"गेल्या काही दिवसांतल्या राजकीय घडामोडी पाहिल्यानंतर मनात एक प्रश्न निर्माण झाला, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राला गरज आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दोन्ही गट. घड्याळ आणि तुतारी चिन्हाचा. आजच्या घडीची या दोन्ही पक्षांची अवस्था पाहिल्यानंतर वाटतं, की हे दोन्ही पक्ष नामशेष झाले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात काडीचाही फरक पडणार नाही. उलट त्यातून महाराष्ट्राचे झाले तर भलेच होईल...! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवीिना राहू शकत नाही हाे वास्तव आहे ते नाकारुन कसं चालेल?"
...........................................
*रा*ष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राला गरजच नाहीये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे इव्हेंट मँनेजमेंट कंपनी सारखं राजकारण करतात. रोहित पवार हे अजित पवार होवू पाहतायत. गावची कुचाळ टवाळ पोरं जशी टिंगल करत गंभीर विषयावरही निव्वळ दात काढत राहतात तसं जयंत पाटलांच सध्या चालूय. शशिकांत शिंदे यांना महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात उतरवलय पण अनुभव जत्रेतल्या कुस्तीचा आहे. तोफेसारखे बरसणा-या अमोल कोल्हेंची तोफ थंडावलीय. बाकी खडसे कंपनी धड धराचे ना भराचे. त्यांची बिडी पेटेना मग सीडी कधी वाजायची? बाकी सगळी मंडळी पवार साहेबांच्या गुणगाैरवाच्या तुता-या वाजवण्यातच धन्यता मानताहेत. या सगळ्या गाळात मात्र शरद पवारांच्या रथाचं चाक रुतलंय. त्यांची अवस्था आज शापित कर्णासारखी झालीय. हातात ब्रम्हास्त्र आहे पण ऐनवेळी त्या विद्येचे विस्मरण होतय. अजित दादांच्या राष्ट्रवादीला भाजपने हायजँक केलंय. भुजबळ, तटकरे, मुंडे आणि चहाटळ पटेल हे फडणवीसांचे पट्टे घातलेले साथी आहेत. ते वरती राष्ट्रवादीची पँट घालतात पण त्यांची आतली चड्डी मात्र फडणवीसांची आहे. सुनेत्रा पवार आणि त्यांची दोन मुलं यांना भाजप कधीच मुंडी वर करू देणार नाही. शरद पवारांची जिरवण्यासाठीच त्याचा वापर केला जाईल. राहूल गांधीला अडवण्यासाठी मेनका गांधीचा मुलगा जसा वापरला तसा जय आणि पार्थ यांचा वापर करतील. पवारांच्या घरातली त्यांची स्वत:चीच कट्यार पवारांच्या छातीत खुपसण्यासाठी जय आणि पार्थ 'कट्यार' म्हणून पोसले जातील. बाकी सुनेत्राताईंची कैकयी करायला फार वेळ लागणार नाही भाजपवाल्यांना. त्यामुळे राष्ट्रवादीचं उद्याच भवितव्य काय? हा यक्षप्रश्न आहे. शरद पवारांनी इथून पुढे उरलेल्या आयुष्यात सत्तेचं राजकारण सत्ता, सत्तेचे खेळ, पैसे, संस्था, कारखाने यात न रमता जाता जाता फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची पेरणी करणारी कुरी हातात धरावी. महाराष्ट्र पिंजून काढावा. असं केल तर त्याला भरघोस पिक येईल. औरंगजबासारखा माजलेला भाजप आणि त्याचे जातीयवादी दात मुळापासून उखाडता येतील. अफझुल्ल्याचा कोथळा काढणा-या, कृष्णा कुलकर्ण्याच मुंडकं उडवणा-या शिवरायांचा आणि अनाजीपंताला धडा शिकवणा-या छत्रपती संभाजी राजांचा हा महाराष्ट्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हा महाराष्ट्र धर्म हा त्याचा गाभा होता. शरद पवारांनी वेळोवेळी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं, की आपल्या पक्षाच्या नावामध्ये काँग्रेस आहे. आपली परंपरा काँग्रेसची आहे. स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची वृत्ती असलेल्या शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला दिल्लीच्या इशा-यावर काम करणं कठीण होतं. त्याला तत्कालीन कारणं आणि अनेक पदर होते. पण मूळ कारण पवारांची स्वतंत्र वृत्ती हेच होतं. