"महाराष्ट्राच्या तेजस्वी कर्तृत्वाला आज जणू अवकळा आलीय. महाराष्ट्राची महानता मराठी माणूस मोडीत काढून जणू मोकळा झालाय. महाराष्ट्रात अलौकिक बुद्धिमत्तेची माणसं गेल्या पन्नास साठ वर्षात झालीच नाहीत असं म्हणता येणार नाही. पण सुमार बुद्धीच्या, सुमार कर्तृत्वाच्या माणसांनी महाराष्ट्राच्या पटावर कटीची स्थाने घेरून मांडलेल्या व्यूहाने माणसांच्या कर्तृत्वाचा गळा घोटलाय. महाराष्ट्र एकेकाळी नररत्नांची खाण असल्यासारखा होता आणि तो होता तेव्हाच तो भारताचा आधार होता. महाराष्ट्राचा आत्मा झोपी गेलाय की काय, अशी शंका येतेय. बुवाबाजीचं स्तोम वाढवून पुरोगामी महाराष्ट्र गायपट्ट्यात सामील झालाय. ज्ञानेश्वर, तुकाराम यांना सोडचिठ्ठी देऊन हनुमान चालीसाचं पठण करू लागलाय. आपला धर्म, भाषा, संस्कृती यांचा विसर पडणं हे समाजाच्या अधोगतीचं लक्षण असतं!"
............................................
*म*हाराष्ट्र आंधळा झाला आहे काय.....! असं वाटण्याजोगी परिस्थिती सध्या अनेक पातळ्यांवर पाहायला मिळतेय. महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अशा अनेक समाज सुधारकांचा हाच का महाराष्ट्र? अशी शंका येतेय. कारण सगळ्यांना सगळं दिसतंय, पण नको ते पाहाण्याची वृत्ती वाढत चाललीय. त्यामुळेच महात्मा फुले रडताहेत, बाबासाहेब रडताहेत, शाहू महाराज रडताहेत, विठ्ठल रामजी शिंदे रडताहेत, सारे समाज सुधारक रडताहेत मात्र त्यांच्या डोळ्यांतले अश्रू कुणालाही दिसत नाहीत. मुळात या महापुरुषांच्या प्रतिमांवरची धूळ पुसण्याची तसदीही कुणी घेत नाही. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांतले अश्रूही कुणाला दिसत नाहीत. पोलीस देशद्रोह्यांकडून मार खाताहेत. अब्रूवर घाला घातला जातोय. गंभीर घटना घडूनही मुख्यमंत्री फडणवीस यांना दिसत नाही, डोळ्यांवर कातडं ओढून घेतलंय, त्यामुळे त्यांना ते दिसण्याचा प्रश्न नाही. हा दोष फक्त डोळ्यांचा असू शकत नाही. राज्यकर्त्यांचा मेंदूच बधिर झाल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या दृष्टीवर झालाय, असं म्हणण्यास पुरेसा वाव आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून निष्क्रिय अन् हतबल आहेत, हे मान्य करता येईल. परंतु महाराष्ट्राचे अमिताभ बच्चन म्हणून मिरवणारे आणि सगळ्यांना सरळ करण्याची भाषा करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही अशा संवेदनशील प्रसंगात मौन पाळून आहेत. हे एवढ्यापुरतंच मर्यादित नाही. जादूटोणा प्रतिबंधक विधेयकाची अंमलबजावणी बाबतीतही फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे केवळ आश्वासनं देतात. पुरोगामी महाराष्ट्राला अंधश्रद्धेच्या खाईत लोटण्याचं पातक आपण करतोय, याचंही त्यांना भान नाही. सोयीस्कररीत्या डोळ्यांवर कातडं ओढलेल्या राज्यकर्त्यांप्रमाणेच या राज्यातली जनतासुद्धा त्यांच्याच वळणावर गेलीय. कारण विरोधी पक्षाचा पुरता वैचारिक शक्तिपात झालाय. परिणामी, महापुरुष