Saturday, 4 April 2026

किशोर सरपोतदार : अस्सल पुणेकर

आमचे सन्मित्र, पाककला क्षेत्रातले दिग्गज पूना गेस्ट हाऊसचे आणि सरपोतदार केटरर्सचे किशोर सरपोतदार यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... त्यांना दीर्घायुष्य लाभो ही प्रभुचरणी प्रार्थना....! 
किशोर सरपोतदार यांचा जन्म ४ एप्रिल १९५९ रोजी पुण्याचा. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातलं एक बहुआयामी, उत्साही व्यक्तिमत्त्व! जगन्मित्र, अजातशत्रू स्वर्गीय चारुदत्त उर्फ चारूकाका सरपोतदार यांचे पुत्र! किशोर सरपोतदार हे देखील असंच वेगळं व्यक्तिमत्त्वच आहे. नानासाहेब सरपोतदार यांचा वारसा किशोरजींना लाभलाय. पुण्याच्या सार्वजनिक जीवनात त्यांचं विशेष स्थान आहे. गेल्या तीन पिढ्यांमधले नाट्य-चित्रपट कलावंत, निर्माते, दिग्दर्शक यांच्यासाठी ‘पुण्यातला घरचा हक्काचा माणूस’ अशी ख्याती त्यांनी मिळवलीय. ते अनेक संस्थांचे व्यक्तींचे आधारस्तंभ आहेत. त्यांचा चवीपासून सामाजिक कार्यापर्यंतचा चारूकाका यांचा वारसा जपलाय. पायंडे जपत पूना गेस्ट हाऊस, सरपोतदार केटरर्स याची वाटचाल सुरू आहे. किशोर यांचं शालेय शिक्षण शिशु विहार, मॉडर्न हायस्कूल आणि गरवारे महाविद्यालयात झालंय. व्यवस्थापन शास्त्राची डिग्री घेतलीय. किशोर यांनी ‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटात राजा परांजपे यांच्या लहानपणाची भुमिका, मृणाल कुलकर्णी यांच्या ‘रमा माधव’ सह अशा अनेक चित्रपटात भुमिका साकारल्यात. अनेक व्यावसायिक ब्रँडसाठी मॉडेलिंग केलेलंय. मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन घरच्याच व्यवसायात लक्ष घातलं. काळाची गरज ओळखून  उपाहारगृहात बदल केले. नवनव्या गोष्टी करण्याचा, आव्हानं स्वीकारण्याचा चारूकाकांचा वारसाही त्यांनी आत्मसात केलाय. त्यामुळे अनेक मोठ्या कार्यक्रमांना केटरिंगची जबाबदारी त्यांच्याकडेच असते. तळजाई पठारावर ४० हजार स्वयंसेवकांच्या उपस्थितीत पार पडलेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिबिर असो, ‘उंबरठा’चं शूटिंग असो, की ‘जाणता राजा’चे राज्यभरातले प्रयोग असोत; खानपान व्यवस्थेसाठी किशोर सरपोतदार हे एकमेव नाव असतं. राजीव गांधी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांच्या उपस्थितीत पुण्यात एक मोठा कार्यकर्ता मेळावा झाला. तेव्हा हजारो लोकांना एकावेळी बुफे तोही पुण्यात पहिल्यांदाच पुरविण्याचा पराक्रम किशोर यांनी केलाय. पुण्यात झालेली अखिल भारतीय मराठी साहित्य आणि नाट्य संमेलनातल्या रसिकांची जेवणाची व्यवस्था किशोर यांच्याकडेच असते. अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान कलावंतांना जेवू घालणाऱ्या किशोर यांनी १९८५ मध्ये देशातला पहिला ‘फूड फेस्टिव्हल’ फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर केला. शंभरहून अधिक पदार्थ अगदी हुरड्यापासून चायनीजपर्यंत अशी रेंज असलेल्या या महोत्सवाला तुफान प्रतिसाद मिळाला. यातल्या  उत्पन्नातले एक लाख रुपये ‘श्रीवत्स’ला दिले गेले. केईएम रुग्णालयातल्या वीस रुग्णांचे जेवणाचे डबे  मोफत पुरविले जातात. शहरात समारंभ, कार्यक्रमातले जेवणावळीनंतर शिल्लक अन्न स्वखर्चानं वाहतूक करून ते गरिबांना वाटण्याचं काम किशोर करतात.‘एमसीसीआय’चे सर्व उपक्रम, कन्स्ट्रो, एक्सपो, महाटेक, किसान अशा मोठमोठ्या उपक्रमांमध्ये केटरिंगची सारी व्यवस्था किशोरकडेच असते. पुण्यात पँव्हेलियन मॉलमध्ये मराठी पदार्थांचे आऊटलेट सुरू केलंय. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी मोदक बनविण्याची कार्यशाळा घेतात. गणेशोत्सवात मोदक आणि दिवाळीत फराळ विक्री केली जाते. सणासुदीच्या काळात समाजात सर्वांना अत्यंत रास्त दरात मिठाई मिळावी, या हेतूने किशोर यांनी गेल्या ४० वर्षांपासून 'ना नफा ना तोटा' या तत्वाने मोतीचुर लाडू, चिवडा विक्रीची योजना सुरू केलीय. त्याद्वारे लो कॅलरी फराळ, डाएट फराळ, मिक्स फराळ आदी योजना सुरू केल्यात. सामाजिक बांधिलकी आणि रोजीरोटीसाठीचा व्यवहार यांचा समन्वय साधलाय.  व्यवसाय सांभाळून सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रांत सतत कार्यरत असतात किशोर यांचे चिरंजीव सनत हे आता त्यांच्या व्यवसायात मदत करत असतात. किशोर यांनी अनेक संस्थांना हातभार लावलाय. ‘प्रिझम ट्रस्ट’, ‘रेडक्रॉस’, स्वातंत्र्यवीर सावरकर वक्तृत्व समिती, पुणे केटरिंग असोसिएशन, पुणे हॉटेल असोसिएशनचे सचिव, पूना रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन, हॉस्पिटॅलिटी वर्ल्ड असोसिएशन या अनेक संस्थांचे काम ते करतात. पर्सिस्टंट कंपनीच्या ‘दे आसरा', या उद्योजक उद्योग घडविणाऱ्या संस्थेत फूड इंडस्ट्री विषयी मार्गदर्शक - मेंटोर म्हणून किशोर  आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हॉस्पिटॅलिटी विषयक 'तज्ञ सल्लागार या नात्याने किशोर काम पाहतात. निवारा वृद्धाश्रमाशी ते निगडीत आहेत. अनेक वर्तमानपत्रांत त्यांचे फूड इंडस्ट्री विषयी लेख आजपर्यंत प्रसिद्ध झाले आहेत.
किशोर यांनी 'पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच' हे स्टेज कलाकारांना उपलब्ध करून दिले असून मंचावरून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले आहेत. सध्या दर सोमवारी एखाद्या उद्योजकाला बोलावून त्यांची मुलाखत घेण्याचा उपक्रम ते राबवित असतात. संगीतातील नव्हें तर लहान मुलांच्या  कार्यक्रमापासून. पपेट शो असे कार्यक्रम करून 'पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच' आणि अजित कुमठेकर यांनी लोकांना एका धाग्यात  गुंफण्याचे काम केलंय. सरपोतदार बंधूंच्या तर्फे कामशेत रस्त्यावर ‘मिराघर’ या नावाने वृद्धाश्रम उभारले आहे. किशोर आणि अभय सरपोतदार यांच्या पूना गेस्ट हाऊसला अनेक
विविध संस्थानी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. २०२२ मध्ये पुणे गेस्ट हाऊसने  आपली शाखा  पी.एन. गाडगीळ अँड सन्स यांच्या कुडजे इथं 'झपुर्झा' या प्रकल्पात उघडली आहे. सरपोतदार कुटुंबातल्या चौथ्या पिढीनं सनत किशोर सरपोतदार आणि त्यांची पत्नी आदितीनं नव्या युगात प्रवेश केलाय. 'पूना गेस्ट हाऊस' मध्ये लोकप्रिय ठरलेली रुचकर आणि स्वादिष्ट "मिसळ, पातळ अळूची भाजी, मटार उसळ आणि मसाले भात...!" याला देशविदेशातून मागणी असल्यानं 'रेडी टू इट' पाकीटं तयार केली आहेत. त्याचा शुभारंभ अनंत चतुर्दशी आणि ९० व्या वर्धापनदिनी करण्यात आलाय. त्याचे डिझाईन आणि पॅकेजिंग माझ्या मुलानं मृणाल यानं आमच्या 'फायर फ्लाय क्रिएटिव्ह सोल्युशन' या जाहिरात संस्थेनं तयार केलंय. याचा आम्हाला अभिमान वाटतो. ही संधी सनत आणि किशोर सरपोतदार कुटुंबानं आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.

Monday, 30 March 2026

बाबासाहेबांचे अंगरक्षक मडकेबुवा...

