Sunday, 9 November 2025

शिवसेना सोडण्याचा बाळासाहेबांचा निर्णय

शिवसेना अन् बाळासाहेब...
"तीस वर्षांपूर्वीची घटना. जेव्हा बाळासाहेबांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा शिवसैनिकांमध्ये हलकल्लोळ माजला होता. 'पुत्र आणि पुतण्याच काय, माझ्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंबिय शिवसेनेतून बाहेर पडत आहेत....!' ह्या बारा शब्दात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना आपल्या पंजात आणू बघणाऱ्या 'सिंडिकेट'चा धुव्वा उडवला होता. शिवसेना आता उद्धव आणि राज यांच्या हातात चाललीय. पुत्र आणि पुतण्या यांच्या घराणेशाहीला बाळासाहेब शरण गेले आहेत आणि त्यांचा धृतराष्ट्र झालाय. दुर्योधन-दुःशासन जोडी जमावी तशी उद्धव-राज जोडी जमते आहे, ही खदखद उरात ठेवून बाळासाहेबांबद्दलच्या निष्ठेचे नाटक खेळत शिवसेनेत वावरणाऱ्या धूर्तांचा डाव बाळासाहेबांनी चुटकीसरशी उधळला होता!" 
----------------------------------------
उद्धव-राज यांची लुडबूड ही घराणेशाहीची सुरुवात असा टेकू ठरला. खेळी खेळली होती. हे घरातले, नुसते घरातले नव्हते. ठाकरे कुटुंबातले दोन जवान बाळासाहेबांचे जय-विजय झाले तर आमचे काय, हा घोर नक्कीच कुणाला तरी लागला होता. तो संपावा म्हणून उद्धव-राज यांच्यावर डायरेक्ट मारा करायचा. नेहमी घराणेशाहीवर घसरणाऱ्या बाळासाहेबांना उद्धव-राज यांच्या सहाय्याला धावणे शक्य होणार नाही. शिवसैनिक उद्धव-राज यांच्यावरील हल्ला फार गंभीरपणे घेणार नाहीत असा अंदाज बांधला असावा. उद्धव-राज दोघांना संघटनेपासून अलग पाडता येईल, खेरीज बाळासाहेबांची अवस्था हात तुटल्यासारखी होईल व ते आपल्या पुरते कबजात येतील अशी शेख महंमदी स्वप्ने पाहात होते. पण घडले भलतेच ! त्यांना चव्हाट्यावर खेचण्याने शिवसेना अधिक दुर्बल होणार हेही ओळखले आणि त्यांना अपेक्षाही नव्हती असा प्रतिडाव बाळासाहेबांनी मांडला. शिवसेना हा बाळासाहेबांचा जणू श्वास. शिवसैनिक हे जणू त्यांच्या धमन्यातून वाहणारे रक्त. या श्वासाचे आणि रक्ताचे एकमेकांशी असलेले नाते बाळासाहेबांशिवाय दुसरे कोण अधिक जाणणार? शिवसेनेत राहून शिवसेनाप्रमुखांना पेचात आणू बघणाऱ्यांना शिवसेनेत ठेवून शिवसैनिकांकडूनच सरळ करण्याचा हा प्रतिडाव कसा प्रभावी ठरला, हे सेनाभवनासमोरील सभेत झालेल्या 'व्यासपीठावर एकच गादी, एकच नेता, बाळासाहेब ठाकरे' ह्या प्रखर घोषणांनी सिद्ध झाले. शिवसेनेत लोकशाही नाही, शिवशाही आहे आणि शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत, ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी छपवली नव्हती. ही रचना मान्य करणाऱ्यांनाच शिवसेनेत स्थान होते व पंचवीस वर्षे हे सगळे निमूटपणे मान्य करूनच ते विविध पदांवर प्यादी म्हणून वावरत होते. आज ना उद्या आपल्याशिवाय आहेच कोण, अशी आशा काहींना होती व त्यावेळी कुणी पुढे घुसू नये यासाठी पुढे घुसण्याची ताकद असणाऱ्यांना विविध मार्गाने हतबल करण्याची वा बाहेर हुसकण्याची फडणीशीही होत होती. पण उद्धव आणि राज ही पटावर नव्यानेच अवतरलेली प्यादी हत्ती-घोडा-उंट सोडा, वजीरांच्या चालीने चालू शकतात असे जाणवताच तथाकथित नेत्यांची घालमेल झाली. 
