Sunday, 18 October 2026

दसरा : मानवी मनाचं सीमोल्लंघन!

"दसरा हा विजयाचा सण असल्याने षडरिपूंवर विजय हे आपले ध्येय असायला हवे. सकारात्मकतेचे, सामर्थ्याचे, मैत्रीचे सोने वाटणे हाच खरा दसरा असायला हवा. आजच्या भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या तरुण पिढीवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आपलीच आहे. सण म्हणजे ‘धम्माल’ हे खरे असले तरी त्याचे रूपांतर धांगडधिंगा आणि उन्मादात होऊ नये. हा संयम आणि विवेक पुढील पिढीत रुजवणे ही काळाची गरज आहे. हा मुहूर्त साधून नागपूरच्या चैत्यभूमीवर आंबेडकरी जनतेचा, मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांचा, भगवान गडावर भक्तांचा, नारायण गडावर मराठा बांधवांचा मेळावा भरतो आणि विचारांचं सीमोल्लंघन केलं जातं!"
........................................
दसरा-दिवाळीची चाहूल हीच मुळात ऊर्जादायक असते पण ती केव्हा? बदललेला ऋतू याची हळुवारपणे जाणीव करून देतो तेव्हा... सोन पावलांनी येणारा आश्विन महिना येतानाच भक्ती आणि शक्तीचा संदेश घेऊन येतो. आश्विनातले लख्ख केशरी ऊन, मोकळी हवा, निरभ्र आकाश, टिपूर चांदणे, पिवळ्या-नारिंगी झेंडूंनी रंगलेला निसर्ग... सगळंच कसं मेंदूला चेतवणारं असतं. आश्विनाच्या हवेतच ऊर्जा असते. नऊ दिवस केलेली जगदंबेची उपासना आणि दहाव्या दिवशीचा दसरा... हे सगळेच दिवस चैतन्याने रसरसलेले असतात. त्यात मनुष्यप्राणी हा उत्सवप्रिय आहे. भारतीय संस्कृतीत अत्यंत कल्पकतेने, योजकतेने या सण-उत्सवांची रचना केलीय. प्रत्येक सणामागे एक निश्चित विचारांची बैठक आढळून येते आणि त्याच वेळी येणाऱ्या ऋतूचे स्वागत केलं जातं आणि सोबतच आरोग्याचा एखादा नियमही जोडला जातो. जीवनप्रणाली, विचारप्रणाली आणि उपासनाप्रणाली या तिन्हींचे उन्नयन या सणामुळे व्हावं हे अपेक्षित असतं.
शुष्क उपदेश सांगितलं असतं, तर ते टाळण्याकडेच माणसाची प्रवृत्ती असते पण सणावारांच्या माध्यमातून अन् प्रतिकांचा उपयोग करून ही संस्कृती आपल्या जीवनात रुजवली गेलीय. सण, उत्सवांद्वारे मन प्रसन्न होतं, कौटुंबिक संबंध दृढ होतात, सामाजिक जाणिवा व्यापक होतात, तर प्रतिकांद्वारे बुद्धीचा विकास होतो. भारताचा सांस्कृतिक इतिहास हा पुस्तकांच्या पानात नाही, तर त्याच्या जिवंत उत्सवात लिहिलाय. त्यामुळे प्रत्येक सणाचे ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक आणि शास्त्रीय महात्म्य आपल्याला माहीत असायला पाहिजे. कारण सणांचा संबंध देहाच्या अन् मनाच्या आरोग्याशी तर आहेच पण आत्मीक समाधानाशीही आहे. मानवी जीवन कौटुंबिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक समृद्ध करायचे असेल तर सण-उत्सवामागचा दृष्टिकोन लक्षात घ्यायला हवा. काळ आणि परिस्थितीनुसार कालबाह्य, निरुपयोगी प्रथा मोडीत काढून सणांमागचे तत्त्व आणि विज्ञान शाबूत ठेवणं  गरजेचे आहे.
