Sunday, 9 November 2025

वंदे मातरम्

 
"भारत, भारत माता आणि मादरे वतन...!
भारतमाता की जय! भारतपिता की...?
"सध्या धार्मिक उन्माद वाढलाय. देशाला वंदन करणाऱ्या घोषणा यासाठी वापरल्या जाताहेत. 'भारतमाता की जय...!' ही घोषणा स्त्रीलिंगी. हिंदू संस्कृतीनुसार भूमीला माता संबोधलं जातं. महात्मा गांधी, पंडित नेहरू अन् काँग्रेसनं देशाला मातेची उपमा देत, स्वातंत्र्यलढ्यात ही घोषणा दिली. त्याचवेळी हिंदू महासभा, त्यांचे नेते वि. दा. सावरकर आणि संघाचे सरसंघचालक मा.स. गोळवलकर यांनी मात्र देशाला पितृभूमी, पुण्यभूमी संबोधलं. देशाला मातृभूमी नव्हे तर पितृभूमी म्हणून त्यांनी स्वीकारलं. संघ तेव्हा स्वातंत्र्यलढ्यात नव्हता. आज त्याच मात्र संघानं आणि भाजपनं भारतमाता की जय म्हणून देशाला मातृभूमी म्हणून स्वीकारलंय. देशाला नंतर देवीचं रूप दिलं गेल्यानं मुस्लिम जय हिंद म्हणतात मात्र भारतमाता की जय म्हणत नाहीत. रामजन्मभूमी आंदोलनात ही घोषणा सार्वत्रिक झाली अन् एका विशिष्ट विचारधारेशी जोडली गेली!"
--------------------------------------------
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजप परिवारानं गंगामाता, गोमाताप्रमाणेच आता भारतमातालाही राष्ट्रनिष्ठा-राष्ट्रभक्तीच्या कसोटीसाठी वापरण्याचा उद्योग सुरू केलाय. 'काहींना भारतमाता की जय बोलण्याचं शिकवावं लागेल...!' असं संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हणताच, मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीनचे प्रमुख असाउद्दिन ओवेसी यांनी उत्तर दिलं, 'माझ्या मानेवर सुरी ठेवली तरी मी भारतमाता की जय बोलणार नाही....!' संघ-भाजपमधल्या कट्टर हिंदूवाद्यांनी आग लावावी आणि ओवेसी बंधूंनी ती भडकवावी, असा प्रकार देशात मोदी सरकार आल्यापासून सुरू आहे. हा प्रकार पुरोगामी-सेक्युलरवाद्यांना फिक्सिंगसारखा वाटतो. तथापि, भाजप परिवार हिंदू मतांची व्होट बँक तयार करण्यासाठी आणि ओवेसी बंधू मुस्लिमांची मतं संघटित करण्यासाठी हा आग-पेट्रोलचा खेळ खेळत आहेत. विशेष म्हणजे, हे दोन्ही पक्ष पक्के भारतवादी आणि कट्टर पाकिस्तानविरोधी आहेत. त्यामुळंच मागे एकदा 'भारतमाता की जय'चे पडसाद राज्य विधानसभेत उमटताच एमआयएमचे आमदार अॅड. वारिस पठाण म्हणाले, ‘आम्ही जय भारत बोलू; जय हिंद किंवा हिंदुस्तान जिंदाबाद बोलतोच; पण भारतमाता की जय बोलणार नाही...!' ह्या विरोधाला कारण संघ-भाजप परिवारनं भारतमाता चित्राला जे देवी-देवताचं स्वरूप दिलंय, ते आहे. मुस्लिमांना इस्लाम धर्मानुसार, अल्लाहशिवाय अन्य देव-देवतांची हयाती मान्य करणं, हराम समजलं जातं. यामुळं स्वातंत्र्य लढ्याचं प्रेरणागीत ठरलेलं बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचं वंदे मातरम् हे गीत स्वतंत्र