रडत आहेत, ते कुणाला दिसत नाही. पण देवीच्या डोळ्यात आलेलं पाणी मात्र लोकांना दिसत आहे, आणि ते पाहून पुरोगामी महाराष्ट्राच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागलेत. देवी-देवतांच्या डोळ्यांतून येणारे अश्रू महाराष्ट्राला नवीन नाहीत. ज्या राज्यात गणपती दूध पितो, तिथे कुठल्याही 'जागृत' देवतेच्या डोळ्यातून पाणी येणारच. मग कधी साईबाबांच्या फोटोतून कुंकू पडायला लागतं किंवा आणखी अशा काही भाकड गोष्टी घडताहेत आणि मात्र सगळी खुळ्यांची जत्रा त्यामागे धावायला लागतेय.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. सातशे वर्षांची संत परंपरा आहे. पण तुकडोजी महाराजानंतर ती संपली. आज संत म्हणण्याच्या लायकीचा एकही अध्यात्मिक पुरुष नसला तरी बुवा, बाबा, स्वामी, परमपूज्य, महाराज यांची संख्या दिवसागणिक वाढतेय. त्यांच्याही देवस्थानचे अड्डे थाटात उभे राहत आहेत. अध्यात्म, सत्संग याला धंद्याचं स्वरूप आलंय. सत्संगासाठी हे बुवा, बाबा, महाराज लाखो रुपयांच्या सुपाऱ्या घेताहेत. ह्या सुपाऱ्यांबरोबरच सत्संगासाठीच्या मंडपाला, लाऊडस्पीकरला, प्रसिद्धीला त्याहून अधिक पैसा खर्च केला जातो. तो काही या महाराज, बुवा, बाबांच्या खिशातला नसतो. तो कुठून आणला जातो? कोण देतो? याची विचारपूस महाराज बुवा बाबा करतात का? मिळालेल्या पैशाचा हिशेब कधी कुणाला देतात का? कुमार्गातले दोन नंबरचे धंदे करणारे आणि लबाड राजकारणी यांचा हा पैसा असतो. त्यांच्या दातृत्वाची किंमत त्यांच्या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करून मोजावी लागते. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पण सत्संगाचे मोठमोठाले सोहळे भरवून आपल्या भक्तीचं आणि भक्तांच्या सांघिक शक्तीचं दर्शन घडविण्याची संधी हे बुवा, बाबा, महाराज सोडत नाहीत. माणसात देव आहे म्हणायचं आणि त्यालाच आपला मोठेपणा मिरवण्यासाठी झुकवायचं, वापरायचं हा कसला सत्संग? महाराष्ट्रातल्या संतांनी आखून दिलेला आध्यात्मिक मार्ग हा सन्मानानं जीवनप्रवास करण्याचं बळ देणारा आहे. या प्रवासातील देवांच्या दलालांची आणि धर्माच्या 'हवाला'दारांची गरजच काय?
सत्संगाचे मोठमोठाले सोहळे भरवून प्रसिद्धीमाध्यमे जाहिरातीच्या आमिषानं अशा बाबांच्या, बुवांच्या, महाराजांच्या सोहळ्याची रसभरीत वर्णन प्रसिद्ध करत असतात. दूरचित्रवाणी वाहिन्या त्यांच्या या सत्संगाचं नियमित रतीब घालत असतात त्यानं ही भोळी भाबडी माणसं आणि आपल्या कृष्णकृत्यानं आत्मभान हरवलेली मंडळी अशा महाराज, बाबा, बुवांच्या चरणी लीन होतात. कुरूप विचारांचा भोंदूपणा, सगळ्या नैतिकतेचंच चाक रुतवून टाकतो. हे महाराष्ट्र आज अनुभवतोय. याचा लाभ लबाड राजकारणी मंडळींनी घेतला ज्यांना आपल्या राजकारणासाठी ही मंडळी लाभदायक होती. त्यांना व्होटबँक ओळखता येते. म्हणूनच तर ते राजकारणी असतात. त्यांनी असे आश्रम उभे राहू दिले, त्यांचा उत्कर्ष होऊ दिला, त्यांची संख्या वाढू दिली. त्यांनी मोकळं