कुणाल कामराच्या पाऊण तासाच्या स्टँड अप कॉमेडी शोमुळे महाराष्ट्रात आणि देशात हलकल्लोळ उडाला. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाला म्हणून कुणाल कामरावर हल्ला करण्यासाठी शिंदेसेनेचे लोक वाट पाहताहेत. त्यातल्या काहींना तर 'तामिळनाडूला कसं पोहोचायचं' असा प्रश्न पडला आहे. यूट्युबवरचे शो कसे रेकॉर्ड किंवा अपलोड होतात, याची समज नसलेले लोक 'कामरा आता तर होता... इतक्यात कुठं गेला?' असं अचंबित होऊन विचारत होते. हा आपल्या राजकीय कार्यकर्त्यांचा पक्षनिरपेक्ष 'आयक्यू' आहे. हॅबिटॅट स्टुडिओची मोडतोड हा कार्यकर्त्यांच्या भावनेचा उद्रेक आहे, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. कामराच्या फोटोला जोडे मारणं, जीवे मारण्याच्या धमक्या देणं वगैरे सगळं सांगोपांग झालं आहे. अनायासे विधिमंडळाच्या अधिवेशनातही कामरावर टीकेचा वर्षाव झाला. कामराने माफी मागायला नकार दिला आहे आणि आठवड्याभरात पोलिसांसमोर हजर राहणार असं कळवलं आहे. तो जेव्हा हजर होईल, तेव्हा शिंदेसमर्थक त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतील. खरंतर त्याला अटक करावी अशी परिस्थिती नाही, पण एकनाथ शिंदे यांचा इगो सुखावण्यासाठी किंवा आगामी जनसुरक्षा विधेयकाची पायाभरणी करण्यासाठी त्याला तुरूंगात टाकलं जाईलही. पण ते उद्याचे प्रश्न आहेत. आजचे प्रश्न काय आहेत?
कामराने कार्यक्रमात चार-पाच गाणी सादर केली. त्याआधी तो असं म्हणाला की, 'एकाच फॉर्ममध्ये लोकांना कशाला ऑफेंड करायचं?' त्याने कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन, आनंद महिंद्र, सुधा मूर्ती, अंबानी कुटुंबाच्या लग्नातला ओंगळ बडेजाव या सगळ्यावर टीका केली. त्यातलं एक गाणं शिंदेंच्या बंडावर आहे. या बंडाला ऐतिहासिक ठरवून त्यावर स्वत: शिंदे विधिमंडळात भरभरून बोलले आहेत, इतकं की फडणवीसांनी 'सगळं सांगायचं नसतं', असं त्यांना सभागृहातच सांगितलं. त्याचं थेट प्रक्षेपण झालं आहे. ज्या शब्दाला शिंदे स्वैराचार, व्यभिचार, सुपारी घेणं असं म्हणतात; तो शब्द विरोधकांनी विधिमंडळात, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उच्चारला आहे; फ्लेक्सवर मिरवला आहे. कामराने फक्त तो शब्द एका उडत्या चालीच्या लोकप्रिय गाण्याचा आधार घेऊन वापरला आणि लोक त्यावर बेहद्द खुश झाले. शिंदेसेनेने थोडी प्रगल्भता दाखवली असती तर कामराचं गाणं यूट्युबपुरतं राहिलं असतं. पण शिंदेंचे मंत्री, कार्यकर्ते, खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा शब्द प्रतिष्ठेचा केल्यामुळे धर्मवीर १ आणि २ या सवंग सिनेमांमधून कोट्यवधी रुपये खर्चून जी प्रतिमानिर्मिती केली होती ती लोकांनी फुकटात उधळून लावली.
