Friday, 7 August 2026

काय केलं त्या नेहरूंनी?

भारताचं वाटोळंच केलं, या देशाच्या ऱ्हासाला जबाबदार फक्त नेहरू आणि नेहरूच' किंवा 'जर आपल्या देशाच्या पंतप्रधानपदी पटेल असते तर आज देश कुठल्या कुठे पोहोचला असता', असे बिनदिक्कत उद्गार काढणारा तरुणवर्ग आज जो दिसतो, त्याला या देशाचा इतिहास एकतर माहिती नसतो किंवा सध्याच्या परिस्थितीत वाहवत जाऊन नेहरूंना नावे ठेवण्यासाठी तो पुढे येत असतो. आज दि. २७ मे स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र धोरणाची मुहूर्तमेढ करणारे व शीतयुध्दातील स्पर्धेपासून दूर ठेवणारे धोरणी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज पुण्यतिथी, त्यानिमित्ताने जाणून घेऊ त्यांच्याविषयी थोडेसे...
पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवणीद्वारे घेतले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरीता गेले. १९१२ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली. कमला नेहरू यांच्याशी त्यांनी १९१६ साली विवाह केला. १९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर कॉंग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. ते महात्मा गांधीजींच्या विचारांचे समर्थक होते. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरीत झाले. जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या वडिलांनी आपल्या संपत्तीचा आणि विदेशी वस्तूंचा त्याग केला व स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करून स्वातंत्र्यचळवळीला प्रोत्साहन दिलं. ते खादीचा वापर करू लागले.
सप्टेंबर १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय कॉंग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय कॉंग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली. १९२९ साली पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले.
१९३० ते १९३५ दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि अशाच अन्य सत्याग्रहांमुळे नेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी अल्मोडा जेलमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकालीन पण शेवटची ठरली. एकंदर पंडित नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले. त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला. 
15 ऑगस्ट 1947 या दिवशी जागतिक इतिहासाने एक नवे वळण घेतले. खंडप्राय असा भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. प्रदीर्घ संघर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सहमतीने पंतप्रधान म्हणून नेहरुंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पंतप्रधान झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सर्वात मोठे योगदान जर कोणते असेल, तर या देशाला त्यांनी लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ लाभू दिला. स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र धोरणाला अतिशय योग्य असा आकार दिला. भारताने तटस्थतेचे धोरण स्वीकारले, त्याचे प्रणेते हे केवळ नेहरूच आहेत. त्या वेळच्या परिस्थितीत अमेरिकेच्या बाजूने जाणे योग्य ठरले नसते आणि तेव्हा कम्युनिस्ट असलेल्या सोव्हिएत युनियनच्या गटात जाऊन बसणे आत्मघाती ठरले असते. नेहरूंनी स्वत:चा स्वतंत्र अलिप्त गट तयार केला, ज्याला तेव्हा इजिप्तचे गमाल अब्दुल नास्सेर, इंडोनेशियाचे नेते सुकार्नो, घानाचे नेते एनक्रुमा, तेव्हाच्या युगोस्लाव्हियाचे मार्शल टिटो यांनी तसेच इतरांनी पाठिंबा दिला. परराष्ट्र राजकारणातले नेहरूंचे हे स्थान भल्याभल्यांनी मान्य केले आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांनी १९७७ मध्ये परराष्ट्र मंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा परराष्ट्रमंत्रालयात प्रवेश करताना तिथल्या अधिकाऱ्यांना पहिला प्रश्न केला, की त्यांच्या त्या कार्यालयाच्या मार्गावर असलेले पंडित नेहरूंचे भव्य तैलचित्र कोठे आहे? त्यावेळी अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. त्यांनी ते चित्र काढून ठेवले असल्याचे सांगितले. तेव्हा अस्वस्थ बनलेल्या वाजपेयी यांनी ते पुन्हा जिथल्या तिथे लावण्यास त्यांना बजावले आणि आपण आज जगात मान उंच करून चालू शकतो, त्यास नेहरूंचे परराष्ट्र धोरणच कारणीभूत आहे असे सांगितले. यापेक्षा मोठी पावती ती आणखी कोणती हवी? पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली!

साधारणपणे, लोक भूतकाळातील पंतप्रधानांचे योगदान किंवा त्यांच्या चुका विसरतात आणि विद्यमान पंतप्रधानाने केलेल्या कामाचीच आठवण ठेवतात. पण हा काळ काही सामान्य नाही. सध्याच्या पंतप्रधानांनी प्रत्येक संधीचा वापर करून लोकांना हेच सांगण्याचा प्रयत्न चालवला आहे की, १९५० ते १९६४ या काळात सत्तेवर असलेल्या तेव्हाच्या पंतप्रधानामुळेच, आपल्याला (सध्याच्या पंतप्रधानांना) अपेक्षित कामगिरी करण्यात सातत्याने अपयश आले आहे. परिणामी, आजची जी पिढी कदाचित 'नेहरू' हे नावही ओळखू शकली नसती, त्या पिढीला विद्यमान पंतप्रधानांपेक्षा खुद्द नेहरूंबद्दलच अधिक माहिती झाली आहे.
भारत एका उद्ध्वस्त आणि कंगाल राष्ट्रात परिवर्तित होत असताना या भारताची भक्कम  उभारणी कोणी केली होती, हे आजच्या पिढीला उमजू लागलं आहे. 
भाक्रा नांगल धरण, IITs, IIMs, AIIMS, BHEL, BEML, TIFR, ISRO, BARC यांसारखी 'विकासाची मंदिरं' कोणी निर्माण केली, हे त्यांनी स्वच्छपणे जाणलं आहे... नेहरूंच्या निधनाला ६२ वर्षे उलटून गेली असतानाही, त्यांना पुन्हा एकदा लोकांच्या स्मरणात जिवंत आणि प्रासंगिक बनवल्याबद्दल सध्याच्या पंतप्रधानांचे आभार मानलेच पाहिजेत. नेहरूंनीच भारत घडवला; आणि सध्याचे पंतप्रधान मात्र आपल्या तुटीच्या अर्थसंकल्पातील तूट भरून काढण्यासाठी, नेहरूंनी निर्माण केलेल्या त्याच मालमत्तांची विक्री करत आहेत. चालू आर्थिक वर्षात, नेहरू आणि त्यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या पंतप्रधानांनी निर्माण केलेल्या ८५ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तांची विक्री करण्याचं घटत आहे.

No comments:

Post a Comment

स्कूल ठीक होतील....?

"शिक्षण क्षेत्रात सुधारणा व्हावी यासाठीच्या आंदोलनांना सरकारला सामोरं जावं लागलंय. आज जगातल्या साऱ्या मोठ्या बहुराष्ट्रीय क...