Saturday, 10 May 2025

मोदींची संघ कार्यालयाला भेट...!

नरेंद्र मोदी गेल्या १० वर्षात रेशीमबागेत गेले नाहीत, मग आताच का जात आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिराला भेट देऊन करणार आहोत. त्यानंतर दीक्षाभूमीवर आणि त्यानंतर वासूदेवनगरमधील माधव नेत्रालयाच्या भूमिपूजन सोहळ्याला जाणार आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून म्हणजे गेल्या १० वर्षांत पहिल्यांदाच संघाच्या स्मृती मंदिराला भेट देणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याची जास्त चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाच्या मुशीतून घडलेले नेते आहेत. ते संघाचे प्रचारक राहिलेले आहेत. तरीही ते गेल्या १० वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय आणि रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिरात का गेले नाहीत? मोदी संघाच्या शताब्दी वर्षातच तिथे का जात आहेत? यामागची कारणं काय असू शकतात? हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी संघाच्या मुख्यालयात जाऊन आले होते. २०१२ साली रा. स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन यांचं निधन झालं होतं. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोदी नागपुरात संघाच्या कार्यालयात गेले होते. त्यानंतर २०१३ मध्ये मोदी हे भाजपच्या पंतप्रधानपदाचा चेहरा असतील, अशी चर्चा सुरू झाली होती, त्यावेळीही मोदी संघाच्या मुख्यालयात गेले होते. त्यांची तत्कालीन आणि विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यानंतर २०१४ ची लोकसभा निवडणूक झाली. भाजपला बहुमत मिळालं आणि मोदी पंतप्रधान झाले. यानंतर मोदी अनेकदा नागपुरात गेले. कधी मेट्रोच्या उद्घाटनाला, तर कधी निवडणुकीच्या प्रचारसभांना, तर कधी विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मोदी नागपुरात आले. कधी तर विदर्भातील इतर जिल्ह्यातही फिरले. पण ते कधीच संघाच्या स्मृती मंदिरात किंवा महाल इथल्या संघाच्या मुख्यालयात फिरकले नाहीत. मोदी पंतप्रधान झाल्यापासून रा. स्व. संघाच्या मुख्यालयात कधीच गेले नाहीत, याबद्दल अनेकजण आश्चर्य व्यक्त करतात. कारण मोदी हे संघाच्या मुशीतून घडलेले नेते आहेत. त्यामुळे अनेकदा नागपूरला भेट देऊन संघ मुख्यालयात न जाण्यामागचं कारण काय असू शकतं?
थेट संघाच्या मुशीतून घडलेले आणि पंतप्रधान झालेले मोदी पहिले नेते आहेत. एखादी व्यक्ती खूप मोठ्या पदावर गेली की, थेट संघाच्या मुख्यालयात जाण्याची प्रथा नाही. संघात कुठलाही मोठा नेता जातो, तेव्हा त्याला निमंत्रित केलं जातं. संघ निमंत्रित करत नाही, तोपर्यंत कुठलाही नेता किंवा मोठा अधिकारी संघ कार्यालयात न जाण्याची प्रथा आहे. त्यामुळेच इतके वर्ष मोदी कदाचित गेले नसतील. संघ मुख्यालय किंवा हेडगेवार स्मारक समिती इथं जायला जाहीर संधी हवी असते. त्यामुळे कदाचित पंतप्रधान गेले १० वर्ष संघ मुख्यालयात गेले नसतील आणि शताब्दी वर्षानिमित्त आता ही संधी मिळाली आहे, याआधीच्या भेटींमध्ये संघ मुख्यालयात भेट देऊन मोदींना मोठा संदेश देता आला असता. मोदी संघासोबत दुरावा कधीच नव्हता. पण याआधीच्या भेटीमध्ये संघ मुख्यालयात जाऊन त्यांना मोठा संदेश देता आला असता. कारण ते संघाच्या मुशीत घडलेले आहेत. पण तशी गरजही वाटली नसावी. कारण भाजप एक राजकीय पक्ष आहे. संघ आणि भाजप एकाच परिवारातले असले तरी दोघांचंही कार्यक्षेत्र मात्र वेगवेगळं आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे मोदी त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांचं काम करत होते. पण, ते गेल्या दहा वर्षात संघ मुख्यालयात का आले नाहीत याचं निश्चित कारण सांगता येणार नाही.