Sunday, 15 February 2026

*राष्ट्रवादीची गरज आहे का?*

"गेल्या काही दिवसांतल्या राजकीय घडामोडी पाहिल्यानंतर मनात एक प्रश्न निर्माण झाला, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राला गरज आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दोन्ही गट. घड्याळ आणि तुतारी चिन्हाचा. आजच्या घडीची या दोन्ही पक्षांची अवस्था पाहिल्यानंतर वाटतं, की हे दोन्ही पक्ष नामशेष झाले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात काडीचाही फरक पडणार नाही. उलट त्यातून महाराष्ट्राचे झाले तर भलेच होईल...! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवीिना राहू शकत नाही हाे वास्तव आहे ते नाकारुन कसं चालेल?"
...........................................
*रा*ष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राला गरजच नाहीये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे इव्हेंट मँनेजमेंट कंपनी सारखं राजकारण करतात. रोहित पवार हे अजित पवार होवू पाहतायत. गावची कुचाळ टवाळ पोरं जशी टिंगल करत गंभीर विषयावरही निव्वळ दात काढत राहतात तसं जयंत पाटलांच सध्या चालूय. शशिकांत शिंदे यांना महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात उतरवलय पण अनुभव जत्रेतल्या कुस्तीचा आहे. तोफेसारखे बरसणा-या अमोल कोल्हेंची तोफ थंडावलीय. बाकी खडसे कंपनी धड धराचे ना भराचे. त्यांची बिडी पेटेना मग सीडी कधी वाजायची? बाकी सगळी मंडळी पवार साहेबांच्या गुणगाैरवाच्या तुता-या वाजवण्यातच धन्यता मानताहेत. या सगळ्या गाळात मात्र शरद पवारांच्या रथाचं चाक रुतलंय. त्यांची अवस्था आज शापित कर्णासारखी झालीय. हातात ब्रम्हास्त्र आहे पण ऐनवेळी त्या विद्येचे विस्मरण होतय. अजित दादांच्या राष्ट्रवादीला भाजपने हायजँक केलंय.  भुजबळ, तटकरे, मुंडे आणि चहाटळ पटेल हे फडणवीसांचे पट्टे घातलेले साथी आहेत. ते वरती राष्ट्रवादीची पँट घालतात पण त्यांची आतली चड्डी मात्र फडणवीसांची आहे. सुनेत्रा पवार आणि त्यांची दोन मुलं यांना भाजप कधीच मुंडी वर करू देणार नाही. शरद पवारांची जिरवण्यासाठीच त्याचा वापर केला जाईल. राहूल गांधीला अडवण्यासाठी मेनका गांधीचा मुलगा जसा वापरला तसा जय आणि पार्थ यांचा वापर करतील. पवारांच्या घरातली त्यांची स्वत:चीच कट्यार पवारांच्या छातीत खुपसण्यासाठी जय आणि पार्थ 'कट्यार' म्हणून पोसले जातील. बाकी सुनेत्राताईंची कैकयी करायला फार वेळ लागणार नाही भाजपवाल्यांना. त्यामुळे राष्ट्रवादीचं उद्याच भवितव्य काय? हा यक्षप्रश्न आहे. शरद पवारांनी इथून पुढे उरलेल्या आयुष्यात सत्तेचं राजकारण सत्ता, सत्तेचे खेळ, पैसे, संस्था, कारखाने यात न रमता जाता जाता फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची पेरणी करणारी कुरी हातात धरावी. महाराष्ट्र पिंजून काढावा. असं केल तर त्याला भरघोस पिक येईल. औरंगजबासारखा माजलेला भाजप आणि त्याचे जातीयवादी दात मुळापासून उखाडता येतील. अफझुल्ल्याचा कोथळा काढणा-या, कृष्णा कुलकर्ण्याच मुंडकं उडवणा-या शिवरायांचा आणि अनाजीपंताला धडा शिकवणा-या छत्रपती संभाजी राजांचा हा महाराष्ट्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हा महाराष्ट्र धर्म हा त्याचा गाभा होता. शरद पवारांनी वेळोवेळी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं, की आपल्या पक्षाच्या नावामध्ये काँग्रेस आहे. आपली परंपरा काँग्रेसची आहे. स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची वृत्ती असलेल्या शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला दिल्लीच्या इशा-यावर काम करणं कठीण होतं. त्याला तत्कालीन कारणं आणि अनेक पदर होते. पण मूळ कारण पवारांची स्वतंत्र वृत्ती हेच होतं. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला होता. स्वतंत्र पक्ष काढताना त्यांनी काँग्रेसची विचारधारा प्रमाण मानली. धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारा, महाराष्ट्र धर्मासाठी काम करणारा प्रादेशिक पक्ष असंच त्याचं स्वरुप होतं. ज्या लोकांना काँग्रेसच्या समुद्रात निभाव लागणं कठीण वाटत होतं, त्यांना महाराष्ट्रव्यापी राष्ट्रवादी सोयीचा वाटत होता. या पक्षाचे नेते शरद पवार हे महाराष्ट्रातील प्रगतीशील प्रवाहाचे आधारस्तंभ राहिले. हा पक्ष भाजपविरोधात संघर्ष करत राहिला. धर्मवादी राजकारणाचा प्रतिवाद करत राहिला. महाराष्ट्र धर्मासाठी झगडत राहिला. ती महाराष्ट्राची गरज होती. आता त्या पक्षाच्या दोन्ही तुकड्यांनी आपली मूळ भूमिका टाकून दिलीय. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या दृष्टिने त्यांचा उपयोग संपलाय. त्यांचे औचित्य उरलेले नाही. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचे औचित्य उऱत नाही तेव्हा अशी गोष्ट टिकली काय किंवा नामशेष झाली काय त्याने कुणाला काहीच फरक पडत नाही. 
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या वर्षभरात राजकीय पक्षापेक्षा एखाद्या व्हाट्सअप ग्रूपचे स्वरूप आलंय. सुप्रिया सुळे यांच्यापासून जयंत पाटलांपर्यंत यच्चयावत सगळे नेते केवळ सोशल नेटवर्किंग करताना दिसताहेत. आपापल्या राजकीय गढ्या सुरक्षित ठेवण्यापलीकडे कुणी पाहात नाही. राजकारणात विरोधी पक्षात राहताना संघर्ष करायचा असतो हे सगळे विसरून गेलेत. त्याचमुळे अजितदादांच्या पक्षात विलिनीकरण करून सत्तेचे चारदोन तुकडे मिळतील, याची आस सगळ्यांना लागून राहिली होती. अजितदादांच्या जाण्यानंतर त्यांच्या पक्षातले नेते हिंग लावून विचारत नसताना ही मंडळी मात्र लाचारासारखी 'दादांची इच्छा होती!' असा राग आळवताना दिसतात. आता परिस्थिती बदललीय आणि बदलत्या परिस्थितीनुसार आपल्याला भूमिका बदलायला पाहिजे, याचा विचार कुणीच करताना दिसत नाही. एकटे शरद पवार अपवाद आहेत. अजितदादांचे अस्थिविसर्जन झाल्यानंतर शरद पवार बाहेर पडले. ते सत्तेच्या सोहळ्यासाठी नव्हे. लोकांच्या प्रश्नांसाठी. शरद पवारांचं राजकारणात सहा दशकं उभं राहण्याचं बलस्थान हेच आहे. हे त्यांच्या लेकीलाही उमजलेलं नाही आणि त्यांचा वारसा उगाळणा-या बाकीच्या मंडळींनाही. सुप्रिया सुळे यांना देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदींपर्यंत कुणाचेही कौतुकाचे पूल बांधताना संकोच वाटत नाही. आपण पक्षाच्या कार्याध्यक्ष आहोत आणि शऱद पवार यांच्या प्रकृतीच्या मर्यादा असताना आपल्यावर काहीएक जबाबदारी आहे, याचं काडीचं भान नाही. बारामती लोकसभेच्या पलीकडचा महाराष्ट्र आणि संसदेतल्या महिला मंडळापलीकडचं विश्व त्यांना दिसत नाही. संसदेच्या मंचावर त्यांची क्षमता अनेकदा दिसून आली आहे, परंतु ती महाराष्ट्राच्या राजकारणात वापरण्याची त्यांची इच्छाशक्ती दिसून आलेली नाही. एनजीओ सदृश्य राजकारण कुणाच्याच फायद्याचं नाही, हे त्यांच्या लक्षात येईल तो दिवस त्यांच्या पक्षासाठीचा सुदिन असेल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा. सुप्रिया सुळे या पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत. जयंत पाटील राज्यपातळीवरील सर्वोच्च नेते आहेत. शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून लढताना या पक्षाला मिळालेल्या दहापैकी आठ जागी विजय मिळाला. नवव्या शशिकांत शिंदे यांच्या जागेला तुतारीच्या दुस-या चिन्हामुळे फटका बसला. आणि दहावी जागा एकनाथ खडसेंच्या अवसानघातामुळे गेली. नाहीतर पक्षाचा स्ट्राइकरेट शंभर टक्के असता. शरद पवार यांची राजकीय ताकद दाखवणारा हा अखेरचा निकाल होता. विधानसभेला चित्र पालटलं. आणि पुन्हा शरद पवार यांचं राजकारण संपल्याची चर्चा सुरू झाली. नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांनी तर त्यावर शिक्कामोर्तब केलं. निवडणुकीतील यशापयश हे शरद पवार यांच्या मूल्यमापनाचं अत्यंत चुकीचं परिमाण आहे, हे एवढ्या वर्षांनंतर तरी लक्षात यायला पाहिजे. पण लक्षात येऊनही काहीजण मुद्दाम ते लक्षात घेत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादांच्या नेतृत्वाखालील पक्ष. आताच्या घडीला या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार आहेत. पीयूष गोय़ल यांच्याकडून एक खडा टाकून प्रफुल्ल पटेल यांनी चाचपणी करून बघितली. पण प्रकरण अंगलट येत असल्याचं लक्षात आल्यावर सारवासारव करावी लागली. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबत आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही. उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या दोन्ही भूमिकांमधून त्या पक्ष कसा चालवतील त्यावर पक्षाचे भवितव्य राहील. अजितदादांशी तुलना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण भविष्यात ममता बॅनर्जी, जयललिता, मायावती यांच्यासारख्या नेत्या बनतात की राबडीदेवी यांच्या मार्गाने जातात, हे पाहावे लागेल. आताच्या घडीला त्यांचा पक्ष भाजपच्या छत्रछायेखाली आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे त्यांच्या पक्षातले कारभारी शरीराने राष्ट्रवादीत अन् मनाने भाजपमध्ये आहेत. अजितदादांना सगळी कल्पना होती. आपल्या पक्षातले सोळा आमदार फुटून निघण्याच्या तयारीत असल्याचे कळाल्यावर अजितदादांनी पुढाकार घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांच्यावर विश्वास टाकून शरद पवार यांच्या पक्षाने आपले उमेदवारही जिल्हा परिषद निवडणुकीत घड्याळाच्या चिन्हावर उभे केले. यापेक्षा त्यासाठीचा अन्य कुठला पुरावा असू शकतो? म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाकडे जे काही उरले सुरले लढणारे ग्रामीण भागातले कार्यकर्ते होते, ते त्यांनी अजितदादांच्या पक्षात पाठवून दिलेत. आणि ज्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करायचे होते, ते अजितदादाही दुर्दैवानं सोडून गेले. अजितदादा भाजपसोबत सत्तेत असले तरी त्यांनी भूमिका सोडली नव्हती. विचारधारेतलं वेगळेपण त्यांनी टिकवून ठेवलं होतं. अजितदादा किंवा त्यांच्या पक्षाचा आमदार नागपूरच्या अधिवेशनाला गेल्यावर रेशीमबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात माथा टेकायला गेला नाही. हे नोंद करून ठेवायला हवं. अजितदादांचं नेतृत्व आणि त्यांच्या पक्षाची महाराष्ट्राला गरज होती, ती याच भूमिकेसाठी. नजिकच्या काळात भाजप विरोधात ते संघर्षासाठी उभे ठाकू शकले असते. महापालिका निवडणुकीत त्यांनी त्याची चुणूक दाखवली होती. त्यांच्या नेतृत्वाची आणि पक्षाचीही महाराष्ट्राला गरज होती. आता अजितदादा नाहीत. त्यांची भूमिकाही नाही. जी काही मंडळी आहेत ती इशारा होताच, नमस्ते सदा वत्सले..! साठी सज्ज आहेत. आता पक्षाची सूत्रे प्रफुल्ल पटेलांच्या हाती असणार आहेत. पर्यायाने त्याचा रिमोट अमित शाह यांच्या हाती असेल. असा पक्ष महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणासाठी भाजपपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकतो. कारण भाजप उघड भूमिका घेऊन चालतोय. पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे ही चौकडी भाजपच्या विचारांच्या विरोधात ब्र काढू शकणार नाहीत. अजितदादांचा पाठिंबा असल्यामुळेच अमोल मिटकरी, सूरज चव्हाण यांच्यासारखे प्रवक्ते भाजप, हिंदुत्ववादी राजकारणाविरोधात थेटपणे बोलत होते. आता त्यांना ती मुभा नसेल. पुरोगामी किंवा बहुजन बुरखा पांघरून भाजपची भूमिका पुढे नेण्याऱ्या पक्षाची महाराष्ट्राला गरज नाही. अर्थात हा पक्ष नेते, कार्यकर्ते यांच्यापुरता आणि निवडणुका लढवण्यापुरता राहील. तेवढंच त्याचं अस्तित्व असेल.
जयंत पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीचा ग्राफ २०१९ पर्यंत एका विशिष्ट गतीने उंचावत होता. परंतु तो २०१९ मध्ये जिथे होता, तिथेच थांबला. गेल्या सहा वर्षांत ते जिथल्या तिथं आहेत. या काळात त्यांचं एकही गंभीर भाषण ऐकिवात नाही. कितीही गंभीर विषय असला तरी त्यावर उपरोधाचं पाणी ओतून ते स्वतःचं हसं करून घेतात. पक्षातल्या वरिष्ठ नेत्यानं सगळ्यांना सोबत घ्यायचं असतं. पण गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत सगळीकडं त्यांना काड्या करण्यात, गटबाजी करण्यात अधिक रस असतो. एका टोळक्याच्या पलीकडं ते जात नाहीत. पक्षातल्या निष्क्रियांना संरक्षण देण्यात त्यांनी अलीकडच्या काळात आपली ताकद वापरली. पक्ष पुढं जाण्यासाठी विद्यार्थी, युवक आणि महिला या शाखा अत्यंत महत्त्वाच्या असतात. गेल्या दोन वर्षांत या तिन्ही शाखा मृतवत आहेत. जयंत पाटील यांच्या कृपाछत्राखालची मंडळी तिथं आहेत. त्यांना हलवलं तर जयंत पाटील दुखावतील म्हणून त्यांना धक्का लावला जात नाही. शरद पवारही जयंत पाटील यांच्या जणू उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले वाटतात. आणि जयंत पाटील त्याचा फायदा घेत राहतात.
महाराष्ट्राचं राजकारण महिलाकेंद्री बनलं असताना शरद पवारांच्या महिला शाखेइतकी निष्क्रिय आणि मृतवत शाखा देशात कुठं आढळणार नाही. महिलांसंदर्भात घेतलेल्या निर्णयांच्या बळावर ज्या शरद पवारांचं राजकारण उभं आहे, त्या पक्षाच्या महिला शाखेची ही अवस्था शोचनीय आहे. पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे असताना ही अवस्था असणं ही तर एखाद्या पक्षाची गुन्हेगारी स्वरुपाची हेळसांड म्हणावी लागेल. सगळ्या पातळीवरून हे मुद्दाम केलं जातंय, का असाही प्रश्न पडतो. अर्थात शरद पवारांना निवृत्तीचे आणि बाकीच्यांना सत्तेच्या उबेला जाण्याचे वेध लागले असताना हळुहळू पक्ष व्हेंटिलेटरवर नेण्याचे हे नियोजनपूर्वक प्रयत्न वाटतात. अजितदादा फुटून निघाल्यानंतर शरद पवारांनी सातत्याने सांगितलं की, मी तरुण नेतृत्व उभे करणार. पण रोहित पवार आणि रोहित पाटील या दोघांच्यापलीकडंही तरुण आहेत, हे त्यांना कुणी सांगितलेलं दिसत नाही.
शशिकांत शिंदे यांच्यासारख्या एका निष्ठावान आणि लढाऊ कार्यकर्त्याकडं पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद आहे. परंतु त्यांना काम करू दिलं जात नाही. जयंत पाटलांना दुखावायचं नाही. आणि रोहित पवारांना काही विचारायचं नाही. शिवाय जोडीला तीन-चार दिव्यांग शाखा. अशा परिस्थितीत एखाद्या नेत्याला कितीही वाटलं तरी तो कसा काय पक्ष चालवू शकेल? शशिकांत शिंदे यांचे हातपाय बांधून त्यांना शऱद पवारांनी धावण्याच्या शर्यतीत उतरवलंय. कठीण आहे एकूणच सगळं. गेले काही महिने विलिनीकरणाच्या पलीकडे आणखी एक चर्चा होत होती, ती म्हणजे, शरद पवारांच्या पक्षातले खासदार अजितदादांच्या पक्षात किंवा भाजपमध्ये जाऊ इच्छितात. शरद पवारांच्या खासदारांपैकी सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे सोडले तर सगळा आनंदी आनंद आहे. निलेश लंके, बाळ्यामामा म्हात्रे यांच्यासारखे लोक खासदार असले काय, ते शरद पवारांच्या पक्षात असले काय किंवा आणखी कुठे असले म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात काय फरक पडणार आहे? असले नग गोळा करून शरद पवारांना कुठली क्रांती घडवायची आहे? आणि असली मंडळी सोडून गेली म्हणून काय मोठं आभाळ कोसळणार आहे? खरेतर शरद पवार यांनी आता दावणीचा दोर सोडावा. जित्राबांना उधळायचं असेल तिकडं उधळू दे. जितेंद्र आव्हाडासारख्यांची अडचण करू नये. कुणाला घड्याळाच्या राष्ट्रवादीत जायचं असेल, कुणाला भाजपमध्ये जायचं असेल, कुणाला शिवसेनेत जायचं असेल त्यांना जाऊ दे. ज्यांना कुणाला भाजपशी संघर्ष करायचा असेल ते काँग्रेसमध्ये जातील. सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात जायचं असेल तर तेही जाऊदे. 




