"तुम्हाला नरहर कुरुंदकर माहीत आहेत? जरा ‘हटके’ बोलणारा- वागणारा माणूस अशी त्यांची ख्याती होती. तर्कशुद्ध विचार करणारे आणि ते विचार ठोसपणे मांडणारे लेखक, समीक्षक, वक्ते गेल्या शतकातल्या महाराष्ट्रात फार थोडे झालेत; त्यातलंच एक नाव- नरहर कुरुंदकर...! वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी ते गेले. त्या माणसाचं जीवन आणि लेखन हा ‘इंटरेस्टिंग’ पण वेगळा विषय आहे!"
----------------------------------------------
या कुरुंदकरांचं ‘यात्रा’ नावाचं एक पुस्तक आहे. खरं तर त्या पुस्तकाचं नाव त्यांना ‘विचारयात्रा’ असं ठेवायचं होतं; पण ते जरा जास्तच भारदस्त आणि आगाऊपणाचं वाटेल म्हणून त्यांनी त्यातलं ‘विचार’ काढलं आणि फक्त ‘यात्रा’ ठेवलं. त्या पुस्तकातल्या एका लेखाचं शीर्षक आहे ‘मी आस्तिक का नाही...?’ इथंही गंमत बघा. ‘मी नास्तिक का आहे...?’ असं शीर्षक दिलेलं नाही. त्या लेखातल्या एका वाक्यानं मी गोंधळात पडलो होतो... ‘शेकडा ९८ धार्मिक आणि सश्रद्ध माणसं अप्रामाणिक आहेत, असं म्हणावं लागतं...!’ हे वाक्य वाचल्यावर मनात आलं, टक्केवारीच्या हिशोबात ढोबळ मानानं भाष्य करायचं असतं तेव्हा आपण ९० टक्के, ९५ टक्के, ९९ टक्के असं बोलत असतो. मग इथं कुरुंदकरांनी ‘शेकडा ९८’ असा शब्दप्रयोग का केला? हा प्रश्न मनात आला, म्हणून लेख पुन्हा वाचला, पण समजलं नाही. नंतरच्या काळात कुरुंदकरांचं लेखन वाचत गेलो आणि अगदी अचानक त्या विधानाचा नेमका अर्थबोध झाला. त्यांना म्हणायचं होतं- ‘नास्तिक माणसं संख्येनं अत्यल्प, म्हणजे एक टक्का आहेत; तसंच आस्तिक माणसंही अत्यल्प, म्हणजे एक टक्काच आहेत. उरलेले ९८ टक्के लोक आस्तिक-नास्तिकच्या सीमारेषेवर आहेत....!’
मित्रांनो, कुरुंदकरांचं हे विश्लेषण बरोबर नाही का? नास्तिक माणसं एक टक्का आहेत, हे आपण गृहीत धरून चालतो. पण आस्तिक माणसंही एक टक्काच? होय! बघा ना, आपल्या सभोवताली. परमेश्वरविषयक संकल्पना स्पष्ट असलेली, त्याच्या अस्तित्वाबद्दल मनात जराही शंका नसलेली माणसं फार म्हणजे फारच कमी आहेत. ठाम भूमिका घेऊन ईश्वराचं अस्तित्व नाकारणारे प्रामाणिक ‘नास्तिक’ जितके दुर्मिळ, तितकेच दुर्मिळ आहेत. आपला अभ्यास आणि अनुभव प्रामाणिकपणे मांडणारे ‘आस्तिक...!' तुम्ही विचाराल, ‘उरलेल्या ९८ टक्क्यांचं काय?’ या ९८ टक्के लोकांचा ‘परमेश्वर’ संकल्पनेवर अभ्यास नसतो, चिंतन नसतं. त्यांना कसली ‘अनुभूती’ही नसते. केवळ संस्कारांच्या बळावर ते ‘ईश्वर आहे’ असं म्हणत असतात. पूर्वजांकडून आलेल्या प्रथा-परंपरा ‘शुद्ध-अशुद्ध’ स्वरूपात, जशा असतील तशा पुढे घेऊन जाण्याचं काम करीत असतात. तरीही त्यांना आपण ‘आस्तिक’ समजत असतो. कुरुंदकर तर म्हणतात, ‘‘परमेश्वराबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, ह्या साध्या प्रश्नालाही प्रामाणिकपणानं उत्तर देण्यासाठी त्यांची ‘ईश्वरावरची श्रद्धा’ उपयोगी पडत नाही...’’ तर हा वर्ग आहे तब्बल ९८ टक्के!
