Sunday, 11 January 2026

मोरूचा बाप मोरूला म्हणाला.....!

सकाळ झाली, दिवस उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘‘मोऱ्या, लेका, घोरत काय पडलाहेस? आज मतदानाचा दिवस म्हणजे जणु दसराच. अर्थात शिलंगणाचा दिवस. ऊठ, तोंड विसळ. स्नान कर आणि बाहेर चालता हो कसा.....!" त्यावर मोऱ्याने पांघरूणात आणखीनच खोल तोंड खुपसले आणि तो निऱ्हानाम घोरू लागला. ते पाहून पित्त खवळलेल्या मोऱ्याच्या बापाने दातओठ खात त्याचे पांघरूण खस्सदिशी ओढले व तो ओरडला, ‘‘मोऱ्या, निवडणुकीचे रणांगण येऊन ठेपलंय,  वीस दिवसांनंतर आलंय. खंडेनवमीप्रमाणे शस्त्रपूजन करोन जनलोक शिलंगणाला बाहेर पडलीसुद्धा. त्वां इथं निव्वळ घोरत पडलाहेस, अशाने कसे भले होणार लोकशाहीचे....?" त्यावर एक गडगडाटी सुस्कारा टाकत मोऱ्याने हातपाय ताणून आळस दिला आणि चिंतनयुक्‍त आवाजात तो म्हणाला, ‘‘बाप हो! राग आवरावा. कां की, लोकशाहीला काहीएक झालेलं नाही, ती अत्यंत सशक्‍त आणि सुशेगाद अवस्थेत आहे. किंबहुना, लोकशाहीची इतकी भली अवस्था गेली सत्तर वर्षे कधीही नव्हती.....!’’ मोरूचे विचारसौंदर्य पाहून हतबुद्ध झालेल्या मोरूपित्याच्या मुखातून शब्द काही फुटेना. जन्मदात्याची तुर्यावस्था पांघरूणाच्या आत अंतर्ज्ञानाने ओळखून मोरू पुढे म्हणाला, ‘‘औंदाच्या निवडणुकीत कोण कोणातर्फे कोठे उभे राहिलेत, हे सांगणे अंमळ कठीण झालंय. प्रश्‍न जनतेच्या प्रतिनिधित्वाचा आहे. कुण्या पक्षाचा नव्हे! इतकी राजकारणविरहित निवडणूक तुमच्या पाहण्यात आहे का? हे सशक्‍त लोकशाहीचे लक्षण नव्हे काय? लोकांनी लोकांसाठी चालविलेलं लोकांचं राज्य म्हणजेच लोकशाही ना....?’’ मोऱ्याच्या जन्मदात्याने आवंढा गिळला. तो गिळून तो खोल आवाजात म्हणाला, "यालाच लोकशाही म्हणायचे, तर आयाराम-गयारामांच्या संधिसाधू राजकारणाला नैतिक अधिष्ठान असल्याचंच मानावं लागेल. निवडणुकांना काही अर्थच उरणार नाही...!’’
‘‘निवडणुकांना तसाही फारसा अर्थ नाही. कारण, त्यातील चार्म आता निघून गेला आहे. एका हाटेलात इडली खाऊन दुज्या हाटेलीतील भजी खाण्यासाठी ज्याप्रमाणे कोणीही जाऊ शकते, त्याचप्रमाणे हल्ली कोणीही कुठल्याही पक्षात जाऊ अथवा येऊ शकते. विचारधारांची लढाई आता लुप्त होत जाणार. येथून पुढे सारेच सत्ताधारी पक्षात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सामील होणार. विरोध, विरोधक औषधालादेखील सापडणार नाहीत, हे आपण लिहोन ठेवावे...!’’ ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे सर्व जल अखेर समुद्रार्पण होते, तस्मात सारी मते कोणालाही दिली, तरी ती दिल्लीस्थित एकाच तारणहाराच्या चरणकमळी रुजू होतात, हे नव्या भारताचे सत्य आहे. तेव्हा निवडणुकीला युद्ध, रणांगण, लढाई असे काही म्हणो नये, बाप हो...!,’’ डोईवरील पांघरूण न काढताच मोरेश्‍वराने केलेला युक्‍तिवाद ऐकून मोरूपित्याला भरून आलं. तरीही, तो मोरूचाच पिता असल्याने त्यानेही विक्रमादित्यासारखा हट्ट सोडला नाही. तो पुढे म्हणाला, ‘‘काय बडबडतो आहेस? विरोधक नसतील तर लोकशाही कशी असेल? हा बुद्धिभेद तुझ्यापास ठेव, मोऱ्या...!’’ शांतता यत्किंचितही ढळू न देता मोरू म्हणाला, ‘‘विरोधक हवेत कोणाला? खुद्द विरोधकांनाच विरोधाचा कंटाळा आला असून, कधी एकदा सत्तेत समाविष्ट होतो, असं त्यांना झालंय. कारण, त्यांच्यावर वशीकरणाच्या प्रयोगाखातर ईडीलिंबू घुमवलं गेलंय. सत्तेत राहून विरोधकांप्रमाणे वागणारे मित्र इथं आहेत आणि गमतीखातर थोडका विरोध करून वेळवखत पाहून खुर्ची बळकावणारे विरोधीजनदेखील आहेत. मुदलात जनतेलाही विरोधक कुठं हवेत? तेव्हा निवडणुकीचे कालबाह्य कारण देऊन मज गरीब तरुणाची झोपमोड करो नये, ही प्रार्थना...!’’ मोरूचा बाप विचारात पडला.
