"गेल्या वर्षी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभेत केलेल्या आंबेडकर.... आंबेडकर.... आंबेडकर... या आणि अन्य विधानांपायी केंद्रीय गृहमंत्री अडचणीत आले होते. त्यानंतर हिंदू कोड बिलाची चर्चा नव्याने सुरू झाली. मीही तो इतिहास पुन्हा समजून घेतला. भारतीय नागरिक म्हणून आणि माणूस म्हणूनही महात्मा फुले बाबासाहेबांचं, नेहरूंच मोल नव्याने जाणवलं. मला उमगलेलं इथे मांडतोय. कारण हे परत परत सांगितलं गेलं पाहिजे. यासाठी रवीशकुमार, द वायर, टेलिग्राफ, इंडियन एक्स्प्रेस, नेहरूंचं पुस्तक, नेहरूंच्या पुस्तकांची भाषांतर करणाऱ्यांशी चर्चा वगैरेंची मदत झाली...!"
----------------------------------------------
खरोखर, हिंदू कोड बिलाचा प्रवास, त्याचं मुख्य कथानक, त्यातली उपकथानकं, भावभावना, व्यूहरचना, झपाटलेपण सगळंच फार स्वारस्यपूर्ण आहे. बाबासाहेबांसाठी हिंदू कोड बिल हे स्वओळख ठरण्याइतकं महत्वाचं होऊन जाणं, डॉ. आंबेडकर आणि नेहरू या दोघांचंही या कायद्याशी असलेलं घट्ट नातं, इथे दोघांना वेगळं करताच येत नाही, या जोडीने भारतीय स्त्रियांचं भलं करण्यासाठी स्वतःला पणाला लावणं हे यातून उलगडतं. सलाम त्यांना! हिंदू कोड बिलाला होणारा जीर्णमतवाद्यांचा तीव्र विरोध केवळ त्यातल्या तरतुदींमुळे नाही, तर त्यातल्या बाबासाहेबांच्या ठळक पुढाकारामुळे होता. नेहरू आणि आंबेडकर दोघांनाही पहिल्या प्रयत्नात बिल पास होऊ शकत नाही, हे मानवत नव्हतं. बिलातल्या तरतुदींमुळे समाजाचं भलं होणार आहे असा त्यांचा दृढ भरवसा होता. दोघांनी हिंदू कोड बिल हे सुधारणेचं पाऊल मानलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या कायदेमंत्रीपदाच्या राजीनामा दिला त्याचं कारण हिंदू कोड बिल मागे घेतलं जाणं, हे होतं, हे खरंच. मात्र कोणाच्या विरोधामुळे हे बिल मंजुर होण्यात अडथळे आले, विलंब झाला? १९५१ मध्ये हे बिल संसदेत मांडण्यात आलं, तेव्हा हिंदुत्ववादी संघटना त्याला जोरदार विरोध करत होत्या. या बिलामुळे हिंदू प्रथा आणि शास्त्रांत ढवळाढवळ होतेय, असा आक्षेप घेत होत्या. हिंदू महासभेने त्यावेळी संसदेला घेराव घातला होता. भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीही विरोध केला होता. श्यामाप्रसाद मुखर्जी १९४७ ते ५० या काळात नेहरू मंत्रिमंडळात असताना त्यांनी हिंदू कोड बिलाच्या विरोधात अवाक्षरही काढलं नाही. पण १९५१ मध्ये म्हणू लागले की या बिलामुळे हिंदू संस्कृती नष्ट होईल. एव्हाना त्यांनी जनसंघाची स्थापना केली होती. १२ डिसेंबर १९४९ ला दिल्लीच्या रामलीला मैदानावर आरएसएस, जनसंघ, हिंदू महासभा आणि राम राज्य परिषदेच्या लोकांनी डॉ. नेहरू आणि डॉ. आंबेडकर यांचे पुतळे जाळले, एकत्र. का? कारण या संघटना हिंदू कोड बिलासाठी नेहरू आणि डॉ. आंबेडकर दोघांनाही जबाबदार धरत होत्या.