या दृष्टीने दसऱ्याचा सण म्हणजे विजयाचा उत्सव आहे. या सणासंबंधी अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराजय करण्यासाठी लंकेवर स्वारी केली आणि आश्विन महिन्यातल्या दशमीला रावणाला ठार मारले म्हणून या दिवसाला विजयादशमी म्हणतात. दुसरी कथा महिषासुरमर्दिनी देवीची आहे पृथ्वीवरील जनतेचा छळ करणाऱ्या महिषासुराचा नि:पात करण्यासाठी देवाने अष्टभूजा देवीचे रूप धारण करून, दहा दिवस युद्ध करून वध केला म्हणूनही या दशमीला विजयादशमी म्हणतात. म्हैसूरला याच देवीला चामुंडेश्वरी या नावाने संबोधतात. रघुराजाने विश्वजीत यज्ञ केल्यामुळे त्याचा खजिना रिकामा झाला होता. अशात चौदा विद्या पारंगत असलेला कौत्स त्याच्याकडे दान मागायला आला. याचकाला विन्मुख पाठवणे ही रघुराजाची संस्कृती नव्हती. म्हणून द्रव्य संग्रहासाठी त्याने इंद्रावर स्वारी केली. रघुराजाच्या अचाट पराक्रमाची कल्पना असल्यामुळे इंद्राने युद्धाचे कारण जाणून घेतले आणि कुबेराला रात्री शमी आणि आपट्याच्या वृक्षांवर सुवर्णमोहरांचा वर्षाव करण्याची आज्ञा दिली. रघुराजांनी कौत्साला या संपत्तीचे दान दिले. आवश्यकतेपेक्षा एकही सुवर्णमोहोर जास्त घेणार नाही, हा कौत्साचा निश्चय होता, तर या द्रव्याने मी माझी तिजोरी भरणार नाही, हा रघुराजाचा आग्रह होता. शेवटी हे सोने लुटून घेण्याचा आदेश त्याने जनतेला दिला. लोकांनी त्या झाडाची पूजा करून ते सोने लुटून घरी आणले, तो दिवस होता आश्विन शुद्ध दशमीचा. तेव्हापासून या झाडाची पाने सोने म्हणून लुटण्याचा प्रघात आहे.
पांडवांनी देखील अज्ञातवासात असताना आपली अस्त्रे-शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली होती. इतिहासाचा मागोवा घेतल्यास विजयादशमीचा मुहूर्त स्वारी करण्यासाठी, मोहीम सुरू करण्यासाठी फार महत्त्वाचा होता, हे दिसून येते. शिवाजी महाराज, पेशवे याच मुहूर्तावर कूच करत असत अशी इतिहासात नोंद आहे. हा सण साजरा करत असताना सीमोल्लंघन करण्याची पद्धत आहे. ईशान्य दिशेला असलेल्या शमी किंवा आपट्याच्या वृक्षाची पूजा करताना,
शमी शमयते पापम्, शमी लोहित कंटका |
धारिण्य अर्जुनं बाणानाम् , रामस्य प्रिय वादिनी |
तसेच, 
अश्वंतक महावृक्ष, महादोष निवारणम् |
इष्टानां दर्शनम् देहि, कुरु शत्रुविनाशनम् |
अशी प्रार्थना म्हणून नंतर शमी तसेच आपट्याची पाने आणायची असतात. ही पाने म्हणजे सुवर्ण मोहरांचे प्रतीक आहे. ही पाने आपण देवाला वाहतो, वडीलधा वऱ्या, मित्रांना देतो. मला हे जे वैभव मिळाले आहे, त्याचा उपभोग मी एकटा घेणार नाही तर सगळ्यांना वाटून या आनंदाचा गुणाकार करायचा, ही कल्पनाच किती उदात्त आहे. मित्रांबरोबर शत्रूशीही प्रेमाचे नाते जोडायचे हा दसऱ्याचा संदेश आहे. या दिवशी शस्त्र लेखणी, वाहनांची पूजा करतात. म्हणजे आपली शक्ती वाढवणाऱ्या साधनांचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्याची ही कल्पना किती अभिनव आहे... या दिवशी रावणाचे दहन करतात. याद्वारे मनातली दुष्ट वृत्ती नष्ट होऊन रामप्रवृत्तीचा उदय होण्याची प्रेरणा मिळणे अपेक्षित आहे. या सगळ्या पद्धती प्रतीकात्मक आहेत. पौराणिक कथा कपोलकल्पीत असतीलही, पण लहानपणी अशा कथांवर विश्वास बसतो आणि त्यातून मिळणारा संदेश संस्काररूपात नकळत खोलवर रुजत जातो. हे बालवयात झालेले संस्कार मनाला संयमी आणि विवेकी करतात आणि पुढील आयुष्यात सण साजरे करताना कधी वावगे वागू देत नाहीत.