बराच वेळ दाढी खाजविल्यावर तो त्याने पुशिले,
‘‘म्हणजे निवडणुकीला काहीच अर्थ राहिला नाही, असे तुझे म्हणणे आहे काय...?’’ 
‘‘निवडणूक हा एक लोकशाहीचा उत्सव आहे. उत्सव म्हणजेच इव्हेंट. इव्हेंट म्हटले की, रंगारंग कार्यक्रमांची बौछार आलीच, पाठोपाठ मनोरंजन आलं. अवघा देश ज्या रंगात सचैल न्हातो असं या देशात दोनच तर रंग आहेत, एक निवडणूक आणि दुसरा क्रिकेट! बाकी सारे बेरंग आहे बापहो...!’’ मोऱ्याच्या आवाजाला सॉक्रेटिसाच्या चिंतनशीलतेची बैठक होती. "मोऱ्या, मग इलेक्‍शन आलं की आम्ही पामर मतदारांनी कासं वागावं, तेही सांगून टाक...!’’ मोरूपिता म्हणाला. 
‘‘राजकारणाचा पोत बदलतोय. राजकारण्यांचाही रागरंग बदलतोय. तेव्हा मतदारानेही स्वतःला बदलणे भाग आहे. अखेर जगात बदल हीच एक गोष्ट सातत्यपूर्ण, शाश्‍वत आहे. तेव्हा आपल्या गल्लीतील प्रतिनिधीने काश्‍मीरप्रश्‍नी काही मुद्दा मांडला असता त्याला प्रतिवाद करून गल्लीतील नालेसफाईचा मुद्दा उकरणे काही योग्य होणार नाही. हल्ली कोठलीही निवडणूक ही राष्ट्रीय मुद्द्यांवरच लढली जाते, हे लक्षात ठेवावे. एवंच केल्यास अच्छे दिनांच्या आगमनाला अपशकून होणार नाही...!" मोऱ्या मोऱ्या, बालिष्टर का नाही रे झालास? हा सुप्रसिद्ध आणि तितकाच इमोशनल सवाल करण्याची उबळ मोरूपित्याने दाबली आणि मोरूने केलेल्या ‘वैचारिक सीमोल्लंघना’चा नेमका अर्थ काय, या विचारात ते गढून गेले. आता हा अर्थ तुम्ही, आम्ही सर्वांनीच समजावून घ्यायला हवा...!" मोरूचं राजकीय तत्वज्ञान आणि सद्यस्थितीतलं समज पाहून मोरूचा बाप विचारात पडला. तसा मोरू पुढे म्हणाला, 
"चिमण्या परत फिरल्या, पाखरांचं काय? राजकारणात गेल्या दहा, बारा वर्षांपासून जे वरिष्ठ स्तरावरचे डावपेच आणि शह काटशहचे सत्ता प्रेरित राजकारण सुरू झालं, त्यात चिमण्यांचं भलं झालं, परंतु पाखरं मात्र जायबंदी झालीत. काही पिंजऱ्यात सापडली तर काही वाट पाहून थकून जागेवर शांत झालीत....!"
