Monday, 2 June 2025

छत्रपती शिवरायांचा हिंदू धर्म...

"ज्या राजाने सर्व जातीधर्माच्या सर्वसामान्य जनतेला जोडून जनतेचं म्हणजेच रयतेचं राज्य निर्माण केलं त्याच छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करून देशातल्या नागरिकांचे विभाजन केलं जातंय. एका सर्वसमावेशक, समतावादी, उदारमतवादी राजाला कट्टरवादी म्हणून समोर आणलं जातंय हे अत्यंत संतापजनक आहे. काही वर्षांपूर्वीसुद्धा तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आताचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा "छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची वोटबँक तयार केली होती, त्यावर अलीकडच्या काळात अटलजी, अडवाणी आणि मोदींनी त्यावर कळस चढवलाय...!" असे उद्गार काढून शिवरायांना हिंदुत्ववादी ठरविण्याचा प्रयत्न केला होता. छत्रपती शिवराय हिंदुत्ववादी कधीही नव्हते. छत्रपती शिवरायांची नीती-धोरणं, त्यांच्या आयुष्यातल्या घटनांद्वारे आपण शिवरायांना अपेक्षित हिंदू धर्म कोणता होता? हे जाणून घेऊयात..!"
------------------------------------- 
आजवरचा इतिहास पाहता छत्रपती शिवरायांसारखा विज्ञानवादी आणि वास्तववादी दृष्टिकोन असणारा राजा भारताच्या इतिहासात दुसरा आढळून येत नाही. आपल्या देशात अनेक धार्मिक, शूर-वीर , पराक्रमी, मुत्सद्दी, राजे-महाराजे होऊन गेलेत परंतु छत्रपती शिवरायांसारखा वास्तववादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कुणाकडेच नव्हता हे शिवरायांच्या चरित्रावर प्रकाश टाकल्यावर आपल्या लक्षात येईल. छत्रपती शिवराय काही अंशी धार्मिक असतीलही परंतु ते धर्मांध किंवा धर्मवेडे कधीच नव्हते म्हणजेच ते हिंदू होते परंतु हिंदुत्ववादी नव्हते. त्यांनी स्वतः च्या धर्माचा अभिमान बाळगताना आपल्या शत्रूच्या धर्माच्या लोकांच्या कत्तली केल्या नाहीत. त्यांना जबरदस्ती स्वतःच्या देवी-देवतांचे नाव घ्यायला लावले नाही. आजूबाजूला इतक्या धर्मांध शाह्या पाहूनही त्यांनी धर्माच्या आधारावर स्वराज्य स्थापन केले नाही. स्वराज्यालासुद्धा हिंदवी हे व्यापक नाव दिले हिंदवी म्हणजे भारतीय, जसे आपण जय हिंद म्हणतो अगदी तसेच. स्वतःच्या धर्माचं रक्षण करतांना त्यांनी इतर धर्मियांचा कधीच छळ, जबरदस्ती किंवा अन्याय केला नाही. युध्दबंद्यांवर धार्मिक बंधने लादली नाही.
शिवरायांनी कोणतेही कार्य करतांना कधीच पोथ्या-पंचांग मुहूर्त पाहिला नाही. काम कितीही महत्वाचं असो अथवा जोखमीचं असो ते शुभ-अशुभ वेळेची वाट बघत बसले नाहीत. त्यांचा मुहूर्त ठरत होता तो त्यांच्या गुप्तहेर खात्याच्या बातम्यांवरून. अनेक लढाया, चढाया, गड, किल्ले त्यांनी अत्यंत अशुभ मानल्या जाणार्‍या अमावास्येच्या रात्रीच जिंकलेत. त्यामुळे नेहमी मुहूर्त, शुभ-अशुभ वेळ पाहून प्रत्येक कार्य करणार्‍या पेशव्यांना त्यांची टीचभर पेशवाई सुद्धा टिकवता आली नाही, आणि कधीच मुहूर्त-काळ-वेळ न पाहता प्रत्येक कार्य करणार्‍या इंग्रजांचे अर्ध्यापेक्षा अधिक जगावर राज्य होते. छत्रपती शिवरायांचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराजांचा जन्म पालथा म्हणजे पायाकडून ,पायाळू झाला होता. जे की पंचांग-ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत अशुभ होते. परंतु महाराजांनी हा पालथा जन्मला म्हणजे दिल्लीची पादशाही पालथी घालेल असे बोलून घडलेल्या घटनेचा सकारात्मक अर्थ लावला. मुलगा पालथा जन्माला आला म्हणून अशुभपण टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारचे धार्मिक अनुष्ठान, होम-हवन, पूजा-विधी साधी औपचारिकता म्हणूनही केले नाहीत. 