भारताचं राष्ट्रगीत होऊ शकलं नाही. कारण या गीताच्या तिसऱ्या कडव्यात दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती आदि देवदेवतांची स्तुती आहे. तथापि, वंदे मातरमचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान लक्षात घेऊन सर्वसंमतीनं त्याच्या पहिल्या दोन कडव्यांना राष्ट्रीय गीताचा मान देण्यात आलाय. तरीही विशेषकरून संघ आणि परिवारातल्या संस्था-संघटनांच्या कार्यक्रमात अखंड वंदे मातरम् साठी गवयाला कामाला लावलं जातं. हाच खोडसाळपणा भारत माताबाबत आहे. भारत माता नावाची कोणतीही देवता हिंदूधर्मात नाही. तसंच राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती दाखवण्यासाठी भारत माता असेल, तर भारत पिता कोण, हा प्रश्न सरसंघचालकांना तरी पडला पाहिजे. १९९६ मध्ये मुंबईत शिवाजी पार्क इथं संघाची 'महाशाखा' भरली होती. तत्कालीन सरसंघचालक राजेंद्रसिंह उर्फ रज्जूभैय्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना, महात्मा गांधीजींच्या संदर्भानं म्हणाले होते की, 'राष्ट्र का कोई पिता होता है क्या...?' फादर - मदर या ख्रिस्ती धर्मातल्या संकल्पना आहेत, असं राजेंद्रसिंह यांना सांगायचं होतं. त्यातून 'राष्ट्रपिता' गांधीजी आणि 'राष्ट्रमाता' मदर तेरेसा का? अशी खोड त्यांना काढायची होती. कारण तेरेसांचा १९८० मध्ये काँग्रेस सरकारनं भारतरत्न किताबानं गौरवलं होतं. यातला पाचकळपणा सोडून द्या. राजेंद्रसिंह यांचा 'राष्ट्रपिता' विरोधी युक्तिवाद हा भारत मातालाही लागू होतो, याचं भान भारत माता की जय करताना ठेवलेलं बरं! खरंतर, आपल्या देशाला 'भारत' हे नाव पुराणकथातल्या दुश्यंत शकुंतला पुत्र भरत याच्या नावावरून पडल्याचं सांगण्यात येतं. तथापि, पुराणकाळाच्या आधीही भरत नावाचा उल्लेख येतो. रामायण काळात म्हणजे, रामाच्या सावत्र भावाचं नाव भरत होतं. तसंच रामायण-महाभारत या ग्रंथात नाट्य आणणाऱ्या नाट्यशास्त्राचे निर्मातेही मुनीवर्य भरत होते. ही सर्व नावं पुल्लिंगी असताना स्त्रीलिंगी भारत माता झाली कशी? हा लिंगबदल एका मुस्लिमानंच केला. अजीमुल्ला खाँ असं त्यांचं नाव. ते धर्मसुधारक स्वामी दयानंद सरस्वती यांचे सहकारी होते. अजीमुल्ला खाँ यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात देशातल्या लढवय्यांना एकत्र आणण्यासाठी 'मादरे वतन' म्हणजेच 'भारत की जय' असा नारा दिला होता. हा नारा स्वामी दयानंद सरस्वती यांनी भारतव्यापी केला आणि त्यातूनच १९५७ च्या क्रांतीचा अंगार फुलला. हे बंड अखेरच्या टप्प्यावर फसलं, तरी मादरे वतन, भारत की जय हा नारा देशभर पसरला. त्यावेळी काँग्रेस नव्हती. काँग्रेसची स्थापना १८८५ मध्ये झाली. हिंदू-मुस्लीम प्रमाणे इतरही देशबांधव पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्यासाठी