काही दिवसांपूर्वी मी प्रभंजन मध्ये लिहिले होते की, शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एकच आकडा, बाकी सारी शून्ये! शून्यांमुळे आकडा वाढतो, पण आकडा असतो म्हणूनच शून्यांना किंमत येते. शून्ये आकड्याची जागा घेऊ शकत नाहीत. ही जागा मिळावी म्हणून शिवसेनेतल्या शून्यांनी मांडलेल्या डावाचे बाळासाहेबांनी बारा शब्दात बारा वाजवले. बाळासाहेबांसाठी आम्ही प्राणाची कुर्बानी करू, पण आमचा आवाज बाळासाहेबांपर्यंत पोहोचतच नाही हे दुःख वारंवार व्यक्त केले जात होते ते का? हे दुःख जाणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बाळासाहेब व शिवसैनिक यांच्यातला दुवा होण्याची भूमिका घेतली आणि बाळासाहेबांपर्यंत शिवसैनिकांचे दुःख पोहोचू लागले. शिवसैनिकांना बाळासाहेबांचे विचार भेसळ न होता कळू लागले. आमच्यामार्फतच देवाशी संपर्क साधा असे भक्तांना दटावणारे मध्यस्थ यामुळेच हादरले असावेत का? घराणेशाहीचा आवाज यामुळेच उठला असावा का? उद्धव आणि राजला आवरा, सामूहिक नेतृत्वाची लोकशाही शिवसेनेत आणा ही मागणी त्यावेळी झाली होती. 
गेल्या अंकात मी 'हिंदुहृदयसम्राटाने तर हिंदू धर्माएवढे विशाल, उदार असायलाच हवे' असे लिहून बेताल, बेफाम व अर्वाच्च लिखाणामुळे आचार्य अत्रे यांचे काय झाले याबद्दल लिहिले होते. आज त्याच गोष्टीवर पुन्हा लिहावे लागले ही गोष्ट मन खिन्न करणारीच आहे. ज्यांच्याबद्दल अभिमान, आदर आणि आपुलकी वाटते अशा व्यक्तींचे पतन ही तटस्थता राखून बघण्याची गोष्ट नसते असेही मी गेल्या वेळी लिहिले होते. शिवसेनेत राहून शिवसेनाप्रमुखांना अडचणीत आणणाऱ्या, शिवसेना ही संघटना केवळ आणि केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या सामर्थ्यावरच उभी आहे हे पूर्णपणे ठाऊक असताना उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यामुळे घराणेशाही सुरू झाली असा कांगावा करून आपले हेतू साधायचा प्रयत्न करणाऱ्या, बाळासाहेबांना नाममात्र शिवसेनाप्रमुख बनवून शिवसेनेवर कबजा जमवू बघणाऱ्या धूर्वांना राजीनाम्याची घोषणा करून शिवसैनिकांच्या जबरदस्त संतापाचा शह देऊन बाळासाहेबांनी चुटकीसरशी संपवले असले तरी शिवसैनिकाला निखारे बनवण्याचा त्यांचा उद्योग निरर्थक ठरणाराच आहे. ह्या निखाऱ्यांवर आपले परोठे भाजून घ्यायला पुन्हा तेच धूर्त पुढे सरसावणार आहेत. आजवर हाच उद्योग त्यांनी केलाय. 