प्रबोधनकार ठाकरे यांनी दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सवात दलितांच्या हातून गणपतीची पूजा करावी म्हणून जे आंदोलन केलं होतं त्यावेळी ज्यांच्या हस्ते पूजा केली ते हे मडकेबुवा....!
गणपत महादेव जाधव तथा मडकेबुवा यांचा जन्म - १८८५ तर निधन २८ मार्च १९४८. डॉ.बाबासाहेबांचे बॉडीगार्ड मडकेबुवा यांचं संपूर्ण नाव जरी गणपत महादेव जाधव असलं तरी ते 'मडकेबुवा' म्हणूनच प्रसिद्ध होते. हे नाव पडण्याचं कारण म्हणजे ते आधी माळकरी बुवा होते आणि भगवी वस्त्रे वापरत. ते उत्कृष्ट मेकँनिक होते त्यामुळे एका गोऱ्या साहेबाने त्यांना १९२८ साली आफ्रिकेला नेलं आणि बॉयलर मेकर म्हणून ४०० रुपये दरमहा नोकरीला लावलं. पण गोऱ्या लोकांबरोबर न पटल्याने १९२९ मध्ये ते भारतात परतले आणि मडकी विकण्याचा धंदा सुरु केला म्हणून ते 'मडकेबुवा' म्हणून प्रचलित झाले. अशिक्षित परंतु प्रचंड संघटन कौशल्य, आपले नेते डॉ.आंबेडकर आणि त्यांनी चालविलेल्या चळवळीवर पराकोटीची प्रखर निष्ठा असलेला निधड्या छातीचा धडाडीचा, करारी नेता होते. डॉ.आंबेडकरांचे ऑफिस असलेल्या दामोदर हॉलला लागून असलेल्या चाळीतल्या पहिल्या मजल्यावर मडकेबुवांचं बिऱ्हाड होतं. त्यामुळे डॉ.आंबेडकरांशी मडकेबुवांचा स्नेह जुळला. सुरुवातीच्या काळात म्हणजे १९३४ साली राजगृहात राहायला जाण्यापूर्वी याच दामोदर हॉलच्या ऑफिसात बसून बाबासाहेब आपल्या समता प्रस्थापनेच्या आणि दलित मुक्तीच्या चळवळीच्या रोजच्या रोज बैठकीतून आणि चर्चेतून मोर्चेबांधणी करत, त्यात अर्थातच मडकेबुवाही उत्साहाने भाग घेत असत. मडकेबुवा जरी अशिक्षित होते तरी त्यांची विचारसरणी अत्यंत प्रगल्भ आणि पुरोगामी होती. ते मराठीत सही करायला शिकले होते पण तीदेखील गिरवून करत असत. त्यांची रहाणी अत्यंत साधी पण टापटीप असे.
 डोक्यावर मखमलीची नक्षीदार काळी टोपी, तलम धोतर, पायात मोजे अन् बूट असा थाटाचा पेहराव ते करत. मडकेबुवांची आंबेडकरी चळवळीवरची निष्ठा, त्याग नि धडाडी प्रत्येक कसोटीवर तावून सलाखून निघालेली होती. पुणे करारापूर्वी गांधीजींच्या आमरण उपोषणाने साऱ्या देशाचे लक्ष बाबासाहेबांवर केंद्रित झालं होतं. बाबासाहेब आपल्या कोट्यावधी बांधवांच्या हक्कांवर पाणी सोडायला नव्हते. गांधीजींची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. बाबासाहेबांना धमक्यांची पत्रे येत होती; पण बाबासाहेब न डगमगता आपल्या नित्य कार्यात मग्न होते. त्यांच्या जीविताला फार मोठा धोका होता. अशा बिकटप्रसंगी मडकेबुवा बाबासाहेबांना न कळत त्यांच्या पाठीशी सावलीसारखे वावरत असत. प्रत्येक बिकट प्रसंगी बाबासाहेबांच्या जीविताचे रक्षण करण्याचं कार्य मडकेबुवांनी आपल्या जीवाची बाजी लावून लावून केलं. त्यामुळेच 'बाबासाहेबांचे बॉडीगार्ड' म्हणून ते प्रसिद्ध होते. मुंबईत बाबासाहेबांची सभा वा कोणताही कार्यक्रम असला म्हणजे मडकेबुवा अध्यक्ष किंवा स्वागताध्यक्ष असणार हे ठरलेलंच असायचे. १९३४ साली डॉ.आंबेडकरांनी स्थापलेल्या मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे ते स्वतः अध्यक्ष तर मडकेबुवा सहचिटणीस होते. बाबासाहेबांशी असलेली मडकेबुवांची जवळीक अनेकांच्या डोळ्यात खुपत असे. परंतु मडकेबुवांनी बाबासाहेबांच्या मनात जे अढळ स्थान निर्माण केलं होतं ते आपल्या त्यागाने आणि निःस्वार्थ कार्याने निर्माण केलं होतं. त्यांच्याबद्दल म्युनिसिपल अधिकारी, कार्यकर्ते आणि नेते यांना आदरयुक्त दरारा वाटत असे. बाबासाहेबांवरच्या निष्ठेने आणि अंगीकृत निःस्वार्थ कार्याने त्यांचा तसा दरारा इतरांना वाटत असे. बाबासाहेबांच्या कामगार संघटनेचे ते प्रमुख संघटक आणि प्रचारक होते. म्युनिसिपल कामगार चळवळीतले मडकेबुवा म्हणजे प्रचंड शक्ती होती. मुंबईत अनेक पदवीधर सुशिक्षित कार्यकर्ते असतानाही डॉ.बाबासाहेबांनी मडकेबुवांची मुंबई प्रदेश शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी म्हणून नेमणूक केली होती. यातूनच मडकेबुवांची क्षमता आणि पात्रता काय होती याची कल्पना येईल. हाी त्याची निष्ठेची, त्यागाची नि कार्याची बाबासाहेबांनी दिलेली पावतीच होय. १९४१ च्या सुरुवातीला डॉ. आंबेडकरांनी मुंबईच्या राज्यपालांची भेट घेऊन महार हाी लढवय्यी जमात असून ईस्ट इंडिया कंपनीची त्यांनी फार मोठी सेवा केली आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी उभारलेली पलटण सरकारने आर्थिक कारणे दाखवून बंद केली, तेव्हा महारांची एक पलटण दुसऱ्या जागतिक युद्धात प्रत्यक्ष भाग घेण्यासाठी उभारावी, अशी त्यांना विनंती केली. त्याचा परिणाम होऊन महार सैनिकांची एक बटालियन उभारण्याचे निश्चित केलं. "महारांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आणि आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी या संधीचा फायदा घेऊन सैन्यात भरती व्हावे...!" असं डॉ.आंबेडकरांनी महार तरुणांना आवाहन केलं. लवकरच 'महार रेजिमेंट' उभारण्यात आली. काहींची सैन्यभरती करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जागी नेमणूक करण्यात आली. त्यात मडकेबुवांची नेमणूक करण्यात आली होती.
मुंबईतले बाबासाहेबांचे जाहीर कार्यक्रम, सभा बैठका, त्यांची स्थळे आणि वेळ हाी मडकेबुवांच्याच मध्यस्थीने आणि पसंतीने ठरत असत. मडकेबुवांच्या विनंतीला बाबासाहेब सहसा नकार देत नसत. मडकेबुवांचे मुंबईत २८ मार्च १९४८ रोजी पहाटे राहत्या घरी हृदयविकाराने वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी वरळी स्मशानभूमीत झाला. त्यावेळी बाबासाहेब कायदेमंत्री होते. तसेच घटना निर्मितीच्या कामात व्यस्त होते. मडकेबुवांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांना अतिशय दुःख झालं आणि व्यथित मनाने त्यांनी शोक संदेश पाठविला तो असा, "बुवांच्या निधनाची वार्ता ऐकून धक्काच बसला. अस्पृशांचा एक मोठा कार्यकर्ता, कामगारांचा एक ट्रेड युनियानिस्ट आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा एक प्रभावी संघटक नाहीसा झाला आहे. मी अशी इच्छा व्यक्त करतो की, हा संदेश बुवांच्या प्रेतयात्रेच्या लोकसमूहात वाचून दाखविण्यात यावा. बुवांच्या निधनाने ओढवलेल्या आपत्तीत मी सहभागी असल्याचे त्यांच्या पत्नीला कळवा...!" वरळी स्मशानभूमीत प्रेतयात्रा सायंकाळी ७ वाजता पोहोचली. त्यावेळी बाबासाहेबांनी दिल्लीहून पाठविलेल्या हा शोक संदेश वाचून दाखविण्यात आला. मडकेबुवा मुंबई प्रदेश शे.का.फे. तसेच समता सैनिक दलाचे अध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिव देहाला समता दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
'समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर...!' या संपादक विजय सुरवाडे यांच्या पुस्तकातून साभार

Saturday, 28 March 2026

द्वेषचक्रातून बाहेर पडण्याची गरज

"लोकशाहीची नैतिक अध:पतनाकडे वाटचाल सुरू आहे! आजवर विधानभवनाच्या प्रथा, परंपरा, नियमांचं काटेकोरपणे पालन होत आलेलं. मात्र, गेल्या काही वर्षात जे घडतंय, ते लोकशाहीला मारक अन् घातक आहे. भाषेच्या स्तरावर विधिमंडळाचा दर्जा खालावलेला आहे. हे समाजाच्याच दांभिक वास्तवाचं दु:खद चित्र आहे, त्याचं विधिमंडळातही प्रतिबिंब नेहमी उमटतं. पण परवा मंगळवारी विधीमंडळात निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप देताना जी भाषणं झाली, त्यानं विधानभवनाने जुना काळ अनुभवला. झालेली भाषणं सुखद धक्का देऊन गेली. विरोधक हे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत, शत्रू नाहीत हे दिसलं. किंबहुना ते दाखवलं गेलं. आगामी काळ देखील असाच सौहार्दाचा असेल अशी आशा करायला हरकत नाही. राज्याला विकासाकडे घेऊन जायचं असेल तर अशा प्रकारचं वातावरण आश्वासक असेल. त्यासाठी साऱ्याच पक्षनेत्यांनी या द्वेषचक्रातून बाहेर पडण्याची गरज आहे...!"
---------------------------------------
*म*हाराष्ट्र विधान परिषदेत मंगळवारी एक अत्यंत दुर्मिळ आणि भावूक प्रसंग पाहायला मिळाला.  उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील निरोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्याबद्दल काढलेल्या गौरवौद्गारांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यातील ‘कलाकार’ पैलूचे कौतुक केले. त्यांच्या स्वभावात राजकारण कमी अन् एका संवेदनशील कलाकाराचे मन जास्त दडलेलंय. एकदा निर्णय घेतला की परिणामांची पर्वा न करता त्यावर ठाम राहण्याचा गुण उद्धवजींना आपल्या वडिलांकडून मिळाला आहे. हा बाणेदारपणा त्यांच्या कार्यपद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. या निरोप समारंभाच्या निमित्ताने सभागृहात काही काळ राजकीय टीकाटिप्पणी विरून केवळ आदराची भावना पाहायला मिळाली. राजकारणात विचारधारेचे मतभेद असू शकतात, कधी आपण सत्तेत सोबत असतो तर कधी विरोधात असतो, पण या पलीकडे एकमेकांचे सहप्रवासी म्हणून असलेले नाते महत्त्वाचे असते, उद्धव ठाकरे हे शब्दांचे पक्के असून नाते जपण्याचा त्यांचा मूळ स्वभाव आहे. उद्धव ठाकरे यांना सभागृहात ऐकणे हा नेहमीच एक वेगळा अनुभव असतो, त्यामुळे त्यांनी पुढील सहा वर्षांच्या कार्यकाळासाठी पुन्हा सभागृहात यावे, असे आवाहन केले. या मैत्रीपूर्ण संवादामुळे विधान परिषदेतले वातावरण अत्यंत खेळीमेळीचे झाले होते.
