Friday, 7 August 2026

झुरळांच्या संतापाचा उद्रेक!

आपल्या पूर्वजांनी ज्या आदर्श भारताचं स्वप्न पाहिलं होतं, ते आदर्श सत्ताधाऱ्यांनी कधीच पायदळी तुडवलेत. ज्या संविधानिक मूल्यांच्या आधारावर हा देश उभा आहे, त्याचा पायाच उध्वस्त केला गेलाय. हा देश आता पूर्वीचा महान भारत उरलेला नाही. ह्या देशातली लोकशाही ईव्हीएमच्या इलेक्ट्रिक कबरीत जिवंतपणे गाडली गेलीय. त्यातल्या लोकांचा आवाज म्यूट करून त्याचं रूपांतरण केवळ एका बीपमध्ये केलंय. सामाजिक न्यायाला न्यायालयांकरवीच फासीची शिक्षा सुनावली गेलीय. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांना तुरुंगात डांबले गेलंय.
बेरोजगार तरुणांना कोक्रोच म्हटल्याने चवताळून उठलेत. पण आज देशातल्या तरुणांचं जीवन किड्या मुंग्यापेक्षाही भयंकर बनलेय. त्यांचं भविष्य व्यवस्थेने निर्दयपणे चिरडून टाकलेय. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराची क्षेत्रे संपूर्णपणे नेस्तनाबूत केली आहेत. त्याविरोधात उठणारे न्याय हक्काचे प्रत्येक आवाज दाबून टाकले जाताहेत. जे दबले जात नाही, त्यांना मुस्लिम दहशतवादी, पाकिस्तानी, परकीय शक्तींचे हस्तक वा अर्बन नक्षलवादी ठरवून निकाली काढले जातेय. तरीही जे आवाज निकाली निघत नाहीत, त्यांना एका गूढ निर्वात पोकळीत ढकलून कायमचं बंद केलं जातेय. त्याची मीडियात साधी चर्चाही होऊ दिली जात नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ सत्तेला तोलून धरण्यात खर्ची पडलाय.ही सत्ता सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी त्यांनी जीवाचे रान केलेलंय. शंभर वर्षाच्या अथक कट कारस्थानाचं हे फलित आहे. त्यामुळे मोबाईल स्क्रीनवरच्या आभासी आंदोलनाने ते इतक्या सहजपणे सत्तेवरून पाय उतार होतील असं अजिबात नाही. तरीही तू जरा सांभाळून रहा. कारण ते प्रचंड कपटी, खुनशी आणि नीच आहेत. सत्तेपर्यंत पोचण्यासाठी येणारा प्रत्येक अडसर त्यांनी निर्दयपणे उखडून फेकलाय. कार सेवकांच्या जळालेल्या अस्थिंचं अमानुष प्रदर्शन भरवून नियोजनबद्धरित्या आग लावली आणि त्यात हजारो माणसं जळून राख झाली. हरेन पांड्यासारखा आपल्याच गृहमंत्र्याला बंदुकीच्या नळीत बसवून थेट मोक्षधामाला पाठवून दिलं. कितीतरी निष्ठावान स्वयंसेवकांना फुकटातली स्वर्गाची सफर घडवली. जज लोयासारख्या इमानदार न्यायधिशाला बक्षीस म्हणून हृदयविकाराचा झटका दिला. पुलवामा हल्ल्यात चाळीस सैनिकांना देशासाठी शहीद होण्याचं महदभाग्य प्राप्त करून दिलं. कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या सातशेच्यावर शेतकऱ्यांना बलिदानासाठी सताड दारं उघडून ठेवली. विजय रूपाणीसाठी पाठवलेल्या पुष्पक विमानात चारशेच्यावर प्रवाशांना सदेह वैकुंठागमन घडवलं. भीमाकोरेगावच्या शौर्यस्तंभाला ऍक्टिव्हिस्टांचा वधस्तंभ बनवला. सोनम वांगचूकसारख्या लढाखू कार्यकर्त्याला लढाखच्या बर्फाळ प्रदेशातून उचलून थेट तुरुंगाची उब दिली. ह्या उजेडात आलेल्या काही कपट कथा आहेत. पण अंधारात अजून काय काय घडलं असेल याची कल्पनाही नाही! 
जिथे अजित पवार सारख्या उपमुख्यमंत्र्याला देखील बक्षले नाही, तिथं अभिजित दीपके किस झाड की पत्ती? एकतर तयार केलेल्या खोट्या गुन्ह्यात अडकवून दीपकेला तुरुंगाच्या अंधारकोठडीत वर्षानुवर्षे कुजवत ठेवतील वा बटूच्या महाकाय पायाखाली दीपके सारख्या कोक्रोचांना चिरडून ठार करतील. तसेही क्रॉक्रोच मेल्याचे दुःख कुणाला होणार आहे? सत्तेच्या गुलाम बनलेल्या मीडियावर दोन दिवस अभिजित दीपकेवर उलटी सिधी बात घडेल. तिसऱ्या दिवशी एखाद्या बाबा, अभिनेत्री, क्रिकेटपटू वा व्हायरल व्हिडीओकडे राष्ट्राचे लक्ष वळवून अभिजित दीपकेला विस्मरणाच्या निर्वात पोकळीत ढकलून देतील. 