एकत्र आले. त्यावेळी होणाऱ्या सभा - आंदोलनातून सर्वजण मादरे वतन, जय हिंद, वंदे मातरम् अशा घोषणा देत होते. त्यात मुस्लीमही होते. वंदे मातरम् ला प्रथम आक्षेप १९२१ च्या कॉंग्रेस अधिवेशनात बॅ. जिना यांनी घेतला. बॅ. जिना हे लोकमान्य टिळक कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांचे ६ वर्ष सेक्रेटरी होते. तीच बॅ. जिना यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात होती. ह्याच बॅ. जिना यांनी पुढे मुस्लीम लीगची स्थापना करून त्याच्या बळावर भारत स्वतंत्र राष्ट्र होतानाच रक्तरंजित फाळणी करून पाकिस्तानची 'मुस्लीम राष्ट्र' म्हणून निर्मिती केली. ह्याचा अर्थ, अजीमुल्ला खाँ यांचा मादरे वतन, भारत की जयचा नारा आपलासा करण्यात बॅ. जिना यांना टिळकांचा सेक्रेटरी म्हणून झालेली शिकवणी एकदमच कुचकामी ठरली. ह्या बदलातच मादरे वतन, भारत की जयची घोषणा भारत माता की जय झाली असावी. हा बदल करताना भारत मातेला देवतारूपी चित्रात आणि हिंदू विचारधारेत गुंडाळली नसती, तर भारत माता की जयला आक्षेप घेण्याची संधी ओवेसींना मिळाली नसती. असाच प्रकार 'जय श्रीराम'बाबत झालाय. हिंदूंच्या जय श्रीराम आणि मुस्लिमांचा सलाम आलेकूम  यातून एकमेकांच्या स्नेहाची देवघेव व्हायची. पण अयोध्येतल्या मंदिर-मशीद आंदोलनात जय श्रीराम ! हो गया काम ! असे नारे घुमल्यानं आता जय श्रीराम हा मुस्लीमविरोधी उन्मादी नारा झालाय. तशीच अल्ला हो अकबर ही हिंदूंना दंगलीचा 'आवाज' देणारी घोषणा झालीय. तथापि, धर्मनिष्ठा वा राष्ट्रनिष्ठा या अशा घोषणांत सामावलेल्या नसतात. अशानं आधी धर्मद्वेष आणि अखेरीस राष्ट्रद्वेष वाढतो. तो राष्ट्रहिताचा नाही. भारतासारख्या विविध धर्मीयांच्या देशात एकता आणि राष्ट्रवाद भक्कम करायचा असल्यास प्रत्येकाच्या धर्मश्रद्धेचा सार्वत्रिक स्वीकार झाला पाहिजे. या धर्मश्रद्धांचा आणि राष्ट्रनिष्ठांचा काडीमात्रही संबंध नाही. कारण राष्ट्रनिष्ठा, भक्तीसाठी एकच सूत्र असावं, असा नियम अथवा सिद्धान्त नाही. प्रत्येकजण आपली राष्ट्रनिष्ठा, देशप्रेम आपल्या पद्धतीनं आणि त्याच्या शब्दांत दाखवू शकतो. या मोकळेपणाची तुलना इतर देशांशी करता येणार नाही. इंग्लंड, जर्मनी वा पाकिस्तानसारख्या देशात एकच भाषा, एकच धर्म, एकच वेष-पेहराव, एकच संगीत-नृत्य, एकच आहार-विहार पद्धत असल्यानं त्यांचा राष्ट्रवाद एकरूपी आहे. आपल्या भारतात सर्व बाबतीत वैविध्य असल्यानं आपला राष्ट्रवाद बहुत्वरूपी आहे. तो इंद्रधनुषी आहे; म्हणूनच तो जगात सर्वाधिक सुंदर आहे. तो जपला पाहिजे. म्हणूनच 'भारतमाता की जय बोलण्यास नकार देणाऱ्याचं नागरिकत्व रद्द करा...!' ही मागणी किंवा ओवेसीची जीभ छाटण्यासाठी इनाम लावणारा हा अतिरेकीपणा आहे. ते राष्ट्रनिष्ठा वा देशप्रेमाचं लक्षण नाही.
