नुकतंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कार्यकाळाला २५ वर्षं पूर्ण झाली म्हणून देशभरात उत्सव साजरा झाला. त्यानिमित्तानं एका पुस्तकाच्या दुकानात मोदींवर लिहिलेल्या पुस्तकांचं प्रदर्शन मांडलेलं होतं. त्या साऱ्या पुस्तकात 'आज के शिवाजी : नरेंद्र मोदी' हे पुस्तक आढळलं. हे पुस्तक संघ आणि भाजपच्या मुशीतून घडलेल्या जय भगवान गोयल यांनी लिहिलंय. गोयल यांची ही उचापत जाणीवपूर्वक झालीय असा हेत्वारोप करावा असं प्रयोजन नाही. मात्र मोदी शहा यांच्या पंजात सापडलेल्या भाजपला काहीही आणि कसंही करून मोदींना 'इतिहास पुरुष' ठरवायचंय. पौराणिक करायचंय. त्यामुळं त्याची प्रतिमा 'लार्जर दन लाईफ' म्हणजे प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट, कितीतरी मोठी करण्याचा प्रयत्न दिसतो. गोध्राकांडानं त्यांची प्रतिमा 'हिंदू राष्ट्रवादी नेता' अशी उभं करण्यात आलीय.
.............................................
मोदींच्या चरित्रांची सर्व भारतीय प्रादेशिक भाषेत प्रसिद्ध करून वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आजवर अशी पाचशेहून अधिक छोटी मोठी पुस्तकं विविध भाषेत प्रसिद्ध झालीत. या पुस्तकात एकसुरीपणा, उदात्तीकरण, अशा शब्दांचा समुच्चय खच्चून भरलाय. 'द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी अँड हिज इंडिया' या शशी थरूर यांच्या पुस्तकाचा अपवाद वगळता कोणताही लेखक वास्तवाला भिडलेला नाही. गोयल यांचं पुस्तक हे फक्त महिमामंडन आणि चापलुसीगिरीसाठी पुढं आलेलंय. मोदी स्वपक्षात किती धाक ठेऊन आहेत हे आपण जाणतोच!
फडणवीस हे आपल्या एका भाषणात 'आपले नेते मोदी आणि आपण त्यांचे सारे मावळे..!' असं म्हटलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी हे भारताचे राष्ट्रपिता आहेत असं विधान केलं होतं. प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार असल्याची आरती गायली होती. व्यंकय्या नायडू, शिवराजसिंह चौहान यांनी मोदी हे ईश्वरी अवतार असल्याचं म्हटलं होतं. या साऱ्यातून मोदी यांचं नाव सतत चर्चेत राहावं असा हेतू असतो. मोदींची फिडबॅक टीम आणि थिंक टँक यांना मोदींना राष्ट्रपुरुष करायचंय. स्वतः मोदी आपण स्वतः 'नॉन बायोलॉजिकल' असल्याचं सांगतात. तसं लिहितात, वागतात, आणि बोलतातही. तसंच सरदार पटेल, महात्मा गांधी यांना टाळता येत नाही म्हणून त्यांचं नाव घ्यावं लागतं. बाकी कोणी नाही. मी आणि मीच म्हणजे मोदी! संत तुकोबारायांनी ३५० वर्षापूर्वीच घेतलाय. ते म्हणतात-
वाघाचा कलभूत, दिसे वाघाऐसा l
परि नाही दशा, साच अंगी ll
तरीही जनतेने 'छत्रपती शिवराय' समजावं, अशी मोदी यांची मानसिक गरज असली, तरी आपलं सामाजिक चारित्र्य आणि समकालीन परिस्थिती तशी बिलकूल नाही. एवढंच कशाला, मोदी यांनी अगोदर अटलबिहारी वाजपेयी होऊन पाहावं! पण ही अपेक्षापूर्ती ते करणार नाहीत. विकसनशील आणि बहुधर्मीय देशात, तेवढ्याच व्यापक अशा बहुसांस्कृतिक देशात सत्ता प्राप्त करण्यासाठी, ती सत्ता राबवण्यासाठी, सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी कोणतं मॉडेल वापरायचं, याचं उत्तम ज्ञान