हजार रुपयांपर्यंत वाढला, मात्र, शेतमजुराचा पगार अजून पाच हजार रुपयेच आहे, बौध्दिक संपदेचा ताठा एवढी असमानता कशी काय जन्माला घालतो? राज्यात एकेकाळी लोकांना खायला भाकरी नव्हती. अमेरिकेतल्या डुकरांचं खाद्य असणारा मिलो खाऊन लोक जगले. १९६० च्या दरम्यान राज्याचं एकूण उत्पन्न १ हजार ७०३ कोटी रुपये होतं, अशावेळी आपण बाजारमूल्यानुसार कोयना, जायकवाडी यातसारखे एक लाख कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प उभं केले. विष्णुपुरी ताकारी या योजनांद्वारे वळचणीचं पाणी आढ्याला नेलं. शेकडो साखर कारखान्यांना भागभांडवल दिलं. आज राज्याचे उत्पन्न लाखो कोटी रुपयाचं असताना धरणग्रस्तांना आपल्या मागणीसाठी महिना-महिना मंत्रालयासमोर कुडकुडत बसावं लागतं. कारखान्याचं कर्ज भरलं नाही म्हणून मंत्रालय जप्त होण्याची नामुष्की सहन करावी लागते.
राज्याच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याला महाराष्ट्र हे पुन्हा एकदा देशातलं आघाडीचं राज्य बनवू...! असं म्हणण्याची उबळ येते ती दपोंक्ती असते. मुख्यमंत्र्यांना खात्री करायची असेल, तर त्यांनी त्यांच्या अखत्यारीतल्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडे येणारे देश आणि जागतिक पातळीवरचं टपाल चाळावं याच संचालनालयाच्या महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालात देशात महाराष्ट्र कुठे आणि महाराष्ट्रात कोण कुठे याची इत्यंभूत माहिती मिळते. हा अहवाल प्रमाण मानायचा झाला तर नरीमन पॉइंट परिसर, विधानभवन मंत्रालय, वाळकेश्र्वरचे बंगले आणि राजभवन सोडलं, तर आबादी आबाद म्हणावं असं कुठंच कांही नाही. 
एकेकाळी उद्योगातल्या दरडोई मूल्यवृद्धीत महाराष्ट्र राज्य सर्वात आघाडीवर होतं. आता हा क्रमांक गुजरातकडे जातो. ऊर्जा क्षेत्रात आपण एकेकाळी सर्वांत पुढे होतो जाता मुंबई वगळता राज्यात कमीत कमी चार तास आणि जास्तीत जास्त बारा तास वीज जाते. पंजाबसारख्या राज्यात ही स्थिती नाही. तिथं औद्योगिक वापराचं प्रमाण आपल्यापेक्षा दीडपट जास्त आहे. केरळसारख्या राज्यात दर शंभर चौरस किलोमीटरला ३५५ कि.मीचे रस्ते आहेत. आपल्या इथे हे प्रमाण १७५ कि.मी आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जाताना आपलं राज्य सुंदर वाटतं. राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गाची आणि त्या भोवतीची अवस्था अपवाद वगळता डोळ्यांना सुंदर वाटणारी नाही. महाराष्ट्राची संस्कृती कृषी औद्योगिक असेल, असं स्वप्न पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाणांनी पाहिलं होतं. कृषिपूरक कारखाने ही मंदिरं असतील, असं सांगितलं होतं. अनेक वर्ष ही बाब अभिमानानं सांगितली जात होती. परंतु धान्योत्पादनाच्या बाबतीत आपण पंजाबपेक्षा आठपट मागे आहोत. दर एकरी धान्योत्पादनात आपण पंजाबपेक्षा तिप्पट मागे आहोत, म्हणायचं तर आपलं दरडोई उत्पन्न चांगलं म्हणजे २२ हजार ६०४ रुपये