महाराष्ट्रात राजकीय अधोगतीला २०१९ पासून सुरुवात झालीय. सारे विधिनिषेध गुंडाळून, कोणाची कसलीही पर्वा न करता राज्यशकट हाकण्याला प्रारंभ झाला. सत्तेसाठी ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांनाच मांडीवर घेऊन सत्ता हस्तगत केली. अशा नतद्रष्टाना मानमरातब दिल्यानं लोक हताश झाले. निष्ठावान, मूल्याधिष्ठित राजकारण करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना दूर लोटलं जातंय. गुंड प्रवृत्तीच्या दंगेखोर कार्यकर्त्यांची विधिमंडळात रेलचेल सुरूय. सोज्वळ, सात्विक महाराष्ट्र काळ्याकुट्ट अंधारात चाचपडतोय. हा विद्रोही तुकारामांचा महाराष्ट्र आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा लाभलाय. पूर्वी राजकारणात कटुता नव्हती. वाद होते, संघर्ष होते. पण द्वेष नव्हता. तो गेल्या दहा बारा वर्षांत वाढला. का? कुणामुळे? याचं उत्तर महाराष्ट्राला ठाऊक आहे. या द्वेषचक्रातून बाहेर पडण्याची राज्याला आता नितांत गरज आहे. लढत राहू. सुशासन प्रस्थापित होईपर्यंत, त्याचा विजय होईपर्यंत..! मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर यशवंतरावांनी सुसंस्कृत राजकारणाचा पाया घातला, स्वर्गीय वसंतदादांनी ग्रामीण राजकारणाची गरिमा जपली, शंकरराव चव्हाणांनी शिस्त लावली. विलासराव, मनोहर जोशी, गोपीनाथरावांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली. पृथ्वीराजबाबांनी भ्रष्टाचार आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र सत्तेवर आलेल्यांकडून त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची वाताहात झाली. 
खरं तरं २००४ सालच्या निवडणुकीत राज्यात सच्छिल 'अरुण' गुजराती यांचा पराभव आणि गुंड 'अरुण' गवळी यांचा विजय झाला तेव्हाच मतदारांना काय अपेक्षित आहे याचा निकाल लागला होता. फुलनदेवी निवडून येते, भगतसिगांचा भाऊ मात्र पराभूत होतो. इतकी लोकशाहीची ही विटंबना झालीय. आपल्या सोलापूरचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांनी हे ओळखलं होतं. त्यांनी सांगोल्याची एस.टी थेट पकडली. आपल्या बॅगेत या पवित्र सभागृहातली निष्ठा, ज्ञानवंतांची भाषणं, जनतेच्या प्रती असलेली कणव, महाराष्ट्राच्या विकासाची स्वप्नं हे सर्व बहुधा दुष्काळी भागात घेऊन गेले असावेत. कारण त्यानंतर फक्त आणि फक्त सत्तेसाठीच साम, दाम, दंड, भेद अवलंबलं जातंय अन् हेच भेसूर चित्र जनतेला दिसतंय. केवळ माझ्या मुलाबाळांसाठी, सत्तेसाठी काहीही, कसंही आणि केव्हाही असंच वागणं चाललंय. अशांच्या बाबतीत मराठी माणूस कधी म्हणेल, चल... आता तुला जय आमचा महाराष्ट्र!
मागे राजकारणावर आधारित 'सिंहासन' नावाचा चित्रपट आला होता. त्यातले डॉ. लागू, निळू फुले, अरुण साधू आज हयात नसले तरी दिग्दर्शक जब्बार पटेल हयात आहेत, त्यांना सिंहासन चित्रपटाच्या शूटिंगला अनेक परवानगी अन् अडथळे होते. आता वेगवेगळ्या अँगलने चित्रीकरण झालेले टिपलेले क्षण त्यांना सहज उपलब्ध होतील, फक्त त्यावेळचा दिगू आज मात्र नसेल. ज्याने आपल्या डोळ्यांनी आणि लेखणीनं ते क्षण टिपलं होतं. राज्यावर वाढलेलं २.५ लाख कोटींपासून १० लाख कोटींचं कर्ज. राज्याला गरज नसलेल्या बुलेट ट्रेनला उरावर घेणं. पोलिस दलाची समाजात संपलेली पत. माजलेली धार्मिक अन् जातीय दुफळी. कृषी निर्यात धोरणाला केंद्राने दिलेला सापत्न वागणूक आणि त्यामुळे खड्ड्यात गेलेला कांदा एक्सपोर्ट उद्योग. इथले उद्योग गुजरातला पाठवणं. येणारे उद्योग गुजरातला देणं. सरकारी मराठी शाळा बंद करणं. भाषिक वाद निर्माण करणं. केंद्राशी काहीही समतोल सुसूत्रता नसणं किंवा केंद्रासमोर होयबा होणं. त्यामुळं राज्याला मदत न मिळणं. राज्याला गरज नसलेले प्रोजेक्ट लादणं, केंद्र सरकारच्या मित्रासाठी पायघड्या घालणं आणि अत्यंतिक गरज असलेल्या ठिकाणी निधी पुरवठा न करणं. फक्त गुंडगिरी आणि उच्छाद मांडणं. ही सर्व पापं आहेत. सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्याला पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा अन् पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी जनतेच्या लक्षात आला. एका पाठोपाठ एक भ्रष्ट कलंकित नेत्यांना पक्षात, युतीत घेत राहायचे, एकीकडे कारवाई करावी असा आग्रह धरायचा आणि आपल्याकडे आल्यानंतर त्यांना मानानं वागवायचं, विविध प्रकारच्या अस्मितांचे वाद चिघळतील असे निर्णय घेत राहायचं, गुंडांना उमेदवारी देऊन निवडून आणायचं. निवडून आलेल्या गुंड लोकप्रतिनिधीनी मोकार पोसलेली, माजलेली माणसं थेट विधीमंडळात आणून काहींना काहीही बरळण्याची मुभा द्यायची मग कायदा सुव्यवस्थेचे रोज धिंडवडे निघाले तरी हरकत नाही!  
लोकशाहीची नैतिक अध:पतनाकडे वाटचाल सुरू झालीय! आजवर विधानभवनाच्या प्रथा, परंपरा आणि नियमांचं काटेकोरपणे पालन होत आलेलं आहे. मात्र, आता जे काही घडतंय, ते लोकशाहीला मारक आहे. ही थेट नैतिक अध:पतनाकडे वाटचाल आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या आमदारांवर कठोर कारवाई व्हायला हवी, की त्यांच्यावर जरब बसेल. मात्र, हे कधी ना कधी होणारच होतं, असं म्हणून हे संपणार नाही. भाषेच्या स्तरावर विधिमंडळाचा दर्जा खालावलेला होताच. हे समाजाच्याच दांभिक वास्तवाचं दु:खद चित्र आहे, त्याचं विधिमंडळातही प्रतिबिंब उमटतं. २०१४ नंतर जे बदल झालेलेत, त्यानंतर टोकाचे विरोधक तयार झालेलेत. अनेक अभ्यासू, नैतिकता असलेल्या आमदारांचा काळ आता नाहीये. विधिमंडळाच्या सर्वोच्च परंपरेचं पालन करणं हे उत्तरदायित्त्व ही सर्वांचीच आहे. विधिमंडळाला लोकशाहीचं मंदिर संबोधलं जातं. त्याचं काटेकोरपणे पालन करणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडलीत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये. सत्ताधारी पक्षाचे आमदार, मंत्रीच प्रश्न विचारताहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरलीय का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जाताहेत? तुरुंगवास भोगलेली मंडळी गेली अनेक वर्ष राजकारणात सक्रीय आहेत. हाजी मस्ताननेही राजकीय पक्ष काढला होता. अरुण गवळीने राजकीय पक्ष काढला. तो आमदारही झाला. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलची हवा खाल्लेले नेतेही सत्ताधाऱ्यांच्या परिसस्पर्शांनं राजकारणात सक्रीय आहेत. सगळा व्यवहार निर्लज्जपणे सुरू असतो. घटनात्मक तरतुदींमधल्या पळवाटांचा आधार घेऊन लोकशाहीचं खुलेआम वस्त्रहरण होत असतं. त्याचीच परिणती म्हणून विधिमंडळात, संसदेतही गुन्हेगारांचा भरणा मोठा आहे. यामध्ये गुन्हेगारी कृत्य करणारे, राजकीय कारणांनी गुन्हे दाखल असणारे, अशा दोन्ही प्रकारचे लोकप्रतिनिधी आहेत. 
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेकडच्या आकडेवारीनुसार सध्याच्या संसदेतील १६२ खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ७६ जणांवर असे गुन्हे दाखल आहेत, ज्यासाठी पाच वर्षांहून अधिक काळाचा तुरुंगवास होऊ शकतो. त्याचबरोबर १,४६० आमदारांवरही खटले सुरू आहेत. त्यापैकी ३० टक्के आमदारांना पाच वर्षांची सजा होऊ शकते. म्हणजे ७५ खासदार आणि सुमारे पाचशे आमदार गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेले आहेत. आपण सगळ्याच बाबतीत अलीकडे एवढे उदारमतवादी झालो आहोत, की किरकोळ गोष्टींकडे सहज दुर्लक्ष करतो. म्हणजे एखाद्याने पाच-पन्नास लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला, तर त्याच्याकडे क्षमाशील वृत्तीने पाहातो. कारण आपल्या नजरेत भ्रष्टाचारी म्हणजे कोट्यवधींचा घपला करणारे! आपणही निबर आणि निगरगठ्ठ बनत चाललोत. शेवटी गुन्हेगारांना निवडून देणारे आपणच असतो! अशा निगरगठ्ठ वातावरणात लोकशाही व्यवस्था, संसद-विधिमंडळाच्या पावित्र्याबाबत संवेदनशील असलेल्या लोकांनी जागृत व्हायला हवंय! सामान्य माणसांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अधिक बळकट व्हावा. प्रत्येक लोकशाहीप्रेमी व्यक्तीने खुलेपणाने स्वागत करून देशातल्या राजकीय गटारगंगेच्या स्वच्छता मोहिमेला स्वतःपासून पाठिंबा दिला पाहिजे. सारेच गुन्हेगारांना संरक्षण देणारे असल्यामुळे त्याचं आश्चर्य वाटत नाही. काँग्रेस आणि भाजप य पक्षांनी गुन्हेगारीशी संगत केलीय. मग ते केंद्रातल्या सत्तेसाठी असो किंवा राज्यातल्या सत्तेत असो ! सगळेच पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. साधनशुचितेच्या गोष्टी करत भाजपनेही सत्तेसाठी गुन्हेगारी, भ्रष्टाचारी लोकांना आपलंसं केलंय ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, गुन्हेगारीचे आरोप केले अशांना पक्षात घेऊन पक्षाला सूज आणलीय.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Harish K. Kenchi
9422310609

