"महात्मा गांधींचं आत्मचरित्र ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे केवळ एक आत्मचरित्र नसून सत्याचा शोध घेणारी निरंतर जीवनप्रणाली आहे. गांधींचे सत्याचे प्रयोग स्वयं-पारदर्शकता अन् चुकांची कबुली आहे! गांधींनी आयुष्यातला कमकुवतपणा, बालविवाह, लपूनमापून मांससेवन आणि स्वतःच्या चुकांची जाहीर कबुली प्रामाणिकपणे दिलीय. गांधींच्या दृष्टीनं सत्य ही कोणतीही पक्की वा कायमस्वरूपी तयार केलेली गोष्ट नव्हती, तर तो एक सतत चालणारा शोध आणि प्रयोग होता. सत्य आणि अहिंसा हे त्यांच्यासाठी राजकीय हत्यार तसेच जीवनमूल्य होतं. आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात माहितीचा महापूर आहे. तिथं सत्यापेक्षा 'व्हायरल' होण्याला किंवा मीम्स, खोट्या बातम्या आणि प्रचाराला जास्त महत्त्व दिलं जातं. आजच्या काळात राजकारण, समाजकारण किंवा वैयक्तिक आयुष्यात स्वतःच्या चुका मान्य करणं दुर्मीळ झालंय. त्याऐवजी स्वतःला 'सर्वज्ञानी' वा निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न होतोय. आज सत्याचा शोध घेण्याऐवजी सोयीनुसार सत्य मांडलं जातंय. अशा काळात गांधींच्या 'सत्याच्या प्रयोगांची' प्रासंगिकता प्रचंड वाढलीय...!"
.....................................................
*मी* गांधीजींचं 'सत्याचे प्रयोग' हे पुस्तक आधी मैत्रिणीचं चोरून आणलं, वाचलं आणि आता विकतही घेऊन सोबतीलाच ठेवलंय! देशात सत्तेचे प्रयोग सुरू झाल्यापासून या पुस्तकाचं 'आत्मकथा' असं नामांतर झालं असावं. अनेक भाषांतलं तुफान विक्रीचं हे पुस्तक आहे. या पुस्तकात गांधीजींनी बालपणापासून ते 'महात्मा' अशी आपली ओळख होईपर्यंतची जीवनयात्रा सांगितलीय. त्यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय अशी टीका-टिप्पणी आहेच; तशीच चोरी केल्यापासून ते आपल्यातल्या अतिकामवासनेनं काय काय गमवावं लागलं, तेही गांधीजींनी खुलेपणानं सांगितलंय. त्यात कसलीही लपवाछपवी नाही. 'मी आत्मचरित्र लिहिणार नाही! निवडणुकीला उभं राहाणार नाही...!' असं 'हिंदुहृदयसम्राट' बाळासाहेब ठाकरे म्हणत असत. पण गांधीजींची 'आत्मकथा' वाचली की वाटतं, आपल्यातलं असत्य, खोटं, नालायकी सांगण्याची ज्याच्यात हिंमत असते, तोच आत्मकथा, चरित्र लिहू शकतो. 'वडिलांचा मृत्यू आणि माझी नालायकी...!' ह्या प्रकरणात तर गांधीजींनी स्वतःला सोलून काढलंय! गांधीजी आणि कस्तुरबा यांचा बालविवाह झाला होता. गांधीजींच्या वडिलांना भगंदरच्या विकारानं अंथरुणात जखडून टाकलं होतं. दुखणं वाढत होतं. वडिलांचं अंथरूण आता मृत्युशय्या झाली होती. गांधीजी त्यांना नेमून दिलेली पितृसेवा चोखपणे करत. रात्र खूप झाली होती. काकांनी गांधींना सांगितलं, 'तू जा, आता मी बसतो.' सोळा वर्षांचे गांधीजी खूश झाले. पुढचं गांधीजींच्याच शब्दांत वाचा, 'आणि मी सरळ शयनगृहामध्ये - बेडरूममध्ये गेलो. पत्नीला बिचारीला गाढ झोप लागली होती. परंतु मी कसचा तिला झोपू देणार? मी तिला जागं केलं. पाच-सात मिनिटं झाली नसतील, इतक्यात नोकरानं दार ठोठावलं. माझ्या पोटात धस्स झालं. बिछान्यातून ताडकन उडी मारून उठलो. दार उघडलं. नोकराला विचारलं काय झालं...? जबाब मिळाला, बापू म्हणजे वडील आटोपले..! आता मला पश्चात्ताप झाला तरी उपयोग काय? मी खूप शरमलो. मला अतिशय दुःख झालं. वडिलांच्या खोलीकडं धावून गेलो. माझ्या ध्यानात आलं, की मी विषयांध नसतो, तर शेवटच्या त्या घडीला माझ्या नशिबी वडीलांचा वियोग आला नसता...!'