अन् भान मोदींना आहे. म्हणून ते या मॉडेलमधले विष्णूचा अवतार, ईश्वरी अवतार, राष्ट्रपिता, छत्रपती शिवाजी यांचाच वापर करत आहेत. सावरकर, हेडगेवार वा गोळवलकर गुरुजी यांच्या नावाचा वापर करणार नाहीत. कारण ती नावं या कामी बिनकामाची आहेत. असं असलं तरी, भावना भडकवणारे वा प्रतीकात्मक विषय पुढं करायचं आणि राजकीय सत्तेचं वास्तविक प्रश्नासंबंधातले अपयश लपवायचं, हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. त्यासाठी एक वाद निर्माण करायचा आणि त्याचा तर्कसंगत निवाडा होण्याआधीच दुसरा बाष्फळ वाद पुढं आणायचा, हा उद्योग टीम मोदी गेली बारा वर्षं करत आहे. कायद्याच्या राज्यात आर्थिक आणि सामाजिक प्रश्न हेच राजसत्तेच्या कार्यक्रमपत्रिकेवर अग्रस्थानी असायला हवेत. पण साडेबारा वर्षं नेमक्या त्याच आघाडीवर मोदी सरकार अपयशी आहे. दरम्यान, भावनिक आणि इतर उपविषय इतके होऊन गेलेत की, त्याची काही मोजणीच करता येत नाही. काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी रायगडावर येऊन 'शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ...!' अशी घोषणा केली; तेव्हाच हे प्रतिमा हरण होणार, हे नक्की झालं ! काळाच्या ओघात प्रागतिक पक्षात असणारे छत्रपतींचे वारस मोदींच्या चेल्यांनी भाजपमध्ये आणले. त्यांच्यापुढे पद-प्रतिष्ठा, मंत्री-संत्री अशी लालसा उभी केली. त्यामुळेच मोदीभक्तांची मजल 'शिवाजी के बाद' म्हणण्यापर्यंत मजल गेली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस उक्ती आणि कृतीनं अडखळणारे असले, तरी महाराष्ट्रातले जनता बाळबोध नाही. सूर्य आणि मर्क्युरी दिव्याची तुलना सहन करणारी नाही.
आपल्या समाजाला ढोंगाचं भारी कौतुक असतं. म्हणजे आदर्शाचं दुसरं नावच मुळी ढोंग असतं, हे कधी ना कधी स्पष्ट होतंच. जे आपण करतो ते दुसरा कुणी करीत असेल, तर काही विशेष असं वाटत नाही. मात्र आपण जे काही करत नाही, ते दुसरं कुणी करत असेल, तर त्याचं आपल्याला भारी कौतुक असतं. असा कौतुकवीर आपला आदर्श किंवा नेताच बनतो. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानामध्ये यतीधर्म सांगितलाय. या यतीधर्माची लक्षणं खूप विस्तारानं सांगता येतील. आजच्या संदर्भात यतीधर्म म्हणजे आहार, निद्रा, भय आणि मैथुन यांच्या पलीकडं गेलेला किंवा समाजाने स्थापित केलेल्या नैतिकतेचे सर्व मानदंड पाळणारा असा पुरुष; म्हणजे यती! असा यती असणं म्हणजे अवघ्या समाजाचं लक्ष वेधून घेण्यास तो पात्र ठरतो. प्राचीन भारतीय परंपरेनं अशी मर्यादापुरुषोत्तम, धर्मराज, सत्यवचनी अशी किती किती म्हणून पात्रं जन्माला घातलीत, ती पुराणकथांतून ऐकायला, वाचायला मिळतात. त्या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी; प्रवाहित ठेवण्यासाठी असाच आदर्श समाजा पुढं आणला जातो. कंत्राटी मीडियातल्या कंत्राट्यांनी असाच एक राष्ट्रपुरुष जन्माला घातलाय. त्याचं नाव नरेंद्र मोदी ! या नरेंद्र मोदींना राष्ट्रीय स्तरावर जन्माला घालताना ते अविवाहित असल्याचं बरंच मार्केटिंग करण्यात आलं. ते अविवाहित आहेत, म्हणजे मोह-मायेच्या पलीकडे गेलेले आहेत. अविवाहित असल्यानं