Saturday, 28 June 2025

'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ'...!

"मुंबई अन् महाराष्ट्रातला 'ठाकरे ब्रँड' संपविण्याचा ईर्षेनं, जिद्दीनं भाजप, शिंदेसेना पेटलेत. त्यांच्यामागे दिल्लीतली महाशक्ती उभी आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र झाल्यानंतर त्यासाठी चळवळ उभारणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र समितीचं अस्तित्व तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसनं संपवलं. लढाऊ मराठी माणूस पुन्हा नागवला. पण बाळासाहेब ठाकरे उभे ठाकले. आधी साप्ताहिक मार्मिक आणि नंतर शिवसेना स्थापन झाली. अस्वस्थ मराठी माणूस त्यांच्यामागे उभा राहिला. त्यामुळं मराठी माणूस टिकला. मुंबईची सत्ता हाती राखली. आज मात्र त्या शिवसेनेची शकलं दिल्लीश्वरांनी केली. आता ठाकरे अन् त्यांच्यामागचा मराठी माणूस हुसकावून लावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झालाय. साठ वर्षापूर्वीची मराठी माणूस, महाराष्ट्र यांची तेव्हाची स्थिती, शिवसेनेची निर्मितीची कारणं अन्  ठाकरेंनी केलेली त्यासाठीची घोषणा 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ' याचा घेतलेला धांडोळा...!"
--------------------------------------------
*नु*कताच साजरा झालेला शिवसेनेचा ५९ वा स्थापना दिन, राज्यातल्या रखडलेल्या महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं शिवसेना, मराठी माणूस, त्याची मुंबईवरची मजबूत पकड, त्यासाठी उभा ठाकलेला 'ठाकरे ब्रँड', सोन्याचं अंडं देणाऱ्या मुंबईवर कब्जा मिळविण्याचा भाजपचा, दिल्लीश्वर महाशक्तीचा हरेक प्रयत्न, त्याविरोधात ठाकरे बंधू एकत्र येण्याची होत असलेली चर्चा, मराठीवर कुरघोडी करण्यासाठी पहिलीपासून हिंदी लादण्याचा होत असलेला प्रयत्न, त्याविरोधात व्यक्त होणारा सार्वत्रिक संताप, महाराष्ट्र, मराठीभाषा, शिवसेनाच नाहीतर एकूणच विरोधीपक्ष संपविण्याचा होत असलेला प्रयत्न यासारख्या घटनांनी गेले काही दिवस राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. त्यानिमित्तानं शिवसेनेच्या निर्मितीचीही चर्चा होतेय. ह्या चर्चेचा अधिकाधिक भर तत्कालीन परिस्थिती बरोबरच बाळासाहेबांच्या 'खास ठाकरी' शैलीतल्या वक्तृत्वावर आणि शिवसैनिकांच्या राडा संस्कृतीवर होतेय. खरंतर शिवसेनाच्या निर्मितीसाठी आणि संघटना बांधण्यासाठी विचारांचीही भक्कम मांडणी त्यावेळी झालेली होती. १३ ऑगस्ट १९६० रोजी 'मार्मिक' व्यंगचित्र साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला; आणि 'मार्मिक'च्या माध्यमातून 'मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी झगडणाऱ्या' शिवसेनेची१९ जून १९६६ रोजी स्थापना झाली. 'मार्मिक' अन् 'शिवसेना' ही दोन्ही नावं 'प्रबोधन'कार केशव सीताराम ठाकरे यांनी ठेवली. नावांसारखीच ती पुढे गाजत राहिली. तथापि, प्रबोधनकारांनी केवळ 'नाव' ठेवण्यापुरतंच काम केलं नव्हतं, तर त्याची वैचारिक जडणघडण केली होती. शिवसेनाची स्थापना प्रबोधनकार आणि बाळासाहेब यांच्या दादरच्या 'टू रूम किचन'च्या घरात झाली. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत, ३० ऑक्टोबर १९६६ च्या संध्याकाळी दोन लाखांच्या लोकगर्दीत मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवसेनेचा ऐतिहासिक 'पहिला दसरा मेळावा' झाला. यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी 'मार्मिक' मधली व्यंगचित्र, लेख-अग्रलेखांतून शिवसेना निर्मितीची भूमिका मांडली होती. तशीच मुंबई, ठाण्यासह इतरत्रही बाळासाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सभा, भाषणं, दौरे करून शिवसेनेची आवश्यकता किती आणि कशी आहे याचं महत्व महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवली होती. 
