Sunday, 9 November 2025

लोकमान्य गायकवाड वाडा

"श्वासात मुक्तीचा ध्यास गुंफून, अन्यायाशी आव्हानपूर्वक झुंज देण्याची ईर्षा सतत जागवत आपला हक्क मिळवण्याची रग जोपासणारी एखादी वास्तू तुम्ही बधितलीय का? नसेल तर गायकवाड वाडा, टिळक वाडा, केसरी वाडा या तीन नावांनी ओळखली जाणारी, पुण्याच्या नारायण पेठेतली लोकमान्य टिळकांच्या वास्तव्याने पुनीत झालेली वास्तू बघा. महात्मा गांधी या वास्तूत लोकमान्यांच्या दर्शनासाठी प्रथम आले तेव्हा त्यांनी या वास्तूतली माती आपल्या मस्तकाला लावली!" 
------------------------------------
असंतोषाचा अंगार भारतीयांच्या नसानसात चेतवणारा नरकेसरी लोकमान्य या वास्तूत वावरला. इथली माती मस्तकी धारण करण्याच्या मोलाचीच आहे. हा टिळक वाडा माझा लंगोटीयार दोस्त आहे. मी लहान होतो तेव्हा या वाड्याच्या भल्यामोठ्या दरवाजाजवळच्या देवडीवर एक भल्या मोठ्या मिशावाला भय्या बसायचा. त्यावेळी हा भलामोठा दरवाजाही आतासारखा कायम सताड उघडा नसायचा. त्याच्या दिंडी दरवाजातून आत डोकावताना सिंहाच्या गुहेत डोकावल्याची भावना व्हायची. नवीन मराठीतल्या धारूमास्तरांनी शिकवलेला 'तव स्मरण सतत स्फुरणदायी आम्हा घडो...!' हा श्लोक म्हणतच मी या वाड्यात शिरायचो. आत शिरताच समोरच असलेल्या टिळकांच्या पुतळ्यासमोर एक छानसा लंबगोल हौद होता. त्यात कारंजेही होतं. हौदाला पुढं लांबचौकोनी टीव्हीच्या आकाराएवढी काच होती आणि त्या काचेतून हौदातले रंगीत मासे दिसायचे. हौदाबाहेर लोखंडी कठडा होता. त्यावर डोके टेकून हे मासे बघणं हा मुलांचा आनंद होता. शिवाय या टिळक वाड्यात मेघडंबरीत तिसऱ्या मजल्यावर असलेल्या पुतळ्याकडे बघताना टिळक आकाशाएवढे वाटायचे. या मजल्याच्या गच्चीत मोरही बघितल्याचं आठवतं. पण या मासे-मोरांपेक्षा दैनंदिन केसरीचं मशीन सुरू असताना बघायला मिळण्यातला आनंद अवर्णनीय होता. टिळकांचे नातू जयंत कधीकधी हातात बंदूक घेऊन जाताना बघितलं होतं. त्याच्याशी फार वर्षांनी पत्रकारितेच्या दशेत आल्यानंतर मुलाखत, बातमी आणि पत्रकार परिषदेच्या निमित्तानं पहिल्यांदा बोलायची संधी मिळाली. मग त्यांच्या निवडणुकीत त्यांच्यासाठी काम करायलाही मिळालं. ज्येष्ठ पत्रकार नारायण आठवले यांनी टिळक कुटुंबाबद्दल मला बरीचशी माहिती दिली. कारण ते जवळच राहत असत. त्यांनी सांगितलं की, "टिळकांच्या दुसऱ्या नातवाशी रमणबागेतल्या मैदानावर जवळीक जमली होती. दुर्दैवाने श्रीकांत आता नाही. टिळकांची एक नात रोहिणी माझ्या थोरल्या बहिणीबरोबर होती आणि या मुलांची आई तर सदासर्वदा आमच्या घरासमोरच असणाऱ्या अनाथ हिंदू महिलाश्रमातल्या अनाथ मुलींना आईची माया द्यायला यायची. अशा सर्व टिळक मंडळींशी लहानपणापासूनच आपलेपणा होता. टिळकांचे रामभाऊ नावाचे पुत्रही मी बघितलेत. ते मोर असलेल्या गच्चीत एकदा उपोषणाला बसले होते. नंतर वाड्यात मुख्य दरवाजाजवळच्या देवडीवर त्यांनी आपली पथारी पसरली होती. 