अधिकतम दिलं, किमान घेतलं, सर्वोत्तम जगले! आज जेव्हा रस्ते स्तब्ध झालेत, संसद अनैतिक बनलीय आणि संपूर्ण राजकारण जनविरोधी झालंय, तेव्हा मधु लिमये यांची खूप आठवण येते. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली. १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि समाजवादी चळवळीतील एक नायक मधू लिमये यांची १०४ वी जयंतीही. मधु लिमये हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले एक सेनानी आणि गोवा मुक्ती चळवळीतले एक नायक असण्यासोबतच एक महान संसदपटू, विचारवंत, विद्वान लेखक, शास्त्रीय संगीताचे प्रेमीही होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रामाणिकपणा, नैतिक मूल्यांवरची गाढ श्रद्धा. या वैशिष्ट्यामुळे ते एका वेगळ्या स्थितीत उभे राहिले, जे त्यांच्या समकालीन राजकारण्यांपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. नैतिकतेचा त्यांचा आग्रह किती प्रबळ होता हे फक्त एका उदाहरणावरून समजतं.
इंदिरा गांधी यांनी १९७६ मध्ये घटनादुरुस्तीद्वारे लोकसभेचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला. त्यावेळी मधु लिमये देखील लोकसभेचे सदस्य होते, ते तेव्हा तुरुंगात होते. जयप्रकाश नारायण यांच्यावर मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. इंदिरा सरकारच्या या अलोकतांत्रिक निर्णयाच्या निषेधार्थ त्यांनी रुग्णालयातूनच विरोधी पक्षांच्या सर्व लोकसभा सदस्यांना लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचं आवाहन केलं. मधु लिमये यांनी कोणताही विलंब न करता मध्य प्रदेशातल्या नरसिंहगड तुरुंगातून लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा पाठवला. त्यांच्या पाठोपाठ इंदूर तुरुंगात असलेले शरद यादव यांनीही आपला राजीनामा सभापतींकडे सादर केला. आणीबाणी लागू होण्याच्या काही महिने आधी जबलपूरमधून पोटनिवडणूक जिंकून ते पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचले होते. संपूर्ण विरोधी पक्षात राजीनामा देणारे हे दोन खासदार होते. त्यावेळी लोकसभेत जनसंघाचे २२ सदस्य होते ज्यात जनसंघाचे भाजप नैतिकतेचे सर्वोच्च नेते अटलबिहारी वाजपेयी हेहि होते, परंतु त्यापैकी कोणीही राजीनामा दिला नाही. याचा अर्थ असा की लोकसभेच्या अनैतिकरित्या वाढवलेल्या कार्यकाळातही ते सर्व खासदार राहिले आणि त्यांना पगार, भत्ते आणि इतर सुविधा मिळत राहिल्या. पक्षाच्या शिस्तीने बांधील असल्याचे कारण देत वाजपेयींनी राजीनामा देण्यास नकार दिला. मधु लिमये यांनी केवळ लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही तर अनेक वेळा राज्यसभेचे सदस्यत्वही नाकारलं. एवढंच नाही तर त्यांनी स्वातंत्र्यसैनिक आणि माजी खासदारांचं पेन्शन कधीही घेतलं नाही.