ह्याच काळात प्रबोधनकार ठाकरेंनी 'मार्मिक'च्या अंकात मराठी माणसांवर कसा अन्याय अत्याचार होतोय हे सांगणारे सलग १२ लेख लिहिले होते. यावेळी प्रबोधनकारांनी वयाची ऐंशी ओलांडली होती. तरीही त्यांच्या प्रत्येक शब्दांनी विशेषकरून त्यावेळच्या तरुणांच्या बुद्धीचा ठाव घेतला आणि कृतिशील विचाराचा, अन्यायाला भिडणारा अंगार  त्यांनी फुलवला. या बारा लेखांची शीर्षकंच पाहा... 'स्वाभिमानी लागवड', 'नंगेसे खुदाभी डरता है', 'गोळीला जनता पोळीला पुढारी', 'आम्हीच आमचे मित्र आणि शत्रू', 'महाराष्ट्र राज्याचे पाणी जोखले', 'मऱ्हाठों शैतान की औलाद है', 'महाराष्ट्राचा वाली कुणी नाही', 'मराठा तितुका मेळवावा', 'गलबला बुद्धी नासवतो', 'प्रतापे सांडली सीमा', 'झुणका भाकरीच्या आड येऊ नका' आणि 'मारिता मारिता मरावे!' ही त्यापैकी काही मथळे. 'स्वाभिमानाची लागवड' या पहिल्या लेखात प्रबोधनकारांनी कट्टर धर्म, जातीवादाची कठोर शब्दांत चिरफाड केलीय. हिंदू-मुस्लिमातल्या दंग्यांना 'जातीय दंगे' म्हणण्याची फॅशन कशी पडलीय, ते सांगताना प्रबोधनकार लिहितात, 'जातीय शब्दाचा इंग्रजी प्रतिशब्द म्हणजे कम्युनल; आणि जमात या शब्दालाही तोच प्रतिशब्द. इथं कास्ट अन्  कम्युनिटी या दोन शब्दांचा अकरमाश्या संबंध जोडून, वरचेवर लोकांच्या मनात गोंधळ उडवण्याचा खटाटोप नेहमी चालू असतो. हिंदू-मुसलमान दंग्याच्या बातम्या देताना, अमुकतमुक ठिकाणी दोन जमातीत दंगा झाला, असा मोघम उल्लेख करण्यात येत असतो. मुसलमानाचं नाव घ्यायला सरकार, त्यांच्या वृत्तसंस्था का बिचकतात आणि घाबरतात, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे...!' आजही ह्यात फरक झालेला नाही. त्याची वहिवाट ब्रिटिश सरकार काळापासून कशी अन् का चालू आहे, ह्याची माहिती प्रबोधनकार देतात. अशाचप्रकारे 'आम्ही जातपात, धर्म मानत नाही,' असं म्हणणाऱ्यांची 'शिखण्डी'त गणना करून प्रबोधनकार लिहितात, 'असे शिखण्डी हिंदुंतच फार सापडतात. आई, बाप, बायको मेल्यावर, हे पांढरी कॉलरवाले पांढरपेशे दाढीमिशा डोके भादरून, नासिकच्या रामकुंडावर मयताची राख-हाडे मोक्षाला पोचविण्यासाठी मुकाटतोंडी जाताना कुणी पाहिलेच नाहीत? वाणी-करणीचा व्यभिचार करणाऱ्या या करंट्यांना इतर जबरदस्तांची पायताणे चाटूनच जगण्याचा बांका वखत आला, तर त्यांची काय म्हणून कोणी कीव करावी? मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, बोहरी इत्यादी हिंदूंतेर जातीत असला कोडगेपणा तुम्हाला आढळणार नाही. स्वाभिमानशून्यांनाच आपली जात आणि धर्म ठणकावून सांगण्याची हिंमत होत नाही....!' 