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला होता. स्वतंत्र पक्ष काढताना त्यांनी काँग्रेसची विचारधारा प्रमाण मानली. धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारा, महाराष्ट्र धर्मासाठी काम करणारा प्रादेशिक पक्ष असंच त्याचं स्वरुप होतं. ज्या लोकांना काँग्रेसच्या समुद्रात निभाव लागणं कठीण वाटत होतं, त्यांना महाराष्ट्रव्यापी राष्ट्रवादी सोयीचा वाटत होता. या पक्षाचे नेते शरद पवार हे महाराष्ट्रातील प्रगतीशील प्रवाहाचे आधारस्तंभ राहिले. हा पक्ष भाजपविरोधात संघर्ष करत राहिला. धर्मवादी राजकारणाचा प्रतिवाद करत राहिला. महाराष्ट्र धर्मासाठी झगडत राहिला. ती महाराष्ट्राची गरज होती. आता त्या पक्षाच्या दोन्ही तुकड्यांनी आपली मूळ भूमिका टाकून दिलीय. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या दृष्टिने त्यांचा उपयोग संपलाय. त्यांचे औचित्य उरलेले नाही. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचे औचित्य उऱत नाही तेव्हा अशी गोष्ट टिकली काय किंवा नामशेष झाली काय त्याने कुणाला काहीच फरक पडत नाही.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या वर्षभरात राजकीय पक्षापेक्षा एखाद्या व्हाट्सअप ग्रूपचे स्वरूप आलंय. सुप्रिया सुळे यांच्यापासून जयंत पाटलांपर्यंत यच्चयावत सगळे नेते केवळ सोशल नेटवर्किंग करताना दिसताहेत. आपापल्या राजकीय गढ्या सुरक्षित ठेवण्यापलीकडे कुणी पाहात नाही. राजकारणात विरोधी पक्षात राहताना संघर्ष करायचा असतो हे सगळे विसरून गेलेत. त्याचमुळे अजितदादांच्या पक्षात विलिनीकरण करून सत्तेचे चारदोन तुकडे मिळतील, याची आस सगळ्यांना लागून राहिली होती. अजितदादांच्या जाण्यानंतर त्यांच्या पक्षातले नेते हिंग लावून विचारत नसताना ही मंडळी मात्र लाचारासारखी 'दादांची इच्छा होती!' असा राग आळवताना दिसतात. आता परिस्थिती बदललीय आणि बदलत्या परिस्थितीनुसार आपल्याला भूमिका बदलायला पाहिजे, याचा विचार कुणीच करताना दिसत नाही. एकटे शरद पवार अपवाद आहेत. अजितदादांचे अस्थिविसर्जन झाल्यानंतर शरद पवार बाहेर पडले. ते सत्तेच्या सोहळ्यासाठी नव्हे. लोकांच्या प्रश्नांसाठी. शरद पवारांचं राजकारणात सहा दशकं उभं राहण्याचं बलस्थान हेच आहे. हे त्यांच्या लेकीलाही उमजलेलं नाही आणि त्यांचा वारसा उगाळणा-या बाकीच्या मंडळींनाही. सुप्रिया सुळे यांना देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदींपर्यंत कुणाचेही कौतुकाचे पूल बांधताना संकोच वाटत नाही. आपण पक्षाच्या कार्याध्यक्ष आहोत आणि शऱद पवार यांच्या प्रकृतीच्या मर्यादा असताना आपल्यावर काहीएक जबाबदारी आहे, याचं काडीचं भान नाही. बारामती लोकसभेच्या पलीकडचा महाराष्ट्र आणि संसदेतल्या महिला मंडळापलीकडचं विश्व त्यांना दिसत नाही. संसदेच्या मंचावर त्यांची क्षमता अनेकदा दिसून आली आहे, परंतु ती महाराष्ट्राच्या राजकारणात वापरण्याची त्यांची इच्छाशक्ती दिसून आलेली नाही. एनजीओ सदृश्य राजकारण कुणाच्याच फायद्याचं नाही, हे त्यांच्या लक्षात येईल तो दिवस त्यांच्या पक्षासाठीचा सुदिन असेल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा. सुप्रिया सुळे या पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत. जयंत पाटील राज्यपातळीवरील सर्वोच्च नेते आहेत. शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून लढताना या पक्षाला मिळालेल्या दहापैकी आठ जागी विजय मिळाला. नवव्या शशिकांत शिंदे यांच्या जागेला तुतारीच्या दुस-या चिन्हामुळे फटका बसला. आणि दहावी जागा एकनाथ खडसेंच्या अवसानघातामुळे गेली. नाहीतर पक्षाचा स्ट्राइकरेट शंभर टक्के असता. शरद पवार यांची राजकीय ताकद दाखवणारा हा अखेरचा निकाल होता. विधानसभेला चित्र पालटलं. आणि पुन्हा शरद पवार यांचं राजकारण संपल्याची चर्चा सुरू झाली. नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांनी तर त्यावर