१९३१ च्या कराची अधिवेशनात काँग्रेसने मूलभूत हक्कांविषयी ठराव मंजूर केला होता. त्यात स्त्री-पुरुष समानता या मुद्याचा समावेश होता. नेहरू या समितीचे अध्यक्ष होते. १९४० नंतर नेहरूंनी हिंदू कोड बिलाबद्दल पाठिंब्याचं बोलायला सुरुवात केली. नेहरूंनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'मध्ये लिहिलंय की, इंग्रज आले तेव्हा प्रथा-परंपरांनाच हिंदू कायदा मानलं गेलं. त्यामुळे झालं असं, की इंग्रजांनी चालीरीतींवर आधारित दिलेले निर्णयच पायंडे ठरू लागले. जुन्यापुराण्या प्रथा तशाच चालू राहिल्या, उलट त्या नव्याने बळकट होऊ लागल्या. ब्रिटीश सरकारला इथल्या लोकांचा पाठिंबा हवा होता, म्हणून ते पुराणमतवादाला खतपाणी घालत राहिले. त्यांना परंपरा बदलायची नव्हती. खरं तर, समाजात बदल घडवून आणण्यासाठी या परंपरा बदलण्याची गरज होती. पंतप्रधान नेहरूंनी १९ डिसेंबर १९४९ रोजी संसदेत सांगितलं, “सभागृहाने हिंदू कोड बिलाविषयी पुसटशीसुद्धा शंका घेऊ नये. आपल्या समाजाला पुढे जायचं असेल, तर प्रत्येक आघाडीवर या कायद्याची अंमलबजावणी करावी लागेल....!” हा कायदा तयार करण्याची प्रक्रिया चकित करणारी आहे. बी.एन.राव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने देशभर दौरे केले. लाखो लोकांशी संपर्क साधला. बॉम्बे बार असोसिएशनपासून बेळगाव बार असोसिएशन, मोतिहारीपासून मुझफ्फरपूर बार असोसिएशनपर्यंत सदस्यांची मतं जाणून घेतली. हिंदू वकिलांच्या बहुसंख्य संघटनांचा या विधेयकाला विरोध होता. वृत्तपत्रंही बिलातल्या तरतुदींच्या विरोधात अद्वातद्वा लिहीत सुटली होती. हे बिल धार्मिक स्वातंत्र्याच्या आड येत असल्याचं कारण देत हिंदू संघटना निषेध नोंदवत होत्या.
डॉक्टर आंबेडकर हे बिल मंजूर होण्यासाठी जितका अधिक प्रयत्न करायचे, तितका तितका बिलाला होणारा विरोध वाढत असे. नेहरू आणि आंबेडकर, दोघंही हिंदू कोड बिलाचे घट्ट समर्थक असूनही डॉ.आंबेडकरांना अधिक विरोध केला जात असे. त्यांच्या जातीमुळे त्यांच्याबद्दल द्वेष बाळगणारे तेव्हा कोण होते? आणि आजही ते कोणाच्या बाजूने आहेत? सवर्ण नेतृत्व आणि समाज डॉ.आंबेडकरांना मुळीच मानत नसे. संघाच्या ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकाने या बिलाला विरोध केला होता. २ नोव्हेंबर १९४९ रोजीच्या ऑर्गनायझर’मधल्या लेखात लिहिलंय की हे बिल म्हणजे थेट हिंदू श्रद्धेवर हल्ला आहे, स्त्रीला घटस्फोट देण्याचा अधिकार देणं, हे हिंदू विचारसरणीविरुद्धचं बंड आहे.
बिल तयार करण्याची बाबासाहेबांची पद्धत खासच होती. बाबासाहेबांनी १९२७ मध्ये मनुस्मृतीचा अभ्यास करणं ही ऐतिहासिक महत्वाची घटना होती. हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार करण्यासाठी डॉ.आंबेडकरांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. बाबासाहेबांनी हिंदू धर्म ग्रंथ आणि चालीरीतींचा सखोल अभ्यास केला. विवाह, घटस्फोट आणि मालमत्तेच्या वाटणीशी संबंधित मिताक्षरा आणि दयाभाग या हिंदू धर्मातल्या विचारशाखांचं त्यांनी अध्ययन केलं. इतर लहान समाजघटकांच्या चालीरीतींचाही वेध घेतला. त्यांची पूर्ण खात्रीच पटली की, हिंदू कोड बिल पास व्हायलाच हवं. अत्यंत गंभीरपणे, गहन संशोधनोत्तर ते या निष्कर्षाप्रत आले होते. भारतात जात आणि लिंगाधारित शोषणाचा परस्परसंबंध आहे आणि हेच असमानतेचं मूळ आहे, या अनुमानाशी ते पोचले होते. जोवर हे शोषण आणि त्यातून येणारी विषमता यावर उपाय करत नाही तोवर संविधानाने दिलेला आर्थिक समानतेचा अधिकार निरर्थक राहाणार, हे त्यांना पक्कं उमगलं होतं. म्हणूनच डॉ.आंबेडकर हिंदू कोड बिल मंजूर करून घेण्यासाठी व्याकूळ झाले होते. त्यांनी म्हटलं: “कायदे बनवण्याचं काम देवाचं किंवा स्मृतीचं आहे, अशी हिंदू समाजाची नेहमीच धारणा आहे. समाजाला स्वतःला बदलण्याचा अधिकारच नाही, अशी यांची घट्ट समजूत. श्रुतीस्मृती पुराणोक्त असं पिढ्यानपिढ्या सुरू आहे. आपल्या जगण्यात आर्थिक आणि वैधानिक पातळीवर बदल घडू शकतात, हे या समाजाने कधी लक्षातदेखील घेतलं नाही. तशी जबाबदारीच स्वीकारली नाही. पहिल्यांदाच असं घडतंय, की आपण हिंदू समाजाला समजावून सांगत आहेत की आता मोठं पाऊल उचलायचं आहे....” दलितांच्या आणि महिलांच्या शोषणाचं मूळ त्यांना समजून चुकलं होतं. हे बिल अंमलात आल्यावर त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल, असा पक्का विश्वास त्यांना वाटत होता.
