"महापालिका निवडणूक निकालांनी महाराष्ट्रातली सारी राजकीय समीकरणे बदलली जातील अशी चिन्हे आहेत. शतप्रतिशतच्या दिशेने भाजपची वाटचाल सुरु झालीय. भाजपनं महाराष्ट्रातले लोकनेते शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांचे पक्ष, जनाधार खिळखिळा करून टाकलाय. नगरपालिका, नगरपरिषदा अन् आता महापालिका हाती आल्यात. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका होताहेत त्यानंतर भाजप आपला स्वबळाचा नारा अधिक टोकदार करील. पक्षाचे सर्वेसर्वा अमित शहा यांनी निर्धार केल्याप्रमाणे सत्तेसाठी घेतलेल्या कुबड्या फेकून देईल. सत्तासाथीदार अजित पवार, एकनाथ शिंदे यांना भाजप दूर करील. शक्तिशाली, बलाढ्य भाजपच्या विरोधात ठामपणे उभे ठाकलेले काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि इतरांना एकत्र यावंच लागेल. भाजपच्या अतिरेकी धार्मिक कट्टरतेनं एमआयएम पक्ष सरसावलाय. सोलापूर आणि इतर ठिकाणीही तो विरोधीपक्षाची भूमिका पार पाडू शकतोय!"
--------------------------------------------------
*आ*काशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् |
सर्व देव नमस्कार: केशवं प्रति गच्छति ||
ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते, त्याचप्रमाणे सर्व देवांना अर्पण केलेले नमस्कार हे श्रीकृष्ण चरणी पोहोचतात. तद्वतच कुणालाही दिलेली मतं ही भाजपला जाऊन मिळतात असं दिसतं. कारण विरोधक म्हणून निवडणूक लढवलेले नेते सत्तेच्या वळचणीला कधी जाऊन बसतात ते त्यांच्या मतदारांनाच काय त्यांनाही समजत नाही. महापालिका निवडणुकांचे लागलेले निकाल साऱ्यांनाच अचंबित करणारे आहेत. जसे विधानसभा निवडणुकीच्यावेळी म्हटलं गेलं होतं 'अनाकलनीय' अगदी तसंच वाटतंय. वृत्तपत्रात येणारी वाचकांची पत्रे, सोशल मीडियावर व्यक्त होणारे पोस्ट, युट्यूबर्स, ब्लॉगर्स यांचीे व्यक्त होणारी मतं पाहता भाजपला या निवडणुका जड जातील असं म्हटलं जात होतं, पण प्रत्यक्षात वेगळंच घडलंय. 'पाच वर्षं आपण साप दिसला की, तो काठीने ठेचून काढतो, पण नागपंचमी आली की, त्याची पूजा करतो...!' अगदी तसंच राजसत्तेच्या विरोधात वेगवेगळ्या व्यासपीठावरून व्यक्त होणारी मंडळी निवडणुका येताच राजसत्तेला शरण जातात अन् त्यांनाच ते मतं देतात. वर्षभर राजसत्तावर टीकेची झोड उठवणारे, महागाई- पाणी - गटार- रस्ते- आरोग्य- शिक्षण यांबाबत तक्रार करणारे मतदार निवडणुकीच्यावेळी सत्ताशरणागत झालेले दिसतात. महापालिका निवडणुकांत कोणता पक्ष कोणाबरोबर लढतोय अन् कोण कोणाविरुद्ध याचा पायपोसच उरलेला नव्हता, फोडाफोडीचं राजकारण एवढं पुढं गेलेलं. पक्षनिष्ठा, भूमिका, डावे-उजवे सारं काही धुळीला मिळालेलं. याचं मूळ मागच्या पाच वर्षांत भाजपने राज्यात केलेल्या राजकारणात दडलेलंय. आधी भाजपने शिवसेना फोडून शिंदेंना आपल्या गळाला लावलं नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार यांना आपल्या मांडीला मांडी लावून बसवलं त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, निवडणुकीत कार्यकर्त्यांनी तोच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून अधिकच खालची पातळी गाठलीय. फक्त निवडणुका जिंकण्यासाठीचं राजकारण सुरू होतं. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच्या निकालानंतर सत्तेसाठी याच्या पुढची पायरी गाठली जाऊ शकते. गळ्यात गळा घालून उभे राहणारे गळा कसा कापायचा, किती कापायचा, कुणाचा, कधी कापायचा याची खलबतं सुरू होतील. सत्तेसाठी घेतलेल्या कुबड्या फेकून देतील. गरज संपल्याने सत्तासाथीदार असलेले अजितदादा, एकनाथभाई यांना देवाभाऊ दूर करतील.
लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने हवालदिल झालेले भाजपनेते लगेचच सावरले. त्यांनी मग आक्रमक व्यूहरचना केली. सारी आयुधं परजली त्यातून विधानसभा जिंकली. त्यानंतर रखडलेल्या नगरपालिका जिंकल्या अन् आता महापालिकाही सहजगत्या खिशात टाकल्या. इजा... बीजा... अन् तिजा...! प्रधानमंत्री मोदी यांनी ज्याप्रकारे केंद्रातला कारभार चालवलाय अगदी तसाच कारभार फडणवीस यांनी आरंभलाय. साम, दाम, दंड, भेद या चाणक्यनीतीने गतकाळातल्या दिग्गजांचा, वर्तमानातल्या धुरंधरांचा, भविष्यातल्या उत्साही अन् उथळ प्रतिस्पर्धकांचा सफाया चालवलाय. इथं प्रबळ विरोधक समजले जाणारे शरद पवार, उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू, विरोधक असल्याचा आव आणत सत्तेच्या आश्रयाला असलेले अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुकीत उभा केलेला आव्हानाचा बागुलबुवा किती फुसका ठरलाय हे पाहून त्यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न आज निर्माण झालाय. भाजपच्या 'काँग्रेसमुक्त भारत' सारखं 'काँग्रेसमुक्त महाराष्ट्र' करण्याच्या निर्धारातून 'विपक्षमुक्त महाराष्ट्र' होईल का काय याची भीती वाटतेय. असं झालं तर 'लोकशाही'त 'एकाधिकारयुगा'चा आरंभ होईल. संघानं पाहिलेलं 'एकचालकानुवर्तीत साम्राज्या'चं स्वप्न साकार होईल! भाजपने आपणही अन्य कुठल्याही पक्षापेक्षा भीषण असू शकतो; असं सिद्ध करण्याची भूमिका घेतलेली दिसते. मात्र आपल्या या भीषण असण्याला त्यांनी 'बिभीषण' असं सोज्वळ पौराणिक संबोधन घेतलंय अन् वाटचाल आरंभलीय...! सारे विधिनिषेध गुंडाळून कसलीही पर्वा न करता सत्तेसाठी ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांनाच मांडीवर घेऊन सत्ता हस्तगत केली गेली. अशा नतद्रष्टाना मानमरातब दिल्यानं लोक मात्र हताश झालेत. निष्ठावान, मूल्याधिष्ठित राजकारण करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना दूर लोटलं जातंय. गुंड प्रवृत्तीच्या दंगेखोर कार्यकर्त्यांची रेलचेल सुरूय. सोज्वळ, सात्विक महाराष्ट्र काळ्याकुट्ट अंधारात चाचपडतोय. पूर्वी राजकारणात कटुता नव्हती. वाद होते, संघर्ष होते. पण द्वेष नव्हता. तो गेल्या दहा बारा वर्षांत खूप वाढलाय. आज जशी शहरं सुजलीत तशी राजकीय पक्ष सुजलेत. निष्ठेवर विष्ठा ठेवणाऱ्यांना मानाचं पान दिलं जातंय.