Wednesday, 4 February 2026

राष्ट्रवादीतला 'पॉवर शो'

"महाराष्ट्रातलं राजकारण अजित पवारांच्या निधनानं ढवळून निघालंय. राजीव गांधींच्या निधनानंतर सोनिया गांधींनी जशी पक्षाची धुरा स्वीकारली तशीच धुरा सुनेत्रा पवारांनी हाती घेतलीय. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलंय. आता चर्चेतली राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया लांबलीय. शरद पवार किंवा पवार कुटुंबीयांशी चर्चा न करता पटेल, तटकरे, भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांना पक्षाची धुरा आणि उपमुख्यमंत्रीपद तर पार्थ पवार यांना राज्यसभा देऊन पक्षावर नियंत्रण आपलंच सिद्ध केलंय. पक्ष पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जाऊ नये याची खबरदारी घेतलीय. महायुतीत जाण्याला उत्सुक असलेल्या शरद पवार गटाच्या नेत्यांना सत्तेपासून रोखण्यात यशस्वी झालेत. या खेळीमागे भाजप नेते असून अजित पवारांचा पक्ष भाजप चालवित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातून राष्ट्रवादीतला 'पॉवर शो' दिसून आलाय. आगामी काळात घडणाऱ्या घडामोडी ह्या विलक्षण असतील.!"
------------------------------------
राजकारण हे प्रवाही असतं, ते कुणाच्या जाण्यानं थांबत नाही की, कुणाच्या जाण्यानं अधिक वेग घेत नाही. राजकारणाला स्वतःची गती असते आणि ज्या ज्या वळणावर राजकारण येऊन थांबतं त्या त्या वेळेला ते कुस बदलत असतं. बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा काळ थांबण्याची जाणीव काही क्षणासाठी तरी झाली. पण आपण म्हणतो तसं शो मस्ट गो ऑन...! तशा पद्धतीनं तातडीनं राजकारण २४ तासाच्या आत प्रवाही होऊ लागलं. गुरुवारी बारामतीत सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यात एक छोटी बैठक झाली, त्यात सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला आणि शुक्रवारी सकाळी पटेल, तटकरे, भुजबळ हे तिघेजण मुंबईत येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. या भेटीनंतर भुजबळांनी सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री होतील, त्यासाठी शनिवारी दुपारी २ वाजता विधिमंडळ सदस्यांची बैठक होईल त्यात सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होईल आणि संध्याकाळी ५ वाजता शपथविधी होईल. हे सारं घडत असताना मात्र तटकरे हे तसं काही ठरलं नाही असं म्हणत नाकारू लागले. तिकडे प्रफुल्ल पटेल मात्र आम्हाला पवार कुटुंबीयांशी बोलावं लागेल, चर्चा करू असं सांगत त्यांनीही नकार दर्शविला.  पण भुजबळांच्या वक्तव्यानं गोंधळ उडाला. त्यामुळं राष्ट्रवादीत काहीतरी घडतंय अशी शंका येऊ लागली. त्यामुळं नक्की अजित पवारांची जागा कोण घेणार? दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण होणार की नाही? पवार फॅमिलीच्या राजकारणाचा पुढचा प्रवाह कसा आणि काय असणार हे शुक्रवारी रात्री उशिरा स्पष्ट झालं जेव्हा सुनेत्रा पवारांचा त्यासंदर्भातला होकार आला आणि त्या पार्थ आणि जय यांच्यासोबत मुंबईच्या दिशेनं निघाल्या असल्याच्या बातम्या आल्या. त्यानुसार शनिवारी विधिमंडळाची बैठक झाली आणि संध्याकाळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्या उपमुख्यमंत्री त्या ठरल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि त्यांचे समर्थक यांना आनंद होणं स्वाभाविक आहे पण याबाबत पवार कुटुंबीयांशी तशी कोणतीच चर्चा तोवर झालेली नाही. इतरांना वा आपल्याला याबाबत विचारलं गेलं नाही, असं पवारांनी स्पष्ट केलंय. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र आहेत. त्यांच्यातला तो अंतर्गत प्रश्न आहे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीकरणाबाबत अजित पवारांची शेवटची इच्छा होती, आमचीही होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर १२ फेब्रुवारीला ते होईल असं ठरलं होतं, पण आता खंड पडलाय असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. पण अजित पवारांच्या पक्षातले नेते आज शांत झालेले दिसले. त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण आता काही काळासाठी तरी थांबल्याचं जाणवतं.

अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अन् सर्वेसर्वा होते. प्रफुल्ल पटेल हे कार्यकारी अध्यक्ष तर सुनील तटकरे हे प्रांताध्यक्ष आहेत. भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत. ते उपमुख्यमंत्रीही होते. हे तिघेही नॉन मराठा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा तसा मराठ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. बहुसंख्य आमदार हे मराठा समाजाचे आहेत. त्यामुळं हे तिघं किंवा इतर कुणीही उपमुख्यमंत्री झाला असता तर पक्षात फूट पडली असती. पक्षात आमदारांना, नेत्यांना एकत्र ठेवण्यासाठी भावनिक बंध आवश्यक होते त्यामुळं सुनेत्रा पवार यांची निवड ही आवश्यक ठरलीय. भाजपची भूमिकाही इथं महत्वाची ठरली. कारण  अजित पवारांना सोबत घेताना त्यांच्यामागे असलेला समाज, सहकारी संस्था ह्या भाजप सोबत यायला हवाय हा विचार होता. राष्ट्रवादी नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्याबाबत संमती घेतली. त्यामुळं सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा झाला. पवार घराण्यातलं कुणीतरी व्हावं असाच आग्रह होता हेही स्पष्ट झालं. आता प्रश्न उभा राहतो हा की, अजित पवारांकडे असलेली खाती राष्ट्रवादीला मिळतील का? तर त्याचं उत्तर नाही असंच असेल. कारण मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःच 'अर्थसंकल्पाचं काही काम अजित पवारांनी केलेलं आहे. पण त्या पुढचं काम मी पाहणार आहे!' असं स्पष्ट केलंय. त्यामुळं आता अर्थखातं हे भाजपकडे राहील हे दिसून आलं. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांना सोडून पटेल, तटकरे आणि भुजबळ हे अजित पवारांबरोबर आले. पक्षातली महत्वाची पदं घेतली. अजित पवार आज नाहीत. पण असं काही घडेल असं कुणालाच वाटलं नव्हतं पण अशी अभूतपूर्व परिस्थिती समोर येऊन ठाकलीय, अशा स्थितीत दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचं एकत्रिकरण केलं आणि  एक पक्ष म्हणून काम करावं लागलं तर पुन्हा एकदा शरद पवार आणि इतर नेत्यांबरोबर काम करावं लागलं तर गेल्या काही वर्षात पक्षावर आपण मिळवलेलं वर्चस्व आणि नियंत्रण निसटून जाईल याची चिंता त्यांना वाटत असावी. दुसरं जर आपल्याला शरद पवार यांच्या हाताखाली काम करावं लागलं तर आपल्याला माहित आहे की, शरद पवार असे नेते आहेत की, त्यांच्यावर कधी कुणी आघात केला असेल तर ते अजिबात विसरत नाहीत. अशावेळी आपल्याला फारसा उज्वल भवितव्य नाही अशी भीती या तिघांना वाटत असावी. असुरक्षितता भासत असावी म्हणूनच त्यांनी शरद पवार यांची भेट न घेता थेट फडणवीस यांची भेट घेतली आणि सुनेत्रा पवार यांचा प्रस्ताव पुढे रेटला हे पटेल, तटकरे, भुजबळ बोलण्यातून स्पष्ट होत होतं. एका विचित्र परिस्थितीत अजित पवार हे वारसदार झाले. पण आता ते नसताना मराठा समाजाचे आमदार, नेते, हे ओबीसी असलेल्या पटेल, तटकरे, भुजबळ यांना स्वीकारणार का? जर दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण झालं तर जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे अशांना पुन्हा एकदा संधी मिळेल का? मग आपलं काय होणार? अशाही शंका त्यांच्या मनात असतील. म्हणून ही संधी आपल्या हातून जाता कामा नये यासाठी सुनेत्रा पवार यांना पुढं करून भावनिकता निर्माण करून त्यांच्या माध्यमातून पक्ष एकसंघ ठेवून पक्षावरचं आपलं नियंत्रण अबाधित राहावं यासाठी यांनी तशी घाई केल्याचं दिसतं.
सुनेत्रा पवारांना पुढं करून राष्ट्रवादीतल्या या तिघा नेत्यांनी अजूनही आपणच पक्ष चालवतो अशी भूमिका घेतलेली दिसते. दिल्लीतले मोदी आणि शहा या दोन्ही नेत्यांशी प्रफुल्ल पटेल या गुजराती नेत्यांचे मधुर संबंध आहेत. त्यामुळेच अजित पवार हे त्यांच्या माध्यमातून महायुतीमध्ये सामील झाले होते हे विसरता कामा नये. केंद्रातल्या राजसत्तेनं राष्ट्रवादीतल्या अनेकांना वेठीला धरलं होतं म्हणून त्यांनी महायुतीत सामील होणं पसंत केलं होते. राज्यात भाजप आणि शिंदेसेना हे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी पक्ष असताना अजित पवारांनी मात्र आपलं धर्मनिरपेक्ष धोरण ठामपणे मांडलं होतं. ते तसेच वागतही होते. पण आता अजित पवार नाहीत. शरद पवारांनी आपण भाजप बरोबर जाणार नाही अशी भूमिका घेतलेलीय. मग जर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचं एकत्रीकरण झालं तर शरद पवार आणि त्यांच्या पक्षातले नेते हे महायुतीत सामील होतील का? तेव्हा आपलं राजकीय भवितव्य यापुढच्या काळात राहील की नाही अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली तर मात्र दोन्ही राष्ट्रवादीतले आमदार,  नेते थेट भाजपमध्ये सामील होतील अशी शक्यता असल्यानेच  सुनेत्रा पवारांना पुढं केलं गेलंय. पवार घराण्यातल्या साऱ्यांनी अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणुका लढविलेल्या आहेत. जाहीरपणे 'सुनेत्रा ह्या बाहेरच्या आहेत' असं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं होतं त्यामुळं त्यांचा पराभव झाला होता. हे शल्य सुनेत्रा पवारांना सलत असणार. शिवाय पार्थ पवारांच्या उमेदवारीला देखील शरद पवार यांनी विरोध केला होता. त्यामुळं अजित पवार हे जरी एकत्रीकरणाच्या बाजूनं होते तरी देखील त्यांच्यानंतर त्यांचं कुटुंब हे एकत्रीकरणाच्या विरोधात असतील असा होरा पटेल, तटकरे, भुजबळ यांचा असावा असं दिसतं. त्यामुळं त्यांनी ही खेळी घाईघाईनं खेळलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसचा तंबू ज्या अजित पवार नावाच्या मजबूत एकखांबी आधारावर उभा होता, तोच खांब अचानक निखळल्याने या पक्षात मोठी उलथापालथ होणार निश्चित. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातही प्रचंड वेगाने घडामोडी घडताहेत. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही राजकारणातील सारीपाटाच्या खेळाची नव्याने मांडणी करावी लागणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने इतक्या जवळ आल्या होत्या, की शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांच्या घड्याळावरच अनेक ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्या की, काका-पुतण्यांचे हे दोन पक्ष एकत्र येणार असं बोलले जात होते. अर्थात, या एकत्र येण्याबाबत अजित पवार यांच्या पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांचे मतभेद आहेत. तर शरद पवारांच्या पक्षातले नेते एकत्र यायला आतुर आहेत. अजित पवार यांच्यानंतर या प्रक्रियेला खीळ बसते किंवा कसे, याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काय होणार याची चर्चा सुरू झाली होती. ती सध्यातरी थांबलीय. शरद पवारांसोबत फारकत घेतल्यानंतर अजित पवारांनी आपली वेगळी वाटचाल केली होती. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह ही मिळालं. पक्षावर त्यांची एकहाती पकड होती. त्यांच्या ताकदी एवढा एकही नेता सध्या तरी पक्षात नाही. अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा असं साधं सरळ गणित बनलं होतं. सध्याच्या स्थितीत अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सुनेत्रा पवार सांभाळणर आहेत. सुनेत्रा पवार या प्रत्येक गोष्टीत अजित पवारांसोबत राहील्यात. त्यामुळे त्यांना राजकारणाचा आणि तसंच अजित पवारांच्या खास राजकारणाचा अनुभव आहे. शिवाय पवार घराण्यातलीच व्यक्ती असल्याने त्यांच्यामुळे पक्ष एकसंध ठेवण्यास मदत होईल. पक्ष दुसऱ्या कुणाच्या हातात जावू नये याची ही काळजी त्या घेतील. त्यात त्यांना पार्थ आणि जय यांची ही साथ मिळेल. आपल्या दोन मुलांपैकी एकाला पुढे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधला दुरावा गेल्या काही महिन्यापासून कमी झालेला दिसून आला. दोन्ही राष्ट्रवादी एक झाली पाहीजे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र अनेक नेते सध्या 'वेट अँण्ड वॉच'ची भूमिका घेणार असं दिसतंय. अजित पवारांच्या प्रेमापोटी अनेक नेते, आमदार हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत आले होते. पण अजित पवारांच्या अकाली जाण्याने त्यांच्या समोर मोठे प्रश्न निर्माण झालेत. अशावेळी काही नेते हे शरद पवारांच्या सोबत जाण्याची शक्यता आहे. तर काही जण भाजपकडे जातील असं ही बोललं जातंय. काहीना काँग्रेसचा पर्याय खुला आहे. त्यामुळे जसा वेळ पुढे जाईल तसं राष्ट्रवादीचे नेते ही आपला निर्णय काय त्यावर विचार करतील. सध्या सर्वच जण संभ्रमात असल्याची स्थिती आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकांना सुप्रिया सुळेचे नेतृत्व मान्य नाही. त्यामुळे ते परत त्यांच्याकडे जाणार नाहीत. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे असे नेते पक्षाकडे आहेत. पण त्यांचा आवाका तेवढा मोठा नाही. त्यामुळे यांचे नेतृत्व सर्वांनाच मान्य होईल असे नाही. अशा वेळी पक्षात मोठी फूट पडण्याची भीती ही भविष्यत आहे. सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा निवडणुकीस उभ्या राहिल्यापासून त्यांनी पक्षातील अनेक जबाबदाऱ्या घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पक्षातील एका गटात याबाबत नकारात्मक चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून सुनेत्रा यांनी पक्षाच्या कामात अधिकाधिक लक्ष दिले. त्यामुळे सुनेत्रा पवार या अगदीच अनुभवी नाहीत, अशा प्रसंगी कार्यकर्त्यांचा धीर वाढवायचा असल्यास त्यांच्याशिवाय पर्याय नाही, असे पक्षातील अनेक आमदार व बहुतांश कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पुढे कशाप्रकारे जायचे याबाबत दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात उघड बोलले जात होते. शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेतृत्व आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाकडे असले, तरी वयोमानामुळे पक्षाच्या दैनंदिन कामकाजाकडे पूर्वीसारखे लक्ष देणे त्यांनाही शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर, दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणानंतरही त्या एकीकृत पक्षाचे प्रमुख नेते म्हणून अजित पवारच असणार अशीही चर्चा होती. मात्र, अजितदादांच्या अपघाती निधनामुळे ही सगळीच गणिते संपुष्टात आली आहेत.
हरीश केंची
९४२२३१०६०९
चौकट
अजितदादा कधी पूजा-पाठ नाही, कोण्या बाबाच्या चरणी लीन नाहीत. हातात अंगठी नाही, गंडेदोरे नाहीत. अंगारे धुपारे यज्ञ मुहूर्त अमावस्या पौर्णिमा शुभ अशुभ अंधश्रद्धाळू अविचारी दादा नव्हते. काम हाच देव आणि काम करणं हीच पूजा. आज राजकारणात माजलेले स्तोम, दिखाऊ श्रद्धा, घंटा-घोष पाहता, हे जाहीरपणे सांगण्याचं धारिष्ट्य फक्त दादांकडेच होतं. सुनेत्राताई उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार म्हणताच अनेकांच्या कमेंट्स येऊ लागल्या. सुतक तरी संपायला हवे, दहावा तरी व्हायला हवा. यांना सत्ता व पैसा हवा असतो, इ. वास्तविक हे सामान्य माणसांचे किंवा उगीच विरोध करणारांचे मत झालं. खरंतर कोणतीही स्त्री, कितीही वयाची पतीच्या दुःखातून कधीच बाहेर येत नसते, ती फक्त मुलं आणि कुटुंब यासाठी जगत असते. सुनेत्राताई तर एका कामाच्या माणसाच्या, वादळाच्या पत्नी आहेत. काळ थांबत नसतोच.. आणि त्या दुःखातून बाहेर येण्यापेक्षा आपण दहावा, तेरावा यातून बाहेर येऊयात. सुनेत्रा पवार यापुढच्या आयुष्यात योग्यच निर्णय घेतील. आज त्या डोंगराहून मोठ्या दुःखाला सामोरे जात आहेत परंतु त्यांनी शपथ घेणे आणि पक्षाला सावरणे हीच दादांना श्रद्धांजली ठरेल. स्त्रीला सावरणे अवघड असते. तिचे तिलाच ते सावरावे लागते. समाजात स्त्री सन्मान करण्यापेक्षा खच्चीकरण करणारांची संख्या जास्त आहे. 