१८८२ मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीत वंदे मातरम् हे गीत आलं. त्यात भारतमातेला वंदन तिच्या मुक्तीसाठी संघर्ष हा क्रांतिकारकांचा निर्धार व्यक्त झाला. त्याही आधी किरणचंद्र बॅनर्जी यांनी भारतमाता हे नाटक १८७३ मध्ये रंगभूमीवर आणलं होतं. लॉर्ड कर्झननं बंगालची पूर्व आणि पश्चिम अशी फाळणी केली. त्यावेळी कर्झनच्या जुलूमशाही विरोधात लोक वंदेमातरम हे प्रेरणा गीत घेऊन लढले. हे गीत म्हणजे इंग्रजांविरोधात लढण्याचं एक शस्त्र ठरलं. त्यावेळी बंगालमध्ये इंग्रजांनी या गीतावर बंदी आणली. त्यानंतर तर भारत माता आणि वंदे मातरम् या गीतघोषणा प्रतीकांविषयी लोक जास्त संवेदनशील झाले. आजही या घोषणेबद्दल लोकांना मंत्राइतकी आपुलकी दिसते. वंदे मातरम्, भारतमाता की जय या आता फक्त घोषणा राहिल्या नाहीत. ते भारतीय देशभक्तांचे मंत्र बनलेत. या मंत्राला कुणाचा विरोध असेल तर ते खपवून घेणार नाही.'
भारतमाता हे रूपक प्रतीक आणि वंदे मातरम् या संकल्पना स्वातंत्र्य चळवळीत उदयाला आल्या, लोकप्रिय झाल्या असल्या, तरी भारताच्या भूमीवर या संकल्पना फार पुरातन आहेत, असं दिसतं.
विष्णू पुराणात म्हटलंय-
उत्तरं यत समुद्रस्य हिमद्वैद्ववैव दक्षिणम्
वर्ष तत् भारतं भारती यत्र संतति. 
वेदांमध्ये म्हटलंय,
माता भूमि: पुत्रो s हं पृथिव्या :
भूमी माता आहे, आपण पृथ्वीचे पुत्र आहोत
वाल्मिकी रामायणात, 
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी 
असं वाल्मिकींनी लिहून ठेवलंय.
आपण ज्या भूमीवर राहातो तिला मातेचा दर्जा देण्याचा मानस असं पुरातन ग्रंथात दिसतं. भारत मातामधलं भारत हे नाव कसं आलं ? याविषयी विविध मतांतरं आहेत. भारत नावाचे जैन मुनी होते. त्यांच्यावरून भारत हे नाव आलं, असं काहीजण सांगतात. पुराणात प्रसिद्ध असलेल्या शकुंतला हिचा शूर मुलगा भरत त्याच्या नावावरून भारत हे नाव आलं, अशी मांडणी होते. रामाचा भाऊ भरत याच्या नावावरून भारत नाव आलं, असं रामायणप्रेमी सांगतात. श्रीकृष्णाच्या आधी जन्मलेले; नाट्यशास्त्र लिहिणारे प्रसिद्ध मुनी भरत यांच्यापासूनही भारत हा शब्द आला असावा, असं मत काहीजण मांडतात. भारत देशाला ज्यांच्यापासून भारत हे नाव पडलं ते सारे पुरुष आहेत. पण भूमीला माता मानण्याच्या परंपरेमुळे भारतमाता ही संकल्पना आली. भारत पिताभूमी आहे, असं कुणी म्हटलेलं नाही.
आनंदमठ कादंबरीतून भारत माता ही संकल्पना लोकांपर्यंत नेण्यात आली असली तरी १८५७ च्या इंग्रजविरोधी उठावात भारत माता ही कल्पना पुढे आली होती. आर्यसमाजी समाजसुधारक स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांचे सहकारी अजीमुल्ला खाँ यांनी इंग्रजांविरोधात चळवळ सुरू करताना लोकांना संघटित केलं. त्यावेळी लोकांमध्ये देशभक्ती जागावी, म्हणून अजीमुल्ला खाँ यांनी मादरे वतन-भारत की जय ही घोषणा दिली. दयानंद सरस्वती यांनी इंग्रजांविरोधात लढ्यासाठी ज्या पाच लोकांशी चर्चा केली, ते पाच जण १८५७ च्या उठावाचे क्रांतीचे कर्णधार बनले. हे पाचजण म्हणजे- नानासाहेब पेशवे, अजीमुल्ला खाँ, बाळासाहेब, तात्या टोपे, बाबू कुंवर सिंह हे होत.