ठाकरे बंधूंचं मनोमिलन अन् काका पुतणे यांचा झालेला तह महाराष्ट्रानं पाहिला, देशभरातल्या मिडियानं पाहिलं, एखाद्या उत्तम पटकथा असलेल्या राजामौलीसारख्या कल्पक दिग्दर्शकाच्या सिनेमातला क्लायमॅक्स सीनसारखा झालेला तो सोहळा, त्यात सुप्रिया मावशीचं ग्रँड हस्तांतरण आणि अनेक वर्ष ताटातूट झालेल्या भावना आणि भाचे मंडळी यांना जवळ आणणं, हा क्षण त्या सोहळ्यातील परमोच्च बिंदू होता...!"
मोरूपिता म्हणाला, "म्हणजे तूला काय म्हणायचंय.? तुझे म्हणणे आहे काय...?" "आता महाराष्ट्र काका पुतण्याला एकत्र पाहण्यासाठी आसुसलाय. त्यात सुप्रियाताईची भूमिका महत्वाची असेल. हे भावनात्मक क्षण राजकारणातल्या असह्य अशा काटेरी क्षणावर फुंकर घालतात...!" मोरू पुढे म्हणाला,  ओके... इट्स फाईन..... इकडं दादू आणि राजा यांचं मनोमिलन अन् त्यांच्या गाठीभेटी, एकत्रित, स्वतंत्र मुलाखती सुरू आहेत. त्या दोघात आजवर संजय एकटाच खिंड लढवत होता. पण या दोघा बंधुराजांना एकत्र आणण्याची संधी साधणारा महेश इथं जोडला गेलाय...!" मोरूपिता वस्तुस्थिती सांगत म्हणाला. त्यावर मोरू म्हणाला, "मोठ्या नेत्यांचं सगळं ओके झालंय, पण गाव पातळीवरचे कार्यकर्ते जे नेते आणि विविध ठिकाणी जाऊन पदाधिकारी बनू पहात आहेत, त्यांचं काय? आणखी वाट पाहणं किंवा बंडखोरी करणं...राजकारण हा चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवसांचा खेळ आहे. यात टॉस जिंकून भागत नाही किंवा सगळं अनुकूल असूनही भागत नाही, या राज्यातल्या निवडणुकांचं राजकारण कधी भावनिक, तर कधी जात, धर्म, पंथ आणि दामाजीपंत यावर चालतं.. त्यात काडीमात्र बदल नाही...!"
मोरूचा बाप सांगू लागला. "पण हजारो ग्रामीण, शहरी, निमशहरी कार्यकर्ते गणेशोत्सवातली जबाबदारी घेत हळूहळू राजकारणात येतात, पूर्वीच्या काळापासून सुरू झालेली उमेदवारी, पाच वर्षे खिशातले पैसे टाकून पूर्ण होते, पुढं मात्र योग्य संधी मिळाली नाही आणि राजकारण, त्यातली उपभोग्य पदं मिळाली नाहीत तर ते कर्जबाजारी होऊन जातात, हे वास्तव आहे. जितके पक्ष जास्त, निवडणूक रिंगणात उमेदवार जास्त तितका खर्च जास्त, या समीकरणात आणखी भर पडणार ती नव्याने लाटेवर स्वार होऊ पाहणाऱ्या ताकदवर, पैसे बाळगून असलेल्या नवनेत्यांची! तिसऱ्या पिढीतल्या फौजेची....!"
मोरू सांगू लागला.
"तेही खरंय...सतरंज्या उचलणारे, स्टेजची काळजी घेणारे आणि सर्व सूत्रं सांभाळणारे दुर्लक्षित राहतात, होतात किंवा केले जातात, हे देखील वास्तव आहे. पाखरांचं विश्व कायमच हिंदोळणारं असतं, त्यांची किंमत होत नसते, त्यांना जपावं लागतं, कॉर्पोरेट स्वरूप धारण केलेल्या राजकारणात सगळं वाहून जातं, भावना आणि निष्ठा या लग्न समारंभ झाल्यानंतर बाजूला ठेवलेल्या मोठ्या ड्रममधल्या प्लेट सारख्या... पाखरं कायमच असुरक्षित असतात, ती कुठंही असोत त्यांना आकाश खायला उठतं तर जमीन काटेरी भासते...!"