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच हेडगेवार स्मृती मंदिराला भेट देतात. तसेच, भाजपचे काही केंद्रीय मंत्री देखील नागपूर दौऱ्यावर असताना रेशीमाबागेत जातात. पण मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या १० वर्षांत संघ मुख्यालय किंवा हेडगेवार स्मृती मंदिरात आलेले नाहीत. पण मग संघाचं शताब्दी वर्ष असताना मोदी का येत आहेत? यामागे नेमकी काय कारण असू शकतात? मोदी आता येण्याचं कारण म्हणजे संघाचं शताब्दी वर्ष आहे. तसेच, संघाची स्थापना देखील गुढीपाडव्याला झाली होती. आता दोन्ही योगायोग साधून मोदी रेशीमबागेतील स्मृती मंदिराला भेट देत आहेत. कारण कुठलीही संधी कशी साधायची हे मोदींना जमतं. त्यासाठी ते ओळखले जातात. त्यामुळे संघाचं शताब्दी वर्ष आणि गुढीपाडवा असा मुहूर्त साधून ते भेट देत आहेत.  संघ ही भाजपची मातृसंस्था आहे, हे संघानं तरी कधीच लपवून ठेवलेलं नाही. भाजपचं सुकाणू हे संघाच्या हातात आहे हे जगजाहीर आहे आणि हे संघाचं शताब्दी वर्ष आहे. त्यात मोदींची तिसरी टर्म आहे. त्यामुळे संघाला वाटलं असावं की मोदींची सूत्र संघाच्या हातात आहे हे यानिमित्तानं जगाला दाखवता यावं. त्यामुळे या भेटीवर संघानं मोहोर उमटवली. अर्थात, पंतप्रधान आणि संघ दोन्हीच्या संमतीनं ही भेट होत आहे. शताब्दी वर्षानिमित्त संघाचा प्रचारक पंतप्रधान म्हणून हेडगेवार स्मृती मंदिराला भेट देतोय, यासाठीही संघानं त्यांना बोलावलं असेल पण गेल्या काही महिन्यात मोहन भागवत यांनी केलेली वक्तव्य, संघाच्या मुखपत्रातून भाजपवर केलेली टीका, त्यानंतर संघाने भाजपचे कान टोचले, अशा आलेल्या बातम्या यामुळे संघ आणि भाजपमध्ये सर्व काही आलेबेल नाही का? अशा ज्या चर्चा रंगल्या होत्या ते देखील यामागे कारण आहे का?  
मोहन भागवत यांचं संघ शिक्षा वर्गाला भाषण झालं होतं. यावेळी संघाच्या भाजपला कानपिचक्या अशा बातम्या झाल्या होत्या. कारण मोहन भागवत कधीही संघ शिक्षा वर्गाला राजकीय भाषण करत नाहीत. पण, त्यांनी यावेळी ते केलं होतं. यावेळी त्यांनी भाजपला काही डोस देखील दिले होते. त्यामुळे संघ नाराज आहे असा संदेश गेला. त्यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी संघाची भाजपला गरज नाही हे वक्तव्य देखील आलं. लोकसभेत संघानं प्रचार केला नाही असंही बोललं गेलं. भाजपनं संघाला प्रचार करा असं म्हटलं नाही म्हणून संघानं प्रचार केला नाही असं त्यावेळी संघाकडून सांगितलं जात होतं. पण, विधानसभा निवडणुकीत संघाचा सक्रीय सहभाग दिसला आणि त्यात भाजपला यशही मिळालं. गेल्या काही दिवसातल्या मतभेदांमुळे मधल्या काळात भाजपला कुठेतरी परिवारापासून दुरावल्यासारखं वाटत असेल. आता त्याला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यासाठी, आम्ही सगळे एक आहोत हे दाखवण्यासाठी ही भेट असू शकते. संघ आणि भाजपमध्ये गेल्या काही काळात झालेले थोडेसे मतभेद यामागचं एक कारण आहे. आरएसएस आणि भाजपमध्ये कधी संवाद छान होतात, पण कधी कधी भाजप विरुद्ध आरएसएस असं चित्र दिसतं. दोन्ही संघटनेमध्ये खूप टोकाचं भांडण दिसत नाही. पण कुठंतरी थोडेसे मतभेद दिसतात. पण वाजपेयी आणि सुदर्शनजी यांच्यामध्ये मतभेद होते तसे मोदी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये दिसत नाहीत असंही ते नमूद करतात. तसेच, भाजपला त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा निवडायचा आहे. त्यासाठी सुद्धा रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची एक सहमती लागेल. त्यासाठी सुद्धा ही भेट महत्वाचं वाटत.
रा. स्व. संघाच्या स्मृती मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान नाहीत. याआधी अटलबिहारी वाजपेयी ज्यावेळी ५ वर्षांसाठी पंतप्रधान झाले होते, त्यावेळी त्यांनी नागपुरात रा. स्व. संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती. वाजपेयी २६ ऑगस्ट २००० रोजी रेशीमबागेत गेले होते. यावेळी त्यांनी संघाचे प्रचारक नारायणराव तरटे यांची भेट घेतली होती. पण त्यावेळी संघाचे कुठलेही मोठे नेते, तत्कालीन सरसंघचालक सुदर्शन, सरकार्यवाह, सहसंघचालक यातील कोणीही वाजपेयींच्या स्वागतासाठी नव्हते. विदर्भ प्रांत सहसंघचालकांनी त्यावेळी वाजपेयींचं स्वागत केलं होतं. त्यावेळी सुदर्शन आणि वाजपेयी यांचे मतभेद होते, अशी जोरदार चर्चा होती, 
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...