१८५७ च्या उठावात मुस्लीम क्रांतिकारक अजीमुल्लांनी दिलेला मादरे वतन-भारतमाता की जय हा नारा पुढे विभागला गेला. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसनं भारत माता की जय म्हणायला सुरुवात केली. महमदअली जिनांच्या मुस्लीम लीगच्या सभांमध्ये मादरे वतन की जय, जय हिंद, हे नारे घुमू लागले. वि.दा. सावरकर यांच्या हिंदू महासभेने मात्र जय हिंदची घोषणा पसंत केली. १९४७ ला देशाची फाळणी झाली. त्यानंतर तर या घोषणांचं सारे अर्थच बदलून गेले. हिंदू-मुस्लीम भेद जसा वाढला, तशा या घोषणाही वादग्रस्त बनल्या. त्यांच्याभोवती राजकारणाचे फास आवळले गेले.
भारतमाता की जय ही घोषणा म्हणायला मुस्लीम समाजाचा नकार कशामुळे आहे? यावर 'उर्दू मर्कज' चे संस्थापक, उर्दू भाषेचे अभ्यासक, साहित्यिक जुबेर आजमी हे सांगतात. आजमी यांनी उर्दू मर्कज ही संस्था उर्दू आणि इतर भाषांमध्ये संवाद वाढावा, म्हणून चळवळ सुरू केलीय. उर्दू मर्कजमधल्या मर्कज या शब्दाचा अर्थ मध्यवर्ती कार्यालय असा आहे.
भारतमाता की जय घोषणेच्या वादाविषयी जुबेर सांगतात, 'ही घोषणा देणारे देशभक्त आणि न देणारे देशाचे विरोधक, असं चित्र संघ परिवार रंगवतोय, हे चुकीचं आहे. बंगालमधले प्रसिद्ध चित्रकार अवनींद्रनाथ टागोर यांनी भारत मातेचं चित्र पाहिल्यांदा काढलं. त्यात चार हात असलेली देवी चित्रित करण्यात आली. ही देवी नारंगी, केसरी साडी नेसलेली आहे. चार हातांत पुस्तक, माळ, पांढरं कापड आणि तांदूळ पिकाची रोपं काड्यांची पेंढी आहेत. त्यानंतर इतरही काहीजणांनी भारतमाताची चित्रं काढली आहेत. काशी, हरिद्वार, कन्याकुमारी इथे भारतमाताची मंदिरं, मूर्ती आहेत. आता मुस्लिमांना प्रश्न असा पडतो की, मूर्तीची, देवीची पूजा आम्ही कशी करणार? मुस्लीम धर्माच्या शिकवणुकीनुसार एका ईश्वरा अल्लाह शिवाय कुणाच्यापुढे माथा टेकवायचा नाही. आईची सेवा करायची पण पूजा नाही. असं जर आहे तर भारत माताच्या मूर्तीची, देवीची पूजा मुस्लीम कसे करतील? भारत माताची मूर्ती पूजायला मुस्लिमांना सक्ती कशी करता येईल? मुस्लीम जय हिंद म्हणतात, जय भारत म्हणतात. आणि ते म्हटलं तरच देशप्रेमी असा आग्रह बरोबर नाही.