दसरा म्हणजेच विजयादशमीचा उत्सव आहे.याच दिवशी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवलेला होता. त्याचं प्रतिक म्हणून नवरात्रोत्सव पर्वात ठिकठिकाणी रामलीला सादर केली जाते. तसेच दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करून रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा केला जातो. आज लंकापती रावण नसला तरी भ्रष्टाचार, अत्याचार, दहशतवाद, गुन्हेगारी, महागाई, दुष्काळ, दारिद्य्र, रोगराई, कुपोषण आणि अंधश्रद्धा ही दहा तोंडे असलेला समस्यारूपी रावण आजही जिवंत आहे. हा रावण आजही कित्येकांचे बळी घेत आहे. लंकानरेश रावणाला श्रीरामांनी यमसदनी धाडून त्यावर विजय मिळवलेला होता. आजच्या काळात प्रभू रामचंद्रांची भूमिका कोणी एकटा बजावू शकणार नाही. त्यासाठी एकजूटच हवी. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे.सर्वत्र गावाची वेस ओलांडून आई भवानीचा उदो उदो करत विजयादशमी साजरी केली जाते.याच दिवशी भवानीमातेने महिषासुराचा वध केला होता.याच दिवशी पांडवांनी त्यांची शस्त्रे शमीच्या झाडावरून उतरवली होती.त्यामुळे दसऱ्याला शस्त्रपूजनही करतात.इतकच नव्हे तर इतर साहित्याच,वाहनांच अथवा वास्तुंच पूजन केल जात.दसऱ्याला आपट्याची पाने सोनं म्हणून वाटण्याची प्रथा आहे.आपट्याच्या पानांनाही दसऱ्याच्या दिवशी सोन्याइतक महत्व असतं.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दसऱ्याला सर्वत्र विजयोत्सव साजरा केला जातो. दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची प्रथा खूप प्राचीन आहे. ती आजही टिकून आहे आणि सदैव राहील, पण सीमोल्लंघन म्हणजे काय? कधी केलाय विचार? सीमांच उल्लंघन म्हणजे सीमोल्लंघन. संस्कृती आणि प्रथा-परंपरा म्हणून या दिवशी गावाची सीमा ओलांडली जाते. ही परंपरा जपणं आपलं काम आहे, पण दसऱ्याच्या दिवशी खरच आपल्या एखाद्या सीमेच उल्लंघन केलं तर? ज्याप्रमाणे रामाने रावणावर विजय मिळवला त्याप्रमाणे आपण आपल्यातील एका दुर्गुणावर विजय मिळवला तर? पांडवांनी जशी दसऱ्याला आपली शस्त्रे शमीच्या झाडावरून उतरवली तसेच आपण आपली कला अथवा सद्गुणरुपी शस्त्र जे व्यापामुळे बाजूला पडले आहे ते पुन्हा उपयोगात आणले तर? किंवा ते उपयोगात असल्यास त्याला अधिक धार लावली तर? सीमोल्लंघनाचा खरा अर्थ असा आहे.
प्रत्येकाला आपल्या सीमा-मर्यादा माहिती असतात. उदाहरण घ्यायचे झाल्यास साधारणतः सर्वचजण उजव्या हाताने लिखाण करतात. अगदी कमी लोक डाव्या हाताचा वापर लिखाणासाठी करतात. दोन्ही हातांनी लिखाण करू शकणारे या जगात किती लोक असतील? लाखात एक? किंवा कोटीत एक म्हणा. आपण हे का आत्मसात नाही करू शकत? काही कारणाने जर उजवा हात निकामी झाला तर डाव्या हाताचा वापर करून लिखाण किंवा कामे करता येतील. आता असे दुर्दैव प्रत्येकाच्या वात्यालायेत नाहीच हेही सत्य आहे. तरीही आपली एक मजबूत बाजू म्हणून त्याचा आपल्याला नक्कीच आयुष्यभर फायदा होईल. त्याचप्रमाणे एखाद्याला लागलेले व्यसन सुटत नसेल तर त्या मर्यादेच उल्लंघन त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर करायला हरकत नाही. एखाद्याला स्टेजवर जाऊन बोलता येत नसेल तर या भीतीवर मात करता येईल. एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विषय अवघड वाटत असेल तर त्याचा अभ्यास करून तो सोपा करता येईल. इतर एखादा अवगुण असल्यास तो या मुहूर्तावर दूर करता येईल. असे सीमोल्लंघन करण्याचा संकल्प प्रत्येकाने केल्यास प्रत्येकाचाच उत्कर्ष होईल आणि प्रत्येकाला यश, विजय मिळेल. आमच्याबद्दल सांगायचे झाल्यास आम्ही डाव्या हाताने लिखाण करण्याची कला आत्मसात करण्याचा संकल्प केला आहे.
