Sunday, 18 May 2025

काँग्रेसी अर्जुनाला कृष्णाची प्रतिक्षा...!

"मंत्री, आमदार, खासदारांचं राहणीमान पंचतारांकित लक्झरीयस बनलंय. मंत्री, अधिकारी वातानुकूलित बैठकीत मेजवान्या झोडताहेत. अशा झगमगाटात काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वाईच्या दौऱ्यात प्राज्ञ पाठशाळा मंडळाच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचं वास्तव्य राहिलेल्या वाड्यात मुक्काम केला. त्यांचं हे वागणं काँग्रेसच्या मूळ तत्वाशी, गांधींच्या परंपरेची साधर्म्य साधणारी. हे साधं वागणं कार्यकर्त्यांच्या, लोकांच्या मनांला साद घालणारं ठरणार का? असा साधा माणूस आपलं भलं करेल का? अशी शंका येते. त्याचवेळी चौंडी इथल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जेवणाचा जो फोटो प्रसिद्ध झालाय तो अंगावर शिसारी आणणारा होता. सकपाळ यांनी आपल्या वागण्यानं सत्तेतला हा विरोधाभास स्पष्ट केलाय..!"
............................................
*सो*शल मीडियातून काहींनी काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वाईतल्या दौऱ्यात प्राज्ञ पाठशाळा मंडळाच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचं वास्तव्य राहिलेल्या वाड्यात मुक्काम केल्याचा फोटो टाकला. त्यावरून काहींनी टीका केलीय पण काहींनी त्याचं, बदलत्या नेतृत्वाच्या मानसिकतेचं कौतुक केलं अन् त्याचं अनुकरण करण्याचा सल्लाही दिलाय. काँग्रेसला अशा साधेपणाची आताशी सवय राहिलेली नाही. तसं आजचं राजकारणही हे काही साधंसुधं राहिलेलं नाही. त्यामुळं काँग्रेसच्या प्रांताध्यक्षांचं असं वागणं कितपत परिणामकारक ठरू शकेल, हे आगामी काळात दिसेल! काँग्रेसच्या प्रांताध्यक्षांना एखाद्या तारांकित हॉटेलात किंवा सरकारी विश्रामगृहात राहावसं न वाटता ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या वास्तूत राहावंसं वाटणं, याला निश्चितच महत्त्व आहे. राजकारणाची परिभाषा, गरज आणि स्पर्धा आज पूर्णपणे बदलून गेलीय, तेव्हा अशा वागण्याला दांभिकता म्हणून संबोधलं जाईल. मात्र, आजचे नगरसेवक ज्या पद्धतीत राजेशाही थाटात राहतात, ते पाहता प्रांताध्यक्षांचं असं साधं वागणंसुद्धा मोलाचं ठरतं. पण त्यांचा हा साधेपणा कार्यकर्त्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांना आवडेल का? यापेक्षा असं एखाद्या ओसरीवर झोपणाऱ्या, नेतेपणाचं वलय, प्रभावळ नसलेल्या नेत्याच्या हातून उद्या आपलं भलं होईल का? आपले प्रश्न तो सोडवेल का? अशी शंका सामान्यांना येण्याचा हा काळ आहे. सध्याच्या राजकारणातली एकंदरीत परिस्थिती ही पैसे घेऊन काम करणारे, कानफटात लगावून काम करून घेणारे किंवा आपल्या स्वार्थाची कामं करताना कोणतीही साधनशुचिता न बाळगणारे नेते बहुतेक लोकांना आज हवेत. तसे ते सर्वत्र उपलब्धही आहेत. यातून मार्ग काढायला हवंय. त्यासाठी लोकांची मानसिकता बदलावी लागणार आहे; ते तितकं सोपं नाही. पूर्वी साधनसुचितेच्या माध्यमातून साथसंगत मिळविली जात होती. आज सत्ता मिळवणं