मुंबई आणि राज्य स्वबळासाठीचे प्रयत्न भाजपने सात वर्षापूर्वीच सुरू केले होते. जेव्हा त्यांनी शिवसेना फोडली. एकनाथ शिंदे यांना कधीही दूर करता येऊ शकेल, असा त्यांचा होरा होता. आता तशी परिस्थिती निर्माण झालीय. भाजपला अजित पवार यांची गरज कोणत्याच प्रकारे उरलेली नाही. भाजप नेते, कट्टर कार्यकर्ते, संघाचे स्वयंसेवक यांचा अजित पवारांना कायमच तीव्र विरोध राहिलेलाय. त्यांच्यात आणि भाजपच्या मतदारांमध्ये प्रचंड राग आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणूकीत भाजपला अजित पवारांनी मोठं आव्हान उभं केलं होतं. कधी नव्हे ते भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्यांनी एक जुनं प्रकरणही उकरुन काढलं होतं. त्यामुळं असं वातावरण निर्माण झालं होतं की, निकालात तोडीसतोड असं चित्र राहील. प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही. सत्तेसाठी भाजपला त्यांची कुठेच गरज उरलेली नाही. ते विरोधीपक्ष म्हणूनच तिथं राहतील. एकाअर्थाने अजितदादांची ताकद खूप खच्ची झालेलीय. त्यांचा प्रभाव जिथं आहे असं वाटतं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी आणि अगदी सोलापुरातही त्यांना फटका बसलेलाय. कुठेच त्यांची ताकद दिसत नाही. त्यामुळं या निवडणुकीतून अजितदादांचा आपल्या प्रभाव क्षेत्रातच अपयश येणं हे सत्तेतून दूर करण्यासाठी कारणीभूत ठरणारं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, लातूर आणि चंद्रपूर इथं काँग्रेसनं खूप मोठं यश मिळवलंय. काँग्रेसची राज्यात एकूण जी दुर्बळ अशी अस्वस्था आहे, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मिळालेलं यश हे लक्षणीय ठरतेय. इथं त्यांना स्थानिक गोष्टींचा फायदा झालाय. लातूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याबाबत जे उद्गार काढले त्याच्यामुळे काँग्रेसला फायदा झालाय. चंद्रपुरात मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात जे वाद होते त्याच्यामुळं तिथं फायदा झाला. असं असलं तरी तिथं विदर्भात काँग्रेसचं नेटवर्क आहे. कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. मतदारही आहेत. हे सारं एकत्र येणं महत्वाचं होतं आणि ते तसं घडलं. यातून काँग्रेसच्या नेत्यांनी धडा घ्यायला हवा. आणखी महत्वाचं हे की, एमआयएमला सोलापूर सह मुंबई, भिवंडी, मालेगाव, संभाजीनगर आणि इतर ठिकाणी जे यश मिळालंय तीही लक्षणीय बाब आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय.