१ मे २०२२ रोजी दिवंगत संसदपटू मधु लिमये यांची शंभरावी जयंती होती. मधु लिमयेंच्या पिढीनं स्वप्नवत वाटावं असं कार्य केलेलं. लिमयेंच्या बाबतीत यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, मधु लिमये आमच्याकडं हवे होते. नेहरुंच्या अखेरच्या काळात लिमयेंनी पोटनिवडणूकीद्वारे संसदेत प्रवेश केला. त्यांनी नेहरु, इंदिरा गांधी, शास्त्री, मोरारजी या प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीत लोकसभा गाजवली. मधु लिमये व्यासंगी राजकारणीच नव्हते तर, लोकमतांची कदर करणारे प्रामाणिक लोकप्रतिनिधीही होते. १९७६ साली इंदिरा गांधी यांनी लोकसभेची पाच वर्षांची मुदत संपूनही लोकसभा विसर्जित न करता विशेष अधिवेशन बोलावून लोकसभेची मुदत एक वर्षांकरिता वाढविली होती. त्यावेळी लिमयेंनी सांगितलं की, मला मतदारांनी पाच वर्षांकरताच निवडून दिलंय. तेव्हा माझी पाच वर्षे पूर्ण झालीत. मी माझ्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. एवढंच नव्हे तर पत्नीला फोन करून शासकीय निवासस्थान रिकामं करायला सांगितलं. पत्नीनं घरातलं सारं सामान काढून रस्त्यावर आणून ठेवलं. तिथून एक पत्रकार जात होता, त्यानं हे सारं पाहून लिमयेंचं सामान आपल्या घरी नेलं आणि आपल्या पत्नीला सांगून चंपा लिमये यांना आश्रय दिला. तो राजकीय आणीबाणीचा काळ होता. लिमये आपल्या खर्चासाठी वृत्तपत्रात लिखाण करत. विशेषतः इंग्रजी वृत्तपत्रातून कारण तिथं कदर केली जाई. मानधनही बऱ्यापैकी मिळत. त्यांच्या चाहत्यात सर्व पक्षीय खासदार होते. तसंच विदेशातलं अनेक राजनितीज्ञ त्यांच्या डिबेटिंगवर फिदा होते. लिमये राजकारणी, व्यासंगी विचारवंत होते. त्यांचा सारा वेळ वाचन आणि लिखाणात खर्च होत असे. राजकारण म्हणजे कुटील कारस्थानाचं लाक्षागृह असतं. पण लिमयेंचं सारं आयुष्य भारतीय राज्यघटनेचा रक्षक म्हणूनच देशासाठी समर्पित झालं होतं. १९७७ साली जनता पक्षाची सत्ता केंद्रात आली होती. लिमयेंनी मिळत असलेलं मंत्रीपद स्विकारलं नव्हतं. नानासाहेब गोरे त्यांना म्हणाले होते की, 'मधु तुझा निर्णय मला पटला नाही. डॉ. राममनोहर लोहिया आणि तुझ्या विचारांची प्रत्यक्ष कार्यवाही करुन दाखविणं हेही एक आव्हान होतं. ते तू स्विकारायला हवं होतं....!'
१९९० साली जनता दलाचं सरकार केंद्रात येण्याचे संकेत मिळू लागले; विश्वनाथ प्रतापसिंग हे लिमये यांचं मार्गदर्शन घेत. त्यांनी त्याकाळात मधुजींना गुरुच केलं होतं. फर्नांडिस, रवि रे, मधु दंडवते आदी नेते त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत. देवीलाल, चंद्रशेखर हेही त्यांना भेटत. भेटीत जो काही सल्ला द्यायचा त्याचं प्रत्यंतर पुढच्या एक-दोन दिवसात यायचं. फर्नांडिस यांनी त्यांना रेल्वे खातं दिलं म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यांना मोठं खातं हवं होतं, त्यावर लिमयेंनी सल्ला दिला की, 'रेल्वे तर रेल्वे घे. आपल्या भागाची महत्त्वाची कामं पार पाड. सगळेजण तेच करतात. तू कोकण रेल्वे हाती घे यशस्वी हो. बॅरिस्टर नाथ पै नंतर तुझं नाव कोकणात घेतलं जाईल....!' जॉर्जनं सल्ला मानला मनापासून काम केलं आणि कोकण रेल्वेवर दंडवते यांच्या बरोबरच त्याचंही नाव कोरलं गेलं.
