"लक्षभोजनापासून किंबहुना त्या आधीपासून लग्न थाटामाटात ग्रँड व्हायला लागलीत. आहेर, देणंघेणं, मानपान तर दणक्यातच व्हावीत. खच्चून पुढारी लग्नात यावेत. जेवणावळी, गावजेवणं तर जंगी व्हावीत. धूमधडाक्यात वाजतगाजत वरात निघावी. टोलेजंग कार्यालय,भव्य आलिशान मांडव अन् सजावट, करोडोचा चुराडा, अन् संपत्तीचं ओंगळवाणे दर्शन होऊ लागलंय. पण अशा साऱ्या अपेक्षा या स्वतःच्या नव्हेतर मुलीच्या बापाच्या जीवावर! अशी नवी पिढी साकारतेय. त्यातूनच वैष्णवी हगवणे सारखी प्रकरणं, क्रूर निर्घृण ऑनर किलिंग्जच्या घटना घडताहेत. ही नीच मानसिकता आहे. याचा केवळ निषेध करून भागणार नाही तर पूर्वी जसं प्रबोधनकार ठाकरे हे बडेजाव मिरवणाऱ्या, हुंडा घेणाऱ्याच्या लग्नात गाढवं घेऊन जात आंदोलन करत. त्याच धर्तीवर आंदोलनं व्हायला हवीत...!"
---------------------------------------------
*पु*ण्यातल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण सध्या गाजतेय. त्यापाठोपाठ इतर प्रकरणं उघड होताहेत. महिलांच्या छळाच्या बातम्या प्रसारित होऊ लागल्यात. समाजाची मानसिकता निष्ठूर बनली की काय अशी शंका येतेय. समाजधुरिणांच्या समोर यक्ष प्रश्न उभा राहिलाय. हुंडाबळीच्या बातम्यांच्या तीव्रता कमी होईल तेव्हा पुन्हा पहिले पाढे पंचावन्न...! शहरातली आणि गावाबाहेरच्या मंगल कार्यालये पुन्हा गजबजतील. 'लग्नाच्या बाबतीत गाव, समाज, काय म्हणेल...?' या प्रश्नानं लोक इतके ग्रासलेले असतात की त्यांना इतर सर्व सामाजिक, आर्थिक प्रश्न त्यापुढं फालतू ठराव्यात. लग्न थाटामाटातच ग्रँड झालं पाहिजे. ही मानसिकता सध्या आकाराला आलीय. लग्नातला आहेर, देणंघेणं, मानपान तर अगदी दणक्यात, झगमगाटात झालं पाहिजे. पाच पंचवीस पुढारी लग्नात यायला हवेत. जेवणावळी, गावजेवणं तर खच्चून व्हावीत. वरात धूमधडाक्यात वाजतगाजत नेत्रदीपक निघाली पाहिजे. पैशाचा धूर निघावा अशाप्रकारची भारी भरकम रुखवत हवी. पंचक्रोशीत साऱ्या गावातून लग्नाची, त्याच्या भव्यतेची, झगमगाटाची हवा झाली पाहिजे. पण मुलाचं सासर कसंय, त्यांचे आचार, विचार काय आहेत, घरातली लोकं कशीत, याबाबत आताशी विचार करणं जणू बंदच झालंय. त्यापेक्षा आलेल्या स्थळाची आर्थिक सुबत्ता, जमिनजुमला, श्रीमंती किती आहे. याला अधिक भाळलं जातंय. मुलाचं शिक्षण किती झालंय, तो नोकरी कामधंदा काय करतोय. किती मिळवतोय, त्याची किती नि कसली शेती आहे, हे पाहिलं जात नाही. याला इथं प्राधान्यच नसतं. काहींचं स्वारस्य हे 'पैसेवाली पार्टी' शोधण्यात असतं. त्या स्थळासाठी मग ते काहीही करायला तयार होतात. वैष्णवी प्रकरणात हेच घडलंय. अजूनही बरेच नवश्रीमंत वृथा अस्मितेने, नको त्या कुळाभिमानाने ग्रासलेलेत. राज्यात केवळ वैष्णवीच नाही तर इतर अनेक ठिकाणी झालेल्या क्रूर निर्घृण ऑनर किलिंग्जच्या घटना घडल्या आहेत, ही या नीच मानसिकतेचीच लक्षणं आहेत. मुलीनं मर्जीविरोधात लग्न केलं की त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. ते कुठल्याही थराला जातात. इथं पालकांचा नाईलाज होतो. मुलीच्या हट्टापायी बापाला सारं काही सहन करावं