Saturday, 8 November 2025

पाव शतकाचा मानकरी : डॉ. मनमोहनसिंग

"आपल्याकडं माणूस मेल्यावर तो जास्त मोठा होतो. जिवंतपणी त्यांना आपण ओळखायला कमी पडतो. गोदी मीडिया आणि कुजबुज मोहिमांनी कितीही चिखलफेक केली, तरी आज जसजसा देश विकला जातोय, जसजसं द्वेषाचं विष प्रत्येक घरातला मेंदू सडवत चाललाय, तसतसं मनमोहन सिंगांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय! भारतीय अर्थव्यवस्थेला तरतरी आणणाऱ्या खुल्या अर्थव्यवस्थेचे जनक, जागतिक मंदीमध्ये भल्या भल्या देशांनी नांगी टाकलेली असताना सुद्धा देशाला आपल्या नेतृत्वानं सहजरीत्या तारणारा महान अवलिया. अन्नसुरक्षा कायदा, मनरेगा योजना, भूमी अधिग्रहण कायदा, माहिती अधिकार कायदा, शिक्षण हक्क कायदा, वनाधिकार कायदा या जनसामान्यांचं आणि गरिबांचं आयुष्य बदलणाऱ्या महत्वाच्या सुधारणा करणारा भारताचा महान सुपुत्र कालवश झाला आहे!"
.................................................
मनमोहनसिंग यांनी गेल्या २३ वर्षांत स्वत:विषयी एकही लेख लिहिलेला नाही, आत्मकथन करणारी मुलाखत दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या राजकीय मत-मतांतरांविषयी फारसे काही प्रसिद्ध झालेले नाही, पण त्यांच्या काही  भाषणांतून अगदी त्रोटक स्वरूपात आलेले स्वत:विषयीचे उल्लेख एकत्र करून त्यांची संगती लावण्याचा प्रयत्न केला तर, दोन दशके राजकारणात वावरलेला हा माणूस आचार- विचाराने कसा आहे याचा अंदाज बांधता येतो. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी राजीनामा दिलेला असेल. अर्थतज्ज्ञ मनमोहनसिंग यांच्याकडे वयाच्या साठीत असताना अगदीच अचानकपणे नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्रिपद १९९१ मध्ये चालून आले. नंतरची पाच वर्षे त्यांना त्या पदावर राहून देशाच्या अर्थकारणाला वेगळे वळण देण्याचे काम करता आले. त्यानंतर सात वर्षे, केंद्रात भाजप आघाडीचे सरकार असताना मनमोहनसिंग हे काँग्रेस पक्षात तर होतेच, पण त्यातील बहुतांश काळ राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरही होते. त्यांच्याकडे २००४ मध्ये पुन्हा एकदा अगदी अचानकपणे, देशातील सर्वोच्च असे पंतप्रधानपद चालून आले आणि त्यानंतर दहा वर्षे ते त्या पदावर कायम राहिले. या संपूर्ण दहा वर्षांच्या काळात त्यांनी ‘मी अपघातानेच राजकारणात आलो’ ॲक्सिडेंटल पॉलिटिशियन असे विधान अनेक वेळा केले, पण ‘मी अपघातानेच पंतप्रधान झालो’ ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर असे विधान एकदाही केल्याचे आढळत नाही. वरवर पाहणाऱ्या बारूंसारख्या ‘संजयां’ना या दोन्हींत जास्त फरक आहे असे वाटणार नाही, पण घटनात्मक अधिकारपदांची प्रतिष्ठा जपण्याच्या संदर्भात विशेष जागरूक असणाऱ्या मनमोहनसिंग यांना त्याचे महत्त्व अधिक वाटत असणार... असो.