"म्हणजे हे चित्र पाहून सत्ताधाऱ्यांची आजची अवस्था म्हणजे सहनही होईना आणि सांगताही येईना..? अशी झाली असणार.. मराठी या मुद्यावरून या दोन भावांच्या एकत्र येण्यानं शिंदे सेनेला आता थंडीत घामाच्या धारा लागल्या असणार..! एकत्र आलेल्या या दोन्ही भावांचा प्रतिकूल काळ सध्या जरूर आहे आता त्यांना माघारी फिरता येणार नाही. या मेळाव्यानं ठाकरे हे नाव महाराष्ट्रातून संपलेलं नाही हे सिद्ध झालंय. भाजपनं आता कितीही या घटनेवरून झाडू आपटण्याचा वा पांघरूण घालण्याचा तसंच मराठी प्रेमाचा पुळका दाखवण्याचा प्रयत्न केला तरी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय हे नक्की..! मोऱ्या, लेका, मला चर्चेत गुंतवून गाढवा, तू मात्र लोळतो आहेस, ऊठ आता नाहीतर ती देवभाऊंची लोकं येतील अन् तुला उचलून नेतील. त्याआधी ऊठ... हवं तर तू नोटा दाब म्हणजे मतदानाच्या मशीन मधलं नोटा बटन... नाहीतर तुला सवय आहे नोटा हातात दाबायची... नाही का...?"
मोरूच्या बापानं मोरूला सुनावलं.
मोरू डोळे चोळत उठून बसला अन् म्हणाला,
"पण बाबा... तुमच्याशी बोलता बोलता मला झोप लागली. पाहतो तर काय दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन माझ्यासमोर उभे ठाकले त्यांनी मला बाळासाहेबांनी ऐकवलं... "आपली मराठी आणि आपला महाराष्ट्र मुंबईसह टिकविण्यासाठी आपण काय काय खस्ता खाल्ल्यात, त्या तुला माहिती नाही. १०७ लोकांनी प्राणाची आहुती दिल्यानंतरच हे मराठी राज्य निर्माण झालंय. मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती गुजरातला ६० कोटी रुपये दिल्यावर झालीय. मुंबईवरच्या दाव्याचा सोक्षमोक्ष लावावा, म्हणून ही भरपाई तेव्हाच्या काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी दिली आणि मगच मुंबई मराठी माणसाची झाली. तरीही कधी गुजराती - जैनांची कबुतरं उडवून; तर कधी हिंदी भाषेच्या आडून, मुंबईकडे वक्रदृष्टी टाकली जाते. हा मुंबईवर रोखलेला वाकडा डोळा फोडल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही! काय तर म्हणे, लोकांनी अधिकच्या भाषा शिकल्या पाहिजेत. अरे पण हा प्रयोग इथंच का? देशात अन्य कुठल्याच राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती नाही. महाराष्ट्रातच का? आयला, हाताला काम नाही. शेतकऱ्यांच्या मालाला दाम नाही. पोरीबाळी सुरक्षित नाहीत. इथले उद्योग दुसऱ्या राज्यात जाताहेत. मुंबईची तर अक्षरशः वाट लावायचं काम सुरूय. हे बिनबोभाट पार पडावे, म्हणून हे सगळे सुरूय..! आपल्याला सगळे मतभेद विसरून देशाची राखण करणारा महाराष्ट्र धर्म वाचवायचाय! मुंबईसह सर्वत्र विजय मिळवून तिथे मराठी महापौर बसवायचाय! दोघांचं जुळवणारा खमक्या हवा ना! ते काम आमच्या संजयने चोख केलंय...!"  बाळासाहेब पुढं म्हणाले,