Wednesday, 25 March 2026

ऐसे कैसे झाले भोंदू...!

'प्लेबॉय' म्हणून शोभेल अशा लीला करणारा भोंदू, रुपाली चाकणकर यांचा 'पांडुरंग', कथित ज्योतिषी अशोक खरातला लैंगिक शोषणाच्या आरोपावरून अटक झालीय. समाज, अंधश्रद्धा, राजकारण यांच्यातल्या संगनमताचं हे उदाहरण! केवळ भोंदू खरातच नव्हे तर आज सर्वत्र अशा बुवा, बाबांनी उच्छाद मांडलाय. 'राम' नांव धारण करणारे काही 'हराम'खोर गजाआड झालेत. राजकारणी, दोन नंबरच्या धंद्यातले लोक याला कारणीभूत आहेत. राजकारण्यांसाठीची प्रसिद्धी अन् बुवा, बाबांची नसलेली सिद्धी या त्यांच्या सिद्धी-प्रसिद्धीच्या मोहमायेत सामान्य जनता, अनुयायी हे बुद्धिबळातले प्यादे ठरताहेत. 'धर्मसत्तेनं राजसत्तेला मार्गदर्शन करावं...!' असं म्हणणारे आज सत्ताधारी आहेत. ही त्यांची मानसिकता बदलणार कशी? सत्ताधारीच असं वागत असतील तर मग अशा भोंदू बुवा बाबांना आवरणार तरी कोण?
-----------------------------------------
ऐसे कैसे झाले भोंदू l कर्म करोनि म्हणती साधू ll
अंगा लावूनियां राख l डोळे झांकुनी करिती पाप ll
दावुनि वैराग्याची कळा l भोगी विषयांचा सोहळाll
तुका म्हणे सांगों किती l जळो तयांसी संगती ll 
जगद् गुरू संत तुकाराम महाराजांचा हा अभंग पदोपदी आठवतोय..! कुरूप विचारांचा भोंदूपणा, सगळ्या नैतिकतेचंच चाक रुतवून टाकतो. हे आज महाराष्ट्र अनुभवतोय. 'महिला आयोगातल्या जिजाऊच्या फोटोला आज ताडकन तडा गेलाय. जेव्हा तिथल्या खुर्चीला रांझ्याचा पाटील पितृतुल्य झाला, तेव्हा त्या खुर्चीतून बेगडी नीतिमत्ता ओसंडून वाहिली. सामाजिक, कौटुंबिक, की, वैयक्तिक सीमारेषाच पुसट झाली! काठी आधाराची होती पण स्वार्थापायी मोडून पडली. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्येची पुन्हा एकदा शिळा झाली. 'सावित्रीची लेक' जिथं भोंदूच्या पावलांवर झुकली. तिथं गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, साऱ्या अक्षरधनाची अक्षरशः होळी झाली...!' अशी महिला आयोगाच्या कारभाराची लक्तरं टांगणारी कविता सोशल मीडियावर फिरतेय. यावर चहूबाजूने टीकेची झोड उठल्यानंतर या भोंदू बाबाच्या ट्रस्टवर असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितलं. अन् अखेर त्यांनी शुक्रवारी रात्री राजीनामा दिला. स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेणाऱ्या स्त्रीलंपट, भोंदू अशोक खरात याच्या अटकेनंतर, त्याच्या विकृत कृत्यांचे पुरावे समोर येण्यामागे एका मोठ्या कटाचा उलगडा झालाय. ज्या आक्षेपार्ह व्हिडिओंनी खळबळ उडवून दिली, ते व्हिडिओ प्रत्यक्षात खरातच्याच ऑफिस बॉयने खंडणीसाठी चोरले होते, अशी माहिती समोर आलीय. खरातच्या कार्यालयात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे ५८ सीसीटीव्ही फुटेज संशयित ऑफिस बॉय नीरज जाधव याने डिसेंबर २०२५ मध्ये चोरले होते. खरात महिलांवर अत्याचार करत असतानाचे हे पुरावे आहेत. नीरजने या क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मात्र, समाजात 'साधू' म्हणून वावरणाऱ्या भोंदू खरातने या धमक्यांना जुमानले नाही. पैसे मिळत नसल्याचे पाहून नीरजने या व्हिडिओंचे स्क्रीनशॉट पीडित महिलांना पाठवून त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. नीरजने एका २८ वर्षीय विवाहितेचा आक्षेपार्ह व्हिडिओ तिच्या मेहुण्याला पाठवला, तेव्हा हे सारं प्रकरण बाहेर आलं. मेहुण्याने पीडितेला धीर दिला आणि पोलिसांत तक्रार करण्यास प्रोत्साहित केले. या धाडसामुळेच खरातच्या 'लिंगपिसाट' वृत्तीचा, मंत्र-तंत्राच्या नावाखाली सुरू असलेल्या अत्याचाराचा बोभाटा झाला. दुसरीकडे, शिर्डीतल्या एका २४ वर्षीय महिलेलाही नीरजने मॉर्फ केलेले फोटो पाठवून धमकावले होते. तिने पोलीस तक्रार केली होती, मात्र शिर्डी पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही, असा आरोप केला जातोय. याचे गांभीर्य लक्षात घेऊन याचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आलाय. 
ही घटना समाज, अंधश्रद्धा-राजकारण यांच्यातल्या संगनमताचे उदाहरण आहे. अशा घटना नवीन काही नाहीत; परंतु प्रत्येकवेळी त्यातून उघड होणारी बाब म्हणजे स्वत:ला बाबा, बुवा, गुरू, ज्योतिषी म्हणवून घेणार्‍या व्यक्तींना मिळणारा राजकीय आश्रय, त्यातून निर्माण होणारे अभेद्य सत्ताकवच...! लैंगिक शोषणासारखा गुन्हा ही विकृती आहेच; शिवाय तो सत्तेचा अन् प्रभावाचा गैरवापर आहे. अशा बुवा, बाबांकडे लोक श्रद्धेने जातात, त्यांच्यावर समस्या सोडवण्यासाठी विश्वास ठेवतात. हाच विश्वास मग अशा व्यक्तींकडून शस्त्रासारखा वापरला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती स्वत:ला आध्यात्मिक किंवा अलौकिक शक्ती असलेली म्हणून सादर करते, तेव्हा तिच्याभोवतेी भीती अन् आकर्षण तयार होतं. यामुळे पीडित व्यक्तींना आवाज उठवणं कठीण होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, मंत्री दीपक केसरकर, मंत्री विखे पाटील, आमदार जयंत पाटील, खासदार नीलेश लंके अशा सर्व पक्षाच्या नेत्यांची नावे समोर येताहेत. राजकीय नेते अशा व्यक्तींकडून आशीर्वाद घेताना दिसतात, तेव्हा समाजात चुकीचा संदेश जातो. जर इतके मोठे नेते या बाबावर विश्वास ठेवतात, तर ते नक्कीच योग्य असतील असं सामान्य नागरिकांना वाटतं. मग अशा बाबांची सामाजिक मान्यता वाढते. भोंदू खरातवर लैंगिक शोषणाचा आरोप असताना, त्याच्या संस्थेशी संबंधित रूपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, ही बाब धक्कादायक, संतापजनक आहे. ज्या व्यक्तीवर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, तिचेच नाव अशा व्यक्तीच्या संस्थेशी जोडले जाते, तेव्हा संपूर्ण व्यवस्थेची विश्वासार्हता कोलमडते. सत्ताधार्‍यांची भूमिका इथं संशयास्पद ठरते. एखादा विरोधी पक्षाचा कार्यकर्ता अशा प्रकरणात अडकला असता, तर पोलिसांची कारवाई, माध्यमांचा दबाव, राजकीय निषेध यांचा भडिमार झाला असता. पण जेव्हा सत्तेशी जवळीक असते, तेव्हा अचानक मौन पाळलं जातं, चौकशी संथ होते अन् जबाबदारी टाळण्याचा खेळ सुरू होतो. ही सध्याची दुहेरी मापदंडांची पद्धत लोकशाहीसाठी घातक आहे. अंधश्रद्धा हा या समस्येचा केंद्रबिंदू आहे. लोक ज्योतिष, तांत्रिक उपाय, चमत्कार यांवर आजही विश्वास ठेवतात. शिक्षण आणि विज्ञानाचा प्रसार झाला असला तरी मानसिक पातळीवर अंधश्रद्धा अजूनही घट्ट रुजलेली आहे. आर्थिक, कौटुंबिक, आरोग्याशी संबंधित समस्या असते, तेव्हा ती व्यक्ती कोणत्याही आशेच्या किरणाकडे धाव घेते. याच मानसिकतेचा फायदा अशा बाबांकडून घेतला जातो. जेव्हा एखाद्या भोंदू बाबावर आरोप असतानाही त्याला जेव्हा राजकीय पाठबळ मिळते, तेव्हा पीडिताला न्याय मिळण्याची शक्यता कमी होते. प्रभावशाली लोकांवर कारवाई होत नाही असा संदेश समाजात जातो. यामुळे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी होतो. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदे आहेत. पोलीस प्रशासनाने दबावाला बळी न पडता अशा प्रकरणांवर तातडीने कठोर कारवाई करून पीडितांना संरक्षण अन् न्याय मिळवून देण्यासाठी यंत्रणा उभारली पाहिजे. भोंदूना गजाआड केलं पाहिजे.
विज्ञानानं जग जवळ आलंय. हृदयाला भिडलंय. आयुष्याला गती, आनंद देणाऱ्या गोष्टी माणसाच्या जवळ आल्यात. पण अनेक सामाजिक, सांसारिक, शारीरिक व्याधी-व्यथांनी माणसाला घेरलंय. माणसं जवळ असली तरी मनानं दूर जाताहेत. अशावेळी देव, धर्म, अध्यात्म याचा त्याला आधार वाटतो. ही त्याची गरज ओळखून काहींनी बाजार मांडलाय. बाजार म्हटलं की जे काही असतं ते सारं इथे दिसतं. खरं तर सत्संग हा उपचार नाही, ती सहजप्रवृत्ती आहे. 'शेवटचा दिस गोड व्हावा' किंवा मोक्षासाठी देव, धर्म, कार्य नाही. जे आपण अनुभवतो, जगतो त्यातल्या विकारांचा नायनाट करण्यासाठी सत्संग, अध्यात्म आहे. असा सत्संगच मूर्तीतल्या देवाला, धर्माला, अहंकाराला भडभुंजा ठरवणाऱ्या देवमाणसाचं दर्शन घडवितो! या बुवाबाजीनं केवळ अशिक्षितांनाच नव्हे तर सुशिक्षितांना सुद्धा आपल्या कह्यात घेतलंय. अल्पशिक्षित, अर्धशिक्षितांमध्ये संभ्रमाची भावना निर्माण होतेय. हल्ली आपल्याकडं अध्यात्म, धर्म, श्रद्धा, यासारख्या शब्दांना चांगले दिवस आलेत. जिकडे तिकडे सत्संग, प्रवचन, योग शिबीर, आयोजित केली जाताहेत. प्रसिद्धीमाध्यमे दररोज अशा या बुवा बाबांच्या प्रवचनाचे रतीब घालताहेत. त्यामुळे अशा सत्संगाला हजारो भाविकांची हजेरी लागते. देवाधर्माच्या नावाने पोट जाळणाऱ्यांनी देवाला आकारात आणि धर्माला कर्मकांडात अडकवलंय. भौतिक प्रगतीतून लोकांमध्ये भोगवादी वृत्ती वाढतेय. चंगळ वाढतेय. एकीकडे मौजमजा करायची, वाट्टेल त्या मार्गाने पैसा, संपत्ती मिळवायची, दुसरीकडे पुण्य गाठीशी बांधण्याचा 'शॉर्टकट' म्हणून बुवा-बाबांचा हा सत्संग करायचा; ही वृत्तीही हे प्रस्थ वाढविण्यास कारणीभूत आहे. उच्चभ्रू वर्गातले सुशिक्षित डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, शास्त्रज्ञ, व्यापारी, चित्रतारका, खेळाडू, राजकारणी, या मंडळींनी बुवा बाबांचा सत्संग हा स्टेटस सिम्बॉल झालाय. सामान्य माणसं त्याचं अनुकरण करतात. बऱ्याच जणांना परमपूज्य मंडळींचं भजन-पूजन, वाणी-श्रवण केलं की, आपण धार्मिक, आध्यात्मिक झालो असं वाटतं. स्वामी विवेकानंदांनी या वृत्तीवर परखड टीका केलीय. ते म्हणतात, "खऱ्या धर्मात कोणत्याही विश्वासाला अन् श्रद्धेला स्थान नाही. कोणत्याही महान धर्माचार्याने अंधविश्वासाची शिकवण दिलेली नाही. अंधविश्वास हा धर्मग्लानीकाळातच पुढे येतो. मूर्ख लोक कोणातरी महान विभूतीचे अनुयायी असल्याचा आव आणतात आणि त्यांच्या स्वतःमध्ये कोणतेही सामर्थ्य नसले, तरी इतरांना डोळे मिटून विश्वास ठेवण्याचा उपदेश देतात. पण विश्वास ठेवायचा कशावर? आंधळेपणाने श्रद्धा ठेवल्याने माणसाचा अधःपात होतो. तुम्ही नास्तिक झाला तरी चालेल, पण कशावरही डोळे मिटून विश्वास ठेवू नका. उगीच स्वतःला पशूंच्या पातळीवर का घसरू देता? त्यामुळे तुम्ही स्वतःचंच नुकसान घेत नसून, समाजाचेही नुकसान करता! अंधविश्वासाच्या भरीला न पडता दृढतेनं तर्कबुद्धीच्या सहाय्यानं विचार करा. या अवस्थेप्रत जेव्हा तुम्ही पोहोचाल तेव्हाच तुम्ही धार्मिक व्हाल. तोपर्यंत तुम्ही पशुपेक्षा भिन्न नसाल...!" तर महात्मा गांधींनी म्हटलंय "श्रद्धा ही नीतीला पर्याय नाही....!" मानवी व्यवहाराच्या नावानं दिवसभर अशुभं करायचं अन् सांजवातीला शुभंकरोती म्हणायचं, ही विसंगती देवाधर्माला बदनाम करणारी आहे. अंतरीचा ज्ञानदीप सतत तेवत असेल तर रोजचं जगणंही उजळून निघेल, यासाठी कुणाची करुणा भाकायची गरज नाही. नियत साफ असली म्हणजे बस्स!.
कालपर्यंत खेडूत, ग्रामीण, अशिक्षित, गरीब वर्गाच्या श्रद्धांना, विधींना, पुजांना, परंपरांना 'अंधश्रद्ध' म्हणणारा शहरी सुशिक्षित, सुस्थिर पांढरपेशा, मध्यमवर्ग अशा विचारांची, विवेकाची कास सोडून बाजू बदलू पाहतोय अन् सत्संगाना नि प्रवचनांना उपस्थिती लावू पाहतोय. या वर्गाने कालपर्यंत मागासलेले अंधश्रद्ध असं ज्यांचं वर्णन केलं होतं, त्यांच्या मांडीला मांडी लावून ते सश्रद्ध बनलेत. शिक्षणाचा, शहाणपणाचा, योग्य-अयोग्य ठरविण्याचा मक्ता आपल्याकडं आहे, असं मानणारा हा वर्ग पाहता पाहता नवाध्यात्मिक लाटेत सामील झालाय. हे चिंताजनक आहे. भोंदू खरातसारख्या बाबांचे स्तोम नाशिक, नगर मध्ये दिसते. याला कारण तिथली सामाजिक व्यवस्था, जातीय उतरंड अन् असमतोल सामाजिक स्थिती आहे. लोकांच्या मनात असुरक्षितता निर्माण करते. जातीय उच्चनीचतेचं समीकरण या धर्मातही अबाधित ठेवलं गेलंय. या असमतोल स्थितीमुळे अनेकांच्या मनात न्यूनत्व येतं अन् स्वतःसाठी एक सन्मानजनक स्थिती हवी असते. यातून अशा बाबांचा जन्म होतो. संतांनी आखून दिलेला मार्ग हा सन्मानानं जीवनप्रवास करण्याचे बळ देणारा आहे. या प्रवासातल्या देवांच्या दलालांची आणि धर्माच्या 'हवाला'दारांची गरजच काय?
हरीश केंची
९४२२३१०६०९

