"खलिस्तानी दहशतवादी हरजिंदर सिंग उर्फ जिंदा आणि सुखदेव सिंग उर्फ सुखा यांनी 'ऑपरेशन ब्लू स्टार'चे नेतृत्व करणारे भारताचे माजी सेवानिवृ निवृत्त लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांची १० ऑगस्ट १९८६ रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या केली होती. जिंदा आणि सुखा यांनी स्वतः येरवडा कारागृह फोडण्याचा प्रयत्न केला नसला, तरी त्यांना सोडवण्यासाठी बाहेरून खलिस्तानी अतिरेकी कारागृहावर हल्ला करू शकतात, अशी गुप्तचर यंत्रणांची माहिती होती. यामुळे त्यांच्या फाशीच्या वेळी येरवडा कारागृह आणि संपूर्ण पुणे शहरात अभूतपूर्व लष्करी आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याच कडक सुरक्षेमुळे लोकांमध्ये अशी चर्चा पसरली असावी. असं वाटत असतानाच पंजाबमधल्या काहींना येरवडा कारागृहातून येरवडा कारागृहचा नकाशा पाठवला गेला होता. त्याला पुष्टीही मिळाली होती. तशी खळबळजनक आणि संवेदनशील बातमी दैनिक सामनातून प्रसिद्ध झाली होती. त्याचा हा वृत्तांत...!"
.......................................................
*सं*ध्याकाळची वेळ होती. बातम्या पाठविण्याची लगबग सुरू होती. तेवढ्यात सन्मित्र संजय नहार आले. तसे अनेक मान्यवर दैनिक सामनाचे कार्यालयात येत असत. तेव्हा सामनाचं कार्यालय शनिवार चौकात होतं. शिवाय कार्यालयासमोर पार्किंगसाठी मोठी जागा होती. त्यामुळं मंडईत आणि तुळशीबागेत खरेदीसाठी येणारे पत्रकार, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते इथं येत असत. सामनाचे कार्यालय सुरू होण्यापूर्वी इथं पत्रकार संघाचं कार्यालय होतं. त्यामुळं सगळ्यांचाच राबता इथं असायचा. संजय नहार हे काश्मीर, पंजाब इथल्या दहशतवादाविरोधात शांतता प्रस्थापित करण्यासाठी धडपडणारे कार्यकर्ते. कार्यालयातलं माझं काम संपवून मागवलेल्या चहाचे घोट घेत आमच्या गप्पा सुरू झाल्या. तशी त्यांची अन् माझी ओळख खूप जुनी होती. त्यामुळं साहजिकच अघळपघळ गप्पा सुरू झाल्या. या गप्पांच्या ओघात ते सहजपणे बोलून गेले की, लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य यांच्या हत्या प्रकरणातले दोन दहशतवादी जिंदा आणि सुखा हे येरवडा तुरुंगात होते. त्यांच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर असली तरी त्यांनी येरवडा कारागृहाचा नकाशा पंजाबातल्या त्यांच्या काही साथीदारांना पाठवला होता. अशाप्रकारचे वृत्त पंजाबमधल्या पंजाब केसरी दैनिकाचे संपादक विजयकुमार चोप्रा यांना ती मिळाली होती, ती त्यांनी त्यांच्या पंजाब केसरी दैनिकात लहानशा स्वरूपात प्रसिद्ध केली होती. संजय नहार हे विजयकुमार चोप्रा यांचे मानसपुत्र. त्यामुळं त्यांनी लगेचच संजय यांच्याकडे संपर्क साधून चौकशी करण्याबाबत सांगितले होते. संजय यांनी चर्चेच्या ओघात सहजपणे सांगितलेली बातमी, त्याची व्याप्ती, गांभीर्य आणि संवेदनशील किती आहे याची जाणीव होताच आम्ही हादरून गेलो. आम्ही कार्यालयातूनच चोप्रा यांना फोन करून त्यासंदर्भात माहिती घेतली. त्यांच्या सूत्रानं दिलेली ही बातमी होती. जिंदा आणि सुखा यांनी जो येरवडा कारागृहाचा नकाशा पाठवला होता. त्याची प्रत त्यांच्याकडे होती पण ती त्यांनी प्रसिद्ध केलेली नव्हती मग संजय यांनी त्यांच्याकडून फॅक्सवरून मागवून घेतली. त्यातले डिटेल पाहून आम्ही चकित झालो. पुढचं गेट, मागचं गेट, त्याच्या भिंती, उंची सारे वर्णन त्यात होतं. त्याची बातमी करावी अन् या चित्रासह प्रसिद्ध करावी असं ठरलं. मात्र तोवर गुप्तता पाळावी असं ठरलं.
