२०२२ मध्ये कॉम्रेड अहिल्या रांगणेकर यांचं जन्मशताब्दी होती. ज्यांनी अहिल्या रांगणेकर यांच्यासोबत काम केलं होतं. त्यापैकी फार कमी कॉम्रेडस् शिल्लक राहिलेत. आज साम्यवादी युनियन्सची अवस्था बेरोजगार नेते अशी झालीय. पूर्वी म्हाताऱ्यांचा पक्ष म्हणून साम्यवादी टीकेचे धनी बनलेले होते. नंतरही त्यामध्ये सुधारणा झाली नव्हती. टिळकांच्या काळात जो कामगार युनियनचा सदस्य तो कम्युनिस्ट अशी ओळख बनली होती. भारतात समाजवादी विचार घेऊन विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जी चळवळ उभी राहिली होती. तिचं प्रेरणास्थानच मुळी रशियन राज्यक्रांती हे होतं.
समाजातील शिक्षित उच्चवर्णीय मुख्यतः ब्राम्हण नेत्यांनी सुरुवात केली होती. आज थोड्याफार प्रमाणात साम्यवादी पक्ष आदिवासींमध्ये कार्यरत आहे त्याला कारण आदिवासींमधील बंडखोर नेते जे आपला सांस्कृतिक वारसा वाचविण्यासाठी लढत होते. त्याला सफाईदार तांत्रिक वळण देण्याचं काम कॉम्रेडस् करीत होते. त्याचं श्रेय निर्विवादपणे साम्यवाद्यांना द्यायला हवं. पण वर म्हटल्याप्रमाणे कम्युनिस्ट चळवळीचं नेतृत्व ढुढ्ढाचार्यांकडंच राहीलं होतं. त्यामुळं तरुणांना आकर्षित करु शकले नाहीत. त्याचबरोबर अति पोथीनिष्ठताही कम्युनिस्टांना भोवली होती. पुस्तकातील सूत्रं वाचून चळवळ चालवता येत नाही. कारण माणसांना मन असते त्याला पुस्तकातला कॉम्रेड बनवायचा प्रयत्न केला तर तो विफलच होणार. साम्यवादी वर्तुळाबाहेरही काही नेत्यांनी लोकप्रियता कमावली होती. त्या नेत्यांपैकी एक अहिल्या रांगणेकर होत्या. ज्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्यास आडकाठी होती. त्या काळात मुलींना शिक्षण देणाऱ्या धाडसी पालकांमध्ये रणदिवे कुटुंबीय होते. त्याआधी शकुंतला परांजपे, दुर्गा भागवत, मालती बेडेकर या बंडखोर महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप उमटवली होती. अहिल्या रांगणेकर या साम्यवादी वर्तुळाबाहेरही लोकप्रिय असण्याचं कारण कुटुंबातील मुक्त वातावरण. त्यामुळंच त्यांना आपलं क्षेत्र निवडता आलं होतं. त्या मध्यमवर्गीय कुटुंबातील होत्या. वडील सुधारणावादी होते. त्यांचे बंधू कॉम्रेड बी. टी. रणदिवे हे साम्यवादी पक्षाचे म्होरके होते. अहिल्या रांगणेकर या शिक्षण घेत असतानाच चळवळीत सहभागी झाल्या होत्या. १९४३ साली त्या कम्युनिस्ट पक्षात सक्रिय सहभागी झाल्या. मुंबईतल्या नाविकांच्या बंडाच्या वेळी त्यांनी केलेली कामगिरीही अनेक वर्षे साहसकथेसारखी सांगितली जात होती. कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी बंडाला समर्थन दिले नव्हते. मात्र कम्युनिस्ट पक्षानं नाविकांच्या बंडाला समर्थन दिलं होतं. नाविकांच्या पाच दिवसांच्या बंडात ब्रिटीशांनी अमानूष अत्याचार केले होते. किमान चारशे जणांना गोळीबारात ठार केले होते. कॉम्रेड कमलताई दोंदे, कॉम्रेड कुसूम रणदिवे आणि अहिल्याताई पोलिसांच्या टप्प्यात आल्या होत्या. अहिल्याताईंनी दोघींना जमिनीवर पालथे झोपून राहा. असे ओरडून सांगितले होते. कुसूम रणदिवे या जमिनीवर पालथे होईपर्यंत एक गोळी त्यांच्या पायात घुसून दुसऱ्या पायाला लागली होती. तर कमल दोंदे यांना ऐकण्याचा प्रॉब्लेम होता. त्यांना अहिल्या रांगणेकर यांची सूचना ऐकूच गेली नाही. त्या उभ्या असतानाच एक गोळी सणसणत आली आणि त्यांच्या डोक्याचा वेध घेऊन बाहेर पडली, जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात त्या शहीद