हे प्रबोधनकारांनी धर्म आणि जातीवादाचं समर्थन करण्यासाठी लिहिलेलं नाही. तर सेक्युलॅरिझम हे कसं ढोंग आहे आणि 'सर्व भारतीय एक' हे कसं थोतांड आहे, ते प्रबोधनकारांनी कठोर शब्दांत दाखवून दिलंय. अशाचप्रकारे त्यांनी कम्युनिस्ट आणि सोशॅलिस्ट विचारांचा आणि काँग्रेसच्या सत्ताकेंद्री विचारांचा इतर लेखांतून समाचार घेतला आहे. अशा पक्ष-विचारांच्या दावणीला बांधलेल्या कार्यकर्त्यांच्या अतिरेकी निष्ठेबद्दल प्रबोधनकार लिहितात, 'गोळी-लाठीला जनता, आणि पोळीला नि हारतुऱ्याला पुढारी महाशय असले देखावे अनेक आंदोलनांत लोकांनी पाहिले आहेत. तरीही त्यांच्या भजनी लागलेल्या लोकांना हे संत-महंत कसल्या मसाल्याच्या मनोवृत्तीचे आहेत, याचा शोध आणि बोध घेण्याइतका विचाराचा मगदुरही उरलेला नाही. स्वाभिमानाला मुकलेल्यांची मने अशीच गुलाम नि परस्वाधीन बनतात....!' अशी इष्ट-निष्ठ कार्यकर्त्यांची दुर्दशा आजही केवळ सर्व पक्ष-संघटनांतच नाही; तर सद्‌गुरू-बुवा-महाराजांच्या दरबारींमध्येही दिसते. प्रबोधनकारांनी मुंबईतल्या परप्रांतीयांची घुसखोरी, त्यांची शिरजोरी, पूर्वी काँग्रेसी आणि आता भाजपेयी राज्यकर्त्यांची दिल्लीपुढची शिरजोरी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय इतिहास, समाजकारण आणि राजकारणातले बारकावे त्यांनी नेमक्या शब्दांत सांगितलेत. महाराष्ट्राच्या, देशाच्या पुनरुत्थात पुण्याला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यनिर्मितीच्या कार्यापासून विशेष असं स्थान होतं. त्यात बदल कसा अन् कशामुळे घडून आला, ते प्रबोधनकार सांगतात, लोकमान्य टिळकांच्या अवसानानंतर उगवलेल्या महात्मा गांधी युगाने पुण्याच्या त्या माहात्म्याचे पेकाट मोडले. टिळक युगात त्यांच्या उपरण्याच्या दशा करून मिरवणारी सारी कलदार चलनी नाणी बद्द वाजू लागली. गांधी युगाच्या पहिल्या झपाट्याने त्यांच्या रेशमी पगड्या उडवल्या आणि खादीची थाबडी त्यांच्या मस्तकावर चढली. दिडाण्याच्या खादी टोप्यांनी पागोटी, पगड्या, फेटे पदच्युत केले. बाहेरचे वेषांतर बेमालूम झाले, तर अंतरंगातील राजकारण मतमतांतराच्या आकार-प्रकारांना कालोचित कलाटणी देण्याची समयोचित अक्कलच कोणाजवळ नसल्यामुळे, भले बुद्धी सागर-आगर म्हणून मिरवणारी बामण मंडळी बोलबोलता गांधी युगाच्या पचनी पडून समाजकरणातली आणि राजकारणातली बेकार चिपाड चोथा बनली. एकेकाळच्या या मूठभर चाणक्यांची महात्मा गांधींना फारशी किंमत वाटली नाही नि जरूरही भासली नाही....!' यामागे महात्मा गांधींचं दूरदृष्टीचं धोरण कसं होतं, ते सांगताना 'आम्हीच आमचे मित्र नि शत्रू' या लेखात प्रबोधनकार लिहितात, 'विराट संख्येचा महाराष्ट्रातला बामणेतरी बहुजन समाज माझ्यामागे आला, तर हां हां म्हणता मी इकडची दुनिया तिकडे करीन असे महात्मा गांधींनी जाहीरपणे बोलून दाखवले....!' त्यानुसार गांधीजींनी करून दाखवलं. इतकंच नव्हे तर लोकमान्य टिळकांनी हयातभर सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीला विरोध केला, त्यांच्या पश्चात त्यांच्या 'गायकवाड वाडा'मधून ब्राह्मणेतर चळवळ चालवण्याचा पराक्रम खुद्द टिळकांच्या मुलाने-श्रीधरपंताने केला. हे परिवर्तन प्रबोधनकारांनीच घडवून आणलं होतं, हे विशेष! 