तेव्हा सामनाचे पुणे आवृत्ती सुरू झालेली नव्हती. इथून फक्त बातम्या पाठवाव्या लागत होत्या. अगदी आवश्यक आणि तातडीच्या बातम्या या फॅक्सवरून पाठवल्या जाई अन् इतर कुरिअरने लिहून पाठवल्या जात असत. तेव्हा सामनाचे संपादक स्व. अशोक पडबिद्री होते अन् स्व. नंदकुमार टेनी हे वृत्तसंपादक होते. 'येरवडा कारागृह फोडण्याचा जिंदा सुखा यांचा प्लॅन...!' अशी बातमी तयार करून त्यात पंजाब केसरी दैनिकचे संपादक विजयकुमार चोप्रा आणि संजय नहार यांचा संदर्भ दिला होता. त्यासंदर्भातले रेखाचित्र देखील पाठवले होते. दुपारी कार्यालयात बातम्यांचं पाकीट नेहमीप्रमाणे प्रादेशिक विभाग पाहणाऱ्या उपसंपादकाने फोडलं. इतर बातम्यांबरोबरच येरवडा कारागृहाची बातमी पाहून तो उपसंपादक गडबडला. त्यानं धावतच वृत्तसंपादकांचं केबिन गाठलं. वृत्तसंपादक नंदकुमार टेनी देखील बातमी वाचून गडबडले, त्या संवेदनशील बातमीचं गांभीर्य त्यांना चांगलंच समजलं होतं. ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर त्याचे परिणाम काय होतील हेही त्यांना कळत होतं. त्यांनी थेट त्या बातमीची कागदपत्रे घेऊन संपादक अशोक पदबिद्री यांचं केबिन गाठलं. ती बातमी त्यांना दाखवली. ते थोडेसे चकित झाले. पण त्यातली सत्यता त्यांनी पडताळून पाहिली. मला फोन केला. ही बातमी कशी, कुठून मिळाली याबाबत चौकशी केली. मग त्यांनी संजय नहार आणि विजयकुमार चोप्रा यांच्याशी संपर्क साधून माहिती आणि बातमीतली सत्यता तपासून घेतली. ही देिशात, राज्यात, सरकार आणि गृहखाते यांच्या खळबळ उडवून देणारी बातमी होती. लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणारे दहशतवादी आपल्या राज्यात कारागृहात असताना अशाप्रकारचा प्लॅन ते करताहेत या बातमीनं सारा देश हादरणारा होता, शिवाय या संवेदनशील बातमीनं राज्याच्या गृहखात्याचे धिंडवडे निघणार होते. म्हणून मग पडबिद्री आणि टेणी यांनी सामनाचे संपादक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मातोश्री निवासस्थान गाठलं. त्यांच्याशी ती संवेदनशील बातमी, त्याचे सोर्स, त्या बातमीची व्याप्ती, परिणाम यांची चर्चा केली. त्यानंतर खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी मला फोन करून त्यातली सत्यता किती हे जाणून घेतलं. मी या बातमीशिवाय अप्रत्यक्षरित्या जो बंदोबस्त येरवडा कारागृहाला लावला होता त्याची माहिती घेतली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी तशी फारशी माहिती दिली नव्हती, पण बंदोबस्त असल्याची खात्री मी केली होती. त्यासंदर्भातली सर्व माहिती अगदी संजय नहारांची भेट यापासून बातमी पाठविण्यापर्यंतच्या घडामोडी मी त्यांना सांगितल्या. त्यानंतर त्यावर योग्य ते संपादकीय संस्कार करून कारागृह महानिरीक्षक, गृहमंत्री यांच्या प्रतिक्रिया आणि छायाचित्रासह ती संवेदनशील बातमी पहिल्या पानावर आठ कॉलमी मथळ्यासह प्रसिद्ध झाली. त्यामुळं राज्यात सरकार दरबारी, पोलिस खात्यात खळबळ उडाली. अनेकांनी मग त्या संवेदनशील बातमीचा फॉलोअपही घेतला.
'येरवडा कारागृह फोडण्याचा जिंदा सुखाचा प्लॅन....!' अशी संवेदनशील बातमी प्रसिद्ध होताच हलकल्लोळ माजला. पोलिस खात्यात खळबळ उडाली. कारागृह पोलिस, शहर पोलिस, सीआयडी, एलआयबी सर्व पोलिसी विभाग दक्ष झाले. केंद्रीय गृहखाते आणि पोलिस खात्याकडून चौकशी सुरू झाली. सामना कार्यालयाला पोलिस बंदोबस्त लावला गेला. मी नको म्हणत असताना मलाही बंदोबस्त दिला गेला. संजय नहार यांच्या घरी आधीपासूनच बंदोबस्त होता तो अधिक वाढविण्यात आला. दिल्लीवरून संजय नहार यांना फोन करून विविध सुरक्षा यंत्रणांनी भंडावून सोडले होते. इकडे वृत्तपत्रक्षेत्रात या बातमीनं गडबड उडाली होती. संजय नहार हे अनेक संपादक, पत्रकारांचे मित्र त्या सर्वांना वगळून त्यांनी मला ही बातमी दिली होती. त्यामुळं त्यांना अनेक पत्रकारांनी कोसलं होतं. आम्हाला ती संवेदनशील बातमी का दिली नाही असं म्हणत मोठ्या खपाच्या दैनिकांची नाराजी संजय नहार यांनी ओढवून घेतली होती. पण त्यांनी ती बातमी म्हणून मला दिली नव्हती तर चर्चेच्या ओघात मला ती आढळली अन् त्याचा मागोवा घेत त्याला मी खळबळजनक, संवेदनशील बातमीचं रूप दिलं होतं. जेव्हा त्या इन्फर्मेशनची बातमीच्या रूपात माहिती घेत होतो हे पाहून संजय आश्चर्यचकित झाले होते. सहजपणे चर्चेत सांगितलेलं एक वाक्य एवढ्या मोठ्या रूपात सादर होईल अन् त्याचे पडसाद देशभर उमटतील याची त्यांनाही कल्पना नव्हती. त्यांनी सकाळीच बातमी पाहून माझं अभिनंदन केलं होतं आणि त्यानंतर घडणाऱ्या घडामोडी सांगितल्या. या बातमीसाठी संपादक, शिवसेनाप्रमुखांनी जशी माझी पाठ थोपटून मला शाबासकी दिली तशी संजय नहार यांचं देखील कौतुक केलं.