१९७१ साली मधु लिमयेंना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांना सांगितलं होतं की, मधुच्या घरी महिना हजार रुपये पोहोचते करत जा. तेव्हा गाडगीळ म्हणाले होते की, 'मधु मला कच्चा खाईल...!' पुढच्याच वर्षी लिमये कुठल्याशा पोटनिवडणुकीत विजयी होऊन लोकसभेत पोहोचले. कॉंग्रेसला माणसं खरेदी करण्याचा नाद होता. जनसंघीयांकडून त्यांच्यावर आरोप केला जात होता की, जनता सरकार पाडण्याला मधु लिमये जबाबदार होते. त्यावर ते म्हणाले होते की, 'ते सरकार आपल्याच गुणांनी पडलं होतं. त्यावेळी दुहेरी निष्ठेचा प्रश्न उपस्थित झाला नसता तरी ते पडणारच होते. जनता पक्षात राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निष्ठा ठेवायची हे चालू देता कामा नये...!' एवढीच लिमयेंची मागणी होती. हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा सगळ्यांच्या नाकावर टिच्चून सगळे बडे नेते संघाच्या कार्यक्रमाला गणवेशात हजर होते. त्यांनी आपली छायाचित्रं वृत्तपत्रात प्रसिद्ध होतील, अशी व्यवस्था करवून घेतली. तिथंच जनता पक्षाचा शेवट व्हायचं निश्चित झालं. एवढं होऊनही नानाजी देशमुखांपासून तर अडवानी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यापर्यंतचे सगळे नेते लिमयेंशी व्यक्तिगत संबंध ठेवून होते. महत्वाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर अनेकदा हे नेते त्यांचा सल्लाही घेत. अनेकांना धक्कादायक वाटेल पण ते कॉंग्रेसजनांनाही सल्ला द्यायचे. त्यांच्या अंगात लोकशाही मुरली होती, ती अशी...! केंद्रात १९७७ साली जनता पक्षाचं सरकार आलं तेव्हा गृहमंत्री चरणसिंग चौधरी होते. त्यांचा राजकीय आणीबाणीत इंदिरा गांधींनी जो उपमर्द केला होता. त्याबद्दल ते अतिशय चिडून होते. ते इंदिरा गांधींवर डूख धरुन होते. त्याचबरोबर जर १९७७ साली इंदिरा गांधी पुन्हा निवडून येऊन पंतप्रधान झाल्या असत्या तर जॉर्ज फर्नांडिस यांना फाशीची शिक्षाही होऊ शकली असती. कारण त्यांच्यावर देशाविरुद्ध युध्द पुकारल्याचा आरोप ठेऊन देशद्रोही म्हणून घोषित केलं असतं. म्हणून फर्नांडिसही इंदिरा गांधींच्यावर संतप्त होते. तेही इंदिरा गांधीचा बदला घेण्याची संधी शोधत होते. आता तर ते केंद्रात मंत्री होते. त्यामुळं त्यांनी आणि गृहमंत्री चौधरी चरणसिंग यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना तुरुंगवास घडवायचाच असा ध्यास घेतला. दोघंही सूडानं पेटलेले. इंदिरा गांधी यांना याची कुणकुण लागताच त्यांनी मधु लिमयेंचा सल्ला घेतला. मधु लिमयेंनी त्यांना सांगितलं की, देशाची माफी मागावी अन् प्रकरणावर पडदा टाकावा. इंदिरा गांधी या गोष्टीवर राजी झाल्या होत्या. त्यावर लिमयेंनी चौधरी चरणसिंग यांना प्रकरण मिटवून घेण्यास सांगितलं. पण गृहमंत्री चौधरी चरणसिंगांच्या डोळ्यातून आग बाहेर पडत होती. ते सूडानं वेडे झाले होते. त्यांनी इंदिरा गांधींवर आरोपपत्र तयार करून त्यांना तुरुंगात पाठवलं होतं. पण आरोपपत्र इतकं कमकुवत आणि दुबळं होतं की, इंदिरा गांधींना न्यायालयानं जामीन देऊन मुक्त केलं. देशभर इंदिरा गांधींना अटक केली म्हणून सहानुभूतीची लहर निर्माण झाली होती. तिथंच इंदिरा गांधींचं राजकीय पुनर्वसन केलं गेलं. त्यानंतर बिहार राज्यातल्या बेलछी इथल्या अकरा दलित व्यक्तींच्या हत्याकांड प्रकरणी इंदिरा गांधी भर पावसात चिखलातून हत्तीवर बसून त्या गावात जाऊन पिडितांना भेटून सांत्वन केलं. त्यामुळं इंदिरा गांधींना सहानुभूती आणि सरकार विरोधी जनक्षोभ उसळला. हे असं घडणार हे मधु लिमये जाणून होते. पण त्यांचा सल्ला त्यांनी मानला नव्हता. इंदिरा गांधी राजकारणी म्हणून कठोर होत्या पण व्यक्ती म्हणून सुसंस्कृत होत्या. जयप्रकाश नारायण यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी पंतप्रधान इंदिरा गांधी उपस्थित होत्या. विधी आटोपून त्या पाटणा विमानतळावर वेटींग रुममध्ये संजय गांधी यांच्यासोबत बसून होत्या. त्याचवेळी मधु लिमयेही अंत्यविधीला उपस्थित राहून पाटणा विमानतळावर आले. त्यांनी वेटींग रुममध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींची भेट घेतली आणि उभ्याउभ्याच बातचीत करत होते. इंदिरा गांधी अस्वस्थ झाल्या आणि संजय गांधी यांना म्हणाल्या की, 'तुला एवढाही सेन्स नाही की, मोठी व्यक्ती आल्यानंतर उठून उभं राहावं त्यांना बसायला जागा द्यावी...!' हा किस्सा गुलाम नबी आझाद यांनी सांगितला होता.