'केसरी'चे विश्वस्त आणि रामभाऊ यांच्यात काही वाद होता. टिळकांची मुले आणि विश्वस्त यांच्यातल्या या वादाबद्दल पुष्कळ बोललंही जायचं आणि वाड्यात शिरल्यावर डावीकडचा भाग हा टिळक कुटुंबाचा आणि उजवीकडचा केसरीचा अशी वाड्याची फाळणी असावी असेही दिसायचे. जयंतराव टिळक केसरीच्या संपादकपदावर आल्यावर ही फाळणी संपली. एवढंच नव्हे, ह्या वाड्याची मरगळही संपली. हा वाडा तरुण झाला... या वाड्यात नरसिंह चिंतामण केळकरांना जाता-येताना मी बघितलंय. ज. स. करंदीकर, दा. वि. गोखले, ग. वि. केतकर या केसरीच्या संपादक मंडळींनाही मी बघितलंय तात्यासाहेब केळकर त्यावेळी खूपच थकलेले होते. ज. स. करंदीकरही उतार वयातच होते. दा. वि. गोखले त्यामानानं तरुण, पण त्यांनाही सामाजिक चळवळीत नेतृत्व करताना बघितल्याचं आठवत नाही. ग. वि. केतकर हे टिळक कुटुंबातलेच, पण त्यांनी परदेशी परधर्मी स्त्रीशी विवाह केला आणि ते एकदम बाजूला फेकले गेले. जयंतरावांनी मात्र हळूहळू जम बसवला. ते हिंदूसभेत गुंतले नाहीत, पण हिंदुत्व झटकून मोकळेही झाले नाहीत. जयंतरावांनी ह्या वाड्यावर 'पुनरागमनायच!' नावाचा एक लेख लिहिलाय. जयंतराव टिळकांचे वडील श्रीधरपंत यांनी आत्महत्या केली आणि जयंतरावांच्या
मातोश्रींनी मुलांसह टिळकवाडा सोडून आपल्या माहेरी प्रयाण केले. त्यानंतर ३० साली पुन्हा परत पुण्याला येऊनही हे कुटुंब टिळक वाड्यात राहायला आलंच नव्हतं. सात वर्षे पुण्यातच इतरत्र हे कुटुंब राहिलं आणि जयंतरावांच्या आत्या रमाबाई वैद्य यांनी जयंतरावांच्या काकांना, रामभाऊंना समजावून या कुटुंबाला पुन्हा ह्या वाड्यात आणलं...!" जयंतराव याबाबत लिहिलंय की, "वाड्याच्या दिंडी दरवाजातून आत पाऊल टाकताच माझं मन गलबलून गेलं. याच दरवाजातून वडिलांच्या मृत्यूनंतर मी बाहेर पडलो होतो. भारताचा स्वातंत्र्यलढा माझ्या आजोबांनी ज्या वाड्यातून लढविला, ज्यांनी आपल्या बुद्धिबळानं आणि त्यागानं या देशाचं भवितव्य साकारलं त्यांचा हा वाडा. आत पाऊल टाकताच मला कोठून तरी गंभीर आवाज आल्यासारखं वाटलं. पुनरागमनायच....! वाड्याचा पुराणपुरुष आपले हात पसरून प्रेमानं स्वागत करतोय असं मला भासलं. आजोबानं नातवाला कवेत घ्यावं आणि त्याच्या मस्तकाचं अवघ्राण करावं तसंच काहीसं...!" हे वाचल्यावर खरोखरच हा वाडा टिळकांसारख्याच मिशा फुटलेला आजोबा झाल्यासारखं वाटलं. या वाड्यात आलं की, खरोखरच गलबलून येतं. मग टिळकांच्या नातवाला असं वाटावं हे स्वाभाविकच होतं!.