तर असे हे मनमोहनसिंग प्रशासकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना राजकीय खेळात आले आणि आता मात्र खऱ्या अर्थाने निवृत्त झाले आहेत. मागे वळून पाहिले तर लक्षात येईल, जून १९९१ ते मे २०१४ हा २३ वर्षांचा कालखंड मनमोहनसिंग यांच्या आयुष्यातील उत्कर्षपर्व तर होताच, पण देशाच्या संदर्भातही हा कालखंड विशेष महत्त्वाचा होता. आणि सध्या मनमोहनसिंग यांची जनमानसातील प्रतिमा ‘यशापयशी’ अशी संमिश्र दिसत असली तरी, भारताच्या संदर्भात गेल्या ‘पाव शतकाचा मानकरी’ मॅन ऑफ द क्वार्टर सेंच्युरी निवडायची वेळ आली तर ‘निर्विवाद’पणे मनमोहनसिंग यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल. ८२ वर्षे जगलेले मनमोहनसिंग ऑक्सफर्ड आणि केंब्रिजमधील उच्च शिक्षण संपवून आणि पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील प्राध्यापकीचा अनुभव घेऊन वयाच्या जेमतेम पस्तिशीनंतर केंद्र सरकारच्या आर्थिक-प्रशासकीय सेवेत आले. नंतर वयाच्या ऐन चाळिशीत केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार, मग अर्थखात्याचे सचिव आणि वयाच्या पन्नाशीत- १९८२ मध्ये- भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले आणि त्यानंतर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा पदांवरून कार्यरत राहिले. म्हणजे १९९१ मध्ये देशाचे अर्थमंत्री होण्यापूर्वीची दोन दशके ते अज्ञातवासात नव्हते, तर केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय वर्तुळात बऱ्यापैकी वलयांकित स्थानांवर संचार करीत होते. त्यामुळे ‘मी अपघाताने राजकारणात आलो’ असे ते म्हणत असले, तरी २३ वर्षे इतका दीर्घ काळ राजकारणात इतक्या उच्च स्थानावर ते राहू शकले असतील तर त्या अपघातामागे सबळ असा कार्यकारणभाव असणार, हे देशवासीयांनी समजून घेतले पाहिजे. त्यांच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे २००४ मध्ये ते पंतप्रधान झाले तेच मुळी त्यांच्या आर्थिक धोरणांचे सर्वाधिक कडवे विरोधक असलेल्या ‘माकप’च्या पाठिंब्यावर. एवढेच नाही तर, ज्योती बसू, हरकिशनसिंग सूरजित आणि सोमनाथ चटर्जी या तीन बुजुर्ग कॉम्रेड्‌सचे ठोस समर्थन नसते तर मनमोहनसिंग पंतप्रधान होऊच शकले नसते. हे तिघेही मनमोहनसिंग यांना आधीच्या दोन दशकांपासून ओळखत होते. अशा या मनमोहनसिंग यांच्या राजकीय कारकिर्दीचे पाच-पाच वर्षांचे तीन प्रमुख टप्पे लक्षात घेऊन त्यांचे विश्लेषण केले पाहिजे. पहिली पाच वर्षे अर्थमंत्रिपदाची, दुसरी पाच वर्षे यूपीए-१ चे पंतप्रधान आणि तिसरी पाच वर्षे यूपीए-२ चे पंतप्रधान.