आता म्हणाल, यात काय मोठं! जी सहज भावना होती, ती व्यक्त झाली! पण गांधीजींना ही बाब शरमेची वाटली. यावर गांधीजी लिहितात, 'सेवेच्या वेळी विषयेच्छा ! हा काळा डाग मी आजपर्यंत पुसून टाकू शकलो नाही, विसरून जाऊ शकलो नाही. मी नेहमीच असं मानत आलोय की, माझी जरी मातापित्यांबद्दलची भक्ती अपरंपार होती, मी त्यांच्या सेवेसाठी सर्वकाही सोडू शकत होतो, तरीही त्या सेवेच्या प्रसंगी माझं मन विषयाला सोडू शकत नव्हतं, हे त्या सेवेमधलं एक अक्षम्य न्यून होतं. म्हणूनच स्वतःला मी एकपत्नीव्रत पाळणारा मानत असूनही विषयांध मानत आलोय. त्यातून सुटून जाण्यास मला फार अवधी लागला आणि सुटून जाण्यापूर्वी अनेक धर्मसंकटं सहन करावी लागली...!' गांधीजींनी हे सत्य सांगितलं नसतं, तरी त्यांच्या 'महात्मा'पणात थोडीही घट झाली नसती; अथवा त्या प्रसंगाबद्दल इतर कुणी काही लिहिलं-सांगितलं असतं, अशातलाही भाग नाही. कुत्र्यासारखं भररस्त्यात 'शी-शू' करायची आणि त्यावर तंगड्या मारून 'माल' दडवल्याच्या खात्रीत इतरांची हागंदारी हुंगत फिरायचं; असा बेशरमपणा आजचा नाही; तर तो शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी गांधीजींच्या काळातही होता. गांधीजींनी तो आपल्याच उदाहरणानं दाखवला जे शरमेपोटी दडवायचं, तेच दाखवायचं सांगायचं, म्हणजेच गांधीजींचे 'सत्याचे प्रयोग...!' निकटचे अनुयायी स्वामीआनंद यांच्या 'नवजीवन' या वृत्तपत्रासाठी गांधीजींनी 'सत्याचे प्रयोग' ही लेखमाला लिहिली. छोटी-छोटी सहज वाचता येतील, अशा साध्या सोप्या शब्दांत, ही क्रमशः प्रकरणं होती. त्याचंच 'आत्मकथा' हे पुस्तक झालं. गांधी जयंती आणि स्मृतिदिनी या पुस्तकाच्या तुफान विक्रीच्या बातम्या येतात. पण समाजातलं देशातलं एकूण वातावरण बघितलं की, लोक हे पुस्तक वाचून सत्य ऐवजी असत्याचे प्रयोग कसे सराईतपणे करायचे; ते पाप, आपली नालायकी बिनधोक करण्यासाठी मन कसं कठोर राखायचं; ह्याचेच धडे गिरवत असावेत. ते जाऊ द्या, 'सत्याचे प्रयोग'चं पुस्तक आपण एकदा वाचू, त्यानं आपल्यात 'सत्याचे प्रयोग' करण्याचं बळ नाही आलं, तरी सत्याचे संस्कार होतील ना!
