Saturday, 31 May 2025

सत्यशोधक डॉ. बाबा आढाव


चाफ्याच्या फुलांची पखरण करीत उपेक्षितांचे, कष्टकऱ्यांचे, असंघटितांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देणारा महामानव! त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा....! समताधिष्ठित समाज निर्माण व्हावं यासाठी आयुष्यभर लढा देणारे, हमालांना, कचरावेचक कामगारांना, मोलकरणीना, विस्थापितांना, शेतकऱ्यांना, देवदासींना न्याय मिळावा, त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी म्हणून संघर्ष करत राहणारे. समतेसाठी, लोकशाही-स्वातंत्र्यासाठी, सामाजिक सुरक्षेसाठी, न्याय आणि मानवी नैतिक मूल्यांसाठी-हक्कांसाठी बाबांची धडपड आजही सुरू आहे. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी 'एक गाव एक पाणवठा' साकारणारे, महात्मा फुले यांचं स्मारक व्हावं यासाठी झगडणारे, असंघटितांच्या कल्याणासाठी हिमालयाइतके कष्ट उपसणाऱ्या हिम्मतवाल्या बाबा आढावांना निरोगी दीर्घायू मिळावे म्हणून त्यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा! सरकार दरबारी एकच मागणं आहे की, बाबांना 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कारानं गौरवण्यात यावं!
------------------------------------------
परिवर्तनवादी चळवळीचे नेते, हमाल, रिक्षाचालक, कामगार अशा कष्टकऱ्यांचे संघर्षशील नेतृत्व, 'कष्टाची भाकर केंद्र' मार्फत गरजू कामगारांच्या जेवणाची सोय करणारे कृतिशील सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! बाबा १ जून रोजी वयाची ९५ वर्षे पूर्ण करीत आहेत याचा मनापासून आनंद वाटतो. चांगली माणसे दीर्घायू असली पाहिजेत आणि बाबांना ते वरदान मिळालंय. बाबांनी कष्टकऱ्यांच्या कल्याणाचा वसा घेतला आणि ती एक प्रदीर्घ साधना असल्याने बाबांचे ध्यासपर्व शंभरीपार पोचेल यात शंका नाही. सामाजिक जीवनात संपूर्ण आयुष्य वेचणारे आजकाल फार थोडके दिसतात. या सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत ते बाबा. बाबा आढाव....!
स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीत हिरीरीने उतरणारे ते बहुधा एकमेव नेते असावेत. एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, साने गुरूजी ह्या राष्ट्र सेवा दलाच्या समाजवादी नेत्यांबद्दल माझ्या मनात कायम कृतज्ञताभाव आणि आदर असतो. त्यांच्यासारखी अत्यंत निर्भीड, निरपेक्ष, तत्वांशी तडजोड न करणारी आणि त्यागासाठी कधीही तयार असणारी मंडळी आजकाल दिसत नाहीत याची खंत वाटते. राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झालेले बाबा आढाव मात्र आजही तजेल आणि उत्साही असल्याचे पाहून खूप समाधान वाटते. बाबांवर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार आजोळी घडले. भारत एकीकडे राजकीय स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करत होता त्याचवेळी सामाजिक स्वातंत्र्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल टाकून साने गुरूजींनी देखील अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाचा लढा सुरू केला. बाबांचे वय १५-१६ वर्षाचे असेल, त्यांनीही पंढरीच्या विठ्ठलाचे द्वार सर्वांसाठी खुले करण्यासाठी गुरूजींच्या बरोबरीने आंदोलनात उडी घेतली. त्यांच्या सामाजिक चळवळीतल्या कार्याची पंचाहत्तरी उलटून गेलीय. बाबांचा हा अथक प्रवास थक्क करणारा आहे! अगदी लहान वयात त्यांनी सामाजिक लढ्यात स्वत:ला झोकून दिले. ‘झोकून दिले’ हा वाक्प्रचार त्यांनी पुढे प्रत्यक्ष कृतीतही आणला. पानशेत आणि इतर धरणाच्या विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर असताना ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. त्यादिवशी यशवंतराव चव्हाणांच्या गाडीचा ताफा त्याच रस्त्यावरून जात असताना पायलट गाडी पुढे सरकताच बाबांनी गाडीसमोर अंग टाकलं. ब्रेक दाबले गेले म्हणून बरे नाहीतर ‘झोकून देणे’ त्यांच्या जीवावर बेतले असते! ह्या अचंबित करणाऱ्या अविश्रांत प्रवासात बाबा कधी नाउमेद झाले, कधी सुटीवर गेल्याचे ऐकिवात नाही. मला वाटते हवाबदल करण्यासाठी त्यांचे आवडते ठिकाण तुरूंग असावे. बाबांनी वयाच्या २२ व्या वर्षी अन्नधान्याची दरवाढ करून गरीबांची परवड करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध आंदोलन करून तुरुंगवास भोगला. बावन्न सालापासून त्यांनी तब्बल त्रेपन्न वेळा सामान्यांना न्याय देण्यासाठी कारावास पत्करला. यातून बाबा आढावांमध्ये एक चिवट आणि निडर चळवळ्या असल्याचे दर्शन घडते.
