"राजसत्तेचं मोठं यश याच गोष्टीत आहे. त्यांनी जनतेला जागरूक 'नागरिक' बनवण्याऐवजी फक्त पक्षाचा 'समर्थक' बनवून टाकलंय. नागरिक कामाचा हिशोब मागतो, पण समर्थक कुठल्याही परिस्थितीत सरकारचा फक्त उदोउदोच करतो. आज रुपयाची किंमत ९६-९७ एवढी घसरूनही लोक आंदोलन करत नाहीत, ते मोबाईलवरच सरकारच्या भाटगिरीत मग्न आहेत. जिथे जनता मोबाईलवर एकमेकांशी लढण्यात गुंग असते, त्याचवेळी सरकार मात्र जबाबदारी टाळत वास्तव जीवनातील कठोर प्रश्नांना बगल देऊन पळ काढण्यातच पटाईत होतं, हे फक्त राजकारण चाललेलं नाही, तर लोकांच्या बुद्धीवरच ताबा मिळवण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलंय. लोकं कळसूत्री बाहुल्यांसारखी झालीत अन् कळसूत्र राजसत्तेच्या हातात आहे. विविध साम्राज्यांच्या आक्रमणातून, बलिदानातून, आंदोलनातून, शिस्तबद्ध विरोधातून, धर्मनिरपेक्षतेच्या गाजावाजानं, लोकशाहीच्या मिरवणुकीनं, संविधानाच्या मार्गावर दिमाखदार तोऱ्यात उभा झालेला आमचा देश, विकला गेला! पण आम्ही बघत राहिलो...! आम्ही नपुंसक झालोत. षंढ झालोत...!
...................................................
*भा*जपने भारताला २०१४ मध्ये जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं आश्वासन दिलं होतं. पण १० वर्षांनंतर आज परिस्थिती अशी आहे की, इच्छा असूनही करण्यासाठी लोकांना काम धंदा नाही; त्याऐवजी ते फावल्या वेळात वेगवेगळ्या राजकीय चौकटींमध्ये, नॅरेटिव्हच्या वायफळ चर्चेत गुंगलेत. राजकारणाचा खरा खेळ रस्त्यावर उतरून नाही, तर लोकांच्या डोक्याशी खेळला गेलाय. जनतेचे विचार हळूहळू असे बदलण्यात आलेत की, लोक स्वतःच्या अडचणी, बेरोजगारी, महागाई विसरून सरकारची बाजू उचलून धरण्यातच धन्यता मानू लागलेत. हेच खरं अशा राजकारणाचं साध्य होतं. ते साध्य झालं म्हणायचं. २०१४ ते २०२६ या काळात करोडो तरुणांनी सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिल्या. पण या काळात पेपर फुटण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं. राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्र अशा अनेक राज्यांमध्ये भरती घोटाळे झालेत, ज्यामुळे लाखो तरुणांचं भविष्य अन् उमेदीची वर्षे वाया गेलीत. कुणी ५ वर्षं तयारी करत होतं, तर कुणी ७ वर्षं. काळ थांबून का राहतो? उमेदवारीचं वय निघून गेलं, पण ना नोकरी मिळाली. ना टीव्हीवर या बेरोजगारीला राष्ट्रीय संकट म्हटलं गेलं, ना तो चर्चेचा मुद्दा बनला. का? कारण बेरोजगार तरुण जर संतापले असते, तर निवडणुकीतल्या हारजितीचा खेळ बिघडला असता ना! त्यावर तोडगा कसा काढला गेला तर या बेरोजगार तरुणांच्या हातात स्मार्टफोन, त्यात रीळं, व्हिडिओ आणि या प्रभावी माध्यमांतून त्यांच्या डोक्यात सतत 'भावनिक युद्ध' पेटतं ठेवलं गेलं.
