ब्रूटस, बॅरिस्टर जिना, राघोबा, एकनाथ शिंदे ते सयोनी घोष ! काळजाच्या पाकळीत तेच कट्यारीचा अचूक घाव घालू शकतात, ज्यांना आपण आपल्या काळजातले समजून आयुष्यभर आपल्या सावलीपेक्षाही जवळ केलेले असते. म्हणूनच रोमच्या संसदेमध्ये ज्युलियस सिझरवर त्याच्या पुत्राप्रमाणे जपलेल्या मित्राकडून, ब्रूटसकडून जेव्हा वार होतो, तेव्हा डोळ्यातले अश्रू पुसत तो हताशपणे विचारतो 'ब्रूटस, यू टू...?' रोमन साम्राज्यापासून ते शेक्सपियरच्या लेखणीतून आणि आजच्या जागतिक राजकीय रंगभूमीवरही हे खेळ सुरूच आहेत. ब्रूटसला तर ज्युलियस सिझरच्या पत्नीने स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळले होते.
बॅरिस्टर जिना हे काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते होते. लोकमान्य टिळकांचे जवळपास खासगी सचिव असल्यासारखे ते वावरायचे. सरोजिनीदेवी नायडू तर बॅरिस्टर जिनांचा उल्लेख हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अग्रदूत म्हणून अभिमानाने करत. लखनऊचा हिंदू-मुस्लिम करार घडवून आणण्यातही बॅरिस्टर जिनांची महत्त्वाची भूमिका होती. पण याच व्यक्तीने पुढे पाकिस्तानच्या स्वप्नाला खतपाणी घालत, एकेकाळी अखंड भारताचे पाहिलेले स्वतःचे भव्य स्वप्नच जणू विसरले.
माधवराव पेशव्यांचे दुःखद अन् अकाली निधन झाल्यावर राघोबादादा पेशवे यांनी मोठे काका म्हणून नारायणराव पेशव्याला सांभाळायला हवे होते. पण त्यांच्या कारस्थानी पत्नी आनंदीबाईंच्या महत्त्वाकांक्षेमुळे गारद्यांना हाताशी धरून नारायणरावांचा खून झाला. पोरवयातला नारायणराव 'काका, मला वाचवाss...!' अशी आर्त हाक देत त्या अंधाऱ्या रात्री शनिवारवाड्यातून जीव वाचवण्यासाठी धावत होता. राघोबादादांचे पूर्वचरित्र मात्र अत्यंत उज्ज्वल होते. त्यांनी अटकेपार झेंडा रोवला होता! पण कारस्थानी राजकारण, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि परिस्थिती यांच्या भोवऱ्यात ते अडकले. पुढे राघोबा इंग्रजांच्या आश्रयाला गेले आणि पुण्यवान महाराष्ट्र देश शनिवारवाड्यातील या फितुरीमुळे इंग्रजांच्या टाचेखाली गेला.
कधी कधी इतिहासातील या व्यक्तिरेखांचा अभ्यास करताना वर्तमानातील काही चेहरेही मनाला खुणावतात. अगदी काही महिन्यांपूर्वी कलकत्त्याच्या राजकीय रंगमंचावर हातात माईक घेऊन गाणारी, नाचणारी आणि आपल्या पंतप्रधानांवर तीव्र टीका करणारी फिल्मी अभिनेत्री म्हणजे सयोनी घोष. बंगाल हा माझा आवडता प्रांत आहे. शरदचंद्र चट्टोपाध्याय हे माझे आवडते लेखक आणि काझी नजरूल इस्लाम हे आवडते बंगाली कवी. एकूणच बंगालच्या संस्कृतीतील प्रत्येक गोष्ट माझ्या मनाजवळची आहे. त्यामुळेच सयोनी घोष यांच्या मुखातून दिल्लीकरांबद्दल ऐकायला मिळणारे तीव्र शब्द मनाला खटकायचे. सयोनी जेव्हा एकनिष्ठता आणि त्यागाच्या मोठमोठ्या घोषणा करायच्या, क्रांतीगीते गायच्या, तेव्हा मन भारावून जायचे. असे वाटायचे की उद्या प्रसंग आला तर आपल्या प्रिय नेत्या ममता दीदींसाठी आगीच्या नदीत पहिली उडी घेणाऱ्या याच सयोनी घोष असतील. पण झाले मात्र सारे उलटेच.
मनुष्याचे विरोधकही अनेकदा अतिशय बुद्धिमान असतात. म्हणूनच डोंगराएवढ्या व्यक्तिमत्त्वांना कमजोर करण्यासाठी ते अशा व्यक्तींचा वापर करतात, ज्या सर्वाधिक जवळच्या असतात. तो जवळचा मित्र असो, त्या व्यक्तीच्या आईने जन्म दिलेला दुसरा पुत्र म्हणजेच सख्खा भाऊ असो, किंवा अत्यंत विश्वासातला चालक असो. पूर्वी रथ हाकणाऱ्यांपासून ते आधुनिक काळातील कार चालक आणि वैमानिकांपर्यंत या खेळाची व्याप्ती वाढलेली आहे. मनुष्यातील गाढ प्रेम आणि फितुरी या दोन्हींचा विचार करताना प्लुटार्क, इसापनीती, जंगल बुक, अरेबियन नाईट्स आणि डॉन किहोते यांसारखे ग्रंथ पुन्हा मनाच्या गाभाऱ्यात प्रकट होतात. नकळत इतिहासाचे रंग पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर उधळले जातात. तो ब्रूटस, तो राघोबा, ते बॅरिस्टर जिना सारे डोळ्यासमोर उभे राहतात. आणि मग निष्ठा व विश्वास यांच्या जागी अनादी काळापासून प्रत्येक मनुष्याच्या ठायी दडलेली राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि पराकोटीचा स्वार्थ यांच्या काटेरी पताका उंच उंच फडकताना दिसतात. कालाय तस्मै नमः
No comments:
Post a Comment