Monday, 12 May 2025

साथी यदुनाथजींचा विसर...!

आज त्यांचा स्मृतिदिन...! यदुनाथ दत्तात्रय थत्ते हे नाशिकच्या येवल्यातलं रोपटं, पुण्यात वाढलं, फोफावलं आणि बहरलंही. वृक्ष झाल्यावर अनेकांना मायेची पाखर घातली, ऊब दिली होती. आज त्यांना जाऊन २४ वर्षे पूर्ण झाली. गेल्यावर्षी त्यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष होतं. त्यांच्याशी खूप कमी संबंध आला. यदुनाथजी साधना साप्ताहिकाच्या कार्यालयात कायम दिसत. आम्ही तिथं प्रधान मास्तरांना भेटायला जात असू. तिथं नाना डेंगळेही असायचे. १९८५ साली बाबा आमटे यांनी काश्मीर ते कन्याकुमारी असं भारत जोडो आंदोलन सुरु केलं होतं. त्यावेळीही यदुनाथजींचं कार्य जवळून पाहता आलं होतं. 
साधनेत आमचं फारसं जाणं नव्हतं. नानासाहेब गोरे संपादक असताना जात असे. पण वसंत बापट यांचं आमचं जमलं नाही. बाबा देशपांडे, श्री.न.देशपांडे यांच्यामुळं बापटांना आम्ही मान देत असू. पण ते त्यांच्याच तोऱ्यात असत. मोर्चे-आंदोलनं यांच्याशी त्यांचा संबंध आला होता की नाही तेच जाणे. बापट समाजवादी नव्हते ते पसायदानवादी होते. ते अपघातानं समाजवादी गोटात आले असावेत. पण यदुनाथजी मात्र अस्सल समाजवादी होते. यदुनाथजींनी साने गुरुजींच्या छायेत राहून लिखाणाचा गुण उचलला होता. त्यांनी इतकं लिखाण केलं की, त्या काळात मुलांसाठी पुस्तकं लिहिणाऱ्या आघाडीच्या लेखकात त्यांची गणना होत होती. ते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभे होते. पण मधु मंगेश कर्णिक या मुंबईकर पुरोगामी साहित्यिकानंही अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली होती आणि जमवाजमवही चांगलीच केली होती. यदुनाथजींनी परिस्थितीचा अंदाज घेऊन निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. माधव गडकरी हे खटपटी संपादक होते. त्यांनीच या माघारीमध्ये यशस्वी मध्यस्थी केली. कवयित्री इंदिरा संत यांच्या मराठी साहित्य संमेलनाच्या उमेदवारी विरोधात माधव गडकरींनी आघाडी उघडली आणि रमेश मंत्री या विनोदी लेखकाला निवडणूक रिंगणात उतरवलं होतं आणि एका चांगल्या कुलीन जेष्ठ कवयित्रीला संमेलनाध्यक्ष पदापासून दूर ठेवलं. वास्तविक रमेश मंत्रीची तुलना साहित्यिक म्हणून इंदिरा संत यांच्याशी होऊ शकत नव्हती. पण लॉबिंग करुन एका चांगल्या कवयित्रीला अध्यक्षपदापासून दूर ठेवलं गेलं. यदुनाथजींना संमेलनाध्यक्ष पदाचा मोह नव्हता आणि निवडणूक लढवून आघाडी उघडणं हा त्यांचा पिंड नव्हता. त्यांनी एकदा सावरकरांवर साधना साप्ताहिकाच्या अंकात लेख लिहिला होता. त्यावरुन नेहमीप्रमाणे चिडून हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी एस पी कॉलेजसमोर त्यांना मारहाण केली होती. खरं तर मारहाण करण्याचं काहीही कारण नव्हतं. जर लेखन आक्षेपार्ह होतं तर खटला भरायचा होता, गुन्हा दाखल करायचा होता. पण तसं केलं नाही. कारण तसं केलं असतं तर यदुनाथजींनी पुरावे दिले असते अन माहित नसलेल्या घटनाही जनतेला माहीत झाल्या असत्या.
यदुनाथजी १९५७ पासून तब्बल सव्वीस वर्षे साधना साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांची खरी कसोटी १९७५ सालच्या राजकीय आणीबाणीत लागली होती. संपूर्ण देशाला त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याचा धडा दिला होता. दैनिक मराठवाडाचे संपादक अनंत भालेराव, दि इंडियन एक्स्प्रेसचे रामनाथजी, कुलदीप नय्यर यांनीही आपला बाणा दाखवत तुरुंगवास भोगला होता. यदुनाथ थत्ते हे नाना समाजोद्योग करणारे उद्योजक होते. त्यांची पहिली भेट तात्या बोराटे यांच्या सायकलच्या दुकानात झाली होती. यदुनाथजी अनेकदा एस पी कॉलेजसमोर विजयकुमार चोकसी या गृहस्थांच्या स्टेशनरी दुकानात