छत्रपती शिवरायांच्या इतिहासातला एक खूप महत्वाचा प्रसंग म्हणजे औरंगजेबाच्या अनेक दिवसांच्या अनन्वित छळानंतर नेताजी पालकरांनी धर्मांतरास तयारी दर्शविली त्यानुसार १७ मार्च १६६७ रोजी त्यांची सुंता करून त्यांना मुस्लिम धर्माची दीक्षा देण्यात आली. जबरीने धर्मांतरण करून नेताजी पालकरचे मुहम्मद कुलीखान असे नामकरण करण्यात आले आणि महाबतखानासोबत काबुलकडे रवाना करण्यात आले. १६७६ मध्ये जेव्हा नेताजी पालकर पुन्हा स्वराज्यात परत आले तेव्हा महाराजांनी धर्ममार्तंडांच्या, धर्मपंडितांच्या विरोधाला अज्जीबात न जुमानता नेताजींना पुन्हा हिंदुधर्मात सामावून घेतले. मोहम्मद कुलीखान पुन्हा नेताजी पालकर झाले. याचप्रमाणे बजाजी नाईक निंबाळकर यांच्या जबरी धर्मांतरानंतर सुद्धा महाराजांनी धर्मगुरूंचा विरोध दुर्लक्षित करून त्यांना हिंदू धर्मात नुसतं परतच घेतलं नाही तर त्यांचा मुलगा महादेव याला स्वतःची मुलगी सुद्धा दिली. या दोन्ही घटनांच्या वेळी महाराजांनी धर्मपंडितांना जबरीने ज्या हिंदूंचे धर्मांतरण केल्या गेले आहे त्यांना मुस्लिम धर्मातून पुन्हा त्यांच्या मूळ हिंदू धर्मात घेण्यासाठी काही तरतूद आहे का अशी विचारणा केली असता, अशी कुठलीही तरतूद, सोय वा पूजा विधी आपल्या धर्मात अजिबात नसल्याचे धर्मगुरूंनी सांगितले. त्यावर शिवराय बोलले कि जर आपल्या धर्मात अशी तरतूद नसेल, असे प्रयोजन नसेल तर तयार करा, नवीन लिहा, नवीन नियम तयार करा पण आपलीच माणसे परत आपल्या धर्मात घ्या आणि त्या धर्मगुरूंना पालकर आणि निंबाळकरांना पुन्हा हिंदू धर्मात घ्यावं लागलं .
