"राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आलीय. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? स्वार्थकारण आहे की सत्ताकारण आहे? हे समजून घेतलं पाहिजे. महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेनं कार्य झालं त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होतं. पण आता शंभर टक्के सत्ताकारण झालंय! आयुष्यात राजकारणाशिवाय अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत! पण लक्षांत कोण घेतो? ज्याला त्याला स्वार्थासाठी सत्ताकारण करायचंय. ते राजकारण गरजेचं झालंय. लोकांची सेवा केवळ सत्तेतूनच करता येतं असं तत्त्वज्ञान खुद्द उपमुख्यमंत्र्यानेच मांडलं असल्यानं त्यांचं अनुकरण केलं जातंय. सोलापुरातच नाही सर्वत्र याची लाटच आलीय. आपल्याला राजकीय जन्म देणाऱ्या जन्मदात्या पक्षाचा अगदी सहजपणे त्याग करण्या सरसावलेत. मग निष्ठावंतांचा उद्रेक हा होणारच! उगवत्या सूर्याला दंडवत घालणारी ही मंडळी कुणाचं भलं करण्यासाठी नाही तर वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष बदलताहेत. अशावेळी पक्षासाठी आयुष्य झिजवलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या निष्ठा धुळीला मिळवल्या जाताहेत. पक्षाला आलेलं हे बाळस नाही तर सूज आहे. हे पक्षनेतृत्वाला कसं समजणार?"
-----------------------------------
कोट्यानुकोटी माणसांचं आजकालचं जीवन राजकारण निगडित झालं आहे. असं एकही ज्याच्याशी राज्य शासनाचा संबंध नाही. तरीही अष्टौप्रहर पोटापाण्याच्या विवंचनेत असलेल्या रयतेला 'राजकारण कसं असतं' या परिसंवादाशी कर्तव्य त्यात रस घ्यायला फुरसत नाही. सामान्य माणूस काकुळतीनं एवढंच म्हणेल- 'बापहो, राजकारण कसंही करा, बेरजेचं वजाबाकीचं वैराशिकाचं अथवा पंचराशिकाचं करा; आम्हांला दोन वेळ अन्न, अंगभर कपडा नि डोकं टेकायला निवारा देणारं करा म्हणजे झालं!' परंतु, सामान्यजनांप्रमाणे राजकारणाची कोणत्याही 'कारणा'ची उपेक्षा करून बुद्धिमंतांचं - 'इंटलेक्चुअल्स'चं चालेल? अति-शहाणपणामुळं त्यांचा स्वतःचा राजकारणाचा बैल रिकामा राहिला तरी त्यांना स्वतःला क्रियाशील राजकारण फारसं जमलं नाही तरी राजकारण चर्चा त्यांचा प्रांत आहे; प्रत्यक्ष राज्य शासन राजकारण करणाऱ्या मंडळीना 'गाईड पुरविणाऱ्या 'यथार्थ दीपिका' उजळणं त्यांचं 'मिशन' अन् कधी कमिशनही आहे! कोणत्या तरी शिवबाचे गागाभट्ट, रामदास होण्याची, अथवा कोण्या चंद्रगुप्ताचे आर्य चाणक्य बनण्याची तमन्ना त्यांच्या दिलाच्या दिवाणखान्यात थैमान घालीत असते.
बुद्धिमंतांतला एक पोटवर्ग आहे आम्हो पत्रकारांचा! आम्हांस जीवनातील विषयांत रस घ्यावाच लागतो. विशेषतः राजकारणात! राज्यकर्त्यांची राजकारणाची 'संगत नको बाप्पा' असं आम्हांस म्हणताच येत नाही. शासनकल्यांना ऐकविणे. त्यांचं ऐकणं त्यांच्या मुलाखती घेणं त्यांच्याशी प्रश्नोत्तरी करणं हा आमच्या व्यवसायाचाच एक भाग म्हणूनच आमच्या एका बंधूनं परवाच मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला तो पुढीलप्रमाणे ओवीबद्ध करता येईल!