त्यांनी आपल्या साऱ्या इंद्रियांवर विजय प्राप्त केलाय ! ते अविवाहित आहेत, असं सांगण्यामागे ते ब्रह्मचारी आहेत अर्थात, ब्रह्मचारी असण्याचा अर्थ व्यापक आहे असाही अर्थ अनुस्यूत होतो. अर्थात, अविवाहित असण्याचा आणि ब्रह्मचर्याचा काहीही संबंध नसतो, याची चर्चा मागे अटलबिहारी वाजपेयींच्या उमेदीच्या काळात झालीच आहे. आता मात्र, मोदींच्या ते अविवाहित असल्यानं मोह-मायेपासून दूर आहेत, या प्रतिमेचा बुरखा इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्राने फाडला होता. ३१ जानेवारी २०१४ च्या इंडियन एक्सप्रेसमध्ये तेंव्हा ६२ वर्षीय जसोदाबेन यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्या स्वतःला नरेंद्र मोदींची पत्नी म्हणवतात. त्यांचा आणि मोदी यांचा ४५ वर्षांपूर्वी विवाह झाला. लग्नावेळी जसोदाबेन १७ वर्षांच्या होत्या आणि नरेंद्र २० वर्षांचे होते. तीन वर्षं दोघे एकत्र राहिले. त्यानंतर मोदींना नारायण सूर्याजी ठोसर ऊर्फ समर्थ रामदास स्वामींच्या 'संसार संगे बहोत शिणलो रे...!' या श्लोकाची आठवण झाली. त्यांनी गृहस्थधर्माचा त्याग केला. या देशाच्या सर्व उद्धारासाठी, उत्कर्षासाठीचं एकमेव संघटन असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यांना कास धरावीशी वाटली. जसोदाबेन यांना त्यांनी सोडून दिलं की, त्या मोदींना सोडून गेल्या, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्या आपल्या माहेरी गेल्या. बालपणीच मातेचं छत्र हरवलेल्या परित्यक्ता झालेल्या जसोदाबेनचे वडीलही काही काळानं वारले. आयुष्य असंच कंठत राहाण्यापेक्षा त्यांनी आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणशास्त्राची पदवी घेतली आणि शिक्षिका म्हणून नोकरी केली. त्या आता सेवानिवृत्त आहेत. आपल्या भावाच्या घरी राहातात. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीतून फारशी माहिती पुढे येत नाही. मात्र त्यांनी मोदींना प्रधानमंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. ही बातमी देशातल्या बहुतेक वर्तमानपत्रांत छापून आली. मात्र, थोडक्यातच छापून आलीय. पण त्यावर फारशी टीका-टिपण्णी झाली नाही. एरव्ही राहुल गांधी यांचं लग्न कधीच झालं असल्याचा दावा कुणा एखाद्या सुवासिनीनं केला असता, तर या देशातल्या मीडियानं केवढा मोठा गहजब केला असता! आपल्या देशातल्या मीडियानं त्यांच्या हनिमूनचं हॉटेलही शोधून काढलं असतं. एवढंच काय, मुलं न होण्यासाठी कोणती संततीप्रतिबंधक साधनं वापरली, हे सांगण्यापर्यंत काही पापाराझी पोहोचले असते. राहुल गांधींच्या मैत्रिणींच्या संबंधानं सोशल मीडियावर बरंच काही पाहायला-वाचायला मिळतं. पण मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करायला निघालेला आणि शेकडो कोटी रुपयांची सुपारी घेतलेला इलेक्ट्रॉनिक मीडिया यावर काहीही बोलत नाही. राष्ट्रीय स्तरावरचा प्रेस मीडियाही गप्प आहे. काही चर्चा घडवताना दिसत नाही. इंग्रजी, हिंदी आणि मराठीतले तरुण तेजपाल यांच्या लाइव्ह फोकनाड बाता आता कुठेच दिसत नाहीत! इतकी चूपकी राखायला नरेंद्र मोदी हे रामदास स्वामींचे अवतार आहेत का?