२०१४ नंतर भारतात एक गोष्ट बदललीय. सरकारं कामापेक्षा देखावाच जास्त करू लागलीत. २०२० मध्ये कोरोनाच्या काळात लाखो मजूर रस्त्यावरून पायी चालत निघाले होते. कोणी ५०० किलोमीटर तर कोणी १००० किलोमीटर अंतर पायी कापलं. स्वातंत्र्यानंतर देशाने मजुरांचे इतकं मोठं स्थलांतर कधीच पाह्यलं नव्हतं. पण हे होत असताना टीव्हीवर काय सुरू होतं? तर थाळ्या आणि टाळ्या पिटण्याचा उत्सव दाखवला जात होता. इतिहासात बहुधा पहिल्यांदाच एखाद्या देशात लोकांवर ओढवलेल्या एवढ्या मोठ्या जीवघेण्या महामारीला एका मोठ्या उत्सवासारखं साजरं केलं गेलं. त्यानंतर कृषी कायदे आले. एक वर्षापेक्षा जास्त काळ शेतकरी रस्त्यावर आंदोलनं करत धरणं देऊन बसले. शेकडो शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. पण तेव्हा या शेतकऱ्यांना काय म्हटलं गेलेलं? देशद्रोही, खलिस्तानी, दलाल, पाकिस्तानी एजंट. पण शेतकरी बधले नाहीत. शेवटी सरकारला नामुष्की पत्करत हे कायदे मागे घ्यावेच लागले. म्हणजे हे अनर्थकारी कायदे आणण्याचा निर्णय सुरवातीपासून चुकीचाच होता, पण सरकारधार्जिणी प्रसार यंत्रणा वृत्तवाहिन्या, समाज माध्यमं एवढी निर्ढावलेली होती की, स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी ते शेवटपर्यंत शेतकऱ्यांनाच बदनाम करत राहिले. हेच आजच्या नवीन राजकारणाचं तंत्र आहे. आधी समोरच्यावर हल्ला करायचा अन् नंतर लोकांचा दबाव वाढला की कुटीलपणे मागं जायचं. पण पडलं तरी नाक वर अशा पद्धतीनं!
रुपया का रसातळ गाठत आहे याचं खरं कारण समजून घ्या. भारतात वस्तूंचं उत्पादन जितकं वाढायला पाहिजे होतं तितकं वाढलं नाही. चीन नवनवीन कारखाने उभारत गेला, व्हिएतनाम, बांगलादेश, तायवान, दक्षिण कोरिया आपली निर्यात वाढवत गेले, पण यादरम्यान भारतात सगळ्यात वेगाने काय वाढलं असेल तर तो फक्त निवडणूक प्रचार. हजारो कोटींचे बजेट असलेले कार्यक्रम, प्रचंड मोठी प्रसिद्धी मोहीम, प्रत्येक योजनेवर स्वतःचा चेहरा आणि प्रत्येक रस्त्यावर, पेट्रोलपंपावर, रेशनच्या पिशवीवरही स्वतःचा फोटो घालण्याचा अट्टहास. सरकार हळूहळू कारभार करणारी संस्था म्हणून संपली फक्त जाहिरात करणारी संस्था बनली. सगळ्यात मोठं नुकसान कशाचं झालं माहितीये का? विश्वासाचं. आता जेव्हा लोक रोज नवीन घोषणा ऐकतात पण त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात काहीच बदल होत नाही हे ढळढळीत दिसत असतं, तेव्हा हळूहळू ते खरं काय आणि जाहिरात काय, यातला फरक करणंही सोडून देतात. भ्रमातच आयुष्य कुंठित करण्यात आलंय बिचाऱ्यांचं. कोणत्याही लोकशाहीसाठी हा सगळ्यात धोकादायक टप्पा असतो. आज दुर्दशा अशी झालीय की, तरुण नोकरी मागून थकले आहेत, शेतकरी शेतीचा खर्च न परवडल्यामुळे हतबल झालाय आणि छोटा व्यापारी कर आणि बाजाराच्या स्पर्धेत चिरडला गेलाय. पण सोशल मीडियावर मात्र असं नियंत्रित वातावरण तयार केलं गेलंय की, जर कोणी सरकारला जाब विचारला, तर त्यालाच चुकीचं देशद्रोही, कॉक्रोच ठरवलं जातंय. म्हणजे प्रश्न सोडवू नका, प्रश्न विचारणाऱ्याला संपवून टाका. रोगावर इलाज करायचा सोडून, रोग आहे ही जाणीव करून देणाऱ्यालाच संपवण्याचा हा जीवघेणा खेळ आहे.