महाराष्ट्रात समाज-राजकारणातल्या वहिवाटीच्या खाचाखोचा सांगितल्यावर मराठी, महाराष्ट्राभिमानी म्हणून संघटित निर्माण करण्याचं मार्गदर्शन करताना प्रबोधनकार लिहितात, 'मऱ्हाठ्यांना महाराष्ट्रातल्या अठरापगड स्थानिक जमातींनी एकजीव, एकजिव्ह एकवटूनच आपल्या जीवनाचे गुंते सोडवले पाहिजेत, महाराष्ट्रातला मऱ्हाठा म्हणून आपल्याला ताठ मानेने जगायचे आहे. छाती काढून निर्धोकपणे समाजात नि व्यवहारात वागायचे आहे. तेखदार मराठबाण्याने आपल्या वाजवी हक्कांसाठी जागच्या जागी थांबून लढे द्यायचे आहेत. जगायचे तर मर्दासारखे नि मरायचे तेही मर्दाच्या मरणाने, तर पहिल्या प्रथम वैयक्तिक, कौटुंबिक, जातीय, ग्रामीण यच्चयावत सर्व भेदांवर निखारे ठेवून अभेद एकवटणीचा श्रीगणेशा काढला पाहिजे....!' शिवसेनेच्या विचाराची बैठक पक्की करणारी प्रबोधनकारांची ही लेखमाला होती. पण या लेखमालेचं पुस्तक व्हायला, मात्र आणखी सात वर्ष उलटावी लागली. ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार झालेले नारायण आठवले यांनी आपल्या 'आराधना प्रकाशन'तर्फे या लेखांचा संग्रह 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ...!' या नावानं प्रकाशित केला. तो १९ सप्टेंबर १९७३ रोजी प्रबोधनकारांच्या ८८ व्या वाढदिवशी. 'माझी जीवनगाथा' या प्रबोधनकारांच्या आत्मकथनासह प्रकाशित झाला. या लेखसंग्रहाच्या मुखपृष्ठावरचा वाघ हा खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी चितारलेला आहे. इतिहासाचं दणकट संचित घेऊन भविष्याकडे झेप घेण्याच्या तयारीतला हा वाघ आहे. शिवसेनाप्रमुखांना तसाच शिवसैनिक हवा होता; आणि प्रबोधनकारांना तसा समस्त मराठी समाज हवा होता; एवढाच काय तो फरक ! आज तसाच मराठी माणूस उभा राहण्याची तीच अपेक्षा व्यक्त होत आहे. मराठी भाषेबरोबरच मराठी अस्मिता, मराठी माणूस अडचणीत सापडलाय.