आश्विन महिना म्हणजे शरद ऋतू. आयुर्वेदानुसार या काळात शरीरातील पित्त प्रभावी असते. पित्त म्हणजे बुद्धी, साहस, पराक्रम. अशा वेळी प्रत्येकानेच एका चौकटीत बंदिस्त न राहता सीमोल्लंघन करावे, अशी अपेक्षा आहे. महिषासूरमर्दिनीचा पराक्रम, रामाने रावणावर केलेली मात, रघुराजाचे दातृत्व, परधनाबद्दल विरक्ती, कौत्साची निर्मोही वृत्ती... यातून आपण योग्य तो बोध घेतला पाहिजे. आजच्या युगात वैचारिक सीमोल्लंघन आणि त्यानुसार केलेली कृती अपेक्षित आहे. या सणातला उत्साह, उल्हास, आनंद, प्रेम हे जीवनाचे प्रेयस आहे, तर वैचारिक सीमोल्लंघन हे आत्मशक्ती, संघटनशक्ती, अन्याय निवारण यासाठी पोषक ठरणारे म्हणजेच या सणातील श्रेयस आहे. उत्सव साजरा करताना श्रेयस आणि प्रेयसाचा योग्य समन्वय हवा. दसरा हा विजयाचा सण असल्याने षडरिपूंवर विजय हे आपले ध्येय असायला हवे. सकारात्मकतेचे सामर्थ्याचे, मैत्रीचे, परस्पर सामंजस्याचे सोने वाटणे हाच खरा दसरा असायला हवा. आजच्या भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या तरुण पिढीवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आपलीच आहे. सण म्हणजे ‘धम्माल’, ‘मज्जामस्ती’ हे नक्कीच खरे आहे पण त्याचे रूपांतर ‘धांगडधिंगा’ आणि ‘उन्मादात’ होऊ नये. हा संयम आणि विवेक पुढील पिढीत रुजवणे ही काळाची गरज आहे. ‘आला आश्विन आश्विन, जाती सीमा उल्लंघून, लुटा समतेचं सोनं, गात मानव्याचं गाणं’, असा समानतेचा, वैचारिक उन्नतीचा, परस्पर सौहार्दाचा दसरा साजरा करू या
नुसतं गावाची सीमा ओलांडून किंवा रावणाचे पुतळे जाळून परिस्थिती बदलणार नाही. सगळ सुजलाम्-सुफलाम व्हावं, आपल जीवन भयमुक्त, सुखी, आनंदी आणि समाधानी व्हावं अस सगळ्यानांच वाटत.हे व्हायचं असेल तर देशातलं सरकार बदलून उपयोगाच नाही.सरकार फक्त सुविधा पुरवत असत. भ्रष्टाचार, अत्याचार, दहशतवाद, गुन्हेगारी, महागाई, दुष्काळ, दारिद्य्र, रोगराई, कुपोषण आणि अंधश्रद्धा हे सगळ जर समाजातून मुळासकट नष्ट करायचं असेल तर प्रत्येकाने सुपंथावर चालण्याचा संकल्प करावा. सगळच बरोबर आणि उत्तम करायला आपण देव नाहीत, संतही नाहीत, पण वाईट वागायला आपण राक्षसही नाहीत. प्रत्येकाने दुसऱ्यांना सुधरवत बसण्यापेक्षा स्वतःमध्येबदल करावा. एक एक सद्गुण आत्मसात करण्याचा प्रतिवर्षी दसऱ्याला संकल्प करावा. एक दुर्गुण किंवा कमतरता दूर करून एक सद्गुण आचरणात आणला तर आयुष्यात आपल्याला खूप मोठी मजल मारता येईल. आयुष्य हे असच जगायचं आहे. त्यामुळे यंदाच्या दसऱ्यापासून असं सीमोल्लंघन करा आणि दुर्गुणांवर, मर्यादांवर मिळवलेल्या विजयाच सोन सुख-समाधानाने लुटा.