शिक्कामोर्तब केलं. निवडणुकीतील यशापयश हे शरद पवार यांच्या मूल्यमापनाचं अत्यंत चुकीचं परिमाण आहे, हे एवढ्या वर्षांनंतर तरी लक्षात यायला पाहिजे. पण लक्षात येऊनही काहीजण मुद्दाम ते लक्षात घेत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादांच्या नेतृत्वाखालील पक्ष. आताच्या घडीला या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार आहेत. पीयूष गोय़ल यांच्याकडून एक खडा टाकून प्रफुल्ल पटेल यांनी चाचपणी करून बघितली. पण प्रकरण अंगलट येत असल्याचं लक्षात आल्यावर सारवासारव करावी लागली. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबत आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही. उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या दोन्ही भूमिकांमधून त्या पक्ष कसा चालवतील त्यावर पक्षाचे भवितव्य राहील. अजितदादांशी तुलना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण भविष्यात ममता बॅनर्जी, जयललिता, मायावती यांच्यासारख्या नेत्या बनतात की राबडीदेवी यांच्या मार्गाने जातात, हे पाहावे लागेल. आताच्या घडीला त्यांचा पक्ष भाजपच्या छत्रछायेखाली आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे त्यांच्या पक्षातले कारभारी शरीराने राष्ट्रवादीत अन् मनाने भाजपमध्ये आहेत. अजितदादांना सगळी कल्पना होती. आपल्या पक्षातले सोळा आमदार फुटून निघण्याच्या तयारीत असल्याचे कळाल्यावर अजितदादांनी पुढाकार घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांच्यावर विश्वास टाकून शरद पवार यांच्या पक्षाने आपले उमेदवारही जिल्हा परिषद निवडणुकीत घड्याळाच्या चिन्हावर उभे केले. यापेक्षा त्यासाठीचा अन्य कुठला पुरावा असू शकतो? म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाकडे जे काही उरले सुरले लढणारे ग्रामीण भागातले कार्यकर्ते होते, ते त्यांनी अजितदादांच्या पक्षात पाठवून दिलेत. आणि ज्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करायचे होते, ते अजितदादाही दुर्दैवानं सोडून गेले. अजितदादा भाजपसोबत सत्तेत असले तरी त्यांनी भूमिका सोडली नव्हती. विचारधारेतलं वेगळेपण त्यांनी टिकवून ठेवलं होतं. अजितदादा किंवा त्यांच्या पक्षाचा आमदार नागपूरच्या अधिवेशनाला गेल्यावर रेशीमबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात माथा टेकायला गेला नाही. हे नोंद करून ठेवायला हवं. अजितदादांचं नेतृत्व आणि त्यांच्या पक्षाची महाराष्ट्राला गरज होती, ती याच भूमिकेसाठी. नजिकच्या काळात भाजप विरोधात ते संघर्षासाठी उभे ठाकू शकले असते. महापालिका निवडणुकीत त्यांनी त्याची चुणूक दाखवली होती. त्यांच्या नेतृत्वाची आणि पक्षाचीही महाराष्ट्राला गरज होती. आता अजितदादा नाहीत. त्यांची भूमिकाही नाही. जी काही मंडळी आहेत ती इशारा होताच, नमस्ते सदा वत्सले..! साठी सज्ज आहेत. आता पक्षाची सूत्रे प्रफुल्ल पटेलांच्या हाती असणार आहेत. पर्यायाने त्याचा रिमोट अमित शाह यांच्या हाती असेल. असा पक्ष महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणासाठी भाजपपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकतो. कारण भाजप उघड भूमिका घेऊन चालतोय. पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे ही चौकडी भाजपच्या विचारांच्या विरोधात ब्र काढू शकणार नाहीत. अजितदादांचा पाठिंबा असल्यामुळेच अमोल मिटकरी, सूरज चव्हाण यांच्यासारखे प्रवक्ते भाजप, हिंदुत्ववादी राजकारणाविरोधात थेटपणे बोलत होते. आता त्यांना ती मुभा नसेल. पुरोगामी किंवा बहुजन बुरखा पांघरून भाजपची भूमिका पुढे नेण्याऱ्या पक्षाची महाराष्ट्राला गरज नाही. अर्थात हा पक्ष नेते, कार्यकर्ते यांच्यापुरता आणि निवडणुका लढवण्यापुरता राहील. तेवढंच त्याचं अस्तित्व असेल.