पहिल्या टप्प्यात मनमोहनसिंग यांना नरसिंह राव यांचा खंबीर पाठिंबा आणि ‘फ्री हँड’ होता, त्यामुळे उदारीकरण पर्वाची मुहूर्तमेढ रोवण्याचे श्रेय किंवा अपश्रेय द्यायचे ठरले तर मनमोहनसिंग यांच्याबरोबरच नरसिंह राव यांनाही वाटेकरी करावे लागते. नरसिंह रावांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस शेखर गुप्ता यांना Walk the Talk मध्ये दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले होते की, ‘‘वळण आम्ही घेतले हे म्हणणे खरे नाही. देश ज्या रस्त्याने चालला होता, त्या रस्त्यावरच वळण आल्यामुळे आम्ही वळलो, इतकेच...’’ इथे उदारीकरणाच्या धोरणाची अपरिहार्यता नरसिंह राव सूचित करतात. पण म्हणून उदारीकरणाचे श्रेय अनेकांच्या दृष्टीने अपश्रेय त्या दोघांना देता येणार नाही, असे म्हणणे योग्य नाही. उलट, तात्पुरत्या तडजोडी करून वेळ निभावून नेण्याची मतलबी चलाखी न करता; दीर्घकालीन रणनीती आखून त्यासाठीची पायाभरणी करण्याचे काम त्या दोघांनी केले, याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्या संदर्भात २३ जुलै १९९१ रोजी मनमोहनसिंग यांनी आपला पहिला अर्थसंकल्प मांडताना केलेले भाषण ‘ऐतिहासिक’ ठरले. त्या ३१ पानांच्या भाषणातील दोन-तृतीयांश भाग त्या वर्षीच्या अर्थसंकल्पावर असला तरी एक-तृतीयांश भाग उदारीकरणाची द्वाही पुकारणारा होता. त्या एक-तृतीयांश भाषणात काय आहे, यापेक्षा काय नाही असे विचारावे लागेल. ‘‘सद्य:स्थिती नाजूक आहे, पण त्यातून बाहेर पडता येणार आहे... कठोर पावले उचलावी लागणार आहेत आणि जादूची कांडी असणार नाही... पूर्वीची धोरणे त्या परिस्थितीत योग्य होती, पण आता त्या धोरणांची कालमर्यादा संपली आहे... आपण संकटात सापडलो आहोत, पण समोर खूप मोठी संधी वाट पाहत आहे... अप्रिय निर्णयांमुळे ताण येणार आहे, पण कमजोर वर्गावर जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे... संपत्ती निर्माण करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, पण गांधीजींची ट्रस्टीशिपची कल्पना समोर ठेवली पाहिजे.’’
या भाषणात ‘उद्या’बाबत कठोर पण आश्वासक भाष्य  करतानाच, ‘काल’बाबत कुठेही मोठा पश्चात्ताप किंवा हळहळ व्यक्त केलेली नाही... भाषणाचा समारोप करताना व्हिक्टर ह्युगोचे वचन उद्‌धृत करून मनमोहन म्हणतात, ‘‘ज्या संकल्पनेचा काळ आला आहे, तिला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला येण्याचा काळ आता आला आहे.’’ पण दुर्दैव(?) हे आहे की, ते भाषण टीव्हीवर दाखवले गेले नव्हते, कारण तोपर्यंत संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू झालेले नव्हते आणि तोपर्यंत इंटरनेटही नसल्याने ते भाषण जनसामान्यांना उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे इंग्रजी वर्तमानपत्रांतून आलेले त्रोटक वृत्तांत यापलीकडे ते भाषण गेले नाही, काही राजकीय-सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासकांपुरतेच ते मर्यादित राहिले. त्या भाषणाला २० वर्षे झाली, तेव्हा साधनाच्या अंकात त्याची विस्तृत ओळख दिली आहे.