तंजावरचे राजे सरफोजी महाराज दुसरे

भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचे संरक्षण खऱ्या अर्थाने कुणी केले असेल तर ते क्षत्रिय असलेल्या मराठ्यांनी. त्यातही शिवछत्रपतींचे व भोसले घराण्याचे योगदान अमूल्य असे आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. शिवछत्रपतींच्याच घराण्यातील तंजावरचे महाराज व्यंकोजी राजे भोसले यांचे वंशज सरफोजी महाराज भोसले यांचे देखील भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोठे योगदान आहे यावर खूप कमी वाचायला मिळते. तामिळनाडूमध्ये आजही सरफोजी महाराज भोसले दुसरे यांचे नाव मोठ्या आदराने आणि सन्मानाने घेतले जाते.
तंजावरचे शेवटचे राजे असलेले सरफोजी महाराज भोसले हे कलासक्त साहित्यप्रेमी आणि विद्येचा आदर करणारे होते त्यांच्या काळात तंजावरला विद्येच्या बाहेर घराचा दर्जा प्राप्त झाला होता. 
महाराज स्वतः इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, लॅटिन या पाश्चिमात्य भाषांचे उत्तम जाणकार होतेच पण त्याचबरोबर मराठी, तमिळ, तेलगू, हिंदी, उर्दू आणि पर्शियन या आशियाई भाषा देखील त्यांना उत्तम अवगत होत्या. महाराज इंग्रजी मध्ये उत्तम कविता करत असत. तसेच ते चित्र आणि संगीत कलेचे उत्तम जाणकार होते. ज्ञानाची गंगा सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सरफोजी राजांनी शिक्षणासाठी त्यांच्या राज्यात विद्यालये स्थापन केली होती. सर्वसामान्यांना उपचारासाठी रुग्णालये काढली आणि वैद्यकीय शिक्षण पीठ देखील स्थापन केलं. हा राजा इतका ग्रंथ वेडा होता की दरवर्षी प्रकाशित झालेली देशी-विदेशी पुस्तके आणि हस्तलिखित शेकड्यांनी गोळा केली आणि पुस्तकांच्या छपाईसाठी दगडाक्षरांचा वापर करून मुद्रणालय चालू केले. 
आजही तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयामध्ये संस्कृत मराठी तमिळ तेलुगु भाषा मधील ४० हजार हस्तलिखीतांचा संग्रह आहे. कवी परमानंद कृत शिवभारताला शिवचरित्रातील सर्वात महत्त्वाचे साधन मानले जाते त्याचे हस्तलिखित देखील याच संग्रहालयात उपलब्ध झाले. असा कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी, साहित्य प्रेमी विद्वान राजा हा मराठ्यांच्या इतिहासात झाला. त्या काळातील एक किस्सा सांगितला जातो. तिरूमलाई हे तामिळनाडूतील एक छोटसं गाव होतं. तिथून जवळच एका गावात अतिशय गरीब असा एक ब्राह्मण राहत होता. पूर्वजांच्या कृपेने त्याच्याकडे अतिशय अमूल्य आणि दुर्मिळ अशी ग्रंथसंपदा होती. याला मात्र शिक्षणात फारशी रुची नव्हती किरकोळ भिक्षुकी करून आपली उपजीविका कशीबशी तो भागवत होता. पण त्याच्या घरात बरेच असे ध्वजपत्रावर लिहिलेले प्राचीन असे शेकडो वर्षांपूर्वीचे अनेक जुने आणि दुर्मिळ ग्रंथ पडलेले होते. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या गाठोड्यांमध्ये ते ग्रंथ बांधून ठेवलेले होते. आपल्या गरिबीमुळे ते ग्रंथ कोणाला तरी विकून टाकावेत म्हणजे त्यातून काही पैसे कमवून आपले दिवस ढकलावेत अशी त्याची इच्छा होती अगदी कुणी पाच २५ रुपये जरी त्या बदल्यात दिले असते तरी तो ब्राह्मण आनंदाने तयार झाला असता. त्याकाळी पाच पंचवीस रुपयांची सुद्धा फार मोठी किंमत होती तसेच त्याकाळी पुस्तकांच्या हद्दीचाही धंदा वगैरे नव्हता नाहीतर त्या ब्राह्मणाने आपल्या घरातील ही अडगळ दूर करण्यासाठी ती पुस्तके विकून काही पैसे कमावले असते. एकदा त्या ब्राह्मणाला कोणीतरी सांगितलं तंजावरचे मराठा राजे सरफोजी राजे भोसले यांना अशी जुनी ग्रंथसंपदा गोळा करण्याचा फार मोठा छंद आहे. ते त्या बदल्यात चांगली रक्कमही लोकांना देतात. 
हे ऐकल्यावर त्या ब्राह्मणाच्या मनात आशा पालवली. 
आपण जर हे सगळे गबाळ महाराजांना दिलं तर ते कदाचित खुश होऊन आपल्याला शंभर रुपये सुद्धा देतील आणि मग त्यातून आपले पुढील दोन-तीन वर्षे आरामात जातील असे त्याला वाटले. तशीही आपल्या या दरिद्री घरात आपल्या पूर्वजांच्या या ठेवीची फार आबाळ होत आहे. महाराजांकडे त्यांच्या राजवाड्यामध्ये हे अगदी सुरक्षित राहतील असा विचार करून मग त्या ब्राह्मणाने सगळ्या ग्रंथांची गाठोडी बांधली आपल्या मुला बायकांच्या डोक्यावर आणि स्वतःच्या डोक्यावर ती भली मोठी गाठोडी घेऊन तो पायपीट करीत  तिरूमलाई वरून तंजावरला निघाला. लवकरच एका भर दुपारी तंजावरच्या राजवाड्याजवळ पोहोचला तेव्हा राजवाड्यातील सेवकाने महाराजांना वर्दी दिली की कुणीतरी व्यक्ती आपल्या बायका मुलांसह प्राचीन ग्रंथांचे मोठे मोठे गाठोडे घेऊन इथे आलेला आहे. तेव्हा महाराजांनी त्या ब्राह्मणाला सन्मानाने आत घेऊन यायला सांगितलं. 
सर्वांच्या स्नानाची आणि पंचपक्वानांच्या भोजनाची व्यवस्था करायला सांगितले आणि जेवणानंतर त्यांची विश्रामगृहात आराम करण्याची सोय केली. 
मग सायंकाळी विश्रामगृहात महाराज स्वतः त्या ब्राह्मणाला भेटायला आले. महाराजांचे शरीर धिप्पाड होते त्यांच्या मिशा पिळदार आणि भरघोस होत्या अंगावर भरजरी शेला आणि गळ्यात हिऱ्या मोत्यांच्या माळा होत्या. अत्यंत आकर्षक आणि प्रसन्न असं महाराजांचं व्यक्तिमत्व होतं. सस्मित आणि प्रसन्न चेहरा, कपाळाला दुबोटी शिवगंध रेखलेले, अंगावर रूळलेला भरघोस काळाभोर केशांभार व कानांमध्ये अत्यंत दुर्मिळ अशी गुलाबी मोत्यांची कुंडल डुलत होती. महाराजांचे ते सुंदर रूप पाहून त्या ब्राह्मणाला असं वाटलं की जणू काही स्वर्गातील देवता आपल्यासमोर अवतरली आहे. मग त्या ब्राह्मणाने महाराजांसमोर लोटांगणच घातलं. पण महाराजांनी मोठ्या विनम्रपणे त्याला उठवलं आणि थोडी विचारपूस करून त्यांनी त्या ब्राह्मणानं सोबत आणलेल्या एका एका ग्रंथाचे अवलोकन करण्यास सुरुवात केली. जुन्या तमिळ आणि जुन्या संस्कृत भाषेतील ते अति दुर्मिळ ग्रंथ होते. महाराज स्वतः संस्कृतचे आणि तमिळचे महापंडित होते.  त्याचबरोबर त्यांना तेलुगु, कन्नड, मराठी, उर्दू, फ्रेंच, इंग्रजी, जर्मन, डॅनिश, ग्रीक, डच आणि लॅटिन अशा विविध भाषा लिहिता वाचता आणि बोलता सुद्धा येत असत हे आपण वर वाचलेलेच आहे.
पण तरीही महाराजांना आपण मूळचे मराठी असल्याचा प्रचंड अभिमान होता महाराजांचा सगळा राज्यकारभार हा मराठीत मोडी लिपीत चालायचा. तसेच आपल्या घरात ते शुद्ध मराठीतच बोलायचे. 
तंजावरच्या गादीवर महाराजांनी १७८७ ते १८३२ सालापर्यंत राज्य केलं होतं पण त्या अगोदर तंजावरला वारसा  हक्काचा वाद होता सरफोजी राजे हे त्यांच्या अगोदरचे राजे तुळाजी राजे भोसले यांचे दत्तक पुत्र होते. त्यामुळे इंग्रजांनी या गादीच्या वादाचा फायदा उठवला आणि दहा वर्षांच्या सरफोजी राजेंना तंजावरच्या गादीवर बसवताना त्यांच्याशी करार केला. त्या अनुषंगाने सरफोजी राजेंना दरवर्षी एक एक लक्ष रुपयांचा तनखा मिळायचा आणि त्यासोबत तंजावरच्या महसुलाच्या एकूण २० टक्के रक्कम त्यांना देण्यात यायची. त्याच्या बदल्यात तंजावरचा सगळा राजकीय व्यवहार इंग्रज बघायचे तर तंजावरची प्रशासकीय व्यवस्था महाराजांकडे होती. 
राजकीय हालचालींवर इंग्रजांचे नियंत्रण असल्यामुळे महाराजांना फार बंधनं होती. त्यामुळे महाराजांनी आपली संपूर्ण शक्ती संशैक्षणिक सांस्कृतिक आणि लोक कल्याणकारी प्रशासकीय कामांमध्येच झोकुन दिली होती. त्यामुळे सरफोजी राजे भोसले नी त्या ब्राह्मणाने आणलेले ग्रंथ पाहिले तेव्हा महाराज फार खुश झाले. या ग्रंथांमध्ये कितीतरी दुर्मिळ आणि अति दुर्मिळ संस्कृत व तामिळ ग्रंथ होते. महाराज एक-एक ग्रंथ आनंदाने छातीशी कवटाळत होते आणि मोठ्या श्रद्धेने आपल्या मस्तकाजवळ नेत होते. मग महाराजांनी मोठ्या आनंदाने त्या ब्राह्मणाला मिठी मारली आणि ते म्हणाले या सगळ्यांसाठी आम्ही तुला या ग्रंथसंपदेसाठी पाच हजार रुपये सुद्धा अगदी हसत हसत देऊन टाकू. महाराजांचे ते बोलणं ऐकून तो ब्राह्मण आश्चर्यचकित झाला. इतक्या मोठ्या रकमेचे त्याने अगदी स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती. महाराजांनी अमात्य महाडिक राजे यांना आणि कारभारी असणाऱ्या नरसिंह भट्ट यांना ती रक्कम आणायला सांगितलं पण हे दोघेही महाराजांना हे सांगायला परत आले की महाराजांचीच परवानगी घेऊन ब्रिटिशांचा ट्रेझरी अधिकारी लेफ्टनंट ड्यूमा शिकारीला काही दिवसांसाठी तंजावरच्या बाहेर गेला आहे काही दिवसांनी तो तंजावर मध्ये येईल तोपर्यंत आपल्याकडे तीन-चार हजार रुपये वर खर्चासाठी आहेत आपण त्या ब्राह्मणाला थांबायला सांगून आठवड्याने परत बोलवूया. पण महाराज म्हणाले नाही. आम्ही असं या अमूल्य ठेव्याबद्दल कोणाचीही उधारी ठेवू इच्छित नाही आणि महाराजांनी चक्क गळ्यातली रत्नमाला काढून त्या ब्राह्मणाच्या हातात ठेवली. अमात्य महाडिक महाराज आणि कारभारी नृसिंह भट्ट आश्चर्याने पाहतच राहिले कारण महाराजांच्या काळातील त्या रत्नमालेची किंमत कमीत कमी एक लाख रुपये होती त्यांची ती अवस्था पाहून महाराज हसले आणि ते म्हणाले अमात्य कारभारी आमच्या भारताच्या या अमूल्य वारशाची किंमत फार मोठी आहे ही लाख रुपयांची रत्नमाला ही कवडी मोलाची आहे. रत्नमाला म्हणजे नुसते किमती दगड आहेत पण अस्सल खजिना म्हणजे ही ग्रंथसंपदाच आहे. महाराजांचा जयजयकार करत ते ब्राह्मणाचं कुटुंब तिथून निघून गेले. 
या घटनेनंतर तो ब्राह्मण व्यक्ती त्याच्या जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत माणूस बनला होता. ज्या भारतात सोन्याचा धूर निघत होता त्यावेळी संपूर्ण जगाच्या ज्ञानाचे मुख्य केंद्रच होता खरं सांगायचं झालं भारतात ज्ञानाची पूजा होत होती म्हणूनच भारतात समृद्धी होती. त्यावेळी व्यापारासाठी जगातले सगळे लोक भारताकडेच धाव घ्यायचे. नालंदा तक्षशिला वाराणसी अशी विद्यापीठे भारतात होती. 
ज्ञानाची पूजा होत होती. ज्ञान व्यापार कला साहित्य संस्कृती या सर्वांचे जगातलं माहेरघर भारतच होतं. ज्या संस्कृतीत ज्ञानाची पूजा होते ती संस्कृती जगात पुढे जाते आणि जो समाज स्वतः चा इतिहास आणि स्वतःची संस्कृती विसरतो त्या समाजाला स्वतःची अस्मिता आणि स्वाभिमान उरत नाही आणि असा स्वाभिमान आणि अस्मिताहीन समाज अगदी सहजपणे दुसऱ्यांचा गुलाम होतो दुसऱ्यांच्या पोशाखांचा दुसऱ्यांच्या संस्कृतीचं दुसऱ्यांच्या वागण्या बोलण्याचं तो कौतुक करू लागतो अंधानुकरण करू लागतो स्वतःच्या इतिहासाला आणि स्वतःच्या संस्कृतीला कमी समजू लागतो. 