देशभरातले हिंदुत्ववादी आणि काँग्रेस संघटनेतले जातीयवादी यांनी डॉ.आंबेडकरांना इतका काही विरोध करायला सुरुवात केली, की आंबेडकरांच्या जागी दुसरी कुणी व्यक्ती कायदामंत्री असली, तर कदाचित बिल पास होईल, असं नेहरूंनाही वाटलं. आंबेडकरांमुळे हिंदू कोड बिलाला होणारा विरोध वाढत होता, हे सत्य काहींना लपवून ठेवायचं आहे. ते लपवल्याने कोणाला फायदा होईल, हे आपण समजू शकतो. नेहरूंना कॉंग्रेस पक्षाचा विचार करावा लागत असे. डॉ.आंबेडकर कोणत्याही पक्षाला बांधील नव्हते. समाजसुधारक आणि कायदामंत्री म्हणून ते विचार करत होते. नेहरूंना १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जायचं होतं. हिंदू कोड बिलाला हिंदू महासभेप्रमाणेच खुद्द कॉंग्रेस पक्षातूनही विरोध होता. पत्रकारांपासून ते धार्मिक संघटनांपर्यंत सर्वदूर विरोधच. काँग्रेसचे सदस्यही विरोध करत असल्याने हे बिल संसदेत आणल्यास मंजुर होऊ शकणार नाही, ही नेहरूंची चिंता होती. निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या अधिवेशनात या विरोधाला कसं सामोरं जाणार? या स्थितीत नेहरूंनी राजकीय निर्णय घेतला, की निवडणुकीनंतर बिल संसदेत पुन्हा मांडायचं. आणि सद्यस्थितीत ते माघारी घ्यायचं. यानंतर आंबेडकरांनी आपलं राजीनामापत्र नेहरूंना दिलं. पत्रात त्यांनी हिंदू कोड बिल हेच राजीनाम्याचं मुख्य कारण असल्याचं लिहिलं.
हे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीआधीचं शेवटचं अधिवेशन होतं. बिलातल्या प्रत्येक अन् प्रत्येक तरतुदीवर चर्चा होत होती. वेळ लागत होता. संसदेबाहेरचा निषेधही उग्र होत होत चालला होता. म्हणून हिंदू कोड बिल पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी मागे घेतलं गेलं. कोणामुळे? हिंदू महासभा, जनसंघ आणि धार्मिक संघटनांनी मोठा विरोध केल्यामुळे. हिंदू कोड बिल मागे घेतल्यानंतर नेहरूंनी डॉ. आंबेडकरांना एक औपचारिक पत्र लिहिलं: “हिंदू कोड बिलाला सभागृहातच नव्हे, तर सभागृहाबाहेरही विरोध होत आहे, हे तुम्हाला माहीत आहे. आपण जगातल्या सर्वात प्रबळ इच्छाशक्तीचा उपयोग केला, तरी या विरोधाला बाजूला सारून बिल लगेच मंजूर करून घेता येणार नाही....” नेहरूंनी डॉ.आंबेडकरांना लिहिलेल्या पत्रात कुठेही कारणं लपवलेली नाहीत. उलट त्यांना वारंवार आणि आदराने सांगत होते की, खूप विरोध चालला आहे. आपण योग्य वेळ आल्यावर मंजुर करून घेऊ. पण ही ती वेळ नव्हे. सगळं काही लिखित पत्रात आहे. दोघंही परोपरीने एकमेकांशी बोलत आहेत, लिहीत आहेत, कारणांची चर्चा करत आहेत. एका पत्रात नेहरूंनी हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार करण्यातलं बाबासाहेबांचं योगदान स्पष्टपणे मान्य केलंय. ते कोणत्याही परिस्थितीत मंजुर करण्याचं वचनही दिलंय. नेहरूंनी संविधान निर्मितीतलं बाबासाहेबांचं योगदान गौरवलंदेखील आहे.
