मशीनचा झोल, शरणागत निवडणूक आयोग, हाताशी असलेल्या केंद्रीय यंत्रणा, बीभत्स वाटावा असा पैसा ज्यांच्या दिमतीला आहे त्यांना देश काय आकाशगंगाही जिंकता येऊ शकेल. एक बरं झालं. डाव्यांसकट सर्व प्रादेशिक पक्षांचा बाजार उठल्याने सगळ्यांची पाठ भिंतीला टेकलीय. माफियांविरूद्ध निकराची लढाई लढणं हा एकमेव पर्याय उरलाय. देशातली जनता विरोधकांचे आपआपसातले वाद पाहण्यास इच्छूक नाही. त्यांना एक तर भाजपला थेट मत द्यायचंय वा थेट भाजप विरोधी शक्तीला!
अलीकडच्या काळातले एकतर्फी निकालाच्या पध्दतीचाच जनादेश तेच दर्शवतात. या जनतेची छप्परफाड मते स्विकारण्यास आम्ही पात्र नाही हेच विरोधक आपल्या सुंदोपसुंदीतून दाखवून देताहेत. परिणामी राज्यातच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत ज्या जनतेने त्यांना मोठी खासदार संख्या दिली ते खासदारही भविष्यात या पक्षांची वाताहत पाहून भाजप वा त्यांच्या मित्रपक्षात मोठ्या संख्येने जाऊ लागलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आता बारा वर्षाचा कालावधी पुर्ण झालाय आणि या काळात त्यांनी काय साधलं वा करून दाखवलं, असा प्रश्न विचारला जाणं स्वाभाविक आहे. त्याचं उत्तर काहीही असलं तरी भाजप विरोधकांना ते मान्य होण्याची शक्यता नाही. कारण ज्याला समजून घ्यायचं नसतं, त्याला समजावता येत नसतं. सहाजिकच त्याला समजावण्यात आपला वेळ वाया घालवण्याची गरज नसते. त्यापेक्षा आपण काय साध्य केलं वा अजून काय साध्य करायचंय, त्याचा उहापोह करण्यालाच प्राधान्य असलं पाहिजे. एक नवं सरकार आलं, मग त्यानं काय केलं असे प्रश्न नेहमी विचारले जातात. पण निवडणूकांच्या राजकारणात असलेल्या पक्षांना आणि नेत्यांना फ़क्त जनहिताच्या मागे लागून चालत नसतं. त्यांना आपलं राजकीय प्रभावक्षेत्रही वाढवावं लागत असतं. आपला प्रभाव टिकवणं ही भाग असतं. किंबहूना विरोधातल्या शक्तींचं खच्चीकरण करण्यालाही प्राधान्य द्यावं लागतं. सुदैवानं नरेंद्र मोदींना आपल्या कारकिर्दीत मनमोकळे सहकार्य देणारे विरोधी पक्ष आणि नेते मिळालेत. प्रत्येक विरोधक अन् विरोधी पक्ष आपल्या परीनं मोदींचा प्रभाव वाढण्यासाठी स्वत:ला खच्ची करून घेण्याचं योगदान मोठ्या प्रमाणात देतोय. म्हणून तर निवडणूका इतक्या सहजगत्या जिंकणं मोदींना शक्य झालंय. पहिलं वर्ष मोदींना आपलं स्थान दिल्लीच्या राजकारणात पक्के करण्यातच खर्ची पडलं. नंतरच्या काही वर्षात मोदी खर्या कामाला लागले. आपलं स्थान वा पक्षाची सत्ता जनमतावर विसंबून असल्यानं, अधिकाधिक मतदार आपल्या बाजूला गोळा करण्याला प्राधान्य असतं. मतदार अनेक कारणांनी तुमच्या बाजूला येतो किंवा तुमच्यापासून दुरावत असतो. त्यात दुरावणार्याला थांबवणं आणि दूर असलेल्यांना आपल्या जवळ आकर्षित करणं, महत्वाचं असतं. यात विरोधकांचं मोठे सहकार्य मिळावावं लागतं. यापुर्वीचं सरकार सत्तेत असताना