आहे. मात्र ते पंजाबपेक्षा कमीच आहे. रेल्वे आणि महामार्ग यांचं विकासाच्या प्रक्रियेत मोठ्ठं स्थान आहे. मात्र, महाराष्ट्राच्या वाट्याला मुंबईला जोडणारे महामार्ग आहेत त्यात महाराष्ट्राच्या हिताचा विचार नाही. रेल्वे मुंबईची लाइफलाइन आहे. तशीच ती उत्तर प्रदेश आणि बिहारची आहे. महाराष्ट्राची अवस्था तशी नाही कोकण रेल्वेचा अपवाद वगळला तर गेल्या ७० वर्षात फक्त काही शे किलामीटरचाच नवा मार्ग बांधला गेलाय. ब्रिटिशांपेक्षा भारतीय राज्यकर्ते मोठे वाटत नाहीत त्यामुळेच विकास-प्रगतीच्या क्षेत्रात कशी अवस्था आहे. हे अनेक स्तरावर दिसतं, सांस्कृतिक सुदृढता असेल, तर त्यातून तयार होणाऱ्या अनेक क्षेत्रांतल्या व्यक्तिमत्त्वाच्या भरवशावर विकास आणि प्रगतीच्या क्षेत्रात सहजी लांबचा टप्पा गाठणं अवघड नसतं. मात्र, अनेक वर्ष संस्कृतीचा रांजण फक्त आपल्यासाठीच आहे तो रांजण भरणारी कावड वागवणारा, पखाली वाहणाऱ्या रेड्यापेक्षा निराळा नाही. असाच समज करून वर्तन केलं गेलं. परिणामी सांस्कृतिक व्यवहार तोकडा राहिला त्या तुकडेपणामुळे नोबेल सोडाच, सांस्कृतिक मुखंडांनी देशपातळीवर साहित्यिकाच्या क्षेत्रात जो ज्ञानपीठ'चा भोजा उभा केला आहे. तो मराठीतल्या तिघांनाच शिवता आला. कारण मराठी साहित्य बावनखणी, दिवाणदेवडी, माजघर असंच उंबरठ्याच्या आत वावरणार आहे. राकट, कणखर देशाचं अंतरंग साहित्यात अपवादानेच उमटलं आहे. जे साहित्य, ती भाषा बोलणाऱ्या सर्वांचं नसतं. तेव्हा ते त्या समाजाचे होत नाही. कन्नड, उडिया भाषेतल्या डझनभर लेखकांना ज्ञानपीठला शिवता आलं. कर्नाटक, ओरिसासारख्या लौकिकार्थाने मागास राज्यांनी या क्षेत्रात आपल्यावर मात करावी, यातच सांस्कृतिक व्यवहार आजही कोणते घाल मोठे दादा करतात ते लक्षात घ्यावं. पन्नास वर्षानंतर श्वास' या चित्रपटाला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळालं त्यावेळी मराठी जनमानस उचंबळून आलं, कारण असं यश आता दुर्मीळ झालं आहे. नाटक, संगीताच्या क्षेत्रात मंगेशकर, आमोणकर, अत्रे ही आपली मोठी झाडं आहेत. ही झाडंही अशी आहेत की त्यांनी आपल्याभोवती काही उगवूच दिले नाही. इथे एखादा अल्लारखॉ, मन्सूर अली, बिस्मिल्ला खान जन्माला आलाच नाही मग संस्कृत पर्वाची, अभिव्यक्ती सर्वांसाठी असं कसं म्हणावं? तीच गोष्ट क्रीडा क्षेत्राची आहे. या क्षेत्रात भारताला आता किंमत नाही आणि भारतात महाराष्ट्राचे तेवढं मूल्य राहिलेलं नाही खाशाबा जाधव यांचं नाव आणखी बरेच दिवस घ्यावं लागणार असे दिसतं. कारण नव्या खाशाबा जाधवांना तयार केलं जात नाही. त्याचा शोध घेतला जात नाही. हरणाबरोबर धावणारे जंगलातच अनवाणी कंदमुळाच्या शोधात फिरत आहेत. आपल्या शरीराच्या वजनाच्या दुप्पट वजन उचलणारे हमाल माथाडी झाले आहेत. असलं पर्यावरण राज्याला कुठं नेणार आहे. आणि कोणता महाराष्ट्र धर्म जागवणार आहे? महाराष्ट्र धर्म मातला आहे तो अशा प्रदूषणांमुळेच! न्या. महादेव