ही बातमी प्रसिद्ध होताच आधीच कडेकोट बंदोबस्त असलेल्या येरवडा कारागृहाचा बंदोबस्त आणखी वाढविण्यात आला होता. तेव्हा जिंदा आणि सुखा त्यांच्यावरची न्यायालयीन सुनावणी कारागृहातच होत होती. काही वेळेला पत्रकारांना तिथं उपस्थित राहण्याची परवानगी मिळत असे. त्यासाठी मीही जात असे. त्या दहशतवादी जिंदा आणि सुखा यांचं न्यायालयातलं वागणं तेवढंच बिनधास्त असायचं अनेकदा ते घोषणाही देत असत. पण त्यांना भेटायला, बोलायला पत्रकारांना बंदी होती. आम्हाला बोलता येत नसे. खरं तर आम्हाला न्यायालयीन कामकाजाबरोबरच त्या दोघांचं म्हणणं बातमीसाठी हवं होतं. त्या दोघांना तिथं आणल्यानंतर मग आमच्यातल्याच एक ज्येष्ठ पत्रकाराने एक शक्कल लढवली. त्यानं त्या दोघांना बसल्या ठिकाणावरूनच सांगितलं की, 'आम्हाला तुमच्याशी बोलता येत नाही, पण तुम्हाला बोलता येतं ना, तुम्ही बोला ना, आम्ही लिहून घेऊ...!' ते बोलण्याचा प्रयत्न करताच त्यांना तिथून नेण्यात आलं. त्यानंतरच्या सुनावणीसाठी पत्रकारांना मज्जाव करण्यात आला. अगदी शेवटी सजा सुनावणीच्या दिवशी पत्रकारांना तिथं उपस्थित राहण्याची परवानगी दिली गेली. जिंदा आणि सुखा हे अत्यंत हाय-प्रोफाइल आणि धोकादायक कैदी होते. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यासाठी येरवडा जेलमध्ये विशेष 'अंडा सेल' उभारण्यात आला होता. हे दोघे या सेलमध्ये ठेवण्यात आलेले पहिले कैदी होते. २१ ऑक्टोबर १९८९ रोजी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर ९ ऑक्टोबर १९९२ रोजी त्यांना येरवडा कारागृहातील वधस्तंभावर फाशी देण्यात आली आणि त्याच दिवशी पुण्यात मुळा नदीजवळ त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
फाशी रात्रीच्या वेळी, पहाटे देण्यात येईल असं आम्हा बातमीदारांना सांगण्यात आलं होतं. वधस्तंभावर फाशी दिल्यानंतर लगेचच त्यांना येरवड्यातून लोहगाव विमानतळावर जाणाऱ्या रस्त्यावरून अंत्यसंस्कारासाठी नेलं जाईल असं सांगण्यात आल्यानं सारे पत्रकार त्याबाजूला दबा धरून बसले होते. नागरिकांसाठी तो रस्ता बंद करण्यात आला होता. येरवडा कारागृह प्रशासनाने मात्र आम्हा पत्रकारांना कात्रजचा घाट दाखवला. येरवडा कारागृहाच्या एका बाजूनं आम्ही जिथं जमलो होतो तो लोहगाव विमानतळाकडे जाणारा रस्ता तर दुसरीकडे विश्रांतवाडीहून आळंदीकडे जाणारा रस्ता आहे. आम्हा सगळ्या पत्रकारांना एका बाजूला रोखून धरून येरवडा कारागृह प्रशासनाने आणि पोलिसांनी त्या दोघांचे मृतदेह विश्रांतवाडी इथं नेऊन सकाळी ६:२० वाजता मुळा नदीजवळ त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार त्यांच्या नातेवाईकांनी केले. आम्हा पत्रकारांना ते काही समजलेच नाही. त्यामुळं त्या दोघांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रियाही घेता आल्या नाहीत. तत्कालीन महापौर भारत सावंत यांना आम्ही सारे पत्रकार इकडे आहोत हे समजल्यानंतर ते या बाजूला सकाळी ७ वाजता आले. त्यांनी तिकडे विश्रांतवाडीला अंत्यसंस्कार झाल्याचं सांगितलं. सारे पत्रकार रात्रभर तिथं होते पण त्यांना बातमी काही मिळाली नाही.