फडणवीस कामराने मोदी-शाहांवर केलेल्या स्फोटक टीकेवर का बोलले नाही? फडणवीसांनी 'कामराने माफी मागावी' असं म्हणून शिंदेंची पाठराखण केल्याचं भासवलं आहे. मात्र, मोदी-शाहांवर कामराने केलेली स्फोटक टीका अनुल्लेखाने मारली आहे. योगायोग म्हणजे 'टीका हा लोकशाहीचा आत्मा आहे' असं पंतप्रधान अलीकडेच एका पॉडकास्टरला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत. फडणवीसांचा खरा रोख वेगळाच आहे. 'डावे उदारमतवादी आणि शहरी नक्षल हे सारखेच आहेत' असं ते सभागृहात म्हणाले आहेत. म्हणजे कामरा, त्याचा कार्यक्रम आवडणारे हे सगळेच शहरी नक्षल आहेत का? का व्यवस्थेविरुद्ध विनोद करणारे सगळेच त्या व्याख्येत बसतात? एखादी कविता, चित्र, व्यंगचित्र, समाजमाध्यमावरची एखादी पोस्ट यातल्या ज्या कशाने, ज्या कुणा प्रबळ हितसंबंध असणाऱ्याचं मन दुखावेल ते सगळं या व्याख्येत बसू शकेल. शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुख्यमंत्री त्यांचा आणि एकूणातच संघ-भाजपचा राज्यातल्या बहुमताने पुढे रेटता येईल असा अजेंडा बेमालूमपणे पुढे नेताहेत. धार्मिक उन्मादाने न्हाऊन निघालेल्या मराठी समाजाला हे कळतंय का आणि कळलं तरी काही फरक पडतोय का? विधानसभेतल्या दारुण पराभवातून अजूनही विरोधक नीट सावरलेले दिसत नाहीत. ठाकरेसेनेला हिंदुत्वाच्या नादी लागूनच आपली ही अवस्था झाली आहे आणि महाराष्ट्राचा मराठीवादी प्रादेशिक पक्ष ही ओळखच आपल्याला तगवू शकते हे अद्याप कळलेलं दिसत नाही.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांचे उपपक्ष आहेत. काँग्रेस पक्षात पराभवाची जबाबदारी कोणावर ढकलायची यावर पुरेसं मंथन झालेलं दिसत नाही. त्यामुळे ते एकदिलाने पक्ष अधिक गाळात जाण्याची वाट पाहत आहेत. मनसे, वंचित, प्रहार, एमआयएम इत्यादी पक्ष-आघाड्यांचा अस्तित्वाचा लढा सुरू आहे. त्यामुळे बूमपलीकडे जाऊन लोकांचे प्रश्न त्यांनी हाती घ्यावेत, ही अपेक्षा त्यांच्यावर अन्याय करणारी आहे. संतोष देशमुख-सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येपासून कामराच्या विनोदापर्यंत सर्व बाबींकडे या संदर्भात पाहिलं पाहिजे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना जेरीस आणणारे सुरेश धस आणि अंजली दमानिया यांच्या हेतूबद्दलही शंका येते. पारदर्शकतेचा अपार सोस असलेल्या धसांचा नेमका धनंजय मुंडेंच्या चार तासांच्या भेटीबाबतच 'संजय सिंघानिया' कसा होतो? कुणाल कामराने अमुक एक विनोद करायला नको होता, असं अंजली दमानिया कशाच्या आधारे सांगतात? राजकीय विनोद या विषयाचा त्यांचा व्यासंग आहे का? संतोष देशमुखांसाठी अटीतटीने अश्रू ढाळणारे धस सोमनाथच्या कुटुंबीयांना 'मात्र पोलिसांना माफ करा' असा सल्ला देऊन लाँग मार्च कोणाच्या इशाऱ्यावर मोडून काढतात? जे मुख्यमंत्री सोमनाथचा मृत्यू पोलीस मारहाणीत झालाच नाही, असं सभागृहाला सांगतात, त्यांना भेटून प्रकाश आंबेडकर काय सिद्ध करतात? हे सगळं चालू असताना फडणवीस आणि शिंदे गळामिठी घातल्यासारखं दाखवत दोन समांतर सरकारं चालवतात. राज्यातल्या असंख्य स्थानिक स्वराज्य संस्था पूर्णत: नोकरशहांच्या ताब्यात जातात. उजव्या विचारांची सरकारं सत्तेत आली की, स्थानिक स्वराज्य संस्थांचा बेमुदत लोप का होतो? उजव्या विचाराच्या राजकीय नेतृत्वाला केंद्र, राज्य ते स्थानिक पातळीपर्यंत संसद, विधिमंडळ मुक्त नोकरशाहीकेंद्री व्यवस्था चालवणं सोयीचं जातं का?
सर्वांना हवाहवासा विकास करून देणारे नियम, कायदे फाट्यावर मारणारी गतिमान नोकरशाही आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, गुन्हेगार, भांडवलदार यांचं सिंडिकेट तयार झालं आहे का? त्यामुळे लोकांना जे खटकतं ते सत्ताधाऱ्यांना तर सोडाच, विरोधकांनाही खटकणं बंद झालंय का?यालाच महाराष्ट्राचं सहमतीचं, सुसंस्कृत राजकारण म्हणतात का? तसं नसतं तर सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूबद्दलचा उद्रेक रस्त्यावर आणि सभागृहात दिसला असता. 'महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या आजारलेपणाचा निर्विवाद पुरावा' एसटीची परवड, पाण्यासाठी वणवण, शालेय व उच्च शिक्षणातला भ्रष्टाचार आणि अनागोंदी, दावोसच्या गुंतवणुकीच्या दंतकथा, शहरांची रोगट वाढ आणि गावांचा बकालपणा यांचं सप्रमाण वस्त्रहरण हा राजकीय चर्चाविश्वाचा भाग असता. तसं होत नाही. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या आजारलेपणाचा हा निर्विवाद पुरावा आहे. कामरा बोलतो ते लोकांना भिडतं त्याचं कारण यात आहे. तो शिव्या देतो, बहुतांश सर्वसामान्य माणसंही देतात. समाजमाध्यमात एखादं मत मांडल्यावर 'आयटीसेल'मधले खरेखोटे लोक संबंधितांच्या कुटुंबीयांना बलात्काराच्या धमक्या देतात. अशा ट्रोलांना कोण फॉलो करतं ते आपण जाणतोच. समाजमाध्यमांनी लोकांच्या हाती एक शस्त्र दिलं आहे, पण काही लोकांकडे ट्रोल्स पगारी ठेवण्याइतका पैसाही दिला आहे. दुबळ्यांचा आवाज चढाच लागतो. कामरा हा लक्ष्मणच्या 'कॉमन मॅन'चं रागावलेलं रूप आहे. विशुद्धतावाद्यांना हे पटणार नाही. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावं. कामरा, वरुण ग्रोव्हर हे लोकांचा राग बाहेर काढण्याचे मार्ग आहेत. अगदी १०-१५ वर्षांपूर्वी 'टिकल ते पोलिटिकल', 'घडलंय बिघडलंय' हे कार्यक्रम मराठी वृत्तवाहिन्यांवर होत होते.