आजही ते भाषण वाचले तर ‘व्हिजन’ काय असते, ते कळेल. गेल्या २३ वर्षांत त्याच ‘व्हिजन’च्या दिशेने हा देश अडखळत-ठेचकाळत, पण पुढे-पुढेच वाट काढत चालला आहे. या संपूर्ण काळात कोणत्याही केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने त्या धोरणाची दिशा वळवण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण खरी गंमत तर वेगळीच आहे... ते भाषण बारकाईने ‘बिट्‌विन द लाइन्स’सह वाचले आणि त्यानंतरची २३ वर्षांची देशाची वाटचाल व्यापकपणे न्याहाळली तर, या देशात उदारीकरण आणले किंवा अवतरले असे ठोसपणे म्हणता येत नाही. आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबवले, असे म्हणणेच कदाचित जास्त योग्य ठरेल. अनेक अर्थतज्ज्ञ ‘रिफॉर्म्स’ हाच शब्द अधिक करून वापरतात. मनमोहनसिंग यांचा दुसरा पाच वर्षांचा, म्हणजे यूपीए-१ च्या काळात पंतप्रधान असतानाचा कालखंड तुलनेने अधिक चांगला होता. त्यांपैकी पहिली चार वर्षे डाव्यांचा ‘जाच’ होता हे खरे; पण त्यामुळे मनमोहन यांच्या बाजूला सहानुभूतीही होती आणि दोषारोपही कमी होते. आणि त्याच काळात माहितीचा अधिकार देणारा कायदा, जमीन सुधारणा, रोजगार हमी, शेतकरी कर्जमाफी असे कल्याणकारी निर्णय झाले. पण चार वर्षांनंतर डाव्यांनी अमेरिकेबरोबरच्या अणुकराराला विरोध करून सरकारचा पाठिंबा काढला, तेव्हा मनमोहनसिंग यांनी मुत्सद्देगिरी पणाला लावून तो करार घडवून आणला. त्या वेळी विरोधकांनी गदारोळ केल्याने मनमोहनसिंग यांना विश्वासदर्शक ठरावाला उत्तर देणारे भाषण करता आले नाही. त्या संपूर्ण भाषणाचा अनुवाद साधनामध्ये आला होता. त्यानंतर वर्षभराने आलेल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा २०० च्या पुढे सरकल्याने त्या विजयात मनमोहनसिंग यांचा वाटा सर्वांत मोठा मानला गेला.
मनमोहनसिंग यांचा पाच वर्षांचा तिसरा कालखंड म्हणजे यूपीए-२ चे पंतप्रधानपद. यातील पूर्वार्ध जागतिक स्तरावरील आर्थिक मंदी व मध्य-पूर्वेतील राजकीय अस्थिरता यामुळे गाजला; तर उत्तरार्ध कोळसा, राष्ट्रकुल, टू जी स्पेक्ट्रम, इत्यादी महाघोटाळ्यांमुळे गाजला. त्यामुळे प्रशासनाच्या आघाडीवर ढिलेपणा, सहकारी मित्रपक्षांच्या कारवायांवर नियंत्रण न राहणे, अण्णा-बाबा यांची आंदोलने नीट हाताळता न येणे, आणि नंतर मोदींचा विखारी व उन्मादी तर केजरीवाल यांचा धडाकेबाज व सिम्प्लिफाइड प्रचार... अशा एकामागोमाग संकटांना, आव्हानांना सामोरे जाण्याची वेळ मनमोहनसिंग यांच्यावर आली आणि त्याच वेळी काँग्रेस पक्षसंघटनेला आलेले मांद्य व मरगळ, आजारपणामुळे सोनियांची सक्रियता कमी होणे, राहुलला अखेरपर्यंत सूरच न सापडणे अशी दैन्यावस्थाही त्यांच्या वाट्याला आली. त्यामुळे एफ.डी.आय., अन्नसुरक्षा, भूसंपादन, पेन्शन, पेट्रोल-डिझेल नियंत्रणमुक्त करणे असे महत्त्वपूर्ण निर्णय/ कायदे केल्यानंतरही त्यांचे विशेष श्रेय ना मनमोहनसिंग सरकारला मिळाले, ना काँग्रेस पक्षाला. अशा दीर्घकालीन हेतू ठेवून केलेल्या निर्णयांचे परिणाम दिसायला वेळ लागतो, त्यामुळे भ्रष्टाचार-घोटाळे यांच्या गदारोळात त्याकडे लक्ष न जाणेही साहजिकच होते. पण हे सर्व एवढ्यावरच न थांबता, सरकारला धोरण-लकवा आलाय, आर्थिक सुधारणा रखडल्यात, कल्याणकारी योजनांमुळे देशाचे अर्थकारण ढासळलेय अशा चर्चा सुरू झाल्या आणि उदारीकरणाचा उद्‌गाताच मग निष्क्रिय ठरवला गेला. काव्यात्म न्याय कसा आहे पाहा! उदारीकरण धोरणामुळे बरे-वाईट काय झाले याची वेगवेगळी यादी करता येईल, पण ‘सर्व स्तरांतील जनतेच्या अपेक्षा वाढल्या’ हा मुद्दा दोन्ही याद्यांमध्ये कॉमन असेल. आणि आता जनतेच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, हाच तर प्रमुख ठपका मनमोहनसिंग सरकारवर आहे. पण एका अर्थाने मनमोहन यांच्या यशाची ही पावती आहे.