'आपले राजकारण आहे कैसे?
बेरजेचे की वजाबाकीचे?
अथवा केवळ गरजेचे ? हे कृपया सांगावे ll' मुख्यमंत्र्यांचा जबाब असा ओवीबद्ध होऊ शकेल
'आमुचे राजकारण बेरजेचे
तत्त्वाचे तैसेचि व्यवहाराचे
म्हणोनीच ते गरजेचे, जाणावे गा॥'
राजकारण गरजेचंही असतं. हे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं फार महत्त्वाचं आहे. किंबहुना आजवरचा जगातील राजकीय उलाढालीचा इतिहास पाहता ते प्रथमतः गरजेचंच असतं. हे सहज लक्षात येईल.
राजकारणात कधी कृष्णशिष्टाई-तडजोड तर कधी कुरुक्षेत्रावरील झोडाझोड, कधी समझोता तर कधी निव्वळ उगारलेला जूता, कधी दम खाऊन कालहरण करणं, तर कधी निव्वळ दमबाजीनं बाजी मारणं- असं राजकारणाचं स्वरूप गरजेनुसार म्हणजेच देश-काल-परिस्थितीप्रमाणे पालटत राहतं. राजकारण गरजेचं हे एकदा मान्य केलं म्हणजे ते सदैव बेरजेचंच असेल, असं सांगवत नाही ते जेवढं बेरजेचं तेवढंच वजाबाकीचं; जेवढं गुणाकाराचं तेवढंच भागाकाराचं राजकारण किबहुना कोणतंही कार्य- एकंदरीत बेरजेनं; लोकमान्य टिळकांच्या शब्दांत सांगायचं झाल्यास 'लोकसंग्रहानं साध्य होतं हे खरं; पण कधी कधी वजाबाकीनंही कार्यभाग उत्तम साधतो. बारा भिन्न भिन्न वाटांनी जाणाऱ्या बारभाईंच्या बेरजेपेक्षा, सुसूत्रता साधणारी वजाबाकीही केव्हा केव्हा वाजवी ठरते...! 'राखावी बहुतांची अंतरे' हा समर्थसंदेश बहुश: फलदायी असला तरी बहुतांना विशिष्ट अंतरावर ठेवणं देखील राजकारणात कधी कधी क्रमप्राप्त ठरतं! लोकसंग्रहजन्य संख्याबळ पुष्कळदा उपयुक्त ठरलं, तरी कधी कधी दृढनिश्चयी अल्पसंख्या 'डिटर्मिन्ड मायनॉरिटी' परिणामकारक ठरते. समर्थ रामदासांनी 'राखावी बहुतांची अंतरे' या आशयाचा उपदेश अनेकदा केला असला, तरी दासबोधातील 'राजकारण'-निरूपण-नामक समासात याच उपदेशाला पुस्तीही जोडली आहे.
'जो बहुताचे सोसेना त्यास बहुत लोक मिळेना।'
एवढंच सांगून ते थांबले नाहीत, तर
'अवघेचि सोसिता उरेना महत्त्व आपुले॥'
अशी जोडही दिली आहे. पुष्कळांना आपलंसं करावं हे सांगत असतानाच,
'हिरवटासी दूरी धरावे। युद्धकार्यास ढकलावे
नष्टासी नष्ट योजावे. राजकारणामध्ये ॥'
असाही इशारा त्यांनी दिला आहे.