गोविंद रानडे, वि. का. राजवाडे यांनी महाराष्ट्र धर्माच्या कल्पनेची रॉयल्टी रामदास स्वामीच्या नाव जमा केली आहे. प्रत्यक्षात १३ व्या शतकातील महिकावतीच्या मुंबईच्या बखरीतच महाराष्ट्र धर्माची चर्चा झालेली आहे. काही अतिशहाणे आपल्या जातीच्या प्रतीकाचा ताठा मिरविण्यासाठीच महाराष्ट्र धर्माच्या निरुपणाचा हक्क आपल्याकडे असल्याचं सांगतात (पान १० वर) काही प्रवृत्ती ह्या महाराष्ट्र धर्म म्हणजे इस्लामच्या विरोधात उभे राहिलेल्यांचा धर्म अशीही शाहिरी करतात. इथला स्वाभिमान लुळा करण्यासाठी काहीजण महाराष्ट्र धर्म म्हणजे भक्तीची परिणिती असल्याचं सांगतात. ही सारी बनवेगिरी आहे. महाराष्ट्र धर्माचा खरा अर्थ आमच्या मराठी जनमानसांच्या अंतरंगात सांपडतो. इथल्या लोकांचं सहजीवन, स्वाभिमान, देशहिताचा भावना आणि या सर्वांच्या कार्यशैलीचा आराखडा म्हणजे महाराष्ट्र धर्म आहे. हा धर्म कोणत्या मंदिराच्या गाभाऱ्यात कोंडता येणारा नाही. चर्चच्या भिंतींवर टांगता येणार नाही. आणि प्रार्थनास्थळात कितीही गुडघे टेकले तरी धुंडाळता न येणारा आहे. महाराष्ट्र धर्म आज मराठी भाषकांचा धर्म मानला जात असला तरी त्याच्या मिश्रणात तेलुगू, कानडी माती आहे. हा धर्म चालुक्याला कळला होता. राष्ट्रकुटांनाही उमगला होता. कदंब, शिलाहार, सातवाहन, यादवांना देखील समजला होता. मराठी जातींबरोबरच जे स्वतः ला व्यवसायाच्या जातीत बांधून घेत होते. अशा जातींच्या मराठ्यांकडे वारसा आहे. तो यात राज्यकर्त्यांचा. पण आपण कोण आहोत? या भूमिशी आपलं नातं काय आहे? यांचं भान इथं बाहेरून जगायला आलेल्या समाजघटका व्यतिरिक्त कुणाकडेही नाही. महाराष्ट्राची अवस्था झाली आहे ती यामुळेच!
सरकार नावाचा प्राणी अजगरासारखा असतो. एखाद्याची शिकार करायची अन् सुस्तपणे ती चघळत पडायचं. पुन्हा जेव्हा कधी भूक लागेल तेव्हाच हालचाल करायची. अशीच सरकारची कार्यपद्धती असते. सरकारचं असं असेल तर त्या व्यवस्थेला चटावलेले कोल्हे- लांडगे कसे वागत असतील हे सांगायला नको. देवगिरीपासून विजयनगरपर्यंत अनेकांना राम राम करत नोकरशाहीने आजच्यापेक्षा काही मोठं काम केल्याचं शिवकाल वगळता सलग असं उदाहरण नाही. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत महाराष्ट्राचा गाडा पुढं नेण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची होतीच, परंतु तेवढीच जबाबदारी विष्णुगुप्तांच्या वारसदारांची, मॅक्सवेकरच्या नातवांची आणि मेकॉलेच्या पुत्रांची होती. ती त्यांनी पाळली नाही. नोकरशाहीचे भारतीय प्रतिरूप तर मनुस्मृतीच्या आधारावर विकसित झालं आहे. आधी दुसऱ्याला नागवणे नंतर आपण जगणे आणि जमलंच तर दुसऱ्याला जगवणे ही नोकरशाहीची खासियत आहे. ही प्रवृत्ती आता एकाच जातीपुरती मर्यादित राहिलेली नाही. नोकरशाहीत गेलेल्या कोणत्याही वर्णजातीतला सदस्य अपवाद वगळता असंच पूर्वंपार वर्तन करत असतो. आजच नव्हे तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचं नेतृत्व आणि नेतृत्वाचा कणा हा उच्च जातीच राहिल्या आहेत. द्विभाषिक महाराष्ट्र असो की, संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या नोकरशाहीचा आत्मा हाच समाज होता. एवढंच काय बाळासाहेब खेर यांच्यानंतर पन्नास वर्षांनी मनोहर जोशी आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं महाराष्ट्र सरकार आणि शासन हे एकाच समाजाकडे गेलंय. या समाजाची अन्य वैगुण्यस्थळं दाखविण्याचा इथं हेतू नाही. मात्र, आजच्या नोकरशाहीचं आज जे दिसतं ते प्रतिरूप रुजविण्याचं श्रेय याच समाजाकडे जातं. अडाणी ऱ्हस्व दृष्टीचे राज्यकर्ते असले की, राज्य शकट हाकणाऱ्या शासकांचं फावते. किंबहुना जाणीवपूर्वक अशा नेतृत्वाची पैदास केली जाते. जेणेकरून मुठभरांचं राज्य राहावं, त्यांचे पाहुणे रावळे पोसले जातील. महाराष्ट्राबाबत असंच झालं आहे. खुद्द यशवंतराव चव्हाणही हा कावा भेदू शकले नाहीत. तिथे परावलंबी वसंतराव नाईक, रांगड्या वसंतदादा पाटील यांना आणि विचारांपेक्षा व्यवहाराला जास्त मानत असलेल्या शरद पवारांनाही तो कसा कळला असता? कळला जरी असता तरी अंमलबजावणी करण्याची हिंमत त्यांनी दाखवलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनुभवावरून त्या प्रश्नांची जाण नाही असंच आहे.
हे राज्य म्हणजे आपली मिरासदारी आहे. आजन्म राज्य करण्यासाठीच आमचा जन्म झालाय, अशी त्यांची पक्की समजूत आहे. आज लोकशाही असली तरी हीच राजे आहोत हा दंभ त्यांच्यातला सुंभ जळाला तरी पीळ कायम आहे. संस्थानं आधीच खालसा झालीत. मात्र गावोगावच्या मूठभर पाटलांना चिमूटभर देशमुखांना अन् नखभर राजा-महाराजांना, सात बारा वरील वारसांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरावंस वाटतं ते शीर्षस्थ होण्याच्या भावनेनं. राजकीय शिक्षण नाही, राजकारणातही नाहीच नाही. गेल्या काही वर्षांपासून अर्थशास्त्र कळणारा अर्थमंत्रीच लाभलेला नाही. हे खातं चांगलं मालदार आहे म्हणून त्याला प्रतिष्ठा आहे. रामराव आदिक, एकनाथ खडसे, महादेव शिवणकर, जयंत पाटील, सुनील तटकरे, सुधीर मुनगंटीवार, अजित पवार ही नावं काही अर्थशास्त्राशी संबंधित नाहीत. अशा अनेक वेगवेगळ्या खाती सांभाळणाऱ्या प्रतिष्ठितांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगती करू शकणार? राजकारणातल्या या माणसांना मी पणाची बाधा झालेली असते. त्यामुळं ते राज्य करण्यासाठीच आखाड्यात उतरतात. उथळ पाण्याला खळखळाट अशा प्रवाहात हितसंबंधी जणांना उतरवणं फार अवघड नसतं. अंदाज उतार चढ लक्षांत घेऊन ते बरोबर उतरतात. सांस्कृतिक जीवन खुरटे, सार्वजनिक बलदंडही थिटे त्यामुळं सर्वच व्यवहार भुरट्याच्या हातात जातात. अशावेळी कुणाचं हित साधलं जातं, हे दिसतंच आहे. गाडगे महाराज, तुकडोजींच्या महाराष्ट्रात आज बापू, बाबा, दादा, नाना, अण्णा नावांच्या महाराजांचं पीक फोफावलंय. संपूर्ण समाजाला अफूची गोळी चारण्याचं काम नेटानं