काही दिवसांपूर्वीची घटना जंतर मंतरवर झुरळांचं आंदोलन पेटलं होतं, त्यांना पूर्ण ताकदीने सगळे विरोधी पक्ष मदत करत होते. केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण तयार झाले होते आणि अश्यावेळी शरद पवार जाऊन अभिजीत दीपके यांना जंतरमंतर वर भेटतात. त्याच दिवशी मोदींची भेट घेतात. त्यांना विद्या प्रतिष्ठान च्या कार्यक्रमाचे आमंत्रण देतात आणि मग आंदोलनाची कोंडी फुटू लागते. सरकार कायदा करायला तयार होते. प्रधान यांचा राजीनामा होतो आणि यथावकाश परिस्थिती निवळते. गेल्या १२ वर्षात मोदी सरकारला पवारांनी केलेली ही पहिलीच मदत नव्हती.
गेल्या बारा वर्षात प्रत्येक अडचणीच्यावेळी महत्वाचे कायदे पारित करत असताना शरद पवारांनी उघडपणे भाजपच्या बाजूने दान टाकलं किंवा सभात्याग करून भाजपला मदत केली. भाजप आणि शरद पवार यांचे हे स्नेहाचे प्रेमाचे नाते फार जुने आहेत. त्यादृष्टीने विचार केला तर शरद पवार हे भाजपचे 'पहला प्यार' आहेत.
वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवारांनी पुलोद स्थापन केली आणि त्यावेळी त्यांच्या या सरकारमध्ये जनता पक्ष सामील झाला होता. या जनता पक्षात विलीन झालेला जनसंघ सुद्धा होता. भागवत म्हणून एका रा. स्व. संघातील प्रचारकाचे यात मोठे योगदान मानले जाते. हे तेच भागवत आहेत ज्यांनी ' माधव ' - माळी, धनगर, वंजारी फॉर्म्युला आणला होता. त्यामुळे पवारांच्या खांद्याला खांदा लावून २१ महीने तत्कालीन जनसंघ सत्तेत होता.
भारतीय जनता पक्ष आणि शरद पवार यांचे मधुर संबंध तेंव्हापासूनचे आहेत. जे २०१४ साली भक्त झालेले लोक आहेत त्यांना ही पार्श्वभूमीच माहिती नसते. त्यांना पडद्यामागचं राजकारण माहित नसते. शरद पवार आणि भाजप हा 'बहोत पुराना याराना' आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांना संपवणं किंवा त्यांचे राजकारण उध्वस्त करणं यासाठी लढलेला एकमेव नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे. त्यांनी खरोखर पवारांना अंगावर घेतलं होतं. पण त्यात सुद्धा त्यांचे मेव्हणे प्रमोद महाजन यांचं पवारांशी अत्यंत प्रेमळ आणि घनिष्ठ संबंध होते आणि गोपीनाथराव हे प्रमोद रावांच्या शब्दाबाहेर नव्हते. यातून काय ते समजून घ्या.
त्यामुळे भूखंडाचे श्रीखंड हा शब्दप्रयोग असेल किंवा सिंचन घोटाळा असेल, शरद पवारांवरील भाजपचे राजकीय हल्ले ही नुरा कुस्ती होती, हे महाराष्ट्राने समजून घेतले पाहिजे. आज महाराष्ट्रात सगळ्या पक्षांचे आणि नेत्यांचे उघडपणे जे एकमेकात घुसलेले तंगडे दिसताहेत ते गेली कित्येक दशके अदृश्य स्वरुपात विद्यमान होतेच. आता ते उघड करण्याइतके सर्वपक्षीय नेते निर्लज्ज झालेत आणि त्याचे काहीही वाटू नये इतके सामान्य नागरिक बधिर झालेत. त्यामुळे हे समोर दिसतेय आणि आपली अवस्था द्रौपदीसारखी झालीय. राजकारणी आणि अंडरवर्ल्ड यांच्या संबंधांना उघड करणारा व्होरा कमिटीचा अहवाल कोंग्रेसच्या काळात १९९४ साली सादर झाला परंतु त्यावर त्यावेळी कारवाई झाली नाही. त्यानंतर केंद्रात भाजप सरकार १३ दिवस , १३ महीने आणि संपूर्ण ५ वर्ष सत्तेत आले. यापैकी एकदाही वोरा कमिटी अहवालावर कारवाई झाली नाही. हा अहवाल बाहेर आला असता तर शरद पवारांचे राजकीय करियर संपुष्टात आले असते ही चर्चा त्याकाळापासून सुरू आहे.