जयंत पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीचा ग्राफ २०१९ पर्यंत एका विशिष्ट गतीने उंचावत होता. परंतु तो २०१९ मध्ये जिथे होता, तिथेच थांबला. गेल्या सहा वर्षांत ते जिथल्या तिथं आहेत. या काळात त्यांचं एकही गंभीर भाषण ऐकिवात नाही. कितीही गंभीर विषय असला तरी त्यावर उपरोधाचं पाणी ओतून ते स्वतःचं हसं करून घेतात. पक्षातल्या वरिष्ठ नेत्यानं सगळ्यांना सोबत घ्यायचं असतं. पण गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत सगळीकडं त्यांना काड्या करण्यात, गटबाजी करण्यात अधिक रस असतो. एका टोळक्याच्या पलीकडं ते जात नाहीत. पक्षातल्या निष्क्रियांना संरक्षण देण्यात त्यांनी अलीकडच्या काळात आपली ताकद वापरली. पक्ष पुढं जाण्यासाठी विद्यार्थी, युवक आणि महिला या शाखा अत्यंत महत्त्वाच्या असतात. गेल्या दोन वर्षांत या तिन्ही शाखा मृतवत आहेत. जयंत पाटील यांच्या कृपाछत्राखालची मंडळी तिथं आहेत. त्यांना हलवलं तर जयंत पाटील दुखावतील म्हणून त्यांना धक्का लावला जात नाही. शरद पवारही जयंत पाटील यांच्या जणू उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले वाटतात. आणि जयंत पाटील त्याचा फायदा घेत राहतात.
महाराष्ट्राचं राजकारण महिलाकेंद्री बनलं असताना शरद पवारांच्या महिला शाखेइतकी निष्क्रिय आणि मृतवत शाखा देशात कुठं आढळणार नाही. महिलांसंदर्भात घेतलेल्या निर्णयांच्या बळावर ज्या शरद पवारांचं राजकारण उभं आहे, त्या पक्षाच्या महिला शाखेची ही अवस्था शोचनीय आहे. पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे असताना ही अवस्था असणं ही तर एखाद्या पक्षाची गुन्हेगारी स्वरुपाची हेळसांड म्हणावी लागेल. सगळ्या पातळीवरून हे मुद्दाम केलं जातंय, का असाही प्रश्न पडतो. अर्थात शरद पवारांना निवृत्तीचे आणि बाकीच्यांना सत्तेच्या उबेला जाण्याचे वेध लागले असताना हळुहळू पक्ष व्हेंटिलेटरवर नेण्याचे हे नियोजनपूर्वक प्रयत्न वाटतात. अजितदादा फुटून निघाल्यानंतर शरद पवारांनी सातत्याने सांगितलं की, मी तरुण नेतृत्व उभे करणार. पण रोहित पवार आणि रोहित पाटील या दोघांच्यापलीकडंही तरुण आहेत, हे त्यांना कुणी सांगितलेलं दिसत नाही.
शशिकांत शिंदे यांच्यासारख्या एका निष्ठावान आणि लढाऊ कार्यकर्त्याकडं पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद आहे. परंतु त्यांना काम करू दिलं जात नाही. जयंत पाटलांना दुखावायचं नाही. आणि रोहित पवारांना काही विचारायचं नाही. शिवाय जोडीला तीन-चार दिव्यांग शाखा. अशा परिस्थितीत एखाद्या नेत्याला कितीही वाटलं तरी तो कसा काय पक्ष चालवू शकेल? शशिकांत शिंदे यांचे हातपाय बांधून त्यांना शऱद पवारांनी धावण्याच्या शर्यतीत उतरवलंय. कठीण आहे एकूणच सगळं. गेले काही महिने विलिनीकरणाच्या पलीकडे आणखी एक चर्चा होत होती, ती म्हणजे, शरद पवारांच्या पक्षातले खासदार अजितदादांच्या पक्षात किंवा भाजपमध्ये जाऊ इच्छितात. शरद पवारांच्या खासदारांपैकी सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे सोडले तर सगळा आनंदी आनंद आहे. निलेश लंके, बाळ्यामामा म्हात्रे यांच्यासारखे लोक खासदार असले काय, ते शरद पवारांच्या पक्षात असले काय किंवा आणखी कुठे असले म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात काय फरक पडणार आहे? असले नग गोळा करून शरद पवारांना कुठली क्रांती घडवायची आहे? आणि असली मंडळी सोडून गेली म्हणून काय मोठं आभाळ कोसळणार आहे? खरेतर शरद पवार यांनी आता दावणीचा दोर सोडावा. जित्राबांना उधळायचं असेल तिकडं उधळू दे. जितेंद्र आव्हाडासारख्यांची अडचण करू नये. कुणाला घड्याळाच्या राष्ट्रवादीत जायचं असेल, कुणाला भाजपमध्ये जायचं असेल, कुणाला शिवसेनेत जायचं असेल त्यांना जाऊ दे. ज्यांना कुणाला भाजपशी संघर्ष करायचा असेल ते काँग्रेसमध्ये जातील. सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात जायचं असेल तर तेही जाऊदे.
No comments:
Post a Comment