लैला कबीर यांचे निधन झाले आहे. लैला कबीर बऱ्याच काळापासून कर्करोगाने ग्रस्त असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांचे आज १५ मे रोजी निधन झाले आणि उद्या, १६ मे २०२५ रोजी नवी दिल्लीतल्या ग्रीन पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. लैला कबीर ज्या एक समर्पित सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि त्या रेड क्रॉस या स्वयंसेवी संस्थेशी बराच काळ जोडल्या गेल्या होत्या. जॉर्ज फर्नांडिस आणि लैला कबीर यांचे लग्न २२ जुलै १९७१ रोजी झाले. त्यांचे वडील हुमायून कबीर हे देशाचे पहिले शिक्षणमंत्री होते. जॉर्ज फर्नांडिस आणि लैला कबीर यांना शीन फर्नांडिस (शांतनु) नावाचा एक मुलगा आहे, जो अमेरिकेत राहतो.
जॉर्ज यांचं प्रेम
४ ऑगस्ट २००९ रोजी अलझाईमर पीडित जॉर्ज राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेत होते, तेव्हा त्यांच्याशेजारी एक महिला उभी होती. त्या होत्या लैला कबीर! जवळपास २५ वर्षांनंतर लैला जॉर्ज यांच्या जीवनात परतल्या होत्या. या त्याच लैला होत्या कधी काळी जिच्यावर जॉर्ज यांनी वेड्यासारखं प्रेम केलं होतं. १९७१ मध्ये दिल्ली ते कलकत्ता या विमान प्रवासात जॉर्ज यांची लैला यांच्याशी प्रथम भेट झाली. हा आणखी एक योगायोग होता की, दोघेही त्यावेळी सुरू असलेल्या बांगला देशात चाललेल्या युद्धाच्या वातावरणातून परतत होते. दिल्लीत पोहोचल्यानंतर जॉर्ज यांनी लैलाला तिच्या घरापर्यंत सोडण्याची तयारी दाखविली पण ती तिने नाकारली. पण 'पहलीही नजरमें प्यार हो गया' अशी दोघांची अवस्था झाली. त्यानंतर दिल्लीत ते अनेकदा एकमेकांना भेटले. एका महिन्यातच जॉर्जने लैलाला लग्नाची मागणी घातली. लिफ्ट नाकारणाऱ्या लैलानं जॉर्जना नकार देऊ शकली नाही. २२ जुलै १९७१ रोजी दोघांचा विवाह झाला. या दोघांना कालांतरानं एक मुलगा झाला त्याचं नाव शॉन फर्नांडिस! २५ जून १९७५ ला देशात आणीबाणी लागू झाली. तेव्हा जॉर्ज आणि लैला ओरिसाच्या गोपाळपूर इथं सुट्टी साठी गेले होते. तेव्हापासून जॉर्ज भूमिगत झाले. जवळ जवळ २२ महिने जॉर्ज आणि लैला यांच्याशी संपर्क राहिला नाही. दरम्यान लैला आपल्या मुलाला घेऊन अमेरिकेला निघून गेल्या. आणीबाणी संपल्यावर जॉर्जने लैलाचा शोध घेऊन अमेरिकेत संपर्क साधला आणि भारतात परतण्याची विनंती केली. पण काही गोष्टींमुळे त्या परतल्या नाहीत.
आणखी एक नवं नातं
कालौघात जॉर्ज आणि जया जेटली यांचं नातं राजकीय वर्तुळात बहरत होतं. दोघांमधलं नातं हे केवळ राजकीय सहकारीच नाही तर त्याहून अधिक काही तरी होतं. याची चर्चा लैलापर्यंत गेली तिनं तिथून जॉर्जला घटस्फोटाची कागदपत्र पाठविली, जॉर्जने मात्र त्याचं उत्तर दोन सोन्याच्या बांगडया पाठवून दिलं. लैला यांची जॉर्जच्या जीवनात परतणं देखील तेवढीच मजेशीर गोष्ट आहे. २००७ ची ही घटना आहे, दीर्घ कालावधीनंतर अचानकपणे मुलगा शॉन याची गाठ पडली. तो खूप भावनिक क्षण होता. दोघात जे काही घडलं ते खूपच कौटुंबिक होतं. याचा परिणाम असा झाला की, तब्बल २३ वर्षांनंतर जॉर्जचं प्रथमच लैलाशी फोनवर बोलणं झालं. शॉनला आपल्या वडिलांच्या आजाराबाबत इथं आल्यानंतर कळलं. लैलाचं म्हणणं असं झालं की, जॉर्जला कधी नव्हे इतकी आता त्यांची गरज आहे याची जाणीव झालीय. त्यामुळे लैला जॉर्जच्या जीवनात दुसऱ्यांदा परतली.
