Saturday, 8 November 2025

नरोटीची उपासना...!


"हिरवा विरुद्ध भगवा हा कृत्रिम सामना बरोबरीत सुटला. फिट्टम फाट झालीय. फक्त आमचा तपास चोख असतो असा पिसारा फुलवत नाचणाऱ्या एटीएसचा पार्श्वभाग उघडा पडलाय की ठरवून पाडला गेलाय हे पहावं लागेल! सारे आरोपी निर्दोष आहेत असं न्यायालय म्हणतं मग बॉम्बस्फोट घडवले कुणी. ज्या पामरांचा जीव यात गेला त्या बिचाऱ्यांचा दोष काय होता. दोन दिवस याबाबत उलटसुलट बातम्या येतील. मग सारं विसरलं जाईल. लोकांची स्मृती क्षीण झालीय. विचार करण्याची बुद्धी कुंठीत झालीय. नैतिकतेचं अधिष्ठान कुठंच दिसत नाही. स्वार्थ, मोह, आळस, श्रद्धाशून्यता यामुळं मूलतत्वाचाच विसर पडलाय. धर्म, विद्या, नीती, राजकारण, समाजव्यवस्था या क्षेत्रात जेव्हा बाह्य रूप, कर्मठ आचार, टीळा, टोपी, गंध, माळा यावर लक्ष केंद्रित करतो तिथंच समाजाचा ऱ्हास होतो!"
--------------------------------------
*हिं*दुत्वाचं गर्वपर्व सर्वत्र सुरू असताना हिंदू महासभेची राख होते, हिंदुत्वाचे निखारे फुलतच नाहीत ह्याला नक्की कारण काय? याला कारण हिंदू धर्माच्या रोमारोमात भिनलेली विषमता! अज्ञान आणि नको त्या गोष्टींबद्दलचा अहंकार! हिंदू एकत्र येऊच शकत नाहीत! विविध पंथ-प्रणाल्या यांनी हिंदूंना भेदून टाकलंय. हिंदूंना एकत्र आणण्यासाठी धर्म वेगळ्या तऱ्हेनं तुमच्यापुढं यायला हवा. जे नष्ट व्हायला हवं, ते नष्ट करता येतं आणि इष्ट आहे एवढं घेऊन समाज म्हणून एकत्र येता येतं हे हिंदूंना पटवणारा, प्रत्यक्ष प्रमाण देऊन पटवणारा प्रयोगकर्ता, प्रेरक नेता हिंदू समाजात नाही. स्वतःला हिंदुत्वाचे सर्वेसर्वा म्हणवून घेणारे तथाकथित हिंदुत्ववादी नेते इस्लामभोवतीच विनाकारण घोटाळत आहेत. हिंदुत्व जागवायला इस्लामचा बागुलबुवा नाचवत आहेत. एकाचं भय दाखवलं की, दुसऱ्याबद्दल प्रेम वाटतं हा समज बालीश आहे. हिंदुत्वाची साऱ्या हिंदूंना आत्मीयता वाटावी याचा हा मार्ग नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा, सगळ्यांतला होणारा आणि सगळ्यांचं वेगळेपण विसरायला लावणाराच समाजातला संघटित पुरुषार्थ जागवू शकतो. मी तोंडाची वाफ सोडून निखारे फुलवीन म्हणणाऱ्याला तोंडाची मर्यादा आणि निखाऱ्यांचं जळणं या दोन्ही गोष्टी समजलेल्या नसतात. राष्ट्राला चेतना, प्रेरणा प्राप्त होण्यासाठी निखारे पुरे नसतात. एकमेकाला चेतवणारं, ऊर्जा निर्माण करणारं, स्फुल्लिंग जागवणारा एखादाच पुरुष बऱ्याच काळानं निर्माण होतो. ज्यांचा उल्लेख आपण भगवान म्हणून करतो ते श्रीकृष्ण हे असं स्फुल्लिंग निर्माण करणारे महापुरुष होते. 'समाजाचं नैतिक आणि सांस्कृतिक स्थैर्य हाच धर्म,...!' असं सांगून त्यांनी फाजील धर्मश्रद्धेनं दुबळ्या बनलेल्या धर्मराजाला धक्का देऊन खऱ्या धर्माकडे नेलं. पांडवांनो, धर्म मार्ग सोडून लढा, 'आस्थियतां जये योगः धर्ममुत्सृज्य पांडवा...!,' असं सांगून आणि समजावून त्यांनी पांडवांना विजयी केलं. भीष्म-द्रोणांना कसं मारू म्हणणाऱ्या अर्जुनाला, मार त्यांना असं श्रीकृष्णानंच ठणकावलं. श्रीकृष्ण