Tuesday, 17 June 2025

केशवा....! असा कसा गेलास रे...!!


पुण्याच्या पूर्व भागातलं बोलतं चालतं वर्तमानपत्र म्हणजे केशव वाडेकर....! आज त्याच्या निधनाला चार वर्षे उलटलीत. त्यानं वयानं सत्तरी पार केली होती तरी, त्याला सारे केशव या एकेरी नावानंच साद घालायचे एवढा जिव्हाळा त्याच्याबद्धल सर्वांना होता. अत्यंत गरीबीत असतानाही त्यानं चेहऱ्यावर कधी ते जाणवू दिलं नाही. निर्गर्वी, सदा हसमुख, दुसऱ्याच्या सुखदुःखात मिसळणारा, चालण्यात, वागण्यात, बोलण्यात गडगडाट असणारा केशव नाही ही कल्पनाच सहन होत नाही. कुठूनतरी आवाज येईल...मोठ्यांदी हाक मारेल असंच वाटतंय....!

त्याची माझी मैत्री जवळपास ४५-५० वर्षाची होती. आलंग आळीत गेलो की, समोरच त्याचं छोटंसं टुमदार घर. वडील छोट्याश्या यंत्रानं वारकऱ्यांसाठी तुळशीच्या माळा तयार करायचे. त्याची सालस बायको त्याची सतत काळजी करायची. संध्याकाळी तो परतेपर्यंत जेवायची नाही. त्यालाही तिचं कौतुक होतं. मुलगा माझा 'डीजे' आहे हे तो अभिमानानं सांगायचा. लहानपणापासून पडेल ते काम करणाऱ्या केशवची भेट झाली ती शिवाजी रस्त्यावर! आताच्या श्रीनाथ थिएटरसमोरची दुकानं बंद झाली की, रात्रीच्यावेळी रद्दीतून निवडून आणलेली मासिकं, सिनेसाप्ताहिकं, प्रकाशकाकडं पडून राहिलेली पुस्तकं तिथं तो विकायचा आणि दिवसा घरासमोरच्या वाहत्या रस्त्यावर एका रिकाम्या भिंतीवर हीच मासिकं, पुस्तकं विकत असायचा. तिथंच त्यानं त्या मासिकं-पुस्तकांची लायब्ररी सुरू केली. पण ती भिंत ज्या घराची होती त्याच्या मालकानं ते घर पाडलं, नवं बांधण्यासाठी त्यामुळं ते सारं बंद पडलं. दिवसा रिकामं राहणं त्याला आवडलं नाही, त्याला मग काही मित्रांच्या सोबतीनं फोटोग्राफीचा छंद लागला. पण त्याकाळी ते खर्चिक होतं. फिल्म, निगेटिव्ह, प्रिंट कॉपी याचा खर्च असायचा. त्यानं त्यावर उपाय शोधला. त्याचा एक मित्र लक्ष्मण कोळा हा व्यावसायिक फोटोग्राफर होता. त्यानं त्याला मग डेव्हलपिंग, प्रिंटिंग शिकवलं आणि मदत केली. मग केशव निगेटिव्ह पाहूनच प्रिंट करायचा आणि जे चांगले एक्स्पोज झालेत त्याचेच प्रिंट मारून संबंधितांना द्यायचा. हळूहळू त्यात तो तरबेज झाला. त्याच्या तोंडाची टकळी सारखी सुरूच असे त्यामुळं त्यानं अनेक मित्र जोडले होते. तेव्हापासून त्याचा चालता फिरता स्टुडिओ सुरू झाला होता. तो कित्येकवर्षं पायीच फिरायचा त्यात त्याला आनंद वाटायचा. अखेरच्या काळात त्यानं एक जुनी ल्युना घेतली होती. आणि आपल्याच स्टाईलमध्ये 'चल मेरी धन्नो..!' म्हणत निघायचा.
गणेशोत्सव आणि निवडणुका ही त्याची पर्वणी असे. गणेशोत्सवाच्या आधीपासूनच त्याचे फोटो वृत्तपत्रांच्या कार्यालयात येऊन धडकत असत. त्यानं पैशाची अपेक्षा वृत्तपत्रांकडून कधी केली नाही पण फोटोला 'छाया : केशव वाडेकर' अशी क्रेडिट लाईन द्या असा आग्रह असायचा. कारण त्यामुळं त्याच्या कामाची प्रसिद्धी होई आणि त्यातून कामं मिळत आणि अर्थार्जनही! 
पुण्यातील गणेशोत्सव मंडळे, विशेषतः शहराच्या वस्तीतील मंडळे, राजकीय नेते, पुढारी, भावी-माजी नगरसेवक, या सर्वांशी परिचित असा तो मान्यवर चेहरा होता. अतिशय उत्कृष्ट आणि अचूक फोटो काढणारा कसबी कलाकार होता. गणेशोत्सवात कार्यकर्त्यांची धडपड; मंडपातली आरास; देखावे उभे करायच्या काळातील हालचाली सुरू असताना तो अचानक यायचा आणि देखाव्याचा फोटो काढायचा; दुसरे दिवशी वर्तमानपत्रात मंडळाच्या नावासह देखाव्याची माहिती आली की, त्याचं दुकान सुरू झालंच म्हणून समजा. पाच-दहा फोटो कार्यकत्यांना विकलं नाही असं कधी झालंच नाही. कार्यकर्त्यांना त्याचं कौतुक वाटायचं, तो एक वेगळाच आनंद होता. 