आणखी एक घटना. हिंदू कोड बिलाच्या विरोधी वातावरणात नेहरू फुलपूर इथून निवडणूक लढवत होते. त्यावेळी त्यांनी आपल्या एका प्रचारसभेत म्हटलं: “मी निवडणूक जिंकलो वा हरलो तरी हिंदू कोड बिल मंजूर करून घेईनच. मी केवळ या बिलाच्या एका मुद्द्यावर निवडणूक लढवण्यास तयार आहे. मी हे ब्रह्मचारीजींना लिहून द्यायला तयार आहे...” कोण हे ब्रह्मचारी? त्यावेळी जनसंघ, हिंदू महासभा आणि रामराज्य परिषद यांनी मिळून नेहरूंच्या विरोधात उभा केलेला गोळवलकरांच्या मर्जीतला उमेदवार, प्रभू दत्त ब्रह्मचारी. १९५२च्या निवडणुकीत नेहरू, कॉंग्रेस जिंकले. परिस्थिती कायद्याला अनुकूल झाली. १० मे १९५४ रोजी कायदामंत्री चारू चंद्र बिस्वास यांनी ते सभागृहात मांडलं. कायदामंत्री विश्वास यांनी म्हटलं की, १९४८ पासून देशभरातून हिंदू कोड बिल मंजूर केलं जाऊ नये यासाठी तारा येत होत्या. १९५२ साली ते त्वरीत पास व्हायला हवं, अशा तारा येऊ लागल्या. संपूर्ण हिंदू कोड बिल तयार होतं, मूळ स्वरुपात नाही, पण त्याचे एकेक भाग हिंदू विवाह कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा, हिंदू दत्तक कायदा असे स्वतंत्र अधिनियम म्हणून पारित करण्यात आलं. दरम्यान, आणखी एक कायदामंत्री आले, हरी विनायक पाटसकर. डॉ.आंबेडकर म्हणत असत, तेच पाटसकर यांनी सांगितलं दोन हजार वर्षांपूर्वी स्मृतीमध्ये जे काही लिहिलंय ते पुरातन कायदे आज अस्तित्वात नाहीत आणि कोणत्याही कारणास्तव ते पुनरुज्जीवित केले जाऊ शकत नाहीत. २००५ मध्ये मनमोहन सिंग सरकारने हिंदू उत्तराधिकार कायद्यात सुधारणा करून वडिलांच्या संपत्तीत मुलींना मुलग्यांच्या बरोबरीने समान वाटा दिला, विधवांना मृत पतीच्या आणि पैत्रुक मालमत्तेचा अधिकार दिला. १९५१ मध्ये बाबासाहेबांनी राजीनामा दिला आणि १९५६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. यानंतर दहा वर्षांनी, १९६६ मध्ये तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर यांनी ‘बंच ऑफ थॉट्स' हे पुस्तक लिहिलं, तेव्हा त्यांनी संविधानाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. भारतीय राज्यघटनेत भारतीयत्वच नसल्याचं, इकडून-तिकडून जोडाजोडी करून ती तयार केल्याचं ते म्हणतात. वाजपेयी मंत्रीमंडळातले कॅबिनेट मंत्री अरुण शौरी यांनी लिहिलेलं पुस्तक 'वर्शिपिंग फॉल्स गॉड आंबेडकर' पुस्तक लिहून झाल्यावर त्यांना मंत्री करण्यात आलं. त्या काळात भाजपसाठी ते महत्वाची व्यक्ती होते.
डॉ.आंबेडकरांच्या राज्यघटनेविषयी आरएसएसचा दृष्टिकोन काय आहे, याबद्दल अनेक अनेक कागदपत्रं उपलब्ध आहेत. गेल्याच वर्षी, १३ एप्रिल २०२४ रोजी भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलेल्या लेखात त्यांनी आंबेडकरांचं योगदान मान्य केलं आहे. मात्र, बिलाला कोणाचा विरोध होता, याबद्दल राम माधव चकार शब्द काढत नाहीत. असो. हिंदू कोड बिलाशी संबंधित अशा अनेक गोष्टी. हिंदू कोड बिलाबाबत नेहरू आणि डॉ आंबेडकर यांचं एकमत होतं, हे पक्कंच. आंबेडकरांची या कायद्याबाबतची तळमळ आतड्यातून आली होती. हिंदू कोड बिलाच्या काळातल्या विरोधवादळात हंसा मेहता, जी दुर्गाबाई, रेणुका रे आणि सुचेता कृपलानी या स्त्री सदस्यांनी बिलाचं ठोस समर्थन केलं. देशभरातल्या महिला संघटनांनीदेखील हिंदू कोड बिलाला भक्कम पाठिंबा दिला. ही लढाई स्त्री-पुरुषांमधली, धर्माच्या आधारावर लढली जात होती. स्त्रियांना अधिकार मिळावेत, म्हणून तयार केलेल्या हिंदू कोड बिलाला कोण विरोध करत होते? स्त्रियांना देवी मानणारे की स्त्रियांना माणूस आणि नागरिक समजणारे, हे लक्षात घ्यायला हवं. डॉ आंबेडकरांचं योगदान जितकं राज्यघटना निर्मितीत आहे, तितकंच हिंदू कोड बिल तयार करण्यातही आहे. त्यांची ही थोरवी परत परत मांडत राहिलं पाहिजे.