चौकट
अटक आणि मृत्यू
१७ सप्टेंबर १९८६ रोजी, सुखाचा पिंपरी, पुणे इथं एका ट्रकसोबत अपघात झाला आणि त्याला अटक करण्यात आली. तो त्याच काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर होता, जी जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या हत्येच्या वेळी वापरण्यात आली होती. जिंदाला मार्च १९८७ मध्ये दिल्लीतील गुरुद्वारा मजनू दा टिल्ला इथं अटक करण्यात आली. अटकेच्या वेळी त्याच्या पायात गोळ्या घालण्यात आल्या. त्यांच्या न्यायालयीन खटल्यादरम्यान, हत्येची कबुली देऊनही, त्यांनी स्वतःला निर्दोष घोषित केलं आणि आपल्या कृतीचं समर्थन करताना म्हटलं की, 'वैद्य एका गंभीर गुन्ह्यासाठी दोषी होते, ज्याची शिक्षा केवळ मृत्यूदंडच असू शकते...!'. २१ ऑक्टोबर १९८९ रोजी दुपारी २:०५ वाजता त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ९ ऑक्टोबर १९९२ रोजी पहाटे, सुखदेव सिंग सुखा आणि हरजिंदर सिंग जिंदा यांना मृत्यूदंड देण्यात आला. येरवडा कारागृहाच्या आवारात उभारलेल्या फाशीच्या खांबाकडे त्यांच्या कोठडीतून नेत असताना, त्या दोन दोषी मारेकऱ्यांनी पंजाबमधील शीख स्वातंत्र्यासाठी घोषणा दिल्या.
चौकट
*अशी झाली अरुणकुमार वैद्य यांची हत्या*
१० ऑगस्ट १९८६, सकाळचे साधारण साडेअकरा वाजले होते, शहर पुणे. शांत अशा कँप परिसरात जिथं लष्कराच्या दक्षिण कमांडचं मुख्यालय आहे त्या राजेंद्रसिंहजी मार्गावरून एक मारुती कार चालली होती. वळण्यासाठी गाडीने वेग कमी केला आणि तेवढ्यात दोन बाईकस्वार गाडीच्या समांतर आले. त्या बाईकवर मागे बसलेल्या माणसाने कार चालवणाऱ्या व्यक्तीवर एकापाठोपाठ एक गोळ्या झाडल्या आणि वेगाने ते पसार झाले. गाडी चालवणारी व्यक्ती म्हणजे तेव्हा निवृत्त झालेले भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल अरुणकुमार श्रीधर वैद्य! सुवर्ण मंदिरात लपलेल्या खलिस्तानवाद्यांना संपवण्यासाठी झालेल्या 'ऑपरेशन ब्लू स्टार'चा बदला घेण्यासाठी जनरल वैद्य यांची हत्या केली गेली. ऑगस्ट १९८३ मध्ये जनरल वैद्य यांनी लष्कराची सूत्रं हाती घेतली तेव्हा पंजाब धुमसत होता. खलिस्तानवाद्यांचं प्रस्थ वाढत चाललं होतं. ऑपरेशन ब्लू स्टार राबवून अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात शिरले होते. भारतीय सैन्याचे रणगाडे घुसविलेले होते, ८० बाटल्या रक्त चढवूनही त्यांचा जीव वाचला नाही. या सगळ्याला पायबंद घालण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लष्करी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले होते. १० ऑगस्ट १९८६ रोजी, ऑपरेशन ब्लू स्टारचे सूत्रधार जनरल अरुण कुमार वैद्य बाजारातून गाडी चालवत घरी जात असताना जिंदा आणि सुखा यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. हल्लेखोरांनी मोटार स्कूटरवरून त्यांच्या गाडीजवळ येऊन गाडीवर आठ ते नऊ गोळ्या झाडल्या. डोक्याला आणि मानेला झालेल्या जखमांमुळे वैद्य यांचा जागीच मृत्यू झाला. गाडीतच असलेल्या त्यांच्या पत्नीच्या पाठीत आणि मांडीत चार गोळ्या लागून त्या जखमी झाल्या.
हरीश केंची,
९४२२३१०६०९
अरुणकुमार वेैद्य
*हैदराबाद ते बांगलादेश व्हाया पाकिस्तान*
श्रीधरपंत आणि इंदिराबाई वैद्य यांच्या घरी २७ जानेवारी १९२६ ला मुलगा जन्माला आला. त्याचं नाव ठेवलं गेलं अरुणकुमार. अलिबाग, पुणे, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत, १९४४ साली, म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षी अरुणकुमार कॅडेट बनला आणि पुढच्याच वर्षी 'डेक्कन हॉर्स' या पलटणीत दाखल झाला. १८ व्या शतकात घोडदळाची पलटण म्हणून सुरू झालेल्या 'डेक्कन हॉर्स'मध्ये कालांतराने रणगाडेही सामील झाले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हैदराबादसारखी संस्थानं अजून स्वतंत्रच होती. निजामाविरोधात झालेल्या कारवाईत लष्कराचीही भूमिका होती. एव्हाना वैद्य सैन्यात कॅप्टन झाले होते. दौलताबाद, परभणी या भागात त्यांनी लष्करी कारवाईत भाग घेतला, असं डॉ. सौ. भाग्यश्री पाटसकर यांनी आपल्या 'जनरल अरुणकुमार वैद्य' या पुस्तकात लिहीलंय. अरुणकुमार वैद्यांच्या लष्करी कारकीर्दीतला महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९६५ चं भारत-पाकिस्तान युद्ध. पंजाबमधल्या खेमकरण, असल उत्तर, चीमा या प्रांतात भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात तुंबळ लढाई झाली. डेक्कन हॉर्स रेजिमेंट या लढाईत कार्यरत होती आणि त्यांचे कमांडिंग ऑफिसर होते लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले अरुणकुमार वैद्य.