लागतं. अवमान सहन करत, कर्ज काढून जमिनजुमला विकून जावयाची, सासरच्या लोकांची, मुलीची इच्छा पूर्ण करण्यात तो मश्गुल होतो. आजकाल लग्नं म्हणजे सध्या एकप्रकारचा लिलाव झालाय. मुलगा किती श्रीमंत, केवढा शिकलेला यावर त्याचा हुंडा ठरू लागलाय. मानपान आहेर ठरताहेत. लग्नासाठी टोलेजंग कार्यालय नाहीतर भव्य आलिशान मांडव अन् त्यासाठीची सजावट करायची गळ घातली जाते. त्यासाठी करोडोचा चुराडा करायला लावला जातो. यातून मोठेपणाची हाव अन् जोडीनं येणारं राजकीय अन् सामाजिक सेटींग, पैशाची मस्ती आणि मोठ्या वर्तुळात वावरत असल्याचा माज दाखवला जातो. हे केवळ लग्नातच नाही तर घरात कुणी मेलं तरी त्याचा दहावा एखाद्या लग्नसमारंभापेक्षा मोठा जंगी करण्यात लोक धन्यता मानू लागलेत. दहाव्याला माणसं किती आली, कोणाचं कीर्तन, प्रवचन होतं. किती लोक जेवले यावरून संबंधितांची पत ठरू लागलीय. भरीस भर म्हणून दहाव्याला ज्ञान देणाऱ्या बाबा, बुवा, बाया प्रवचनकारांची एक भली मोठी पलटणच उभी राहिलीय. त्यांचा उपदेश समाज सुधारणा, प्रबोधनाऐवजी लक्ष त्यांना मिळणाऱ्या बिदागीवर असतं. या साऱ्या कुप्रथांवर खरंतर त्यांनी प्रहार करून थांबवलं पाहिजे पण तसं होत नाही. किती ही समाजाची अवनती अन् किती अवमूल्यन!
लग्न हा एक असा सामाजिक, धार्मिक, आणि सांस्कृतिक विधी आहे ज्यामुळे दोन व्यक्तींचा एकमेकांशी, त्यांच्या कुटुंबांशी संबंध प्रस्थापित होतो. लग्न ही संकल्पना भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते आणि तिच्या विविधतेमध्ये सुंदरता आहे. प्रत्येक समाजात लग्नाचे विविध रीतिरिवाज, परंपरा, आणि विधी असतात, ज्यामुळे प्रत्येक विवाह उत्सव एकमेव आणि खास बनतो. लग्न, विवाह हा दोन जीवांचा, दोन कुटुंबांचा आनंद सोहळा पण त्यातूनही विघ्न उभी राहताहेत. समाजात भूमिहीन, अल्पभूधारक शेतकरी आणि मातब्बर श्रीमंत यांच्यात जशी तफावत दिसून येतेय तशीच सामाजिक बंधनं तोडलेल्या, रूढीचुस्त अन् परंपरांना चिकटून बसलेल्यांत आहे. ही दरी, हा विरोधाभास कोण अन् कसा भरून काढणार? मतांवर डोळा असणाऱ्या राजकीय पक्षांकडून तशी फारशी अपेक्षा नाही. समाजधुरिणांनी यावर काही कणखर भूमिका घेतली तर काही लोक दुखावणार हे ठरलेलं असल्यानं त्यांनीही कदाचित टाळलं असावं. पुण्यात शहरातल्या राजकीय समाज नेत्यांनी नुकतंच एक बैठक घेतली अन् त्यात समाजानं यापुढच्या काळात कशाप्रकारे या समस्येला तोंड द्यायचं यावर विचारमंथन केलं. पण ही वांझोटी चर्चा ठरेल, कारण शाब्दिक निषेधापलीकडे काही सक्रिय आंदोलनाची पावलं उचलायला हवी होती. अशा लग्नाला आम्ही जाणार नाही अशी भूमिका घ्याला हवी होती. मात्र त्यांचे ते प्रयत्न कमी पडताना दिसतात. गावोगावच्या नवविचारी नि विवेकी मंडळींनी यासाठी सातत्याने कृतिशील भूमिका घेतली पाहिजे. प्रयत्न करायला हवेत. प्रबोधनकार ठाकरे यांनी असे प्रयत्न केले होते त्यांनी हुंडा घेणाऱ्या, थाटमाट करणाऱ्या लग्नामध्ये गाढवं घुसवून धमाल उडवून दिली होती. 