जॉर्ज जीवनातील टर्निंग पॉईंट
२ जानेवारी २०१० च्या दुपारी दोन वाजता लैला जॉर्जच्या घरी पोहोचते. तिच्यासोबत मुलगा शॉन आणि सूनही होती. लैला घरातल्या एका खोलीत जॉर्जसोबत स्वतःला बंद करून घेतलं. ती जेव्हा त्या खोलीतून जॉर्जसह बाहेर पडते तेव्हा जॉर्जच्या अंगठ्यावर शाई लागलेली दिसत होती. त्यानं सारेच आश्चर्यचकित होतात. याप्रमाणे जॉर्जची पॉवर ऑफ ॲटर्नी जी नोव्हेंबर २००९ मध्ये जया जेटलींचा नावे होती ती आता लैलाच्या नावे झालेली होती. हे सारं होतं जॉर्जच्या १३ कोटी रुपयांच्या संपत्तीचं! जया जेटली गप्प बसणाऱ्या नव्हत्या त्यांनी २०१० मध्ये लैलाच्या विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यात म्हटलं होतं की जयाला जॉर्ज यांना भेटू दिलं जात नाही. ज्या जॉर्जसोबत त्या तब्बल ३० वर्षे राहिल्या होत्या. २०१२ एप्रिल महिन्यात याचा निकाल दिल्ली हायकोर्टानं दिला जो जया यांच्या विरोधात होता. जया मग या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेल्या. न्या. पी. सदाशिव बेंचने हायकोर्टाचा निर्णय बदलला. त्यानंतर त्या दोघी एकत्र जॉर्ज यांच्या सोबत दिसल्या त्या जॉर्ज यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने. त्यानंतर जॉर्ज पुन्हा एकदा अज्ञातवासात गेले.
१९६७ मध्ये जॉर्ज यांनी मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स.का.पाटील यांचा पराभव केलेला होता. जॉर्जला 'द जॉइंट किलर' म्हणून ओळखले जात असे अशी एक कहाणी देखील आहे की, त्यावेळी, ३७ वर्षीय जॉर्ज देशातल्या सर्वात पात्र बॅचलरपैकी एक मानले जात. ते 'बॅचलर इलेव्हन'चा एक भाग होता ज्याने आयुष्यभर अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली होती. पण जेव्हा जॉर्ज फर्नांडिस यांनी लैला कबीरसोबतच्या साखरपुड्याची घोषणा केली तेव्हा 'बॅचलर्स इलेव्हन त्यांच्यावर रागावला. लैलाचे वडील पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात मंत्री होते तर फर्नांडिस गरीब मजुरांमध्ये राहणारा माणूस होता. त्या दोघांमध्ये एक गोष्ट समान होती, ती म्हणजे गरिबांचे दुःख आणि वेदना समजून घेणं लैलाचे शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले होते पण सेवेसाठी तिनं १५० रुपये प्रति महिना पगारावर परिचारिकेची नोकरी स्वीकारली होती. तथापि, लग्नाच्या १० वर्षातच जॉर्ज आणि लैला वेगळे झाले. यानंतरही, जॉर्ज कुठेही असला तरी, तो नेहमीच त्याच्या मुलाच्या वाढदिवसाला उपस्थित राहायचा. तो त्याच्या मुलाच्या एमबीए पदवीदान समारंभासाठी शिकागोलाही गेला होता. २००२ मध्ये जपानमध्ये झालेल्या त्यांच्या मुलाच्या लग्नालाही ते उपस्थित होते. २००९ मध्ये त्यांच्या नातवाला पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यानंतर त्यांची स्मरणशक्ती कमी होत गेली. २०१० मध्ये, जवळजवळ २५ वर्षे दूर राहिल्यानंतर लैला जॉर्जच्या आयुष्यात परतली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार, त्यांनी जया जेटलीच्या भेटी दर १५ दिवसांनी फक्त एकदाच मर्यादित केल्या. जॉर्जने त्याच्या आयुष्यातील शेवटचे दिवस लैलाच्या घरी घालवले.
No comments:
Post a Comment