लोकसभेतल्या त्यांच्या कार्याबद्दल इथं सांगणार नाही. कारण ते बहुसंख्य जण जाणतात. पण त्यांचा एक किस्सा इथं सांगायला हवा. ते लोकसभेत हिंदीतच बोलत असत. इंग्रजीचा वापर अजिबात करीत नसत. त्यांना संस्कृत चांगलं येतं, हे कोणालाच ठाऊक नव्हतं. विशेषतः मालविकाग्निमित्रम मधले श्लोक मुखोद्गत होते. लोकसभेत अश्लीलतेच्या कायद्यावर बोलताना त्यांनी, 'पुराणमित्येव न साधु सर्वत्र...!' म्हणजे जुनं ते सर्व सोनंच नसतं. या श्लोकाचा हवाला दिला. ते ऐकून सारी लोकसभा थक्क झाली. मधु लिमये संस्कृत श्लोक तालासुरात म्हणताहेत आणि अटलबिहारींसारखे अनेक खासदार त्यांना साथ देताहेत हे आगळं दृश्य त्या दिवशी लोकसभेत दिसलं. प्रेस गॅलरीतही खळबळ उडाली. पीटीआय चा वार्ताहरानं धावत येऊन लिमयेंना श्लोकाचा अर्थ विचारला.
मधु लिमये अपघातानं राजकीय क्षेत्रात उतरले होते. मधु लिमये म्हणतात की, मी फर्ग्युसन महाविद्यालयात असताना इतिहास आणि शासनव्यवस्था हे विषय शिकविण्यासाठी प्रा.एच.डी.केळावाला नावाचे पारशी प्राध्यापक होते. माझ्या आयुष्यात फार मोठं परिवर्तन घडवून आणण्याला ते कारणीभूत होते. मधु लिमये कॉलेजमधल्या प्रत्येक उपक्रमात उत्साहानं भाग घेत. वादविवाद सभा, क्रिकेटचं मैदान, सगळीकडं त्यांचा संचार होता. लिमयेंना प्रा.केळावाला यांनी, १९३५ च्या 'फेडरेशन अॅक्ट'वर पेपर लिहायला सांगितलं. त्या निमित्तानं लिमयेंचा घटनाशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर सखोल अभ्यासाला प्रारंभ झाला. प्रांतिक स्वायत्तता आणि संघराज्य घटनेवर प्रमुख राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समजावून घेण्याच्या निमित्तानं अच्युतराव पटवर्धन, एसेम जोशी, नानासाहेब गोरे इ. मंडळींना भेटणं झालं. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून लिमये यांच्यामध्ये राजकीय कुतूहल निर्माण झालं. त्यानिमित्तानं बुध्दीला नवी चालना मिळाली होती. नवनव्या राजकीय नेत्यांचा जवळून परिचय झाला होता. त्यांच्या मनातल्या त्याग, बलिदान, देशसेवा या भावनांना खतपाणी मिळालं.
