Saturday, 24 May 2025

संस्कारांचा अनमोल ठेवा 'श्यामची आई. '*अभिनेत्री वनमाला...!*

संस्कार म्हणजे नक्की काय? बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणं, मोठयांचा आदर करणं, खरं आणि प्रेमानं बोलणं, नियमांचं पालन करणं... यादी नक्कीच लांबत जाईल. पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसं? संस्कार हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत रूजवायचं असतात. संस्कारांचा अनमोल ठेवा मागच्या शतकात साने गुरूजी यांनी 'श्यामची आई' रूपानं लिहून ठेवला आहे. साने गुरूजींनी आपल्या आईच्या आठवणी आणि अंत:करणापासून आईला वाहिलेली श्रघ्दाजंली 'श्यामची आई' पुस्तकावर कितीतरी पिढ्या संस्कारक्षम झाल्या. 
१९५३ साली प्र.के.अत्र्यांनी ह्या पुस्तकावर चित्रपट काढायचा ठरवला. चित्रपटाचा बाल नायक श्याम म्हणून होता बाल कलाकार माधव वझे आणि आईच्या भूमिकेत त्यावेळच्या उच्च शिक्षित शिक्षिका संध्या पवार अर्थातच वनमाला. चित्रपट जरी १५३ मिनिटांचा असला तरी एकदा पाहिलेल्या ह्या उत्तम चित्रपटाचा परिणाम मात्र आयुष्यभर राहतो. राहीला आहे. अभिनेत्री वनमाला यांचे पिता ‘कर्नल रावबहादुर बापूराव आनंदराव पवार’ मालवा प्रांतचे कलेक्टर आणि कमिश्नर पदावर असून ग्वालियर महाराजा ‘माधवराव सिंधिया-प्रथम’ द्वारा आपल्या असामयिक निधनापूर्वी राज्य देखरेखकरिता संगठीत केलेल्या ट्रस्टचे सदस्य ही होते. वनमाला यांचा जन्म २३ मे १९१५ उज्जैन इथला... त्यांचं शिक्षण पूर्णतया ग्वालियर संस्थान राजसी पद्धतीनं झालं होतं. खास करून त्यांचं शिक्षण राजवी परिवारच्या मुलांच्या शिक्षण करत असलेल्या ‘सरदार डॉटर्स स्कूल’ मध्ये झालं होतं.
ग्वालियरहून त्यांनी बी.ए. आणि नंतर मुंबई इथं एम.ए. करत असताना आई वारल्यानं शिक्षण अर्धवट सोडून त्यांना ग्वालियर परत यावं लागलं होतं. वनमाला यांचा चित्रपट प्रवेश योगायोगानंच झाला होता. पुण्यात त्यांच्या मावशीकडे राहत असताना लेखक, रंगकर्मी आचार्य अत्रे यांच्यामुळं त्यांचा परिचय व्ही.शांताराम, मास्टर विनायक आणि बाबूराव पेंढारकर या सारख्या महान चित्रपट कर्मी बरोबर झाला होता. बापू व्ही. शांताराम यांनी वनमाला यांना स्वतःचे सहाय्यक-निर्देशिका म्हणून आपल्याबरोबर काम करत राहण्याचा प्रस्ताव दिला असता यांनी तो नाकारला होता. परंतु त्यांचा नवीन चित्रपट ‘लपंडाव'ची नायिकाची भूमिका मात्र त्या नाकारू शकल्या नाहीत. हा ‘लपंडाव’अभिनेत्री बेबीनंदाचे पिता मास्टर विनायक यांची कोल्हापुर स्थित कंपनी ‘नवयुग चित्रपट’ यांचा चित्रपट होता. जो साल १९४० प्रदर्शित झाला होता. ‘लपंडाव’च्या प्रीमियरवेळी त्यांची ओळख चित्रपट निर्माते, अभिनेते सोहराब मोदी यांच्या बरोबर झाली. सोहराब मोदी त्यांच्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटाच्या नायिकेच्या शोधात होते. ‘लपंडाव”च्या वनमाला यांच्या अभिनयानं प्रभावित होऊन सोहराब मोदींनी सिकंदरमधली ‘रूखसाना’ची भूमिका साठी त्यांची निवड केली आणि साल १९४१ मध्ये ‘सिकंदर’ प्रदर्शित झाला. ‘सिकंदर’चे नायक पृथ्वीराज कपूर होते. ‘सिकंदर’ त्याकाळी जबरदस्त हिट चित्रपट झाला होता आणि वनमाला यांना स्टारचा दर्जा रातोरात मिळाला होता. यांची शैक्षणिक योग्यता पाहून त्यांच्या पोस्टरवर जाहिरात करताना त्यांच्या नांवापुढं  ‘वनमाला बी.