समाजउद्धारक होते. समाजसंघटक होते. सत्ता आणि संपत्ती यांचा कैफ चढलेल्या सम्राटांविरुद्ध त्यांनी सामान्य माणसाला लढायची प्रेरणा दिली. या सत्तासम्राटांचे धर्मनिष्ठेचे ढोंग लोकांपुढं उघडं करून, श्रीकृष्णांनी त्यांचा नाश करवला. सत्ता आणि संपत्ती यांचा कैफ चढलेल्या मोगलाईची मस्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य माणसाचं संघटन करून, त्यांच्यात प्रेरणा निर्माण करून उतरवली. कालचक्र त्यांनी उलटं फिरवलं. लोकमानसातला अंधार संपवून कर्तृत्वाचे, निष्ठेचे शेकडो स्फुल्लिंग त्यांनी ह्या मातीतून उभे केले. शिवाजी महाराज गेले. संभाजीचा घात झाला. राजारामांना दूर पळून जावं लागलं. पण स्वराज्य संपलं नाही. उत्तरेकडून ह्या ना त्या खानाच्या स्वाऱ्या दक्षिणेवर कोसळत होत्या. पण मराठी वीरांनी इतिहास बदलला. मराठे हिंदवी स्वराज्याचा हर हर महादेव करत उत्तरेवर चालून गेले. हे सगळं घडलं ते छत्रपती शिवाजी नावाच्या एका महापुरुषामुळं. त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय असंतोषाचे जनक म्हणून गाजले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, एवढे म्हणूनच ते थांबले नाहीत 'आणि मी तो मिळवणारच...' असंही त्यांनी निर्धारानं ऐकवलं. ही दुर्दम्य झुंजारवृत्ती, हा कर्तृत्वाचा दिमाख ही सगळ्यांना जागवण्याची, चेतवण्याची, समर्पणासाठी सिद्ध करण्याची हातोटी, यामुळंच लोकमान्यांनी सुरू केलेली लोकशाहीची, स्वातंत्र्याची लढाई आपण जिंकू शकलो. त्यापाठोपाठ आले गांधी. महाराष्ट्रात हिंदुत्वाचा झेंडा नाचवताना गांधींना भ्याड, नेभळट, शेळीचं दूध पिणारा शेळपट, मुसलमानधार्जिणा, देशाचा दुश्मन असं हिणवायची फॅशन आहे. सावरकर गांधींशी आमनेसामने झुंजत होते. सावरकरांचा असामान्य धैर्याचा, त्यागाचा सर्वस्व समर्पणाचा मार्ग सामान्यांसाठी नव्हता आणि सर्वसामान्य माणूस ताठ मानेनं ब्रिटिश सत्तेपुढं उभा होईपर्यंत स्वातंत्र्याचा लढा वेग घेणार नव्हता. या सर्वसामान्य माणसात प्राण ओतलं ते गांधींनी. त्यांनी कणा मोडून पडलेली, ब्रिटिश सत्तेच्या अक्राळविक्राळ आणि आधुनिक रूपानं दबलेली, कलीयुगात लालतोंड्याचेच राज्य होणार असल्या अजब प्रचारानं धास्तावलेली माणसं बदलली. त्यांच्या मनातलं भय त्यांनी संपवलं. स्वातंत्र्यासाठी मीही काही करू शकतो हा विश्वास त्यांनी त्यांच्यात जागवला. फक्त पुण्या-मुंबईत वा महाराष्ट्रात नव्हे, फक्त सुशिक्षितात नव्हे, फक्त हिंदूत नव्हे, उभा भारत त्यांनी जागा केला. घराघरात त्यांनी स्वराज्याचा लढा नेला. एक तुफान उठले 'करेंगे या मरेंगे...!' या निर्धारानं!. ही साधी गोष्ट नव्हती. साम्राज्याशी सामना करायला सामान्य माणूस असामान्य धैर्यानं उभा झाला तो गांधी या महापुरुषामुळच. हा गांधी देवावर पक्का विश्वास ठेवणारा, तसाच माणसावरही पक्का विश्वास ठेवणारा. रोज प्रार्थना करणारा आणि अस्पृश्याला हरिजन म्हणून जवळ घेणारा. स्वतःचा कपडा स्वतः विणणारा. चरखा चालवणारा, लोकांना चरख्यांद्वारा आत्मगौरवाचे अभिमानी जिणं शिकवणारा धर्मवीर तसाच कर्मवीरही !