दिसत होते. बहुतेक ते राष्ट्रभाषा संस्थेशी संबंधित होते. १९७२ साली यदुनाथजींच्या साधना परिवारातल्या सहकाऱ्यांनी आंतरभारतीच्या हॉलमध्ये संगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला चांगली रंगत चढली होती. रात्रही वाढत चालली होती. तेवढ्यात कार्यक्रमाचा मध्यंतर झालं. रात्रीचे बारा वाजले होते आणि स्टेजवर एसेम अण्णा चढले. त्यांनी घोषित केले की, ऑक्टोबरची पाच तारीख आहे, कार्यक्रमाची जशी इंटरव्हल होत आहे तशीच आपल्या यदुनाथजींच्या जीवनाचीही इंटरव्हल होत आहे. यदुनाथजींनी आपल्या आयुष्याची पन्नास वर्षे पूर्ण केली आहेत. टाळ्यांच्या कडकडाटानं हॉल दणाणून गेला. यदुनाथजी गोंधळून कावरेबावरे होऊन आश्चर्य चकित झाले आणि गोंधळूनही गेले. आपला वाढदिवस आहे हे त्यांच्या ध्यानी मनीही नव्हतं. पण सहकाऱ्यांना हे ठाऊक होतं त्यांनी कट केला होता की, यदुनाथजींना पन्नासाव्या वाढदिवसाला प्रेमाची भेट म्हणून स्कूटर द्यायची आणि देईपर्यंत कोणीही कोणीही कटाचा सुगावा लागू द्यायचा नाही. तसंच झालं, जेव्हा स्कूटर भेटीची घोषणा झाली तेव्हा पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि यदुनाथ आणखीनंच गोंधळून गेले. एरवी उत्कृष्ट भाषण देणाऱ्या यदुनाथांना उत्तरादाखल दोन शब्द बोलणंही जड गेलं. कार्यक्रम पार पडला, सगळी पांगापांग  झाली. पण यदुनाथजींना झोप आली नसावी. दोन दिवसांनी त्यांनी स्कूटर साधना ट्रस्टकडं सुपूर्त केली आणि ज्यांचे पैसे त्यांना परत पाठवले होते. त्यादिवशी मित्रांना अपरिग्रही, निस्वार्थी, साध्या आणि सत्वशील यदुनाथचं दर्शन घडलं होतं. सहकाऱ्यांना वाईट वाटलं त्याचवेळी आपल्या मित्राचा अभिमानही वाटला. यदुनाथ थत्ते हे दैनिक सकाळमध्ये 'मुल्क परस्त' या टोपण नावानं मुस्लीम मनाचा कानोसा हे सदर लिहित. बरेच दिवस आम्हाला ठाऊक नव्हतं. १९५० साली भारत इतिहास संशोधक मंडळाच्या शेजारी सदाशिव पेठेत तिसऱ्या मजल्यावर यदुनाथजींची एक खोली होती. म्हणायला ती यदुनाथजींची होती. तीचा वापर बापू काळदाते बाबा पाटील, राजा मंगळवेढेकर, टण्णू हेच करीत असत. यदुनाथजींनी ती खोली खास लिखाण कामाकरीता घेतली होती. तिथंच त्यांचं बहुतेक लिखाण लिहिलं गेलं होतं. साने गुरुजींची धडपडणारी मुलं म्हणवून घ्यायला अनेकांना आवडत असे. त्यावर अनेक दिवस भाव खाल्ला. पण भावनेची थोरवी आचरणात आणली ती विज्ञानिष्ठ यदुनाथांनीच! त्याच झिंगेत ते भारतभर फिरले. खांद्यावर पिशवी मिळेल त्या वाहनानं फिरत. आंतरभारतीचं खरं काम त्या काळातच उभं राहिलं. कथामाला, सेवा दल, मुस्लीम सत्यशोधक मंडळ, आनंदवन, बाल आनंद मेळा, एक गाव एक पाणवठा सगळीकडं सहस्त्रभुजा असल्यासारखं तलवारबाजी, दांडपट्टा चालू होता. यदुनाथांचं सत्तर टक्के आयुष्य फिरस्तीपायी उंबऱ्याबाहेर गेलं असावं, घरी आलं तरी उसंत नव्हती. कुठंतरी मिटींग, सभा, चर्चा ठेवली जात असे. भारतीय समाजाला एक वाईट खोड आहे मदत करणाऱ्या माणसाला पार पिळून सगळा रस काढून घ्यायचा, त्यांचं पार चिपाड करायचं, त्राण राहिलं नाही की लक्षही द्यायचं नाही, जणू आम्ही काय देणं लागत नाही. असे कित्येकजण विपन्नावस्थेत फकिरासारखं अखेरंच आयुष्य, कंठीत होते. नशिबी 'नाही चिरा,नाही पणती...!' यदुनाथ थत्ते या पिढीला माहित नाहीत पण माहित होणं यासाठी गरजेचं आहे की, असाही एक आजोबा होता की ज्यानं बालकांचे मळे आनंदाने फुलवले होते. हास्य निर्माण केले होते. हे समजणं गरजेचं आहे. त्यांच्या स्मृतीचं निमित्त करुन साधना परिवाराने निदान पंचवीस वर्षे साधनेचे संपादक होते, याची जाण ठेवून हे काम करावं, अशी वाजवी अपेक्षा आहे. 

No comments:

Post a Comment

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...