माझ्या प्रॅक्टिकल मित्रांनो, हा १+९८+१ टक्क्यांचा सिद्धांत थोडंसं ताणूस ‘थर्ड अँगल’मधून बघितलं तर लक्षात येतं की, जगात ‘चांगली’ माणसं थोडी म्हणजे एक टक्का आहेत, तशीच ‘वाईट’ माणसंही थोडीच एक टक्काच आहेत. ‘त्यागी’ माणसं फार कमी एक टक्का आहेत, पण ‘भोगी’ माणसंही फारच कमी एक टक्काच आहेत. ‘पुरोगामी’ अत्यल्प आहेत, तसेच प्रतिगामी’ही अत्यल्प आहेत. सारांश, ‘सत्’ आणि ‘असत्’ अशा दोन प्रवृत्ती मानल्या तर या दोनही प्रवृत्तीचे लोक प्रत्येकी एक टक्का आहेत, उर्वरित ९८ टक्क्यांनी ‘सत्-असत्’च्या सीमारेषेवर गर्दी केलेली आहे. या ९८ टक्क्यांचं अनेक गटांत वर्गीकरण करता येईल, पण तूर्त ते बाजूला ठेवू. यांचं काही ‘कॉमन’ गुणविशेष सांगता येतील. हा वर्ग फार सुसंगत विचार करीत नाही. प्रवाहाबरोबर चालत रहायचं, काही अडचणी आल्या तर मोकळी वाट असेल त्या दिशेनं निघायचं, असं त्यांचं धोरण असतं. विचार, मूल्ये, तत्त्वं यांचं ओझं वाहायची त्यांची तयारी नसते. यांच्यातच ‘जिओ और जिने दो...’ असं ‘ब्रीद’ असणारा सर्वांत मोठा आणि प्रतिष्ठित गट असतो. हा ९८ टक्के वर्ग अधूनमधून ‘सत्’ प्रवृत्तांचं गुणगान गातो, पण त्यांचं मोठेपण नेमकं कशात आहे, हे त्याला कळलेलं नसतं. हा वर्ग ‘असत्’ प्रवृत्तांना अधूनमधून शिव्या देतो; पण त्यांचा धोका त्याच्या ध्यानात आलेला नसतो. हा वर्ग ‘सत्’ आणि ‘असत्’ या दोन्ही अल्पसंख्यांकांपासून थोडा दूर राहतो, पण गरज पडली तर या दोन्हींचा उपयोग करून घेतो. या दोन्हींचंही आकर्षण त्याला अधूनमधून वाटत असतं, पण त्यांच्यात सामील होऊन त्याचे परिणाम भोगण्याची, त्यासाठी किंमत मोजण्याची यांची तयारी नसते. म्हणून ‘सत्-असत्’च्या सीमारेषेवर गर्दी करून अतिशय दाटीवाटीने हे ९८ टक्केवाले राहतात. सीमारेषेवर राहिल्याने यांचं कधी-कधी ‘सँडवीच’ होतं, तर कधीकधी ‘लंबक’ होतो.