मुंबईतलं भाजपला मिळालेल्या यशाचं विश्लेषण हे तात्कालिक किंवा कालपरवा घडलेल्या घडामोडीकडे पाहून त्यावर बोलता येणार नाही. मुंबईच्या या अपेक्षित निकालाची सुरुवात भाजपने पाचवर्षापूर्वी केली होती. जेव्हा त्यांनी शिवसेना फोडली. भाजपला मुंबई काही करून जिंकायचीच होती. ते त्यांच्यासाठी आवश्यकही होतं त्यासाठी त्यांनी शिवसेना फोडली नसती आणि आज जर ती शिवसेना एकसंघ असती तर आज जे मुंबई महापालिकेचे निकाल आले आहेत ते पाहिलं तर सारं काही लक्षांत येईल. नक्कीच शिवसेनेनं मुंबई जिंकली असती. मुंबईच नाही तर ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि संभाजीनगर इथं यश मिळवता आलं असतं. यात नेमकं घडलं काय तर मुंबईतला आपला प्रतिस्पर्धी शिवसेना आहे आणि त्याला कमकुवत केलं पाहिजे. हिंदुत्वाच्या एका म्यानात दोन तलवारी असू शकत नाहीत. यासाठी मग ठरवून त्यांनी ती खेळी केली. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाला एक्का एकनाथ शिंदे आणि शिंदेसेनेला सोबत घेतलं, त्यांना ताकद दिली, सत्ताही दिली. परंतु त्याचबरोबर आज मुंबई महापालिकेच्या निकालाचे तुम्ही जे आकडे बघताहात यात भाजपने हेही निश्चित केलंय की, शिंदेसेना फार कशी वाढणार नाही. त्यांची निवडून आलेल्यांची संख्या पाहिली तर ती उद्धव सेनेच्या खूप कमी आहे. त्यामुळं मुंबईत भविष्यात आपल्याला गरज आहे म्हणून एकनाथ शिंदे यांना बरोबर घेतलं, पण फार वाढू दिलं नाही. जेव्हा गरज नसेल तेव्हा त्यांना दूर करणं शक्य होईल अशी ती त्यांची तजवीज, योजना केलेली होती. मुंबईत भाजपच्या विरोधात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले. ते एकत्र आल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या की, आता काहीतरी बदल होईल. प्रसिद्धीमाध्यमांनी हे खूप उचलून धरलं, पण एका रात्रीत हे घडून येऊ शकत नाही. याची जाणीव दोघांनाही होती. दुसरं असं की, भाजपने गेल्या काही काळात उद्धव ठाकरेंची सेना दुर्बळ करून ठेवलीय. त्यांचे खासदार, आमदार, नगरसेवक, शाखाप्रमुख अशी मोठी तगडी फौज फोडून टाकल्याने खालची सारी यंत्रणा खिळखिळी झालेली आहे. पक्ष चालविणारे आर्थिकदृष्ट्या सक्षम नेते बाहेर गेल्यानं उद्धव सेनेची आर्थिक कोंडी झाली. त्यामुळं उद्धव सेनेला भावनेच्याच जोरावर निवडणुका लढवणं आवश्यक बनलं होतं. ते त्यांनी तसंच केलं. म्हणूनच त्यांनी फारशा सभा घेतल्या नाहीत. एकच सभा घेतली आणि शाखा शाखांना भेटी दिल्या. त्यानं वातावरण फिरल्यासारखं वाटलं. तीच मराठी अस्मितेची भावना त्यांच्या कामी आलेली आहे. त्याचा त्यांनी योग्य वापर केला. असं म्हणता येईल. आज उद्धव सेनेचे अनेक दोष सांगता येतील. ते मुंबई बाहेर का पडले नाहीत, बाहेर प्रचार का केला नाही. आधीपासून एकत्र का आले नाहीत, पण त्यांना जेवढं शक्य होतं त्यांनी ते केलं. मुंबई , ठाणे नाशिक इथं सभा घेतल्या. वातावरण निर्मिती केली. इथं एक लक्षांत घेतलं पाहिजे की, मराठी अस्मितेची भावना हीच त्यांच्या यशाच्या उपयोगाची होती. याचा त्यांनी मुंबईत पुरेपूर वापर केला आणि त्यांना आज जे काही यश मिळालंय ते पाहता त्याकडं दुर्लक्ष करता येणार नाही. भावनांचा वापर केला नसता तर त्यांना खूप कमी यश मिळालं असतं. पण 'मराठी माणसांवर अन्याय होतोय, भाजप त्याला चेपतोय!' अशी भावना तयार झाल्यानं मराठी माणूस आपल्या अस्मितेसाठी पुन्हा एकदा पेटून उठला. आणि आज जे यश दिसतं हे त्याचं फळ आहे. राजकीय विश्लेषकांनी ठाकरे बंधूंवर जी टीका केलीय ती रास्तच होती, पण ठाकरे बंधूंना आपल्या मर्यादा ठाऊक होत्या म्हणूनच त्यांनी तशी रणनीती आखली होती.
विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपला ही कळून चुकलं होतं की, पुढच्या काळात आपण एकहाती सत्ता आणू शकतो. आताच्या नगरपालिका, महापालिका निवडणुकीत मिळालेल्या यातून त्यांचा तो एकहाती सत्तेचा विश्वास अधिक दृढ झाला. २९ पैकी २५ महापालिकेत ते एकहाती सत्ता घेण्याच्या स्थितीत आलेत. एखाद दुसऱ्या ठिकाणी शिंदेसेनेची थोडीफार मदत लागू शकते. त्यामुळं यापुढच्या काळात भाजप अधिकाधिक स्वबळाकडे वाटचाल करताना दिसेल आणि आपल्या मित्रपक्षांना दूर करण्याचा प्रयत्न करील. त्यामुळं या पुढच्या काळातलं राजकारण हे भाजप विरुद्ध इतर सारे पक्ष असं होईल. जसं पूर्वी काँग्रेसविरुद्ध सारे पक्ष असायचं अगदी तसंच राहील. या नव्या राजकीय समीकरणात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची अवस्था खूप कठीण होऊन बसेल. सत्तेतही नाही अन् विरोधातही नाही अशी सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही अशी होईल. काँग्रेस, शिवसेना, समाजवादी, डावे हे आधीपासून भाजप विरोधात आहेत. पण अजितदादा, शिंदेसेना काय करतील हे महत्वाचं आहे. केंद्रात ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी आहेत त्याप्रमाणे राज्यात देवेंद्र फडणवीस कार्यरत आहेत. ते अत्यंत धूर्त, मुत्सद्दी, धुरंदर, चाणाक्ष, हुशार अशा सगळ्याप्रकारचे राजकारणी आहेत हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलंय. भाजपचे नेते कार्यकर्ते हे ३६५ दिवस आणि २४ तास राजकारण करत असतात. त्याप्रकारे फडणवीसही करत असतात. त्यांची कारभारावर पकड आहे. ते योग्य त्या गोष्टींचा, साधन सुविधांचा वापर करून घेऊ शकतात. विरोधकांमध्ये फूट पाडू शकतात. असं म्हटलं जातं की, तेच विरोधीपक्ष चालवतात. ते अनेकदा आपल्याला दिसलेलंय. ते भाजपचे उगवते तारे आहेत. त्यांच्याकडे प्रधानमंत्रिपदाचे दावेदार म्हणूनही पाहिलं जातं. पण भाजपच्या, फडणवीसांच्या रणनीतीचा, घेत असलेल्या कष्टांची, त्यांची विचारसरणी, कार्यक्रम पोहोचवण्याची त्यांची जी धडपड आहे त्याची आपण तारीफ करू पण त्यासाठी ते जे मार्ग अवलंबतात, वापरतात, गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात त्यांनी वापरल्या आहेत, ते अगदी धडधडीत डोळ्यासमोर अत्यंत वाईट अशा पद्धतीचे आहेत. अगदी वेगवेगळ्या शब्दात वाईट म्हणता येईल असे आहेत. पक्ष फोडणे असेल, निवडणूक आयोगाचा वापर करणं असेल, पैशांचा वापर असेल, गुंडांना पक्षांत घेणं असेल त्यांना पदं उमेदवारी देणं असेल किंवा समोरचा विरोधकांचा उमेदवार ज्यानं अर्ज दाखल केलाय अशांना फोडणे असेल असे अनेक प्रकार त्यांनी केलेत, हे जे त्यांनी मार्ग वापरलेत, त्यांची रणनीती वगैरे सारं ठीक आहे पण हे जे मार्ग वापरलेत लोकशाहीला घातक अशाप्रकारचे आहेत. खरं पाहिलं तर एवढा मोठा जनाधार असताना फडणवीसांना, त्यांच्या पक्षाला याची गरजच नाही. असे मार्ग त्यांना का वापरावे लागतात? आणि का ते पुन्हा पुन्हा वापरतात. हे समजत नाही. भाजपकडे मोदींसारखा प्रचंड अशा लोकप्रिय ब्रँड आहे, हिंदुत्वाची धगधगती विचारधारा आहे असं असताना पक्षाला यश मिळणं शक्य नाही का याचा विचार कधी होणार आहे की नाही?