गांधीजींच्या सत्याच्या प्रयोगाची 'आत्मकथा' म्हणजे 'सत्यनारायणाची पोथी' किंवा पुराणातली मनोरंजक कथा नाही ते? सत्यासाठी जगलेल्या आणि जनतेला सत्य कळू नये म्हणून जीवानिशी मारल्या गेलेल्या माणसाची ती सत्यकथा आहे. थोर शास्त्रज्ञ आईन्स्टाइन म्हणतात, 'महात्मा गांधी नावाचा हाडामांसाचा एक माणूस पृथ्वीवर होऊन गेला, यावर पुढील पिढ्या कदाचित विश्वास ठेवणार नाहीत...!' अजून तरी तसं झालेलं नाही. कारण आपल्या पिढीतल्यांच्या बहुतेकांच्या आजी-आजोबांचा जन्म गांधीजी हयात असताना झालाय. म्हणूनच 'सत्याचे प्रयोग' वाचताना सतत वाटत होतं, आपल्याच काय, पुढच्या सर्व पिढ्यांतल्या तरुणांना गांधीजींचं विस्मरण झालं तर, ती देशासाठी मोठी चूक ठरेल. गांधीजींचा सत्याग्रह-सत्याचा आग्रह केवळ भारतीयांसाठी नव्हता; तर तो अखिल विश्वातल्या अखिल मानव जातीसाठी होता. म्हणूनच ते सीमा नसलेल्या देशाचे राष्ट्रपिता झाले! विश्वपिता झाले! ज्येष्ठ लेखक, समीक्षक अशोक शहाणे ह्यांचं नाव ऐकलं असेल. या शहाणे यांनी आपल्या 'प्रास प्रकाशन'तर्फे पु.ल. देशपांडे यांनी शिफारस केलेलं, 'लेटर टू टीचर...!' हे इटालीतल्या बार्नियाना खेड्यातल्या मुलांनी लिहिलेलं पुस्तक अनुवादित करून प्रकाशित करण्याचं ठरवलं. या अनुवादाच्या परवानगीसाठी अशोक शहाणे यांनी त्या मुलांशी पत्राद्वारे संपर्क साधला आणि त्याला मानधनाचा आकडा विचारला. त्या मुलांनी पत्राद्वारे कळवलं, 'मानधन म्हणून आम्हाला समग्र गांधी वाङ्मय पाठवा...!' ही गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा आग्रहाची कमाल! सत्य आणि अहिंसाबाबत गांधीजी कमालीचे आग्रही होते तरीही त्यांची हत्या झाली. मात्र त्यांचा सत्य आणि अहिंसा यासाठीचा आग्रह अमर होता. तो अमरच राहिला. भारतीय लोकशाहीचं प्रतीक असलेल्या तीन सिंहाच्या अशोक स्तंभावर 'सत्यमेव जयते' असं लिहिलेलं असतं. सम्राट अशोकाच्या राजवटीत हा तीन सिंहाचा स्तंभ होता. पण त्यावर सत्यमेव जयते असं लिहिलेलं नव्हतं. भारतीय लोकशाहीचं ब्रीदवाक्य झालेलं 'सत्यमेव जयते' हे प्रथम १९१८ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या मदन मोहन मालवीय यांनी वापरात आणलं. त्यापूर्वी ते महात्मा जोतिराव फुले यांनी आपल्या मानवमुक्तीच्या लढ्यासाठी वापरात आणलं होतं. जोतिरावांच्या सत्यशोधक चळवळीच्या प्रत्येक पत्र पत्रकांवर 'सत्य की जय हो' असं लिहिलेलं असायचं. 'सत्य' विचार-आचारासाठी जोतिरावांनी अभंगासारखे अखंडही लिहिलेत. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी जोतिरावांचा 'सत्याचा पालनवाला' असा काव्यगौरवही केला आहे.
कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर हे गांधीजींचे समकालीन. म्हणजे रवींद्रनाथांचा जीवनकाल ७ मे १८६१ ते ७ ऑगस्ट १९४१ असा; तर गांधीजींचा २ ऑक्टोबर १८६८ ते ३० जानेवारी १९४८ असा! रवींद्रनाथांच्या शांती निकेतनबद्दल आपल्याला माहिती आहे. पण या शांती निकेतनची स्थापना करताना त्यांनी जे प्रतिज्ञागीत गीत लिहिलं, म्हटलं, ते मी सांगतो. रवींद्रनाथांची ही प्रतिज्ञा आपण मनोमनी जपली, तरी आपलं जीवन धन्य होईल. वाचा-
मोरा सत्येर परे, मन करिब समर्पण
जय जय सत्येर जय l
मोरा बुझिब सत्य, पुजिब सत्य, खूँजिब सत्यधन l जय जय सत्येर जय ll
यदि दुःखे दहिते हय, तबू मिथ्या चिन्ता नय l
यदि दैन्य वहिते हय, तबू मिथ्या कर्म नय l
यदि दंड सहिते हय, तबू मिथ्या वाक्य नय l
जय जय सत्येर जय ll
या बंगाली गीताचा अर्थ सांगणंही आलंच! कारण अर्थ कळला नाही की, अनर्थ होतो. आता रवींद्रनाथांच्या कवितेचा अर्थ ऐका-
सत्याला माझं मन, समर्पित व्हावं l
सत्याचा जय व्हावा l
सत्य मज समजावे, सत्य मी पुजावे l
सत्य धन मी शोधावे । सत्याचा जय व्हावा l
दुःखाने होरपळलो तरी, मला असत्य सुचू नये l दैन्याने पिचलो तरी, असत्य कर्म हातून घडू नये l
शिक्षा भोगायची वेळ आली, तरी असत्य बोलू नये l
सत्याचा जय व्हावा l
'भगवद्गीता' मध्ये अखेर सत्याचाच जय होतो, असं म्हणत, 'महाभारत'चा पट रंगवलाय. तरीही पुनःपुन्हा 'सत्याचाच जय व्हावा,' असा धोषा का करावा लागतो? मुबलक असलेल्या आणि माजलेल्या असत्याच्या शोधालाही सत्यशोधन का म्हणायचं? हे माझेच प्रश्न नाहीत. ते सनातन प्रश्न आहेत. पण या प्रश्नातला वरचढ प्रश्न ख्यातनाम नाटककार, लेखक, कलावंत संतोष पवार यांनी 'यदा-कदाचित' या त्यांच्या नाटकात विचारला आहे. तोदेखील २६ वर्षांपूर्वी त्यांच्या वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी! 'यदा-कदाचित'मधून 'भारत-महाभारत'ची चिरफाड झाल्यावर ते विचारतात, 'सत्याचा विजय शेवटीच का होतो? आधी मध्ये वेळीच का होत नाही?' चेकोस्लावाकियाच्या 'प्रावदा वितेजी' या ब्रीदवाक्याचा अर्थ, 'सत्यमेव जयते' सारखाच आहे. आपलं 'सत्यमेव जयते' हा मुण्डक उपनिषदातला मंत्र आहे. तो असा आहे-
*सत्यमेव जयते नानृतम सत्येन पंथ विततो देवयानःl*
*येनाक्रमंत्युषयो ह्यासकामो यत्र तत् सत्यस्य परमम् निधानम् ll*
अर्थात, अंतिम विजय सत्याचा होत नाही की असत्याचा! ज्यामुळे मानवी जीवनाचं शिखर गाठलं जातं, तो मार्ग म्हणजे सत्य! असो. देव-ईश्वर ही कल्पना सत्य नाही, या मतावर मी ठाम आहे. असेल तर सत्य हाच ईश्वर-देव असू शकतो. महात्मा जोतिराव फुलेंनी निर्मिक ही देवाला खोडून काढणारी संकल्पना मांडली आणि सत्यधर्माची निर्मिती केली. सत्य हा सर्वच धर्मग्रंथांचा प्राण आहे. राज्यव्यवस्था कुठलीही असली, सत्ताधारी कुणीही असला; इतकंच कशाला, कुणी क्रूरकर्मा असला तरी तो असत्याचं, हिंसेचं समर्थन करू शकत नाही. कारण असत्य आणि हिंसा, हे चालवणाऱ्यावर उलटणारं हत्यार आहे. म्हणूनच सत्य हाच ईश्वर आहे, अशी एक काळ लोकांत, समाजात श्रद्धा होती.
*सत्यमेवेश्वरो लोके, धर्मः सत्ये प्रतिष्ठितः l*
हा लोकांचा विश्वास होता. म्हणूनच मला वाटतं, लोकशाही जर समर्थ व्हायला हवी असेल, तर सत्याचा उच्चार करणाऱ्यांची आणि सत्यावर विश्वास असणाऱ्यांची संख्या वाढायला हवी. धादांत खोटारडेपणा क्षणोक्षणी दाखवणारे सत्यवान आज आपल्याकडे वाढलेत. त्यामुळेच सत्याचा डांगोरा पिटण्याचा त्यांचा उद्योगच मुळात खोटा आहे, ही गोष्ट आता लोक समजून चुकलेत. सत्य सांगेन अशी खोटी शपथ घेण्याचं धाडस वाढलंय, पण सत्य
सांगेन आणि त्यासाठी कुठलीही कठीण परीक्षा देईन, असं म्हणण्याचं धाडस मात्र आता दुर्मीळ झालंय. ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा यामधून तर राजरोस सत्याची हत्या करणारे सत्यवान बघायला मिळण्याचं संकट भारतवासींवर सध्या ओढवलंय. ह्या सत्यवानांना घटनात्मक कवच असल्यानं त्यांना कधी सत्य क्रिया करावी लागत नाही.