'मी हुंडा घेतला आहे...!' असं त्या गाढवावर लिहिलेलं असायचं, त्यामुळं हुंडा घेणाऱ्याचे धाबे दणाणले जायचे. हा उपाय त्याकाळी परिणामकारक ठरला होता. अगदी तसंच काही नाही पण तशी आंदोलन करण्याची, अशा लग्नावर बहिष्कार घालण्याची तयारी समाजधुरिणांनी दाखवायला हवी. वाईटपणा कुणालाच नको असतो त्यामुळं अशा वेळी मौन राहिलं की दोन्ही डगरीवर हात ठेवण्याचं हुकुमी कसब काहींच्या अंगी असतं जे पुढे जाऊन समाजासाठी विखारी शाबित होतं. याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण समाजच अशा बुरसटलेल्या विचारांनी त्रस्त आहे. सुधारक, आधुनिक, खुल्या विचारांचे अनेकजण सर्वत्र आहेत. ज्या समाजाने अखंडित गौरवशाली अशी ओजस्वी माणसं दिली त्या समाजात अविवेकी, कालबाह्य, बुरसटलेल्या विचारांना थारा मिळतोय याची सल प्रत्येकाला जाणवली तर याचं उत्तर मिळेल.
पुण्यातल्या मुळशी तालुक्यातलं भूकुम गावातल्या वैष्णवी हगवणे हिचं मृत्यूप्रकरण चर्चेत आहे. तिनं आत्महत्या केल्याचं सुरुवातीला समोर आलं. पण शवविच्छेदनात मारहाणीच्या खुणा सापडल्यात. तिच्या आई-वडिलांनी वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ होत असून तिची सासरच्या लोकांनी हत्या केल्याचा आरोप केला. त्यातून पुन्हा हुंडाबळी हा विषय चर्चेत आलाय. १९६१ मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा झाला. या कायद्यानुसार थेट किंवा अप्रत्यक्ष स्वरुपातलं देवाण घेवाण हा गुन्हा ठरवलाय. पण, अजूनही हुंडा घेणं, त्यासाठी छळ, प्रसंगी महिलांचे बळी यागोष्टी थांबलेल्या नाहीत. वैष्णवी ही राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष पैलवान राजेंद्र हगवणे यांच्या सून होती. वैष्णवीची ही आत्महत्या की हुंडाबळी असा प्रश्न उपस्थित झाला. वैष्णवी आणि शशांक हगवणे यांचं २८ एप्रिल २०२३ ला लग्न झालं. त्यानंतर सासरच्या लोकांकडून तिला वारंवार त्रास दिला जात होता. वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटे यांनी लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि सूचवलेल्या कार्यालयात लग्न लावून दिलं. मात्र, तिचे सासू, सासरे आणि नवरा यांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच तिच्याशी भांडणं करायला सुरुवात केली. लग्नाच्या चार ते पाच महिन्यानंतर वैष्णवीच्या सासू लतानं चांदीच्या भांड्यांची मागणी केली. ती दिली नाहीत म्हणून तिला त्रास देणं सुरू केलं. वैष्णवी गरोदर असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केली असे आरोप तिच्या वडिलांनी केलेत. यानंतर २७ नोव्हेंबर २०२३ मध्ये वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारानंतर ती सासरी गेली. मात्र, त्यानंतर १५ दिवसांनी वैष्णवीचे पती शशांकनं जमीन खरेदीसाठी २ कोटी रुपयांची मागणी केली. ही रक्कम देऊ न शकल्यानं पुन्हा वैष्णवीला त्रास देत 'आम्ही तुला फुकट पोसणार का? तुझ्या खानदानाचा काटाच काढतो...!' अशी धमकी दिल्याचा आरोप कस्पटेनी केला. यानंतर तिला मारहाण करून माहेरी सोडलं. मार्च २०२५ मध्ये वैष्णवीची नणंद करिश्मा आणि सासू लता यांनी तिला मारहाण करून तिच्या अंगावर थुंकून तिला पुन्हा माहेरी पाठवल्याचाही आरोप वैष्णवीच्या पालकांनी केलाय.