पाकिस्तानी सैन्याचे अमेरिकन बनावटीचे पॅटन रणगाडे आग ओकत होते. त्या रणगाड्यांना जायबंदी करून भारतीय लष्कराने निर्णायक विजय मिळवला.
या युद्धात अतुलनीय शौर्य दाखवल्याबद्दल हवलदार अब्दुल हमीद यांना 'परमवीर चक्र' हा सर्वोच्च लष्करी सन्मान मरणोत्तर प्रदान केला गेला. लेफ्ट. वैद्य यांनाही याच लढाईत 'महावीर चक्र' हा दुसरा सर्वोच्च लष्करी पुरस्कार दिला गेला. या लढाईत सुमारे शंभर पाकिस्तानी रणगाडे उद्ध्वस्त केले गेले तर ४० पेक्षा अधिक ताब्यात घेण्यात आले.
या युद्धानंतर ६ वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान एकमेकांना भिडले. साल १९७१, यावेळी मुख्य लक्ष पूर्व पाकिस्तानवर असलं तरी पश्चिम सीमाही पूर्णतः शांत नव्हतीच. जम्मूपासून अगदी जवळ असलेल्या शकरगढ सेक्टरमध्ये बसंतरच्या लढाईत भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात तीव्र सामना झाला. ही लढाईसुद्धा रणगाड्यांसाठी गाजली. एव्हाना ब्रिगेडियरपदी पोहोचलेले अरुणकुमार वैद्य या युद्धातही होते. पाकिस्तानी सैन्याकडून होणारा मारा चुकवत आपल्या रणगाड्यांना पुढे सरकवण्याचं काम त्यांनी मोठ्या कौशल्याने केलं. या सगळ्या भागात रणगाडे उद्ध्वस्त करणारे भू-सुरूंग लावलेले होते त्यांना चुकवत वैद्यांनी ही कामगिरी केली. या लढाईत ६२ पाकिस्तानी रणगाडे उद्ध्वस्त केले गेले. या कामगिरीसाठी ब्रिगेडियर वैद्य यांना दुसऱ्यांदा महावीर चक्र प्रदान केलं गेलं ज्याला सैन्याच्या परिभाषेत 'Bar to Maha Vir Chakra' असं म्हटलं जातं.
*लष्करप्रमुखपद आणि वाद*
वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पेलत आणि पदोन्नती होत जनरल अरुणकुमार वैद्य ऑगस्ट १९८३ मध्ये लष्करप्रमुख झाले. पण त्यांची ही नेमणूक वादापासून लांब नव्हती. भारतीय लष्कराचे तत्कालीन उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सिन्हा यांची ज्येष्ठता डावलून लेफ्टनंट जनरल वैद्य यांना बढती दिली गेली, असा आक्षेप घेतला गेला. लेफ्ट. जनरल सिन्हा यांच्याकडे लेफ्ट. जनरल वैद्य यांच्याइतका प्रत्यक्ष लष्करी कारवाईचा अनुभव नव्हता असं कारण तेव्हा पुढे केलं गेलं. पण सिन्हा यांच्या काही भूमिका सरकारला रुचणाऱ्या नव्हत्या त्यामुळे त्यांना डावललं गेलं असा अंदाज तेव्हा अनेकांनी व्यक्त केला होता. अर्थात अनुभव किंवा कर्तृत्वाच्या बाबतीत जनरल वैद्यांबदद्ल कोणतीही शंका असण्याचं कारण नव्हतं.
*'ऑपरेशन ब्लू स्टार' कारवाई*
जून महिना उजाडला तसे पंजाबात कठोर निर्बंध लागले. अमृतसर शहरात कर्फ्यू लागला, पत्रकारांना शहरातून बाहेर काढलं गेलं, होत्या नव्हत्या त्या फोन लाईन्सही बंद झाल्या. ६ जून १९८४ ला सुवर्ण मंदिराला आपला तळ बनवलेले धार्मिक नेते भिंद्रनवाले आणि त्यांचे सशस्त्र अनुयायी विरुद्ध भारतीय लष्कर यांच्यात निकराचा सामना झाला.
शीखांसाठी पवित्र अशा सुवर्ण मंदिर आणि अकाल तख्तमध्ये घुसून सैन्याला कारवाई करावी लागली, अकाल तख्तचं नुकसान झालं, पण अखेर भिंद्रनवालेंसह त्यांच्या अनुयायांचा पाडाव झाला आणि खलिस्तानी चळवळीच्या नेतृत्वालाच सैन्याने खिंडार पाडलं. भिंद्रनवाले मारले गेले तरी त्यांचे अनुयायी संपले नव्हते. त्यांना मानणारा आणि भारतापासून वेगळं होऊन शिखांचं स्वतंत्र राष्ट्र मागणारा मोठा वर्ग पंजाबात आणि बाहेरही होता.