सारांश, जीवनाप्रमाणेच राजकारणाचं ध्येय निश्चित ठरविता येईल. पण त्या ध्येयाच्या गरजेनुसारच उपाय योजावं लागेल; वेगवेगळ्या प्रकारे गणित मांडावं लागेल पुष्कळदा बेरजेचं-गुणाकाराचं पण वेळप्रसंगी वजाबाकीचं नि भागाकाराचं देखील राजकारणधुरंधर नरेंद्र मोदींची गेली ११ वर्षांची कारकीर्द डोळ्यांपुढं आणली तरी सहजच पटेल की, त्यांनी बेरजेप्रमाणेच वजाबाकीचं पाठही अनेकदा गिरविले आहेत. छत्रपती शिवरायांच्या चरित्रातही निरपवाद बेरीज अथवा निरपवाद वजाबाकी आढळत नाही. कधी शरणागती तर कधी रणागती; कधी माघार तर कधी पुढाकार; कधी तह कधी तलवार; कधी संधी कधी विग्रह आणि कधी बेरजेचं सामर्थ्य तर कधी बजाबाकीचं चातुर्य अशी विविध परींची वळणं घेत त्यांच्या राजनीतीचा अश्व प्रगतिपथावरून ध्येयमंदिराकडे गेला! राजकारणाची ही क्षणाक्षणाला बदलणारी वळणं... वळणंच ती तेव्हा ती वक्रच असावयाची. राजकारणाची मुसाफिरी सरळसोट धोपट मार्गानं सहसा होतच नाही. राजकारण म्हणजे एक वक्री शनी...! त्याच्या साडेसातीच्या फेऱ्याला तोंड देणं तर मुश्किलच, पण त्याचा तोंडवळा नुसता न्याहाळणेही सोपं नाही. राजकारणाचं गणित कळायला नि यशस्वीपणे सोडवायला विशिष्ट पिंड-प्रकृतीची जरुरी असते. तत्वज्ञ, साहित्यिक-कलावंत ह्यांच्या पिंड-प्रकृतीला सहसा ते मानवत नाही. म्हणूनच या वर्गातील शहाणी माणसे राजकारणाच्या चक्रव्यूहात शिरत नाहीत. इतकेच काय, पण त्यावर भाष्य करणंही टाळतात.
भाजपबाहेरचे जे अलीकडे भाजपत आलेत त्यांना असं का वाटतंय की, आम्ही फार तर चोर किंवा महाचोर होतो. आज भाजपतले बहुतांश तरबेज दरोडेखोर असल्यासारखे वाटतात हुबेहूब तसेच वागतात. त्यामुळे त्यांना पक्ष संस्कृती जरी बदलली तरी फारसा फरक जाणवत नाही. म्हणजे एखादी तरुणी आत्याकडे सुन म्हणून नांदायला आली की, तिला दोन्ही घरातल्या वागणुकीत संस्कृतीत बदल अजिबात जाणवत नाही. तेच पक्ष बदलून आलेल्यांचे झालेलंय. याउलट इथं कांग्रेसपेक्षाही लूट करताना दरोडे टाकतांना अधिक मोकळे वाटतं असं त्यांचं म्हणणं आहे. आम्हाला इथं संरक्षण मिळत असल्याने पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित वाटते. आजही जे संघात आहेत भाजपमध्ये ऐक्टिव नाहीत असे स्वयंसेवक जेव्हा त्यांच्यापासून दूर जाऊन भाजपमध्ये आता जे रुळलेत, रमलेत अशा मंडळीकडे बघून तेही आश्चर्य व्यक्त करतात की, कालपर्यंत उत्तम संस्कारात वाढलेला आमचा स्वयंसेवक, भाजप कार्यकर्ता झाल्यानंतर किती, किती आणि केवढा अन् कसा बदललाय. आजच्या भाजपचे हे फार मोठं अपयश आहे. कारण उद्या जर चुकून भाजपबाहेर एखादा उत्तम विचारांचा लोकमान्य टिळक, सावरकर, शिवाजी महाराजांच्या विचारांचा एखादा नेता तयार होऊन जनतेला भावला तर मला वाटतं राज्यातला भाजप पुन्हा एकदा शंभर टक्के मागच्या बेंचवर जाऊन बसेल, आज हिंदुत्व मानणाऱ्या लोकांना इतर कुठलाही पर्याय नाही कारण मराठीपण आणि हिंदुत्ववादी भूमिका घेणारी शिवसेना, मनसे मुस्लिम मंडळींना आपली वाटायला लागलेलीय. ससंघचालक मोहन भागवत पाय घसरलेले कालचे स्वयंसेवक जे आजचे भाजप कार्यकर्ते आहेत त्यांची वागणूक, वर्तणूक अचंबित करणारी असल्याने तुम्ही संघात हेच शिकलात का? असा सवाल आता पुढं येऊ लागलेलाय. मला वाटतं हे संघाचे मोठे अपयश आहे की, त्यांच्या स्वयंसेवकांना सत्तेत उतरल्यानंतर हिंदुत्व, राष्ट्रीयत्व देशप्रेम उत्तम संस्कार भ्रष्टाचार, विरोधात लढाई इत्यादींचा लगेचच विसर पडतो त्यानंतर त्यांच्यातील थेट कांग्रेस प्रवृत्तीचा दरोडेखोर दिसतोय, अवतरतोय.