अकरा एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती आहे. लगेच तीन दिवसांनी, चौदा एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असणार आहे. दोघांचे २८ नोव्हेंबर आणि ६ डिसेंबर हे स्मृतिदिनही असेच एकामागोमाग येतात. एवढेच नाही, त्यांचे जीवनकाळही एकापाठोपाठ एक आहेत. भाग एक संपून अजिबात उसंत न घेता भाग दोन सुरू व्हावा असा त्यांच्या जीवनपटांचा सलग क्रम होता. १८९० साली फुलेंचा मृत्यू झाला आणि पुढच्याच वर्षी १८९१ ला आंबेडकरांचा जन्म झाला. दोघांचा एकत्रित जीवनकाळ मोजला तर तो १२९ वर्षांचा भरतो. या काळात एका जीर्णमतवादी प्रतिगामी व्यवस्थेविरुद्ध प्रचंड महासंग्राम झाला. त्याचे नेतृत्त्व प्रामुख्याने या दोघांनी केले...! भारतीय समाजात जात-वर्ण-वर्ग-लिंग यावर आधारलेली विषमता होती. ही विषमता आपोआप आलेली नव्हती. ती मुख्यतः आणि हेतूतः म्हणजे कुटिलतः वैदिक संस्कृतीने रुजविलेली होती. ती समाजमनात खूप आतपर्यंत भिनलेली होती. ही विषमता आणि तिला जोपासणारी वैदिक संस्कृती उखडून टाकण्याची आणि समतावादी सत्यशोधक संस्कृती अस्तित्वात आणण्याची जबरदस्त प्रक्रिया फुलेंच्या जन्माने सुरू झाली. या प्रक्रियेचा पहिला भाग पूर्वार्ध १८९० ला त्यांच्या मृत्यूने संपला. १८९१ ला आंबेडकरांच्या जन्माने या प्रक्रियेचा दुसरा भाग उत्तरार्ध सुरू झाला. फुलेंची लढाई आंबेडकरांनी हातात घेतली आणि आयुष्यभर संघर्ष करत १९५६ साली बुद्धिझमच्या माध्यमातून वैदिक संस्कृतीला एकमय संस्कृतीचा स्ट्राँग पर्याय देऊन त्या लढाईचा भूमिकेच्या/मांडणीच्या दृष्टीने शेवट केला. फुलेंच्या जन्मापासून आंबेडकरांच्या मृत्युपर्यंतचा म्हणजे १८२७ ते १९५६ असा १२९ वर्षांचा हा प्रवास म्हणजे सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील वैदिकविरोधी लढ्याचा जिगरबाज आविष्कार होता. या लढाईचा प्रारंभ विषमतावादी संस्कृतीने बंद केलेली शिक्षणाची दारे उघडी करण्यापासून झाला आणि या लढाईचा क्लायमॅक्स बुद्धिझम नावाच्या समतावादी संस्कृतीची दारे खुली करण्याने झाला.
भारताच्या सामाजिक इतिहासात फुले आणि आंबेडकर ही अशी दोन माणसं होऊन गेली आहेत ज्यांच्या आयुष्यात कमालीचे साम्य होते. या दोन स्वतंत्र व्यक्ती होत्या पण त्यांचे विचार, कार्य आणि लक्ष्य आश्चर्य वाटावे इतके एकसारखे होते. दोघांनी पुकारलेल्या समाजपरिवर्तनाच्या लढाईचा आशय समान होता. भारतीय समाजव्यवस्थेविषयी त्यांनी केलेला सखोल विचार, त्या विचारांच्या आधारे केलेले उत्तुंग कार्य, ते फलद्रूप होण्यासाठी प्रयत्नांची केलेली पराकाष्ठा, त्यासाठी बाळगलेला प्रचंड ध्यास, सर्वसामान्य लोकांबद्दलचा तीव्र जिव्हाळा, त्यांच्यावरचा अन्याय दूर करून त्यांना सर्वंकष न्याय देण्याची विलक्षण पोटतिडीक, त्यातून उमललेला कृतिशील/सर्वव्यापी करुणाभाव, सगळे सगळे एकसारखे होते. त्यात काहीही फरक नव्हता.
दोघांचे कार्य इतके महत्त्वाचे आणि इतके मिळतेजुळते होते की त्यांच्याबद्दल विचार करणारे संवेदनशील लोक त्यांच्या एकत्रित प्रेमात पडतात. एखादा माणूस फुलेंच्या प्रेमात पडला तर तो हमखास आंबेडकरांच्या प्रेमात पडतो आणि आंबेडकरांच्या प्रेमात पडलेला माणूस न चुकता फुलेंच्या प्रेमात पडतो. फुले आवडतात पण आंबेडकर आवडत नाहीत किंवा आंबेडकर आवडतात पण फुले आवडत नाहीत असे सहसा होत नाही. माणूस फुले-आंबेडकरांच्या प्रेमात पडला की मग तो त्या दोघांच्या विचारांना फॉलो करू लागतो. रोज उठून त्यांचे नाव घेऊ लागतो. स्वतःला फुले-आंबेडकरवादी म्हणवून घेण्यात त्याला अभिमान वाटू लागतो.
फुले-आंबेडकरवादी असणे आणि फुले-आंबेडकर फॉलो करणे यात फरक नाही. जो फुले-आंबेडकर फॉलो करतो तो फुले-आंबेडकरवादी असतो आणि जो फुले-आंबेडकरवादी असतो त्याला फुले-आंबेडकर फॉलो करणे भागच असते. अर्थात एका गोष्टीची स्पष्टता असणे आवश्यक आहे ती म्हणजे, फुले-आंबेडकरांचा भरपूर अभ्यास करणे, त्यांच्या जीवनकार्याविषयी गाढा व्यासंग बाळगणे, त्यांच्या जीवनात घडलेल्या घडामोडी तोंडपाठ असणे म्हणजे फुले-आंबेडकरवादी असणे नव्हे! बरेच लोक तसे असण्यालाच फुले-आंबेडकरवादी समजतात आणि त्यांना अवाजवी प्रतिष्ठा देतात. वास्तविक, अशा लोकांना केवळ ‘अभ्यासक’ म्हटले पाहिजे. ज्यांचा गाढा अभ्यास आहे त्यांना ‘गाढा अभ्यासक’ म्हणता येईल. फुले-आंबेडकरवादी म्हणता येणार नाही. माझ्या मते खालील लक्षणे बाळगणारे लोक खर्या अर्थाने फुले-आंबेडकरवादी असतात.