त्यांनी जी राजकीय सामाजिक परिस्थिती निर्माण केली, ती पोकळी भरण्यासाठी नव्या नेत्याची आणि राजकारणाची गरज त्यांनीच निर्माण करून ठेवली. मग ती पोकळी भरून काढण्यासाठी लोकांनी शोध सुरू केला. तेव्हा नरेंद्र मोदी हे दिल्लीबाहेरचं नाव पुढं आलं. तेव्हा मनमोहन सरकार आणि सोनिया गांधी यांच्या अराजकाला वैतागलेल्या भारतीयांना पर्याय म्हणून मोदी पुढं आलेले होते. तरी ती लोकप्रियता त्यांना आधीच्या सरकारी नाकर्तेपणाने बहाल केलेली होती. सहाजिकच कारभार चोख झाला तरी मतदार खुश रहाणार, हे मोदींना कळत होतं. त्यांनी काटेकोर कारभार करत आपल्या हातून फ़ारश्या चुका होऊ नयेत, याची खुप काळजी घेतली. म्हणून दहा वर्षे उलटल्यावरही विरोधक मोदींवर कुठला आरोप करू शकलेले नाहीत. मोदी सरकारवर आरोप होऊ शकलेला नाही. पण म्हणून निवडणूक सोपी नसते. आपल्या गुणवत्तेपेक्षाही विरोधकांच्या नाकर्तेपणाला मतांमध्ये खुप मोठे स्थान असतं. वर्षानुवर्षे काँग्रेसचं नाकर्ते सरकार भारतीयांनी चालवून घेतलं. कारण इतर पक्षांची अनागोंदी काँग्रेसी भ्रष्टाचारापेक्षाही भयंकर होती. त्या अनागोंदी आणि काँग्रेसी भ्रष्टाचारापेक्षाही सुखद सरकार मोदींनी चालवून दाखवलंय. थोडक्यात इतर नाकर्त्यांपेक्षा उत्तम सरकार, असं मोदींचं मूल्यांकन होऊ शकतं. दिर्घकाळ अनागोंदी असली मग काटेकोर कारभारही लोकांना उत्तम भासू लागतो. मोदींनी ती अपेक्षा पुर्ण केलीय. पण मोदींच्या या लोकप्रियतेनं त्यांचे विरोधक समाधानी नाहीत. त्यांना तर मोदींना अपुर्व लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन जाण्याची अनिवार इच्छा असावी. म्हणून विरोधकही मोदींना पुढल्या लोकसभेत अपुर्व बहूमत मिळावं, अशा तयारीला लागलेत. की आपल्या प्रामाणिक विरोधकांना मोदींनीच या कामाला जुंपलंय? लोकांनी आपल्याला नाकारावं म्हणून विरोधक इतकी मेहनत, अन्यथा कशाला करत असतील? मागल्या दोन वर्षात, म्हणजे प्रामुख्यानं पुरस्कार वापसीपासून सुरू झालेलं नाटक बघितलं, तर विरोधकांनी आपल्याला राष्ट्रद्रोही ठरवून घेण्यासाठी कमालीची मेहनत घेतलीय. नेहरू विद्यापीठातल्या मुठभर मुर्खांनी देशविरोधी घोषणा दिल्या आणि त्या मुलांना अटक करून भाजप सरकारनं एक खेळी केली. वरवर बघता देशद्रोहाचा असा आरोप कोर्टाच्या कसोटीवर टिकणारा नसतो. पण त्यातून सरकारवर दडपशाहीचा मात्र मोठा आरोप होऊ शकत असतो. कन्हैयाकुमार वा अन्य कोणी खालीद या विद्यार्थ्यांना त्या आरोपाखाली पोलिसांनी पकडलं, मग देशव्यापी गदारोळ विरोधी पक्ष करतील याची मोदींना खात्रीच होती. नाहीतरी पुन्हा आणिबाणी येतेय असा संशय व्यक्त केला जातच होता. तात्काळ मोदी विरोधी राजकारण्यांनी त्या घोषणाबाजांची तळी उचलून धरली. त्यांचा बचाव मांडायला काँग्रेसचे दिग्गज वकील कोर्टात धावले आणि राहुलसह केजरीवाल आणि डावे नेतेही नेहरू विद्यापीठात दाखल