भाजप आता आंतरबाह्य बदललाय. निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसपक्ष जे काही करायचा ते सारं काही भाजपेयींनी अंगीकारलंय. आपण स्वीकारलेला 'केशरी' रंग त्यांनी कधीच टाकून दिलाय. शिवसेनेच्या संगतीनं केशरीचा रंग 'भगवा' करून टाकलाय हा बाह्यरंग शिवसेनेचा घेतला तसा अंतरंग काँग्रेसकडून घेतलाय. त्यामुळं भाजप आता 'भगवी काँग्रेस' बनलीय. जे जे काँग्रेस करत होती ते ते सारं भाजपेयी करताहेत. आपली मूल्याधिष्ठतेची भरजरी वस्त्र, कवचकुंडल भाजपेयींनी कधीच उतरवलीत आणि बलाधिष्ठतेची वस्त्र परिधान केलीत. याचा अनुभव देशात सर्वत्र होतोय. देशाला दिशादर्शन करणारे राजकीय धुरंधर जनसंघी नेत्यांकडून पूर्वी 'मूल्याधिष्ठित राजकारणा'ची आस धरली जात होती. पण तेव्हाच्या मूल्याधिष्ठित राजकारणाची जागा आता 'मूल्य'अधिष्ठित समाजसेवेनं घेतलीय, त्याच्या सोबतीला 'बाहुबली' देखील सज्ज झालेत. त्यामुळं आजच्या राजकारणाची दिशाच बदलून गेलीय. वैचारिक तत्व, निष्ठा, जीवनमूल्य याला कोणतीच किंमत राहिलेली नाही. केवळ 'निवडून येण्याची क्षमता...!' एवढाच काय तो निकष उरलाय. त्यामुळं धनदांडगे, बाहुबली यांचीच चलती भाजपत निर्माण झालीय. हे सारं रोखायला हवंय. हिरवा देठ अद्यापी आहे म्हणणाऱ्या मंत्र्याला, प्रेमाला नकार देणाऱ्या मुलींना पळवून आणणारा आमदार, लिंग सरकलेला खासदार, शिवरायांचा उपमर्द करणारा नगरसेवक अशांना आवरायला हवंय, सावरायला हवंय...! aukt
चौकट
सोलापूरात ‘मिशन लोटस’च्या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्ष उफाळून आलाय. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या संभाव्य प्रवेशाने जणू जुन्या जखमा पुन्हा ताज्या केल्यात. भाजप कार्यालयाबाहेरच कार्यकर्त्यांनी आंदोलन करून व्यक्त केलेली नाराजी ही केवळ ‘प्रवेश’विरोधातील प्रतिक्रिया नाही तर ती पक्षाच्या सत्ताबलाच्या बदलत्या केंद्रबिंदूविरुद्धची असंतोषाची लाट आहे.