कोरोना महामारीमुळे संपूर्ण भारतात मार्च २०२० महिन्यात अभूतपूर्व संचारबंदी लागू केली गेली होती. महामारीला घाबरून लहान-मोठी, गरीब -श्रीमंत सगळी माणसे स्वत:ला घरात कोंडून घेऊन बसली. उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडले; नोकऱ्या गेल्या; रोजगार बुडाले. महामारीची सर्वात मोठी कुऱ्हाड कोसळली ती हातावर पोट असणाऱ्या रोजंदारी करणाऱ्या मजुरांवर, हातगाडीवाल्यांवर, पथारीवाल्यांवर आणि दुकानात काम करणाऱ्या गड्यांवर! संचारबंदी वाढवावी लागली तसे महामारीच्या भीतीने आणि पोटासाठी लोक संचारबंदी झुगारून मूळगावी, मूळ राज्याकडे परतू लागले. रस्त्यांच्या दुतर्फा, लोहमार्गांवर, आडवाटांवर स्थलांतरितांचे थवेच्या थवे दिसू लागले. ‘बाबा आढावांच्या मनाला ह्या अंगमेहनत करणाऱ्या, असंघटित स्थलांतरितांचे हाल पाहून किती यातना झाल्या असतील! याची कल्पना मनाला स्पर्शून गेली. पाठपुराव्यानंतर केंद्रशासनाने रेल्वेद्वारे प्रवासी वाहतुकीला अखेर हिरवा कंदील दिला. एसटी गाड्या देखील राज्यात धावू लागल्या. महामारीच्या संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी सरकार अहोरात्र कष्ट घेत आहे. अशा वेळी ज्यांनी संपूर्ण आयुष्य ह्या उपेक्षित, असंघटित समाजघटकांसाठी वेचले त्या बाबा आढावांची आठवण साहजिकच येते.
माणसाच्या आयुष्यात अन्न-पाणी, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा पुरवल्या गेल्या की तो किमान माणसाप्रमाणे जगतो. नाहीतर त्याची अवस्था प्राण्यांहून दयनीय असते. टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी ज्यांना संघर्ष करावा लागे त्या कष्टकरी, अंगमेहनत करणाऱ्या उपेक्षित आणि असंघटीत वर्गासाठी बाबांनी आयुष्यभर संघर्ष केला. तुरूंगवासाची भीती मनात बाळगली नाही. बाबा सुरवातीला हडपसर भागात वैद्यकीय व्यवसाय सांभाळत. पण रुग्णसेवा करत असताना मनातील अस्वस्थता त्यांना सामाजिक विकारांवर उपचार करण्यासाठी खेचत असे. काही वर्षे व्यवसाय सांभाळल्यानंतर ते पूर्णकाळ सामाजिक आंदोलनात समरस झाले. झोपडपट्टीत राहणाऱ्या, गरीबीने गांजलेल्या आणि कष्टाने पिचलेल्या वर्गासाठी त्यांनी झोपडपट्टी महासंघ स्थापन केला. अशा वंचितांना न्याय देण्यासाठी सक्रिय राजकारणात उतरून पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक झाले. परंतु झोपडपट्टीसाठी बजेट नाही म्हणून नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा पूर्णवेळ चळवळीवर लक्ष केंद्रित केले. स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालवण्यात आपण उणे पडत असल्याची खंत बाबांना जाणवते. खरं आहे कारण प्रत्येक आंदोलनाचा आणि चळवळीचा मूळ उद्देश बाजूला पडून त्याचे राजकारण होत आहे. बाबांनी राजकारणातून स्वत:ला बाहेर काढून सामाजिक उणीव भरून काढण्याचे मोठे कार्य केले. १९७१-७२ महात्मा फुले समता प्रतिष्ठान स्थापन करून , ‘एक गाव एक पाणवठा’ अभियान सुरू करून त्यांनी समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली; आणीबाणी काळात तुरूंगात असताना संघ विचारसरणीच्या दांभिकतेवरही प्रहार केला.मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी उभ्या राहिलेल्या आंदोलनात ते अग्रभागी होते. नामांतरासाठी पुणे ते औरंगाबाद असा लाँगमार्च देखील त्यांनी काढला. १९२७ मध्ये बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली तरी जयपूर इथल्या न्यायालयासमोर मनुचा पुतळा कित्येक वर्षे तसाच राहिला होता. बाबांनी तो हटवण्यासाठी देखील लाँगमार्च काढला. पुरोगामी महाराष्ट्राच्या ह्या सुपुत्राची इतिहासात अक्षय्य नोंद राहील. बाबांनी २०१२ मध्ये नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर असंघटित कामगारांसाठी पेन्शन परिषद घेतली. त्यापूर्वीही त्यांनी असंघटित कामगारांसाठी दिल्लीची दारे ठोठावलीत. त्यांच्या प्रयत्नाने ४५ कोटी असंघटित कामगारांच्या भल्यासाठी सामाजिक सुरक्षा कायदा विधेयक संसदेत मंजूर झाले असले तरी अंमलबजावणी होत नाही याची त्यांना खंत आहे.