५ मे २०२५ ला वैष्णवी तिच्या चुलत भावाच्या लग्नासाठी माहेरी आली तेव्हा जावयाला पोशाख आणि अर्धा तोळ्याची अंगठी दिली. यातला पोशाख फेकून तो निघून गेला. वैष्णवीला माहेरी थांबू दिलं नाही. १६ मे रोजी वैष्णवीच्या माहेरी फोन करून तिला न्यायला शशांकनं सांगितलं. संध्याकाळी नातलगांनी वैष्णवीनं आत्महत्या केल्याचं सांगत रुग्णालयात येण्यासाठी कळवलं अशी माहिती कस्पटे कुटुंबानं दिली. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मात्र धक्कादायक बाबी समोर आल्या. यात तिच्या शरीरावर धारदार वस्तूनं वार केल्याच्या खुणा, जखमा आढळून आल्या. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी मुळशी मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविली होती. या घटनेनंतर राजेंद्र आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील, वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक केलीय. शशांकला दिलेली फॉर्च्युनर कार जप्त केली, शिवाय सोन्याच्या दागिन्यांसंदर्भात कोणतेही व्यवहार करू नयेत, असं पत्र पोलिसांनी बँकेला दिलं.
हुंडा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कुठल्याही अशा वस्तूंची देवाण-घेवाण करणं हा गुन्हा आहे. हुंडाबंदी कायदा येण्याआधी लोक प्रत्यक्ष हुंड्याची मागणी करत. पण, काळानुसार हुंड्याचं स्वरुप बदलत गेलं. वेगवेगळ्या पद्धतीनं हुंडा मागितला जातो, काहीजण छुप्या पद्धतीनं हुंडा मागतात. लग्नानंतर हुंड्यासाठी छळ होत असल्याचे प्रकारही समोर येतात. कायदा अस्तित्वात येऊन हुंडाबळी थांबत नाहीत. यामागचं पहिलं कारण, महिलेला समाजातला दुय्यम दर्जा. तो जोपर्यंत बदलत नाही तोवर हे घडतच राहणार. मुलगी अजून आई-वडिलांच्या पश्चात त्यांच्या मालमत्तेत हक्क मागत नाही. पण स्त्रीनं वारसाहक्क मिळवायला पाहिजे, मग या घटना कमी होतील. दुसरं, आपल्या जातीत, गावाजवळ लग्नासाठी मुलगा मिळावा अशा अपेक्षा असतात. मग तो मुलगा त्याची किंमत मागतो आणि मुलीचे आई-वडील ती द्यायला तयारही होतात. पण, त्याऐवजी मुलीला तिचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं, तर अशा घटना कमी होतील. दुर्दैवानं मुलीला तिचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य नाही. वैष्णवीच्या प्रकरणात मात्र तिनेच नवरा निवडला होता. कुटुंबीयांचा त्याला विरोध होता, पण मुलीच्या इच्छेविरोधात त्यांचं काहीच चाललं नाही. पैशांची हाव आणि झटपट मिळणारा पैसा हे याला कारणीभूत आहे. बायकोच्या माहेरहून मागितला की झटपट पैसा मिळतो आणि तो नाही मिळाला की अशा घटना घडतात. तिसरं, 'चांगला' मुलगा हातातून जाईल अशी भीती पालकांना असते. कोणी हुंडा घेत असेल तर सर्वात आधी मुलींनी विरोध करायला हवा. 