अन् त्यासाठी सर्व बाजूंनी म्हणजे साम, दाम, दंड, भेद या आयुधांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता भासत असते. सत्ताधारी म्हणून आपणच कसे प्रभावी आहोत, आपणच लोकांसाठी कशी सत्ता राबवतोय, हे सारं पूर्वेतिहास पुसून टाकून लोकांच्या मनात विश्वास निर्माण करावा लागतो. याशिवाय मूल्याधिष्ठित, सेवाभाववृत्ती, मूल्यात्मक विचार, नीतिविवेक जपणारं राजकारण असायला हवं. प्रांताध्यक्षांच्या या छोट्याशा कृतीतून ते प्रतीत होतं. महात्मा गांधी जन्मभर हेच करत आले. साधं जीवन जगत आले. राहुल गांधीही असंच वावरताना दिसतात. त्याच अनुकरण केलंय. पण प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्या पडक्या वाड्यात खरंच झोप लागली का? त्यांच्या स्वप्नात तर्कतीर्थ किंवा तिथं राहिलेले अनेक पंडित, विद्वान किंवा विद्याभ्यास करणारे आले का? हे कळायला मार्ग नाही. मात्र, त्यांना असं काही सुचलं, याचं आजमितीला स्वागत करायला हवं. राजेशाही थाटात अन् बटबटीतपणे वावरणाऱ्या आजच्या उथळ राजकारण्यांच्या काळात काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं हे साधं वागणं प्रकर्षानं जाणवतेय. राज्यकर्त्यांच्या एखाद्या छोट्याशा गोष्टींचं अवडंबर माजवणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांनी मात्र या कृतीकडं सपशेल दुर्लक्ष केलेलं जाणवलं! हे घडत असताना नेमकं त्याच्या विरोधात राज्यकर्त्यांचं भपकेबाज, श्रीमंती वागणं दिसून आलं. अहिल्यानगरातल्या चौंडी या अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यातल्या मंत्र्यांच्या अन्  अधिकाऱ्यांच्या जेवणाच्या पानांचा फोटो अंगावर शिसारी आणणारा होता. अशा ठिकाणी प्रतिकात्मक बैठक घेताना साधी भाजीभाकरी खाता येत नाही का? असा विचार सत्ताधारी राज्यकर्त्यांच्या मनात का येत नाही? या साऱ्या गोष्टींचा समाजमनावर परिणाम होत असतो. सपकाळ यांनी ते नेमकं त्या भपकेबाजपणाच्या विरोधात वर्तन केलंय. काँग्रेस कार्यकर्त्यांना एक आदर्श घालून दिलाय. 
देशात आणि राज्यात काँग्रेस हा एक महत्त्वाचा पक्ष आहे, तो संसदीय लोकशाहीत बळकट होऊन टिकला पाहिजे..! लोकसभेनंतर झालेल्या सर्व निवडणुकीत केवळ काँग्रेसचाच नव्हे तर सर्व पुरोगामी, समाजवादी विचारांच्या पक्षांचा दारुण पराभव झालाय. विचारसामर्थ्य शक्तिशाली असलं तरी व्यक्तिदोषामुळं त्यांचा हा पराजय झालाय. आपसातले संघर्ष, ते मिटवण्याच्या नावाखाली चाललेली अटीतटी, दिलजमाईचं प्रदर्शन आणि कुजकी टोमणेबाजी यामधून काँग्रेसवाल्यांना बाजूला काढून पुरोगामी विचारापर्यंत आणण्याचं काम आज व्हायला हवं. सत्ता जिंकण्यासाठी देवाधर्माचा वापर करण्याचा, तो करता यावा म्हणून वेगवेगळ्या संघटना उभारण्याचा, त्यांच्याद्वारा श्रद्धावान भाबड्या जनसामान्यांना खोट्यानाट्या गोष्टी ऐकवून फितवण्याचा, विशिष्ट राजकीय पक्षासाठी त्यांना वापरण्याचा उद्योग या देशात पद्धतशीरपणे केला जातोय. जन्मजात उच्च-नीचतेविरुद्ध, विषमतेविरुद्ध, अंधश्रद्धा अन् अन्याय