Friday, 7 August 2026

'रिफ्रेमिंग’- सैतानाला देवदूत बनवणारी कला !!!

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला ब्रिटनमधील वर्तमानपत्रांमध्ये एक चित्र नेहमी दिसायचं. अॅडॉल्फ हिटलर आणि जोसेफ स्टालिन हातात हात घालून उभे आहेत. जर्मनी आणि रशियाने मिळून पोलंडची वाटणी केली होती. ब्रिटनसाठी दोघेही सारखेच शत्रू होते. ब्रिटिश जनतेला सतत सांगितलं जात होतं की स्टालिन हा हिटलरइतकाच भयंकर आणि धोकादायक आहे. पण २२ जून १९४१ रोजी हिटलरने अचानक रशियावरच आक्रमण केलं आणि एका रात्रीत सगळं बदललं! कालपर्यंत जो कट्टर शत्रू होता, तो दुसऱ्या दिवशी ब्रिटनचा जिवलग मित्र बनला. आता जनतेला हे कसं पटवायचं? इथेच जन्माला आली 
मानसशास्त्रातील आणि मार्केटिंगमधील एक अद्भूत संकल्पना, जिचे नाव आहे......‘रिफ्रेमिंग’ (Reframing). घटना तीच ठेवायची, माणूस तोच ठेवायचा, पण त्याच्याभोवतीची चौकट अशी बदलायची की पाहणाऱ्याला त्याचा अर्थच बदलून दिसावा. कालपर्यंतचा क्रूर स्टालिन अचानक गोड, प्रेमळ ‘अंकल जो’ बनला. विन्स्टन चर्चिल यांनी यावर मर्मभेदक वाक्य म्हटलं होतं, "जर हिटलरने नरकावर आक्रमण केलं असतं, तर मी संसदेत सैतानाच्याही बाजूने दोन चांगले शब्द बोललो असतो....!"
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी असाच ‘सैतानाशी मैत्री’चा ऐतिहासिक क्षण येऊ घातला आहे, होय, तुम्ही अगदी बरोबर ओळखलंत. आदरणीय शरद पवार आणि सुप्रिया सुळे आता अधिकृतपणे ‘एनडीए’ चा भाग होणार असल्याच्या गप्पा राजकीय कॉरिडोअरमध्ये रंगू लागल्या आहेत. आता हा चमत्कार घडल्यावर, आजवर ज्यांना दिवसाचे चोवीस तास ट्रोल करण्यातच धन्यता मानली, त्या ‘भाजप आयटी सेल’च्या कर्मचाऱ्यांवर रात्रीतून कोणती नामुष्की येईल आणि ते या नेत्यांचे कसे ‘रिफ्रेमिंग’ करतील, याची एक झलक.
सुप्रियाताई सुळे : ‘संकष्टीचे मटण आणि पंचमकार साधना’... आजवर ज्या सुप्रियाताईंना 'संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मटण खाणाऱ्या' म्हणून आयटी सेलने सोशल मीडियावर ट्रोल केले होते, त्यांच्यासाठी रिफ्रेमिंगची नवी चौकट अशी असेल, "सुप्रियाताई या उच्छिष्ट गणेश या गणेशाच्या तांत्रिक स्वरुपाच्या उपासक आहेत. तो वामाचार असल्याने त्यात पंचमकार वर्ज्य नसतात. किंबहुना पंचमकार हेच नैवेद्य असतात. संकष्टीच्या दिवशी त्यांनी मटण खाल्ले, हा त्यांच्या गुरूंनी सांगितलेल्या साधनेचा भाग होता. ही साधना केवळ राष्ट्रकल्याणासाठी त्यांनी केली आहे. जोडीला सुळे कुटुंब कसे सीकेपी आहे आणि त्यांच्या कुळात उच्छिष्ट गणेश साधना कशी कुलधर्म कुलाचाराचा भाग आहे यावरील एक लोणकढी पोस्ट असेल. 