याच लेखात जयंतरावांनी केसरी कार्यालयात सर्वत्र भरलेल्या कागदाच्या आणि शाईच्या वासाचाही उल्लेख केलाय. टिळक वाडा हा 'केसरी' वाडाही आहे हेच त्यांच्या या उल्लेखातून व्यक्त झालंय. ह्या वाड्याचं स्वरूप काळानुसार बदलून गेलंय. मुळात हा वाडा श्रीमंत चिमणाबाईसाहेब गायकवाड यांच्या पुण्यातल्या वास्तव्यासाठी बडोद्याच्या महाराजांनी घेतला होता. पुण्यात गव्हर्नरांचा मुक्काम असे त्यामुळं संस्थानिक मंडळीही पुण्यात आपल्या मुक्कामासाठी कायमची काही व्यवस्था करत. बडोदेकरांनी त्या दृष्टीनेच हा वाडा बनवला असावा. मोट चालेल अशी मोठी विहीर वाड्यात आहे. चारीबाजूनं वाड्याला चांगल्या बंदोबस्ताची व्यवस्था आहे. मूळ वाड्याच्या पूर्व-पश्चिम भिंती तर पाच पाच फूट रुंदीच्या आहेत. घोडे बांधण्यासाठी पागा असाव्यात तशी मुख्य दरवाजाच्या बाजूलाच लांबलचक बंद जागाही प्रारंभी असावी. याच जागेत केसरीचा जुळणी विभाग मी बघितलाय. तिथं टायपांचे घोडे असायचे. देवडीला लागून एक छोटी खोली होती. टिळक आणि गोखले यांची या खोलीमध्ये भेट झाली. या भेटीत ते दोघे काय बोलतात हे ऐकण्यासाठी ग. वि. केतकर खोलीतल्या काळोख्या बळदात लपून बसले होते. आता या भागात बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. आत गेल्यावर उजवीकडे केसरीचे संपादक दुसऱ्या मजल्यावर बसायचे. तिथं जायला आता जो जिना आहे तो मात्र पूर्वी नव्हता. देवडीच्या बाजूनेच वर जायची सोय होती आणि टिळक ज्या अभ्यासिकेत बसायचे तिथूनही वरच्यावर ह्या बाजूस जाता येत असे. आता केसरीचे संपादक मुख्य दरवाजासमोर जो टिळक पुतळा आहे त्याच्या डोक्यावर बसतात. ह्या पुतळ्याच्या उजवीकडे केसरीचे छपाई यंत्र आहे. केसरीचे ग्रंथालय हे एक विद्यापीठच म्हणायला हवे. अर्थात ते न. चिं. केळकर यांच्या काळात उभे झाले आणि त्यावेळेपासूनच ते सर्वांसाठी अभ्यासार्थ सदैव खुलेही राहिले. महाराष्ट्रातल्या कुठल्याही मराठी दैनिकाचे असे सुसज्ज ग्रंथालय नाही. ह्या ग्रंथालयाचा उपयोग करून अनेकांनी पदव्या मिळवल्या आहेत. कॉ. डांगे काही काळ टिळकवाड्यात राहात होते आणि त्यांच्या आग्रहावरून ह्या ग्रंथालयात केळकरांनी मार्क्सचे ग्रंथही आणवले. ह्या वाड्यात कोण कोण राहून गेले याबद्दल जयंतराव म्हणतात, "ह्या वाड्यात तळमजल्यावर रविकिरण मंडळ भाड्याने राहात होते. कवि गिरीश होते, यशवंत होते, श्री. बा. रानडे होते. रविकिरण मंडळाचे किरण मासिक इथंच प्रसिद्ध झालं. याच रविकिरण मंडळात गिरीशांनी सप्तर्षी म्हटले. प्रा. ज. नी. कर्वे, दबडघाव हेही या वाड्यात राहात होते....!" टिळक जेव्हा या वाड्यात वावरायचे तेव्हा वाड्याबाहेर सदैव पोलिसांचा वावर असायचा. दोन पोलीस अधिकाऱ्यांचे वाडेच टिळक वाड्याच्या पुढे आणि मागे होते. पण वाड्यात कुणी पोलीस बिऱ्हाडकरू म्हणून नव्हता. त्यानंतरच्या काळात मात्र बाळासाहेब कर्णिक हे गुप्तहेर खात्यातले अधिकारी टिळक वाड्यातच राहायला आले आणि अजूनही हे कर्णिक कुटुंब टिळकांचे भाडेकरू आहे. बेचाळीसच्या काळात या बाळासाहेबांना भूमिगत क्रांतीचे नेते अच्युतराव पटवर्धन आणि त्यांचे सहकारी कुठे आहेत, काय करतात हे सारे ठाऊक होते, पण त्यांनी कधी त्याबाबत रिपोर्ट दिला नाही अशी आठवण टिळक वाड्यात पन्नास-साठ वर्षे राहणाऱ्या म. तु. कुलकर्णी या ८३ वर्षांच्या स्वातंत्र्य सैनिकांनी सांगितली होती. ह्या म. तु. कुलकर्णीचे टिळक वाड्याच्या दर्शनीभागात 'हिंदू भांडार' नावाचे दुकान होते आणि साम, दाम, दंड, भेद या सर्व दृष्टीने हिंदुत्वाला लागणारी सामग्री या भांडारात विकत मिळे. अशी बरेली, लखनौ, मुंबईतही या कुलकर्णीची हिंदू भांडारे होती. हैद्राबादच्या निजामाविरुद्धच्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. म. तु. कुलकर्णी आता टिळक वाड्यात दर्शनी विभाग नव्याने बांधण्यात आला तिथे राहात. खेरीज सप्रे नावाचे एक पोलीस इन्स्पेक्टर आणि गांगल नावाचे एक कुटुंबही टिळक वाड्यात होते. एक कुलकर्णी डॉक्टर होते. टिळक वाड्यात पशुपक्षीही खूप होते. जयंतरावांनी टिळक वाड्यातच तीन मजली शानदार बंगला बांधलाय.
