"धर्मात नास्तिकतेला जागा नसते. पण धर्माचे पालन करणाऱ्या समाजात ती अनेकदा असते. किंबहुना ती असायला हवी. याचं कारण धर्माच्या पलिकडे जावूनही प्रत्येकाच्या नेणिवेत खोलवर माणुसकीचा सखोल ओलावा असतोच. त्यामुळे टीका, कठोर टीका, प्रसंगी शिव्या शाप देतही अनेक धर्मांनी नास्तिकांना आपल्यासोबत घेऊनच प्रवास केला. त्याच्या सरमिसळीतूनच विविध संस्कृती फुलल्या. हे सगळं सांगण्यामागे उद्देश हा की, शार्ली हेब्दोमध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रावरून एका शिक्षकांचा एका कुमारवयीन मुलाने शिरच्छेद करण्याची घटना पॅरिस घडली हा आहे!"
---------------------------------
इस्लामच्या पाच मूल तत्त्वांपैकी चार मुलतत्त्व म्हणजे, रोजा, जकात, हज आणि नमाज या सादर करण्याच्या गोष्टी आहेत. तर इमान म्हणजे अल्लाह हा एकमेव इश्वर आहे आणि महंमद त्याचा पैगंबर आहे हे विश्वास ठेवण्याचे मूलतत्त्व आहे. चार मूलतत्त्व न पाळणाऱ्यास टीकेचे धनी व्हावे लागते, बोल खावे लागतात तेही जर तुम्ही मुस्लिम वस्तीत राहात असाल व तेही धार्मिक मुस्लिमांमध्ये उठबस असेल तर. मात्र पहिले मूलतत्त्व म्हणजे इमान यावर अविश्वास दाखवल्यास मुस्लिम समाजात त्या व्यक्तीला आपला मानलं जात नाही. बहुतांश वेळा शत्रू म्हणूनच मानलं जातं. हमीद दलवाईंचं मोठेपण खरं तर मुस्लिमांच्या या कट्टर विश्वासाला धक्का पोहोचवणं हेच आहे. हमीद दलवाई हे इस्लामचे गाढे अभ्यासक वगैरे नव्हते. तसेच त्यांना मिळालेलं आयुष्यही उणेपुरे ४९ वर्षांचं. त्यातच त्या काळात आजच्यासारखी इस्लामवरची पुस्तकंही उपलब्ध नव्हती. ९/११ च्या हल्ल्यानंतर अनेक पाश्चिमात्य विद्यापीठांमध्ये इस्लामी इतिहासाचे विभाग उघडले गेले, जिथे होते ते अधिक सशक्त केले गेले. इस्लामी इतिहासावर अनेक अंगांनी अभ्यास सुरू झाला व इंग्रजीत विपूल साहित्य उपलब्ध झाले. त्याचा फायदा दलवाईंना घेता आला नाही. त्यामुळे दलवाईंच्या काही भूमिका या प्रतिक्रियावादी वाटतात. दलवाईंनी स्वतःचे नास्तिक असणं जाहीर केलं. महंमद हे प्रेषित नव्हे तर समाजसुधारक होते व त्या काळात त्यांनी काळाच्या पुढे जाऊन अनेक महत्त्वाच्या सुधारणा अरब समाजात घडवून आणल्या. मात्र नव्या काळात त्यातील काही सुसंगत राहिल्या नाहीत व त्या दिशेने बदल घडविण्याचा त्यांचा मानस त्यांनी जाहिर केला. मात्र अल्लाहचे अस्तित्व नाकारणे व प्रेषित असण्यालाच नकार देणे यावर मुस्लिम सवयीने चिडले. प्रसंगी ते हिंसकही झाले. त्यातून पुढे जे घडले त्यातूनच दलवाईंच्याही प्रतिक्रिया येऊ लागल्या. असो.
सांगण्याचा मुद्दा हा की, इस्लामचा सुवर्ण काळ हा इसविसन ९०० ते १३००-१४०० असा मानला जातो. या काळात इस्लामी राज्यांमध्ये विज्ञान, कला, तंत्रज्ञान अनेक क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रगती घडली. अगदी आज आपण स्मार्टफोनवर वापरत असलेले अनेक ॲप ज्या अलगॉरिदमवर चालतात इथपासून ते आधुनिक वैद्यकशास्त्रातील विविध गोष्टी या काळात अरब संशोधकांकडून शोधल्या गेल्या. याचं मुख्य कारण होतं मुत्तझील नावाचा पंथ. अब्बासीद राजघराण्याचा राजाश्रय असलेल्या या पंथाचं म्हणणं होतं की, जर इस्लाम एकेश्वरवादाची मांडणी करतो तर कुराण हे दैवी असू शकत नाही. कारण दैवी शक्ती ही फक्त अल्लाह आहे. अल्लाहने तर संपूर्ण विश्वाचीच निर्मिती केली आहे. पण त्या विश्वात मनुष्य आपल्या ज्ञानानुसार बदल घडवतोच. म्हणजे अल्लाहनेच निर्माण केलेल्या फळ-फळावळ वनस्पती, बोकड वगैरे तो स्वतःचे अन्न म्हणून वापरतोच की. तर कुराणाचेसुद्धा अर्थ समजून घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती विवेक, असे मुत्तझील पंथाचे म्हणणे होते. धर्माचे सार हे विवेकात आहे, हा या पंथाचा मुख्य विचार होता. त्यातूनच मग पुढे ग्रीक, संस्कृत, लॅटीन अशा विविध भाषांमधील पुस्तकं बगदादमध्ये आणून ती अरबीत भाषांतरित करण्याची मोठी चळवळच उभी राहिली व त्याला राजाश्रय मिळाला. यातूनच मग पुढे हे सुवर्णयुग उभे राहिले. पुढे याच्या विरोधात अबू हमीद मुहम्मद अल गझाली, इब्न हंबल यांनी मात्र याच्या विरोधात पुनरुज्जीवनवादी चळवळ सुरू केली. हंबल यांच्या कट्टर धार्मिक भूमिकेविरोधात राज घराण्याशी संबंधित पुरोगामी विद्वानांनी त्यांच्याशी उघड वाद घातले. मात्र ते त्यांच्या मतांवर कायम राहिले व पुढे त्यांना देहांताचीही शिक्षा झाली. त्यातूनच मग हळू हळू जनता विवेकवादी विचाराकडून कट्टरतेकडे झुकू लागली.