सुरू आहे. साक्षरतेअभावी असलेलं अज्ञान आणि दारिद्र्यातून आलेली अगतिकता आज बुवा बाबांच्या मांडवात गर्दी करताना दिसते. मेंदूला त्रासच नको म्हणून अंमली पदार्थ घेणाऱ्या चरशी आणि सत्संगाचा जाणारा समाज यात कोणता फरक समजायचा? हे थोतांड कुणाच्याच लक्षांत येत नाही, असं थोडंच आहे. एकेकाळी पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय पूजा कशासाठी करायची? अशी चर्चा झडत होती. आता ती बात सोडाच. राजभवनात शपथ घेण्यापूर्वी राज्यकर्त्यांना सिद्धिविनायकालाच आधी भेटावंस वाटतं. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आणि धर्मचिकित्सा करणाऱ्या आगरकर, सावरकरांच्या महाराष्ट्रात हे असं होत असल्याबद्दल कुठं शरमच काय खुट्टही होत नाही. आज महाराष्ट्र चाचपडताना दिसतो. त्याला राजकारण, राज्यकर्ते अपवाद नाहीत. फारच कमी उंचीची आणि वकूबाची माणसं सर्वच क्षेत्रात वावरताना दिसतात. ते क्षेत्र अद्यापनाचं असो नाहीत राजकारण्यांच्या नेतृत्वाचं. बहुजनवाद शिकविण्यासाठी कुणीतरी कांशीराम, मायावती इथं यावं अन् त्यांनी फुले, शाहू, आंबेडकर शिकवावेत. धर्मनिरपेक्षतेचं सांगावं. पाण्याचं महत्व राजेंद्रसिंहांनी सांगावं. झाडावर प्रेम करा हे सुंदरलाल बहुगुणांनी सांगावं, माहितीचा अधिकार हे स्वातंत्र्य आहे हे अरुंधती रॉय हिने सांगावं आणि अण्णा हजारेंसारखा बंदरावरचा नारळ देशात चांगल्या भावाने विकला जावा, हेच जर महाराष्ट्रात उगवलेलं पीक आहे? महाराष्ट्र धर्म एवढा का वांझ आहे? महाराष्ट्र हा जात पात धर्म पंथ गरीब श्रीमंत यांच्यापलीकडे जाणारी सर्वच स्तरावरील समानतेशी संबंधित आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्राची जी प्रगती झाली, ती या भावनेनं काम केल्यानं झाली. कारण धर्म ही इथली प्रकृती आहे आणि या प्रकृतीची मशागत करण्याचं काम फुले शाहू आंबेडकर यांनी केली. त्यापूर्वी महाराष्ट्र धर्माचा आविष्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनुभवता आला होता. लिखित इतिहास जातीचे प्रतिकं याच्या पलिकडे शिवरायांच्या प्रती लोकभावना अत्यंत आदराची आहे. ती त्यांच्या सर्वसमावेशकतेमुळेच भेदाभेद पलीकडे जातीधर्माच्या कितीतरी दूर अशी राज्यपद्धती प्रत्यक्षात येते तेव्हा ती राजवट इतिहास, भूगोलाच्या मर्यादा तोडून अनुवंशिकतेने लोकभावनेत उतरते. एकेकाळी महाराष्ट्र धर्म वाढला होता. आता तो खुरटा झालाय. त्याची कारणं अशी आहेत. ऊतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये, हे वाक्य पुराणकथांनी जोडलं होतं. तो वसा टाकला तरी काहीच होत नाही. मात्र यातून खऱ्या प्रगतीचा, कल्याणाचा वसा टाकला की काय होतं... आजच वर्तमान भोगाला आलं आहे, ते यामुळेच. म्हणूनच महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाराष्ट्र धर्माची पुनर्स्थापना, पुनरुज्जीवन व्हायला हवंय!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...