Thursday, 29 January 2026

महाराष्ट्राचा दादा माणूस...!

"फारसा थेट संबंध आलेला नसतानाही काही व्यक्तींच्या अकाली जाण्याने मनाला चटका लागतो....मन व्यथित होतं... अस्वस्थ होतं ! नकळत डोळ्यात पाणी तरळतं !! दादांचं असं जाणं खरोखरच भावनाविवश करणारं आहे. थेट भूमिका, रोखठोक बोलणं, शिस्तीचा आग्रह, परखड मतं, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता असणारा नेता हरपला हे अतिशय दुःखदायक आहे. खरंतर असे नेते तयार होण्यासाठी खूप काळ जावा लागतो. पण असा तयार झालेला नेता काळाने अशा पद्धतीने न्यायला नको होता......! महाराष्ट्राची 'दादा'गिरी आज हरपलीय...!"
..............................................
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे. मुंबईहून विमानाने उड्डाण केल्यानंतर एक तासाने सकाळी ९ वाजता ही घटना घडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच्या सभांना संबोधित करण्यासाठी अजित पवार बारामतीला जात होते. 
अजित अनंतराव पवार हे महाराष्ट्र राज्यातले एक महत्वाचे राजकारणी होते. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी नगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा इथं त्यांच्या आजोळी झाला. त्यांचं बालपण बारामतीला गेलं. त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण देवळाली, प्रवरा, नगर इथं पूर्ण केलं. ते पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या काटेवाडी या गावाचे होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे होते. अजितदादा पवार हे शरद पवारसाहेब यांचे मोठे बंधू अनंतराव पवार यांचे पुत्र होते. अनंतरावांनी प्रारंभीच्या काळात प्रख्यात चित्रपट निर्माते, व्ही. शांताराम यांच्या मुंबईतल्या राजकमल स्टुडिओसाठी काम केलं होतं. अजितदादा पवार यांचे आजोबा गोविंदराव पवार हे बारामती सहकारी सोसायटीत नोकरी करत होते आणि त्यांच्या आजी शारदाबाई पवार ह्या कौटुंबिक शेतीची देखभाल करत होत्या. त्याचबरोबर त्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याही होत्या. त्यामुळं त्यांच्यावर पुरोगामी विचारांचे संस्कार झालेले होते. अजितदादांचे महाराष्ट्रातले माजी मंत्री पदमसिंह पाटील यांच्या भगिनी सुनेत्रा निंबाळकर पाटील यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना पार्थ आणि जय अशी दोन मुलं आहेत. अजितदादांनी पहिल्यांदा १९८२ साली जेव्हा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवड झाली तेव्हापासून अजितदादांच्या सक्रिय राजकारणाला प्रारंभ झाला. १९९१ मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, तेव्हापासून जिल्ह्याच्या राजकारणात वावरू लागले होते. तब्बल १६ वर्षे ते या पदावर कार्यरत राहिले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामे केली. या काळात ते बारामतीतून लोकसभेचे खासदार म्हणूनही निवडले गेले. पण दिल्लीतलं राजकारण त्यांना भावलं नाही. मग त्यांनी देशाचे संरक्षणमंत्री बनलेले आपले काका शरद पवार यांच्यासाठी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राज्यस्तरावरच राजकारण करायचं असा निर्धार केला आणि राज्य हेच आपलं कार्यक्षेत्र म्हणून निवडलं. सन १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये बारामतीतून विधानसभेचे सदस्य म्हणून सतत निवडून आले. २०१९ आणि २०२४ मध्ये त्यांनी भाजपसह सर्व विरोधी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करून निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख होते. त्यांनी २०१० ते २०१४, २०१९ ते २०२१ आणि २०२२ ते आज असे पाच वेळा  उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहीलंय. अजित पवार हे एका राजकीय प्रतिथयश कुटुंबाचे सदस्य होते. शरद पवार यांच्यासारख्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले होते. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून कॉमर्स पदवी संपादन केली होतेी. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यांनी राज्य सरकारतल्या अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केलेलं आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव होता. पवार त्यांच्याकडं असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांचा प्रशासनावर जबरदस्त पकड होती. राज्यातले वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचं श्रेय त्यांना जातं. पण जलसंपदामंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते. पुढे महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना या आरोपांतून मुक्त केलं. अजित पवार हे त्यांच्याकडं असणारी हुशारी आणि राजकीय कुशाग्र बुद्धीसाठी लोकप्रिय होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सर्वांचा पाठिंबा मिळवून देण्याची त्यांच्याकडं क्षमता होती. वादग्रस्त विधानांमुळं ते नेहमी चर्चेत होते. भ्रष्टाचाराचे आरोप आणि अन्य बेकायदेशीर कामांमध्ये असलेल्या कथित सहभागावरुन त्यांच्यावर टिका होत होती. असं असूनही ते महाराष्ट्राच्या राजकारणातले एक महत्त्वपूर्ण लक्षवेधी नेते होते. राज्यामध्ये त्यांचे खूप समर्थक होते. त्यांच्याकडं एक सक्षम नेतृत्व होते. त्या बळावरच ते मुख्यमंत्री होण्याची क्षमता राखून होते.
लोकशाही आघाडी असो, महाविकास आघाडी असो की महायुती. सरकार मध्ये काम करतांना राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास विचार सर्वप्रथम. जे जमण्यासारखे असेल ते केल्याशिवाय राहणार नाही आणि जे जमणार नसेल तर लोंबकळत ठेवणार नाही, हा दादांच्या कार्यपद्धतीचा खाक्या. गुळगुळीत आणि मुळमुळीत राजकारण दादांना कधी जमलेच नाही. माणुसकी, प्रामाणिकपणा याचे ओतप्रोत दर्शन दादा आपल्या कार्यपद्धती मधून घडवितात. दादांचा करारी बाणा असला तरी मनाच्या एका कोपऱ्यात हळवेपणा सुद्धा निश्चित दिसून येतो. अजितदादा पुण्याचे अनेकवर्षे पालकमंत्री असल्यानं त्यांच्या माझ्या अनेक भेटी पत्रकार परिषदेच्या निमित्तानं झाल्या होत्या पण फारशी जवळीक निर्माण झाली नाही. मात्र प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधन पक्षिकाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं अजित पवारांची भेट झाली तेव्हा त्यांनी माझ्याकडून प्रबोधनकारांसंबधी माहिती जाणून घेतली होती. त्यानंतर प्रबोधनकारांची काही पुस्तकं देखील मागून घेतली. प्रबोधन पक्षिकाच्या शताब्दी समारंभाला ते आवर्जून उपस्थित राहिले. त्यावेळी त्यांच्या स्वभावातला वेगळा गुण लक्षांत आला. त्यांनी माझा त्या समारंभात सत्कारही केला. अजित पवार हे शरद पवार, यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाच्या तालमीत तयार झालेले, त्या विद्यापीठाचे राजकारणी. सत्ता मिळवायची. टिकवायची. त्यासाठी सगळे अपराध मान्य. मात्र, ही सत्ता लोकांसाठी आहे, हे कधी विसरायचं नाही.  संसदीय राजकारणाची शिस्त समजणारे होते. उभा-आडवा महाराष्ट्र त्यांना माहीत होता. प्रशासनातले अधिकारी त्यांना घाबरत, कारण त्यातली ओळ ना ओळ त्यांना ठाऊक असे. अजित पवारांनी कधीही जातीचं, धर्माचं राजकारण केलं नाही. लोकांची कामं करा आणि निवडून या, हा त्यांचा खाक्या होता.  अर्ध्या रात्रीही अजित पवार लोकांसाठी उभे असायचे. ते सतत काम करत असायचे. त्यामुळेच लोकांचे ते प्रचंड लाडके होते. लोकांसोबत दादा मस्त रमत. खुमासदार विनोद करत. त्यांची कामे करत. त्यांना खडसावत. त्यांच्या राजकारणाची एक स्वतंत्र शैली होती. काकांचेच बोट धरून ते राजकारणात आले, पण त्यानंतर त्यांनी अहोरात्र काबाडकष्ट करून, अभ्यास करून, लोकांमध्ये जाऊन, स्वतःचे लोक मिळवून आपली स्वतःची ओळख स्वतःच्या कर्तबगारीने तयार केली. अजित पवारांचा दरारा होता. पण, ती दहशत नव्हती. लोकांनाही त्यांची दादागिरी आवडे. कारण, त्याच्या मुळाशी एक प्रेमळ माणूस होता. त्यांनी कायम त्यांच्या मनाचं ऐकलं. फार व्यूहरचना अथवा असे काही करत न बसता, जे वाटलं ते केलं. कार्यकर्त्यांवर त्यांचा जीव होता. कार्यकर्ते सदैव त्यांच्या सोबत असत. अजित पवार या माणसांच्या जशा मर्यादा त्यांना होत्या. तशा त्या त्यां  राजकारणाला होत्या. तो मातीत उगवलेला, राजकारणाला धर्म मानणारा नेता. जन्मच राजकारणात झाला होता, ते जसे राजकारण करू लागले तेव्हा यशवंतराव, शंकरराव, वसंतदादा, शरद पवारांचा महाराष्ट्र होता. अजित पवार वयाची साठी उलटत असताना मात्र त्या राजकारणाचा आकार उकार पार बदलून गेलाय. त्याच्याशी जुळवून घेण्याची कसरत ते करत राहिले. मिश्किलपणा, हजरजबाबीपणा, स्वतःवरही विनोद करण्याची प्रवृत्ती कायम लक्षात राहील. ते उगाच किरकिर करत बसणारे नेते नव्हते. त्यांच्यात एक उमदेपणा होता. काम होत असेल तर कितीही अडचणी आल्या तरी करायचंच आणि होण्याजोगं नसेल तर तसं स्पष्ट सांगायचं हा त्यांचा खाक्या. माणसं दुखावली जातील याची त्यांनी कधी फिकीर केली नाही. फार विचार करून बोलण्याची सवय नसल्याने अनेकदा ते अडचणीतही आले. चुकलं तर दिलगिरी व्यक्त करायची, प्रायचित्त घ्यायची त्यांची तयारी असायची. हे त्यांचं वेगळेपण होतं. परिस्थिती जी आहे ती समजून आणि ती स्वीकारून पुढे जाणारे नेते होते ते. प्रशासनाच्या झारीतल्या शुक्राचार्याच्या वृत्तीवर मात करून अधिकाऱ्यांकडून कामे करून घेण्याची धमक त्यांच्यात होती. महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्रीयन माणसाची नाडी माहित असलेल्या अजिदादाच जाणं निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणाचं नुकसान करणारं आहे. अजितदादांना भावपूर्ण आदरांजली


Wednesday, 21 January 2026

शतप्रतिशतच्या दिशेने ...!