तरीही अभिजित दीपके  जर प्रश्न विचारत असेल तर दीपकेला सलाम. कारण या काळात प्रश्न विचारणं हेच सगळ्यात मोठं साहस आहे आणि स्मरणशक्ती जपणे हा सर्वात मोठा गुन्हा! गुन्ह्यासाठी लाख लाख शुभेच्छा!!

झुरळांच्या संतापाचा उद्रेक! 
सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा विरोध दडपला की तो स्प्रिंगसारखा उफाळून येतो हे लोकशाहीचे विज्ञान आहे. त्याची प्रचिती सध्या कॉक्रोच म्हणजे झुरळ जनता पार्टीच्या माध्यमातून येतेय. सरकार सर्वोच्च, त्यामुळे ते काहीही, अगदी मतेसुद्धा विकत घेऊ शकते किंवा दहशतीने मिळवू शकते. मात्र, काही गोष्टी विकाऊ नसतात. प्रामाणिक मत ही त्यापैकी एक. काबाड कष्ट करून संसार उभारणार्‍या किंवा तसे प्रयत्न करू नये. अपयश येत असलेल्या सर्वसामान्य माणसाला जेव्हा आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येते, तेव्हा तो कॉक्रोच बनतो. सत्तेची बाजू घेणाऱ्या बदमाशांनाही सुबत्ता येते आणि माझ्यासारख्या प्रामाणिक कष्टकऱ्याच्या वाट्याला खस्ता, हे त्याला पटत नाही म्हणून तो पेटून उठतो. गेल्या दहा-बारा वर्षांत जो विकास झाला तो आपल्या वाट्याला का आला नाही, हा प्रश्न मनात येतो तेव्हा तो चवताळतो. सत्ताधाऱ्यांना त्याची ही तगमग कधीच समजली नाही. त्यामुळे ते फक्त निवडणुका जिंकत चाललेत. हाच सामान्य माणूस आपल्याला मोठा धक्का देऊ शकतो, अशी त्यांना कधीच धास्ती वाटत नाही. सर्व संवैधानिक संस्था, माध्यमे आणि उद्योगपती खिशात घातले की विकासाचा हैदोस घालता येतो, असा त्यांचा समज. सत्तेच्या माध्यमातून समाजाचे, म्हणजेच सर्वसामान्यांचे कल्याण, या विचाराची खिल्ली उडवणाऱ्या मदमस्त सत्ताधाऱ्यांना कोणीतरी धडा शिकवेल, या अपेक्षेने हा सामान्य माणूस सत्तेच्या प्रत्येक विरोधकाकडे पाहतो. एखादी व्यक्ती किंवा संघटना हीरोसारखी मदतीला धावून येईल, या आशेवरच तो जगतोय. म्हणूनच कॉक्रोच जनता पार्टी किंवा आम आदमी पार्टीसारख्या प्रयोगांना त्याचा पाठिंबा मिळतो.
देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांना कॉक्रोच म्हणजे झुरळ संबोधले होते. यापैकी काही तरुण माध्यमांमध्ये जातात, तर काही सामाजिक कार्यकर्ते होतात, ते देशाला लागलेले गळू पॅरासाईट आहेत असे न्यायाधीशांचे विधान होते. ते निमित्त झाले आणि सरकारचा खरा रंग ओळखलेले अनेक लोक एकत्र आले. संभाजीनगरचा उच्चशिक्षित तरुण अभिजीत दीपके याने कॉक्रोच जनता पार्टी स्थापन करण्यास पुढाकार घेतला. उद्या शनिवारी तो राजधानी नवी दिल्लीत निदर्शने करणार आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकारचे भाट अपूर्व उत्साहाने मैदानात उतरलेत आणि शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातले विरोधक त्यांची सालटी सोलून काढताहेत. अशिक्षित लोक मंत्री, आमदार , खासदार आणि कोट्यधीश बनू शकतात, म्हणूनच उच्चशिक्षितांना रोजगाराच्या शोधात आयुष्य घालवावे लागते, हा समज दृढ होत चाललाय. ज्या सैनिकांकडून प्राणाहुतीची अपेक्षा केली जाते, त्यांनाही कंत्राटी पद्धतीने सैन्यात भरती करणाऱ्या, प्रामाणिकपणे अभ्यास करून डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या, विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची कत्तल करणाऱ्या, सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालणाऱ्या, कर वसुलीतून नफेखोरी करणाऱ्या नतद्रष्ट सरकार विरुद्ध जनक्षोभ एकत्र होत आहे. यातून फार मोठी क्रांती होईल किंवा सरकार पडेल, अशी भाबडी अपेक्षा कोणीही करणार नाही. मात्र, सरकारला त्याच्या चुका दाखवून देण्याची ही एक मोठी संधी नक्कीच आहे. लोकशाहीच्या चौकटीत राहून आंदोलन करणाऱ्यांच्या पाठीशी हा देश नेहमीच उभा राहिलाय. त्यामुळे दिपके यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतोय. जंतर-मंतरवर अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन जसे भरकटले, त्यातून सीजेपीने बोध आणि खबरदारी घेतलेली दिसते. अन्यथा हा समाज माध्यमांवरील आंदोलनाचा एक बुडबुडा ठरेल आणि सरकारचा विकासाचा वरवंटा मोकाट सुटेल. 
नीट पेपरफुटीमुळे २२ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागलेले असताना सरकारने केवळ काही बाबूंच्या बदल्या करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देशभरातले प्रामाणिक शिक्षक संतापले. सरकारने त्यांना नामोहरम करण्यासाठी माध्यमांमधील आपल्या अँकर्सचा वापर सुरू केला. त्यामुळे शिक्षकवर्गाने या अँकर्सलाच धारेवर धरले. आजतागायत असे कधीही झाले नव्हते. माध्यमांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिल्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी राहिली. मात्र, बहुसंख्य माध्यमांनी जनतेच्या व्यथांची खिल्ली उडवून सरकारची भाटगिरी करताना सर्वच सीमा ओलांडल्या. इंधन आठ दहा रुपयांनी महागले म्हणून काय बिघडले, असा प्रश्न विचारण्यापर्यंत त्यांची मजल गेली. पेपर फुटी ला सरकार जबाबदार नाही, अशी क्लीन चीटच देऊन टाकली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध संताप उफाळून आला आहे. 