"दुसरं आमचे ते दोस्त शरद पवार अनेकांना वाटतं ते पुरोगामी विचारांचे आहेत. हे पुरोगामीपणाची शाल पांघरून राजकारण करणारे ढोंगी आहेत. पवारांच्या राजकारणाची सुरुवातच मुळात भाजपला सोबत घेऊन झालेलीय. १९७८ ला जो वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडून पुलोदचा प्रयोग केला तो जनसंघ म्हणजे आत्ताचा भाजप यांना सोबत घेऊनच झाला. भाजप अन् संघाचे लोक मंत्रिमंडळात होते. उत्तमराव पाटील, हशू अडवाणी हे संघाचेच. त्यांना पहिल्यांदा मंत्री कुणी केलं तर स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या पवारांनी. सरकार कुणाचं पाडलं तर एका अस्सल पुरोगामी विचारांच्या वसंतदादाचं! हा कावेबाजपणा पवारांनी कधी केला होता तर वयाच्या ३८ व्या वर्षी. ज्यांची सुरुवातच इतकी ढोंगी आणि विश्वासघातकी झाली. इतकंच नाही पवारांनी १९८५ ला कॉंग्रेस विरोधात पुलोद म्हणून निवडणूक लढवली त्यामध्येही भाजप होती. काँग्रेस त्यावेळी जिंकली पण तेव्हाही पवारांनी पुरोगामी नाव वापरून असं निष्ठेचं काम केलं. विशेष म्हणजे त्यावेळी भाजप स्थापन झालेला असताना पवारांनी हा प्रयोग केला. पुढे पंतप्रधान पदाच्या महत्वकांक्षेने झपाटलेले पवार सोनिया गांधी यांना बाहेरच्या म्हणत स्वतः बाहेर झाले. म्हणजे काँग्रेसने यांना हाकललं. कुणाचीही बायको बाहेरचीच असते. मग ती गावाबाहेरची असो वा देशाबाहेरची. तिला बाहेरची कसं म्हणणार? त्यातही स्वतःला पुरोगामी म्हणणारा नेता असा भेदभाव कसा करू शकतो? इतकंच काय २०२४ ला माध्यमांशी बोलताना लेक घरची आणि सून बाहेरची अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया यांच्याविषयी केलं होतं. हे स्वतःच्या सुनेलाही पवार मानत नाहीत इतके जातिवंत पुरोगामी आहेत. त्यामुळं अशा ढोंगी, बेगडी अन् फक्त सत्तेसाठी राजकारण करणाऱ्या नेत्याकडून, त्यांच्या पुढच्या पिढीकडून विचाराचं, विवेकाचं राजकारण होईल हे मानणं भाबडेपणा आहे. हा चांगला तो चांगला असं करत सगळ्यांना गोंजारलंय. २०१४ ची निवडणूक आठवा. निकाल लागताच भाजप सेनेला बहुमत मिळतंय हे लक्षात येताच भाजपला मतमोजणी चालू असतानाच बाहेरून पाठिंबा देऊन टाकला. काही भाबड्यांना वाटलं हा चाणक्य डाव आहे, हा डाव नव्हता. विचारांवर लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर घाव होता. कारण भाजपची सत्ता येताना आपण बाहेरून पाठिंबा जाहीर केला की आपल्याला काही त्रास न होता ते आपल्याकडं पर्याय म्हणून पाहतील असा तो विषय. आजही असंच ढोंगी, बेगडी राजकारण सुप्रिया, अजित पवार करतात. हे पवार घराणं कधीच पुरोगामी नव्हतं आणि नसेल. विचार खुंटीला टांगून कायम सत्तेच्या वळचणीला राहणारे कुटुंब आहे. विचारांवर अढळ श्रद्धा असणाऱ्या तरुणांनी यांच्याकडे पाहून मोठी स्वप्न उराशी घेऊन पक्षात दीर्घकाळ काम केलं आणि करताहेत. मात्र, तरुणांनी यांना ओळखावं, मार्ग निवडावा...!" 