कॉलेजच्या फर्स्ट इयरच्या पहिल्या टर्ममध्ये डिबेटिंग कमेटीतर्फे श्री अच्युतराव पटवर्धनांचे 'War on the horizon' या विषयावर व्याख्यान झालं होतं. अच्युतरावांबद्दल तरुणांमध्ये फार आदर आणि कुतूहल होतं. कारण ते कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे वयानं सर्वात लहान सदस्य होते. त्यावेळच्या वर्किंग कमिटीचं स्थान आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळापेक्षा मानाचं होतं. त्यामुळं त्यांचे निर्णय महत्त्वाचे आणि मोलाचे होते. साहजिकच अच्यतरावांच्या व्याख्यानाला तुफान गर्दी झाली. त्यांच्या विचार आणि विवेचनाचा लिमयेंवर विलक्षण परिणाम झाला. त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली. प्रा.केळावालांच्या प्रोत्साहनानं लिमयेंना विश्वेतिहासाच्या सखोल अभ्यासाची प्रेरणा मिळाली. लिमयेंनी डोळसपणे आणि जाणीवपूर्वक स्वातंत्र्य चळवळ आणि राजकारण यामध्ये उडी घेतली. लिमयेंना अभावितपणे राजकीय क्षेत्राकडं न्यायला प्रा. केळावाला कारणीभूत झाले होते, हे निःसंशय.
मधु लिमये लिहितात की, 'राजकीय प्रबंधाच्या निमित्तानं पुढाऱ्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. १९३७ साली एसेम जोशी यांच्याशी भेट झाली होती. ते नारायण पेठेतल्या एका घरात तिसऱ्या मजल्यावर राहत. त्यांच्या व्यक्तिमत्वाची मनावर सखोल छाप पडली. साधी राहणी, त्यागमय जीवन, चमकदार बुध्दीमत्ता, आकर्षक वक्तृत्व, इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व, सौजन्य, शुचिता आणि गरिबांच्या दुःखांना समजून घेण्याची वृत्ती या गुणांमुळं आकर्षित झालो...!'
मधुजी लिहतात की, अच्युतराव पटवर्धन यांच्या ओजस्वी वक्तृवाचं आकर्षण होतं, पण त्यांच्याजवळ डॉ लोहियांसारखी अलौकिक प्रतिभा नव्हती. डॉ. लोहिया यांची बुध्दीमत्ता असामान्य आणि प्रतिभा नवनवोन्मेषशालिनी होती. मधु लिमयेंना एसेम अभ्यास मंडळाला घेऊन गेले होते. ते नानासाहेब गोरे यांच्या घरी भरलं होतं. तिथं पां.वा.गाडगिळ बौद्धिक घेत होते. तिथंच बंडू गोरे यांच्याशी मैत्री झाली. एसेम जोशी अर्थशास्त्र आणि कम्युनिस्ट जाहिरनामा यांवर बौद्धिक घेत होते. कम्युनिस्ट आणि कॉंग्रेस सोशॅलिस्ट पार्टीत विद्यार्थी ओढून नेण्याची तीव्र चढाओढ सुरु होती. मधु लिमयेंना ओढण्याचा जोरदार प्रयत्न, कम्युनिस्ट आणि रॉयिस्ट करत. पण बंडू गोरे,अण्णा साने, माधव लिमये, गंगाधर ओगले यांनी मधु लिमयेंना सोडलं नाही. विशेषतः बंडू गोरे मधु लिमयेंना धाकट्या भावासारखं जपू लागले होते. १९३८ साली मधु लिमयेंची ओळख मिनू मसानींशी झाली. लिमये लिहितात की, मसानी स्वभावानं तुटक आणि तुसड्या वृत्तीचे होते. पण अतिशय बुद्धिमान व्यवस्थित अभ्यासू होते. त्यांचं भाषण आणि लेखन तर्कशुद्ध, रेखीव होतं. त्यात फाफटपसारा नव्हता, की शब्दजंजाळ नव्हतं. अतिशय कार्यक्षम मनुष्य होते.