१) फुले-आंबेडकरवादी भूमिकेवर निःसंदिग्ध आणि ठाम निष्ठा असणे, २) फुले-आंबेडकरवादी भूमिका स्वच्छपणे, आग्रहाने आणि सातत्याने मांडणे, ३) फुले- आंबेडकरवादी भूमिकेचे टोक सतत धारदार ठेवणे, ४) फुले-आंबेडकरवादी भूमिकेला बाधक ठरणारा समन्वय टाळणे, ५) स्वतःला सामान्यांपेक्षा वेगळे न समजणे, ६) भूतकाळात न रमता भविष्यकाळ घडविण्यात योगदान देणे, ७) नुसते बौद्धिक कार्य किंवा नुसते कृतिकार्य पुरेसे न मानता दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी काम करत राहणे, ८) आंतरजातीय विवाह करणाऱ्या आणि न करणाऱ्या पती आणि पत्नीने आपापल्या जातीचे विसर्जन करणे, ९) स्वत:ला निधर्मी न मानणे, १०) सार्वजनिक सत्यधर्म किंवा बौद्ध धर्म रीतसर स्वीकारणे, इत्यादी इत्यादी.
वरील निकषांपैकी काही निकष सहज समजतील असे आहेत. त्यामुळे त्यांची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. मात्र काही निकष नीट समजून घेण्याची गरज आहे. अशा काही निकषांची चर्चा इथे संक्षिप्त स्वरूपात करत आहे. ती सविस्तर करावीशी वाटल्यास पुन्हा केव्हातरी करता येईल.
फुले-आंबेडकरवादी भूमिका म्हणजे समग्र आणि मूलगामी समाजपरिवर्तनाची भूमिका. स्वाभाविकच, एकांगी/वरवरचा विचार करणारा माणूस फुले- आंबेडकरवादी ठरत नाही. केवळ लेखन करणारा, चर्चा करणारा माणूस फुले-आंबेडकरवादी ठरत नाही. मी बुद्धिजीवी आहे, मी फक्त वैचारिक मांडणी करीन अशी धारणा मनात बाळगून चळवळीत वावरणारा माणूस फुले-आंबेडकरवादी ठरत नाही. फक्त अभ्यास-संशोधन करणारा, जोरदार भाषणे/व्याख्याने देणारा माणूस फुले-आंबेडकरवादी ठरत नाही. या अनुषंगाने इथे हे सांगितले पाहिजे की, केवळ वाचणे, लिहिणे, बोलणे हा प्रकार ‘ब्राह्मणी’ आहे. फक्त अभ्यास- संशोधन करणे हेही ‘ब्राह्मणी’ आहे. फक्त चर्चा करणे हेही ‘ब्राह्मणी’ आहे. आपण ज्या गोष्टी लिहितो, ज्याची हिरीरीने चर्चा करतो त्या गोष्टी कृतीत आणणे, त्या संदर्भात भूमिका घेणे, त्या भूमिकेच्या दिशेने ठोस पाऊल उचलणे, त्याच्याशी निगडीत छोटीमोठी निर्मिती करणे हे मात्र ‘ब्राह्मणी’ नाही आणि जे जे 'ब्राह्मणी' नाही ते ते करण्याची आवश्यकता आहे. हे सारे जो लक्षात घेतो आणि त्यानुसार वागतो त्याला फुले-आंबेडकरवादी म्हणणे रास्त ठरते. या पार्श्वभूमीवर आणि या निकषांवर पाहिले तर सध्या सगळीकडे ब्राह्मणी कृत्यांचाच बाजार भरला असल्याचे दिसत आहे. लेखन, अभ्यास, संशोधन, चर्चा, चर्चासत्रं या सगळ्याचा नुसता ऊत आला आहे. पुस्तकं, ग्रंथ, नियतकालिकं यांची बेसुमार गर्दी झाली आहे. वाचनालयांमध्ये आणि ग्रंथालयांमध्ये साहित्य ठेवायला जागा नाही. या ग्रंथांमध्ये जे लिहिले आहे ते भूमिकेत आणि कृतीत आणण्याच्या नावाने मात्र सार्वत्रिक बोंब आहे. प्रबोधनाच्या आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेला कृतिशील पूर्णत्त्व प्राप्त करून देणे ही आपली जबाबदारी आहे, हे लोक विसरून गेले आहेत. हा एक प्रकारे ‘ब्राह्मणी’ संस्कृतीचा विजय आहे. हा विजय होऊ द्यायचा नसेल तर भूमिका घेण्याच्या कृतीला प्राधान्य दिले पाहिजे. फुले-आंबेडकरी विचारांची आणि त्या विचारांच्या प्रकाशात आजच्या काळात आपण केलेल्या विचारांची कृतियुक्त भूमिका घेणे म्हणजे फुले-आंबेडकरांना फॉलो करणे होय.