'चांगला' मुलगा गेला, तर गेला. हुंडा दिला तर मी लग्नच करणार नाही अशी भूमिका मुलींनी घ्यायला हवी. अजूनही समाजात तिच्या वैवाहिक दर्जावरूनच मान-सन्मान दिला जातो. त्यामुळं मुली आत्महत्या स्विकारतात पण, एकटं जगायला तयार होत नाहीत. ऑनर किलींग, हुंडाबळी यासारख्या घटना घडतात. नात्यात आता समझोता शक्य नाही हे समजल्यावर मुलींनी एकटं राहण्याचं पाऊल उचलायला हवं. यासाठी मुलांनीही बायकोला घरगडी म्हणून न पाहता साऱ्या जबाबदाऱ्या या दोघांच्या आहेत असं समजून वागलं पाहिजे. तसंच सासू-सासऱ्यांनी सुद्धा सूनेला पैशांची मशिन समजू नये. मुलीच्या मागं भक्कमपणे उभे राहणारे आई, वडील, भाऊ समाजात तयार व्हायला हवेत. समाज आज आणखी मागे जातोय.
लग्नात दोन पक्षांत होणारी देवाण-घेवाण ती पैशांच्या स्वरुपात असो की वस्तूंच्या, तो हुंडा असतो. पण, या हुंड्याचं स्वरुप काळानुसार बदलत चाललंय. हल्ली तुम्ही तुमच्या मुलींचा खर्च बघा, तुमच्या मुलीला सजवा...! असं बोलून हुंडा मागितला जातो. तर काही ठिकाणी आम्हाला काहीच नको, मुलीला स्वखुशीनं जे द्यायचं ते द्या...! अशा छुप्या पद्धतीनं हुंडा घेतला जातो. सध्या ग्रँड लग्न करून मुलीच्या सासरच्यांना महागड्या भेटवस्तू देण्याची पद्धत सुरू झालीय. दोन्ही पक्षांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला की, तो यात खर्च करतात. मेहंदी, हळदी, संगीत असले भव्य कार्यक्रम करून लग्न ५- ५ दिवसांचं होतं. ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक गाजावाजा करत लग्न करतात, याच श्रीमंत लोकांचं अनुकरण मग इतर करतात. लग्नासाठीची प्रत्येक पूर्वअट ही हुंडा असते हे मुलींना, तिच्या घरच्यांना समजायला हवं. मुलांनी सुद्धा हुंडा घेणार नाही असं सांगायला हवं. निम्म्या निम्या खर्चानं लग्न करण्याची पद्धतच योग्य आहे. मुलीचं लग्न असलं की तिला काय गिफ्ट द्यायचंय ते कुटुंबातला एक एक जण वाटून घेतो. एकजण म्हणतो फ्रीज देतो, दुसरा स्कूटर देतो. पण, या सगळ्यांमध्ये दोष मुलीवाल्यांचा आहे. त्यांनी या सवयी बिघडवल्यात. त्यांनी वस्तू स्वरुपात मुलीच्या सासऱ्यांना गिफ्ट देऊन या परंपरा निर्माण केल्यात. थाटामाटात लग्न करण्याचा समाजाचा दबाव जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत असल्या गोष्टी होतील. कायद्याची पायमल्ली करणं, लग्नात एका पक्षानं दुसऱ्या पक्षाकडून पैसे, भेटवस्तू घेणं आणि संपत्तीचं प्रदर्शन करणं यात लोकांना मोठेपणा वाटतो. मुलींच्या मनातही प्रचंड उद्दातीकरण झालेलंय की, आपलं लग्न थाटामाटात व्हावं. पण, प्रत्येक मुलगी अशी नसते. आई-वडिलांचा विचार करणाऱ्याही काही असतात. लग्न साध्या पद्धतीनं झालं, तर आई-वडिलांच्या निम्म्या समस्या सहज सुटतील.
हरीश केंची
९४२२३१०६०९
No comments:
Post a Comment