सोलापूर भाजपची परंपरागत सूत्रे आजपर्यंत सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्या हातात होती. महापालिका असो किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका, सोलापुरातील राजकारण या दोन्ही देशमुखांच्या प्रभावाशिवाय पूर्ण होत नसे. मात्र २०१९ नंतर परिस्थिती झपाट्याने बदलू लागली. सचिन कल्याणशेट्टी आणि राम सातपुते हे दोन तरुण आमदार फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून पुढे आले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर मध्य मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपत आलेले देवेंद्र कोठे हे आणखी एक प्रभावी तरुण चेहरे ठरले. २४ च्या निवडणुकीत राम सातपुते पराभूत झाले असले तरी सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे यांचे वाढते महत्त्व हे दोन्ही देशमुखांना खटकणारे ठरल्याचे बोलले जाते.
विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रीपदाच्या वाटपात दोन्ही देशमुख वगळले गेले आणि पालकमंत्रीपद जयकुमार गोरे यांना मिळाले. गोरे, कल्याणशेट्टी आणि कोठे हे तिघेही तरुण, फडणवीसांच्या गोटातले त्यामुळे सोलापुरातले भाजपचे समीकरण बदलले. या तिघांनी हळूहळू जिल्ह्यातली सत्ता आणि संघटन या दोन्हीवर पकड मिळवायला सुरुवात केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुभाष देशमुख यांच्या पॅनलविरुद्ध सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे दिलीप माने यांच्याशी हातमिळवणी केली. माने विजयी झाले आणि सभापती बनले. या निकालाने कल्याणशेट्टी किंगमेकर ठरले, तर देशमुख यांची गोटातली पकड कमकुवत झाल्याचे चित्र उभे राहिले. दिलीप माने यांनी आणि चार माजी आमदारांनी थेट भाजप प्रवेश करण्याची तयारी केलीय. तीही जयकुमार गोरे आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्या पुढाकाराने. सुभाष देशमुख गटासाठी हे केवळ राजकीय आव्हान नाही, तर आपल्याच शत्रूला घरात स्थान देण्यासारखी बाब आहे. त्यावरूनच सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन छेडले. शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या समजावण्याच्या प्रयत्नांनाही कार्यकर्त्यांनी विरोध केला. राज्यभर चर्चेत आलेल्या या आंदोलनाने भाजपच्या शिस्तबद्ध पक्षसंस्कृतीवरही प्रश्नचिन्ह उभे केले. विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे आतापर्यंत वेगवेगळे गट असल्याचे पाहिलंय. मात्र नव्या तिघा तरुण नेत्यांच्या वाढत्या प्रभावामुळे आता हे दोन्ही ज्येष्ठ नेते एकत्र आल्याचे दिसतंय. दोघांच्या बैठका, एकमेकांच्या कार्यक्रमात सहभाग हे संकेत राजकीय पुनर्मिलनाचे आहेत. त्यात दिलीप माने यांचा प्रवेश केवळ सुभाष देशमुखांनाच नाही, तर विजयकुमार देशमुखांच्या राजकीय गणितालाही धक्का देणारा आहे. आज सोलापूर भाजप दोन थरात विभागलेली दिसते. एकीकडे दोन्ही ज्येष्ठ देशमुख, तर दुसरीकडे जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे ही तरुण मंडळी. भाजपची ओळख “पार्टी विथ डिफरन्स” अशी सांगितली जाते. मात्र सोलापुरात जे सुरू आहे ते ‘डिफरन्स विथिन पार्टी’चं उदाहरण वाटतंय. भाजपच्या या मिशन लोटसमुळे सोलापुरात राजकीय सत्तासंतुलन पूर्णपणे बदलण्याची चिन्हं आहेत. प्रश्न एवढाच आहे या सत्तासंघर्षातून भाजप मजबूत होईल का?
हरीश केंची,
९४२२३१०६०९
No comments:
Post a Comment