मनमोहनसिंग यांनी गेल्या २३ वर्षांत स्वत:विषयी एकही लेख लिहिलेला नाही, आत्मकथन करणारी मुलाखत दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या राजकीय मत-मतांतरांविषयी फारसे काही प्रसिद्ध झालेले नाही, पण त्यांच्या काही  भाषणांतून अगदी त्रोटक स्वरूपात आलेले स्वत:विषयीचे उल्लेख एकत्र करून त्यांची संगती लावण्याचा प्रयत्न केला तर, दोन दशके राजकारणात वावरलेला हा माणूस आचार- विचाराने कसा आहे याचा अंदाज बांधता येतो. त्यांच्या राजकीय मनाचे कंगोरे त्यांच्या काही सौम्य पण ठोस विधानांतून दृष्टीस पडतात. उदाहरणार्थ... १९९१ च्या ‘त्या’ ऐतिहासिक भाषणात ते म्हणतात, ‘‘अर्थमंत्री ‘हार्ड हेडेड’ असला पाहिजे तसा मी असेन, पण जनतेशी वागताना मात्र सॉफ्ट हार्टेड असेन... आपल्याला माइंडलेस आणि हार्टलेस ग्राहक तयार करायचे नाहीत, कारण ते आपल्याला परवडणारे नाही.’’ २००८ च्या अणुकराराच्या वेळी केलेल्या भाषणाचा समारोप करताना ते म्हणतात, ‘‘रस्ते, वीज, पाणी नसलेल्या आता पाकिस्तानात असलेल्या एका दुष्काळ- प्रदेशांतील लहान गावातून मी आलो आहे. पंतप्रधान म्हणून काम करताना तो छोटा मुलगा सतत माझ्या नजरेसमोर असतो.’’ एफ.डी.आय.च्या निर्णयाच्या वेळी म्हणाले, ‘‘काही निर्णय केवळ योग्य आहे म्हणून घेता येत नाहीत, बहुमत आहे म्हणूनही घेता येत नाहीत; सहमती घडवून किंवा विरोधाची धार बोथट करूनच ते निर्णय घ्यावे लागतात.’’ ‘‘राजकारणी होण्यापेक्षा मुत्सद्दी होणे अधिक सोपे असते, कारण राजकीय नेत्यांना निवडणुका जिंकाव्या लागतात... आणि राजकारणात टिकून राहण्याला मी समजत होतो त्यापेक्षा जास्तच महत्त्व आहे.’’‘‘आपण सर्व जण घटना घडून गेल्यानंतर काय व कसे चुकले याचे विश्लेषण करतो, कारण सर्व तपशील आपल्या हाती असतात. पण काही निर्णय घेत असताना असे तपशील हाताशी नसतात आणि निर्णय तर घ्यावेच लागतात.’’‘‘आम्ही अधिक चांगले काम करू शकलो असतो, असे म्हणणारा पहिला माणूस मीच आहे. वर्तमानातील माध्यमे माझ्यावर कितीही टीका करोत, इतिहास माझे मूल्यमापन अधिक सहानुभूतीने करील.  सुषमा स्वराज यांनी २०११ मध्ये लोकसभेत भ्रष्टाचार व घोटाळे यांच्यासंदर्भात तडाखेबंद भाषण करून समारोपाला एक शेर ऐकवून पंतप्रधानांना आव्हान दिले होते, ‘शायरीमध्येच उत्तर द्या.’ त्यावर ‘सुषमाजींसारखे वक्तृत्व माझ्याकडे नाही’ असे नम्रतापूर्वक म्हणून मनमोहनसिंग यांनी शेर ऐकवला होता, ‘माना है के तेरे काबिल मै हूँ नही, लेकिन तू मेरा शौक तो देख, मेरा इंतजार तो देख.’