त्याच्या प्रवेशद्वारांत दोन पंचरंगी पोपटांचे पिंजरे दिसतात आणि पायऱ्यांच्या बाजूलाच तीन दांडग्या कुत्र्यांचे पिंजरे आहेत. समोर बागेत तर चांगल्या वीस फूट लांब, पाच फूट रुंद जाळीदार पिंजऱ्यात डझनावारी लव्हबर्डस, पोपट आणि दुसरेही पक्षी आहेत. टिळक वाड्यात पाऊल टाकल्यावर कागद-शाईचा वास जयंतरावांच्या नाकात शिरला असे त्यांनी लिहिले आहे. तो वास केसरीच्या बाजूला अजूनही येतो. पण वाड्याच्या राहत्या भागात वास येतो बटाटे वडे-भजी यांचा. कारण तळमजल्यावर जिथे बहुधा पूर्वी रविकिरण मंडळाच्या कविता व्हायच्या तिथे सध्या बटाटे वडे-भजी, इडली सांबार, पोळी-भाजी बनवली जाते. नव्याने बांधलेल्या दर्शनीभागात महिलांनी सहकारी पद्धतीने चालवलेल्या उपाहारगृहाचा भटारखाना टिळकवाड्याच्या तळमजल्यावर चालतो आणि त्याचा घमघमाट तशीच टाकलेल्या अन्नाची घाणही सर्वत्र दरवळते.
टिळकांची अभ्यासिका त्यांच्या काही वस्तूंसह या वाड्यात अजून राखून ठेवलीय. काचा लावलेल्या पार्टीशनमधून ती बघायला मिळते. टिळकांच्या नात सुनेने-शैलेश श्रीकांत टिळक यांच्या पत्नीने तिसऱ्या मजल्यावरून खाली येऊन कुलूप काढून ती बघायची संधी प्राप्त करून दिली, पण ज्या अभ्यासिकेतून टिळकांनी सांगितलेल्या संपादकीयांचा आवाज साऱ्या टिळकवाड्यात निनादायचा त्या अभ्यासिकेसमोर सध्या आहे एका भाडेकरूचा संडास. दुसऱ्या भाडेकरूच्या घरातल्या कचऱ्याची बादलीही ह्या अभ्यासिकेच्या बाजूच्या दारातच असते. राष्ट्रीय पुढाऱ्यांच्या वास्तू स्मारक म्हणून जतन काव्यात असे म्हटले जाते. टिळक वाड्याचे जतन होते आहे का पतन होते आहे यावर प्रकाश कोण टाकणार? दर्शनीभाग पूर्ण पाडून कदाचित विकून नवा करण्याचीही काही योजना असावी, पण एक भाडेकरू कोर्टात गेल्याने ती अजून पूर्णतः अंमलात आलेली नाही, असे कळले. टिळक जिथे राहात होते तो भाग खूपच जीर्ण झाला आहे. वाड्याच्या गटारांचे पाईप सर्वत्र वाहात होते. जीर्ण भिंती त्यामुळे अधिकच कमकुवत होत आहेत. जागोजाग लोखंडी गर्डर्स टाकून ह्या इमारतीला सावरल्याचेही दिसत आहे. 