तो दररोज कार्यालयात यायचा. तेव्हा शनिपाराजवळच माझं सामनाचं कार्यालय होतं. ते जणू त्याचं संपर्क कार्यालय होतं. अनेकांना भेटायला तो तिथं बोलवायचा. असंख्य कार्यकर्त्यांशी त्याचा संपर्क होता. त्याकाळी पूर्वभागातल्या बातम्या वृत्तपत्रात कमीच असायच्या. ते त्याला खटकायचं. त्यानंच मग बातम्या आणायला सुरुवात केली. त्याला तसं लिहिता येत नव्हतं, पण असं काही वर्णन करायचा की, बस्स, त्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलंच म्हणून समजा! गणेशोत्सवापूर्वी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बदल होत. त्यांच्या फोटोसह छोटीशी चार ओळीची बातमीचं सदर त्याच्यामुळं सुरू झालं. सकाळ झाली की, फोटो आणि माहितीचा ढीग तो आणून टाकायचा. त्याच्यामुळं अनेक मंडळ आणि लोक सामनाशी जोडले गेले. त्याचा माझ्यावर विशेष लोभ होता. तो मला धाकटा भाऊ समजायचा. कौटुंबिक कार्यक्रमात मला बोलवायचा. पुण्यातलं मुलाचं लग्न असो नाहीतर सोलापुरातलं मुलीचं लग्न असो, त्याचं आग्रहाचं निमंत्रण असायचं. त्यानं माझे अनेक फोटो काढले आहेत. ते प्रत्येक फोटो पाहताना त्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय कार्यालयातल्या सर्वांसाठी दिवाळीचा घरी केलेला फराळ नको नको म्हणत असताना तो घेऊन यायचा. मनसोक्त खायला घालायचा. आता दिवाळीत त्याची आठवण मलाच काय कार्यालयातल्या सर्वांना आल्याशिवाय राहणार नाही.
त्याला राजकारणाची आवड असली तरी आपण त्यात पडावं असं त्याला कधी वाटलं नाही. पण एकदा तो यात पडला. त्याला स्थानिक कारण होतं, तो जिथं राहायचा तिथल्या एका दिग्गजाचा त्याला त्रास होता. तो दिग्गज महापालिकेच्या निवडणुकीत उभा राहिला. केवळ त्याला विरोध करायचा म्हणून तो निवडणुकीला उभा राहिला. 'पाटी' हे त्याचं चिन्ह होतं. या निवडणुकीत त्याच्यावर हल्लाही झाला होता. हा कटू अनुभव त्याच्या गाठी होता. त्यानं पुन्हा कधी असं धाडस केलं नाही. विशेष म्हणजे त्याच्या प्रचारासाठी गो. रा. खैरनार यांनी सभा घेतली होती.
निवडणुकीचा मौसमही असाच असायचा. त्याच्यासाठी ती पर्वणी असायची. त्यावेळी वृत्तपत्रांचं आजच्याप्रमाणे कमर्शिलायझेशन झालेलं नव्हतं. तो काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता होता. गांधी घराण्यापासून गाडगीळ-ढेरे घराण्यापर्यंतच्या नेत्यांवर त्याचा विशेष लोभ होता. त्यांच्यासाठी तो प्रसंगी विनामोबदला काम करीत असे. तो फ्रीलान्स फोटोग्राफर होता. पण साप्ताहिक चित्रलेखासाठी तो मनापासून काम करायचा. राज्यातल्या वेगवेगळ्या जातींची ओळख देणारं सदर जवळपास तीनेक वर्ष सुरू होतं. त्याची छायाचित्रे हे एक मोठं दिव्य होतं, पण त्याचा लोकसंग्रह एवढा प्रचंड होता की, त्या जातीच्या व्यवसायाची नेमकी ओळख स्पष्ट करणारा फोटो तो द्यायचा. बेलबाग चौकाजवळ असलेली ऐतिहासिक कोतवाल चावडी जेव्हा पाडली गेली त्याचं चित्रण त्यानं रात्रभर जागून केलं होतं आणि त्या स्मृती जपून ठेवल्या होत्या. पुण्यात राजीव गांधींच्या सभेचा फोटो असाच फक्त त्याच्या एकट्याकडंच होता. शरद पवार यांचं पुणेरी पगडी घालून गडगडाटी हास्य असलेला फोटो हा एकमेकद्वितीय असा फोटो.... एक ना दोन असे अनेक किस्से केशवचे आहेत. केवळ राजकारणीच नाही तर बातमीदारांमध्येही तो लोकप्रिय होता. राजकारण्यांचे, पत्रकारांचे अनेक कट्टे त्याकाळी होते, तिथं त्याचा मुक्त संचार असे. गप्पांच्या कट्ट्यावर तो अक्षरशः फुलुन जायचा. शहरभर फिरून आणलेल्या बातम्या आणि त्यावरचे किस्से यानं कट्ट्यावरच वातावरण हलकं फुलकं व्हायचं, दिवसभराचा ताण जायचं आणि मैत्रीचं नातं घट्ट व्हायचं. पाच फूट उंचीचा शिडशिडीत बांध्याचा, बोलघेवडा, रस्त्यावरून जाताना त्याला अनेकजण भेटत. जर एखाद्यानं बघितलं नाहीतर मोठ्यानं हाका मारीत त्याच्याकडं जायचा. वेळ असला की गप्पाचा ओघ सुरू असायचा. वेळ नसेल तर केवळ हात दाखवून सटकायचा. त्याच्या मनांत कधी कुणाबद्धल राग, द्वेष नसायचा. भगवान नारदाप्रमाणे सर्वत्र संचारी केशव लॉकडाऊनमुळं जखडून गेला होता. तेच त्याचं दुखणं ठरलं आणि तो त्या नारदाकडं निघून गेला. चुटपुट लावून...! त्याच्या स्मृतीला विनम्र अभिवादन...!
हरीश केंची

No comments:

Post a Comment

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...