आम्ही जन्माला घातलेला मुलगा बदमाश निघू शकतो, पण आम्ही निवडलेली सरकारं बदमाश निघूच शकत नाहीत, अशी मतदारांची मानसिक स्थिती बनलीय. विविध साम्राज्यांच्या आक्रमणातून, करोडो लोकांच्या आत्म बलिदानातून, हजारोंच्या आंदोलनातून, त्यांनी केलेल्या शिस्तबद्ध विरोधातून, धर्मनिरपेक्षतेच्या गाजावाजानं, लोकशाहीच्या मिरवणुकीनं, संविधानाच्या मार्गावर दिमाखदार तोऱ्यात उभा झालेला आमचा देश, विकला गेला! आता कुठं विकासाची स्वप्नं हा देश आतुरतेनं पाहू लागला होता, करोडो रोजगाराच्या गोतावळ्यात गुंतून राहणारा, पाठीवर दणके मारून शाळेत पाठविणारा, शिक्षणानं मुलं घडविणारा, नोकरी लागल्यावर आई वडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहणारा, आपल्या अर्थव्यवस्थेला सातासमुद्रापार नेण्याचं स्वप्न पाहणारा, रुपयाला डाॅलरच्या शर्यतीत जिंकवणार म्हणणारा, पाच वर्षांत बँकेत पैसे डबल करणारा, देश आमचा! सहज विकून टाकला! आमची बैलं रडतात, त्यांना विकल्यावर! मालकही रडतो, पैसे हातात घेतल्यावर! पण राजकारणी मिरवतात देश विकल्यावर! शेतकरी शेतीत हरला, तर आत्महत्या करतो! पण राजकारणी निवडणूक हरला तर ते आत्महत्या करत नाही! शेतकरी मेला तर, त्याची पोरं उघड्यावर पडतात अन् राजकारणी मेला तर, त्याची पोरं सहानुभूतीच्या लाटेनं आपोआप निवडून येतात! हा टोकाचा विरोधाभास समजण्याला आम्ही घेतलेलं शिक्षण कामी आलं नाही, याची लाज वाटूनही, आम्ही निर्लज्जपणे गप्प बसलो. आम्ही देश छाती ठोकून विकून टाकला! पण आम्ही तरी काय करू? आम्ही व्यसनी झालोत, अगदी दारूड्यासारखा! अचानक असंख्याना धर्माचं व्यसन लावलं गेलंय, आम्हाला अचानक धर्म... धर्म... असा खेळ आवडायला लागलाय, दुसऱ्या धर्माचा राग यायला लागलाय, न दिसणारा ईश्वर आता आपला वाटायला लागलाय, झेंड्याच्या रंगात आम्हाला आपलेपणा वाटायला लागलाय, आम्हाला अचानक पक्ष आवडायला लागलाय, कधी नव्हे तो आज माईकवर विश्वास बसायला लागलाय, सरकारनं सांगितलेल्या समस्या, आपल्या वाटायला लागल्यात, सरकारचं सर्वच काही पटायला लागलंय, सरकार जसं म्हणेल तसं करायला आम्हाला आनंद वाटायला लागलाय, देशातल्या पत्रकारांवर विश्वास बसायला लागलाय, विरोधक मूर्ख वाटायला लागलेत, पक्षाचा मानसिक गुलाम म्हणून मिरवायला आम्हाला गर्व वाटायला लागलाय, प्रश्न विचारणारा तुच्छ वाटायला लागलाय, आमच्या या सर्व आवडीच्या सह्या घेऊन! आमचा देश विकून टाकला! सनातन शिक्षणात इतकी ताकद असेल तर, मग परकीय विद्यापीठे भारतात सुरु कशाला आहेत? शिक्षण जर मुलभूत हक्क आहे तर, मग शाळा बंद कशाला होत आहेत? नोकऱ्या जर विकास करतात तर, मग