आजच्या काळातही धर्माचा जबर असा पगडा पाहता १६ व्या शतकातल्या महाराजांचा हा निर्णय म्हणजे विलक्षण क्रांतिकारी आणि दूरदर्शीपणाचा वाटतो. ते वाटण्याचे कारणही तसेच आहे. संपूर्ण भारतदेश इंग्रजी राजसत्तेच्या अधिपत्याखाली असतांना जम्मू काश्मीरचे तत्कालीन महाराजा रणबीरसिंग यांच्याकडे मुघलांच्या काळांत जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात आलेले राजौरी, पुंछ आणि श्रीनगर भागातले पंडित आले. त्यांनी महाराजा रणबीरसिंहांकडे दयायाचना केली कि आमच्या पूर्वजास आणि आम्हास जबरीने धरून पकडून मुस्लिम करण्यात आले आहे, आम्हास परत स्वधर्मात यावयाचे आहे, आम्हास आमच्या मूळ हिन्दु धर्मात परत घ्या. त्यावेळी महाराजा रणबिरसिहांनी तत्कालीन धर्मगुरू, पंडितांना बोलावून जबरीने मुस्लिम झालेल्या हिंदूंना मूळ धर्मात परत घेण्यासाठी धर्मात काही तरतूद आहे का? असे विचारले असता , अशी कुठलीही तरतूद अथवा विधी हिंदू धर्मात नसल्याचे त्यांनी सांगितले. राजा रणबीरसिंहसुद्धा धर्मगुरूंच्या निर्णयाविरुद्ध गेले नाहीत. त्या जबरीने धर्मांतरण करण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांना त्यांच्याच बंधूंच्या सल्ल्याने परत हिंदू करून घेतलं नाही त्याचंच फळ भारत देश आज गेली अनेक वर्षांपासून काश्मीर मुद्द्याच्या रूपाने भोगतो आहे. ज्यांनी त्या काश्मिरी पंडितांच धर्मांतरं होऊ शकत नाही असा निर्णय रनबिरसिहांना दिला होता त्यांचेच २ लाख वंशज आज दिल्ली आणि परिसरात निर्वासितांच जगणं जगत आहेत. कलम ३७० हटविल्यानंतर सुद्धा ते लोक परत जाण्यास तयार नाहीत.
१६ व्या शतकात अनेक जुन्या रूढी-परंपरांपैकी एक महत्त्वाची पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे सती जाणे. २३ जानेवारी १६६४ मध्ये छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राजमाता जिजाऊंनी त्या काळच्या रूढीनुसार सती जाण्याचा निर्णय घेतला. परंतु शिवाजी राजांनी त्यांच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला. या सर्व रूढी परंपरा फोकलट असून तुमच्या सती न जाण्याने काहीही विपरीत, अनिष्ट, अशुभ असं काही घडणार नाही, स्वराज्याला तुमची गरज असल्याचे शिवरायांनी मासाहेब जिजाऊंना पटवून दिले. आणि आपल्या विज्ञानवादी दृष्टिकोनातून धर्मातल्या आणखी एका गैरप्रथेला तिलांजली दिली. जिजाऊ सती गेल्या नाहीत त्यामुळेच त्या दुसरे छत्रपतीसुद्धा घडले ते म्हणजे छत्रपती शंभूराजे.        
स्वराज्यनिर्मिती करीत असतांना शिवरायांनी कधीच कोणताही जातीधर्म पाळला नाही. कोणताही देव धर्म टिकावा म्हणून ते कधीच कुणाशी झगडले नाहीत. एखाद्याने मंदिर तोडले, देवतांचा अपमान केला, मूर्ती फोडली, पूजा-हवनात विघ्न आणले, जुना चालीरीती- रूढी-परंपरा पाळल्या नाहीत म्हणून कधीही कुणाला साधी शिक्षा केल्याचीही इतिहासात नोंद नाही. परंतु स्त्रियांचा अपमान, बलात्कार केला म्हणून अनेकांना कठोर शिक्षा केल्याचे शिवचरित्रावरून आपल्या लक्षात येते. मग तो शिवरायांची शत्रू असलेल्या देसाईंनीचा विनयभंग करणारा सखूजी गायकवाड असो की गावातल्या मुलीवर बलात्कार करणारा रांझ्याचा पाटील असो. ज्याने गुन्हा केला तो आपला सरदार आहे, आपला मंत्री आहे म्हणून महाराजांनी कधीच त्याला पाठीशी घातला नाही. पण सध्या हाथरस बलात्कार प्रकरणात रात्री अडीच वाजता पीडितेच शवं जाळलं जात. कठूवा बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या समर्थनात भगवे आणि तिरंगे ध्वज घेऊन मोर्च्या निघतो. बलात्कारी राम रहीमला वर्षातून अनेकदा पॅरोल मिळतो. महिलांवर अत्याचाराचे गुन्हे असलेल्यांना मंत्रिपद मिळतात. कुलदिपसिंग सेंगर सारख्या बलात्कारी आमदाराला आणि साक्षी मलिक-विणेश फ़ोगाट या महिला पहेलवानांचे लैंगिक शोषण करणाऱ्या खासदार ब्रजभूषण सिंगला छातीठोक पाठिंबा देणारे हे देशातील हिंदुत्ववादी काय करत आहेत हे कुणापासून लपून राहिलेलं नाही. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये असे कडक आदेश देणारे शिवराय कुठे आणि शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारून टाकणारे, शेतकऱ्यांच्या रस्त्यात खिळे ठोकणारे तसेच ७०० शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा तोंडातून दिलीगिरीचा एक शब्दही न काढणारे हिंदुत्ववादी कुठे?
अफजलखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी त्याने अनेक मंदिरे तोडली, मुर्त्या फोडल्या परंतु आपण हिंदू आणि हा मुस्लिम अफजल हिंदूंची धर्मस्थळे तोडत आहे म्हणून शिवाजी महाराज लगेच बेभान होऊन अफजल खानावर चालून आले नाहीत. शिवाजी राजे धार्मिक असतीलही परंतु धर्मांध किंवा धर्मवेडे नव्हते. त्यांना माहिती होतं की आपण जिवंत राहू तर धर्म जिवंत राहील, देव जिवंत राहील. असा वास्तववादी विचार करणारे त्याकाळचे एकमेव राजे म्हणजे राजा शिवछत्रपती. अफजलखानाला मारला तो मुस्लिम होता किंवा त्याने मंदिरे तोडली म्हणून नाही तर तो स्वराज्याचा शत्रू होता म्हणून. जावळीचा चंद्रराव मोरे मराठा होता म्हणून नाही तर स्वराज्याचा शत्रू होता म्हणून मारला. ब्रम्हहत्येच पाप लागेल म्हणून कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा मुलाहिजा महाराजांनी केला नाही, त्यालाही मारला तो ब्राम्हण होता म्हणून नाही तर स्वराज्याचा शत्रू होता म्हणून. जो स्वराज्याचा शत्रू तोच आपला शत्रू मग तो कुठल्याही जातीधर्माच्या असो त्याला माफी नव्हती. शिवरायांच्या अंगरक्षकात आणि सैन्यात मुस्लिम होते. परंतु आज देशाचे हिंदुत्ववादी प्रधानमंत्री एका विशिष्ट धर्मियांना उद्देशून म्हणतात वो अपने कपडोसे पहचाने जा सकते है. ज्याला मंदिर हवं त्याला मंदिर आणि  आपल्या मुस्लिम मावळ्यांना गडांवर मस्जिद हवी असेल तर मस्जिद बांधून देणारा मोठ्या मनाचा सहिष्णू राजा माझा शिवछत्रपती. औरंगजेबाने शिवरायांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी जेव्हा मिर्झाराजे जयसिंगांवर सोपविली तेव्हा मिर्झाराजांनी शिवाजी राजांचा पराभव व्हावा म्हणून शास्त्रीपंडितांच्या सल्ल्यानुसार ३० सप्टेंबर १६६४ रोजी ४०० ब्राम्हण पंडितांद्वारे कोटीचंडी यज्ञ केला, बागलामुखी आणि कालरात्री देवींचे अनुष्ठान सुद्धा मांडले. शिवाजी राजे हरावेत आणि औरंगजेब जिंकावा म्हणून ४०० हिंदुत्ववादी ब्राम्हण दिवसरात्र पूजा, होम-हवन करत होते. 