यांच्याविरोधात  लढणाऱ्यांना आपसात लढायला लावण्याचा अथवा निष्क्रिय बनवून निरुपयोगी करून टाकण्याचा जोडधंदाही याच मंडळींनी प्रभावीपणे चालवलाय. याला रोखण्याचं सामर्थ्य फक्त पुरोगामी विचारातच आहे. राजकारणात तर मतलब सांभाळणं ही बाब आता अनिवार्यच झालीय. एखाद्या व्यक्तीनं आपल्या मतलबासाठी एका पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसरा घरोबा केला की, ती व्यक्ती उठवळ! पण एकमेकाला संपवणं हेच ध्येयधोरण असलेले दोन पक्ष जेव्हा मतलबासाठी एकत्र येतात तेव्हा...? मतलबासाठी पक्षबदल करणाऱ्यात आदर्श म्हणवले जाणारे राजकारणीही आहेत. हे लक्षात घ्यावं लागेल. काँग्रेसपक्षाला या निवडणुकांतून फार मोठं अपयश आलं. पण हे अपयश एकदम काही काँग्रेसच्या माथ्यावर कोसळलेलं नाही. ते गेली दहा-पंधरा वर्षे एक एक पावलानं येतच होतं. काँग्रेसनं गरिबांशी, दलितांशी, उपेक्षितांशी, अल्पसंख्य समाजघटकांशी, समाजातल्या परिवर्तनाला सदैव निष्ठेनं साथ देणाऱ्या मध्यमवर्गीयांशी प्रतारणा केली; त्यामुळंच अपयश काँग्रेसला झोम्बु लागलंय. काँग्रेस धनिकांच्या दावणीला बांधली गेली आणि सदासर्वदा स्वार्थाचा रवंथ करणाऱ्या बैलांनी काँग्रेस फक्त आपल्या गोतावळ्यापुरतीच आहे असं वर्तन करुन काँग्रेसबद्दल जनमानसात अप्रिती वाढविली. काँग्रेस अशीच राहावी असा प्रयत्न करणारे महाभाग आजही आहेत. मात्र काँग्रेसला बदलावं लागेल. काँग्रेस पुन्हा लोकांची झाली नाही तर काँग्रेस नक्कीच संपेल. शिवाजी महाराज, छत्रपती शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या आचार-विचारातच काँग्रेसला पुन्हा सामर्थ्य देण्याची शक्ती आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसवाल्यांना या निकालांनी आपण पुरे झोपलेलो नाही हे दाखवून देण्याची संधी प्राप्त झाली होती. पण मतलबासाठी चालवलेल्या आरोप प्रत्यारोपांनी आपलं कापलेलं नाक मिरवत वावरण्याचा उद्योग काँग्रेसवाल्यांनी चालविला. आपल्याच हातानं आपला गळा कापून घेण्याचा प्रयोगही केला, अशावेळी बगलबच्यांना टाळ्या वाजवायला लावलं जात होतं, याकडं गांभीर्यानं पाहिलंच गेलं नाही. 
कर्मकांडाच्या, पुरोहितशाहीच्या, जन्माधिष्ठित उच्च नीचतेच्या, विषमतेच्या चक्रव्यूहात राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या नावानं कुणी समाजाला गुंतवू बघत असेल तर त्याचा प्राणपणानं मुकाबला करण्याची तयारी पुरोगामी विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्यांना करावीच लागेल. उत्तर पेशवाईचा उल्लेख कुणी केला की काही मंडळींना कळमळायला होतं. रयतेच्या रक्षणाची, उदरनिर्वाहाची जबाबदारी न पाळण्याचा, फुकटखाऊ, भिक्षुक, उनाड बाया यांचे तांडे पोसण्याचा प्रकार करणारे राज्यकर्ते होऊन गेले याची आठवण काढण्यानं जर कुणाला दुःख होत असेल तर अशी वेळ समाजावर पुन्हा येऊ नये याची खबरदारी या मंडळींनीच घ्यायला हवी. उत्तरकाळात पेशव्यांच्या नालायकीनं मराठी सत्ता ग्रासली हे खरं; पण ह्या नालायक पेशव्यांना त्यांच्या तोडीस