असं म्हटलं जातं की मुंबईचा निकाल हा ठाकरेबंधूंचा जसा मानला पाहिजे तसाच तो इथल्या मराठी माणसाची नैतिक भूमिका घेण्याची जी शक्ती उफाळून आली आहे त्याची देखील आहे. नाहीतर भाजपच्या विरोधात जाण्याची त्यांना गरजच काय? ही जी उभी ठाकलेली मराठी जनता आहे, जिने ७०- ७२ जागा ठाकरेंना निवडून दिल्यात ती भाजपच्या आणि महायुतीच्या अनैतिक राजकारणाच्या विरोधात उभी राहू पाहणारी जनता आहे. जर अशाच पद्धतीने भाजपने राजकारण सुरू ठेवलं तर त्यांना राज्यभर अशा पद्धतीचा विरोध पहायला मिळेल तो विरोध कोण कधी संघटित करू शकेल हे काळ ठरवील आगामी काळात हे अधिक वाढेल असं वातावरण आहे. फोडाफोडी, आयाराम गयाराम, अशा अनैतिक राजकारणाला लोक आता कंटाळलेत. याचा कधीही उद्रेक होऊ शकतो. राजकीय कालचक्र अटळ असतं याची जाणीव साध्य होत नाही! त्यानं खचून जाण्याचं कारण नाही. केव्हा तरी उत्कलन बिंदू गाठला जातोच! 'त्यांच्या'कडून शिकण्यासारखं इतकंच असतं श्रद्धा आणि सबुरी...! स्वातंत्र्य पुर्व काळातले जसे संस्थानिक इंग्रजांपुढं हतबल होते, तेव्हा सामान्य माणसांनी हा लढा आपल्या हातात घेतला होता, आता मात्र विरोधी पक्षनेतेच 'विकासासाठी' सत्तेत सहभागी होतात तेव्हा सामान्य माणसासाठी ही परिवर्तनाची पुढाकाराची संधी असू शकते. सत्ता एवढाच ध्यास असेल तर इतकं खालच्या पातळीचं राजकारण करून सत्याला झाकून, भ्रष्ट नेते, भ्रष्टाचारी चाल, चलन आणि चरित्र असलेले पक्ष, हाताशी धरून धर्माचा, रामाचा वापर करून जनतेला मूर्ख बनवून, त्यांना मताच्या मोबदल्यात पैशाचं आमिष दाखवून, सरकारी पैशाने फुकट सवलती, पैसे वाटप करून त्यांनाही भ्रष्ट करून तत्कालीन समाधान मिळवू शकता. पण पुढच्या परिणामाची जबाबदारी कोण घेणार? सगळे सत्तेचे लाचार. पण आशा आहे सत्तेसाठी नव्हे तर तत्वासाठी निवडणूक हरली तरी ती स्वीकारण्याचे धारिष्ठ दाखवणाऱ्या पक्षाला सलाम करावा वाटतो. स्वच्छ चरित्र, संस्कृतीरक्षक, धर्मरक्षक असे अनेक बिरुदे लावून तुम्ही हीन पातळीचे राजकारण करणार असाल तर देशाचा वैचारिक धुरळा झालाच आहे. पण जनतेला रसातळाला नेण्याचे पाप तुम्हाला कधी ना कधी कुठल्यातरी शिक्षेने भोगावे लागेल. नियती वेळ घेते. नीतिमत्ता संयम राखते, असत्य नष्ट होते हा जगाचा इतिहास आहे. आज विरोधी पक्षांचा व्होट बेस आणि कॉन्फिडन्स हललाय...!
हरीश केंची,
९४२२३१०६०९.
No comments:
Post a Comment