दोन प्रसिद्ध चित्रकारांनी भारत माताची चित्रं काढलीत. त्यातलं अवनींद्रनाथ टागोरांचं गंभीर, शांत, सभ्य भारत माताचं चित्र अनेकांच्या पसंतीस पडलं. या भारत माताच्या हातातल्या वस्तू पुस्तक म्हणजे शिक्षण, माळ म्हणजे धर्म-अध्यात्म, नीती, कापड म्हणजे वस्त्र आणि भातच्या पिकाची पेंडी म्हणजे अन्न या देशातल्या जनतेच्या गरजा सांगणारं चित्र होतं. दुसरे चित्र वादग्रस्त चित्रकार एम. एफ. हुसेन यानी काढलं होतं. त्यात भारत माता अत्याचार पीडित आहे, असं दाखवलं होतं. ते चित्र संघ परिवारानं धुडकावून लावलं. त्यावर बंदी आली. एम.एफ. हुसेन यांना देश सोडून जावं लागलं. परदेशातच त्याचं निधन झालं.
अवनींद्रनाथांची शांत, संयमी, गंभीर भारत माता रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वाद-आंदोलनाच्या काळात हिंसक, आक्रमक रूपात लोकांसमोर आणण्यात आली. अशी चित्र रूढ करण्यात आली. आता भारत माता म्हणजे नेमकं कोणतं चित्र, रूप खरं मानायचं, यावर संभ्रम आहे. सध्या भारत माताच्या अनेक मूर्ती आहेत. अनेक आरत्या आहेत. हा संभ्रम महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या मनात नव्हता. बंकीमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ मधली भारत माता ही दुर्गा, काली मातेच्या रूपांतून साकार झाली होती. महात्मा गांधींच्या मनात अशी भारत माता नव्हती. १९३६ मध्ये काशी वाराणसी इथे गांधींनी भारत माता मंदिराचं उद्घाटन केलं होतं. हे मंदिर बांधण्यात देशभक्त शिवप्रसाद गुप्ता आणि दुर्गाप्रसाद खत्री यांनी आर्थिक मदत केली होती. उद्घाटन करताना महात्मा गांधी म्हणाले होते, 'हे भारत माता मंदिर सर्व जाती, धर्म, वंशाच्या लोकांना प्रेरणा देईल. हरिजनांना त्यात प्रवेश असेल. धार्मिक एकता, शांतता आणि देशप्रेमाचं हे मंदिर प्रेरक स्थळ बनावं "
जवाहरलाल नेहरू यांनी १९४० मध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया या त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथात भारत माता म्हणजे काय? ते स्पष्ट केलंय. ते लिहितात- 'मी एका सभेत पोहोचताच, लोकांनी भारत माता की जय अशा जोरात घोषणा दिल्या. माझं स्वागत केलं. मी लोकांना विचारलं, या घोषणेचा अर्थ काय? ही भारत माता कोण आहे? जिचा तुम्ही जय व्हावा अशी इच्छा व्यक्त करताय. तिचं रूप काय? माझ्या प्रश्नांनी लोक आश्चर्यचकित झाले होते. उत्तरं काय द्यायची या संभ्रमात लोक कुजबुजू लागले. इकडे तिकडे पाहू लागले. एकमेकांची तोंड न्याहाळू लागले. माझ्याकडे बघू लागले. मग मी सांगितलं- भारत म्हणजे तुम्ही जो विचार करता तो तर आहेच. पण त्या पलीकडे खूप काही अर्थ त्यात आहे. भारतातले पर्वत-डोंगर, नद्या, वनं - जंगलं, दूरवर पसरलेली शेतं.... जी आपल्याला जेवण देतात हे सारं तर भारत आहेच.
सर्वात शेवटी सगळ्यात महत्त्वाचे आहेत तुमच्या, माझ्यासारखे लोक. या जमिनीवर राहाणारे. भारत माता की जय म्हणजे या सर्व लोकांचा जय. आपण सगळे या भारत माताचा एक हिस्सा, भाग, अंश आहोत. जसजसं लोकांच्या मनात माझं हे सांगणं झिरपे, तशी त्यांच्या डोळ्यांत मला एक खास चमक आलेली दिसे. जसे काही आज त्यांना एक नवा शोध लागलाय.'