२०१४ साली नरेंद्र मोदींनी ज्यांचा उल्लेख 'नॅच्युरली करप्ट पार्टी...!' असा केला होता त्या पक्षाच्या प्रमुख असणार्या शरद पवारांवर २०१४ ते २०२५ काहीही कारवाई झाली नाही. २०१४ साली फडणवीस यांनी ७० हजार कोटी रूपयाच्या सिंचन घोटाळ्यासंदर्भात बैलगाडीभरून पुरावे आदि घोषणा केल्या परंतु त्यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत शरद पवार आणि अजित पवार यांना अडचणीत आणले गेले नाही. नाही म्हणायला, छगन भूजबळ काही काळ तुरुंगात फेरफटका मारून आले. पण त्यात सुद्धा केंद्रीय यंत्रणांचाच मोठा हात होता. राज्यातील सरकारने काहीही केले नाही. २०१४ साली महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे हे स्पष्ट झाल्यावर पवारांनी बाहेरून पाठिंबा घोषित केला आणि आपल्या सर्व नेत्यांवरील संभाव्य कारवाई टाळली. भाजपने याचा राजकीय वापर करत पुढील पाच वर्ष शिवसेनेला चेचत नेले आणि शिवसेनेने पण पाच वर्ष राजीनामे खिशात ठेवून विरोधी पक्ष + सत्ताधारी असा विचित्र कारभार केला. पहाटेच्या शपथविधी नंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे उघड केले होते की, २०१७ सालीच भाजप + राष्ट्रवादी कोंग्रेस असे सरकार स्थापन करण्याचे ठरले होते पण ते मूर्त स्वरुपात आले नाही.
पहाटेच्या शपथविधीनंतर तरी भाजप आणि शरद पवार यांचे प्रेमसंबंध संपुष्टात येतील असा भ्रम भाजप समर्थकांना होता पण ते सरकार भाजपच्याच आशीर्वादाने सत्तारूढ झाले होते हेच सत्य होते. त्या ३० महिन्यांच्या काळात शरद पवारांनी आपल्या सगळ्या नेत्यांच्या सगळ्या फाइल उद्धव ठाकरे यांच्याकडून क्लिअर करून घेतल्या.. योग्य वेळी अजित पवार आता स्वच्छ होऊन आपल्या अन्य सर्व स्वच्छ सहकार्यांना घेऊन सरकार मध्ये सामील झाले. २०२४ च्या दोन्ही निवडणुका महायुती म्हणून झाल्या आणि राष्ट्रवादीला सत्तेत भरपूर वाटा मिळाला, एकही चौकशी दोन्ही राष्ट्रवादींच्या मागे लागली नाही. जुनी पापे धुवून निघाली. आता आयुष्याच्या उत्तरार्धात पवारांचा एक पाय अजूनही कोंग्रेस मध्ये अडकला आहे. अजूनही लेकीला कोंग्रेस सोडवत नाही परंतु भविष्याचा विचार करून पवार आणि सुकन्या भाजपत जाणार यात संशय नाही. मग आघाडी करून स्वतंत्र पक्षरूपी अस्तित्व ठेवून जातील किंवा थेट सामील होतील पण ते भाजपवासी होणार हे नक्की. कॉलेज मधील प्रेम प्रकरण विवाहापर्यंत न गेलेली काही जोडपी उत्तरायुष्यात दोघांचेही जोडीदार निवर्तले की लग्न करताना दिसतात. शरद पवार हे सुद्धा भाजपचे पहिला प्यार असल्यामुळे त्यांच्यासाठी भाजपची दारे कायम सताड उघडी आहेत. आता पवार कन्येच्या हिरव्या बावट्यासाठी सगळे अडले आहे इतकेच.
No comments:
Post a Comment