लोकांना काय हवं, ते त्यांना कसं द्यायचं, लोकांना कसं वळवायचं, कसं जागवायचं, कसं कामात गुंतवायचं याची विलक्षण जाण ज्यांना असते ते लोकशक्तीच्या सहाय्यानं लोकोत्तर गोष्टी करून दाखवतात. ते लोकविश्वास जागवतात. त्या सहाय्यानं लोकसेवेची नवी नवी क्षेत्रं व्यापून टाकतात. ते लोकांमध्ये प्रेरणा पेरतात, चैतन्य जागवतात. मला काहीतरी करायचंय, माझ्यावर काहीतरी जबाबदारी आहे याची जागती जाणीव ते माणसांच्या श्वासातच गुंफतात. ही माणसं त्यामुळं सतत ताजी राहतात. त्यांची भेंड्याची भाजी होत नाही. मी हे केलं, माझ्यामुळं हे झालं असा दर्पही त्यांना येत नाही. ही माणसं तुटत नाहीत, फुटत नाहीत, मोडत नाहीत, साथ सोडत नाहीत आणि मुख्य म्हणजे विकली जात नाहीत. अशी माणसं खरोखरच असतात? हो असतात! अशी माणसं असतात आणि त्यांना घडवणारा महापुरुषही असतो. जो महापुरुष असा प्रयोग करतोय. त्याचं अधिष्ठान आहे देव. धर्माचे मर्म जाणून त्यानुसार कर्म करणारा आणि करायला लावणारा हा महापुरुष योगेश्वर कृष्णापासून मोहनदास करमचंद गांधी या महात्म्यापर्यंतच्या साखळीतला तो नवा दुवा आहे. माणसातले सत्व जागवू पाहतोय. लोकमान्यांनी हेच केलं होतं. कंबरडे मोडलेला रडका माणूस, राष्ट्र उभं करू शकत नाही, म्हणून माणसाचं सत्व गीतेच्या आधारानं जागवायचा प्रयोग लोकमान्यांनी केला. छत्रपतींनी 'हे राज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा...!' अशी भावना लोकांत जागवून हा सत्व जागवण्याचाच प्रयोग केला होता.
सामाजिक क्षेत्रात स्वातंत्र्यपूर्व काळातल्यापेक्षा कितीतरी अधिक समाजसेवक निरपेक्षपणे काम काम करत आहेत. त्यांना प्रसिद्धी मिळत नाही. संसदेत आणि बाहेरही जे कायदे मोडतात अशांनाच भरपूर प्रसिद्धी दिली जाते. मानवतेसाठी शांतपणे कामं करणारेच या देशाला, समाजाला तारू शकतील. अजून सारं काही संपलेलं नाही, अजूनही या देशाला आशा आहे. भवितव्याबद्दल मला आशा वाटते ती या देशात फार मोठे राजकीय पुढारी आहेत, कार्यशूर नोकरशहा आहेत, वैज्ञानिक आहेत, विद्वान आहेत म्हणून नाही, निष्काम, निर्लेप काम करणारे समाजसेवक आहेत म्हणून. आज कुणीच धर्म पाळत नाही. प्रत्येकानं आपला धर्म पाळायला हवा. राजकारण्यांनी, नोकरशहांनी त्यांचा धर्म पाळावा. शिक्षकांनी शिक्षकांचा धर्म पाळावा. दुर्दैवानं शिक्षकही आपला धर्म विसरलेत. त्यांनी समाजसेवेचा मार्ग अनुसरायला हवा.