रान दिलं. त्यांना सर्व प्रकारचं पाठबळ देऊन हक्काची मतपेढी बाबांच्या माध्यमातून निर्माण केली. कालचे विरोधक हे आजचे सत्ताधारी बनलेत ते अशाच बाबांच्या सहाय्यानं त्यामुळे शपथविधी सोहळ्याला त्यांना सन्मानानं उच्चासनावर बसवलं गेलं. हे विशेष! सध्या अध्यात्माच्या नावाने जे काही प्रकार सुरू आहेत ते पाहता समाजसुधारकांनी, संतांनी केलेले प्रबोधन लुप्त झालंय की काय अन् इथल्या माणसांनी हा सारा संस्कार पुसून टाकला की काय? असं वाटावं अशी स्थिती आहे. अध्यात्माची जी नवी आवृत्ती बुवा, बाबांच्या रूपानं अवतरलीय. तिला जो उदंड प्रतिसाद लाभतोय, ती पाहता या मंडळींनी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथासारखे धार्मिक ग्रंथ पचवून जोरदार ढेकर दिलेली दिसते. कालपर्यंत खेडूत, ग्रामीण, अशिक्षित, गरीब वर्गाच्या श्रद्धांना, विधींना, पुजांना, परंपरांना 'अंधश्रद्ध' म्हणणारा शहरी सुशिक्षित, सुस्थिर पांढरपेशा, मध्यमवर्ग अशा विचारांची, विवेकाची कास सोडून बाजू बदलू पाहतोय अन् सत्संगाना नि प्रवचनांना उपस्थिती लावू पाहतोय. या वर्गाने कालपर्यंत मागासलेले अंधश्रद्ध असं ज्यांचं वर्णन केलं होतं, त्यांच्या मांडीला मांडी लावून सश्रद्ध बनलेत. त्यामुळेच सत्संगाना हजेरी लावणं, आस्था, संस्कार, जागरण, साधना यासारख्या धार्मिक, आध्यात्मिक चॅनल्सवरचं प्रवचन ऐकणं, त्यांच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या वादात 'भक्त' या नात्यानं सामील होणं असे कारनामे हा वर्ग करू लागलाय. शिक्षणाचा, शहाणपणाचा, योग्य-अयोग्य ठरविण्याचा मक्ता आपल्याकडं आहे, असं मानणारा हा वर्ग पाहता पाहता नवाध्यात्मिक लाटेत सामील झालाय. हे चिंताजनक आहे. तिकडे जातीची उतरंड होती इकडे संतांच्या शिकवणीनं, पुरोगामी विचारधारेच्या प्रसारानं ती फारशी नाही. पण यातलं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे.
अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ २० व्या शतकात सुरु झालेलीय. महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ती सुरु केली. त्यांना वाट पुसत अनिल अवचट यांनी ‘संभ्रम’ हे पुस्तक लिहीलं. या पुस्तकाला मे. पुं. रेगे यांची प्रस्तावना आहे. हे पुस्तक १९७९ साली प्रकाशित झालं. या पुस्तकाची पाचवी आवृत्ती २०११ साली काढण्यात आली. ‘संभ्रम’ हे बुवाबाजी, अंधश्रध्दा, अनिष्ट चालीरीती या सामाजिक रोगाचे चित्रण करणारं बोलकं पुस्तक आहे. यात रजनीश, रमामाता, न्यायरत्न विनोद, सदानंद महाराज यांच्या प्रभावाचे प्रत्यक्ष दर्शन घडवलंय. मीरा दातारचा दर्गा, समर्थांच्या पादुकांचा आगमन सोहळा, शिर्डीच्या साईबाबांचा रामनवमी उत्सव, काळुबाईची जत्रा, वारकरी संमेलन यांसारख्या अंधश्रध्दांच्या केंद्रावरचं वातावरण डाक्यूमेंटरी पध्दतीने घडवलंय. जैन समाजात अल्पवयीन मुलींनाही संन्यासदीक्षा दिली जाते. यलम्माला अल्पवयीन मुली सर्रास सोडल्या जातात. या अंधश्रध्दांच्या बळींचाही वेध घेतलाय.