या भूमीवर राहाणारे आपण सगळे भारत माताचा अंश आहोत, हे जवाहरलाल नेहरू सांगून गेले तरी ओवेसींना अडचण काय? एमआयएमचे औरंगाबादचे खासदार आणि पूर्वाश्रमीचे पत्रकार इम्तियाज जलील सांगतात, 'आमच्याकडे देशविरोधी म्हणून बघितलं जातं, ते बरोबर नाही. मी पत्रकार होतो. २०११ मध्ये जनलोकपालच्या मागणीसाठी भ्रष्टाचारविरोधी देशव्यापी आंदोलन झालं. त्यात तिरंगा हातात घेऊन मी या आंदोलनात आघाडीवर होतो. त्यावेळी आम्ही इनक्लाब झिंदाबाद, जय हिंद, जय भारत, मादरे वतन की जय या घोषणा दिल्या. जनगणमन  म्हणालो. वंदे मातरमच्या दोन कडव्यांना आमचा विरोध नाही. पण कुणी सक्तीने आम्हाला देशप्रेम सिद्ध करा. ही घोषणा द्या. मग तुम्हाला देशभक्तीचं प्रमाणपत्र देऊ, असं म्हणत असतील, तर त्या प्रमाणपत्र देणाऱ्यांना आम्ही सांगतो की, तुम्ही कोण देशभक्तीचं प्रमाणपत्र वाटणारे. विनायक दामोदर सावरकर तर देशाला पितृभूमी-फादर लँड मानत होते. त्यांनी कधी भारतमाता म्हटलं नाही. आम्ही देशभक्त आहोत. आम्हाला कुणी देशभक्ती सिद्ध करायची सक्ती करू नये....!' 
संघ परिवारातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या संघटना भारत माता की जय घोषणेबद्दल आज आग्रही आहेत. पण त्यांचे वैचारिक आदर्श असलेले विनायक दामोदर सावरकर मात्र भारत माता ही कल्पना मानत नव्हते. ते पितृभूमी, पुण्यभूमी ही संकल्पना मांडायचे. म्हणून त्यांच्या नेतृत्वाखालील हिंदू महासभा या संघटनेच्या सभांमध्ये जय हिंद ही घोषणा दिली जायची. देशाला मातृभूमी, माता मानण्याची पद्धत फक्त आपल्या देशात आहे. युरोप-अमेरिका या खंडात सर्व देश देशाला पितृभूमी-फादर लँड मानतात. आपल्या भाषेला मातृभाषा म्हणण्याचा प्रघातही फक्त आपल्या देशातच आहे. जगभर इतरत्र स्वतःच्या भाषेला फर्स्ट लँग्वेज-प्रथम भाषा म्हटलं जातं. इम्तियाज जलील सांगतात, 'स्वातंत्र्य आंदोलनात भारतमाता हे प्रेरणादायी प्रतीक- रूपक होतं. मात्र त्याचा पुढे राजकीय वापर झाला. फाळणीचं राजकारण रंगल्यानंतर प्रेरणादायी प्रतीकं धार्मिक रंग घेऊन पुढे आली. १९९० मध्ये तर भारत माता की जय ही घोषणा एका खास विचारधारेला जोडली गेली. रामजन्मभूमी आंदोलनात भारत माता की जय ही घोषणा इतरांना डिवचण्यासाठी तर नाही ना? असा संशय येण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली होती...!' 
जुबेर आजमी आपलं निरीक्षण नोंदवताना सांगतात, 'जय श्रीराम ही घोषणा पूर्वी कुणाला डाचत नव्हती. सलाम अलैकुमसारखी ती सामान्य होती. पण रामजन्मभूमी आंदोलन काळात जय श्रीराम या घोषणेला उन्मादाची जोड मिळाली आणि जय श्रीराम ही घोषणा हिंसक, धर्मांध झाली. संघ परिवारानं तर जय श्रीराम, हो गया काम, असं त्या घोषणेचं बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यानंतर विस्तारीकरण केलं. एखाद्या घोषणेला हिंस्रता आणि द्वेष कसा चिकटतो, हे यातून आपल्याला दिसतं...!' एमआयएम किंवा संघ परिवाराने या घोषणांचं राजकारण थांबवावं, असंही मत ते व्यक्त करतात.