संघटना म्हटल्यावर, एकट्याचा विचार करून तुम्ही एक पाऊलही पुढे टाकू शकणार नाही. कामगार संघटनेत जातींच्या-धर्माच्या नावावर मतभेदाला स्थान नाही. प्रत्येक प्रश्न आपसात विचार करून सोडविला जायला हवा. संघटना लोकशाही पद्धतीनेच चालविली गेली पाहिजे. शिस्त प्रत्येकाने पाळली पाहिजे. एका एका पैशाचा हिशोब ठेवला पाहिजे. सर्वांनी पाहण्यासाठी खुला ठेवला पाहिजे. अशा शिस्तीत वाढलेली संघटना कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यास सिद्ध असते हे मात्र खरे. बाबा आयुष्यभर या सर्व बाबी सांगत आले, जगत आले; पण आम्ही मात्र आम्हाला सोयीस्कर वाटल्या तेव्हढ्याच बाबी घेतल्या. आम्हा सगळ्यांना बाबांचे नाव पदोपदी हवे असते. पण ते जो विचार सांगतात अन् जगतात त्याप्रमाणे जगण्याचा आम्ही थोडा तरी प्रयत्न करतो का? आमच्यामधील अनेकांना संघटनेच्या पैशावर ताबा ठेवण्यासाठी पदे हवी असतात. बाजारसमितीवर त्याचसाठी निवडून जायचे असते. गंमत अशी की, अशा मंडळींना हिशोब विचारला तर राग येतो. माझ्यावर विश्वास नाही का, असा प्रतिप्रश्न विचारला जातो. हे सर्व आपण स्वतःला शिस्त घालून सोपे करू शकत नाही का? प्रत्येक बैठकीत जमा-खर्च मांडला तर, पुढचे अविश्वासाचे नाट्य टळणार नाही का?.. खरोखर आपण प्रामाणिकपणे संघटनेचे काम केले तर बाबांना आवडेल, आणि आपल्या कष्टांचे चीज झाले असे त्यांना वाटेल. असंघटित कष्टकरी आपल्या देशात सुमारे ५५ ते ६० कोटी आहेत. वेगवेगळ्या जाती - धर्मात विखुरलेले आहेत. जगण्याचे प्रश्न सर्वांचे समान आहेत. आपल्यातील या फुटीचा राजकारणी मतासाठी वापर करतात. आपण त्यांच्या भूलथापांना बळी पडतो. म्हणून जाती-धर्मविरहित एकजुटीला पर्याय नाही. बाबांनी या अशा एकजुटीसाठीच आयुष्य खर्ची घातले. बाबा जेथे जेथे अन्याय्य दिसला, तेथे धावून गेले. हमालांना, कचरा कामगारांना, मोलकरणीना, विस्थापितांना, शेतकऱ्यांना, देवदासींना न्याय मिळावा, त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी म्हणून संघर्ष करीत राहिले. नव्वदीनंतरही समतेसाठी, लोकशाही- स्वातंत्र्यासाठी, सामाजिक सुरक्षेसाठी, न्याय व मानवी नैतिक मूल्यांसाठी-हक्कांसाठी बाबांची धडपड सुरू आहे.... आणि हाच खरा अर्थ आहे बाबा असण्याऱ्यांचा! २०२४ मध्ये, वयाच्या ९४ व्या वर्षी, त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पैशाचा गैरवापर आणि ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत पुण्यात महात्मा फुले वाड्याजवळ आत्मक्लेश उपोषण केले. आजही त्यांचा उत्साह आणि सामाजिक न्यायासाठीची तळमळ कायम आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...