"महापालिका निवडणूक निकालांनी महाराष्ट्रातली सारी राजकीय समीकरणे बदलली जातील अशी चिन्हे आहेत. शतप्रतिशतच्या दिशेने भाजपची वाटचाल सुरु झालीय. भाजपनं महाराष्ट्रातले लोकनेते शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांचे पक्ष, जनाधार खिळखिळा करून टाकलाय. नगरपालिका, नगरपरिषदा अन् आता महापालिका हाती आल्यात. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका होताहेत त्यानंतर भाजप आपला स्वबळाचा नारा अधिक टोकदार करील. पक्षाचे सर्वेसर्वा अमित शहा यांनी निर्धार केल्याप्रमाणे सत्तेसाठी घेतलेल्या कुबड्या फेकून देईल. सत्तासाथीदार अजित पवार, एकनाथ शिंदे यांना भाजप दूर करील. शक्तिशाली, बलाढ्य भाजपच्या विरोधात ठामपणे उभे ठाकलेले काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि इतरांना एकत्र यावंच लागेल. भाजपच्या अतिरेकी धार्मिक कट्टरतेनं एमआयएम पक्ष सरसावलाय. सोलापूर आणि इतर ठिकाणीही तो विरोधीपक्षाची भूमिका पार पाडू शकतोय!"
--------------------------------------------------
*आ*काशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् | 
सर्व देव नमस्कार: केशवं प्रति गच्छति ||
ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते, त्याचप्रमाणे सर्व देवांना अर्पण केलेले नमस्कार हे श्रीकृष्ण चरणी पोहोचतात. तद्वतच कुणालाही दिलेली मतं ही भाजपला जाऊन मिळतात असं दिसतं. कारण विरोधक म्हणून निवडणूक लढवलेले नेते सत्तेच्या वळचणीला कधी जाऊन बसतात ते त्यांच्या मतदारांनाच काय त्यांनाही समजत नाही. महापालिका निवडणुकांचे लागलेले निकाल साऱ्यांनाच अचंबित करणारे आहेत. जसे विधानसभा निवडणुकीच्यावेळी म्हटलं गेलं होतं 'अनाकलनीय' अगदी तसंच वाटतंय. वृत्तपत्रात येणारी वाचकांची पत्रे, सोशल मीडियावर व्यक्त होणारे पोस्ट, युट्यूबर्स, ब्लॉगर्स यांचीे व्यक्त होणारी मतं पाहता भाजपला या निवडणुका जड जातील असं म्हटलं जात होतं, पण प्रत्यक्षात वेगळंच घडलंय. 'पाच वर्षं आपण साप दिसला की, तो काठीने ठेचून काढतो, पण नागपंचमी आली की, त्याची पूजा करतो...!' अगदी तसंच राजसत्तेच्या विरोधात वेगवेगळ्या व्यासपीठावरून व्यक्त होणारी मंडळी निवडणुका येताच राजसत्तेला शरण जातात अन् त्यांनाच ते मतं देतात. वर्षभर राजसत्तावर टीकेची झोड उठवणारे, महागाई- पाणी - गटार- रस्ते- आरोग्य- शिक्षण यांबाबत तक्रार करणारे मतदार निवडणुकीच्यावेळी सत्ताशरणागत झालेले दिसतात. महापालिका निवडणुकांत कोणता पक्ष कोणाबरोबर लढतोय अन् कोण कोणाविरुद्ध याचा पायपोसच उरलेला नव्हता, फोडाफोडीचं राजकारण एवढं पुढं गेलेलं. पक्षनिष्ठा, भूमिका, डावे-उजवे सारं काही धुळीला मिळालेलं. याचं मूळ मागच्या पाच वर्षांत भाजपने राज्यात केलेल्या राजकारणात दडलेलंय. आधी भाजपने शिवसेना फोडून शिंदेंना आपल्या गळाला लावलं नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार यांना आपल्या मांडीला मांडी लावून बसवलं त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, निवडणुकीत कार्यकर्त्यांनी तोच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून अधिकच खालची पातळी गाठलीय. फक्त निवडणुका जिंकण्यासाठीचं राजकारण सुरू होतं. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच्या निकालानंतर सत्तेसाठी याच्या पुढची पायरी गाठली जाऊ शकते. गळ्यात गळा घालून उभे राहणारे गळा कसा कापायचा, किती कापायचा, कुणाचा, कधी कापायचा याची खलबतं सुरू होतील. सत्तेसाठी घेतलेल्या कुबड्या फेकून देतील. गरज संपल्याने सत्तासाथीदार असलेले अजितदादा, एकनाथभाई यांना देवाभाऊ दूर करतील. 
लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने हवालदिल झालेले भाजपनेते लगेचच सावरले. त्यांनी मग आक्रमक व्यूहरचना केली. सारी आयुधं परजली त्यातून विधानसभा जिंकली. त्यानंतर रखडलेल्या नगरपालिका जिंकल्या अन् आता महापालिकाही सहजगत्या खिशात टाकल्या. इजा... बीजा... अन् तिजा...! प्रधानमंत्री मोदी यांनी ज्याप्रकारे केंद्रातला कारभार चालवलाय अगदी तसाच कारभार फडणवीस यांनी आरंभलाय. साम, दाम, दंड, भेद या चाणक्यनीतीने गतकाळातल्या दिग्गजांचा, वर्तमानातल्या धुरंधरांचा, भविष्यातल्या उत्साही अन् उथळ प्रतिस्पर्धकांचा सफाया चालवलाय. इथं प्रबळ विरोधक समजले जाणारे शरद पवार, उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू, विरोधक असल्याचा आव आणत सत्तेच्या आश्रयाला असलेले अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुकीत उभा केलेला आव्हानाचा बागुलबुवा किती फुसका ठरलाय हे पाहून त्यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न आज निर्माण झालाय. भाजपच्या 'काँग्रेसमुक्त भारत' सारखं 'काँग्रेसमुक्त महाराष्ट्र' करण्याच्या निर्धारातून 'विपक्षमुक्त महाराष्ट्र' होईल का काय याची भीती वाटतेय. असं झालं तर 'लोकशाही'त 'एकाधिकारयुगा'चा आरंभ होईल. संघानं पाहिलेलं 'एकचालकानुवर्तीत साम्राज्या'चं स्वप्न साकार होईल! भाजपने आपणही अन्य कुठल्याही पक्षापेक्षा भीषण असू शकतो; असं सिद्ध करण्याची भूमिका घेतलेली दिसते. मात्र आपल्या या भीषण असण्याला त्यांनी 'बिभीषण' असं सोज्वळ पौराणिक संबोधन घेतलंय अन् वाटचाल आरंभलीय...! सारे विधिनिषेध गुंडाळून कसलीही पर्वा न करता सत्तेसाठी ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांनाच मांडीवर घेऊन सत्ता हस्तगत केली गेली. अशा नतद्रष्टाना मानमरातब दिल्यानं लोक मात्र हताश झालेत. निष्ठावान, मूल्याधिष्ठित राजकारण करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना दूर लोटलं जातंय. गुंड प्रवृत्तीच्या दंगेखोर कार्यकर्त्यांची रेलचेल सुरूय. सोज्वळ, सात्विक महाराष्ट्र काळ्याकुट्ट अंधारात चाचपडतोय. पूर्वी राजकारणात कटुता नव्हती. वाद होते, संघर्ष होते. पण द्वेष नव्हता. तो गेल्या दहा बारा वर्षांत खूप वाढलाय. आज जशी शहरं सुजलीत तशी राजकीय पक्ष सुजलेत. निष्ठेवर विष्ठा ठेवणाऱ्यांना मानाचं पान दिलं जातंय. 
मुंबई आणि राज्य स्वबळासाठीचे प्रयत्न भाजपने सात वर्षापूर्वीच सुरू केले होते. जेव्हा त्यांनी शिवसेना फोडली. एकनाथ शिंदे यांना कधीही दूर करता येऊ शकेल, असा त्यांचा होरा होता. आता तशी परिस्थिती निर्माण झालीय. भाजपला अजित पवार यांची गरज कोणत्याच प्रकारे उरलेली नाही. भाजप नेते, कट्टर कार्यकर्ते, संघाचे स्वयंसेवक यांचा अजित पवारांना कायमच तीव्र विरोध राहिलेलाय. त्यांच्यात आणि भाजपच्या मतदारांमध्ये प्रचंड राग आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणूकीत भाजपला अजित पवारांनी मोठं आव्हान उभं केलं होतं. कधी नव्हे ते भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्यांनी एक जुनं प्रकरणही उकरुन काढलं होतं. त्यामुळं असं वातावरण निर्माण झालं होतं की, निकालात तोडीसतोड असं चित्र राहील. प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही. सत्तेसाठी भाजपला त्यांची कुठेच गरज उरलेली नाही. ते विरोधीपक्ष म्हणूनच  तिथं राहतील. एकाअर्थाने अजितदादांची ताकद खूप खच्ची झालेलीय. त्यांचा प्रभाव जिथं आहे असं वाटतं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी आणि अगदी सोलापुरातही त्यांना फटका बसलेलाय. कुठेच त्यांची ताकद दिसत नाही. त्यामुळं या निवडणुकीतून अजितदादांचा आपल्या प्रभाव क्षेत्रातच अपयश येणं हे सत्तेतून दूर करण्यासाठी कारणीभूत ठरणारं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, लातूर आणि चंद्रपूर इथं काँग्रेसनं खूप मोठं यश मिळवलंय. काँग्रेसची राज्यात एकूण जी दुर्बळ अशी अस्वस्था आहे, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मिळालेलं यश हे लक्षणीय ठरतेय. इथं त्यांना स्थानिक गोष्टींचा फायदा झालाय. लातूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याबाबत जे उद्गार काढले त्याच्यामुळे काँग्रेसला फायदा झालाय. चंद्रपुरात मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात जे वाद होते त्याच्यामुळं तिथं फायदा झाला. असं असलं तरी तिथं विदर्भात काँग्रेसचं नेटवर्क आहे. कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. मतदारही आहेत. हे सारं एकत्र येणं महत्वाचं होतं आणि ते तसं घडलं. यातून काँग्रेसच्या नेत्यांनी धडा घ्यायला हवा. आणखी महत्वाचं हे की, एमआयएमला सोलापूर सह मुंबई, भिवंडी, मालेगाव, संभाजीनगर आणि इतर ठिकाणी जे यश मिळालंय तीही लक्षणीय बाब आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय.
मुंबईतलं भाजपला मिळालेल्या यशाचं विश्लेषण हे तात्कालिक किंवा कालपरवा घडलेल्या घडामोडीकडे पाहून त्यावर बोलता येणार नाही. मुंबईच्या या अपेक्षित निकालाची सुरुवात भाजपने पाचवर्षापूर्वी केली होती. जेव्हा त्यांनी शिवसेना फोडली. भाजपला मुंबई काही करून जिंकायचीच होती. ते त्यांच्यासाठी आवश्यकही होतं त्यासाठी त्यांनी शिवसेना फोडली नसती आणि आज जर ती शिवसेना एकसंघ असती तर आज जे मुंबई महापालिकेचे निकाल आले आहेत ते पाहिलं तर सारं काही लक्षांत येईल. नक्कीच शिवसेनेनं मुंबई जिंकली असती. मुंबईच नाही तर ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि संभाजीनगर इथं यश मिळवता आलं असतं. यात नेमकं घडलं काय तर मुंबईतला आपला प्रतिस्पर्धी शिवसेना आहे आणि त्याला कमकुवत केलं पाहिजे. हिंदुत्वाच्या एका म्यानात दोन तलवारी असू शकत नाहीत. यासाठी मग ठरवून त्यांनी ती खेळी केली. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाला एक्का एकनाथ शिंदे आणि शिंदेसेनेला सोबत घेतलं, त्यांना ताकद दिली, सत्ताही दिली. परंतु त्याचबरोबर आज मुंबई महापालिकेच्या निकालाचे तुम्ही जे आकडे बघताहात यात भाजपने हेही निश्चित केलंय की, शिंदेसेना फार कशी वाढणार नाही. त्यांची निवडून आलेल्यांची संख्या पाहिली तर ती उद्धव सेनेच्या खूप कमी आहे. त्यामुळं मुंबईत भविष्यात आपल्याला गरज आहे म्हणून एकनाथ शिंदे यांना बरोबर घेतलं, पण फार वाढू दिलं नाही. जेव्हा गरज नसेल तेव्हा त्यांना दूर करणं शक्य होईल अशी ती त्यांची तजवीज, योजना केलेली होती. मुंबईत भाजपच्या विरोधात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले. ते एकत्र आल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या की, आता काहीतरी बदल होईल. प्रसिद्धीमाध्यमांनी हे खूप उचलून धरलं, पण एका रात्रीत हे घडून येऊ शकत नाही. याची जाणीव दोघांनाही होती. दुसरं असं की, भाजपने गेल्या काही काळात उद्धव ठाकरेंची सेना दुर्बळ करून ठेवलीय. त्यांचे खासदार, आमदार, नगरसेवक, शाखाप्रमुख अशी मोठी तगडी फौज फोडून टाकल्याने खालची सारी यंत्रणा खिळखिळी झालेली आहे. पक्ष चालविणारे आर्थिकदृष्ट्या सक्षम नेते बाहेर गेल्यानं उद्धव सेनेची आर्थिक कोंडी झाली. त्यामुळं उद्धव सेनेला भावनेच्याच जोरावर निवडणुका लढवणं आवश्यक बनलं होतं. ते त्यांनी तसंच केलं. म्हणूनच त्यांनी फारशा सभा घेतल्या नाहीत. एकच सभा घेतली आणि शाखा शाखांना भेटी दिल्या. त्यानं वातावरण फिरल्यासारखं वाटलं. तीच मराठी अस्मितेची भावना त्यांच्या कामी आलेली आहे. त्याचा त्यांनी योग्य वापर केला. असं म्हणता येईल. आज उद्धव सेनेचे अनेक दोष सांगता येतील. ते मुंबई बाहेर का पडले नाहीत, बाहेर प्रचार का केला नाही. आधीपासून एकत्र का आले नाहीत, पण त्यांना जेवढं शक्य होतं त्यांनी ते केलं. मुंबई , ठाणे नाशिक इथं सभा घेतल्या. वातावरण निर्मिती केली. इथं एक लक्षांत घेतलं पाहिजे की, मराठी अस्मितेची भावना हीच त्यांच्या यशाच्या उपयोगाची होती. याचा त्यांनी मुंबईत पुरेपूर वापर केला आणि त्यांना आज जे काही यश मिळालंय ते पाहता त्याकडं दुर्लक्ष करता येणार नाही. भावनांचा वापर केला नसता तर त्यांना खूप कमी यश मिळालं असतं. पण 'मराठी माणसांवर अन्याय होतोय, भाजप त्याला चेपतोय!' अशी भावना तयार झाल्यानं मराठी माणूस आपल्या अस्मितेसाठी पुन्हा एकदा पेटून उठला. आणि आज जे यश दिसतं हे त्याचं फळ आहे. राजकीय विश्लेषकांनी ठाकरे बंधूंवर जी टीका केलीय ती रास्तच होती, पण ठाकरे बंधूंना आपल्या मर्यादा ठाऊक होत्या म्हणूनच त्यांनी तशी रणनीती आखली होती.
विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपला ही कळून चुकलं होतं की, पुढच्या काळात आपण एकहाती सत्ता आणू शकतो. आताच्या नगरपालिका, महापालिका निवडणुकीत मिळालेल्या यातून त्यांचा तो एकहाती सत्तेचा विश्वास अधिक दृढ झाला. २९ पैकी २५ महापालिकेत ते एकहाती सत्ता घेण्याच्या स्थितीत आलेत. एखाद दुसऱ्या ठिकाणी शिंदेसेनेची थोडीफार मदत लागू शकते. त्यामुळं यापुढच्या काळात भाजप अधिकाधिक स्वबळाकडे वाटचाल करताना दिसेल आणि आपल्या मित्रपक्षांना दूर करण्याचा प्रयत्न करील. त्यामुळं या पुढच्या काळातलं राजकारण हे भाजप विरुद्ध इतर सारे पक्ष असं होईल. जसं पूर्वी काँग्रेसविरुद्ध सारे पक्ष असायचं अगदी तसंच राहील. या नव्या राजकीय समीकरणात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची अवस्था खूप कठीण होऊन बसेल. सत्तेतही नाही अन् विरोधातही नाही अशी सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही अशी होईल. काँग्रेस, शिवसेना, समाजवादी, डावे हे आधीपासून भाजप विरोधात आहेत. पण अजितदादा, शिंदेसेना काय करतील हे महत्वाचं आहे. केंद्रात ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी आहेत त्याप्रमाणे राज्यात देवेंद्र फडणवीस कार्यरत आहेत. ते अत्यंत धूर्त, मुत्सद्दी, धुरंदर, चाणाक्ष, हुशार अशा सगळ्याप्रकारचे राजकारणी आहेत हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलंय. भाजपचे नेते कार्यकर्ते हे ३६५ दिवस आणि २४ तास राजकारण करत असतात. त्याप्रकारे फडणवीसही करत असतात. त्यांची कारभारावर पकड आहे. ते योग्य त्या गोष्टींचा, साधन सुविधांचा वापर करून घेऊ शकतात. विरोधकांमध्ये फूट पाडू शकतात. असं म्हटलं जातं की, तेच विरोधीपक्ष चालवतात. ते अनेकदा आपल्याला दिसलेलंय. ते भाजपचे उगवते तारे आहेत. त्यांच्याकडे प्रधानमंत्रिपदाचे दावेदार म्हणूनही पाहिलं जातं. पण भाजपच्या, फडणवीसांच्या रणनीतीचा, घेत असलेल्या कष्टांची, त्यांची विचारसरणी, कार्यक्रम पोहोचवण्याची त्यांची जी धडपड आहे त्याची आपण तारीफ करू पण त्यासाठी ते जे मार्ग अवलंबतात, वापरतात, गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात त्यांनी वापरल्या आहेत, ते अगदी धडधडीत डोळ्यासमोर अत्यंत वाईट अशा पद्धतीचे आहेत. अगदी वेगवेगळ्या शब्दात वाईट म्हणता येईल असे आहेत. पक्ष फोडणे असेल, निवडणूक आयोगाचा वापर करणं असेल, पैशांचा वापर असेल, गुंडांना पक्षांत घेणं असेल त्यांना पदं उमेदवारी देणं असेल किंवा समोरचा विरोधकांचा उमेदवार ज्यानं अर्ज दाखल केलाय अशांना फोडणे असेल असे अनेक प्रकार त्यांनी केलेत, हे जे त्यांनी मार्ग वापरलेत, त्यांची रणनीती वगैरे सारं ठीक आहे पण हे जे मार्ग वापरलेत लोकशाहीला घातक अशाप्रकारचे आहेत. खरं पाहिलं तर एवढा मोठा जनाधार असताना फडणवीसांना, त्यांच्या पक्षाला याची गरजच नाही. असे मार्ग त्यांना का वापरावे लागतात? आणि का ते पुन्हा पुन्हा वापरतात. हे समजत नाही. भाजपकडे मोदींसारखा प्रचंड अशा लोकप्रिय ब्रँड आहे, हिंदुत्वाची धगधगती विचारधारा आहे असं असताना पक्षाला यश मिळणं शक्य नाही का याचा विचार कधी होणार आहे की नाही? 
असं म्हटलं जातं की  मुंबईचा निकाल हा ठाकरेबंधूंचा जसा मानला पाहिजे तसाच तो इथल्या मराठी माणसाची नैतिक भूमिका घेण्याची जी शक्ती उफाळून आली आहे त्याची देखील आहे. नाहीतर भाजपच्या विरोधात जाण्याची त्यांना गरजच काय? ही जी उभी ठाकलेली मराठी जनता आहे, जिने ७०- ७२ जागा ठाकरेंना निवडून दिल्यात ती भाजपच्या आणि महायुतीच्या अनैतिक राजकारणाच्या विरोधात उभी राहू पाहणारी जनता आहे. जर अशाच पद्धतीने भाजपने राजकारण सुरू ठेवलं तर त्यांना राज्यभर अशा पद्धतीचा विरोध पहायला मिळेल तो विरोध कोण कधी संघटित करू शकेल हे काळ ठरवील आगामी काळात हे अधिक वाढेल असं वातावरण आहे. फोडाफोडी, आयाराम गयाराम, अशा अनैतिक राजकारणाला लोक आता कंटाळलेत. याचा कधीही उद्रेक होऊ शकतो. राजकीय कालचक्र अटळ असतं याची जाणीव साध्य होत नाही! त्यानं खचून जाण्याचं कारण नाही. केव्हा तरी उत्कलन बिंदू गाठला जातोच! 'त्यांच्या'कडून शिकण्यासारखं इतकंच असतं श्रद्धा आणि सबुरी...! स्वातंत्र्य पुर्व काळातले जसे संस्थानिक इंग्रजांपुढं हतबल होते, तेव्हा सामान्य माणसांनी हा लढा आपल्या हातात घेतला होता, आता मात्र विरोधी पक्षनेतेच 'विकासासाठी' सत्तेत सहभागी होतात तेव्हा सामान्य माणसासाठी ही परिवर्तनाची पुढाकाराची संधी असू शकते. सत्ता एवढाच ध्यास असेल तर इतकं खालच्या पातळीचं राजकारण करून सत्याला झाकून, भ्रष्ट नेते, भ्रष्टाचारी चाल, चलन आणि चरित्र असलेले पक्ष, हाताशी धरून धर्माचा, रामाचा वापर करून जनतेला मूर्ख बनवून, त्यांना मताच्या मोबदल्यात पैशाचं आमिष दाखवून, सरकारी पैशाने फुकट सवलती, पैसे वाटप करून त्यांनाही भ्रष्ट करून तत्कालीन समाधान मिळवू शकता. पण पुढच्या परिणामाची जबाबदारी कोण घेणार? सगळे सत्तेचे लाचार. पण आशा आहे सत्तेसाठी नव्हे तर तत्वासाठी निवडणूक हरली तरी ती स्वीकारण्याचे धारिष्ठ दाखवणाऱ्या पक्षाला सलाम करावा वाटतो. स्वच्छ चरित्र, संस्कृतीरक्षक, धर्मरक्षक असे अनेक बिरुदे लावून तुम्ही हीन पातळीचे राजकारण करणार असाल तर देशाचा वैचारिक धुरळा झालाच आहे. पण जनतेला रसातळाला नेण्याचे पाप तुम्हाला कधी ना कधी कुठल्यातरी शिक्षेने भोगावे लागेल. नियती वेळ घेते. नीतिमत्ता संयम राखते, असत्य नष्ट होते हा जगाचा इतिहास आहे. आज विरोधी पक्षांचा व्होट बेस आणि कॉन्फिडन्स हललाय...!
हरीश केंची,
९४२२३१०६०९.