ए.बी.टी.’ असं लिहिलं जात असे. परंतु खरं तर वनमाला यांचा चित्रपट प्रवेश त्यांच्या परिवार आणि सामाजिक दर्जा यावर फार मारक ठरला होता. कुटुंबातून त्यांना प्रखर विरोध झाला आणि वडिलांनी तमाम नाती संबंध तोडून टाकीत त्यांना स्वगृही ग्वालियर येण्यास कडक प्रतिबंध केला होता. ‘सिकंदर’ नंतर वनमाला यांनी किमान २२ हिंदी आणि १० मराठी चित्रपटात  नायिकाची भूमिका केल्या होत्या... ‘वसंतसेना’, ‘राजारानी’ ‘दिल की बात’ आणि ‘आरती’ यासारख्या चित्रपटात त्यांनी आपल्यासाठी गाणीही गायली होती. पुढे त्यांनी आचार्य अत्रे बरोबर लग्न ही केले आणि ‘अत्रे पिक्चर्स’ची एक भागीदार म्हणून काही हिंदी आणि मराठी चित्रपट निर्माण केले होते. त्यापैकी ‘श्यामची आई’ हा गाजलेला चित्रपट होता. ‘अत्रे पिक्चर्स’च्या बैनर खाली निर्मित ‘श्यामची आई’ चित्रपटाला राष्ट्रपती डॉ.राजेन्द्र प्रसाद यांच्या हस्ते साल १९५३ मध्ये प्रथम ‘राष्ट्रपति पुरस्कार’ म्हणून सम्मानित केला गेला होता. श्यामची आई अर्थात वनमाला यांनी ती भूमिका यथार्थ आणि प्रभावीपणे साकारली होती. माधव वझे यांनी 'श्याम' म्हणून बाळ कलाकारची भूमिका केली होती. इतकं कौतुक, प्रसिद्धी असूनही वनमालाच्या वडिलांची नाराजी कमी झाली नव्हतीच. त्यांचे स्नेही ग्वालियर नरेश जीवाजीराव सिंधिया आणि  गुजरातचे सचिन संस्थांचे नवाब हैदरअली याबाबत ख़ासे चिंतित राहत असत. त्यांच्या समजुतीने वडिलांनी वनमाला याना माफ तर केलेच, पण अट अशी घातली होती की त्यांनी चित्रपटात काम करणं समूळपणे बंद केलं पाहिजे. वनमाला यांनी ती अट मान्य केली आणि अशा तऱ्हेने ‘श्यामची आई’ वनमाला यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर त्या धार्मिक, आध्यात्मिक संस्कार असल्याने अधिकतर यात्रा धाम मथुरा-वृंदावन इथल्या मंदिर स्थानी राहिल्या होत्या. पुढे सिनेमाच नाही तर तमाम भौतिक सुख-सुविधाचा त्याग करून संन्यास धारण करणाऱ्या अभिनेत्री वनमाला या मथुरा, वृंदावनमध्ये सुशीलाबाई म्हणून प्रसिद्ध होत्या. शेवटच्याअवस्थेत त्या मुंबईस्थित त्यांच्या लहान बहीण सुमतिदेवी धनवटे यांच्या घरी राहत असत. आजारपण आणि वृद्धत्वने त्यांचे २००७ साली ग्वालियर इथं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले होते. हिंदी आणि मराठी सिनेमाच्या पूर्ण इतिहासात अभिनेत्री वनमाला यांचासारखं अध्यात्म  आणि कला याचा इतका अद्भुत संगम पहायला मिळणे कठीणच आहे. त्या काळी वनमाला सर्वात जास्त शिक्षित आणि तेजमिजाजी सुंदर अभिनेत्री होत्या. तलवार बाजी, घोडेस्वारी आणि निशाने बाजीत निपुण होत्या. परंतु दुर्दैवाने अशा निष्णात आणि हुशार अभिनेत्रीच्या प्रतिभेचा एकही दिग्दर्शकाने उपयोग करून घेतला नव्हता. आचार्य अत्रे साहेबांचा चित्रपट 'चरणों की दासी' पासून ते शेवटचा चित्रपटपर्यंत फक्त सोशिक अश्रुपूर्ण आणि सामान्य भूमिकाच त्यांना मिळाल्या होत्या.

No comments:

Post a Comment

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...