लोकमान्यांचे मोठेपण सांगतानाच त्यांनी शिवाजी महाराजांच्या मोठेपणाचेही मर्म सांगितले. 'चोहीकडे अंधार असताना हे दोघेही प्रकाश झाले. त्यांच्यामध्ये एक सत्व होतं. क्रियेची सिद्धी या सत्वातूनच होते, साधनानं नाही. सत्वात शक्ती असते. भारतातल्या प्रत्येक माणसात हे सत्व यावं याच तळमळीनं मंडालेच्या तुरुंगात लोकमान्यांनी गीतारहस्य लिहिलं. लोकात सत्व नसेल तर लोकशाही फुकट जाईल. कंबरडं मोडलेला रडका-पिचका-मोडका माणूस तुटेल-मोडेल-पडेल-पैशाने विकला जाईल तर लोकशाहीला अर्थच राहणार नाही! म्हणून सामान्य माणसाचं सत्व जागवण्यासाठी, अंतिम माणसापर्यंत गीतेतला विचार पोहोचवण्यासाठी लोकमान्यांनी गीतारहस्य सांगितलं. गीता पुनःपुन्हा सांगतेः 'तू रडायला जन्माला आलेला नाहीस. ऊठ, लढ...!' माणसाच्या जीवनातले दुःख, चिंता दूर व्हायला हव्यात असं अनेक पाश्चिमात्य तत्त्वज्ञ सांगतात. सुख काय, दुःख काय हे सांगता येत नाही. तेव्हा दुःख-चिंता नष्ट करण्याऐवजी त्यांना सामोरं जाण्याची ताकद आपण माणसात आणायला हवी. विवेकानंद तरुण होते तेव्हाची गोष्ट. ते गंगेवर गेले आणि त्यांच्या पाठीमागं माकडं लागली. ते पळायला लागले तसा माकडांना चेव आला. ती अधिक जोरानं त्यांच्यामागे पळू लागली. तेव्हा एका वृद्धानं ओरडून म्हटलं,  तरुण संन्याशा, असा पळू नकोस. माकडं त्यानं पाठ सोडणार नाहीत. तोंड फिरवून उभा राहा. माकडांकडे डोळे रोख. आणि विवेकानंद तसं उभं होताच एकेक माकड पळून गेलं. दुःखाकडे असं बघता यायला हवं. रडका-मोडका माणूस या देशाला नाही चालणार. आज माणूस पडलाय, मोडलाय. माणूस विकत मिळतो. गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांना विकत घेता येतं. जिथं माणसाचा विक्रय सुरू होतो तिथं सगळं संपतं. माणूस स्वतःला हलका समजायला लागलाय. तीन मोटरवाल्यापुढं एक मोटरवाला हांजीहांजी करतो. माणसाला कणाच राहिलेला नाही. मी हलका नाही ही जाणीव माणसात जागृत व्हायला हवी. माझी कुणाला जरुरी नाही, असं कुणीच मानायचं कारण नाही. तुझी जरुरी नसती तर झोपेतून उठलाच नसतास. तू उठलास. तुला ज्या कुणी उठवलं त्याला तुझी जरुरी आहे. त्याची आठवण ठेव. आमच्या सगळ्या संतांनी, धर्मानं 'देव तुझ्याबरोबर आहे...!' असं वारंवार सांगितलंय. धर्मात खूप चांगल्या गोष्टी आहेत, पण आज एक दुसऱ्याला मारतो, उच्चनीचता जपतोय. कुठं गेलं ते तत्त्वज्ञान? आम्ही वादात ते घालवलं. भक्ती संप्रदायातही वेगळेवेगळे पंथ, विचार आहेत. त्यांच्यात हाणामाऱ्या, द्वैती-अद्वैती-विशिष्ट अद्वैती. आमच्या भांड्याला अशी अनेक भोकं पडलीत त्यातून सगळ्या चांगल्या गोष्टी गळून चालल्यात. विहिरीत पाणी खूप चांगलं आहे, पण ते वर आणण्यासाठी भोक पडलेलं भांडं वापरलं तर पाणी वर येणार कसं? समाजाची उन्नती करणारेही भोकं पडलेले. प्रत्येक