भिंद्रनवालेंच्या मृत्यूबद्दलच्या संतापातून 'ऑपरेशन ब्लू स्टार'शी संबंधित दोन मोठ्या व्यक्तिमत्वांची शीख कट्टरतावाद्यांनी हत्या केली. पहिली, ऑक्टोबर १९८४ मध्ये इंदिरा गांधींची आणि दुसरी ऑगस्ट १९८६ मध्ये जनरल वैद्य यांची!
*ऑपरेशन ब्लू स्टार आणि हिंसाचार*
पंजाबात खलिस्तानवाद्यांचा वाढत चाललेला जोर जेव्हा आटोक्यात येतच नव्हता आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हं दिसत होती तेव्हा अखेर इंदिरा सरकारने लष्कराला पाचारण केलं. सुवर्ण मंदिरातील लष्करी कारवाईचं नेतृत्व केलं मेजर जनरल ब्रार यांनी, या संपूर्ण मोहीमेची जबाबदारी होती मेजर जनरल सुंदरजी जे पुढे लष्करप्रमुख झाले यांच्यावर आणि तेव्हा लष्करप्रमुख होते जनरल वैद्य. ऑपरेशन ब्लू स्टार संपल्यानंतर इंदिरा सरकार आणि लष्कराविरोधातही रोष उसळला. लष्कराने शीखांवर अत्याचार केल्याच्या अनेक अफवा उठल्या, देशाच्या अनेक कानाकोपऱ्यांत हिंसक घटना झाल्या. केवळ चार महिन्यांतच पंतप्रधान इंदिरा गांधींची दिल्लीतल्या राहत्या निवासस्थानी त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली.
भारतीय सैन्यात विविध हुद्द्यांवर असलेल्या अडीच हजार पेक्षा जास्त शीख सैनिकांनी लष्कर सोडलं. जनरल वैद्य यांनी १९८५ साली इंडिया टुडे मासिकाला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल म्हटलं होतं, "आपल्या जमातीबद्दलची निष्ठा राष्ट्रीय निष्ठेपेक्षा वरचढ ठरल्याचा तो प्रकार होता. लष्करातल्या ७५ शीखबहुल युनिट्सपैकी ८ युनिट्समध्येच या घटना घडल्या हे विसरू नका. दुष्प्रचार आणि चिथावणी ज्या युनिट्समध्ये नेतृत्वापेक्षा बलशाली ठरली तिथेच हे पाहायला मिळालं....!" ब्लू स्टारमध्ये सहभागी प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांना कट्टरतावाद्यांकडून अनेक वर्षं धमक्या येत होत्या. जनरल वैद्यही त्याला अपवाद नव्हते. त्यांना घोडेस्वारीची आवड होती, ते अनेकदा दिल्ली रेसकोर्सवर रपेट मारायला जात. त्यांना यंत्रणांनी असं न करण्याचा सल्ला दिला. निवृत्तीनंतर त्यांच्या जिवाला अधिक धोका आहे हे ओळखून त्यांना सुरक्षा दिली गेली. एक पोलीस हवलदार! जनरल वैद्यांच्या मृत्यूवेळी पुण्याचे पोलीस आयुक्त असलेले बी. जे. मिसार यांनी इंडिया टुडे मासिकाशी बोलताना, 'धमक्यांना न घाबरता आपण धोका पत्करायला तयार आहोत' असं जनरल वैद्य यांनी त्यांना सांगितल्याचं म्हटलं होतं.
*शीख मारेकऱ्यांचं पुढे काय झालं?*
जनरल वैद्य यांच्या मारेकऱ्यांपैकी सुखविंदर सिंह उर्फ सुखा याला एका महिन्यानंतर पुणे पोलिसांनी पिंपरीमधून अटक केली. त्याचा सहकारी जिंदा याला दिल्लीतून अटक केली गेली. दोघांनी कोर्टात आपण जनरल वैद्य यांना मारल्याचं कबूल केलं, पण तो गुन्हा होता असं मानायला दोघे तयार नव्हते. कारण सुवर्ण मंदिरातली कारवाई हा शीख धर्माचा अपमान होता आणि तो करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवला अशी त्यांची धारणा होती. अनेक खलिस्तान समर्थकांचीही हीच धारणा आहे, त्यामुळेच अनेक समर्थक या दोघांचं आजही कौतुक करतात. या दोघा मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा दिली गेली. या दोघांच्या आयुष्यावर २०१५ साली एक चित्रपट आणला गेला, ज्यावर भारतात बंदी घालण्यात आली. जनरल अरुण कुमार वैद्य यांनी वयाची चाळीस वर्षं लष्करी सेवेत काढली. भारतीय लष्करातल्या अत्यंत विभूषित अशा अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. परम विशिष्ट सेवा मेडल, दोन वेळा महावीर चक्र आणि अतिविशिष्ट सेवा मेडल या लष्करी सन्मानांबरोबरच त्यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मानही प्राप्त होता. १९७१ सालच्या युद्धानंतर तेव्हा ब्रिगेडियर असलेल्या वैद्य यांना दुसऱ्यांदा महावीर चक्र पुरस्कार घोषित झाला त्यात लिहीलेला मजकूर असा होता, "ब्रिगेडियर वैद्य यांनी शत्रूशी लढताना भारतीय सैन्याच्या सर्वोत्तम परंपरांना अनुसरून सर्वकाळ अतुलनीय शौर्य, कौशल्य, दुर्दम्य इच्छाशक्ती, दूरदृष्टी आणि कल्पकता दाखवली!" भारताच्या इतिहासातले राजकीय आणि लष्करी प्रवाह जिथे एकमेकांत मिसळून जातात अशी प्रकरणं मोजकी आहेत. त्यातल्या एकापेक्षा जास्त प्रकरणांमध्ये आघाडीवर राहिलेल्या एका सैनिकाची ही कहाणी.