फुले-आंबेडकरवादी म्हणविणार्या व्यक्तीने फुले- आंबेडकरी विचारांवर चालणे अनिवार्य आहे. या अनिवार्यतेची पूर्ती सुरुवातीला किमान तात्त्विक पातळीवर तरी व्हायला हवी. पुढे प्रत्यक्ष आचरणात उन्नीस-बीस होणार हे समजून घेता येते. यासंदर्भात एक उदाहरण देतो. एक मोठा वक्ता, विचारवंत आहे. स्वत:ला फुले-आंबेडकरवादी मानतो. जाहीरपणे तसा उच्चार करतो. तो नेहमी महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्माचे महत्त्व मांडतो. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला या घटनेचे स्वागत करतो. परंतु स्वत: मात्र सार्वजनिक सत्यधर्म अथवा बौद्ध धम्म स्वीकारत नाही. त्याबद्दल अवाक्षर काढत नाही. हे फक्त व्याख्यानांमध्ये बोलायचं असतं किंवा हे इतरांनी करायचं असतं, असा त्याचा समज असावा. शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा, या धर्तीवर! या माणसाला फुले-आंबेडकरवादी किंवा फुले- आंबेडकरांचा फॉलोअर म्हणण्याचे धाडस मी तरी करणार नाही.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या पती आणि पत्नीने आपण आंतरजातीय विवाह केलाय यावरच समाधान न मानता आपापल्या जातीचे विसर्जन केले पाहिजे. त्यासाठी जातीचे विसर्जन करणे म्हणजे नक्की काय करणे याचा शोध घेतला पाहिजे. मी जात सोडली आहे, मी डी-कास्ट झालो आहे, अशी नुसती घोषणा करून चालत नाही. तुमच्या 'डी-कास्ट'तेची अधिकृतता कशी ठरवायची ? म्हणून रीतसर आणि विधिपूर्वक जात सोडण्याची कृती करण्याची आवश्यकता असते. जो ही कृती करतो त्याला फुले-आंबेडकरवादी म्हणता येईल. जो नुसताच 'मी डी-कास्ट झालो आहे...' असं सांगत फिरतो तो स्वतःसह सगळ्यांना फसवत असतो. जात सोडणे म्हणजे नको असलेलं मांजर दूर जंगलात नेऊन सोडण्यासारखं आहे. मांजर जसे संध्याकाळी घरी परत येते तशी जातही परत येते. मांजर परत आलेले दिसते, जात परत आलेली दिसत नाही. पण ती आलेली असते आणि passive अवस्थेत दबा धरून बसलेली असते. बँकेचे अकाऊंट बरेच दिवस ऑपरेट केले नाही तर ज्याप्रमाणे डिॲक्टिव करून ठेवण्यात येते तसे जातीचे आहे. माणसाचे आयुष्य इतके व्यामिश्र आहे की त्याच्याही नकळत कोणत्या ना कोणत्या कारणाने जातीचे KYC केले जाते आणि अकाऊंट पुन्हा चालू होते. त्यामुळे अकाऊंट कायमचे बंद कसे करता येईल याचा विचार करावा लागतो. पण हे लक्षात न घेता आंतरजातीय विवाह केला की आपण जातीअंताचे सत्कार स्वीकारायला पात्र ठरलो असा गैरसमज अनेकजण करून घेत आहेत. दोघांनीही आपापल्या जाती अधिकृतरीत्या सोडल्या आहेत का, असा प्रश्न विचारला तर त्यांना त्याचे उत्तर देता येत नाही. आंतरजातीय विवाह केला की लगेच जातीअंत झाला असं होत नाही. आपोआप जातीअंत होत नसतो. प्यार किया नहीं जाता हो जाता है, हे खरे आहे. पण जातीअंत हो नहीं जाता किया जाता है, किंबहुना करना पडता है ! तो कसा करायचा हे फुले- आंबेडकर सांगतात. त्यानुसार जो कृती करतो तो फुले- आंबेडकरांना फॉलो करत आहे, असे अनुमान काढता येते.