झाले. त्यातून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. पण देशातल्या सामान्य जनतेसमोर यातला प्रत्येक नेता आणि राजकीय पक्ष देशद्रोह्यांचा समर्थक असल्याची एक प्रतिमा तयार झाली. तिथून मग मोदी वा त्यांचे राजकीय सहकारी अशी खेळी करत गेले, की राजकारणात पुरोगामी वा सेक्युलर म्हणजे देशद्रोही वा पाकिस्तानवादी होत, अशी समजूत तयार व्हावी. गेल्या दोन वर्षात तशी प्रत्येक संधी विरोधकांनी सोडलेली नाही. आपल्याकडं पाकचे हस्तक वा देशद्रोही म्हणून बघितलं जावं, याची पुरेपुर काळजी विरोधकांनी घेतलीय. सहाजिकच प्रगती, राजकीय विचारसरणी, विकास असे मुद्दे बाजूला पडले असून, देशद्रोही विरुद्ध देशप्रेमी अशी संपुर्ण लोकसंख्येची विभागणी होत गेलीय. यातून आपण मतं आणि लोकांचा पाठींबा गमावत चाललो आहोत, याचंही भान विरोधकांना राहिलेलं नाही. मोदींनी तीन वर्षात मारलेली ही सर्वात मोठी राजकीय बाजी आहे. वाजपेयी असताना किंवा पंधरा वर्षापुर्वी भाजप किंवा हिंदूत्ववाद म्हणजे देशाचं विभाजन करणारी भूमिका विचारसरणी, अशी एक सार्वत्रिक समजूत तयार करण्यात आली होती. तात्कालीन तमाम माध्यमातल्या बातम्या, चर्चा किंवा लेख विवेचन वाचलं, तर देश हिंदूत्वामुळे धोक्यात असल्याचा पगडा दिसून येतो. आज हिंदूत्वाचा धोका हा विषय कुठल्या कुठे अडगळीत गेला असून; सेक्युलर, पुरोगामी म्हणजे देशद्रोही, अशी एक सार्वत्रिक मानसिकता रुजत चाललेलीय. पण अशा हिंदूत्वाला पंतप्रधान म्हणून मोदींनी चुकूनही खतपाणी घातलेलं. नाही. पण आपल्या डावपेचात किंवा कृतीमधून मोदी अशी काही खेळी करतात, की तमाम पुरोगामी विरोधकांनी हिंदूत्वाच्या ऐवजी राष्ट्रवाद वा राष्ट्रप्रेमाची खिल्ली उडवावी. देशासाठी प्राणार्पण करणार्या जवान सैनिकांच्या विरोधात सेक्युलर मतप्रदर्शन व्हावं. अशा गोष्टीचा सामान्य माणसाच्या मनावर मोठा परिणाम होत असतो. देशात किमान दोन कोटीहून अधिक माजी सैनिक आहेत आणि त्यांचे आप्तस्वकीय धरल्यास दहा कोटीच्या घरात तशी लोकसंख्या आहे. आपला कोणी सैनिक होता अन् त्यानं देशासाठी प्राणाची बाजी लावण्यात आयुष्य खर्ची घातलेले असेल, तर सैन्याच्या विरोधात बोलणाऱ्यांचं मुठभर बुद्धीमंत कौतुक करतील. पण हे सैनिकांचे दहा कोटी आप्तस्वकीय विरोधात जातील. याचं भान पुरोगाम्यांना राहिलं नाही. म्हणूनच उत्तरप्रदेशात भाजपला मोठे यश मिळालं होतं. या तीन वर्षात मोदींच्या नावावर असलेला हिंदूत्वाचा टिळा पुसला गेला असून, देशाची एकात्मता, अखंडता टिकवणारा कोणी मसिहा, अशी प्रतिमा त्यांच्या विरोधकांनीच निर्माण करून दिलीय. आपले विरोधक, प्रामुख्याने पुरोगामीत्व मिरवणारे म्हणजे देशद्रोही, अशी परिस्थिती मोदींनी निर्माण करून ठेवलीय. पंतप्रधान होण्यापुर्वीची मोदींची प्रतिमा आणि आजची प्रतिमा, यातला फ़रकच कहाणी वा हिशोब स्पष्ट करणारा आहे.
No comments:
Post a Comment