तोड नालायकी करणारे मराठे सरदारही आपल्या सर्व दुर्गुणासह पुरेपूर साथ देत होते. हा इतिहास झाकून ठेवता येणार नाही. आज उत्तर पेशवाईतल्या प्रमाणे सत्ताधारी रंगढंग दाखवत असतील तर त्याला कारण नांदेड, लातूर, सांगली, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, बारामतीचे आपसात लढण्यात दंग असलेले काँग्रेसवालेच आहेत. या सगळ्यांनी लोकहितासाठी लढण्याचं, गोतावळ्यात गुंतून न पडण्याचं आणि सामाजिक समता, सहकार, समृद्धी यासाठी सर्वशक्ती वेचण्याचं ठरवलं तर लोकही त्यांना साथ देतील. पराभवानंतर झालेल्या आत्मचिंतनात 'आपण सगळे सध्याच्या परिस्थितीत जागरूक आणि संघटित राहिल्यास राज्यातल्या सत्तेत फसगतीनं झालेला तात्पुरता बदल दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही...!' असं म्हटलं गेलं. यातल्या 'आपण सगळे' याची व्याप्ती केवढी? 'आपण सगळे' ही भावना घेऊन काँग्रेस खरोखरच उभी राहणार आहे का? दिलजमाई पर्व सुरु असताना कळवळून 'निदान भांडणासाठी तरी काँग्रेस शिल्लक ठेवा...!' असं विलासरावांनी मागे एकदा म्हटलं होतं याची आठवण होते. लोकांना झुलवण्यासाठी देवाधर्माचा उपयोग करण्याचं तंत्र साधलेली मंडळी भावनांचा प्रक्षोभ घडविणारे नाना विषय स्वतः नामानिराळे राहून उपस्थित करताहेत. काशी-विश्वेश्वर आणि मथुरेच्या श्रीकृष्णापासून गल्लीतल्या मारुती, गणपतीपर्यंत देवांचा वापर करून लोकांच्या भाबड्या श्रद्धांना हात घातला जातोय. नको ते घडवलं जातंय. हा देश, समाज आपल्या महत्वाकांक्षेपायी भरडून टाकण्याची टोकाची भूमिका घेतली जातेय. हे तुफान रोखण्यासाठी दिलजमाई व्हायलाच हवी. हातात हात गुंफून दृढ विश्वासानं उभं राहण्यासाठी लोक पुढं यायला हवेत. माणसं जोडली जायला हवीत. महात्मा गांधींनी देशाच्या कानाकोपऱ्यात 'करेंगे या मरेंगे....!' ही जिद्द जागवली तशी जिद्द पुन्हा एकदा जागवायला हवीय. 
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी माणूसपण गमावलेल्या माणसात जो आत्मविश्वास, स्वाभिमान जागवला तसा आत्मविश्वास, स्वाभिमान पुन्हा जागवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हायला हवेत. महात्मा फुले यांनी ज्या त्वेषानं अन्यायाला टकरावर टकरा देऊन समानतेचं वारं समाजात खेळतं ठेवलं, ती तडफ लोकांत निर्माण होईल असं वातावरण जाणीवपूर्वक ठेवण्याचं भान आपण दाखवलं पाहिजे. काँग्रेसवाल्यांच्या वृत्तीत थोडाजरी बदल घडला तर सत्तेत बदल घडणं कठीण नाही. पुरोगामी विचारात जनआंदोलन उभं करण्याची ताकद आहे. पण सध्याच्या वातावरणात मळभ दाटून आलंय. दुसरीकडं रामकृष्णांना रथात घालून भाजपची घोडदौड सुरू आहे. शिवाजी महाराजांना शिवसेनेच्या मावळ्यांनी कडेकोट किल्ल्यात बंदिस्त करून ठेवलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दलित दुसऱ्या कुणाच्या हाती लागू देत नाहीत. महात्मा गांधींना आपण कधीच 'हे राम' म्हणायला लावलंय. आता काँग्रेसला आधार आहे तो केवळ याच विचारांचा आहे. याचा गांभीर्यानं विचार करायला हवाय....!