ही केवळ वानगीदाखल काही उदाहरणे आहेत. एकूणातच काय तर, ह्युगो, रूसो, व्हॉल्टेअर, जेफर्सन, कौटिल्य, गालिब अशा लोकांना उद्‌धृत करून ते स्वत:चा स्वाभाविक कल उघड करीत असतात. ते पाहिले तर जुन्या-जाणत्या ज्ञानमार्गी बुजुर्गांचे शहाणपण, क्षमाशीलता व सहनशीलता आणि याहून महत्त्वाचे म्हणजे व्यक्तिगत मान-अपमानाच्या पलीकडे जाऊन कार्यरत राहण्याची प्रवृत्ती असा संगम मनमोहनसिंग यांच्यामध्ये दिसतो. म्हणून तर ‘मी त्यांचा गुलाम असल्याप्रमाणे वागावे, असे त्यांची इच्छा होती’ असा उल्लेख प्रकाश करात यांच्या संदर्भात ते अणुकरारावरील चर्चेला उत्तर देणाऱ्या लोकसभेतील भाषणात करतात. ‘केंद्रातील ज्येष्ठ मंत्री तर सोडाच, पण नवोदित मंत्रीही त्यांना विशेष सोनियाइतका मान देत नसत,’ असे संजय बारू सांगतात. आणि अगदी अलीकडे राहुल गांधी यांनी ‘‘तो अध्यादेश फाडून फेकून देण्याच्या लायकीचा आहे’’ असे विधान केले तेव्हाही तो अपमान ते शांतपणे गिळतात. अशा प्रसंगी त्यांनी तडकाफडकी राजीनामा का दिला नाही, असा प्रश्न अनेक थोरा- मोठ्यांच्या मनात येतो. पण असे अपमानाचे प्रसंग त्यांच्या वाट्याला इतके आले असतील की, त्यांनी ते मनाला लावून घेतले असते तर किती वेळा राजीनामा द्यावा लागला असता? आणि सार्वजनिक जीवनात त्यातही राजकीय जसजसे वरच्या पायरीवर चढत जाता, संवेदनशील जागेवर बसता तसतसे टीका-टिप्पणीला व मान-अपमानाला कमीत कमी थारा द्यावा लागतो, अन्यथा काम करणेच शक्य होणार नसते. तात्पर्य... व्यक्तिगत मान-अपमानाच्या पलीकडे पाहणारा, श्रेय लाटण्यासाठी चढाओढ न करणारा, आपल्याला ‘मास बेस’ नाही याचे भान ठेवणारा, आपली बलस्थाने व मर्यादा यांची उत्तम जाण असणारा, प्राप्त परिस्थितीत शक्य तितके चांगले करण्याचा प्रयत्न करणारा आणि जुन्या भूतकाळातील तत्त्वज्ञ-विचारवंत यांच्याशी मनाने खेळणारा पण वर्तमानातील वास्तवात रमणारा हा माणूस आहे. एकंदरीत विचार करता, देशाला नवे वळण देणारा हा जुन्या वळणाचा माणूस आहे. आता तो निवृत्त झाला आहे. अनेक मर्यादांसह कर्तव्यपूर्ती केल्याचे समाधान त्याच्याकडे असेल. आपल्याकडे त्याच्यासाठी कृतज्ञतेचा सलाम आहे काय?

No comments:

Post a Comment

'मतचोरी'चं तुफान घोंघावतंय..!

"लोकसभेत अपेक्षित मतं मिळाली नाहीत हे लक्षांत येताच निवडणूक आयोगाला हाती धरून मोठी खेळी खेळली गेली. विरोधी, गैरसोयीच्या मतद...