एकेकाळी आपल्या समाजात खरं बोलणाऱ्याचं कधी वाईट होत नाही, अशी लोकांची धारणा होती. सत्य बोलणाऱ्याचं सत्यच रक्षण करेल असा लोकांचा विश्वास होता आणि हा विश्वास संतांच्या लिखाणानं आणखी सशक्त झाला होता. मी जे काही बोलतोय ते सत्य आहे. ते सत्य असेल तर अमुक गोष्ट घडेल, नसेल तर त्याविरुद्ध घडेल, अशी खात्री लोक देत. कथा रामायणमधली आहे. रामायण काय, महाभारत काय आणि इतर धार्मिक ग्रंथ काय, तो मानवी इतिहास नाही; पण तो साहित्यनिर्मितीचा सर्वोच्च कल्पनाविलास आहे. त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. सीतेनं अशी सत्य क्रिया केली होती. रावणाकडे बंदिवान म्हणून ती काही काळ होती. श्रीरामांनी रावणवध करून तिला सोडवून आणलं. पण इतक्या वर्षांत रावणानं सीतेबरोबर गैरव्यवहार केला असेल, अशी शंका कुणाच्या तरी मनात होती. ती घालवण्यासाठी सीतेनं सत्य क्रिया म्हणूनच अग्निदिव्य केलं. मी शुद्धचरित नसेल तर अग्नी मला जाळून टाकेल, असं म्हणून सीतेनं अग्नीत उडी घेतली. सीता शुद्ध होती. अग्नी तिला जाळू शकला नाही. भगवान श्रीकृष्णानंही सत्य क्रिया करून परीक्षितला पुन्हा जिवंत केलं होतं. मी कधीही खोटं बोललो नाही अथवा कधीही युद्धापासून परावृत्त झालो नाही, हे जर खरं असेल तर हा परीक्षित जिवंत होवो, असं कृष्णानं म्हणताच, परिक्षित जिवंत झाला. बौद्ध वाङ्मयातही एक 'सत्य क्रिया' सांगितलीय. त्यात इंदुमती नावाच्या एका वेश्येनं सत्य वचनाच्या बळावर गंगेचा प्रवाह उलटा वाहवून दाखवला, असं दाखवलंय. नीतीची बंधनं झुगारून देहाचा बाजार मांडणाऱ्या एका वेश्येनं हे करावं, याचा राजा अशोकाला मोठा अचंबा वाटला. तेव्हा इंदुमती म्हणाली, 'गंगेचा प्रवाहच नव्हे, मानवाचं हे जग आणि देवाची सारी विश्वंसुद्धा मी उलटीपालटी करू शकेन...' ह्या सत्य क्रियेचं रहस्य सांगताना इंदुमती म्हणते, 'मी वेश्या आहे. माझ्याकडे राजे, सरदार, धनिक, सावकार वा भणंग, भिकारी कुणीही आले, तरी मी त्याला समभावानं स्वीकारते. त्यांच्या पदाचा पैशाचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. मी हा जो समभाव राखते, तेच माझं सामर्थ्य, माझी सत्य क्रिया या सामर्थ्यावरच आहे. मी कणभर जरी भेदभाव केला असेल, तरी माझ्या शब्दाला किंमत उरणार नाही. मी वेश्या असले, तरी मी देहाचा बाजार मांडलेला नाही. जो ज्याला जमेल ते देईल, पण मी मात्र सर्वांना सर्वस्वच देते....!' या वेश्येचं सामर्थ्यसुद्धा आजच्या सत्यवान, सभ्य महापुरुषांपाशी उरलेलं नाही, सत्य क्रिया करण्याएवढं सामर्थ्य यायला हवं, हे लक्षात ठेवा....!
हरीश केंची,
९४२२३१०६०९
No comments:
Post a Comment