Sunday, 11 January 2026

मोरूचा बाप मोरूला म्हणाला.....!

सकाळ झाली, दिवस उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘‘मोऱ्या, लेका, घोरत काय पडलाहेस? आज मतदानाचा दिवस म्हणजे जणु दसराच. अर्थात शिलंगणाचा दिवस. ऊठ, तोंड विसळ. स्नान कर आणि बाहेर चालता हो कसा.....!" त्यावर मोऱ्याने पांघरूणात आणखीनच खोल तोंड खुपसले आणि तो निऱ्हानाम घोरू लागला. ते पाहून पित्त खवळलेल्या मोऱ्याच्या बापाने दातओठ खात त्याचे पांघरूण खस्सदिशी ओढले व तो ओरडला, ‘‘मोऱ्या, निवडणुकीचे रणांगण येऊन ठेपलंय,  वीस दिवसांनंतर आलंय. खंडेनवमीप्रमाणे शस्त्रपूजन करोन जनलोक शिलंगणाला बाहेर पडलीसुद्धा. त्वां इथं निव्वळ घोरत पडलाहेस, अशाने कसे भले होणार लोकशाहीचे....?" त्यावर एक गडगडाटी सुस्कारा टाकत मोऱ्याने हातपाय ताणून आळस दिला आणि चिंतनयुक्‍त आवाजात तो म्हणाला, ‘‘बाप हो! राग आवरावा. कां की, लोकशाहीला काहीएक झालेलं नाही, ती अत्यंत सशक्‍त आणि सुशेगाद अवस्थेत आहे. किंबहुना, लोकशाहीची इतकी भली अवस्था गेली सत्तर वर्षे कधीही नव्हती.....!’’ मोरूचे विचारसौंदर्य पाहून हतबुद्ध झालेल्या मोरूपित्याच्या मुखातून शब्द काही फुटेना. जन्मदात्याची तुर्यावस्था पांघरूणाच्या आत अंतर्ज्ञानाने ओळखून मोरू पुढे म्हणाला, ‘‘औंदाच्या निवडणुकीत कोण कोणातर्फे कोठे उभे राहिलेत, हे सांगणे अंमळ कठीण झालंय. प्रश्‍न जनतेच्या प्रतिनिधित्वाचा आहे. कुण्या पक्षाचा नव्हे! इतकी राजकारणविरहित निवडणूक तुमच्या पाहण्यात आहे का? हे सशक्‍त लोकशाहीचे लक्षण नव्हे काय? लोकांनी लोकांसाठी चालविलेलं लोकांचं राज्य म्हणजेच लोकशाही ना....?’’ मोऱ्याच्या जन्मदात्याने आवंढा गिळला. तो गिळून तो खोल आवाजात म्हणाला, "यालाच लोकशाही म्हणायचे, तर आयाराम-गयारामांच्या संधिसाधू राजकारणाला नैतिक अधिष्ठान असल्याचंच मानावं लागेल. निवडणुकांना काही अर्थच उरणार नाही...!’’
‘‘निवडणुकांना तसाही फारसा अर्थ नाही. कारण, त्यातील चार्म आता निघून गेला आहे. एका हाटेलात इडली खाऊन दुज्या हाटेलीतील भजी खाण्यासाठी ज्याप्रमाणे कोणीही जाऊ शकते, त्याचप्रमाणे हल्ली कोणीही कुठल्याही पक्षात जाऊ अथवा येऊ शकते. विचारधारांची लढाई आता लुप्त होत जाणार. येथून पुढे सारेच सत्ताधारी पक्षात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सामील होणार. विरोध, विरोधक औषधालादेखील सापडणार नाहीत, हे आपण लिहोन ठेवावे...!’’ ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे सर्व जल अखेर समुद्रार्पण होते, तस्मात सारी मते कोणालाही दिली, तरी ती दिल्लीस्थित एकाच तारणहाराच्या चरणकमळी रुजू होतात, हे नव्या भारताचे सत्य आहे. तेव्हा निवडणुकीला युद्ध, रणांगण, लढाई असे काही म्हणो नये, बाप हो...!,’’ डोईवरील पांघरूण न काढताच मोरेश्‍वराने केलेला युक्‍तिवाद ऐकून मोरूपित्याला भरून आलं. तरीही, तो मोरूचाच पिता असल्याने त्यानेही विक्रमादित्यासारखा हट्ट सोडला नाही. तो पुढे म्हणाला, ‘‘काय बडबडतो आहेस? विरोधक नसतील तर लोकशाही कशी असेल? हा बुद्धिभेद तुझ्यापास ठेव, मोऱ्या...!’’ शांतता यत्किंचितही ढळू न देता मोरू म्हणाला, ‘‘विरोधक हवेत कोणाला? खुद्द विरोधकांनाच विरोधाचा कंटाळा आला असून, कधी एकदा सत्तेत समाविष्ट होतो, असं त्यांना झालंय. कारण, त्यांच्यावर वशीकरणाच्या प्रयोगाखातर ईडीलिंबू घुमवलं गेलंय. सत्तेत राहून विरोधकांप्रमाणे वागणारे मित्र इथं आहेत आणि गमतीखातर थोडका विरोध करून वेळवखत पाहून खुर्ची बळकावणारे विरोधीजनदेखील आहेत. मुदलात जनतेलाही विरोधक कुठं हवेत? तेव्हा निवडणुकीचे कालबाह्य कारण देऊन मज गरीब तरुणाची झोपमोड करो नये, ही प्रार्थना...!’’ मोरूचा बाप विचारात पडला.
बराच वेळ दाढी खाजविल्यावर तो त्याने पुशिले,
‘‘म्हणजे निवडणुकीला काहीच अर्थ राहिला नाही, असे तुझे म्हणणे आहे काय...?’’ 
‘‘निवडणूक हा एक लोकशाहीचा उत्सव आहे. उत्सव म्हणजेच इव्हेंट. इव्हेंट म्हटले की, रंगारंग कार्यक्रमांची बौछार आलीच, पाठोपाठ मनोरंजन आलं. अवघा देश ज्या रंगात सचैल न्हातो असं या देशात दोनच तर रंग आहेत, एक निवडणूक आणि दुसरा क्रिकेट! बाकी सारे बेरंग आहे बापहो...!’’ मोऱ्याच्या आवाजाला सॉक्रेटिसाच्या चिंतनशीलतेची बैठक होती. "मोऱ्या, मग इलेक्‍शन आलं की आम्ही पामर मतदारांनी कासं वागावं, तेही सांगून टाक...!’’ मोरूपिता म्हणाला. 
‘‘राजकारणाचा पोत बदलतोय. राजकारण्यांचाही रागरंग बदलतोय. तेव्हा मतदारानेही स्वतःला बदलणे भाग आहे. अखेर जगात बदल हीच एक गोष्ट सातत्यपूर्ण, शाश्‍वत आहे. तेव्हा आपल्या गल्लीतील प्रतिनिधीने काश्‍मीरप्रश्‍नी काही मुद्दा मांडला असता त्याला प्रतिवाद करून गल्लीतील नालेसफाईचा मुद्दा उकरणे काही योग्य होणार नाही. हल्ली कोठलीही निवडणूक ही राष्ट्रीय मुद्द्यांवरच लढली जाते, हे लक्षात ठेवावे. एवंच केल्यास अच्छे दिनांच्या आगमनाला अपशकून होणार नाही...!" मोऱ्या मोऱ्या, बालिष्टर का नाही रे झालास? हा सुप्रसिद्ध आणि तितकाच इमोशनल सवाल करण्याची उबळ मोरूपित्याने दाबली आणि मोरूने केलेल्या ‘वैचारिक सीमोल्लंघना’चा नेमका अर्थ काय, या विचारात ते गढून गेले. आता हा अर्थ तुम्ही, आम्ही सर्वांनीच समजावून घ्यायला हवा...!" मोरूचं राजकीय तत्वज्ञान आणि सद्यस्थितीतलं समज पाहून मोरूचा बाप विचारात पडला. तसा मोरू पुढे म्हणाला, 
"चिमण्या परत फिरल्या, पाखरांचं काय? राजकारणात गेल्या दहा, बारा वर्षांपासून जे वरिष्ठ स्तरावरचे डावपेच आणि शह काटशहचे सत्ता प्रेरित राजकारण सुरू झालं, त्यात चिमण्यांचं भलं झालं, परंतु पाखरं मात्र जायबंदी झालीत. काही पिंजऱ्यात सापडली तर काही वाट पाहून थकून जागेवर शांत झालीत....!"
ठाकरे बंधूंचं मनोमिलन अन् काका पुतणे यांचा झालेला तह महाराष्ट्रानं पाहिला, देशभरातल्या मिडियानं पाहिलं, एखाद्या उत्तम पटकथा असलेल्या राजामौलीसारख्या कल्पक दिग्दर्शकाच्या सिनेमातला क्लायमॅक्स सीनसारखा झालेला तो सोहळा, त्यात सुप्रिया मावशीचं ग्रँड हस्तांतरण आणि अनेक वर्ष ताटातूट झालेल्या भावना आणि भाचे मंडळी यांना जवळ आणणं, हा क्षण त्या सोहळ्यातील परमोच्च बिंदू होता...!"
मोरूपिता म्हणाला, "म्हणजे तूला काय म्हणायचंय.? तुझे म्हणणे आहे काय...?" "आता महाराष्ट्र काका पुतण्याला एकत्र पाहण्यासाठी आसुसलाय. त्यात सुप्रियाताईची भूमिका महत्वाची असेल. हे भावनात्मक क्षण राजकारणातल्या असह्य अशा काटेरी क्षणावर फुंकर घालतात...!" मोरू पुढे म्हणाला,  ओके... इट्स फाईन..... इकडं दादू आणि राजा यांचं मनोमिलन अन् त्यांच्या गाठीभेटी, एकत्रित, स्वतंत्र मुलाखती सुरू आहेत. त्या दोघात आजवर संजय एकटाच खिंड लढवत होता. पण या दोघा बंधुराजांना एकत्र आणण्याची संधी साधणारा महेश इथं जोडला गेलाय...!" मोरूपिता वस्तुस्थिती सांगत म्हणाला. त्यावर मोरू म्हणाला, "मोठ्या नेत्यांचं सगळं ओके झालंय, पण गाव पातळीवरचे कार्यकर्ते जे नेते आणि विविध ठिकाणी जाऊन पदाधिकारी बनू पहात आहेत, त्यांचं काय? आणखी वाट पाहणं किंवा बंडखोरी करणं...राजकारण हा चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवसांचा खेळ आहे. यात टॉस जिंकून भागत नाही किंवा सगळं अनुकूल असूनही भागत नाही, या राज्यातल्या निवडणुकांचं राजकारण कधी भावनिक, तर कधी जात, धर्म, पंथ आणि दामाजीपंत यावर चालतं.. त्यात काडीमात्र बदल नाही...!"
मोरूचा बाप सांगू लागला. "पण हजारो ग्रामीण, शहरी, निमशहरी कार्यकर्ते गणेशोत्सवातली जबाबदारी घेत हळूहळू राजकारणात येतात, पूर्वीच्या काळापासून सुरू झालेली उमेदवारी, पाच वर्षे खिशातले पैसे टाकून पूर्ण होते, पुढं मात्र योग्य संधी मिळाली नाही आणि राजकारण, त्यातली उपभोग्य पदं मिळाली नाहीत तर ते कर्जबाजारी होऊन जातात, हे वास्तव आहे. जितके पक्ष जास्त, निवडणूक रिंगणात उमेदवार जास्त तितका खर्च जास्त, या समीकरणात आणखी भर पडणार ती नव्याने लाटेवर स्वार होऊ पाहणाऱ्या ताकदवर, पैसे बाळगून असलेल्या नवनेत्यांची! तिसऱ्या पिढीतल्या फौजेची....!"
मोरू सांगू लागला.
"तेही खरंय...सतरंज्या उचलणारे, स्टेजची काळजी घेणारे आणि सर्व सूत्रं सांभाळणारे दुर्लक्षित राहतात, होतात किंवा केले जातात, हे देखील वास्तव आहे. पाखरांचं विश्व कायमच हिंदोळणारं असतं, त्यांची किंमत होत नसते, त्यांना जपावं लागतं, कॉर्पोरेट स्वरूप धारण केलेल्या राजकारणात सगळं वाहून जातं, भावना आणि निष्ठा या लग्न समारंभ झाल्यानंतर बाजूला ठेवलेल्या मोठ्या ड्रममधल्या प्लेट सारख्या... पाखरं कायमच असुरक्षित असतात, ती कुठंही असोत त्यांना आकाश खायला उठतं तर जमीन काटेरी भासते...!"
