Friday, 20 June 2025

पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी

भारताच्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ ज्यांना केंब्रिज विद्यापीठाची पीएचडी मिळाली त्या कमला सोहोनी यांचा जन्म १९१२ साली इंदोर इथं झाला. त्यांचे वडील नारायणराव भागवत यांनी १९११ मध्येच पहिल्या तुकडीत इथं प्रवेश घेऊन ‘ऑरगॅनिक केमिस्ट्रीत’ पदव्युत्तर संशोधन केलं होतं. ह्याचप्रमाणे नारायणराव भागवत आणि यांच्या भावानं संशोधन करून मुंबई विद्यापीठाकडे एम.एस्सी.साठी प्रबंध देऊन ‘मूस गोल्ड मेडल’ मिळवलं होतं.
नारायणराव भागवत यांच्या दुसऱ्या मुलीचं नांव दुर्गा भागवत होतं. दुर्गा भागवत या मराठीमधल्या विचारवंत, लेखिका होत्या. कमला सोहोनी यांनी केमिस्ट्री-फिजिक्स घेऊन बी.एस्सी. केलं होतं आणि त्या मुंबई विद्यापीठात पहिल्या आल्या होत्या. २ जुलै १९३३ साली कमला सोहोनी रेल्वेनं बंगलोरला तिथल्या  इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेण्यासाठी आपल्या वडिलांबरोबर आल्या होत्या. कमला सोहोनी यांना  शास्त्रज्ञ व्हायचं होतं. त्यावेळी इन्स्टिटय़ूटचे संचालक होते जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते सर चंद्रशेखर व्यंकटरमन उर्फ सी. आर. रामन. मुलगी  आणि वडील त्यांना भेटायला गेले. कारण संस्थेनं प्रवेशासाठी पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले होते. परंतु  संस्थेकडून तिला पत्र आलं होतं ते, ‘अर्ज नामंजूर’ म्हणून आणि कारण होतं, ‘स्त्रियांना प्रवेश देण्याची आमच्याकडे प्रथा नाही....!’ हे उत्तर वाचून वडील, मुलगी मुंबईहून रामन यांना भेटायला आले. सर व्यंकटेश रामन यांच्याशी त्यांची बातचीत इंग्रजीमधून झाली. सर रामन मुलींना घेण्यास अनुकूल नव्हते. संशोधन हा स्त्रियांचा प्रांत नाही असं त्याचं म्हणणं होतं. तेव्हा कमला सोहोनी गप्प बसायला तयार नव्हत्या त्यांनी सर व्यंकटेश रामन यांना इंग्रजी मधून विचारले. "माझ्यात काय कमी आहे म्हणून प्रवेश नाकारता...? मुंबई विद्यापीठानं मुलींना उत्तेजन देण्याकरता, इन्टर सायन्सच्या परीक्षेत प्रथम येणारीला शिष्यवृत्ती जी ठेवलीय. ती ‘सत्यवती लल्लुभाई शामळदास’ शिष्यवृत्ती मी मिळवलीय. मला पुढील शिक्षणाची संधी नाकारून माझ्यानंतर येणाऱ्या मुलींवर अन्याय करता आहात. पण आम्ही गांधीजींच्या तत्त्वावर निष्ठा बाळगणारी माणसं आहोत. सत्याग्रहावर विश्वास ठेवणारी आहोत. मी मुंबईला परत जाणार नाही. इथंच राहणार आणि तुमच्या दारापुढं सत्याग्रह करीन.’...!’