पार्टीचं वेगळं भोक. प्रत्येक पक्षाला, समाजाला वर आणायचं आहे. गरिबी मिटवायची आहे. मग एकमेकाला विरोध का? ही भोकं आपल्याला बुजवायला हवीत. माणसाला जागवायचं नाही. माणूस जागा झाला तर आपलं काय, अशी भीती वाटतेय सगळ्यांना. धार्मिकांनी जे केले तेच राजकारणी करीत आहेत. माणसाला नशेत, झोपेत ठेवलं जातंय. त्याला खऱ्या सत्याचा शोध घेऊ दिला जात नाही. तुकाराम महाराज म्हणत 'कोणाचिया सत्ते चाले...!' हे शरीर कोणती शक्ती चालवते. ही शक्ती माणसात हवी. माणसानं माणसाजवळ जायला हवं. पण समस्यांवर मात करण्यासाठी ईश्वरी शक्तीचंही स्मरण ठेवायला हवं. एक श्रीमंत बाई आपल्या मोटारीनं कुठं तरी निघाली. पुढं ड्रायव्हर, मागं ती बाई आणि तिची मुलगी. तेवढ्यात नणंद म्हणाली, मीही येते. ती मुलीजवळ बसली. मावशी आणि आत्याबाईही आल्या. त्या ड्रायव्हरशेजारी बसल्या. आता गाडी निघणार तेवढ्यात विहिणबाई आल्या. तेव्हा ड्रायव्हरला खाली उतरायला सांगून ती जागा विहिणबाईंना दिली. सगळ्यांची सोय झाली, पण गाडी जागच्या जागीच. ड्रायव्हरला खाली उतरवल्यावर गाडी चालणार कशी? आपण हेच केलंय. सर्व जीवन चालवणाऱ्या ड्रायव्हरलाच आपण खाली उतरवलाय. जीवन मग चालणार कसं? बुद्धीवादी म्हणतातः आम्हाला देव नको. रडक्या, मोडक्या, खचलेल्या, पिचलेल्या, आत्मविश्वास गमावलेल्या माणसाला आत्मगौरवातून सामर्थ्य मिळवून देण्यासाठी, ताठ मानेनं उभं करण्यासाठी साधन म्हणून देवाचा वापर करायला काय हरकत आहे? समाजाला उन्नतीकडे न्यायचं असेल तर संप्रदाय, पक्ष, वाद, भेदभाव उपयोगाचे नाहीत. समाजात धार्मिक विरुद्ध बुद्धीवादी असे भेद पाडू नका. भिंती उभारू नका. धर्म पडका-सडका-जातीवादाने भरलेला आहे हे मी कबूल करतोय, पण त्यात जे चांगलं आहे त्याचाही त्याग कशासाठी करायचा? या समाजाचा धार्मिकांनी नाश केला, असं बुद्धीवादी म्हणतात आणि ह्या बुद्धीवाद्यांनी समाजाचा सत्यानाश केला असा कट्टर धार्मिक दावा करतात, हे आता थांबायला हवं. धार्मिकांनी थोडा बुद्धीवाद स्वीकारावा, बुद्धीवाद्यांनी थोडा धर्म मानावा, पिडलेल्या, पिळलेल्या माणसाला आत्मविश्वास देण्यासाठी हे का होऊ नये? कॉमरेडशिपचे युग संपलंय. रिलेशनशिपचे युग आता सुरू झालंय. तू माझा भाऊ आहेस म्हणून समाजातल्या अंतिम माणसाला आपण जवळ घ्यायला हवं. सरकारी मदतीनं माणसं उभी राहणार नाहीत. पैसे, तुकडे फेकून माणसं उभी राहात नाहीत, तर कुत्री उभी राहतात. माणसानं माणसाजवळ जायला हवं. प्रेमाचा उबारा देऊन सर्वसामान्य माणसाचं सत्व जागवावं...!'
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

सत्वपरीक्षा निवडणूक आयोगाची, राजसत्तेची...!

"राहुल गांधींनी पुराव्यानिशी लोकशाहीच्या हत्येचं विश्लेषण केलंय. निवडणूक आयोग डाटाची सॉफ्ट कॉपी देत नाही. सीसीटीव्ही फुटेज डिलीट करतं. ...