एखाद्या संपूर्ण समाजाला लुळपांगळं आणि तेजहीन बनवायचं असेल त्याची तर त्याची संस्कृती आणि इतिहास मिटवून टाकला की काम सोपं होतं. म्हणूनच भारतावर येणाऱ्या ब्रिटिश याबाबत चाणाक्ष होते सगळ्यांपेक्षाही वरचढ होते ब्रिटिश इतिहासकारांनी आपल्या ढोंगी इतिहासकारांना पुढे करून भारताचा इतिहासच बदलला स्वतःच्या हिशेबान लिहून घेतला त्यांनी इंग्लंडला विजेता जमात तर भारतीयांना गुलाम जमात ठरवलं भारतीय समाज हा कोणाची ना कोणाची गुलामी करायलाच जन्माला आला आहे असं त्यांनी सांगितलं तर ब्रिटिश समाज हा सगळ्यांवर राज्य करायलाच जन्माला आला आहे असं त्यांनी शिकवलं. भारतात येऊन थोबाडावर आपटलेल्या सिकंदरला म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट ला विश्वविजेता म्हणून त्यांनी खोटेपणानं गौरवलं भुरट्या मुघलांना डोक्यावर घेऊन ब्रिटिश नाचले तर छत्रपती शिवाजी महाराज लुटारू होते मराठी युद्धे म्हणजे लुटारू आणि आणि पेंढारी होते असा संपूर्ण चुकीचा इतिहास भारतीयांच्या कित्येक पिढ्यांना शिकवला त्यामुळेच भारत ब्रिटिशांनी मुघलांच्या नव्हे तर मराठ्यांच्या ताब्यातून स्वतःकडे घेतला होता हे सत्य आपल्या मराठी माणसांनाच माहिती नाही तर इतर भारतीयांची गोष्ट सोडा. आणि आज जे काही भारतीय इतिहासाचे खरं संशोधन झालं आहे त्या संशोधनाचा मुख्य आधार तो सरफोजी राजे भोसले यांच्या कामाचा आहे. 
सरफोजी राजे भोसले यांनी  त्यांच्या पंजावरच्या सरस्वती महाल लायब्ररीत जोपासलेल्या अस्सल भारतीय अति आणि अति दुर्मिळ अशा ग्रंथसंपदेमुळे भारतीयांना त्यांचा खरा इतिहास आणि त्यांची संस्कृती समजण्यात फार मोठी मदत झाली आहे. 
तसं या सरस्वती महाल ग्रंथालयाचा मूळ पाया विजयनगर साम्राज्याचे एक मांडलीक तंजावर नाईक यांनी पंधराव्या शतकात मांडला होता पण त्याला आजच हे दैदिप्यमान स्वरूप सरपोजीराजे भोसले यांनीच दिलं. महाराष्ट्राचा जो इतिहास आपल्याला ठाऊक आहे त्याचाही खूप सारा आधार याच तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयाने पुरवला आहे शिवभारत या पंडित परमानंद नेवासकरांच्या ग्रंथाची मूळ प्रत याच तंजावरच्या ग्रंथालयात आहे आणि याच ग्रंथामुळे शिवरायांच्या जन्मदिवसाच्या आणि आणि शिवचरित्राच्या अनेक कोळी सुटायला फार मोठी मदत झाली आहे. महाराष्ट्राचा इतिहास मराठी इतिहासकारांना समजण्यासाठी तामिळनाडूच्या तंजावरच्या या सरस्वती महाल लायब्ररीने फार मोठा आधार दिला आहे. सरफोजी राजे भोसले यांचे कार्य फार महान आणि विविधांगी होते. त्यांनी जवळपास 50 हजार वेगवेगळे अति दुर्मिळ ग्रंथ भारताच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात शोधून शोधून इथं ठेवले होते. एवढेच नव्हे तर सरफोजीराजेंनी आपल्या तमिळ संस्कृत आणि अनेक भाषांचे तज्ञ जाणकार लोक ठेवले होते खराब पुस्तकांचं त्यांनी पुनर्लेखन करून घेतलं आणि अनेक दुर्मिळ पुस्तकांचं जतन केलं. अनेक महान पंडित सरफोजीराजेंनी आपल्या पदरी बाळगले होते. 
भारतातील सर्वात समृद्ध आणि संस्कृती जतन करणारे ग्रंथालय असं वर्णन एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका ने सरस्वती ग्रंथालयाचं केले आहे.
महाराज सरफोजीराजे भोसले यांनी करोडो रुपयांची आपली खाजगी संपत्ती या कामासाठी खर्च केली होती आपलं सगळं जीवनच या कामासाठी बहाल केलं होतं या लायब्ररीतलं प्रत्येक पुस्तक महाराजांनी स्वतः वाचलेलं आहे असे म्हणतात. तसेच प्रत्येक पुस्तकावर त्यांची स्वतःची सही देखील त्यांनी केली आहे.  
सरफोजी राजे भोसले यांचे कार्य फक्त ग्रंथालयांपुरतच मर्यादित नव्हतं त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी अनेक तलावांची, रस्त्यांची, रुग्णालयांची, विद्यालयांची निर्मिती केली. तंजावर शहराच्या अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टमचे ते रचनाकार आणि अभियंता सुद्धा होते. औषधी शास्त्रात देखील महाराजांचं फार मोठं कार्य होतं धन्वंतरी महाल हा पारंपरिक आयुर्वेदिक भारतीय औषधी संशोधनाचा आणि भारतीय औषध निर्मितीचा कारखाना त्यांनी तंजावरला काढला होता. प्राचीन ग्रंथावर आधारित आणि माणसांच्या अनेक आजारावरच्या अनेक गुणकारी औषधांची निर्मिती या धन्वंतरी महालातून केली जात होती तेवढेच नव्हे सरफोजी राजे भोसले यांना भारतातले पहिले नेत्र शल्य चिकित्सक हा दर्जा त्यांच्या ज्ञान आणि कार्यामुळे मिळाला आहे. सरफोजी राजे भोसले यांना शस्त्रक्रियेची देखील विद्या अवगत होती असे म्हणतात. त्यांच्याजवळ डोळ्यांवर सर्जरी करण्याचं कीट  असायचे आणि मोतीबिंदू चा रुग्ण मिळाला ते त्याच्यावर तिथल्या तिथे लगेच शस्त्रक्रिया करायचे. त्यांनी शेकडो लोकांना स्वतः मोतीबिंदूंपासून मुक्ती देऊन नवीन दृष्टीची देणगी बहाल केली होती. सरफोजी राजे भोसले यांच्या दरबारातील एका वकिलानं महाराजांच्या या मोतीबिंदूच्या ऑपरेशनच्या कौशल्याबद्दल अगदी भरभरून लिहिलं आहे. महाराज ऑपरेशन शास्त्रीय पद्धतीने करायचे याचं त्यानं त्याच्या लिखाणात वर्णन केलं आहे. 
महाराज प्राणी प्रेमी होते त्यांना प्राण्यांची फार आवड होती म्हणून त्यांनी तामिळनाडू पहिलं प्राणी संग्रहालय आपल्या तामिळनाडूच्या तंजावर च्या आवारातच उभारलं होतं. महाराजांची दूरदृष्टी फार होती व्यापाराला त्यांनी चालना देण्यासाठी अनेक योजना राबवल्या होत्या महाराजांनी जहाज बांधण्याचा कारखाना तंजावर पासून ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मनोरा या बंदरावर उभारला होता तसेच महाराजांनी तंजावरच्या भागात बंदुका तयार करण्याचा कारखाना देखील उभारला होता. 
महाराज स्वतः एक उत्तम चित्रकार सुद्धा होते तसेच महाराज बहुतेक वेळा स्वतः कुदळ फावडं हातात घेऊन बांधकाम सुद्धा करायचे. फुलांची आणि झाडांची निगा राखायचे. त्यांना विविध प्रकारची नाणी जमवण्याचा देखील छंद होता. महाराज स्वतः कुस्तीपटू होते ते स्वतः कुस्ती खेळायचे महाराजांना घोड्यांच्या बैलांच्या शर्यतीचा म्हणजे प्राण्यांच्या शर्यतीचा आणि झुंजीचा देखील छंद होता. 
जेलीकट्टू या तामिळनाडूच्या पारंपारिक बैलाच्या खेळाला लोकप्रिय करण्यामध्ये महाराजांचा फार मोठा सहभाग होता. त्याचबरोबर त्यांना नृत्य, गायन आणि संगीताचा देखील छंद होता महाराज स्वतः एक उत्तम संगीत तज्ञ देखील होते. महाराजांनी स्वतः संगीतावरचे कुमार सांबव टिका, मुद्रारक्षा चर्या, स्मृति ईश्वरग्रह, गजशास्त्र प्रधानम असे ग्रंथ लिहिले होते.
 स्वतः महाराज उत्कृष्ट व्हॅलेलियम वादक आणि सनई वादक देखील होते. महाराजांनी तंजावर चित्रकला म्हणून तंजावरची एक वेगळी शैली तंजावर मध्ये प्रस्थापित केली. इतकंच नव्हे तर महाराज वास्तु तज्ञ देखील होते त्यांनी पाच मजली तंजावर महालाची योजना स्वतः आखली होती विजेपासून महालाचा संरक्षण व्हावं म्हणून त्यांनी महालावर धातूचे वीजरोधक खांब देखील उभारले होते. 
भोसले घराण्याचा त्यांना फार अभिमान होता आपल्या भोसले घराण्याचा संपूर्ण इतिहास शिलालेखाच्या स्वरूपात भिंतीवर त्यांनी करून ठेवलेला आहे आणि जगातील सर्वात मोठा शिलालेख अशी या शिलालेखाची ख्याती आहे. 
सरफोजी महाराज भोसले यांनी काशी यात्रा १८२१  साली केली होती. त्यांनी त्यांच्यासोबत तीन हजार लोक घेतले होते तंजावर ते काशी या संपूर्ण प्रवासात त्यांनी कोट्यावधी रुपयांचा दानधर्म केला होता काशीला गेल्यावर अनेक घाटांची डागडुजी केली. घाटांवर सुंदर चित्रे काढून त्यांचे सुशोभीकरण केले एवढंच नव्हे तर ते जाताना एका रस्त्याने गेले होते तर येताना वेगळ्याच रस्त्याने आले त्यामुळे जाताना व येताना त्यांना जिथे जिथे भग्न मंदिरे दिसली त्या सर्व वस्तूंचं जीर्णोद्धार करण्याचं पुण्य कर्म ही त्यांनी केलं होतं. महाराज सरफोजी राजे भोसले घराण्याच्या परंपरे प्रमाणे इतर धर्मांचा सुद्धा खूप आदर करायचे. अनेक ख्रिश्चन चर्च आणि मिशनरींच्या शाळांना त्यांनी भरभरून मदत केली होती. तंजावरच्या बडे हुसेन दर्गा या मुस्लिम उत्सवाचे ते प्रमुख आयोजक आणि प्रमुख पाहुणे सुद्धा असायचे. महाराजांनी शिक्षणाच्या कार्यातही भरीव कार्य केलं होतं त्यांनी नवविद्या कलानिधी शाळा अशा नावाची अनोख्या प्रकारची शाळा सुरू केली होती. ज्या शाळेमध्ये विज्ञान गणित भाषा सोबतच वेद आणि शास्त्र सुद्धा शिकवले जायचे तसंच राज्यातील मुलांनी नोकरी व्यवसायात अग्रेसर राहावे म्हणून कला व्यावसायिक कौशल्य देखील या शाळेत शिकवले जायचे. युरोपीय लोकांचे विज्ञान आणि भारतीय लोकांचे कला शास्त्र यांचा अत्यंत उत्तम संयोग या शाळेचा अभ्यासक्रमात त्यांनी केला होता. महाराजांनी हातांनी चालवायचा महाराजांची ख्याती ऐकून लंडनचा प्रख्यात शिल्पकार फ्लेक्समन १८०७ साली तंजावर ला आला होता त्यांनी महाराजांचा एक संगम वरी पुतळा उभा करण्याचा महाराजांकडे परवानगी मागितली महाराजांनी ती दिली फ्लेक्समनने रात्रंदिवस खपवून रात्रंदिवस खपवून महाराजांचा संगमवरी अतिशय देखणा सुंदर पुतळा तयार केला. महाराजांच्या कारभाऱ्यांनी महाराजांना आश्चर्यचकित करण्यासाठी तो पुतळा सरस्वती महाल ग्रंथालयाच्या प्रारंगणात बसवला. 
महाराजांनी तो पुतळा अगोदर पाहिला नव्हता तो महाराजांचा अश्वारूढ आणि हातात तलवार घेतलेला वीरमुद्रेतला पुतळा होता. महाराज तो पुतळा पाहून फारसे खुश झाले नाही. 
शिल्पकाराने महाराजांची ती नाराजी तात्काळ ओळखली आणि त्याने महाराजांना विचारलं तुम्हाला पुतळा का आवडला नाही? तेव्हा महाराज म्हणाले "हा सरस्वती मातेचा दरबार आहे.. इथं तलवारीचे घोड्याचं आणि वीर मुद्रेचे काय काम आहे?"
तिथं तर नम्रता पाहिजे. दासाची भूमिका पाहिजे. 
मग फ्लेक्समनने महाराजांचे हे विचार ओळखले आणि रात्रंदिवस मेहनत करून परत महाराजांचा अतिशय देखणा संगमवरी सरस्वती मातेसमोर विनम्रतेने हात जोडलेला दास भावातला दुसरा एक संगमोरी पुतळा उभारला. त्या पुतळ्याला पाहून मात्र सरफोजी राजे भयंकर खुश झाले. सरफोजी राजे एक अत्यंत विनम्र स्वभावाचे राजे होते. आजही तो महाराजांचा अश्वारूढ पुतळा सरस्वती महाल ग्रंथालयाच्या प्रारंगणात आहे. अतिशय दयाळू कलावंत आणि जनतेच्या कल्याणासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या राजावर त्यांची जनता अगदी जिवापाड प्रेम करायची. ७ मार्च १८३२ रोजी वयाच्या अगदी ५६ व्या वर्षी या महान राजाचं निधन झालं तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला एक लाखांपेक्षाही जास्त लोक सहभागी झाले होते असे म्हणतात. अफाट जनसागर आपल्या राजाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी लोटला होता.