झाल्या होत्या. मृत्यू इतका जवळून पाहिलेल्या अहिल्या रांगणेकरनंतरच्या काळात चळवळीत झोकून देताना आपण वाचलो होतो. त्याचं मोल देत होत्या. त्यांना ब्रिटीश काळात तर तुरुंगवास भोगावा लागला होताच, पण स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी जी आंदोलनं केली होती ती सारी युध्द खेळल्यासारखीच होती. आचार्य अत्रेंनी त्यांना रणरागिणी ही उपमा तर दिलीच होती, पण त्यांच्यावर एक कविताही केली होती. त्यांचे पती कॉम्रेड पांडुरंग भास्कर रांगणेकर यांना सारे पी. बी. या टोपणनावानंच ओळखत होतं. या दांपत्यानं स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतर दहा वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत डांगे, एसेम, गोरे, अत्रे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, क्रांतिसिंह नाना पाटील, उध्दव पाटील, दाजीबा देसाई, दादासाहेब गायकवाड, शामराव परुळेकर, गोदाताई परुळेकर यांच्या बरोबरीनेच अहिल्या रांगणेकर हे राजकीय आघाडीवर होते, तर सांस्कृतिक आघाडी कॉ. अण्णाभाऊ साठे, कॉ. शाहीर अमर शेख आणि कॉ. द. ना. गव्हाणकर यांनी सांभाळली होती. मुंबई महापालिकेत १९६१ ते १९७७ पर्यंत नगरसेविका होत्या. १९७७ साली त्या लोकसभेवरही निवडून गेल्या होत्या. १९६२ ते १९६६ या काळात कॉ. संझगिरी, कॉ. परुळेकर दांपत्य, कॉ. रांगणेकर दांपत्य, कॉ. बी. टी. रणदिवे यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला होता. कॉ. शामराव परुळेकर तर ३ ऑगस्ट १९६५ ला, ऑर्थर रोड कारागृहातच वारले होते. अहिल्या रांगणेकर यांना १९७५-७७ राजकीय आणीबाणीत अठरा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. आपण ज्यावेळी महाराष्ट्राचा इतिहास सांगतो तेव्हा कॉम्रेडस् ची कहाणी विसरता कामा नये. परळ येथे कष्टकरी महिला संघटन करण्यात अहिल्या रांगणेकर यांचा मोलाचा वाटा होता. लाटणे मोर्चा असो वा हंडा मोर्चा त्या स्वतः कमल देसाई, मृणाल गोरे, तारा रेड्डी, मंजू गांधी यांनी मुंबई दणाणून सोडली होती. अखिल भारतीय पातळीवर त्याची चर्चा होत होती.
अहिल्या रांगणेकर या राज्याच्या सिटू संघटनेच्या उपाध्यक्ष होत्याच पण राष्ट्रीय पातळीवरील उपाध्यक्ष पदही भूषविले होते. राज्याचे पहिले पक्ष सचिव कॉ एस वाय कोल्हटकर १९८३ साली निवृत्त झाल्यानंतर, त्या राज्याच्या पक्षाच्या पहिल्या सचिव बनल्या होत्या. त्यांच्या डोळ्यांच्या दृष्टीदोषामुळं त्या १९८६ साली सगळ्या पदावरुन पायउतार झाल्या होत्या. आज आपण विविध राजकीय पक्षांमधील महिलांचे वर्तन आणि ज्ञान दररोज पाहात असतो. आम्ही अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, कमल देसाई, तारा रेड्डी यांचा जमाना पाहिला होता. त्यामुळं सध्याच्या राजकीय भगिनींबद्दल न बोललेलंच बरं. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्यानंतरही समाजवादी आणि साम्यवादी चळवळीत स्त्रियांचा मोलाचा वाटा होता. त्यांचे शताब्दीवर्ष पुरुष नेत्यांच्या शताब्दीमुळं झाकोळून जाऊ नये हीच अपेक्षा होती, पण विशेष काही घडलं नाही. अहिल्या रांगणेकर यांची जन्मशताब्दी निदान राज्य कम्युनिस्ट पक्षानं उचित सन्मान होईल अशी साजरी करावी अशी अपेक्षा होती. त्यांनीही त्याकडं दुर्लक्ष केलं. या लोकांनी महाराष्ट्र घडवलाय, हेही अलीकडे कोणाला पटत नाही इतपत ग्लानी आलीय, असो. अहिल्याताई रांगणेकर हे नाव विसरता येणार नाही इतपत महत्वाचे आहे...!
No comments:
Post a Comment