तेव्हाच्या सत्तेतल्या लोकांनी काही अपवाद वगळता ते सहन केलं ना? मग २०१४ नंतर असं काय झालंय की लोकांना विनोद झेपेना? टीका पचेना? व्यवस्थेविरूद्ध बोलणाऱ्यांना वेसण घालण्यासाठी कायदा करून सरसकट लोकांना अडकवावंसं वाटावं इतकी व्यवस्था भित्री का झाली आहे? एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना विनोद कळत नसावेत किंवा झेपत नसावेत असा अर्थ घ्यायचा का?प्रश्न सामान्य आणि शक्तिहीन माणसांचा, प्रश्न कामराचा नाहीच. प्रश्न सामान्य आणि शक्तिहीन माणसांचा आहे. आज कामराच्या मागे लोक उभे आहेत, त्याला आर्थिक मदत करताहेत. तो तसा आक्रमक आहे. पण एखादा छोटा पत्रकार, तलाठी, प्रांताच्या आणि वाळूमाफियाच्या साटेलोट्याबद्दल बोलला आणि योगायोगाने डंपर त्याच्या/तिच्या अंगावरून गेला तर? एखाद्या चळवळीतल्या कार्यकर्त्याने गुत्तेदारांना आवडणाऱ्या विकासाच्या कल्पनेला विरोध केला आणि मग तो गायबच झाला तर? एखादा शिक्षक, प्राध्यापक व्यवस्थेला आव्हान देणारं शिकवू लागला, जाहीरपणे लिहू, बोलू लागला की त्याला सेवाशर्तींमध्ये गुंतवून आयुष्यातून उठवायचा प्रयत्न झाला तर? व्यवस्थेतल्या शोषकांनी ठरवलं, तर त्यांना काहीही करता येणं शक्य आहे. ही फक्त नमुन्यादाखलची उदाहरणं आहेत. गांधींना प्रात:स्मरणीय मानून त्यांच्या हत्येला वध मानणारे लोक आपल्याकडे आहेत. २०१४ आधी 'आम्ही तुमचेच' असं म्हणून काँग्रेसवाल्यांच्या मांडीवर बसणारे २०१४ नंतर आपल्या मूळ प्रवाहात विलीन झाले. एवढंच नव्हे तर 'एकतर आमचे व्हा किंवा बहिष्कृत व्हा' अशी संघटित अरेरावी करू लागले. त्या रेट्याने आणि न-नैतिक वृत्तीमुळेही फक्त उच्चवर्णीयच नव्हे तर वंचित-बहुजनांपैकीही अनेक जण समरसतेच्या स्पर्धेत उतरले. अल्पकाळात टोप्या बदलून जास्तीत जास्त गोष्टी पदरात पाडून घ्यायच्या तर राजापेक्षा राजनिष्ठ होऊन कंठशोष करता आला पाहिजे. कामरा प्रकरणात तेच चालू आहे. या नवनैतिकतेची कवचकुंडलं म्हणजे विस्मृती आणि कोडगेपणा ही असल्यामुळेच अजित पवार – 'तेव्हा मी विरोधी पक्षनेता होतो म्हणून त्यांना गद्दार म्हणालो' - असं चेहऱ्यावरची रेषही न हलवता म्हणतात. अशांची मोट म्हणजे विकासासाठी एकत्र येऊन झालेलं पाशवी बहुमत. त्याचा मुखवटा कोणीही असो - चेहऱ्यांचा स्रोत एकच आहे आणि तेच भयसूचक आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्हींनाही आपापल्या राजधर्माचा, कर्तव्यधर्माचा विसर पडलेला आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी नागरी समाजातून कोणी तरी पुढं येणं आवश्यकच होतं. कुणाल कामरा हे त्याचं ताजं उदाहरण आहे. कामराचा बळी द्यायचा की राजकारणाचं विडंबन थांबवण्यासाठी संघटित विचार व कृती करायची हा निर्णय आपण घ्यायचा आहे.
No comments:
Post a Comment