लिमये म्हणतात की, 'युसुफ मेहेरअलींजवळ जिव्हाळा होता, ओलावा होता, मित्र जोडण्याची कला होती. ते जगन् मित्र होते. त्याच काळात एसेम जोशी पुणे जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे चिटणीस होते. त्यांना पत्रव्यवहारात मधु लिमये मदत करत होते. तिथंच केशवराव जेधे, शंकरराव मोरे यांची भेट झाली होती. केशवराव जेधेंनी पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला राष्ट्रीय आंदोलनात खेचण्याचं महान कार्य केलं होतं...!' अशी नोंद लिमयेंनी केली होती. त्याचबरोबर शंकरराव मोरे हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे आणि व्यासंगी विद्वान होते. असं सांगताना लिमये पुढे म्हणतात की, 'त्यांची जीभ फार तिखट होती. ते पुणे जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते, त्यांच्या गुणांचं चीज लोकांनी केलं नाही. शंकरराव मोरेंनी संसदीय कार्यपद्धतीवर (parliamentary procedure) पहिला ग्रंथ लिहिला होता. त्यांचा स्वभाव फटकळ होता, हांजीहांजी वृत्ती नसल्यानं त्यांचे लोकसभेच्या सभापतींशी कायम खटके उडत होते...!'
मधु लिमयेंचे पहिले अधिकृत राजकीय पदार्पण १९३७ साली शनिवार वाड्यावरच्या जाहीर सभेत पहिल्या जाहीर भाषणानं झालं होतं. कॉंग्रेस सोशॅलिस्ट पार्टीनं अंदमानातल्या राजबंद्यांच्या सुटकेसाठी 'अॅंटिफेडरेशन डे' साजरा केला . दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात पहिल्यांदाच मधु लिमयेंचं नाव आणि भाषण याचा वृतांत छापून आला होता. वडिलधाऱ्या पुढाऱ्यांनी मधु लिमयेंचं कौतुक केलं होतं. त्यामुळं मधु लिमयेंच्या आयुष्याचा सांधा बदलला. मधु लिमये व्यासंगी राजकारणी झाले. त्यावेळी मधु लिमयेंचं वय होतं. सोळा वर्षांचं. मधु लिमये आणि साने गुरुजींची प्रत्यक्ष भेट १९४१ धुळ्यातल्या तुरुंगात झाली. गुरुजी तोपर्यंत समाजवादी बनलेले नव्हते. कम्युनिस्टांना गुरुजी कॉम्रेड वाटत. कारण त्यांना मार्क्सवादाचं आकर्षण होतं. तर कॉंग्रेस पक्षाला गुरुजी कॉंग्रेसचा गुलमोहर वाटत होता. गुरुजींना कम्युनिस्टांचं आकर्षण होतं. हे खरं होतं, पण गुरुजी कम्युनिस्ट नव्हते. तुरुंग ही शाळा असते. मधु लिमयेंच्या सानिध्यात, गुरुजी हे समाजवादी बनले म्हणून कम्युनिस्ट मंडळी मधु लिमयेंना अक्षरशः शिव्या घालत. तर कॉंग्रेस, समाजवादी पक्ष मधु लिमयेंचं कौतुक करत.
मधु लिमये सांगतात, की मी शिव्या देणाऱ्यांचा अपराधही केला नव्हता. कौतुक करणाऱ्यांसाठी पुण्यही केलं नव्हतं. गुरुजींचा तो स्वतःचा निर्णय होता. लिमये श्रेय घ्यायला तयार नव्हते, तर गुरुजी तुरुंगातून सुटेपर्यंत समाजवादी कसे बनले ? गुरुजी तुरुंगातून बाहेर पडले ते समाजवादी बनूनच. डॉ. हर्डीकर, पंडित नेहरु, कॉंग्रेस, समाजवादी पक्ष यांनी त्याच सुमारास सेवा दलाची स्थापना केली. गुरुजी आणि लिमये यांची जवळीक वाढली. गुरुजींना लिमयेंचा लळा लागला की, मधुजींना गुरुजींचा हे सांगणं कठीण असलं तरी 'दो जिस्म है, मगर ईक जान है हम...!' अशी अवस्था झाली होती. दोघंही एकमेकांच्या अंतकरणाला स्पर्श करत होते. गुरुजींच्या अखेरच्या काळात लिमये त्यांच्या सोबतच दौऱ्यांवर जात. डॉ.लोहियांच्या एका उत्कृष्ट लेखाबद्दल मधु लिमये भरभरून बोलत होते. गुरुजींनी तो लेख वाचून भाषांतर करून साधनेत छापला देखील. कदाचित त्यांना त्या लेखात आपल्या विचारांचं प्रतिबिंब गवसलं असेल. गुरुजींच्या श्रध्दांजली लेखात लिमये म्हणतात, 'त्यांचे कार्य महान होते. वीस वर्षे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला भूषविलं आणि समाजवादी चळवळीच्या भव्य परंपरेत मोलाची भर टाकली. सेवा, त्याग, प्रेमळपणा यांत त्यांची बरोबरी कोणी करु शकणार नाही...!'