लोकशाही सशक्त, समृद्ध आणि बलशाली हवी असेल तर देशात तसंच मजबूत, सशक्त विरोधी पक्ष असायला हवा असं भाजपनेते नीतीन गडकरी म्हणतात हे काही चुकीचं नाही. पण काँग्रेसी नेत्यांना आपण मजबूत विरोधी पक्ष होऊ शकतो ही संधी लोकसभेत मिळालेली आहे. देशात सर्वत्र पीछेहाट होत असताना, काँग्रेसी नेत्यांचं, नेहरू-गांधीजींच्या कार्यकर्तृत्वाची टवाळी केली जात असताना मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही उत्साह दिसून येत नाही. नेहरूंनी रचलेला आधुनिक भारताचा पाया, इंदिरा गांधींनी केलेली कामं, राजीव गांधींनी आणलेली संगणकीय क्रांती, शिवाय काँग्रेसनं आपल्या ध्येयधोरणांनी, निर्णयांनी देशाला दिलेला आकार नव्यापिढीपुढं आणला जात नाही. त्यांच्याविरुद्ध केल्या जाणाऱ्या गोबेल्सनीतीला नवी पिढी बळी पडत असताना काँग्रेसी नेत्यांकडून त्याबाबत मौन पाळलं जातंय. काँग्रेसजनांमध्ये हतोत्साह आहे. आपल्या त्या नेत्यांचं स्मरण, जागरण होतच नाही. किंबहुना त्यांचं विस्मरणच केलं गेलंय. त्या दिव्यत्वाची प्रचिती नव्यापिढीपुढं ठेवण्याची गरज असताना मात्र स्थानिक काँग्रेसी नेतृत्व भलत्याच गोष्टीत रममाण झालेलं दिसतंय. एखादे राहुल गांधी किंवा हर्षवर्धन सकपाळ हे पुरेसे पडणारे नाहीत. त्यांना साथसंगत हवीय. त्यासाठी सामूहिक प्रयत्न हवेत. मूल्याधिष्ठित राजकारणाची कास धरण्याऐवजी खोट्या, फसव्या आणि तत्वहीन राजकारणातच सारे गडबडा लोळताना दिसताहेत. आपल्याकडंच्या खणखणीत नाण्यासारख्या नेतृत्वाकडे डोळेझाक करत इतरेजनांसारखं काँग्रेसी बागडताहेत याचं शल्य जुन्या जाणत्या काँग्रेसी मंडळींना वाटतंय. पण त्यांच्या मौलिक सल्ल्याकडं दुर्लक्ष केलं जातंय. त्यांना अव्हेरलं जातंय. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा उज्ज्वल कार्यकाळ लोकांसमोर आणण्याची कधी नव्हे इतकी आज गरज निर्माण झालीय! सत्तेच्या, मतांच्या आणि संख्येच्या राजकारणात काँग्रेस पक्ष हा कमकुवत बनलाय हे जरी खरं असलं तरी जनतेच्या मनांत अजूनही एक हळवा कोपरा त्यांच्यासाठी शिल्लक आहे. त्याला पक्ष साद घालताना दिसत नाही. नेहरू-गांधी यांचं राजकारण कसं प्रभावशाली होतं हे त्यांना सांगताच येत नाही. नुकत्याच झालेल्या युद्धबंदीच्या काळात इंदिरा गांधी, नेहरू, अटलबिहारी वाजपेयी यांची वक्तव्यं सोशल मीडियावर फिरताहेत. तत्कालीन स्थिती अन् आजची स्थिती याची तुलना होतेय . विरोधाभास दाखवला जातोय. काँग्रेस पक्षाला स्वकर्तृत्वाची ओळखच राहिलेली नाही. जुन्या धेंडांना बाजूला सारून नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांच्या हाती पक्षाची सूत्रं, धुरा सोपवायला हवी, त्यांच्यात स्फुल्लिंग चेतवायला हवंय. काँग्रेसचं झाकोळलं गेलेलं कार्य अन् वैभवशाली परंपरा लोकांसमोर आणण्यात सहकार्य मिळेल. भाजपनं वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची बदनामी विद्वेषाच्या माध्यमातून चालविलीय. ती रोखण्याची इच्छाशक्ती निर्माण व्हायला हवी. रणांगणात उतरलेल्या अर्जुनाची जशी अवस्था झाली होती तशी आज काँग्रेसची झालीय. 'काँग्रेसी इतिहासाची भगवद्गीता' सांगणारा श्रीकृष्ण येण्याची वाट तर ते पाहात नाही ना....? असं वाटावं अशी स्थिती आहे!
- हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...