ते त्याचे खाजगीकरण कशाला? रेल्वे जर आमच्या पैशानं बनलीय तर मग, डबे अदानीचे कशाला आहेत? भ्रष्टाचार संपणार म्हणे मग, नोटबंदी कशाला केलीत? ''We the people...!'' हे जर आपलं पहिलं वाक्य असेल तर, मग धर्म कशाला? सत्ता जर बहुजनांची चाबी असेल तर, निवडणुकीत भांडवलशाहीचं कुलूप कशाला लावायचं? विरोध जर लोकशाहीचं ब्रह्मास्त्र असेल तर, विरोधासाठी झेंडे कशाला हवेत? रस्ता आमच्याच पैशातून बांधलाय ना मग, त्यावरून जाण्यासाठी पुन्हा पैसे कशाला? पोट भरण्यासाठी आम्ही धडपडतोय, मेहनत करतोय मग, २ रु. किलो तांदूळ कशाला? ५ किलो धान्य फुकट कशाला? आत्मनिर्भर भारताचे स्वप्न दाखवून शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर ६ हजार रूपयांचे उपकार कशाला? भांडवलदार मित्रांचे बुडीत कर्जे गरीबांच्या अकांऊट मधून कापताय कशाला? आम्ही कर्ज घेत नाही मग आमच्या उरावर देशाचे कर्ज कशाला? असे कितीतरी प्रश्न समोर असतांनाही, आम्ही सरकारची थोरवी गात राहिलो. असाच आमचा देश विकला गेला! पण आम्ही सुद्धा चलाक आहोत, आम्हाला आमच्या सोयीच्या गोष्टी पटकन पटतात, ज्याठिकाणी आम्हाला आमचं शिक्षण वापरणं गरजेचं असतं, त्याठिकाणी आम्ही हमखास पळ काढतो, आमच्या जातीशी, समाजाशी संबंधित प्रत्येक गोष्ट आम्ही अनुकरणाने पाळतो, यामध्ये आम्ही तर्काचा वापर करत नाही, आम्ही निवडलेल्या सरकारनं शेण जरी खाल्लं तरी, ते का खाल्लं? हे पटविण्यात आम्ही आमची शक्ती पणाला लावतो, आमच्या पक्षाचा झेंडा दुसऱ्या झेंड्यापेक्षा आम्हाला श्रेष्ठ वाटायला लागलाय, आम्हाला धार्मिक टोळीत सक्रिय राहण्यात मजा वाटायला लागलीय, चुकीचा इतिहास जरी आमच्या ताटात वाढला गेला तरी, त्याचे घास आमच्या मेंदूत भरण्यात आम्हाला मजा वाटायला लागलीय, भारत भविष्यात महान होणार आहे! असं आमच्यावर, आम्ही निवडलेली सरकारं बिंबवत आहेत, पण तो कसा महान करणार आहात? हे विचारण्याची आमच्यात तिळभरही हिंमत, धाडस नाही, विकासाच्या गोष्टी माईकवर ऐकून रात्री झोप यायला लागलीय, याच धार्मिक झोपेत आमचा देश विकून टाकला अन् आम्ही झोपूनच राहिलो! एक काळ असाही होता विमानतळे, रेल्वे, बॅका, इन्शुरन्स, बंदरे, विद्यापीठे, मोबाईल सेवा, संरक्षण क्षेत्र, खाणी, वीज आणि इतर आमच्याच होत्या, या क्षेत्रातल्या नोकऱ्या आमच्याच होत्या, पण आता नाहीत. पण का नाहीत? हे विचारण्याचं धाडस आता आमच्यात नाही. कारण दुसऱ्याला चूक म्हणायला! शिक्षणाचा वापर करावा लागतो, जे आता आम्ही विसरलोय. एरव्ही आमच्या शेजाऱ्यानं जर दोन इंच कांपाऊंड वॉल इकडं आणला तर, आम्ही कुऱ्हाड घेऊन उभा होतो. पण सरकारनं आमचं सर्वच