"म्हणजे हे चित्र पाहून सत्ताधाऱ्यांची आजची अवस्था म्हणजे सहनही होईना आणि सांगताही येईना..? अशी झाली असणार.. मराठी या मुद्यावरून या दोन भावांच्या एकत्र येण्यानं शिंदे सेनेला आता थंडीत घामाच्या धारा लागल्या असणार..! एकत्र आलेल्या या दोन्ही भावांचा प्रतिकूल काळ सध्या जरूर आहे आता त्यांना माघारी फिरता येणार नाही. या मेळाव्यानं ठाकरे हे नाव महाराष्ट्रातून संपलेलं नाही हे सिद्ध झालंय. भाजपनं आता कितीही या घटनेवरून झाडू आपटण्याचा वा पांघरूण घालण्याचा तसंच मराठी प्रेमाचा पुळका दाखवण्याचा प्रयत्न केला तरी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय हे नक्की..! मोऱ्या, लेका, मला चर्चेत गुंतवून गाढवा, तू मात्र लोळतो आहेस, ऊठ आता नाहीतर ती देवभाऊंची लोकं येतील अन् तुला उचलून नेतील. त्याआधी ऊठ... हवं तर तू नोटा दाब म्हणजे मतदानाच्या मशीन मधलं नोटा बटन... नाहीतर तुला सवय आहे नोटा हातात दाबायची... नाही का...?"
मोरूच्या बापानं मोरूला सुनावलं.
मोरू डोळे चोळत उठून बसला अन् म्हणाला,
"पण बाबा... तुमच्याशी बोलता बोलता मला झोप लागली. पाहतो तर काय दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन माझ्यासमोर उभे ठाकले त्यांनी मला बाळासाहेबांनी ऐकवलं... "आपली मराठी आणि आपला महाराष्ट्र मुंबईसह टिकविण्यासाठी आपण काय काय खस्ता खाल्ल्यात, त्या तुला माहिती नाही. १०७ लोकांनी प्राणाची आहुती दिल्यानंतरच हे मराठी राज्य निर्माण झालंय. मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती गुजरातला ६० कोटी रुपये दिल्यावर झालीय. मुंबईवरच्या दाव्याचा सोक्षमोक्ष लावावा, म्हणून ही भरपाई तेव्हाच्या काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी दिली आणि मगच मुंबई मराठी माणसाची झाली. तरीही कधी गुजराती - जैनांची कबुतरं उडवून; तर कधी हिंदी भाषेच्या आडून, मुंबईकडे वक्रदृष्टी टाकली जाते. हा मुंबईवर रोखलेला वाकडा डोळा फोडल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही! काय तर म्हणे, लोकांनी अधिकच्या भाषा शिकल्या पाहिजेत. अरे पण हा प्रयोग इथंच का? देशात अन्य कुठल्याच राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती नाही. महाराष्ट्रातच का? आयला, हाताला काम नाही. शेतकऱ्यांच्या मालाला दाम नाही. पोरीबाळी सुरक्षित नाहीत. इथले उद्योग दुसऱ्या राज्यात जाताहेत. मुंबईची तर अक्षरशः वाट लावायचं काम सुरूय. हे बिनबोभाट पार पडावे, म्हणून हे सगळे सुरूय..! आपल्याला सगळे मतभेद विसरून देशाची राखण करणारा महाराष्ट्र धर्म वाचवायचाय! मुंबईसह सर्वत्र विजय मिळवून तिथे मराठी महापौर बसवायचाय! दोघांचं जुळवणारा खमक्या हवा ना! ते काम आमच्या संजयने चोख केलंय...!"  बाळासाहेब पुढं म्हणाले,
"दुसरं आमचे ते दोस्त शरद पवार अनेकांना वाटतं ते पुरोगामी विचारांचे आहेत. हे पुरोगामीपणाची शाल पांघरून राजकारण करणारे ढोंगी आहेत. पवारांच्या राजकारणाची सुरुवातच मुळात भाजपला सोबत घेऊन झालेलीय. १९७८ ला जो वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडून पुलोदचा प्रयोग केला तो जनसंघ म्हणजे आत्ताचा भाजप यांना सोबत घेऊनच झाला. भाजप अन् संघाचे लोक मंत्रिमंडळात होते. उत्तमराव पाटील, हशू अडवाणी हे संघाचेच. त्यांना पहिल्यांदा मंत्री कुणी केलं तर स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या पवारांनी. सरकार कुणाचं पाडलं तर एका अस्सल पुरोगामी विचारांच्या वसंतदादाचं! हा कावेबाजपणा पवारांनी कधी केला होता तर वयाच्या ३८ व्या वर्षी. ज्यांची सुरुवातच इतकी ढोंगी आणि विश्वासघातकी झाली. इतकंच नाही पवारांनी १९८५ ला कॉंग्रेस विरोधात पुलोद म्हणून निवडणूक लढवली त्यामध्येही भाजप होती. काँग्रेस त्यावेळी जिंकली पण तेव्हाही पवारांनी पुरोगामी नाव वापरून असं निष्ठेचं काम केलं. विशेष म्हणजे त्यावेळी भाजप स्थापन झालेला असताना पवारांनी हा प्रयोग केला. पुढे पंतप्रधान पदाच्या महत्वकांक्षेने झपाटलेले पवार सोनिया गांधी यांना बाहेरच्या म्हणत स्वतः बाहेर झाले. म्हणजे काँग्रेसने यांना हाकललं. कुणाचीही बायको बाहेरचीच असते. मग ती गावाबाहेरची असो वा देशाबाहेरची. तिला बाहेरची कसं म्हणणार? त्यातही स्वतःला पुरोगामी म्हणणारा नेता असा भेदभाव कसा करू शकतो? इतकंच काय २०२४ ला माध्यमांशी बोलताना लेक घरची आणि सून बाहेरची अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया यांच्याविषयी केलं होतं. हे स्वतःच्या सुनेलाही पवार मानत नाहीत इतके जातिवंत पुरोगामी आहेत. त्यामुळं अशा ढोंगी, बेगडी अन् फक्त सत्तेसाठी राजकारण करणाऱ्या नेत्याकडून, त्यांच्या पुढच्या पिढीकडून विचाराचं, विवेकाचं राजकारण होईल हे मानणं भाबडेपणा आहे. हा चांगला तो चांगला असं करत सगळ्यांना गोंजारलंय. २०१४ ची निवडणूक आठवा. निकाल लागताच भाजप सेनेला बहुमत मिळतंय हे लक्षात येताच भाजपला मतमोजणी चालू असतानाच बाहेरून पाठिंबा देऊन टाकला. काही भाबड्यांना वाटलं हा चाणक्य डाव आहे, हा डाव नव्हता. विचारांवर लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर घाव होता. कारण भाजपची सत्ता येताना आपण बाहेरून पाठिंबा जाहीर केला की आपल्याला काही त्रास न होता ते आपल्याकडं पर्याय म्हणून पाहतील असा तो विषय. आजही असंच ढोंगी, बेगडी राजकारण सुप्रिया, अजित पवार करतात. हे पवार घराणं कधीच पुरोगामी नव्हतं आणि नसेल. विचार खुंटीला टांगून कायम सत्तेच्या वळचणीला राहणारे कुटुंब आहे. विचारांवर अढळ श्रद्धा असणाऱ्या तरुणांनी यांच्याकडे पाहून मोठी स्वप्न उराशी घेऊन पक्षात दीर्घकाळ काम केलं आणि करताहेत. मात्र, तरुणांनी यांना ओळखावं, मार्ग निवडावा...!" 
न राहवून मग प्रमोद महाजन बोलू लागले,
"खरं तर मला दररोज सरसकट ठोकपणे होणारा पक्षबदल अन् आपण दलबदलूचे करत असलेलं स्वागत वाचून मनस्वी वेदना होतात. माझी मतं रूचणार नाहीत याची जाणीव असूनसुद्धा मी जर स्पष्टपणे मतं व्यक्त केली नाहींत तर ध्येयाने प्रेरित होऊन आयुष्यभर मर मर कष्ट करतात अन् नेत्यांचा शब्द प्रमाण मानून झोकून देऊन पक्षाचं काम करतात. अशा प्रामाणिक पण मूक कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचे शल्य सलत राहील. असो! मला सार्वजनिक जीवनात स्व. रामभाऊ गोडबोले, वसंतराव भागवत, नानाराव ढोबळे, कै नानासाहेब उत्तमराव असे स्वच्छ चारित्र्य आणि स्विकारलेलं तत्व याच्याशी तडजोड केल्याचं अजून अस्पष्ट सुद्धा स्मरत नाहीं. याच विचाराची कास घरून मी राजकारणात आलो. बदलत्या राजकारणात माझी टोकाच्या भूमिकेची अपेक्षा नाहीं. पण आजमितीला  पक्ष धोब्याच्या लाँड्रीप्रमाणे झालाय. सत्तेत असताना भ्रष्टाचाराचे डाग घेऊन आपल्या लाँड्रीतून स्वच्छ कपड़े चढवून पुन्हा निष्ठावान कार्यकर्त्याच्या खांद्यावर चढून सत्तेत आपल्या प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्यांना इतकी वर्ष झकमारी करून मिळवलं काय? असा कुत्सित प्रश्न विचारतात. या दलबदलूची पक्ष सोडताना सुरूवात होते ती "माझी पक्षात कुचंबना होत होती. पक्षनेतृत्वाकडे तक्रार करून नेतृत्वानं लक्ष दिलं नाहीं. अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा, विचाराचा मान ठेवूनच मी पक्षात प्रवेश करतोय. यांच्या नेतृत्वावर माझी नितांत श्रद्धा आहे...!" हे सर्व दलबदलू एकाच शाळेतले विद्यार्थी आहेत. पक्ष बदलताना इतका पराकोटीचा बेशरमपणा पाहून तळपायातली आग मस्तकात जाते. हे दलबदलू म्हणजे सत्तेचे दलाल आहेत. गावाकडच्या भाषेत राजकीय भडवे आहेत. महायुतीच्या नेत्यांना माझी  विनंती आहे की, जे दगलबाज काँग्रेस-राष्ट्रवादीची बोट बुडतेय असं लक्षांत येताच जीव घेऊन बुडत्या बोटीतून पळणारे  हे उंदीर खंबीर निणर्याच्यावेळी सोबत राहणार आहेत का? एक गोष्ट लक्षांत घ्या, जे आपल्या पक्षात सारं काही मिळून सुद्धा असंतुष्ट होते, ते आपल्या पक्षात आल्यानंतर संतुष्ट राहणार नाहीत याची गँरंटी काय? असंतुष्टता हा रक्तातला दोष आहे. सत्ता मिळाली नाही अथवा मंत्रीपद न मिळाल्याबद्धलची असंतुष्टता आहे. छगन भुजबळ आमदारांना घेऊन सेनेतून बाहेर पडले. तेव्हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामना वृतपत्रात व्यक्त केलं ते जसंच्या तसं मला आजही आठवतं. "लेंडकी आणि ओंडकी वाहून जातात. जे गेले ते मेले. आमच्या कमरेत जोर कायम आहे... ! मी यासाठी हे उदाहरण दिलं की, बाळासाहेबांवर मनापासून प्रेम केलं ते यामुळंच! नानासाहेबाना वसंतराव नाईकांनी काँग्रेसमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं अर्थात मंत्रीपदाचा शब्द तर पक्का! पण नानासाहेबानी विधानसभेत एकही आमदार नसलेल्या जनसंघातच राहणं स्वीकारलं. उभं आयुष्य एका विचाराची बांधिलकी शेवटच्या श्वासापर्यंत जोपासली. याचं विस्मरण होऊ नये. शेवटी एवढीच विनंती, तुम्ही हा रिजेक्टेड माल घेऊन जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणं अवघड होऊन बसेल. ज्यांना आपण घेतलं नाहीं तरी महायुतीची सत्ता येणारच आहे या विजयाचा निर्भेळ आनंद निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्त्यांना मिळू द्या. जनता त्रासली आहे. सत्ता मिळविण्यासाठी कुणाच्या कुबड्यांची मुळीच गरज नाही. सत्तेचा गोवर्धन जनता रूपी कृष्ण मताच्या करंगळीवर पेलून धरेल यावर विश्वास ठेवा. त्यासाठी या थकलेल्या गोपगोपीकांच्या मोडक्या काठ्याची काडी इतकी सुद्धा आवश्यकता नाहीं...!"
मोरूचा बाप विचारात पडला. मोऱ्याने पांघरूणात आणखीनच खोल तोंड खुपसलं अन् तो घोरू लागला.
हरीश केंची,
९४२२३१०६०९