न राहवून मग प्रमोद महाजन बोलू लागले,
"खरं तर मला दररोज सरसकट ठोकपणे होणारा पक्षबदल अन् आपण दलबदलूचे करत असलेलं स्वागत वाचून मनस्वी वेदना होतात. माझी मतं रूचणार नाहीत याची जाणीव असूनसुद्धा मी जर स्पष्टपणे मतं व्यक्त केली नाहींत तर ध्येयाने प्रेरित होऊन आयुष्यभर मर मर कष्ट करतात अन् नेत्यांचा शब्द प्रमाण मानून झोकून देऊन पक्षाचं काम करतात. अशा प्रामाणिक पण मूक कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचे शल्य सलत राहील. असो! मला सार्वजनिक जीवनात स्व. रामभाऊ गोडबोले, वसंतराव भागवत, नानाराव ढोबळे, कै नानासाहेब उत्तमराव असे स्वच्छ चारित्र्य आणि स्विकारलेलं तत्व याच्याशी तडजोड केल्याचं अजून अस्पष्ट सुद्धा स्मरत नाहीं. याच विचाराची कास घरून मी राजकारणात आलो. बदलत्या राजकारणात माझी टोकाच्या भूमिकेची अपेक्षा नाहीं. पण आजमितीला  पक्ष धोब्याच्या लाँड्रीप्रमाणे झालाय. सत्तेत असताना भ्रष्टाचाराचे डाग घेऊन आपल्या लाँड्रीतून स्वच्छ कपड़े चढवून पुन्हा निष्ठावान कार्यकर्त्याच्या खांद्यावर चढून सत्तेत आपल्या प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्यांना इतकी वर्ष झकमारी करून मिळवलं काय? असा कुत्सित प्रश्न विचारतात. या दलबदलूची पक्ष सोडताना सुरूवात होते ती "माझी पक्षात कुचंबना होत होती. पक्षनेतृत्वाकडे तक्रार करून नेतृत्वानं लक्ष दिलं नाहीं. अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा, विचाराचा मान ठेवूनच मी पक्षात प्रवेश करतोय. यांच्या नेतृत्वावर माझी नितांत श्रद्धा आहे...!" हे सर्व दलबदलू एकाच शाळेतले विद्यार्थी आहेत. पक्ष बदलताना इतका पराकोटीचा बेशरमपणा पाहून तळपायातली आग मस्तकात जाते. हे दलबदलू म्हणजे सत्तेचे दलाल आहेत. गावाकडच्या भाषेत राजकीय भडवे आहेत. महायुतीच्या नेत्यांना माझी  विनंती आहे की, जे दगलबाज काँग्रेस-राष्ट्रवादीची बोट बुडतेय असं लक्षांत येताच जीव घेऊन बुडत्या बोटीतून पळणारे  हे उंदीर खंबीर निणर्याच्यावेळी सोबत राहणार आहेत का? एक गोष्ट लक्षांत घ्या, जे आपल्या पक्षात सारं काही मिळून सुद्धा असंतुष्ट होते, ते आपल्या पक्षात आल्यानंतर संतुष्ट राहणार नाहीत याची गँरंटी काय? असंतुष्टता हा रक्तातला दोष आहे. सत्ता मिळाली नाही अथवा मंत्रीपद न मिळाल्याबद्धलची असंतुष्टता आहे. छगन भुजबळ आमदारांना घेऊन सेनेतून बाहेर पडले. तेव्हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामना वृतपत्रात व्यक्त केलं ते जसंच्या तसं मला आजही आठवतं. "लेंडकी आणि ओंडकी वाहून जातात. जे गेले ते मेले. आमच्या कमरेत जोर कायम आहे... ! मी यासाठी हे उदाहरण दिलं की, बाळासाहेबांवर मनापासून प्रेम केलं ते यामुळंच! नानासाहेबाना वसंतराव नाईकांनी काँग्रेसमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं अर्थात मंत्रीपदाचा शब्द तर पक्का! पण नानासाहेबानी विधानसभेत एकही आमदार नसलेल्या जनसंघातच राहणं स्वीकारलं. उभं आयुष्य एका विचाराची बांधिलकी शेवटच्या श्वासापर्यंत जोपासली. याचं विस्मरण होऊ नये. शेवटी एवढीच विनंती, तुम्ही हा रिजेक्टेड माल घेऊन जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणं अवघड होऊन बसेल. ज्यांना आपण घेतलं नाहीं तरी महायुतीची सत्ता येणारच आहे या विजयाचा निर्भेळ आनंद निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्त्यांना मिळू द्या. जनता त्रासली आहे. सत्ता मिळविण्यासाठी कुणाच्या कुबड्यांची मुळीच गरज नाही. सत्तेचा गोवर्धन जनता रूपी कृष्ण मताच्या करंगळीवर पेलून धरेल यावर विश्वास ठेवा. त्यासाठी या थकलेल्या गोपगोपीकांच्या मोडक्या काठ्याची काडी इतकी सुद्धा आवश्यकता नाहीं...!"
मोरूचा बाप विचारात पडला. मोऱ्याने पांघरूणात आणखीनच खोल तोंड खुपसलं अन् तो घोरू लागला.
हरीश केंची,
९४२२३१०६०९





No comments:

Post a Comment

मोरूचा बाप मोरूला म्हणाला.....!

सकाळ झाली, दिवस उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘‘मोऱ्या, लेका, घोरत काय पडलाहेस? आज मतदानाचा दिवस म्हणजे जणु दसराच. अर्थात श...