मात्र महाराष्ट्रावर त्याचा काहीही प्रभाव पडलेला नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्री, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष अशा बुवांचे भक्त आहेत. ही बाब आपल्याला लाजीरवाणी आहे असं मतदारांनाही वाटत नाही. तिथे बाकीच्या हिंदूंची काय कथा? आपल्या वर्तणुकीत म्हणजेच धारणा आणि व्यवहार यामध्ये सकारात्मक बदल करणं, अंधश्रद्धांना नकार देणं, त्यामुळे होणार्या शोषणाचा धिक्कार करणं हे हिंदूंना पसंत नाही. हम नहीं बदलेंगे हा हिंदूंचा निर्धार आहे. त्यामुळे पिढ्यानपिढ्या मुसलमानांचा द्वेष करणं ही बाब हिंदूंमध्ये रुजलीय. सुबत्ता आल्यानंतर ती अधिक तेजतर्रार झालीय. सोशल मिडियामुळे मूर्खांना कळलं की, आपली मेजॉरिटी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू जनमानस अचूक ओळखलं होतं. त्यामुळे तथाकथित पुरोगामी महाराष्ट्र गायपट्ट्यात सामील झाला. ज्ञानेश्वर, तुकाराम यांना सोडचिठ्ठी देऊन हनुमान चालीसाचं पठण करू लागला. आपला धर्म, आपली भाषा आणि आपली संस्कृती यांचा विसर पडणं हे समाजाच्या अधोगतीचं लक्षण असतं. काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या मराठा सरदारांनी भाजपचे पाय धुवायला सुरुवात केली. त्यामुळे हा पक्ष शिव-फुले-शाहू-आंबेडकरवादी ठरणार नाही. मतदार सोलापूरचे, बारामतीचे असोत की सातार्याचे किंवा नगरचे. त्यांचं नातं सत्तेशी आहे. विचारांशी नाही.
सामान्य बुद्धीची वा गुणांची माणसं प्रतिष्ठेला चढून जर ज्ञानाचा किंवा शहाणपणाचा भलताच आव इथं आणू लागली तर महाराष्ट्र त्याचे वाभाडे काढतो, त्याची भंबेरी उडवतो नी त्यांना साफ भिरकावून देतो. कुणाचे भलते नखरे महाराष्ट्र कधीच चालू देत नाही. विनाकारण कुणाचे फाजील लाड महाराष्ट्र कधीच करत नाही. सोंगाचा नि ढोंगाचा तर महाराष्ट्र कट्टर दुष्मन आहे. मंबाजी-तुंबाजी किंवा सालोमालो यांची या महाराष्ट्रात कधीच डाळ शिजणार नाही. प्रत्येक गोष्टीवर कठोर तर्काचा नि प्रखर वास्तवतेचा शोधक प्रकाश टाकवयाचा हा मुळी महाराष्ट्राचा स्वभावधर्मच होता, तो आता नष्ट झालाय की, काय अशी शंका येतेय. लपवाछपवी मराठी माणसाजवळ नाही. जे मनांत येईल ते स्वच्छ तसेच्या तसे सांगून टाकायचे. मग ऐकणाऱ्याला काय वाटेल किंवा त्याचे काय दुखेल याची मराठी माणसं पर्वा करत नाहीत. असं वातावरण महाराष्ट्रात होतं, पण गेल्या काही वर्षापासून त्याला गळती लागलीय अन् गायपट्ट्यातली रूढीचुस्तता, अंधश्रद्धा, लाळघोटेपणा वाढीला लागलाय. सत्य, स्वातंत्र्य, आणि क्रांती या उत्त्युच्च मानवी मूल्यांचा हव्यास जीवनात निर्माण करणारी 'अलौकिक बुद्धी' हा महाराष्ट्राचा खरा प्राण होता. हा महाराष्ट्राचा आत्मा निस्तेज होत चालला आहे. आणि तो तसाच निस्तेज होत होत नष्ट होईल की काय, असं भय, भीती वाटू लागलीय. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आजकाल इतक्या क्षुद्र माणसांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे आणि इतक्या सामान्य गुणांचा उदो उदो होऊ लागलाय, की केवळ असामान्यांची आणि अलौकिकांची पूजा करणाऱ्या ह्या महाराष्ट्राचा आत्मा त्यांच्या शरीरात झोपी गेला आहे काय, अशी शंका येतेय....!
हरीश केंची,
९४२२३१०६०९