केशवराव जेधे

ब्राह्मणेत्तर पक्षाचे नेतृत्व, केशवराव जेधे यांचा जन्म
 पुण्यातील श्रीमंत (देशमुख) मराठा कुटुंबात झाला. मारुतराव जेधे यांचे ते धाकटे पुत्र होते. देशमुख कुटुंबातील सदस्य सत्यशोधक समाजाच्या विचाराचे होते आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी समाजाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता. जेधे कुटुंबाचा त्या काळात स्वतःचा पितळाच्या भांड्यांचा कारखाना होता आणि त्यांनी मुख्यतः त्यांच्या मालकीच्या पितळ कारखान्यातून त्यांची संपत्ती मिळवली जो कारखाना त्यांचे मोठे भाऊ बाबुराव जेधे देशमुख चालवत होते. बाबुराव देखील ब्राह्मणेत्तर चळवळीत सक्रिय होते तसेच कोल्हापूर संस्थानचे शासक राजर्षी शाहू महाराज यांचे निकटचे सहकारी देखील होते. १९२२ मध्ये शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर केशवराव आणि ब्राह्मणेत्तर पक्षाचे आणि सत्यशोधक समाजाचे नेतृत्व स्वीकारले. ब्राह्मण वर्चस्वातून गणपती उत्सव आणि शिवजयंती असे उत्सव ताब्यात घेणे हे जेधे आणि त्यांच्या साथीदारांचे सुरुवातीचे ध्येय होते. ब्राह्मणेत्तर पक्षाचे ध्येय म्हणून त्यांनी राष्ट्रवादाची कास धरली आणि वर्ण वर्चस्व वादाला विरोध केला. १९३५ मध्ये काँग्रेसच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने स्वदेशी प्रदर्शनाची सुरुवात केली. ज्यातून आपल्याला दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू स्थानिक कारागीरांकडूनच घेतल्या जाव्यात आणि स्थानिक पैसा स्थानिकच राहिला पाहिजे असा त्यांचा उद्देश होता. सामाजिक चळवळींमध्ये भाषण करताना त्यांनी ब्राह्मणेत्तर बांधवांना स्वतःचा वापर केवळ मनुष्यबळ म्हणून करू देण्यापेक्षा राजकीय चळवळीमध्ये सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन केले. केवळ काही मंत्रीपदे घेऊन ब्राह्मणेत्तरांनी समाधान मानू नये राजकीय सत्ता केंद्रे ताब्यात घ्यावीत असे ते म्हणत. केशवरावांनी पुणे आणि सासवड येथे सत्याग्रह देखील केला होता.
केशवराव जेधे यांनी १९२० च्या दशकात काँग्रेस पक्षात विलीन होईपर्यंत ब्राह्मणेत्तर पक्षाचे नेतृत्व केले. त्यांनी आपल्या आयुष्यातील बारा वर्षे नॉन ब्राह्मण मुव्हमेंट साठी घालवली. या काळात त्यांनी एनबीएम चे नेतृत्व करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयोजित केलेल्या समता आणि अस्पृश्यता हटाव मोहिमेत देखील भाग घेतला. 
सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेत्तर पक्षाने सातारा जिल्हा कोल्हापूर राज्य आणि इतर भागातील इतर ठिकाणीही उपक्रम राबवले जे ब्राह्मणेत्तर समाजाला त्यांचे हक्क मिळवण्यासाठी व अन्याय दूर करण्यासाठी ओळखले जात होते. विसाव्या शतकात सत्यशोधक समाजाच्या अनुयायांमध्ये केशवराव जेधे यांच्या व्यतिरिक्त कर्मवीर भाऊराव पाटील, खंडेराव बागल आणि माधवराव बागल यांचा समावेश झाला. १९३० च्या दशकापर्यंत महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाच्या जनआंदोलनाचे स्वरूप पाहता केशवराव जेधे काँग्रेसमध्ये सामील झाले आणि दुर्दैवाने सत्यशोधक समाजाची कामे मागे पडली. १९३० च्या दशकात जेथे यांनी ब्राह्मणेत्तर पक्षाचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण केले. आणि काँग्रेसला उच्चवर्णीय वर्चस्व असलेल्या संस्थेतून अधिक व्यापक आधार असलेल्या परंतु पुणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये मराठा बहुल पक्षात रूपांतरित केले. केशवराव जेधे यांनीच खऱ्या अर्थाने मागे पडलेल्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले आणि नोव्हेंबर १९३४ च्या बॉम्बे प्रेसिडेन्सी विधान परिषदेसाठी लागलेली पहिली निवडणूक जिंकली. १९३८ मध्ये केशवराव प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि जेधे हवेली हे त्या काळात चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. १९४० च्या दशकात जेधे यांनी काँग्रेसमध्ये शेतकरी लीग सुरू केली ज्याला काहींनी बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन मराठी आणि गुजराती ब्राह्मण नेतृत्वाला आव्हान म्हणून पाहिले. पुण्यातील काँग्रेस भवन बांधण्यात केशवराव जेधे यांचा मोलाचा वाटा होता. १९४८ मध्ये स्वातंत्र्यानंतर जेधे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेसाठी काँग्रेस पक्ष सोडला आणि १९ ची पहिली लोकसभा निवडणूक त्यांनी पुण्यातून त्यांचेच मित्र असलेल्या एन व्ही गाडगीळ यांच्याविरुद्ध लढली.  त्यात त्यांना हार पत्करावी लागली. पुढे शेतकरी कामगार पक्षाच्या इतर नेत्यांच्या डावीकडे झुकलेल्या धोरणामुळे मतभेद होऊन केशवराव जेधे ऑगस्ट १९५२ मध्ये काँग्रेसमध्ये परतले आणि १९५७ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून बारामतीतून लोकसभेवर निवडून देखील आले.केवळ केशवरावांमुळेच आपण काँग्रेसमध्ये आलो असे यशवंतरावांनी देखील अनेकदा मान्य केले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांच्या निर्मितीचे वचन जनतेला दिले होते परंतु राज्य पुनर्रचना समितीने महाराष्ट्र आणि गुजरात साठी द्विभाषिक राज्याची शिफारस केली. ज्याची राजधानी मुंबई असेल असे सुचवले. एक नोव्हेंबर १९५६ रोजी त्याचे उद्घाटन झाल्याने मोठी राजकीय खळबळ माजली आणि केशवराव जेधे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सर्वपक्षीय बैठक झाली. ६ फेब्रुवारी १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत १९५७ च्या संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबईतील बारा जागांसह १३३ पैकी १०१ जागा मिळवून काँग्रेसचा पराभव केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. तत्कालीन गुजरात, मराठवाडा आणि विदर्भाच्या पाठिंब्यावरच काँग्रेसला सरकार स्थापन करता आले. पुढे यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले.
एस एम जोशी, एस ए डांगे, एन जी गोरे, पी के अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी अथक लढा दिला. अनेक लोकांच्या प्राणाची आहुती देऊन शेवटी महाराष्ट्राचे वेगळे राज्य व्हावे हे काँग्रेस नेत्यांना पटवून देण्यात संयुक्त महाराष्ट्र समितीला यश आले. पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील तत्कालीन अर्थमंत्री सी डी देशमुख यांच्या राजीनाम्याने सरकार दबावात येऊन अखेर केंद्र सरकारने १ मे १९६० रोजी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश चा समावेश असलेल्या राज्याची स्थापना केली.
*जेधे हवेली- काँग्रेसच्या चळवळीचे दुसरे केंद्र*
जेधे हवेली ९०७ शुक्रवार पेठ पुणे हे केशवराव जेधे यांचे घर होते. जे एकेकाळी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात पुणे आणि महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक उपक्रमांचे केंद्र म्हणून उदयास आले. जेधे हवेली १८८५ मध्ये केशवरावांच्या वडिलांनी म्हणजेच मारूतराव बाबाजी जेधे यांनी बांधली होती. याच ठिकाणी राहून केशवराव जेधे यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात सुमारे ४० वर्षे सामाजिक आणि राजकीय चळवळींचे नेतृत्व केले. केशवरावांच्या नेतृत्वामुळे पुणे ब्राह्मणेत्तर चळवळीचे केंद्र बनले आणि पुणे भौगोलिक आणि समाजशास्त्रीय रेषेनुसार पूर्व आणि पश्चिम भागात विभागले गेले. केसरी वाड्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पश्चिम पुण्यावर ब्राह्मणांचे आणि त्यांच्या संस्कृतीचे वर्चस्व होते तर पूर्व पुण्याचे प्रतिनिधित्व जेधे हवेली आणि केशवरावांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाजाने केले होते. केशवराव जेधे यांच्या व्यतिरिक्त संपूर्ण जेधे कुटुंबाचा महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीवर विश्वास होता. त्याचबरोबर केशवरावांचे थोरले बंधू दादासाहेब जेधे आणि बाबुराव जेधे हे कोल्हापूरच्या शाहू महाराजांचे जवळचे सहकारी होते जे सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व करत होते. शाहू महाराज पुण्यात असताना जेधे हवेलीला आवर्जून भेट देत असत. १९२० च्या दशकात जेधे हवेली बहुजन समाजातील अनेक तरुणांसाठी एक राजकीय आणि सामाजिक शाळा म्हणून उदयास आली. सर्व जेधे बंधू एकत्र राहत असल्याने कुटुंबाला मोठ्या खटल्याचे स्वरूप होते.
 असे म्हटले जाते की, त्याकाळी जेधे कुटुंबियांव्यतिरिक्त दररोज कमीत कमी ५० ते ६० लोक हवेलीवर जेवण करत असत. सत्यशोधक चळवळीतील सामान्य कार्यकर्ता पुण्यात येतात थेट जेधे हवेली कडे जात असे. सामान्य कामगारांव्यतिरिक्त कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, काकासाहेब गाडगीळ, दिनकरराव जवळकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा दिगजांसाठी जेधे हवेली हक्काचे घर होते. महाराष्ट्रातील या दिग्गज नेत्यांनी व्यतिरिक्त पंडित मोतीलाल नेहरू, नेताजी सुभाष चंद्र बोस, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायण, सेनापती बापट, भाऊसाहेब हिरे, शंकरराव देव अशा देश पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांनी देखील जेधे हवेलीला भेट दिली. महात्मा गांधी देखील दोन वेळा जेधे हवेलीत आले होते.
१९३४ पर्यंत जेधे हवेली हे महाराष्ट्रातील स्वातंत्र्य आणि सामाजिक चळवळीचे केंद्र होते याच काळात महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा बसवण्यासारखे अनेक वाद पाहिले. जेधे हवेली येथे समाजविघातक आणि संरक्षणवादी कृतींशी लढा देण्यासाठी रणनीती आखण्यात आली होती. त्याचबरोबर १९५६ मध्ये गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ यांच्यासारख्या आंदोलनावर अनेक बैठका जेधे हवेलीवर होत असत. केशवराव जेधे यांनी पुणे आणि सासवड येथे केलेल्या सत्याग्रहामुळे त्यांना भारताच्या संरक्षण नियमांतर्गत त्यांच्या निवासस्थानी अटक करून येरवाड्याला नेण्यात आले आणि १८ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. केशवराव जेधे यांच्या जीवनाचा शेवट १२ नोव्हेंबर १९६० रोजी पुण्यात झाला. पुण्यातील स्वारगेट येथील प्रसिद्ध चौकाला केशवराव जेधे यांचे नाव देऊन त्यांच्या स्मृती जागृत ठेवल्या आहेत.