*सुखदेव सिंग सैनी बनवाईत*
सुखा हा खलिस्तान कमांडो फोर्स या दहशतवादी संघटनेचा सदस्य आणि ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळी भारतीय लष्कराचे प्रमुख तसेच या ऑपरेशनचे सूत्रधार असलेल्या अरुण वैद्य यांच्या मारेकऱ्यांपैकी एक होता. अर्जन दास, ललित माकन आणि जनरल वैद्य या तीन हाय-प्रोफाईल हत्यांसाठी तो जबाबदार होता. तो खलिस्तान कमांडो फोर्सच्या इतर सदस्यांसह त्याचे प्रमुख जनरल लाभ सिंग यांच्यासह पंजाब नॅशनल बँकेच्या मिलर गंज शाखेतील लुधियानामध्ये बँक दरोड्यात सामील होता, ज्यामध्ये ५.७० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम लुटण्यात आली होती.
*सुरुवातीचे आयुष्य आणि कौटुंबिक पार्श्वभूमी*
सुखदेव सिंग यांचा जन्म १९६२ साली १४ श्रावण, बुधवारी, राजस्थानमधील गंगानगर जिल्ह्यातील करणपूर तहसीलच्या चक एन ११ एफ येथे झाला. ते सैनी जातीचे होते. त्यांचे आई-वडील, मेंघा सिंग बनवाईत आणि सुरजीत कौर बनवाईत हे शीख शेतकरी होते. हे शीख कुटुंब मूळचे होशियारपूर जिल्ह्यातील भुंगरणी गावचे होते. त्यानंतर, ते अविभाजित पंजाबमधील लायलपूर जिल्ह्यातील सैनी बार भागातील चक १७९ येथे स्थलांतरित झाले. १९३० ते १९३३ या वर्षांदरम्यान, हे कुटुंब पुन्हा एकदा राजस्थानमधील श्री गंगानगर जिल्ह्यातील चक एन ११ एफ येथे स्थलांतरित झाले. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या मूळ गावी, मानकपूर येथे झाले. १९८३ मध्ये त्यांनी करणपूर येथील ज्ञान ज्योती कॉलेजमधून बीएची पदवी मिळवली आणि ऑपरेशन ब्लूस्टार घडले तेव्हा ते एमए इंग्रजीचे शिक्षण घेत होते. त्यांनीही आपले शिक्षण सोडून खलिस्तान फुटीरतावादी चळवळीत प्रवेश केला.
*जिंदा आणि सुखा यांनी केलेल्या हत्या*
३१ जुलै १९८५ रोजी, हरजिंदर सिंग जिंदा आणि सुखदेव सिंग सुखा यांनी रणजित सिंग गिल यांच्यासोबत मिळून काँग्रेस आय चे खासदार ललित माकन यांची गोळ्या झाडून हत्या केली. जेव्हा ते नवी दिल्लीतील कीर्ती नगर येथील त्यांच्या घरासमोर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या त्यांच्या गाडीकडे जात होते. माकन आश्रयासाठी घराकडे धावत असतानाही तिन्ही हल्लेखोरांनी गोळीबार सुरूच ठेवला. या गोळीबारात माकन यांच्या पत्नी गीतांजली आणि एक पाहुणा, बालकिशन, हे देखील सापडले. हल्लेखोर त्यांच्या स्कूटरवरून पळून गेले. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीदरम्यान झालेल्या शिखांच्या हत्यांमध्ये ललित माकन यांचा सहभाग असल्याचे मानले जात होते. 'हू आर द गिल्टी' नावाच्या पुस्तिकेत, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज ने त्या २२७ लोकांची यादी दिली ज्यांनी तीन दिवसांत ३ हजार पर्यंत शिखांची हत्या करणाऱ्या जमावाचे नेतृत्व केले होते. या यादीत ललित माकन यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर होते. रणजित सिंग "गिल" याला १४ मे १९८७ रोजी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे इंटरपोलने अटक केली होती, प्रदीर्घ कायदेशीर खटल्यांनंतर मे १९९७ मध्ये त्याला भारतात परत पाठवण्यात आले आणि २४ फेब्रुवारी २००३ रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जनरल अरुण वैद्य हे भारतीय लष्कराचे प्रमुख होते, ज्यांनी ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान अमृतसर आणि पंजाबमधील इतर ठिकाणच्या सर्वात पवित्र शीख तीर्थक्षेत्रांवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. भारतीय गुप्तचर सूत्रांनुसार, शीख अतिरेक्यांच्या हत्येच्या यादीत वैद्य हे चौथ्या क्रमांकाचे लक्ष्य होते आणि ऑपरेशन ब्लू स्टारच्या प्रत्युत्तरात मारल्या गेलेल्या अनेक लोकांपैकी ते एक होते. या हत्येनंतर, खलिस्तान कमांडो फोर्सने एक निवेदन जारी करून जाहीर केले की गोल्डन टेम्पल ऑपरेशनच्या प्रत्युत्तरात वैद्य यांना ठार मारण्यात आले होते. १९८४ च्या शीखविरोधी दंगलींमध्ये सहभाग असल्यामुळे काँग्रेस आय नेते अर्जन दास यांचीही या दोघांनी हत्या केली होती. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जी. टी. नानावटी यांच्या अध्यक्षतेखालील नानावटी आयोगाला निष्पाप शीख पीडितांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये अर्जन दास यांचे नाव आले होते.