आता मात्र हे उत्कृष्ट इंग्रजीतलं खणखणीत बोलणं ऐकून सर रामन चमकले. ते थोड्या मवाळ स्वरात म्हणाले, ‘‘ठीक आहे, तुझा एवढा हट्टच असेल तर देईन मी तुला इथं प्रवेश, पण एका अटीवर. एक वर्ष तुला इथं प्रोबेशनवर काम करावं लागेल. तुझ्या कामाची पद्धत पसंत पडली तरच तुला रीतसर प्रवेश मिळेल....!" सर रामन यांच्या बरोबरच्या शाब्दिक चकमकीनंतर त्या जीवरसायनशास्त्र विभागात, त्या शास्त्राचे प्राध्यापक डॉ. सुब्रह्मण्यम यांना भेटल्या. त्या विभागाचे व्याख्याते बॅनर्जी, श्रीनिवासय्या या तिघांनाही सी. रामन यांची प्रोबेशनची विचित्र अट ऐकून आश्चर्य वाटलं. कमलाची लहानखुरी मूर्ती, तिचं अभ्यासातलं प्राविण्य पाहून श्रीनिवासय्या म्हणाले, ‘‘ठीक आहे, माझ्या हाताखाली काम कर. पण मला आळस, अळंटळं केलेलं मुळीच खपणार नाही...!"  श्रीनिवासय्या कमला सोहोनी यांच्यावर खुश झाले कारण ते त्यांची काम करण्याची चिकाटी, धडपड पाहूनच. कमला सोहोनी म्हणाल्या "मला फक्त ४ ते ६ दोन तास सुट्टी द्या त्या वेळेत मी टेनिस खेळेन, टेनिस खेळल्यामुळे माझं शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील...!" 
एक वर्ष संपल्यावर कमला सोहोनी सी.व्ही. रामन यांना भेटल्या आणि म्हणाल्या ‘‘सर, वर्ष पूर्ण झालंय. माझ्या प्रवेशाचं काय...?’’ रामन म्हणाले, ‘‘अर्थात तू इथे राहून संशोधन पुरं कर. तुझी ज्ञानलालसा, तळमळ, जिद्द पाहून मला इतका आनंद झालाय की, मी आणखी दोन मुलींना यावर्षी प्रवेश देऊन माझी चूक मी सुधारणार आहे...!’’ पुढं म्हणाले, ‘‘तू टेनिस चांगलं खेळतेस म्हणे. मी पाहिलं आणि ऐकलंही. मीही तुझ्याबरोबर एक दोन सेट्स खेळेन. चालेल ना...?’’ कमला सोहोनी यांना आनंद झाला त्यांच्या  मनात विचार आला हेच का सर जे मला म्हणत होते संशोधन हे मुलींचे क्षेत्र नाही. जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, जीवरसायन संशोधक डॉ. डेरिक रिक्टर यांच्यामुळं कमलाला पीएच.डी. साठी १८ डिसेंबर १९३७ साली केंब्रिजमध्ये प्रवेश मिळाला. मुंबईत असताना १९३६ मध्ये त्यांनी अमेरिकेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. पण वेळ टळून गेली होती. पुढच्या वर्षी अर्ज करा, असं त्या विमेन विद्यापीठानं कळवलं होतं. पण कमला सोहोनी यांनी  केंब्रिजला प्रवेश मिळताच त्या विद्यापीठाला कळवून टाकलं. ‘मी यंदा अर्ज करणार नाही. मला दोन शिष्यवृत्त्या मिळाल्या आहेत. माझं संशोधन चालू आहे...!' असं पत्र एका स्त्रीकडून तेही एक मागास देशातल्या स्त्रीकडून, पाहून तिथल्या उच्चपदस्थांनी जीवरसायनशास्त्राचे जनक आणि नोबेल पुरस्कार विजेते सर गॉलंड हॉपकिन्स यांना पत्र पाठवून विचारलं, ‘ही मुलगी कोण आहे? तिची माहिती मला कळवा...!’ हॉपकिन्सनी कळवलं, ‘ही मुलगी अत्यंत बुद्धिमान, कठोर परिश्रम करणारी आहे...!’ हॉपकिन्सचं हे प्रशंसापत्र पाहून ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी फॉर विमेन’ ही संस्था फार प्रभावित झाली. त्यांनी कमला सोहोनी यांना ताबडतोब पत्र लिहिलं, ‘‘आम्ही तुला प्रवासी शिष्यवृत्ती देत आहोत. तिच्या आधारे तू अमेरिकेत ये...!’’  ‘काही तरी घोटाळा आहे. ही शिष्यवृत्ती तर प्रोफेसरना देतात, मला कशी...?’ असा प्रश्न कमला सोहोनी यांना  पडला. त्यांनी हॉपकिन्सना विचारलं. त्यांनी सगळी हकिगत सांगून म्हटलं, ‘यात काही घोटाळा नाही....!’ असं स्पष्ट केलं अर्थात कमला सोहनी यांना अत्यंत आनंद झाला. मार्च १९३८ मध्ये युरोपात लीग ऑफ नेशन्सची बैठक होती. तिथल्या विद्यार्थी परिषदेला हजर राहा, असं त्यांना सांगण्यात आलं. तेही भारत, इंग्लड, अमेरिका या तीन देशांतल्या विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून. कारण काय तर त्या जन्मानं भारतीय, शिकत होत्या केंब्रिजमध्ये आणि अमेरिकन फेडरेशननं त्यांना फेलोशिप दिली होती म्हणून त्या अमेरिकन विद्यार्थिनीही होत्या. लक्झेंबर्गला त्या गेल्या. त्यांना तिथं ठरावीक प्रश्न विचारण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन आपल्या संशोधनाच्या आवडी निवडीबद्दल सांगताना त्यांनी आपल्या वडिलांसंदर्भातही सांगितलं. घरात असलेलं मोकळं वातावरण आणि वडिलांनी मुलगी म्हणून कधीच अडवलं नाही. मला ज्यात रस होता ते शिकण्यासाठी मदत केली, प्रोत्साहन दिलं. त्यांच्या या भाषणाचं कौतुक झालं. केंब्रिजला परतल्यावर त्यांचं संशोधनाचं काम सुरू झालं. आता त्यांनी आणि  डॉ. डेरिक यांनी वनस्पतींवर काम सुरू केलं. प्रचंड आणि सातत्यानं काम करत असताना अचानक कमला सोहोनी यांना एक महत्त्वाचा शोध लागला, बटाट्यातल्या प्रेसिपिटेट हँड स्पेक्ट्रोस्कोपमधून पाहताना त्यांना एक निराळ्याच रंगाची रेष दिसली. त्याचं नाव सायट्रोक्रोम ‘सी’. वनस्पतींच्या श्वसनक्रियेत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या सायट्रोक्रोम घटकाचा शोध होता तो. त्यांनी आणि मार्गदर्शक रॉबिन यांनी अधिक अभ्यास करून त्यावर लेख लिहिला. आजही जगात वनस्पतींच्या श्वसनाचा विषय चर्चेला येतो तेव्हा कमला सोहोनी यांचा आणि ‘नेचर’ मधल्या त्यांच्या लेखाचा उल्लेख असतोच. 
४ जून १९३९ रोजी त्यांना पीएच.डी. मिळाली. केंब्रिज विद्यापीठाकडून पीएच.डी. मिळवणाऱ्या त्या  पहिल्या भारतीय स्त्री आणि मराठी भाषिक. १४ महिन्यांत प्रबंध हा एक वेगळा विक्रमच होता. अनेकांनी आग्रह करूनही परदेशात मिळालेलं शिक्षण, ज्ञान आपल्या देशासाठी उपयोगात आणायचं या विचारानं त्या भारतात परतल्या . महाराष्ट्र सरकारनं मुंबईतल्या विज्ञानसंस्थेत जीवरसायनशास्त्राचा विभाग नव्यानं उघडला. तिथं कमलाबाई १९ जून १९४९ ला विज्ञान संस्थेत रुजू झाल्या. म्युझियमसमोर या विभागाला स्वतंत्र जागा मिळाली आणि कमलाबाईंनी सुसज्ज प्रयोगशाळा उभारली. आपल्या विद्यार्थ्यांना त्या सहा-आठ महिने शिक्षण देऊन नंतर संशोधन करायला सांगत. दुसरे प्रो. डॉ. एन.पी.