मधु लिमयेंनी स्वतःला पूर्णपणे स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिलं होतं आणि महाविद्यालयीन शिक्षणाला रामराम ठोकला होता. त्याबद्दल लिमये म्हणतात, 'अनेक लोक मला विचारतात, तुम्ही उच्च शिक्षण पूर्ण का केलं नाही?' त्याचं उत्तर असं आहे की, मी कॉलेजमध्ये गेलो नसतो तरी माझं जीवन खुरटलं असतं. माझ्या व्यक्तीमत्वाची आणि जीवनाची हत्या झाली असती. कॉलेजच्या मोकळ्या वातावरणामुळं माझं व्यक्तिमत्त्व फुललं, क्षितीजं विस्तारली. मन मुक्त झालं. माझ्या दृष्टीनं ते खरोखरच विश्वविद्यालय ठरलं. नंतरच्या दीड-दोन वर्षात या जीवनापासून जे काही मिळवायचं होतं ते मिळवून झालं होतं आणि नव्या विश्वात प्रवेश करायला मी तयार झालो होतो. त्यामुळं मला कॉलेज सोडल्याचा कधीच पश्चात्ताप झाला नाही. तसं पाहीलं तर, मी जीवनभर विद्यार्थीच राहिलो. नित्य नव्या विषयाचा व्यासंग करीत मी मुमुक्षू साधकाच्या भावनेनं अखंड ज्ञानसाधना करतच राहिलो. माझ्या लेखी विश्वविद्यालयाच्या पदव्यांचं काहीच मूल्य राहीलं नाही. कधी माझ्या मनात न्यूनगंडाची भावनाही डोकावली नाही. कॉलेज आणि विश्वविद्यालये जे जे देऊ शकत होते ते ते मी आत्मसात केलं...!'
'मात्र मी कॉलेजमध्ये गेलो नसतो तर, मला ही संधी मिळाली नाही म्हणून, जन्मभर हळहळत राहिलो असतो. त्यानंतर पुढं शिकत राहून मी एमएस. पीएचडी झालो असतो तरी माझ्यात फारशी भर पडली नसती. उलट कॉलेज सोडल्यावर पुढच्या काही वर्षांतले ज्ञान, जे जीवंत अनुभव मी मिळवलं होतं अनमोल होतं. ते कोणतेही महाविद्यालय, वा विद्यापीठ मला देऊ शकलं नसतं. विशाल जीवन हेच माझं खरं विद्यापीठ ठरलं...!' महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर मधु लिमयेंना तीव्र दुःख झालं होतं. त्यावेळी ते विदेशात होते. महात्मा गांधींना राष्ट्रपिता न मानणाऱ्यांचा समाचार घेताना लिमये म्हणतात.
'भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ज्यांचं योगदान शून्य आहे, राजकीय आणीबाणीत ज्यांनी शेकडो माफी पत्रे, राज्यकर्त्यांकडे पाठवून त्या लढ्याची तेजस्वी प्रतिमा मलिन केली त्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता या गुणविशेषणांनी का संबोधलं याचं मर्म समजणार नाही. सुभाषबाबूंनी गांधीजींना राष्ट्रपिता संबोधताना भारतीय धार्मिक परंपरा आणि एकमेकांशी भांडणाऱ्या कर्मठ संस्कृतीच्या राज्याचे राष्ट्रपिता म्हणून पदवी प्रदान केली नव्हती. तर ज्या राष्ट्राची एकच राज्यघटना आणि एकच केंद्र सरकार आहे अशा आधुनिक भारत या राष्ट्राचे राष्ट्रपिता म्हणून नेताजींनी महात्मा गांधींना राष्ट्राच्या रास्त हक्कानं संबोधलं...!'
No comments:
Post a Comment