संघाला मात्र ही मतं मान्य नाहीत. त्यांच्या मते, 'जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, राधे राधे या घोषणा निष्कलंक आहेत. त्या लोकांना आधार देतात. उलट, यांची अल्ला हो अकबर ही घोषणा गैर मुस्लिमांमध्ये भय पैदा करते. कारण ती दंगलींच्या काळात युद्धाचा उन्माद निर्माण करण्यासाठी वापरली जाते. भारतमाता की जय ही घोषणा कुणाला खतम करण्यासाठी दिली जात नाही. तो प्रेरणा देणारा मंत्र बनतो. लोक त्यातून देशप्रेम शिकतात. सामान्य मुस्लीम समाजाला भारतमाता की जय म्हणायला काही अडचण नाही. पण ओवेसींना त्यांचा पक्ष चालवायचा आहे. म्हणून ते नसते उद्योग करताहेत. ओवेसींच्या आवाजात आवाज मिसळायचं काम या देशातले कम्युनिस्ट, समाजवादी करत आहेत. हे सगळे देशाशी बेइमानी करणारे लोक आहेत. मुस्लीम समाज, हिंदू समाज हे या लोकांची नाटकं आता ओळखू लागलेत. लोक फार काळ फसत नसतात. भारतातली बहुतांशी जनता भारत माता की जय म्हणते. तिची दिशाभूल यापुढे कुणी करू शकणार नाही...!' 
जुबेर आजमी सांगतात, 'काव्यगत न्याय बघा संघ परिवाराचे आदर्श असलेले विनायक दामोदर सावरकर, माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांना भारत माता ही संकल्पना जवळची वाटत नव्हती. ते पितृभूमी, पुण्यभूमी या कल्पनेचा पुरस्कार करायचे. त्यावेळी गांधी, नेहरू यांनी भारत माता हे प्रतीक लोकांत रुजवलं. ते प्रतीक आज संघ परिवारानं आपल्या पद्धतीनं रंगवून ताब्यात घेतलंय. स्वातंत्र्य चळवळीत संघ परिवाराचा सहभाग नव्हता. त्यावेळी त्यांनी भारत माता की जय ही घोषणाही दिली नव्हती. मात्र आज ती घोषणा संघ परिवाराची, भारतीय जनता पक्षाची घोषणा बनू पाहातेय...!' असं निरीक्षण जुबेर आजमी मांडतात. ते असंही सांगतात, 'घोषणाचं राजकीयकरण थांबवावं. भारत माता की जय ही घोषणा देशभक्तीची लिटमस टेस्ट बनवू नये...!'
इम्तियाज जलील सांगतात, 'हे केवळ घोषणांचं राजकीयीकरण, धर्मांधीकरण नाही, तर भारत माताच्या लेकरांचे खरे प्रश्न सोडवायला हे तथाकथीत देशभक्त कमी पडत आहेत. त्यामुळे त्यांना या घोषणांची आठवण होते. घोषणांचा पुळका थांबवा. लोकांना रोजगार द्या. अन्न द्या. त्यांचे रोजचे प्रश्न सोडवा. असो. जवाहरलाल नेहरू म्हणाले तसं ओवेसीही भारत माताचाच अंश आहेत. त्यांची मादरे वतन भारत माताच आहे. भारत माता विरुद्ध मादरे वतन हे भांडण जुंपण्याचं काही कारण नाही...!'
हरीश केंची
९४२२३१०६०९








No comments:

Post a Comment

महाराष्ट्राची पुनरावृत्ती

"बिहारमधलं राजकारण वेगळं राहिलेलंय. इथं समाजवादी विचारसरणी रुजलेली. तिला प्रथमच धक्का बसला. समाजवाद्यांच्या साथीनं भाजपनं इ...