‘सत्’ एक टक्का आणि ‘असत्’ एक टक्का हे परस्परांचे शत्रू असतात. ‘असत्’ वर्गात ‘तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणारे’ आणि ‘टाळूवरचं लोणी खायलाही तयार असणारे’ असे दोन मुख्य गट असतात. पण छोटं संकट आलं तरी ते त्वरीत एकत्र येतात. ‘सत्’ वर्गातही दोन मुख्य गट असतात. त्यांना प्रमाणभाषेत ‘सुधारक’ आणि ‘क्रांतिकारक’ असं म्हणता येईल. मोठ्यात-मोठं संकट आलं तरी ते एकत्र येऊन लढण्याचा विचार करीत नाहीत. त्यामुळं सत् आणि असत् यांच्यात सरळ लढत झाली तर ‘सत्’वाल्यांचा पराभव निश्चित असतो. गंमत म्हणजे सत् आणि असत् यांचा संघर्ष सतत चालू असतो, पण यांची हार-जीत ९८ टक्क्यांच्या क्रिया-प्रतिक्रियांवर अवलंबून असते. या ९८ टक्क्यांना सक्रिय करण्यात ‘सत्’ प्रवृत्तांचं यश सामावलेलं असतं, तर ९८ टक्के निष्क्रिय राहिले तरी ‘असत्’ प्रवृत्तांची ताकद वाढते. म्हणून सत्-प्रवृत्त लोक विचारांना, भावनांना आवाहन करून किंवा त्यागी जीवनाची उदाहरणं पेश करून ९८ टक्क्यांना सक्रिय करण्याचा, आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतात. असत् प्रवृत्तीचे लोक दहशत पसरवून, फोडाफोडी करून, बुद्धिभेद करून किंवा लालूच दाखवून या ९८ टक्क्यांना निष्क्रिय ठेवण्यासाठी आटापिटा करतात. ‘सत्’ वर्गातला अतिशय छोटा गट ज्याला क्रांतिकारक म्हटलं जातं तो अधिक संवेदनशील असतो. ‘असत्’ वर्गाला शक्य तितक्या लवकर संपविण्यासाठी, सर्वस्व पणाला लावून लढायला ही संवेदनशील माणसं तयार असतात. म्हणून ती हाती असतील त्या तुटपुंज्या साधनांनिशी, शक्य असेल त्या मार्गानं ‘असत्’ वर्गाशी डायरेक्ट पंगा घेतात, त्यांना जेरीस आणतात; पण तुलनेनं ताकद फारच कमी असल्यानं लढतानाच संपून जातात. या ‘सत्’ वर्गातलाच मोठा गट सुधारक यांना मदत करीत नाही, करू शकत नाही. कारण निश्चित उद्दिष्ट ठेवून मार्गक्रमण करणं त्यांना श्रेयस्कर वाटतं. ‘साध्य’ एकच असलं तरी साधनं, दिशा आणि प्राधान्यक्रम या मुद्यांवर या दोन्ही गटांतच टोकाचे मतभेद असतात. ‘सत्’ वर्गातले हे दोन्ही गट आपापल्या पद्धतीनं ९८ टक्क्यांना चेतविण्याचा प्रयत्न करतात. पण ह्या ९८ टक्के वर्गाची सहनशीलता फारच भयानक असते. ‘अती’ झाल्याशिवाय ते ‘सत्’वाल्यांच्या हाकेला ‘ओऽ’ देत नाहीत. सर्वांत विशेष हे आहे की, या ९८ टक्क्यांच्या हितासाठी ‘सत्’ वर्ग ‘असत्’शी लढत राहतो, पण ‘असत्’शी लढण्यापूर्वी त्यांना ९८ टक्क्यांशीच लढावं लागतं!
मित्रांनो, तुम्ही ‘प्रॅक्टिकल क्लब’ स्थापन केलाय स्वत:साठी आणि समाजासाठी. म्हणजे आपण ‘सत्’ गटातील आहात असं गृहीत धरतो. त्यामुळे आपल्यासमोर तीन आव्हानं आहेत. परस्परांत ‘समन्वय’ साधण्याचं, ९८ टक्क्यांना ‘जागं’ करण्याचं आणि मग असत् वर्गाशी ‘टक्कर’ देण्याचं. पण आपण प्राधान्यानं विचार केला पाहिजे, या ‘९८ टक्क्यांशी कसं लढायचं...?’ विचार आपल्यालाच करायचाय. पण जाता-जाता राजेंद्र यादव काय म्हणतात ते सांगतो. तुम्हाला प्रेमचंद संस्थापक असलेलं ‘हिंदी’तलं ‘हंसं’ मासिक माहीत आहे..? या ‘हंस’चे सध्याचे ‘संपादक’ आहेत राजेंद्र यादव. तरुणाईच्या समस्या हाताळणारा त्यांच्याच कथेवर आधारित ‘सारा आकाश’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी विशेष गाजला होता. तर हे राजेंद्र यादव ‘हंस’मध्ये ‘मेरी तेरी उसकी बात...’ हा ‘संपादकीय स्तंभ’ लिहितात. नोव्हेंबरच्या अंकातील ‘मेरी तेरी उसकी बात’चा मथळा होता, ‘दिवारों पे सजे हथियार’. त्याचा सारांश असा होता, ‘‘विचारप्रणाल्या, सिद्धांत, इझम्स् यांनी त्या-त्या काळात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलीय; पण ती हत्यारं आता जुनी झाली असल्यानं आजच्या काळात वापरता येणार नाहीत. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमांची ‘स्मृती’ म्हणून आणि नवीन लढाया लढण्यासाठी ‘स्फूर्ती’ मिळावी म्हणून घरातल्या भिंतीवर त्यांनी वापरलेली हत्यारं आपण अभिमानाने लावतो. तसंच विचारधारा आणि सिद्धांत यांचा अभिमान जरूर बाळगा; पण नव्या युगासाठी नवी हत्यारं बनवा!’’