दिनकरराव जवळकर

दिनकरराव जवळकर हे एक समाज सुधारक आणि ब्राह्मणेत्तर चळवळींचे नेते होते. केशवराव जेधे यांच्या समवेत प्रथम पुण्यातील ब्राह्मणेत्तर चळवळीचे तरुण नेते म्हणून उदयास आले आणि त्यांनी नंतर त्यांच्या देशाचे दुश्मन या पुस्तकात बाळ गंगाधर टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राज्यव्यापी ख्याती मिळवली. महात्मा फुलेंचे तत्त्वनिष्ठ अनुयायी म्हणून सामाजिक कार्याची सुरुवात केलेले दिनकरराव जवळकर पुढे साम्यवादाकडे वळले. सत्यशोधक चळवळीची शिकवण व साम्यवाद यांची तत्वे एकत्र करून आपले कार्य पुढे नेण्याचे काम केले.
जवळकर यांचा जन्म १८९८ मध्ये पुण्याजवळील चोराची आळंदी येथील मराठा शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबाकडे फक्त पाच-सहा एकर जमीन होती जी त्यांना १९२६ मध्ये विकावी लागली. 
त्याच वर्षी त्यांचे लग्न झाले इतर कोणत्याही स्थिर उत्पन्नाच्या स्त्रोताशिवाय त्यांची उपजीविका मुख्यतः लेखन आणि आश्रय यावरच अवलंबून होती.
दिनकरराव जवळकर यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते. पुढे त्यांचा संपर्क कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज यांच्याशी आला. जवळकारांच्या उत्कट लेखनाने आणि वक्तृत्वाने शाहू महाराज प्रभावित झाले आणि त्यांनी जवळकरांना कोल्हापूरला येण्याचे आमंत्रण दिले. कोल्हापुरात जवळकरांनी तरुण मराठा हे वृत्तपत्र चालवले. 
१९२१ मध्ये ते कोल्हापूर सोडून पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी प्रमुख ब्राह्मणेत्तर नेते असलेल्या केशवराव जेधे यांच्या समवेत काम करण्यास सुरुवात केली.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीचे पुणे सनातनी पुराणमतवादी आणि सुधारकांमध्ये विभागलेले होते. सुधारक गटाचे नेतृत्व सत्यशोधक समाजाच्या विविध नेत्यांनी केले. ज्यात प्रामुख्याने राजर्षी शाहू महाराज होते. परंपरावादी नेत्यांचे नेतृत्व बाळ गंगाधर टिळक हे करत होते. परंपरावादी सामाजिक सुधारणांच्या कोणत्याही उपाययोजनांना विरोध करीत असत. यातून परंपरावादी आणि सुधारकांमध्ये उभी फुट पडलेली पाहायला मिळाली. १९२० मध्ये टिळकांचा मृत्यू झाला तर १९२२ मध्ये शाहू महाराजांचा. या दोघांच्या मृत्यूनंतर देखील दोन्ही गटांनी एकमेकांवर तीव्र टीका करणे सोडले नाही. १९२४ मध्ये पुणे नगरपालिकेने शहरामध्ये टिळक आणि चिपळूणकर या दोन प्रमुख ब्राह्मण व्यक्तींचे पुतळे उभारले. या पार्श्वभूमीवर ब्राह्मणेत्तर गटाने महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा शहरात सुयोग्य सार्वजनिक ठिकाणी बसविण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला ब्राह्मण गटाने कडाडून विरोध केला भाला हे वृत्तपत्र चालवणारे प्रख्यात ब्राह्मण बी. बी. भोपटकर त्यावेळी म्हणाले होते की जोतिराव फुले यांनी पुण्याची अशी काय सेवा केली की त्यांचे स्मारक पुण्यात उभारले जावे? ज्योतिराव फुले हे सार्वजनिक व्यक्तिमत्व नव्हते तर पंथीय व्यक्तिमत्व होते. अशा सामाजिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जवळकर यांनी देशाचे दुश्मन हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक जुलै १९२५ मध्ये लिहिले. 
हे पुस्तक केशवराव जेधे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले आणि आर एन लाड यांनी हे पुस्तक छापले. पुस्तकाची प्रस्तावना केशवराव बागडे या ब्राह्मणेतर वकिलांनी लिहिली होती. हे पुस्तक टिळक आणि चिपळूणकर यांच्यावर तीव्र टीका करणारे होते. पुस्तकातील भाषा ज्वलंत होती. टिळक आणि चिपळूणकर हे राष्ट्रीय नायक नसून देशाचे शत्रू आहेत असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की ब्राह्मणांना जनमाणसात फूट पाडून आणि त्यांना जन्मताच श्रेष्ठत्व आणि कनिष्ठतेच्या कल्पनांमध्ये अडकवून त्यांची सत्ता आणि जातीय श्रेष्ठता मजबूत करायची होती. त्यांनी सर्व हिंदूंना ब्राह्मणवादाच्या गुलामगिरीतून आणि जातीय व्यवस्थेच्या साखळीतून मुक्त व्हावे असे आवाहन करून पुस्तकाचा समारोप केला. जे ब्राह्मण स्वतःला श्रेष्ठ समजणे सोडून देह रक्ताने जनतेशी एकजूट करतात त्यांनाच मित्र मानले पाहिजे असेही त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले.
त्यांनी ब्राह्मण जातीवर जोरदार टीका केली असली तरी त्यांनी त्या काळातील आगरकर, गोखले, रानडे अशा पुरोगामी ब्राह्मण नेत्यांबद्दल या पुस्तकात अनुकूलपणे लिहिले आहे हे विशेष.
केशव सिताराम ठाकरे यांच्यासारख्या काही ब्राह्मणेत्तर नेत्यांनी या पुस्तकाचे कौतुक केले असले तरी त्यामुळे ब्राह्मण गटात मात्र खळबळ उडाली. सप्टेंबर १९२५ मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे पुतणे श्रीकृष्ण माधव चिपळूणकर यांनी जवळकर, जेधे, लाड आणि बागडे यांच्या विरुद्ध त्यांच्या कुटुंबाची बदनामी केल्याबद्दल खटला दाखल केला. सप्टेंबर १९२६ रोजी शहर दंडाधिकारी यांच्या समोर हा खटला चालवला गेला. जवळकर आणि लाड यांना एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. जेधे आणि बागडे यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली या चौघांनाही न्यायालयाने आर्थिक दंड ठरवला या सर्वांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
जवळकर आणि इतरांनी १९२६ मध्ये उच्च न्यायालयात अपील केले. अपिलात डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी जवळकर यांच्या बाजूने केस लढवली आणि खटला जिंकला. चारही आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. डॉक्टर आंबेडकरांनी लढवलेल्या खटल्यांपैकी "देशाचे दुश्मन" हा खटला प्रमुख खटला म्हणून नोंदवला गेला. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे कायदामंत्री देखील झाले.
राजकारणातील सहभाग
१९१९ मध्ये माँटेग्यू चेम्स फोर्ड च्या निकालांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये ब्राह्मणेत्तर जातींसाठी सात जागा राखीव ठेवल्या होत्या. याच काळात काही ब्राह्मणेत्तर नेते ज्यांची कामे पूर्वी सामाजिक कार्यापुरतीच मर्यादित होती त्यांनी सक्रिय राजकारणात भाग घेण्यास सुरुवात केली. या काळात जवळकरांनी बराच प्रवास केला मे १९२७ मध्ये त्यांनी जेथे यांच्यासह मध्य प्रांत आणि बेरारचा दौरा केला आणि अनेक ठिकाणी भाषणे दिली. त्याच वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महाड सत्याग्रहाला पाठिंबा जाहीर केला आणि मनुस्मृति जाळण्यास ही भाग नोंदवला. १९२७ मध्ये ब्रिटिश सरकारने भारतीयांना अधिक राजकीय अधिकार देण्याचा विचार करण्यासाठी सायमन कमिशन नेमले. आयोगात भारतीय सदस्य नसल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सह ब्राह्मणेत्तर पक्षांनी या आयोगावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तथापि नैराश्यग्रस्त समुदायांच्या नेत्यांनी आयोगाच्या कामकाजात सहभागी व्हावे आणि त्यांच्या सदस्यांवर दबाव आणावा असा पर्यायी विचार देखील काहींनी केला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर १९२८ मध्ये आयोगासमोर साक्ष दिली जवळकरांनी आयोगाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यामुळे त्यांचे आणि त्यांचे दीर्घकाळचे सहकारी केशवराव जेधे यांच्यात तेढ निर्माण झाली. १९२७ मध्ये जवळकर यांनी मराठी वृत्तपत्र कैवारीचे संपादन भास्करराव जाधव यांच्याकडून स्वीकारले ते दुसरे ब्राह्मणेत्तर नेते आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी चे विधानसभेचे सदस्य होते. जाधव यांना निवडणुकीच्या राजकारणात सहभागी होण्यासाठी जेधे यांचा विरोध होता. जाधव यांच्याबरोबर सहकार्य केल्याने जेधे आणि जवळकर यांच्यात आणखी मतभेद निर्माण झाले तथापि कैवारी या वृत्तपत्रातील त्यांच्या कामामुळे त्यांना मुंबईतील गिरणी कामगारांचा पाठिंबा मिळाला. 
त्यांनी कामगार संघटनेला सक्रिय पाठिंबा दिला आणि ब्रिटिश सरकार आणि भांडवलशाही या दोघांविरुद्ध कामगारांनी समान संघर्ष केला पाहिजे असे मत नोंदवले. जवळकर यांनी ब्राह्मणेत्तर चळवळीला पुढे नेण्यासाठी १९२९-३० ला इंग्लंडला भेट दिली. भारतात परतल्यावर जेधे यांच्या नेतृत्वाखालील ब्राह्मणेत्तरांच्या गटाने जाधव यांच्याशी युती केल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली जात होती. इंग्लंडच्या भेटीमुळे जवळकरांमध्ये राष्ट्रवादी भावना तीव्र झाल्या आणि त्यातून ते ब्रिटिश कम्युनिस्ट पक्षाच्या संपर्कात आले. १९३० मध्ये एक राष्ट्रवादी आणि मार्क्सवादी म्हणून भारतात परत आले ते समाजवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी तसेच कट्टरपंथी व भांडवलशाही विरोधी चळवळ करण्यासाठी आणि राष्ट्रवादी शेतकरी चळवळ तयार करण्यासाठीच. ब्राह्मणेत्तर पक्षाने आपले जात प्रदर्शन करणारे नाव बदलून शेतकरी पक्ष हे नवीन नाव धारण करावे असा प्रस्ताव  त्यांनी त्यावेळी मांडला.
इंग्लंडहून परत आल्यावर देखील जवळकर यांनी लेखन सुरू ठेवले. क्रांतीचे रणशिंग नावाचे पुस्तक लिहिले जे मराठीतील सुरुवातीच्या मार्क्सवादी पुस्तकांपैकी एक आहे. या पुस्तकात त्यांनी सत्यशोधक समाजाचा प्रारंभ बिंदू म्हणून विचार केला आणि धार्मिक बंधने तोडल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही या निष्कर्षापर्यंत पोहोचले. भारतीय शेतकऱ्यांनी समाजवादाच्या तत्त्वानुसार एकत्र येऊन शेतकरी स्वराज्य निर्माण केले पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. दिनकरराव जवळकर यांनी १९३१ मध्ये तेज या वृत्तपत्राचे काही महिने संपादन देखील केले. त्यांचे लेखन समाजवादाकडे अधिक वळले आणि त्यांचा सुर अधिक क्रांतिकारक झाला. तेज वृत्तपत्रांमध्ये त्यांनी शेतकरी सैन्याची उभारणी आणि स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धाची तयारी असे काही मूलगामी लेख लिहिले जेथे त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की भांडवलशाही, सरंजामशाही आणि साम्राज्यवाद हे जनतेचे तीन प्रमुख शत्रू आहेंत. जवळकर यांनी आपल्या लेखनातून व भाषणातून ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेची त्यांच्या काळातील इतर कम्युनिस्ट नेत्यांनी इतका मजबूत संबंध निर्माण केला होता. भ्रमण्यतर पक्षांतर्गत एक सुव्यवस्थित राज्यघटना भांडवलशाही विरोधी विचारसरणी आणि त्यांचे चिन्ह म्हणून नांगर असलेला नवाच गट तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
आजारपण आणि मृत्यू
इंग्लंडहून परतल्यावर जवळकर बहुतेक आजारीच असत. दरम्यान त्यांचे दौरे आणि भाषणे मात्र सुरूच होती. मार्च १९३१ मध्ये तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी ब्राह्मणेत्तर चळवळीच्या निमंत्रणावरून नागपूरला भेट दिली. ते नागपूरला आजारी पडले. परत येताना त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रहात भाग घेतला नाशिक येथे त्यांची तब्येत आणखीनच खालावली आणि ते पुण्यात परत आले जेथे त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. ३ मे १९३२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी इंदुताई आणि मुलगा शिवाजीराव होते. जवळेकरांनी ब्राह्मणेत्तर पक्षांतर्गत सुसंघटित शेतकरी संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जरी त्यांच्या प्रयत्नाला त्यांच्या जीवनात अपेक्षित यश आले नाही तरी त्यांच्या मृत्यूनंतर दीड दशकांनंतर शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली गेली. पुढे दिनकरराव जवळकर समग्र वाड्मय नावाने लेखक संपादक य दि फडके यांनी दिनकर रावांच्या साहित्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन केले.

कोथरूडचे शिल्पकार: शशिकांत सुतार

" कोथरूड महापालिका आणि पुणे म्युनिसिपालीटी....!" असा मथळा असलेली बातमी सकाळ वृत्तपत्रानं १९७९ साली झालेल्या पुणे महापालिका निवडणुक...