रस्त्यावरून फिरताना सत्ताधारी पक्षांचे पदाधिकारी, नेते आणि भाऊ-दादा कार्यकर्ते यांच्या उन्मत्तपणाचा, प्रशासनाच्या निवडक कारवायांचा लोकांना आता उबग आलाय. या मोकाट लोकांना आवरणारा कोणीच कसा जन्मला नाही, असा समाजात आक्रोश आहे. एकीकडे सरकार करांच्या माध्यमातून वसुली करत असताना प्रशासनातले अधिकारी, कर्मचारी लाच घेऊन लोकांना लुटताहेत. या दुहेरी लुटीला सवय मानून घेण्यास समाजाचा एक मोठा वर्ग आज तयार नाही. व्यक्त होण्यासाठी समाज माध्यमांचा आधार मिळाला, पण सरन्यायाधीशांसारखे लोक झुरळ म्हणून संबोधत असल्यामुळे तो उद्विग्न झालाय. अमर्याद सत्तेचे हेच फलित असेल तर यापुढे ती कोणालाही देऊ नये, असा निर्धार सुजाण मतदारांना करावा लागणार आहे. धर्माच्या नावावर मते मागून सत्ता मिळताच खिशांवर डल्ला मारणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आलीय. सत्यापेक्षा विरोधात बसलेले बरे, असे म्हणण्याची वेळ या लोकांवर आणल्याशिवाय देशातील प्रामाणिक, कष्टकरी, पीडित झुरळांनी आता स्वस्थ बसता कामा नये. गप्प बसवाल तर याद राखा, असे यांना खडसावून सांगण्याची वेळ आली आहे.





No comments:

Post a Comment

कोथरूडचे शिल्पकार: शशिकांत सुतार

" कोथरूड महापालिका आणि पुणे म्युनिसिपालीटी....!" असा मथळा असलेली बातमी सकाळ वृत्तपत्रानं १९७९ साली झालेल्या पुणे महापालिका निवडणुक...