नरहर कुरुंदकर म्हटलं की, त्यांनी लिहिलेली साहित्य संपदा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. जागर, रूपवेध, मनुस्मृती, शिवरात्र, अभयारण्य, वाटा तुझ्या माझ्या ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. आणीबाणी नंतरच्या महाराष्ट्रात ज्या साहित्यिक, विचारवंतांनी महाराष्ट्राचं वैचारिक नेतृत्व केलं त्यामध्ये कुरुंदकरांचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्यांनी लिहिलेले उतारे, निबंध, लेख हे सोशल मीडियावर सातत्याने दिसतात. १५ जुलै १०३२ साली कुरुंदकरांचा जन्म परभणी जिल्ह्यातल्या नांदापूर आता हिंगोली जिल्हा इथं झाला. प्राथमिक शिक्षण वसमतला झाल्यानंतर ते त्यांच्या मामाच्या घरी हैदराबादला गेले आणि तिथं त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. किशोरवयीन अवस्थेतच ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात उतरले होते. या लढ्याच्या निमित्ताने त्यांना अनेक मोठ्या लोकांना जवळून पाहता आलं. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही हैदराबाद संस्थान निजामाच्या ताब्यात होतं. त्यांच्यावर साम्यवादी विचारांचा प्रभाव होता. त्यांना १९४८ ला त्यांनी अटक देखील झाली होती. सुटकेनंतर पुन्हा ते चळवळीत उतरले. गोविंदभाई श्रॉफ यांच्यासोबतही त्यांनी काम केलं होतं. एक धडपडा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख त्या काळात बनली होती. या काळात केलेल्या कार्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात देखील झाला. कुरुंदकरांचे मामा नांदापूरकर हे प्राध्यापक होते. आपल्या भाचाच्या जिज्ञासू वृत्तीची त्यांना जाण होती. त्यामुळे कुरुंदकर अगदी १०-१२ वर्षांचे असले तरी त्यांचे मामा त्यांच्याशी इतिहास, पुराणं, तत्त्वज्ञान, साहित्य याची चर्चा करत. साधारणतः अकराव्या वर्षापासून कुरुंदकरांनी लिखाणाला सुरुवात केली. ११ व्या वर्षी त्यांनी कविता केली आणि एका नियतकालिकाला पाठवली. त्यांना वाटलं पुढच्या अंकात ती छापून येईल. पण आली नाही. तेव्हापासून ते नियमित लिहून नियतकालिकांना आपले लेख साहित्य पाठवू लागले. त्यांचा पहिला लेख त्यांच्याच मामांनी छापला.