मानवी जीवनाचे कोणतेही अंग फुले-आंबेडकरांच्या नजरेतून सुटले नाही. शिक्षण, शेती, संस्कृती अशा विविध क्षेत्रात त्यांनी परिवर्तनकारी हस्तक्षेप केला. धर्मातसुद्धा केला. त्यांनी धर्माचा चिकित्सक विचार केला. पण तो करताना ‘धर्म’ नाकारला नाही. स्वत:ला निधर्मी मानले नाही. त्यांनी धर्माचा रकाना रिकामा ठेवला नाही. धर्माचा रकाना रिकामा ठेवण्यात त्यांना स्वारस्यही वाटले नाही आणि थ्रीलही वाटले नाही. ‘मी सगळे धर्म नाकारतो...,’ असे ते म्हणाले नाहीत. कारण तसे म्हणण्यात काहीही क्रांतिकारी नाही याची त्यांना जाणीव झालेली होती. थोडक्यात, निधर्मी न होणे, धर्माचा रकाना रिकामा न ठेवणे हा फुले-आंबेडकरवाद आहे. फुले-आंबेडकरी चळवळीशी समविचारी असलेल्या, पण त्या चळवळीचा मनातून दुस्वास बाळगणार्या काही पुरोगामी चळवळी आपल्या आजूबाजूला अस्तित्त्वात आहेत आणि त्यांच्याकडून कायम ‘धार्मिक- सांस्कृतिक बाबतीत तटस्थ व्हायला हवे’ असे सूक्ष्म धडे दिले जातात. फुले-आंबेडकरांनी धर्म मान्य करून चूक केली, असे ठसविण्याचा बेमालूमपणे प्रयत्न केला जातो. निधर्मी बनण्याचे समर्थन केले जाते. परंतु निधर्मी होणे याचा अर्थ वैदिक पुरोगाम्यांच्या चालीला बळी पडणे असा होतो! अर्थात, हे सहजासहजी लक्षात येत नाही. इतिहासक्रमात ‘धर्म’ या वस्तुमुळे बहुसंख्य समाजाला खूप त्रास झाला आहे हे ऐकून-वाचून माहीत झालेले असल्यामुळे निधर्मी बनणे आवश्यक आहे हे साध्यासरळ प्रागतिक माणसाला लगेच पटते. त्यात थ्रीलही वाटायला लागते. या प्रक्रियेत बहुजन समाजातला प्रामाणिक माणूस निधर्मी होऊ लागतो आणि उच्चवर्णीय पुरोगामी मात्र मागच्या दाराने आपल्या मूळ वैदिक संस्कृतीशी संधान साधून राहतो. याचा परिणाम एकच होतो आणि तो म्हणजे, वैदिक संस्कृतीला तिचे वर्चस्व विस्तारायला मोकळे रान मिळते. त्यामुळे निधर्मीकरणाच्या डावपेचात्मक आवाहनाला भुलता कामा नये. बहुजनांनी निधर्मी होणे म्हणजे त्यांनी आपली न्याय्य बाजू विसरून वा त्यागून विनाकारण तटस्थ होणे. निधर्मी होणे म्हणजे आपणच आपला देदीप्यमान सांस्कृतिक वारसा झुगारून देणे. निधर्मी होणे म्हणजे आपले सांस्कृतिक विश्व आपण स्वत:च रिकामे करणे. निधर्मी होणे म्हणजे आपणच आपल्या हाताने आपल्या आयुुष्यात धार्मिक पोकळी तयार करून त्या पोकळीत काहीही घुसू देण्याची, अतिक्रमणाला वाव देण्याची व्यवस्था करून ठेवणे. वैदिकांना हेच तर हवे आहे. 'स्वत्त्व' विसरून बहुजन समाज सांस्कृतिकदृष्ट्या जेवढा शून्यस्वरूप करता येईल, तेवढे त्यांना हवेच आहे. पोकळी तयार झाली की त्याचा ताबा घेऊन त्यात वैदिक संस्कृतीची प्रतिष्ठापना करणे सोपे जावे यासाठी ते निधर्मी होण्याची हुलकावणी देत असतात. यालाच ‘कात्रजचा घाट दाखविणे’ म्हणतात! हे सारे चाणाक्षपणे जो लक्षात घेतो तो फुले-आंबेडकरवादी असतो.
सांस्कृतिक परिवर्तन आवश्यक आहे हे ज्यांना पटले आहे त्या प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे सांस्कृतिक राजकारण केले पाहिजे हे फुले-आंबेडकरी भूमिकेत अंतर्निहीत आहे. आज फुले-आंबेडकरी चर्चाविश्वात सांस्कृतिक राजकारणाच्या गप्पा मारल्या जातात. पण मुळात सांस्कृतिक राजकारण म्हणजे काय हे नीट माहीत असणार्यांची संख्या खूप कमी आहे. फुले-आंबेडकरी भूमिकेत वैदिकांची सर्वंकष सांंस्कृतिक सत्ता नष्ट करण्याचा डिस्कोर्स सामावलेला आहे. या डिस्कोर्सचा मूल्यप्रणालीरूपी पाया अत्यंत मजबूत आहे आणि त्याचे नाव ‘फुले’ आहे. या डिस्कोर्सचा निष्कर्षरूपी कळस अत्यंत दिशादर्शक आहे आणि त्याचे नाव ‘आंबेडकर’ आहे. महात्मा फुले यांनी वैदिक प्रभुत्त्व नाकारण्याच्या सांस्कृतिक राजकारणाची सुरुवात केली आणि आंबेडकरांनी ते एका धारदार बिंदूवर आणून ठेवले. ही धार ‘हिंदू आयडेंटिटीचा त्याग करून बुद्धिझम स्वीकारणे’ ही आहे.
ही धार आपल्या विचारांना आणि कार्याला लावून जो परिवर्तनाच्या चळवळीत उतरतो तोच माझ्या मते सच्च्या फुले- आंबेडकरवादी असतो. तोच फुले-आंबेडकरांचा खरा वारसदार आणि फॉलोअर ठरतो. फुले-आंबेडकरांना अपेक्षित असलेली भूमिका घ्या म्हटले की तोंड लपविणाऱ्या, मात्र जयंतीच्या आणि स्मृतिदिनाच्या 'सालाबादी' कार्यक्रमात यथेच्छ ‘बोलबच्चन’ करणाऱ्या मंडळींना फुले-आंबेडकरवादी मानण्याची चूक करता कामा नये. 'लाँग टर्म'चा विचार करता ही चूक महागात पडू शकते.
No comments:
Post a Comment