शरद पवार : ‘कळीचा नारद’ आणि ‘१३ व्या बॉम्बस्फोटाचे रहस्य’ शरद पवारांना आजवर ‘कळीचा नारद’, ‘हिंदू द्वेष्टा’, ‘मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी १३ वा खोटा बॉम्बस्फोट सांगून मुस्लिमांचे लाड करणारा नेता’ म्हणून हिणवले गेले. आता रिफ्रेमिंगनंतर नवा नॅरेटिव्ह असा असेल, "पवार साहेब हे कळीचे नारद नसून, ते प्रत्यक्षात देवर्षी नारदांचे थेट आधुनिक अवतार आहेत, जे केवळ जगाच्या कल्याणासाठी देव आणि दानवांमध्ये संवाद घडवून आणतात. अन् तो १३ वा खोटा बॉम्बस्फोट? अहो, तो तर साहेबांचा मास्टरस्ट्रोक होता! त्यांनी केवळ एका विधानाने संपूर्ण मुंबईत होऊ शकणारी मोठी दंगल रोखली. पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेला पूर्णपणे संभ्रमात टाकले. पवार साहेबांसारखा हिंदू रक्षक संपूर्ण ब्रह्मांडात नाही!"
रोहित पवार : ‘निर्बुद्ध’ ते ‘नव्या युगाचा अल्बर्ट आइनस्टाईन’ रोहित पवारांना आजवर ‘निर्बुद्ध’ किंवा ‘पोरकट’ म्हणून ट्रोल केले जायचे. आता आयटी सेल त्यांच्यासाठी अशी चौकट तयार करेल : "रोहितजी हे निर्बुद्ध नसून, ते ‘मौन आणि संथ विचारसरणी’ चे जिवंत प्रतीक आहेत. ते जेव्हा कॅमेऱ्यासमोर गोंधळलेले दिसतात, तेव्हा प्रत्यक्षात त्यांचे मेंदू जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि महाराष्ट्राच्या कृषी धोरणावर अत्यंत गुंतागुंतीची गणितं सोडवत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील निष्पापपणा हा त्यांच्या अथांग बुद्धिमत्तेचा मुखवटा आहे. महाराष्ट्राला लाभलेला हा एक अद्वितीय आणि महाज्ञानी तरुण नेता आहे!"
जितेंद्र आव्हाड : ‘गुंड’ ते ‘अहिंसेचे अन् कायद्याचे कडक शिलेदार’ अनंत करमुसे यांना मारहाण प्रकरणी ज्या जितेंद्र आव्हाडांना ‘गुंडगिरीचे प्रतीक’ ठरवले गेले होते, त्यांचे रिफ्रेमिंग सर्वात मजेदार असेल, "जितेंद्र आव्हाड यांनी करमुसे यांना मारहाण केलीच नव्हती, तर ते एक ‘फिजिकल थेरपी’ चे सेशन होते. बॉडीबिल्डर असलेल्या करमुसे यांची resistance power तपासण्याचा तो प्रयास होता. समाजात शिस्त पाळली जावी आणि संविधानाचा आदर व्हावा, यासाठी आव्हाड साहेबांनी स्वहस्ते केलेली ती एक प्रेमळ शारीरिक चौकशी होती. आव्हाड साहेब हे मुळात अत्यंत संत प्रवृत्तीचे गृहस्थ आहेत. त्यांच्यातील आक्रमकता ही केवळ धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी उफाळून आलेली सात्त्विक लाट असते. ते गुंड नसून, एनडीएच्या नव्या शिस्तीचे मुख्य वॉर्डन आहेत!"
राजकारणाच्या या महाभारतात जेव्हा सत्तेची गणिते बदलतात, तेव्हा जुनी सगळी व्यंगचित्रे, narrative आणि शिवीगाळ गोदामात जमा करून आणि ताज्या दमाचे मनोमिलन  फोटो भिंतीवर लागतात. चर्चिल यांच्या शब्दांचा आधार घेत भाजप आयटी सेलचे प्रमुख आपल्या पोरांना सांगतील, " ज्या प्रमाणे केवळ जगताचे कल्याण करण्याच्या हेतूने शिवाने हलाहल प्राशन केले होते. त्याच प्रमाणे मोदीजींनी केवळ देशाचा विचार करून कोंग्रेसी राष्ट्रविघातक विचारधारेला कमकुवत करण्यासाठी बारामतीशी हातमिळवणी केली आहे. जर आपल्याला हिंदू राष्ट्राची स्थापना करायची असेल तर आपल्याला या संक्रमणकाळात त्याग करणे अनिवार्य आहे...!" हा आहे अस्सल बौद्धिकाने सजवलेला भारतीय राजकारणातील 'रिफ्रेमिंग चा चमत्कार'!

No comments:

Post a Comment

स्कूल ठीक होतील....?

"शिक्षण क्षेत्रात सुधारणा व्हावी यासाठीच्या आंदोलनांना सरकारला सामोरं जावं लागलंय. आज जगातल्या साऱ्या मोठ्या बहुराष्ट्रीय क...