मगर होते. दोघांकडे दहा-दहा असे वीस विद्यार्थी होते. संशोधनाचे विषय होते. नीरा या नैसर्गिक पेयाची पौष्टिक उपयुक्तता, कडधान्ये आणि त्यातील ट्रिप्सीन इन्हिबिटर्स. हाफकिन्स इन्स्टिट्यूट पुनर्रचना समितीतही डॉ. कमलाबाईंना घेतलं गेलं. बडोद्याच्या महाराज सयाजीराव विद्यापीठानं जीवरसायन विषयाचा नवा स्वतंत्र विभाग उभारला. त्यासाठी कमलाबाईंना आमंत्रित केलं. आपली  दोन लहान मुलं सांभाळून त्या मुंबई-बडोदा सारी धावपळ करीत. विज्ञानसंस्थेत असतानाच राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणिडॉ. होमी भाभा यांनी संस्थेला भेट दिली. तेव्हा त्यांना नीरा या नैसर्गिक पेयावर संशोधन करायला सुचवलं गेलं. त्यांनी ते काम जोमानं सुरू केलं. खादी ग्रामोद्योग मंडळ झाडावरून नीरा काढण्याचे काम करी. ते पहाटे तीन वाजता नीरा पाठवत. ती घ्यायला प्रयोगशाळेत स्वत: बाई जात. विद्यार्थ्यांना सांगत नसत. त्यांचं हे संशोधन १०-१२ वर्षं चाललं. त्याचे चांगले फायदे हाती लागले. त्याबद्दल डॉ. कमलाबाईंना सर्वोकृष्ट संशोधनाचं पदक राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते २९ एप्रिल १९६० साली मिळालं. कमला सोहोनी ह्या पहिल्या विज्ञानातल्या पी.एच.डी. झालेल्या आहेत.
कमला सोहोनी यांचा विवाह माधवराव सोहोनी यांच्याशी झाला होता त्याची त्यांना उत्तम साथ लाभली. एम.एस्सी. झालेले माधवराव ऑक्चुअरी म्हणजे विमातज्ज्ञ म्हणून काम करीत. पुढं ते खूप मोठ्यापदावर पोहोचले. विमाकंपनीनं अधिक उच्च शिक्षणासाठी त्यांना लंडनला पाठवलं. आयुर्विमाचे ते मॅनेजिंग डायरेक्टर झाले. १९७२ ला ते निवृत्त झाले. कमलाबाईंबरोबर घरातली कामं ते करत. शिस्त, टापटीप, प्रामाणिकपणा हे त्यांचे गुण आणि प्रखर बुद्धिमत्ता त्यामुळं दोघांनीही आपआपले व्यवसाय उत्तम सांभाळले. कमलाबाईंची दोन्ही मुलं उत्तम शिकले आणि आपापल्या व्यवसायात उच्च पदावर पोहोचले. सुना-नातवंड यांनी त्यांचं घर भरून गेलं. २२ सप्टेंबर १९९५ ला माधवराव सोहोनी हे नागिणीच्या आजारानं वारले.
कमला सोहोनी यांना त्या स्त्री म्हणून त्यांचा अनेक वेळा अपमान केला गेला, पुरुषी अहंकाराचा वाईट अनुभवही त्यांना आला. पण त्या सर्वांना त्या पुरून उरल्या आणि त्यांनी आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं. तर त्यांच्या दुसऱ्या दोन बहिणी दुर्गाबाई आणि विमलाबाई खूप शिकून त्यांनीही आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं. मला आठवतंय मुंबईला कीर्ती कॉलेजमध्ये ग्रंथालीचा कार्यक्रम झाला होता त्यावेळी दुर्गाबाई भागवत आणि कमला सोहोनी दोघीही तिथं आल्या होत्या.
१९९७ मध्ये आयुष्याच्या अखेरीस कमला सोहोनी यांना विज्ञान क्षेत्रामधल्या उत्कृष्टता अन् त्यांच्या योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. भारतीय वैद्यकीय संशोधन खात्यानं त्यांना सन्मानित करण्यासाठी खास कार्यक्रम दिल्लीला आयोजित केला. कमलाबाई सोहोनी यांच्या सन्मानार्थ खूप प्रेक्षक सभागृहात जमले होते. सर्वानी उभं राहून टाळ्यांचा कडकडाटात त्यांच्या कार्याला मानवंदना दिली आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच हातात पुरस्कार घेऊन उभ्या असलेल्या कमलाबाई व्यासपीठावरच कोसळल्या. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केलं गेलं परंतु तिथं १९९८ साली  वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले . 

No comments:

Post a Comment

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...