पहिला लेख छापून येण्यासाठी त्यांना १०-११ वर्षं लागली. त्यानंतर त्यांना मागे वळून पाहावं लागलं नाही. पण ते महाराष्ट्रातील साहित्य वर्तुळात चर्चेचा विषय तेव्हा बनले जेव्हा १९५६ ला बा. सी. मर्ढेकर यांच्यावर लिहिलेल्या समीक्षणाची लेखमाला 'सत्यकथा' या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. त्यांनंतर मुंबईच्या मराठी साहित्य संघाने त्यांना सौंदर्यशास्त्रावर व्याख्यानासाठी बोलवलं होतं. गमतीचा भाग म्हणजे कुरुंदकर तेव्हा इंटर आताचं बारावी पास नव्हते तेव्हा त्यांची पुस्तकं बीएला अभ्यासक्रमाला होती. ते मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते, ते बीए पास नव्हते त्याआधी ते मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर होते, एम. ए. पास झाले नव्हते त्याआधी त्यांचा रिचर्ड्सची कलामीमांसा हा संशोधनावर आधारित असलेला ग्रंथ आला होता. त्यावेळी ते नांदेडच्या प्रतिभा निकेतन शाळेत प्राथमिक शिक्षक होते. प्राचार्य राम शेवाळकरांनी काही काळ नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. त्यांचा इंटरव्ह्यू कुरुंदकरांनी घेतला होता. जेव्हा शेवाळकरांना कळलं की, आपला इंटरव्ह्यू एक शालेय शिक्षक घेणार आहे तेव्हा ते नाराज झाले. त्यांनी कॉलेजचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ यांच्याकडे तक्रार केली. त्यावर रामानंद तीर्थ म्हणाले, यात कमीपणा काय यात तुमचा सन्मानच आहे. इंटरव्यू सुरू झाला, कुरुंदकरांनी शेवाळकरांचा इंटरव्यू घेतला. हा इंटरव्यू सुमारे दोन तास चालला. इंटरव्यूनंतर कुरंदकरांनी त्यांची निवड केली आणि पुढे त्यांची चांगली मैत्री देखील झाली.
जेव्हा शेवाळकर वणीला विदर्भातलं प्राचार्य म्हणून जाऊ लागले तेव्हा कुरुंदकर आणि इतर विद्यार्थी रेल्वे स्टेशनवर निरोप द्यायला गेले. वय जास्त असूनही शेवाळकर कुरुंदकरांच्या पाया पडले त्यावर कुरुंदकर म्हणाले, "मला जास्त भावनाप्रधान होता येत नाही." गावं बदलली तरी त्यांची मैत्री कायम राहिली. एम. ए. पूर्ण केल्यानंतर १९६३ मध्ये ते पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रूजू झाले. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांचा विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी आजारी पडली तर तिच्या उशाशी बसून त्यांची ते काळजी घेत असत. त्यातूनच ते ठिकठिकाणी व्याख्यान देऊन लोकांना वेगवेगळे विषय समजावून सांगू लागले. कुरुंदकर राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते होते. या माध्यमातून त्यांनी जागोजागी तरुणांना प्रेरणा देण्याचं काम केलं. ते स्वतः देखील एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणेच वागत असत. सेवादल आणि इतर सामाजिक कार्याच्या निमित्तानेच त्यांची आणि हमीद दलवाईंची मैत्री घट्ट झाली.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ते काम करत. साहित्यिक किंवा राजकीय चळवळीसाठी ते प्रोत्साहन देत. विचारधारा कोणतीही असली तरी त्यासाठी अभ्यासाची बैठक पक्की करून चळवळीत उतरा असं ते विद्यार्थ्यांना सांगत. त्यांच्या परिसंवादावेळी ते शांतपणे त्यांचे मुद्दे ऐकून घेत आणि नंतर त्यावर आपलं मत मांडत. त्यांना सूचना देत असत. आणीबाणीच्या काळात त्यांनी इसापनीती हा विषय घेऊन व्याख्यानं दिली आणि लोकांना लोकशाहीचं महत्त्व या गोष्टींच्या आधारे पटवून देऊ लागले. ते आणीबाणीविरोधी होते पण त्यांना अटक झाली नव्हती. २ ऑक्टोबर १९७५ ला त्यांनी गांधींजींवर एक व्याख्यान दिलं होतं. त्यावेळी त्यांना पोलिसांनी आधी सांगितलं होतं की, ही सभा बेकायदा आहे जर तुम्ही बोललात तर तुम्हाला अटक होऊ शकते. हे समजूनदेखील त्यांनी सभा घेतली. त्यांना अटक झाली नाही. ज्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकारणा सोबत संबंध आहे त्यांनाच अटक झाली होती, दुर्गाबाई भागवत सोडल्या तर शासनाने कुणा साहित्यिकाला अटक केली नव्हती. त्याही काळात कुरुंदकरांनी अभ्यास शिबिरे चालवली होती. 'अपक्ष व्यासपीठ' या नावाने ते कार्यक्रम आयोजित करत असत. यामध्ये शासनाच्या वीस कलमी कार्यक्रमाचा उपहास ते करत असत.