दैनिक महाराष्ट्र टाइम्स २०१३ च्या दिवाळी अंकात अजय उमट लिखित नरेंद्र मोदींची ओळख आहे. तरुणपणी हिमाचल प्रदेशात संन्याशांबरोबर भटकणारे नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय राजकारणात-व्हाया राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसे पोहोचले, त्याचा प्रवास रेखाटलाय. सोबत साधू, शीख पगडीधारी, ट्रॅकसूटधारी वेषांत फोटोही आहेत. त्यांचं लहानपण हलाखीत कसं गेलं, त्यांनी सफाईकाम करणाऱ्या समाजावर कसं नाटकं लिहिलं, ते सादर कसं केलं; दुनियादारी हेच त्याचं विद्यापीठ कसं झालं; सतत वर्तमानाला कसे ते धरून राहिले, या विषयी बराच तपशील आहे. पण त्यांच्या विवाहाबद्दल अक्षर नाही. या लेखाच्या दुसऱ्याच परिच्छेदात म्हटलंय, 'नरेंद्र मोंदी यांनी कधी आपलं आत्मचरित्र लिहायचं ठरवलं आणि आपल्या जडणघडणीच्या वयातील संघर्षापासून ते भारतातील राजकारणाच्या पटलावरील एक महत्त्वाचा प्रवास सांगायचं ठरवलं, तर मॅक्झिम गॉर्कीच्या - कम्युनिस्टांचा लाडका लेखक, 'माय चाइल्डहूड, इन द वर्ल्ड आणि माय युनिव्हर्सिटीज..!' अशा तीन खंडांत प्रसिद्ध झालेल्या आत्मचरित्राशी मिळतंजुळतं असेल!' तथापि, हे लिहिणाऱ्याला आणि छापणाऱ्याला जसोदाबेन प्रकरण ठाऊक नसावं. नरेंद्र मोदींची राजकारणातली प्रगती पाहाता त्यांनी आपल्या मोडलेल्या लग्नाबाबत बाळगलेली 'सावधता' आणि रामदासांनी 'सावधान' शब्द ऐकताच, क्षणार्धात लग्न मंडपाचा केलेला 'मोक्ष मंडप,' ह्यात फरक उरत नाही. जसोदाबेनने मुलाखत देऊन ४०० वर्षांपूर्वीच्या सनातन ढोंगावर आणि मानसिकतेवरही झगझगीत प्रकाशच टाकला होता. रामदासांचं 'सावधान'! आणि जसोदाबेन प्रकरणी मोदींची 'सावधता' सारखीच आहे !
नरेंद्र मोदींच्या उच्चपदांवरच्या कार्यकाळाला २५ वर्षे उलटून गेलीत. या काळात, त्यांची सर्वात मोठी कामगिरी दिसते ती अशी, त्यांनी देशाची सामाजिक रचना यशस्वीपणे उद्ध्वस्त केलीय. त्यांच्या या कार्यकाळात धार्मिक, जातीय विचारांचा जो प्रसार झाला, ती पूर्णपणे त्यांचीच कामगिरी आहे. त्यांनी लोकशाही संस्थांची विश्वासार्हता पूर्णपणे नष्ट केलीय. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यासारख्या सर्वात महत्त्वाच्या संस्थांवरही विश्वास ठेवता येत नाही. त्यांनी देशाची प्रसारमाध्यमे जवळजवळ पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहेत. प्रसारमाध्यमं पाठीचा कणा नसलेल्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखी झालीत. त्यांच्या वृत्तनिवेदकांच्या गर्विष्ठपणे ताणलेल्या माना अन् भावशून्य चेहरे हे त्यांच्यातल्या पाठीच्या कण्याच्या कमतरतेची भरपाई करण्याचा एक व्यर्थ प्रयत्न वाटतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची विश्वासार्हता पूर्णपणे ढासळलीय. भारत आंतरराष्ट्रीय शक्तींच्या हातातली कठपुतळी बनलाय. देशातील बहुतेक सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम विकले गेलेत अन् त्यांचे खाजगीकरण झालेय. याचा अर्थ असा की, सार्वजनिक पैशाने स्थापित आणि जोपासलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्सची देखभाल करण्यास सरकार असमर्थ ठरले आणि त्यांनी ते कवडीमोल भावाने विकले. सार्वजनिक निधीवर यापेक्षा मोठा घोटाळा होऊ शकत नाही.