विकलं तरी, आम्ही नुसता षंढासारखे बघत बसतोय कारण सरकार आम्ही निवडलेलं आहे म्हणून! की आमची आणि सर्वांची यात फसगत आहे म्हणून! समस्या स्वतःची असली तर प्रश्न पडतो, पण जर समस्या सर्वांची असली तर प्रश्न सोडवेल कोण? हा प्रश्न पडतो. पण आम्ही आता मुके झालोत, आमच्या मुकेपणाचा फायदा घेऊन, आमचा देश ढोल ताशाच्या धार्मिक मिरवणुकीत विकून टाकला जातोय अन् आम्ही बघत बसलोय.! खरं सांगायचं तर! आम्ही आता नपुंसक झालोत. षंढ झालोत, आमच्या मनगटात दम राहीलेला नाही. लढाई सोडाच! साधं विरोधात अन् समाजाच्या भल्यासाठी बोलायची आमच्यात हिंमत नाही. वेळ तर अजिबातच नाही. धर्माच्या सुयांनी पार पोखरला गेलोत आम्ही, आम्हाला आता देवदूताचे स्वप्न पडायला लागलेत, कुणीतरी येईल अन् आमचे आयुष्य सफल करेल इतका आम्ही फिल्मी झालोय, आमच्या महामानवांनी जी लोकशाही रूजवली, ती कशी टिकवायची? त्याचा सिलॅबस आता जातोय याची आम्हाला काळजी नाही. आता आम्ही लक्झरी लाईफ जगतोय त्यामुळे दुसऱ्यांवरचा अन्याय आम्हाला काल्पनिक वाटायला लागलाय, आमचे सातबारे आणि बॅक बॅलेंस बघून देशाचा विकास होतोय आणि दुसऱ्यांना पिवळं रेशन कार्ड मिळतोय यातला विरोधाभास आम्हाला हुकूमशाही वाटत नाही, किमती वाढताहेत, पण आम्ही श्रीमंत असल्यानं आम्हाला उपभोग घेता येतोय. तिकडे काहींना ताप आल्यावर बचत गटातून कर्ज काढावं लागतंय, या कृतीचा आमच्यावर आजकाल फरक पडत नाही, गरीबी ही गरीबांच्या कर्तृत्वानं मिळालीय, अश्या मतांचे आता आम्ही झालोत, आमची चारचाकी आम्ही सुसाट पळवतोय पण काहींची पायपीट ही पिढीजात असायला हवी इतके आम्ही
आज श्रेष्ठ झालोत, या सर्व विरोधाभासांचा आता आमच्यावर फरक पडत नाही, त्यामुळे त्यांनी देश विकून टाकला पण आम्ही विरोध करत नाही...!
आता उद्या तुम्ही नद्या, नाले, जंगलं, डोंगर, पहाड, धरणं, आमची अंगणं, रस्ते, वन्यजीव, पक्षी सुध्दा विका आणि कमीच पडले तर आमच्या किडण्या, डोळे आणि आतड्या सुध्दा विका, पण तुम्ही तुमच्या धर्माला धोक्याच्या बाहेर काढा, इकडं आमच्या मुलांचं भविष्य पिढ्यांपासून धोक्यात राहीलं तरी चालेल, पण त्या धर्माला धोक्याबाहेर काढा. कारण तो धर्म धोक्यात आलाय. आम्हाला धोक्याची सवय झालीय तुमच्या धर्माला धोक्याची सवय नाही. तो घाबरेल, दचकेल कदाचित बदला म्हणून तोच तुमच्या जीवावर आज नाही उद्या उठेल. आमच्या पिढ्या आणखी अंधारात जगतील, पण तुमची गैरसोय नको म्हणून तुमच्या धर्माला सदैव जगवतील. तुम्ही असाच देश विकत राहा, आम्ही असाच धर्म जागवत राहू आणि उद्या एकमेकांना कापून खाऊ..!
हरीश केंची,
९४२२३१०६०९
No comments:
Post a Comment