१९०५ साली २७ जानेवारीला पंधरा हजार चारशे रुपये देऊन हा वाडा टिळकांनी घेतला. त्यासाठी दहा हजार रुपये टिळकांना कर्जही काढावे लागले. न. चिं. केळकर ह्या रकमेचा चेक घेऊन बडोद्याला गेले व सर्व व्यवहार उरकून आले. ह्या वाड्याचे भाग्य असे थोर की, लोकहितवादी, गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, महात्मा गांधी, ज्ञानकोशकार केतकर, रवींद्रनाथ, एम. एन्. रॉय, राजगोपालाचारी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार, सरहद्द गांधी, विजयालक्ष्मी पंडित, जयप्रकाश नारायण, आचार्य कृपलानी, सर्वपल्ली राधाकृष्णन, गोविंदवल्लभ पंत अशी एकापेक्षा एक मोठी माणसे इथे येऊन गेली. स्वातंत्र्याचा लढा ह्या वाड्यातून उठलेल्या वादळानेच साऱ्या देशात नेला. गोवा मुक्तीचा लढाही ह्या वाड्यातूनच पणजीच्या पलाशीवर धडकला. त्याकाळी टिळक वाडा ही वीरांची छावणीच झाली होती. हजारो सत्याग्रही या इथूनच लोकमान्यांना वंदन करून 'रोवू चला पणजीवर विजयी झेंडे' म्हणत गोव्याकडे गेले. ह्या सत्याग्रहींना दोन घास खायला घालण्यासाठी इथे भाजी-पोळीचे अक्षरशः डोंगर उभे झाले होते. डांगे, एसेम, अत्रे, प्रबोधनकार, भाई बागल, दाजीबा देसाई, विष्णूपंत चितळे, वसंतराव भागवत, वा. रा. कोठारी, नाथ पै, पिटर अल्वारीस, भाऊसाहेब राऊत या महाराष्ट्राच्या नेत्यांची इथे सतत वर्दळ असायची. पुण्यातल्या पत्रकार संघाच्या बैठकी ह्याच वाड्यात व्हायच्या. काही ना काही सतत करत राहणाऱ्यांना हा वाडा सदैवच साथ देत आलाय आणि अजूनही या वाड्यात चळवळेपणा शिल्लक आहे. त्याचे रूप बदलले असेल, पण तो आहे. स्वतः जयंतराव प्रत्यक्ष राजकारणात होते. त्यांच्या पत्नी इंदूताई तर महिलांना जमवून नाना गोष्टी करत. पुण्यालाच नव्हे, महाराष्ट्राला आणि पर्यायाने राष्ट्राला चेतना देण्याचे सामर्थ्य या वाड्याच्या मातीत अजून आहे. ते जागवून त्यातून वादळ उभे करण्यासाठी कदाचित ही माती कुणाची वाटही बघत असेल.
इथला गणेशोत्सव अजून लोकमान्यांचा विचार जागवतच होतो आहे. देशभक्त आणि देवतुल्य पुरुषांच्या तसबिरींनी सजलेली भव्य मेहरप, पाठीशी टिळकांचा पुतळा, पुढे गणेशाची मूर्ती. ही गणेश मूर्ती आज पन्नासहून अधिक वर्षे गोखले मास्तरांकडचीच आहे आणि तिचे रूपही कायम आहे. लोकमान्य टिळक ही एक चेतना आहे. 'तव स्मरण सतत स्फुरणदायी आम्हा घडो...!' ह्या भावनेनेच आजही मराठी माणूस लोकमान्यांकडे बघतो. महात्मा गांधींनी या वास्तूतली माती कपाळाला लावली. आजही 'टिळक महाराज...!' म्हणून टिळकांच्या पुतळ्यापुढे श्रद्धेने डोके टेकवणारे आहेत. श्रद्धास्थानासाठी प्रचंड संघर्ष करणारा समाज आजही या देशात आहे. टिळक जिथे वावरले ते श्रद्धास्थान ज्या स्वरूपात आज बघावे लागते ते स्वरूप स्पृहणीय नाही. लक्षावधी रुपयांचे भव्य टिळक स्मारक टिळक रस्त्यावर उभे आहे हे खरे, पण टिळक जिथे राहिले, त्यांचा आवाज जिथे निनादला तो वाडा हेच त्यांचे खरे स्मारक आहे. ते अधिक चांगल्याप्रकारे जतन करायलाच हवे.









No comments:

Post a Comment

महाराष्ट्राची पुनरावृत्ती

"बिहारमधलं राजकारण वेगळं राहिलेलंय. इथं समाजवादी विचारसरणी रुजलेली. तिला प्रथमच धक्का बसला. समाजवाद्यांच्या साथीनं भाजपनं इ...