हरीश केंची,
९४२२३१०६०९
चौकट
म्हैसूरमध्ये दसरा एका अनोख्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण मोठ्या उत्साहाने, संगीत आणि नृत्यासह साजरा केला जातो. हा उत्सव पाहण्यासाठी दूरदूरहून लोक येतात. म्हैसूरमध्ये दसऱ्याला राज्य उत्सव (नाद हब्बा, म्हणजे राज्य उत्सव) मानले जाते. म्हैसूरमध्ये ज्या पद्धतीने दसरा साजरा केला जातो, त्याला तोड नाही. म्हैसूरचा दसरा अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, ज्यात म्हैसूर पॅलेसच्या पार्श्वभूमीवर होणारे कला प्रदर्शन समाविष्ट आहे. प्रदर्शनादरम्यान हजारो दिव्यांच्या रोषणाईने पॅलेस उजळून निघतो, ज्यामुळे त्याचे सौंदर्य अधिकच वाढते. देशातील काही सर्वोत्कृष्ट कलाकारांची उपस्थिती आणि त्यांना पाहणारे प्रेक्षक एक मनमोहक वातावरण निर्माण करतात. ही प्रदर्शने, ज्यात प्रामुख्याने शास्त्रीय संगीत आणि नृत्य असते, दररोज संध्याकाळी शेकडो प्रेक्षकांना आकर्षित करतात. याव्यतिरिक्त, शहरातील इतर प्रमुख ठिकाणी, जसे की जगनमोहन पॅलेस, टाऊन हॉल, वीणा शेषना भवन आणि कला मंदिर येथेही मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये हरिकाथे, कामसाले पाडा, गमका, यक्षगान आणि बाहुलीनाट्यासारख्या शास्त्रीय लोककला प्रकारांचा समावेश असतो. रंगायना हा नऊ दिवसांचा नाट्य महोत्सव आहे. दोड्डकर मैदानावर सर्व आकारांचे आणि रंगांचे पतंग आकाशात उंच उडतात. दसऱ्याच्या शेवटी पतंगबाजीचे आयोजन केले जाते, जे देशभरातील पतंगबाजांना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी म्हैसूरमध्ये आकर्षित करते. म्हैसूर दसऱ्याचे मुख्य आकर्षण, जे या भव्य शहराला दहा दिवसांच्या उत्सवात रूपांतरित करते, ते म्हणजे युवा दसरा. हा मानसगंगोत्री कॅम्पसमध्ये आयोजित केलेल्या महाविद्यालयीन उत्सवासारखा असतो. विद्यार्थ्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी आमंत्रित केले जाते आणि दररोज संध्याकाळी काही अप्रतिम कार्यक्रम सादर केले जातात. पारंपरिक नृत्य आणि संगीतापासून ते शास्त्रीय आणि पाश्चात्य संगीतापर्यंत, भारतातील आघाडीच्या रॉक स्टार्सपासून ते तरुणांच्या गर्दीपर्यंत विविध कलाकारांचे कार्यक्रम सादर होतात. २१ तोफांच्या सलामीसह, हत्तींची मिरवणूक राजवाड्यापासून सुरू होते आणि म्हैसूरच्या रस्त्यांवरून फिरते. या मिरवणुकीचे नेतृत्व सुंदर सजवलेले हत्ती करतात. एक हत्ती देवी चामुंडेश्वरीची मूर्ती असलेला ७५० किलोग्रॅम वजनाचा सोन्याचा अंबारी (हत्तीवर बसण्याचे सिंहासन) वाहून नेत आहे. त्यांच्या मागे पारंपरिक वेशभूषेतील सैनिक, त्यानंतर भाले आणि तलवारी घेतलेले घोडेस्वार सैनिक आणि त्यांच्यामागे एक वाद्यवृंद आहे. हत्तींच्या मागे प्रशिक्षित नर्तक असून, ते संपूर्ण मिरवणुकीत मनोरंजन करतात. या मिरवणुकीत ढोलवादक, विशाल बाहुल्या, एनसीसी कॅडेट्स, स्काऊट्स आणि गाईड्स, लोकनर्तक आणि संगीतकार, तसेच चित्ररथ यांचा समावेश असतो.








No comments:

Post a Comment

अमृतकाळाची फळं.....!

"दहशतवादग्रस्त पहलगाममध्ये एकाचवेळी दोन हजार पर्यटक असतांनाही एकही पोलिस नसतो. दहशतवादी येतात, आरामात २०/२५ मिनिटे थांबून ड...