*सार्वजनिक निदर्शने*
त्यांच्या फाशी नंतर शीखबहुल पंजाब राज्यात विद्यार्थी आणि दुकानदारांनी निदर्शने केली आणि नवी दिल्ली, पुणे दक्षिणेकडील शहर जिथे दोन मारेकऱ्यांना फाशी देण्यात आली होती आणि संपूर्ण पंजाबमध्ये सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. स्मृतिसभा आणि त्यानंतर सरकारने सुवर्ण मंदिराचा ताबा घेणे. त्यांच्या स्मृती सभेच्या दिवशी, शेकडो सैनिक आणि पोलिसांनी सुवर्ण मंदिराला वेढा घातला. पहाटेच्या वेळी शेकडो शिखांना सुवर्ण मंदिरातून बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले. राज्यव्यापी अटकसत्रात शीख नेते सिमरनजीत सिंग मान, प्रकाश सिंग बादल, गुरचरण सिंग तोहरा आणि इतर ३०० जणांना अटक करण्यात आली. काही लोकांनी या धार्मिक स्थळात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. अंदाजे ३०० शिखांनी पोलिस कारवाईला उघडपणे विरोध केला आणि मारेकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि शीख मातृभूमी खालिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देत मंदिराच्या आवारात ३० मिनिटांची स्मृती सभा घेतली. सुवर्ण मंदिराच्या पुजाऱ्याने जिंदा आणि सुखा यांच्या वडिलांना सुवर्णपदके प्रदान केली. स्मृती सभेच्या ३ तासांनंतर मंदिरावरील पोलिसांची पकड उठवण्यात आली. ऑक्टोबर १९९९ मध्ये, अमृतसर जिल्ह्यातील गडली गावात त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली, जिथे अकाळ तख्त अमृतसरचे प्रमुख ज्ञानी पुरण सिंग यांनी जनरल वैद्य यांच्या हत्येच्या कृतीचे समर्थन करताना जिंदा आणि सुखा यांना राष्ट्रीय शहीद म्हणून घोषित केले. काही अकाली नेते या कार्यक्रमापासून दूर राहिले. ९ ऑक्टोबर २००० रोजी, सत्ताधारी शिरोमणी अकाली दल, एसएचएसएडी, एसजीपीसी, दमदमी टक्साल, एआयएसएसएफ आणि दल खालसा यासह सर्व प्रमुख शीख संघटनांच्या प्रतिनिधींनी हरजिंदर सिंग जिंदा आणि सुखदेव सिंग सुखा यांच्या आठव्या पुण्यतिथीला हजेरी लावली. जिंदा आणि सुखा यांना आदरांजली वाहण्यासाठी, अकाल तख्तचे शीखांचे सर्वोच्च ऐहिक आसन प्रमुख ज्ञानी जोगिंदर सिंग वेदांती यांनी 'अरदास' एक शीख धार्मिक विधी पार पाडला. या कार्यक्रमादरम्यान सुखा आणि जिंदा या दोघांनाही शीख राष्ट्राचे "महान शहीद" म्हणून घोषित करण्यात आले.
९ ऑक्टोबर २००२ पासून, जिंदा यांच्या पुण्यतिथीला, जनरल वैद्य - जिंदा आणि सुखदेव सिंग सुखा यांच्या मारेकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते. २००२ मध्ये अकाल तख्तचे प्रमुख ग्यानी जोगिंदर सिंग वेदांती यांनी जिंदा यांच्या आईचा गौरव केला. ऑक्टोबर २००५ पासून, दल खालसा, दमदमी टक्साल, अकाल फेडरेशन आणि शीख स्टुडंट्स फेडरेशन इत्यादींसह विविध शीख संघटनांनी त्यांच्या मूळ गाव गडली इथं त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. कॅनडातील सरे इथल्या दशमेश दरबार शीख मंदिरात जिंदा आणि सुखा या दोघांसाठी विशेष प्रार्थना आयोजित करण्यात येते. ९ ऑक्टोबर २००८ पाडूn, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने जिंदा आणि सुखा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुवर्ण मंदिर परिसरात त्यांच्या कुटुंबीयांना आदरांजली वाहिली जाते. एसजीपीसीने जिंदा आणि सुखा यांना 'शीख राष्ट्राचे शहीद' म्हणून घोषित केले आणि पुढे असेही म्हटले की जिंदा आणि सुखा यांनी ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेतला.
No comments:
Post a Comment