भाजप : निर्वासितांची छावणी...!

"शुक्रवारी नाशिक इथं झालेल्या सभेत राज ठाकरे म्हणाले, '...इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहेत हे कळतच नाही.....!' तसं आज झालंय. कोण कोणत्या पक्षात आहे हे कळतंच नाही...! सारे विधिनिषेध गुंडाळून कसलीही पर्वा न करता सत्तेसाठी ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांनाच मांडीवर घेऊन सत्ता हस्तगत केली गेली. अशा नतद्रष्टाना मानमरातब दिल्यानं लोक हताश झालेत. निष्ठावान, मूल्याधिष्ठित राजकारण करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना दूर लोटलं जातंय. गुंड प्रवृत्तीच्या दंगेखोर कार्यकर्त्यांची रेलचेल सुरूय. सोज्वळ, सात्विक महाराष्ट्र काळ्याकुट्ट अंधारात चाचपडतोय. पूर्वी राजकारणात कटुता नव्हती. वाद होते, संघर्ष होते. पण द्वेष नव्हता. तो गेल्या दहा बारा वर्षांत वाढलाय. आज जशी शहरं सुजलीत तशी राजकीय पक्ष सुजलेत. निष्ठेवर विष्ठा ठेवणाऱ्यांना मानाचं पान दिलं जातंय. त्यामुळं लोकांनी आता पक्षाला नाही तर समाजसेवी व्यक्तींना पाहून मतदान करावं असं आवाहन करण्यात आलंय."
..................................................... 
*स्था*निक स्वराज्य संस्था निवडणुकांत कोणता पक्ष कोणाबरोबर लढतोय अन् कोण कोणाविरुद्ध याचा पायपोसच उरलेला नाही, फोडाफोडीचं राजकारण एवढं पुढं गेलंय. पक्षनिष्ठा, भूमिका, डावे-उजवे सारं काही धुळीला मिळालंय. याचं मूळ मागील पाच वर्षांत भाजपने राज्यात केलेल्या राजकारणात दडलेलंय. आधी भाजपने शिवसेना फोडून शिंदेंना आपल्या गळाला लावलं नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार यांना आपल्या मांडीला मांडी लावून बसवलं त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी तोच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून अधिकच खालची पातळी गाठलीय. सध्या फक्त निवडणुका जिंकण्यासाठीचं राजकारण सुरूय. निकालानंतर सत्तेसाठी याच्या पुढची पायरी गाठली जाऊ शकते. "गळ्यात गळा घालून उभे राहणारे गळा कसा कापायचा, किती कापायचा, कुणाचा, कधी कापायचा याची खलबतं सतत चाललेली असतात. गोरगरिबांना सेवासुविधा देण्यात एकमत आहे झेंड्याचे रंगसुद्धा तसे फार वेगळे कुठे आहेत? सेनेचा भगवा तिरंग्यात वर आहे तर भाजपत तो आडवा घातलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना वरखाली ठेऊन मध्ये पांढरा आणलाय. तिघात भगवा कॉमन! उडीदामाजी गोरे काळे प्रमाणे सारेच एका माळेचे मणी आहेत. नेत्यांना आपले सारे उद्योग बिनबोभाट पार पाडण्यासाठी नंदीबैलांचा एक कळप हवा असतो. काही चलाख धूर्त, काही विरोधी गटातले उपद्रव देण्याचं सामर्थ्य असणारे आणि बाकी माना हलवणारे नंदीबैल घेऊनच राज्य चालविण्याचा परिपाठ सुरूय. सध्या राजनीतीचं, राजकीय विचारधारांचं पराकोटीचं अवमुल्यन झालेलंय. राजकारणात जो जनतेला जास्त शिताफीने वेड्यात काढेल तोच सत्तेत बसतो हे दुर्दैव आहे. राजकीय अनागोंदीने ग्रासलेल्या समाजाला आधार हवाय. आज संवेदनशील, अभ्यासू, राजकीय, सामाजिक समाजसेवकांची मात्र वानवा आहे...!"
इकडे मोदींविरोधात उभे ठाकलेले शरद पवार, उद्धव, ममता, अखिलेश, मायावती, लालूप्रसाद, केजरीवाल आणि इतरांचं राजकीय अस्तित्व संकटात आलंय. राहुल अन् काँग्रेस दिशाहीन बनलीय. साम, दाम, दंड, भेद या चाणक्यनीतीने मोदी, शहांनी गतकाळातल्या दिग्गजांचा, वर्तमानातल्या धुरंधरांचा, भविष्यातल्या उत्साही अन् उथळ प्रतिस्पर्धकांचा सफाया चालवलाय, नितीशकुमारांचे आव्हानही संपुष्टात येईल अशी स्थिती आहे. भाजपच्या 'काँग्रेसमुक्त भारत' करण्याच्या निर्धारातून 'विपक्षमुक्त भारत' होईल काय याची भीती वाटतेय. असं झालं तर 'लोकशाही'तल्या 'एकाधिकारयुगा'चा आरंभ होईल. संघानं पाहिलेले 'एकचालकानुवर्तीत साम्राज्या'चे स्वप्न साकार होईल....! भाजपने आपणही अन्य कुठल्याही पक्षापेक्षा भीषण असू शकतो; असं सिद्ध करण्याची भूमिका घेतलीय. मात्र आपल्या या भीषण असण्याला त्यांनी 'बिभीषण' असं सोज्वळ पौराणिक संबोधन घेतलंय अन् वाटचाल आरंभलीय...! जगात सर्वाधिक सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षानं आपली ओळख 'पार्टी विथ डिफ़रन्स...!' अशी मागल्या शतकाच्या अखेरीला देशाला करून दिलेली होती. त्याची आज काय स्थिती आहे? हे आपल्याला दिसतंच आहे. इतर पक्षात जसे गणंग आहेत अगदी तसेच किंबहुना त्याहून अधिक गणंग भाजपत दिसून येतात. प्रधानमंत्री नरसिंहराव यांच्या कारकिर्दीनंतर काँग्रेसचा अस्त होऊ लागल्यावर भाजपने देशातला प्रमुख राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने पाऊल टाकताना, अन्य राजकीय पक्ष आणि त्यांच्या शैलीपेक्षा वेगळ्या मार्गाने जाण्याचा पवित्रा घेतला होता. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, म्हणजेच आपण फारच सभ्य आणि सुसंस्कृत आहोत, असा टेंभा भाजप मिरवत होता. म्हणूनच अन्य पक्षातले गुंड, गुन्हेगार वा भ्रष्ट नेत्यांवर आरोप करत, आपली साधनशुचिता दाखवण्यावर भाजपचा भर असायचा. पण मागल्या लोकसभा निवडणुकीत संसदेतल्या बहुमतापर्यंत मजल मारली आणि भाजपने आपणही अन्य कुठल्याही पक्षापेक्षा भीषण असू शकतो; असं सिद्ध करण्याचीच भूमिका घेतली. मात्र त्यांनी आपल्या या 'भीषण असण्याला बिभीषण' असं सोज्वळ पौराणिक संबोधन घेतलं. मागल्या काही वर्षात देशभर सोडाच महाराष्ट्रातही एकामागून एक नमूने शोधून त्यांना भाजपत आणण्याची प्रक्रिया इतकी वेगवान केली की, निष्ठावान कार्यकर्त्यालाही आपल्या पक्षाची मूळची ओळख जाणवेनाशी झालीय. आचार, विचार, निष्ठा वा चारित्र्य! म्हणजेच भाजपच्या भाषेत चाल, चलन, अन् चरित्र....! याच्याशी जणू काडीमोड घेतल्यासारखा पक्षाचा विस्तार करत, कुठलाही कचरा गोळा करण्याचा सपाटा लावला गेला. सत्तेसाठी बहूमत आणि बहूमतासाठी काय पण, कोणी पण; हा एककलमी कार्यक्रम हाती घेतला गेला. त्याविषयी बोलताना विधानसभा प्रचाराच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस बिभीषणाची कहाणी सांगत, आपण रामराज्य आणणार असल्याची ग्वाही दिलेली. रामालाही विजय संपादन करण्यासाठी रावणाच्या गोटातला बिभीषण आपल्याकडे घ्यावा लागला होता. हा निकष लावताना भाजपने कुठले कुठले हिरण्यकश्यपू वा दु:शासन पक्षामध्ये भरती करून घेतलेत, तेही आता मुख्यमंत्र्याना आठवेनासे झाले आहेत. कारण दोन मंत्र्यांपैकी एकाला न्यायालयाने शिक्षा सुनावलीय तर दुसरा आरोपी म्हणून वावरतोय. हे मित्रपक्षांचे असले तरी पक्षात घेतलेले काही नेते असेच आहेत. मित्रपक्षांचे हे मंत्री जात्यात दळले जाताहेत अन् काही भाजपचे मंत्री सुपात पडून हसत राहिलेत. तेही जात्यात येतील!
*आम्ही 'शठ्यम प्रती शाठ्यम...!'* 
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने 'काँग्रेसमुक्त भारत' अशी घोषणा केली होती. आता आपण केवळ साधनसुचिता धारण करणारे नाही तर 'शठ्यम प्रती शाठ्यम...!' म्हणत आक्रमकपणे चाल करून जाणारे बनलो आहोत, याचा प्रत्यय त्यांनी आजवरच्या निवडणुकांमधून देशाला करून दिलाय. राजकारणात विरोधी पक्षावर कुरघोडी करत एक एक राज्याची सत्ता मिळवणं हा त्यांचा एकमेव हेतू असतो. ते त्यांनी साध्य करून दाखवलंय. पण प्रतिस्पर्धकांची पुरती ओळखच पुसून टाकण्या इतपत आक्रमकता भाजपच्या कार्यकाळात जनतेला दिसून आलीय. साम, दाम, दंड, भेद यासारख्या चाणक्यनीतीतल्या आयुधांचा वापर करण्यात तरबेज असलेल्या शिर्षस्थ भाजप नेतृत्वाने काँग्रेसचं नाही तर, विरोधीपक्षानांही संपविण्याचा प्रयत्न नव्हे सपाटा चालविलाय. लोकसभा निवडणुकीत भाजपने यश मिळवलं नसलं तरी सत्ता हाती घेण्याचे राजकीय चातुर्य दाखवत सत्ता हस्तगत केलीय. ५४१ सदस्यांच्या संसदेत २४० जागा भाजपने जिंकल्या अन् मित्रपक्षाच्या मदतीनं बहुमत मिळवलं. सत्ता हस्तगत केलीय. तब्बल तीस वर्षे आघाडी सरकारांनी ग्रासलेल्या संसदेला एकदा पुन्हा आघाडी सरकार येणार असं वाटत असतानाच धूर्तपणे राजकीय खेळी करत भाजपने पुन्हा सत्ता मिळविली. आज भाजप अशा स्थितीत जाऊन पोहोचलाय की, निवडणुकीतल्या टीकेला, होणाऱ्या आरोपांना सणसणीत उत्तर देईल. 
*दांभिकपणा पदोपदी जाणवतोय!*
स्वातंत्र्यप्राप्ती नंतर पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांचा एक करिश्मा होता, जनमानसावर त्यांचा पगडा होता, तरीही त्यांना कधीच ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळविता आलेली नाहीत. फक्त एकदाच इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसनं ५१४ पैकी ४१४ जागा जिंकल्या होत्या, तेव्हा काँग्रेसला ४९.१ टक्के मते होती. आजवरचा तो एक विक्रमच आहे. त्याला आजवर कुणी धक्का लावलेला नाही. भाजपने मात्र 'सत्तेसाठी सारं काही...!' म्हणत; त्याज्य-स्वीकार्य, नैतिक-अनैतिक या साधनसुचिता दर्शविणाऱ्या बाबी दूर सारून नीती-अनितीचे सारे मार्ग अवलंबिलेत. हे सारं पाहता २०२९ च्या निवडणुकीत भाजपने विक्रमी मतं मिळविली तर आश्चर्य वाटायला नको. कारण भाजप सरकारनं कोणताही निर्णय घेतला की, तो जनसामान्यासाठी योग्यच आहे असं समजलं जाऊ लागलंय. आता खोटं देखील खरं वाटायला लागलंय. भाजपचा दांभिकपणा पदोपदी जाणवतोय. महागाई भडकली तरी ती आता राष्ट्रहिताची वाटू लागलीय. सरकारच्या कोणत्याही धोरणाचं, निर्णयाचं कौतुक करताना केवळ मंत्री, नेतेच नव्हे तर कार्यकर्तेही थकत नाहीत. ही राजकीय स्थिती पक्षासाठी उत्साहवर्धक असली तरी लोकशाहीच्या दृष्टीनं हितावह खचितच नाही. 
*जनाधारकी ऐसी की तैसी'!* 
विरोधीपक्षांत असताना भाजप 'सीबीआयचा दुरुपयोग' सत्ताधारी काँग्रेस करतेय...!' अशी कडाडून टीका करत असे. त्यावेळी प्रसिद्धीमाध्यमेही टीकेची राळ उठवीत. सत्तेचा दुरुपयोग होतोय असा कांगावा केला गेला तर जनतेमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता असते. इंदिरा गांधींच्या काळात सीबीआयचा दुरुपयोग विरोधकांना तुरुंगात डांबण्यासाठी झाला होता, परंतु त्याचा परिणामाला त्यांना सामोरं जावं लागलं होतं. पण आज तशी भीती भाजपला अजिबात वाटतच नाही. कारण विरोधकांवर जनतेचा विश्वासच राहिलेला नाहीये तसाच तो प्रसिद्धी माध्यमांवरही राहिलेला नाही. शिवाय सरकार अशा बाबतीत कशाचीही दखल घ्यायलाही तयार नाही. सगळं राजकारण एका वेगळ्या दिशेनं वाटचाल करतेय. सीबीआय, आयकर, इडी वा इतर कोणत्याही तपास यंत्रणेने निष्ठेनं, प्रामाणिकपणे काम केलं तर, स्वच्छ चारित्र्याचा, प्रामाणिक राजकीय नेता शोधायला त्यांना फार कष्ट घ्यावे लागतील. तपास यंत्रणेचा वापर सत्ताधारी करतात हे आता लपून राहिलेलं नाही. काँग्रेस आघाडीचं सरकार असताना मोदी विरोधात असा वापर झाला होता. आता पलटवार सुरू आहे. तेच हत्यार अधिक धारदारपणे तीव्रपणे परिणामकारकरित्या वापरलं जातंय. पूर्वी या कारवाया निंदनीय ठरत, पण आज त्या अभिनंदनीय ठरताहेत. या साऱ्या प्रकारामुळे राजकारणाचीच नाही तर लोकांच्या बदलत्या मानसिकतेची चिंता वाटतेय. याबाबत विरोधकही तेवढेच जबाबदार आहेत. देशातला प्रत्येक राजकीय नेता हा कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकलेला आहे. लालूप्रसाद यादवांसारखा खुलेआम भ्रष्टाचार करणारा, दोषी ठरलेला नेता, नव्या पिढीच्या मानसिकतेचा विचार न करता अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करणारे अखिलेश यादव, राहुल गांधींसारखे राजकीय नेते, कधीकाळी भाजपच्या सोबत असलेले अकाली दल, शिवसेना, बीजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्र समिती, आसाम गण परिषद यासारखे पक्ष आज हवालदिल, गलितगात्र झाले असताना ते भाजप समोर असतील तर निवडणुकीत भाजपला फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. कारण प्रभावी विरोधक समजले जाणारे नेते भाजपच्या वळचणीला आले आहेत. त्यातही विरोधकांनी आपल्या वागण्यानेच भाजपचा मार्ग सोपा केलाय. कधीकाळी मोदींना पर्याय म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं त्या नितीशकुमारांना भाजपने बिहारमध्ये आपल्या दावणीला बांधून टाकलंय. त्यांच्या साथीनं तिथली सत्ता हस्तगत केलीय. खरं तर तिथं भाजपचे पक्ष संघटन विस्कळीत झालं होतं, सत्तेशिवाय त्याचं संघटन होणं कठीण आहे याची जाणीव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना झाली, त्या तुलनेत राजदची पक्ष संघटना मजबूत होती. अमित शहांनी मागील दाराने का होईना बिहारची सत्ता पक्षाला मिळवून दिली. 'जनाधारकी ऐसी की तैसी'! शेवटी जो जिता वही सिकंदर...! हे त्यांनी सिद्ध केलंय!
*इंडिया आघाडीत चलबिचल*
बंगालमधली राजकीय स्थिती संवेदनशील बनलीय. ममता बॅनर्जी तिथं एवढया अडकल्यात की, त्यांना कलकत्ता सोडणं शक्य नाही. गुरखालँड आंदोलनाने उग्र रूप धारण केलंय. हे थांबलं तर नारदा, शारदा, रोझवेली, आणि इतर चिटफंडच्या केसेस सुरू होतील, शिवाय मिदनापोर, २४ परगणा इथं जातीय दंगली उसळल्यात. अशा वातावरणात राष्ट्रीय राजकारणात येऊन मोदींना आव्हान देण्याची ताकदच त्यांच्यात उरलेली नाहीये, शिवाय वेळही नाही. कर्नाटकात सत्तेने पुनरागमन करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. कर्नाटकात संख्येने सर्वाधिक आणि राजकारणावर प्रभाव असलेल्या लिंगायत समाजाला आपल्याकडे वळविण्यात भाजपला यश आलंय. आंध्रप्रदेशात आणि तेलंगणात भाजप कमकुवत आहे, त्यांचं तिथं अस्तित्वच दिसत नाही. पण चंद्राबाबूंच्या तेलुगु देशम आणि अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेनाशी भाजपने युती केलीय अन् आंध्रप्रदेशात सत्तेत सहभागी झालीय. तेलंगण राष्ट्र समितीची अवस्था विचित्र बनलीय. ते ना काँग्रेसबरोबर आहेत ना भाजपबरोबर. तामिळनाडूत भाजपने कंबर कसलीय. शशिकला, पनीरसेल्वम, रजनीकांत यासारख्या मोहरांवर त्यांनी गळ टाकला मात्र त्यांना तिथं फारसं यश आलं नाही. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती बनवलंय. नव्या नेत्यांची जुळवाजुळव सुरू आहे. भाजप सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस एवढी निष्प्रभ होईल असं कधी वाटलंच नव्हतं, कारण काँग्रेसची पाळंमुळं खोलवर रुजलेली होती, काही वर्षापूर्वी काँग्रेसकडे देशात एकहाती सत्ता होती, आज मात्र ती गलितगात्र झालीय. लालू, अखिलेश, मायावती, ममता, केजरीवाल, पवार, आणि तत्सम नेत्यांची सद्दी आता संपत आलीय. वाचाळ केजरीवाल यांनी मौन धारण केलंय. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मोदींविरोधात एकत्र आलेल्या इंडिया आघाडीमध्ये चलबिचल सुरू आहे. काँग्रेसचे साथीदार काँग्रेसचेच नेतृत्व नाकारताहेत. आधी नुसत्या कुरबुरी होत्या. दिल्लीच्या निवडणुकांनंतर तर त्या उघडपणे व्यक्त होऊ लागल्यात. २०२९ पर्यंत अशीच स्थिती देशात राहिली तर देश केवळ भाजपच्या इच्छेनुसार 'काँग्रेसमुक्त भारत' नव्हे तर 'विपक्षमुक्त भारत' सुद्धा होऊ शकेल आणि देशात ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळविणारा पक्ष म्हणून भाजप उदयाला आला तर आश्चर्य वाटणार नाही. शेवटी हे यश, ही सफलता भाजपची असेल. यात लोकशाहीने काय मिळवलं आणि काय गमावलं याचा विचार राजकीय निरीक्षकांना, विचारवंतांना करावा लागेल. 
- हरीश केंची,
९४२२३१०६०९

Tuesday, 6 January 2026

लोकशाहीचा जागरण गोंधळ...!