तुमचा हिंदुत्वाचा कार्यक्रम तरी एकदा कळू द्या. प्रत्येक निखार हा अखेर राखच होतो. त्याची फुलण्याची जळण्याची विशिष्ट मर्यादा लक्षात घेऊन निखाऱ्यांचा वापर करावा लागतो. एकवेळ अशी येते, अगदी प्राणपणाने फुंकुनसुद्धा निखारा फुलत नाही. नुसती राख मात्र उडते, राहाते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आगे बढो अशा आरोळ्या ठोकून प्रोत्साहित करण्यात आले आहे. आम्ही त्यांना शुभ चिंततो. मुश्ताक अंतुले, अजितदादा पवार, अशोक चव्हाण, अविनाश नाईक या भाग्यवंतांकडे बघत त्यांनी राजकारणात उतरावे, असे आम्ही मुळीच म्हणणार नाही. आमदारी अथवा कुणाच्या कृपेने मिळणारे मंत्रीपद हेच ज्यांचे लक्ष्य असते त्यांची झेप मुद्दाम लक्षात घेण्याची जरुरीच नसते, पण 'घराणेशाही'चे राजकारण करू बघणाऱ्या इंदिरा गांधींना काय भोगावे लागले हे राजकारणात उतरणाऱ्यांनी लक्षात घ्यायलाच हवे. एवढी मोठी झेप न घेणाऱ्यांनाही बरेच काही मोजावे लागतेच. विठ्ठल चव्हाण, खिमबहाद्दूर थापा यांनाही विसरून चालणार नाही. त्यांच्या मृत्यूला राजकारणातला त्यांचा वावरही कारण झाला आहे.
आज राजकारण निर्मळ राहिलेले नाही आणि निर्धोकही राहिलेले नाही. राजकारणात 'आगे बढताना' निदान ह्याची जाणीव असणे आवश्यक आहे. आपले हितचिंतक, खास विश्वासू वाटणारेच आपल्या वाटेवर खड्डे खोदत असतात. उघडपणे शत्रुत्व करणारा वा दूर होणारा परवडला. जवळ राहून घात करणारा नको. उद्धव आणि राज नको हा नारा देण्याचे कारणच काय? जे आत आहेत त्यांची वाट मोकळी करण्यासाठीच हा आवाज उठला. तो आतल्यांनीच बाहेरच्याकडून उठवला. ही गोष्ट उद्धव आणि राज यांनी मनोमनी ठेवावी. शिवसेनेत पुन्हा निखारे फुलवण्यासाठी बाळासाहेबांनी कंबर कसली आहे. हे निखारे फुलतील त्यावर काय भाजायचे, काय शिजवायचे, काय तापवायचे याची योजनाही त्यांनी केली असेल असे धरून चालू. तशी काही तयारी नसेल तर जिथे जिथे निखारा तिथे तिथे राखेचा ढिगारा तेवढा उरेल. असे राखेचे ढिगारे झालेल्या संघटना खूप आहेत. हिंदुमहासभा हे त्यातले अगदी जवळचे उदाहरण. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा मूर्तीमंत अंगार असतानाही ही संघटना टिकली नाही. सावरकरांचे पुतणे विक्रम यांनी जिवाचा आटापिटा केला, पण पुतण्याला ना काकांची पातळी गाठता आली ना त्यांच्या नावाने त्याला तारले. 'आम्ही कधी कुणावर रागावलो असू, संतापलो असू पण त्यामागची शुद्ध भावना जाणून घ्या,' असे बाळासाहेबांनी 'अखेरचा जय महाराष्ट्र' या संपादकीयात लिहिले आहे. इतरांनाही राग-संताप येऊ शकतो. त्यामागेही शुद्ध भावना असू शकते हे मानायला बाळासाहेब तयार असतील अस यावरून म्हणायला हरकत नाही. आम्हीही शुद्ध भावनेनेच हे सारे लिहिले आहे.
हरीश केंची 
९४२२३१०६०९







No comments:

Post a Comment

महाराष्ट्राची पुनरावृत्ती

"बिहारमधलं राजकारण वेगळं राहिलेलंय. इथं समाजवादी विचारसरणी रुजलेली. तिला प्रथमच धक्का बसला. समाजवाद्यांच्या साथीनं भाजपनं इ...