लेखणी, वाणी, विचार आणि कृती या चारहीतही प्रबोधनकारांच्या कडव्या मऱ्हाठी विचार-संस्कृतीचं तेज ठळकपणे दिसतं. 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ...!' हा लेखसंग्रह त्याला अपवाद नाही. प्रबोधनकारांच्या विचार आणि लेखन सौष्ठवाचा हा खास नमुना आहे. राज ठाकरे यांनी १९ वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निर्माण करण्याचा विचार पक्का करण्यासाठी 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ...'ची पारायणं केली होती, इतका ह्या पुस्तकातला विचार उपयुक्त आहे. तो सर्वांसाठी मुक्त आहे. हा लेखसंग्रह दुर्मिळ होता. शिवसेनेच्या निर्मिती काळात कोणते मुद्दे आणि अपेक्षा मांडल्या गेल्या, हे समजण्यासाठी 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ...!' आवश्यक असताना, त्याची गेल्या ५० वर्षांत दुसरी आवृत्ती का निघाली नाही, हे एक कोडंच आहे. आता 'नवता बुक वर्ल्ड' तर्फे 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ'...! हे पुस्तक प्रकाशित झालंय. विचाराची उपयुक्तता आणि टिकाऊपणा लेखकाचा मोठेपणा दाखवत असतो. तो 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ...'तल्या प्रत्येक  वाक्यात ते आहे. म्हणूनच 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ...'तल्या विचारांना आणि मार्गदर्शनाला आजही मोल आहे. तथापि, 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ...' या हाकेनं निर्माण झालेली शिवसेना गेली काही वर्ष महाराष्ट्राचा प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यातली भाजपच्या साथीनं साडेचार वर्ष मनोहर जोशीचं सरकार, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारात आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून अडीच वर्षे काँग्रेसच्या साथीनं सत्ताधारी पक्षही होता. शिवसेनेच्या गेल्या ५९ वर्षाच्या वाटचालीत भारतीय संसदेत पाच पन्नास खासदार झालेत; शिवसेनेचे काही केंद्रीय मंत्री झाले; मनोहर जोशी तर लोकसभेचे अध्यक्ष झाले; तरीही मुंबईसह महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरात परप्रांतीयांचे लोंढे, हे अवघड जागीचं दुखणं आज दिवसागणिक वाढतंय; मराठी टक्क्याची घसरण सुरूच राहावी, मराठी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढाई चालूच राहावी आणि दिल्ली दरबारात सह्याद्रीचे वारे घुमण्यापुरतं दिसावं, हे वर्तमान अभिमानास्पद नाही? हे असं का व्हावं? 'लोकसभेत किंवा राज्यसभेत खासदारकीची आणि विधिमंडळात आमदारकीची ऊबदार धाबळ फर्स्टक्लास जंटलमन म्हणून पांघरायला मिळते. मगजबाज जित्या माणसाला याहून अधिक ते काय हवं असतं हो...!' हे प्रबोधनकारांचं म्हणणं खरं ठरलं म्हणायचं. असो. या लेखसंग्रहातल्या मराठी-महाराष्ट्राच्या दुखण्याचा तपशील-संदर्भ वेगळे असले, तरी वर्तमानाच्या दुरुस्तीसाठी प्रबोधनकारांचाच मुद्याचा गुद्दा प्रभावी ठरणारा आहे. त्याचं वाचन प्रत्येक मराठी माणसांनी करून, आज-उद्याच्या या समस्यांना भिडलं पाहिजे. साठ वर्षापूर्वीची राज्यातली राजकीय स्थिती, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूस पुन्हा एकदा अडचणीत आलाय. त्याच्या अस्तित्वाचा झगडा उभा राहिलाय. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईसाठी मराठी माणसांनी रक्त सांडलंय, हे विसरलं जातंय. आज तीच 'मराठी मुंबई' परप्रांतीय त्यातही विशेषतः गुजरातींना हस्तगत करायचीय. मराठी माणसांना इथून हुसकावून लावायचंय. सत्ताभ्रष्ट करून त्यावर कब्जा मिळवायचाय. त्यासाठी दिल्लीश्वरांनी हालचाली आरंभल्यात. महाराष्ट्रातला कृतघ्न भाजप आणि सत्तालोभी शिंदेसेना साम, दाम, दंड, भेद अशी सारी हत्यारे परजत महाराष्ट्र अन् मुंबई दिल्लीश्वराच्या हाती सोपविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याविरोधात मुंबई वाचविण्यासाठी, मराठी स्वाभिमान शाबूत राखण्यासाठी पुन्हा एकदा मराठी माणसांकडून तीच अन् तशीच डरकाळी उठायला हवीय, 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ'....! 
हरीश केंची
९४२२३१०६०९



No comments:

Post a Comment

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...