"डान्स ऑफ डेमोक्रसी....! लोकशाहीच्या नृत्यात निव्वळ गोंधळ दिसून आलाय. कुणी भोवळ येऊन पडतोय. कुणी हंबरडा फोडतोय. कुणी लोटांगण घालतोय. कुणी मंत्र्यांना घेराव घालताहेत. कुणी रॉकेल ओतून घेतोय. पक्ष कार्यालये फोडताहेत! उमेदवारीसाठीचे हे चित्र सार्वत्रिक आहे. ही चढाओढ, रडणे, भेकणे, चुरस, उद्रेक कशासाठी तर आर्थिकदृष्ट्या भंगारात निघालेल्या महापालिकांत नगरसेवक होण्यासाठी! यांच्या निष्ठा ना पक्षाशी, ना विचारधारेशी. अगदी शिसारी यावी अशी स्थिती आहे! निष्ठावंतांना डावललं जातंय अन् सत्तेच्या दलालांना पायघड्या घातल्या जाताहेत. 'पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणीहार.!' दुसरं काय? पक्षीय राजकारण दामटत ४ चा प्रभाग करून कार्यकर्त्यांचा बळी देत नेता महापालिकेची सूत्रं हाती घेतोय. या 'राजकीय भांडवलशाही' विरोधात उठाव करण्याची वेळ आलीय. कारण न्यायपालिका आंधळी आहे. पत्रकारिता थंड आहे. नागरी प्रश्नांसाठी राजकीय नेत्यांची नव्हे तर या प्रश्नांची जाण असलेल्या सक्षम 'नागरिकांची संघटना' हवीय!"
-----------------------------------------
सत्ताधाऱ्यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं होतं की, आमचे सारे उमेदवार हे दणदणीत, खणखणीत आणि ठणठणीत रुपय्या असतील. थोडक्यात असं की, या खेपेस निवडून गेलेला प्रत्येक नगरसेवक हा 'ठणठणीत रुपय्या' असणार याबद्दल नव्याने सांगणेच नको...!' हे अभिवचन आहे. गायपट्ट्यातल्या संस्कृतीचे संस्थापक देवेंद्र फडणवीस यांचं! फडणवीस आणि ठणठणीत रुपये वाजवून बघण्यात तरबेज असलेले त्यांचे चंद्रशखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांनी समोर आलेला समस्त खुर्दा पारखून-वाजवून केवळ तुमच्या-आमच्या भल्यासाठी दणदणीत, खणखणीत,  ठणठणीत रुपय्या निवडून त्यांना उमेदवार म्हणून उभं केलंय. आता आपण फक्त ह्या ठणठणीत रुपय्यांना आपली मतं द्यायचीत. दुर्दैवाने रुपये वाजवून बघणारी 'फडणवीस आणि कंपनी' ही एवढी एकच 'फर्म' नसल्याकारणाने तुमची माझी थोडी पंचाईतच झालीय. एकनाथभाई, अजितदादा तसे आपलेच! ते उपमुख्यमंत्री कुणाच्या मदतीने झाले? परवाच्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्यांच्या प्रत्येक व्युहाला तोडीस तोड व्यूह टाकणाऱ्या शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा पराभव कसा केला? असे आपले 'नवलोद्योगा'तले भागीदार एकनाथभाई, अजितqदादा आपल्या छगन भुजबळ, रामदास आठवले, गणेश नाईक यांना सोबत घेऊन दुसरी 'ठणठणीत रुपय्यांची' चळत लावून बसलेत. त्यांच्यासमोर 'गर्वसे कहो हम...!' म्हणणारी पेढी 'आम्ही खोट्या नाण्यांना हातच लावत नाही...!' अशी मिजास दाढीमिशांतून मिरवत आपले 'ठणठणीत रुपय्या' घेऊन असणारच! खेरीज आम्हाला वाजवून पाहा म्हणणारे कैकजण आपण होऊन आपल्यापुढे येतच आहेत. या ठणठणीत रुपयांच्या बाजारात आपण उभे आहोत. बोटाला शाई लागेपर्यंतच आपला रुपय्या ठणठणीत असणार आहे. ही शाई लागली की, आपली किंमत सरली आणि मग जो कोणी निवडून येईल तो 'ठणठणीत रुपय्या' ठणठणीत रुपये वाजवून घेण्याचा उद्योग करणार. तुम्हाला-मला तो विचारणार नाहीच, ज्यांनी त्याला उमेदवारी दिली त्यांनासुद्धा तो विचारणार नाही.
महापालिका निवडणूक ही विधानसभा, लोकसभा निवडणुकीपेक्षाही अधिक महत्त्वाची आहे. आमदारकीपेक्षा नगरसेवकपद अधिक 'मोलाचे' आहे. नगरसेवकपद ही रोजच्या रोज सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, म्हणून तर आमदार मंडळींनाही नगरसेवकपदाचा त्याग करवत नव्हता. सेवेसाठी ही मंडळी तळमळत असतात. आमदारकीत सेवा थोडी, नगरसेवकपदात सेवाच सेवा. प्रभागातला प्रत्येक रस्ता, गटार, दुकान, मकान, गाडा, फेरीवाला आणि झोपडीवाला ही जणू सेवाकेंद्रेच. नगरसेवकाची कर्तबगारी जोखायची असेल, तर डोळे उघडे ठेवून आपल्या प्रभागात फिरा, बेकायदा बांधकामे बघा, फेरीवाल्यांचे तांडे बघा, हॉटेल-बारवाल्यांनी पसरलेला व्याप बघा. या प्रत्येकाची नगरसेवकाने सेवा केलीय हे लक्षात घ्या. फूटपाथवरचा फेरीवाला हा नगरसेवकाचाच पोटभाडेकरू असतो. पोलिसांचा हप्ता जसा ठरलेला तसाच नगरसेवकाचाही असतो. महापालिकेच्या समित्यांवर तुम्ही आलात तर 'भगवान तुम्हाला छप्पर फाडके देतो...!' समित्यांच्या बैठकींच्यावेळी बाहेर बॅगा भरून गरजू माणसं उभी असतात. मतदानापूर्वी त्यांच्या बॅगा रिकाम्या होतात, त्यांना हवे असणारे निर्णय सेवाभावी नगरसेवक बहुमताने घेतात. विरोध करणारे ऐनवेळी काम निघाल्याने बैठकीतून मतदानापूर्वी निघून जातात अथवा मतदान झाल्यावर उशिरा येतात. महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद पुनःपुन्हा एखाद्याच माणसाकडे जाते तेव्हा अर्थातच त्याचा 'समृद्ध अनुभव' हेच कारण असतं. असे समृद्ध अनुभवी विधानसभेच्या वा लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा उभे राहतात, तेव्हा मतदारांना धनाढ्याच्या लग्नातला सोहळा अनुभवायला मिळतो. या निवडणुकीत उमेदवाऱ्या मिळवताना अनेकांनी जीवनमरणाची लढाई करण्याएवढा आटापिटा का केला? झुंडीने कार्यकर्ते आणून आपले कार्य नेत्यांच्या मनावर बिंबवण्याची धडपड का केली? नेते केवढे चाणाक्ष! त्यांना वॉर्डातल्या कार्यकर्त्यांना ज्यांची कर्तबगारी कधी दिसली नाही अशी झाकली माणके कशी चटचट दिसली? कोण महापालिका गाजवणार याचा साक्षात्कार नेत्यांना झाला. उमेदवारांचे व्यक्तिमत्त्व नेत्यांनी जाणले आणि नेत्यांचा आशीर्वाद लाभला की, अनुयायी '...की जय' म्हणणारच हे उमेदवारांनी जाणलं. थोडी नाराजी, खळखळ झाली, पण 'ठणठणीत रुपय्ये' हातात असले की, सगळी नाराजी संपवता येते. उमेदवारी मिळणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. वाट्टेल ते करून ती मिळवायची अशा निर्धारानेच अनेकजण या लढतीत उभे होते. काहींना 'ठणठणीत रुपय्या' हीच यशाची गुरुकिल्ली आहे हे ठाऊक होतं, त्यांनी वाजवून उमेदवारी मिळवली. सात वर्षांतल्या कर्तबगारीचे भरलेले रांजण पक्षातल्याच कार्यकर्त्यांनी नेत्यांपुढे ओतले, पण त्याची दखलही घेतली गेली नाही. 'सेवे'साठी घराघरात पोहोचलेल्यांना पुन्हा सेवेची संधी दिली गेली. त्यांच्याविरुद्ध व्यक्त झालेला तळतळाट 'ठणठणीत रुपय्या'च्या आवाजात विरून गेला. जिथे तोंड दाबून मुका मार सहन करण्यालाच निष्ठा असं नाव होतं अशा संघटनेतही माणसे आपली वेदना व्यक्त करू लागलेत. हे असेच घडणार आहे, कारण आपण लोकशाही स्वीकारली असली तरी ती यशस्वीपणे राबवण्याएवढी निष्ठा मात्र आपण आपल्यामध्ये निर्माण केलेली नाही. ह्या लोकशाहीला दळभद्री म्हणणाऱ्या ठोकशाही वृत्तीच्या लोकांना आणि लोकांना विकत घेऊन ही लोकशाही आपल्या खिशात घालणाऱ्या सर्वभक्षक स्वार्थांधाना आपण हवा तो उत्पात घालू देण्याइतपत निष्क्रियता स्वीकारलीय. या शक्तींविरुद्ध झुंजायची आपली ताकद जरूर आहे, पण इच्छा मात्र दिसत नाही. ही इच्छा जागृत व्हायला हवी. इच्छाशक्तीचे बळ अफाट असते. जर ही लोकशाही स्वच्छ, समर्थ करायचे ठरवले तर आपला रुपय्या ठणठणीत वाजेल. नाहीतर पदरात पडेल ते नाणे चालवून घ्यावे लागेल. 
'कमीत कमी वाईट असणारा उमेदवार निवडा...!' एवढं करायचं जरी सर्व सुशिक्षितांनी ठरवलं तरी राजकारणाचं गटार बरंचसं साफ होईल. उमेदवाऱ्या देणाऱ्यांना फक्त आपला झेंडा लावायचीच ईर्षा आहे अन् तो लागावा म्हणून कुणालाही 'ठणठणीत रुपय्या' म्हणून त्यांनी तुमच्या-माझ्यासमोर धरलंय. हा रुपया स्वीकारायचा का नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. गँगवॉरमध्ये जो सक्रीय आहे, ज्याला हात लावायला पोलीसही धजत नाहीत, जो कुणालाही उडवण्यात तरबेज आहे त्याला अथवा त्याच्या कुटुंबातल्या कुणाला तुमच्या घराजवळचे फुटके गटार अथवा कचऱ्याचे ढीग दाखवायला घेऊन जाण्याची तुमच्यात हिम्मत आहे? तुमच्या प्रतिनिधीला तुम्ही तुमच्या कामासाठी कुठेही गाठू शकला पाहिजेत. तुमचे ऐकण्याइतपत त्याला तुमच्याबद्दल आपुलकी हवी आणि तो उमेदवारी देणाऱ्याचा नव्हे, तुमचाच प्रतिनिधी राहायला हवा. नेत्यांच्या पालख्या उचलणारे तुम्हाला जर बुटाला पॉलीश करायला लावणार असतील, तर ते नेत्यांना लाख प्रिय असोत, तुम्ही त्यांना आपले प्रतिनिधीत्व कधीही देऊ नका. उमेदवाऱ्या देणारे कुणाच्याही व्यक्तिमत्त्वाने भारून जाऊ देत, तुम्ही तुमचा उमेदवार पारखून घ्या. पुन्हा उमेदवाऱ्या मिळवणाऱ्या नगरसेवकांबद्दल त्यांच्याच पक्षातली, त्यांचेच कार्यकर्ते काय बोलतात हे ऐका. या कार्यकर्त्यांनी आपल्या नगरसेवकांची कृष्णकृत्ये सांगणाऱ्या याद्या नेत्यांकडे सादर केल्या, पण महापालिकेवर झेंडा लागायचा असेल तर निवडणुका जिंकण्याच्या खुब्या जाणणारे अन् पैसा खर्चणारेच उमेदवार हवेत. ते एकदा ठरल्यावर या याद्यांचा उपयोग नगरसेवकांकडून जादा खंडणी घेण्यासाठी झाला. आता जेवढे द्यावे लागते तेवढे पुन्हा कमवावे लागणारच. हे सगळीकडेच घडलंय म्हणून सल्ला मोलाचा 'कमीत कमी वाईट असणारा उमेदवार निवडा...!' मी म्हणेन, कमीतकमी वाईट पक्षाचाही विचार करा. कारण अखेर नगरसेवक हा आपल्या पक्षाला बांधिल असणार. तुमच्या-आमच्या कामासाठी वेळ नसणारे, तुमच्या-आमच्या गाहाण्यांची दखल घेण्यापुरता वेळ काढण्याचे सौजन्य नसणारे आणि दोन बरे शब्द नम्रपणे बोलण्याचीही सभ्यता नसणारे नगरसेवक आपल्या नेत्यांचे पाय धरतात, त्यांच्या कुटुंबियांचे हरकामी गडी असल्यासारखे राबतात. खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून मौल्यवान भेट-वस्तूंपर्यंत पुरवठा नेत्याच्या घरात करून जबरदस्त वशिला निर्माण करून ठेवणाऱ्यांची फौजच आज राजकारणात वावरतेय. हे उमेदवार जेवढे वाईट त्यापेक्षा त्यांचे नेते सवाई वाईट. म्हणजेच त्यांचे पक्ष सुपरसवाई वाईट अशी दारुण परिस्थिती आहे. आता तर काय बिल्डर-शूटर-गैंगवॉरवाले सगळ्यांनीच 'ठणठणीत रुपय्यां'च्या टाकसाळी उघडल्यात. राज्य करायला निघालेले नेते आणि त्यांचे अनुयायी पहिल्याप्रथम नीतीचा मुडदा पाडताहेत. जिथे नीती नाही तिथे धर्मही नाही ही गोष्ट यांना कुणी सांगायची? नुसते झेंडे लावून सुराज्य येत नाही. सुराज्यासाठी नीतीची चाड असणाऱ्या निष्ठावंतांची फौज लागते. तेव्हा मतदारांनो, तुमचा रुपया ठणठणीत ठेवा. उमेदवार पारखून घ्या. त्याचा पक्ष, त्या पक्षाचे नेते, त्यांची नीतीदेखील पारखून घ्या आणि कमीतकमी वाईट असेल त्याला मत द्या.
सोलापूर, पुण्यातच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रात पैशाची उधळण सुरू आहे. देवदर्शन, तीर्थयात्रा, परदेशवारी, एवढंच नाहीतर एक गुंठा जमीन देण्याची चर्चा वृत्तपत्रातून रंगलीय. याशिवाय मतदानाची वेळ येऊन ठेपलीय पण अजूनही पक्षप्रवेश देणं सुरूच आहे. या गुंतागुंतीच्या व्यवस्थेतून सामान्य माणूस पुढे कसा जाईल? तुम्ही विचार करा. ५-२५ हजार रुपये मानधन असलेल्या नगरसेवक पदासाठी कोट्यवधी रुपये सर्व पक्षाचे उमेदवार खर्च का करतो? एवढी तीव्र इच्छा असते का याच्या जनसेवेची की, घरचे कोट्यवधी रुपये खर्च करतात. पैसे कुठून येतात? सामान्य माणसाकडे इतके पैसे नसतात. मग हे कोट्यवधी रुपये कुठून येतात? त्याचा परतावा कसा मिळवला जातो? निवडून आल्यानंतर हा खर्च कसा वसूल केला जातो? भ्रष्टाचार, गैरव्यवहार की अन्य काही? इथं गुणवत्तेपेक्षा पैसे महत्त्वाचे ठरतात का? योग्य व्यक्ती नव्हे तर जास्त पैसे खर्च करणारी व्यक्ती निवडली जाते, असा आजवरचा अनुभव आहे. ही लोकशाही आहे की धनशाही? आपली व्यवस्था ही खऱ्या अर्थाने लोकशाही म्हणता येईल अशी आहे का, की केवळ श्रीमंतांची राजवट? सामान्य माणसाचे स्वप्न संपलेत का? प्रामाणिकपणे, कष्टाने काम करून पुढे येण्याचा मार्ग बंद झालाय का? जागे व्हा.. प्रश्न विचारा.. बदल घडवून आणा!
महापालिका निवडणूक हा कार्यकर्त्यांचा आत्मा असतो. जनतेचा हक्काचा लोकप्रतिनिधी स्थानिक नगरसेवक असतो. पुर्वी तो सांगेल तिथेच लोकसभा, विधानसभेचे मतदान व्हायचे. आमदार अन् मंत्र्यांना नगरसेवकांची भुमिका विचारात घ्यायला लागायची. हिच खरी लोकशाही होती. मात्र सर्वपक्षीय नेत्यांना नगरसेवकांची जनतेची जोडलेली नाळ ही डोकेदुखी वाटायची. ही नाळ तोडून स्वतःकडे एकाधिकारशाही हवी होती. या निवडणूकीत मतदार पक्षावर नव्हे उमेदवारावर मतदान ठरवायचा! हे राजकीय नेत्यांना नको होते. याच वृत्तीने 'प्रभाग पद्धतीला' जन्म दिला. आधी २ चा प्रभाग केला तरीही कार्यकर्त्यांनीच बाजी मारली! मग नेत्यांनी ३ चा प्रभाग केला, कार्यक्षेत्र वाढल्याने कार्यकर्त्यांची दमछाक होऊ लागली. शेवटी स्थानिक कार्यकर्त्यांचा बळी देणारा ४ चा प्रभाग आला अन् महापालिकेत लोकशाहीचा अधिकृत अंत झाला...! ६० ते ७० हजार मतदारांमधे सातत्य ठेऊन ५ वर्षे काम करणं सामान्य कुटूंबातील कार्यकर्त्याला अशक्य असते. मग निवडणूक आपोआप पक्षावर जाते. पंतप्रधांनाच्या नावावर महापालीकेचे देखील मत मागता येते. नेत्यांना उमेदवारी देताना 'सांगकामे' निवडता येतात, निवडूनही आणता येतात. हजारो कोटींच्या कामांची सुत्रे राज्याच्या नेत्यांच्या हातात राहतात. निवडून आलेले सांगकामे हतबलपणे हुजरेगिरी करण्यात धन्यता मानतात. राजसतेला कार्यकर्त्यांचा बळी दिला की, तो राज्यही चालवतो अन् महापालिका देखील चालवतो. त्याशिवाय तो शांत होत नाही. या राजकीय भांडवलशाही विरोधात उठाव करण्याची वेळ आलीय. कारण न्यायपालीका आंधळी आहे. पत्रकारिता थंड आहे. मतदार जत्रे-यात्रेत दंग आहेत.
देशाची निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांवर, राज्याची निवडणूक राज्यपातळीवरच्या समस्यांवर, तर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्थानिक प्रश्नांवर लढवली जाते. यात देश अन् राज्यपातळीवर राजकीय पक्षांचं माध्यम वापरण्यास हरकत नाही. मात्र, महापालिकेच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण कशासाठी? असा सवाल पुण्यातील विचारवंतांनी मांडला. त्याला सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या नामवंतांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. निळूभाऊ लिमये, ना. भि. परुळेकर आदींच्या या विचाराला नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, डॉ. वा. रा. ढमढेरे, शेकापचे बंडोपंत किल्लेदार आदी अनेकांनी साथ दिली. त्यातून नागरिकांचा पक्ष स्थापन झाला. त्याला 'नागरी संघटना' असं नाव देण्यात आलं. 'स्थानिक समस्या स्थानिक पातळीवरच्या प्रतिनिधींनीच सोडवायच्या, त्यात पक्षीय राजकारण नको...!' असा स्तुत्य विचार जाणकार पुणेकरांनी मांडला. त्याला नागरिकांनी मनापासून साथ दिली. स्वातंत्र्यानंतरची पहिली निवडणूक नागरी संघटनेने जिंकली. 'सनातन्यांचा बालेकिल्ला' असा शिक्का असलेले पुणे सामाजिक क्रांतीचा विचार मांडणाऱ्या, परिवर्तनवादी विचारांच्या समाजवादी विचारांचं एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उगमस्थान बनलं. त्यातूनच स्वातंत्र्यानंतर 'नागरी संघटने' चा उदय झाला. महापालिकेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत नागरी संघटना सत्तेवर आली. दिल्ली आणि मुंबई अशा दोन्हीकडे काँग्रेसची सत्ता असताना स्थानिक पातळीवर पुणे महापालिकेमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली नाही! नागरी संघटना या नावाने वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या जाणकार, नागरी समस्यांची कळकळ असलेल्या पुणेकरांनी पुण्याचा कारभार मागितला अन् पुणेकर मतदारांनी तो दिला. त्यावेळी २० वॉर्डामध्ये ६५ जागा होत्या. नागरी संघटनेने ३२ जागा पटकाविल्या. काँग्रेसचे १९, तर अपक्ष १४ जण निवडून आले. नंतर १९५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या प्रभावामुळे नागरी संघटना थोडीशी मागे सरकली. पण लक्षणीय जागा मिळाल्याने भाऊसाहेब शिरोळे सहजरीत्या महापौर झाले. १९६२ मध्ये गुरुवर्य बाबूराव जगताप यांची साथ नागरी संघटनेला मिळाली अन् पुन्हा सत्ता मिळवली. लोकसभा, विधानसभेच्या एकामागून एक निवडणुका जिंकत असलेल्या काँग्रेसला तोवर पुणे महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करता आलं नव्हतं. पण, १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झेंड्याखाली गेलेला मूळ काँग्रेसी पक्षाकडे परतू लागला. यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व कारणीभूत होतं. त्यामुळे पुण्यात १९६८ मध्ये झालेल्या निवडणुकीवर त्याचा परिणाम झाला आणि काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर स्वबळावर प्रथमच पुणे महापालिकेची सत्ता हस्तगत केली. १९७४ मध्ये पुन्हा नागरी संघटनेला लक्षणीय यश मिळालं अर्थात, नागरी संघटना म्हणून तिचे पुण्यातलं हे शेवटचे मोठे यश ठरलं. कारण, त्यानंतर उदयाला आलेल्या जनता पक्षाकडे काँग्रेसविरोधी शक्ती गेली. नंतर जनता पक्ष फुटला, तरी 'नागरी संघटना' पुन्हा मूळ धरू शकली नाही. १९५२ पासून सुमारे पंचवीस वर्षे नागरिकांच्या नावाने काम करणाऱ्या संघटनेने आपला जबरदस्त प्रभाव निर्माण केला होता. आज नासलेल्या, सडलेल्या राजकारणाच्या आणि 'राजकीय भांडवलशाही' च्या पार्श्वभूमीवर नागरी संघटनेची केवळ आठवणच नाही तर गरज प्रकर्षानं जाणवते.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

स्कूल ठीक होतील....?

"शिक्षण क्षेत्रात सुधारणा व्हावी यासाठीच्या आंदोलनांना सरकारला सामोरं जावं लागलंय. आज जगातल्या साऱ्या मोठ्या बहुराष्ट्रीय क...