देशातील लोकांची नागरी आणि विवेकबुद्धी मोठ्या प्रमाणात नष्ट झालीय. आता, तुम्ही त्यांना कितीही त्रास दिला तरी, जोपर्यंत त्यांना जोरदार लाथ मारली जात नाही, तोपर्यंत ते ते सारं सहन करतील, नुकसान म्हणून ओळखणे तर दूरच. लोकांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष आणि वैरभावाची वाढ झालीय. तुम्ही जनतेच्या एका गटाला लाथ मारा, तर दुसरा गट टाळ्या वाजवून म्हणेल की त्यांच्यासोबत असेच व्हायला हवे. जनता आपल्या दुःखाचे कारण सरकारला नव्हे, तर जनतेलाच मानते. कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे ऱ्हास. पोलीस आंदोलनांमध्ये दिसतात, पण दंगलीत नाही. रस्त्यावर जमावाकडून मारहाण असो किंवा सामूहिक बलात्कार, पोलीस तिकडे लक्षही देणार नाहीत; ते केवळ जनतेचा आवाज दाबण्यासाठी आणि उच्चपदस्थ राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे वागण्यासाठीच आहेत. भ्रष्टाचाराचे प्रमाण अकल्पनीय आहे. एखाद्या रस्त्याची मशागत करणे, नवीन पुलावर जीवघेणा खड्डा पडणे, नवीन संसद भवन कोसळणे, नव्याने बांधलेली इमारत ढासळणे आणि लोकांचा जीव जाणे. हे सर्व आता सामान्य झालंय. सरकारी तिजोरी रिकामी केली जातेय. लाचखोरी तर सोडाच, ३०% वाटा घेतल्याशिवाय कोणतेही सरकारी काम होत नाही. सर्वोच्च स्तरावर उत्तरदायित्व, जबाबदारी पूर्णपणे नाहीशी झालीय. जनतेला मतदानाच्या हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या दुरुस्त्यांना कोणी मंजुरी दिली हे कोणालाच माहीत नाही; तिथे कोणतेही उत्तरदायित्व किंवा जबाबदारी नाही.
याव्यतिरिक्त, वाढत्या घराणेशाहीचे, भांडवलशाही, खोटेपणा आणि अफवांचे संस्थात्मकीकरण, वैयक्तिक प्रसिद्धीवर सार्वजनिक निधीची उधळपट्टी, राजकीय निर्लज्जपणा, राजकीय गुन्हेगारीकरण, वाढता स्त्रीद्वेष, अंध धार्मिकता, गुंडगिरी, भाषिक असभ्यता, लष्कराचे दुर्बळ होणं, बेरोजगारी, शैक्षणिक संस्थांचे पंगू होणं, शिक्षण, आरोग्यसेवेचा ऱ्हास, पर्यावरणाचा विनाश, समाजाच्या वैज्ञानिक विचारांची बोथटता, न्यायाची कमतरता, सामाजिक भेदभावाचा वाढता प्रभाव, लोकांच्या जीवाची किंमत किड्यांपेक्षाही कमी मानणं हे सर्व अतिरिक्त घटक आहेत. सर्वात मोठे यश हे आहे की, देश आणि समाजावर इतके विनाशकारी परिणाम होऊनही, ते केवळ टिकूनच राहिले नाहीत, तर आजही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. आजही ते आत्मविश्वासाने घोषित करतात, "आम्ही ते करून दाखवू.....!"
हरीश केंची,
९४२२३१०६०९.
No comments:
Post a Comment