शिवरायांची लढाई जर धर्माची असती तर शिवरायांच्या सैन्यात सिद्दी इब्राहिम, रुस्तमें जमाल सारखे मुस्लिम मुस्लिमांच्या विरोधात लढले नसते आणि औरंगजेबाकडून मिर्झा राजे जयसिंग, रामसिंग हे हिंदूंच्या विरुद्ध लढले नसते. ही लढाई राजकीय होती हे यावरून सिद्ध होते. शिवरायांच्या जीवनात पावलो-पावली अनेक संकटे आली. शहाजीराजांची आदिलशाहीत कैद, स्वराज्यावर चालून आलेला अफजलखान, पन्हाळगडाला सिद्दी जौहरचा वेढा , पुण्यात शाहिस्तेखानाचा धुमाकूळ, पुरंदरचा तह, आग्र्याची कैद असे एक ना अनेक जीवघेणे, सर्वस्व पणाला लावावे लागणारे महाभयंकर प्रसंग उद्भवले परंतु शिवरायांनी ही सर्व संकटे नशिबावर, दैवावर न सोडता स्वकर्तुत्वाने त्यातून यशस्वीपणे वाट काढली. वरील सर्व संकटे टाळण्यासाठी शिवराय कधीच होम-हवन, पूजा-अर्चा, देव-धर्म करीत बसले नाहीत किंवा काशीला जाऊन गंगा स्नान करून कॅमेर्‍याच्या साक्षीने पूजा अर्चा केली नाही  कारण त्यांनी जाणले होते जे करायचंय ते स्वतःलाच करावं लागेल. त्यांचा देवा-धर्मापेक्षा स्वकर्तृत्वावर अढळ असा विश्वास होता. त्यांनी हिंदुत्ववाद्यांप्रमाणे आपल्या शस्त्रांना कधीच लिंबू-मिरची बांधली नाही. शिवरायांनी आयुष्यात फक्त आपल्या रयतेसाठी कार्य केलं. हे काम करत असताना त्यांनी रयत हिंदू की मुस्लिम हे बघितलं नाही.  त्यांनी वोटबँक तयार केली नाही तर स्वराज्यासाठी जीव देणारी माणसे तयार केली. स्वराज्यात प्रत्येकासाठी सारखे नियम होते, कारण स्वराज्यात माणसाकडे माणूस म्हणून बघितले जाई, हिंदू-मुस्लिम-दलित-सवर्ण म्हणून नाही. परकीयांची चाकरी करणारी ही मिर्झा जयसिंगांची वारसदार हिंदुत्ववादी जमात कुठे? आणि स्वराज्यासाठी परकीयांशी प्रखर लढा देणारे शिवराय कुठे...?
शिवरायांचा हिंदू धर्म हा मानवतावादी होता. असे सर्वसामान्य रयतेची काळजी वाहणारे, जात-पात-धर्मभेद न पाळणारे समानतावादी, वास्तववादी विचार करणारे, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे शिवराय हे एकमेव राजे होते. अशा राजांचे अनुयायी म्हणवून घेण्यास आपण पात्र आहोत की नाही याचा विचार आज प्रत्येकाने करणे गरजेचे आहे कारण दुसर्‍या धर्माचा द्वेष  करणारी, जातीभेद-धर्मभेद पाळणारी, नशिबावर विश्वास ठेवणारी,  अंधश्रद्धा-कर्मकांड मानणारी, मुहूर्त शोधणारी, जनतेला खोटं बोलून फसविणारी, धर्माच्या आधाराने देशाला विभागणारी हिंदुत्ववादी जमात शिवरायांची अस्सल वारसदार कदापि असूच शकत नाही हे शिवरायांच्या नावाने वोट मागणार्‍यांनी कधीही विसरू नये. आज वारंवार शिवरायांच्या होणाऱ्या अपमानावर गप्प बसणारेच जर उद्या शिवरायांच्या नावाने मते मागायला आले तर त्यांना त्यांची खरी जागा दाखवणे हीच शिवरायांना खरी आदरांजली ठरेल.  

No comments:

Post a Comment

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...