इस्लाम मध्य आशियात पसरल्यानंतर व तेथील मंगोल लढवय्यांनी विशेषतः तैमूरसारख्या भटक्या संस्कृतीतून आलेल्या अव्वल लढवय्यांनी जेव्हा अरबांना लढाईत मात दिली त्यानंतरही या विवेकवादी पंथाला वाईट दिवस आले. पुढे आधुनिक काळात इस्लामी देशांतील राज्यकर्ते त्यांच्या सोयीने हा इतिहास वापरत राहिले. त्यातील सगळ्यात वाईट राजकारण है सोद घराण्याने अमेरिकेचे अंकित राहून केले. अल्लाह आणि पैगंबर यांच्यावरील टीका ऐकून न घेण्याची ही प्रवृत्ती आजच्या काळात अधिक ठाशीव झाल्याचे अनेक घटनांवरून अधोरेखित होत असते. अर्थात नैसर्गिक स्रोतांचा भांडवली व्यवस्थेला हवा असणारा फायदा व त्यामुळे मध्य पुर्वेला अस्थिर करण्याचे कारस्थान हा त्यातील एक अत्यंत महत्त्वाचा कांगोरा आहेच. मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमध्ये खूपच पुसट रेषा असते. इमान या मूलतत्त्वावरचा प्रहार अनेक मुस्लिम सहन करू शकत नाहीत. नव्या पिढीतील अनेक मुस्लिम लेखक, विचारवंत या दिशेने विपूल लेखन, चिंतन, मंथन करत असतात.
तमीम अन्सारी, रेझा अस्लान, जीम खलीली अशा अनेक विद्वानांनी याबाबत खूप काम केलेले आहे. मात्र धर्माचे अन्वयार्थ लावण्याचे काम कुराण व हादीसचे पाठांतर केलेल्या ज्या मौलाना नामक गटाकडे असते त्यातील अबूल कलामांसारखी व्यापकदृष्टी असलेले क्वचितच असतात. मग त्यातूनच कायम जंग ए बदर (बदरची लढाई जी महंमद यांनी कमी सैन्य असतानाही मक्क्यातील शत्रूंचा पाडाव करून जिंकली होती) आणि करबला ज्यात महंमद यांचे नातू हुसेन यांना याजिद नावाच्या मुस्लिम नेत्याने ज्याने स्वतःला खलिफा घोषित केले होते मारले. याच्या पलिकडे काही सांगितले जात नाही. मुत्तझील तर दूरच राहीले, पण अल ख्वार्जमी, अल किंदी, अल सिना, अल बेरूनी यांचा उल्लेखही केला जात नाही कारण तितका अभ्यासच नसतो. त्यातच भर म्हणून तबलिग, अहल ए हादीस वगैरे आहेतच. त्यातूनच मग वेडसर कट्टरतेकडे झुकलेली तरुणांची फळीच्या फळी उभी राहते. या वेडसर धार्मिक कट्टरतेतून बाहेर पडायचेच असेल, तर कबीर, बुल्लेशहा यांच्या आध्यात्मासोबतच या सांप्रतच्या अनेक विद्वानांनी लिहिलेल्या विपूल पुस्तकांचाही अभ्यास करायला हवा. सोबतच्या मुस्लिम तरुणांशी चर्चा करायला हवी. यातील अनेक पुस्तकांच्या पीडीएफ तर नेटवर मोफत उपलब्ध असतात. ती नव्या पिढीने वाचायला हवीत. अर्थात ही उर्मी तेंव्हाच येईल जेव्हा पॅरिससारख्या घटना आपण ज्या धर्माला मानतो त्या धर्मातील वेडसर माणसाने केल्यात याची लाज वाटू लागेल. या अशा गोष्टींची लाज वाटायला लागण्यातच मानवतेचं आणि विवेकाचं बीज आहे, इतकंच या निमित्ताने लक्षात घ्यायला हवं.
No comments:
Post a Comment