१९७७ मध्ये ते पीपल्स कॉलेजचे प्राचार्य झाले. पुढे त्यांना राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाला. ते त्यांच्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना १० फेब्रुवारी १९८२ ला त्यांना स्टेजवरच हार्ट-अॅटॅक आला. ऐन पन्नाशीत कुरुंदकर गेले याचा धक्का मराठवाड्यालाच नाही तर पूर्ण राज्याला बसला. नांदेड इथं त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी शेकडो लोक जमा झाले. याबाबत अनंत भालेराव यांनी, मृत्यू पण मृत्यूलाच रडवणारा या अग्रलेखात असं लिहिलं आहे, "कुरुंदकरांचे प्राणोत्क्रमण झाले, त्या क्षणापासून त्यांचे पार्थिव गोदावरीच्या काठावर अग्नीच्या स्वाधीन होईपर्यंत अक्षरशः शेकडो अबालवृद्ध स्त्री पुरुषांना ढसाढसा रडताना, हंबरडे फोडताना, मूर्च्छित होताना, एकमेकांच्या अंगावर कोसळताना बघितले आणि काळजाने ठावच सोडला. कुरुंदकरांचा मृत्यू आकस्मिक होता, करूण होता, दुःखद होता वगैरे शब्दांच्या संहती वर्णनाला अपुऱ्या आहेत. ही घटनाच इतकी करूण आणि वेदनेने चिंब झालेली होती, की कुरुंदकरांचे जीवन हिरावून नेणाऱ्या मृत्यूलाही या विलक्षण मृत्यूने नक्कीच रडवले असणार." नरहर कुरुंदकरांच्या निधनाला ४० वर्षं झाली आहेत. आज त्यांच्या विचारांची चर्चा होताना दिसते. त्यांचं साहित्य हे आता इंग्रजीत अनुवादित होऊन येत आहे. त्यामुळे कुरुंदकरांचे विचार प्रासंगिक आहेत हे विधान अतिशयोक्ती ठरत नाही. कुरुंदकरांच्या विचारांबरोबरच त्यांची विचारपद्धती देखील कालसुसंगत आहे.
नरहर कुरुंदकरांच्या अभ्यासाची आणि विश्लेषणाची पद्धत ही आंतरविद्याशाखीय होती. ते स्वतःला मार्क्सवादी म्हणत पण वेळप्रसंगी कार्ल मार्क्स आणि मार्क्सवादाचीही चिकित्सा ते करत. ते म्हणत "कार्ल मार्क्सने जी पद्धत दाखवली आहे तिचा मी स्वीकार केला आहे, पण तो जे बोलला ते सर्वच मी स्वीकारलेलं नाही. त्याचा शब्द मी प्रमाण मानणार नाही. ज्यांना ते काम करायचं आहे त्यांनी ते जरूर करावं." तर्कसंगत विचार आणि प्रमाणबद्ध मांडणीच्या जोरावर ते आपला विषय पटवून देत. संगीत, साहित्य, कला, धर्म, इतिहास आणि तत्त्वज्ञान यांचा परस्पर संबंध समजून घेऊन त्यावर ते भाष्य करत. तत्कालीन प्रश्नांची उत्तरंच नाही तर त्या समस्येचं मूळ काय आहे याबद्दल ते थेट बोलत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ ला मनुस्मृतीचं दहन केलं होतं. आजही हा प्रश्न चर्चिला जातो की, डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचं जे दहन केलं होतं ते योग्य होतं की अयोग्य. काही जण अशी भूमिका घेतात की विचारांचा प्रतिवाद हा विचारानेच करावा एखादं पुस्तक जाळल्यामुळे प्रश्न मिटणार नाहीत. कुरुंदकरांना डॉ. आंबेडकरांची भूमिका पूर्णपणे मान्य होती. मनुस्मृतीला जाळून डॉ. आंबेडकरांनी केवळ मनुलाच नाही तर आजच्याही आधुनिक मनुवाद्यांना आव्हानच दिलं आहे असं ते म्हणत. कोणताही प्रश्न संविधानाच्या चौकटीत सोडवावा अशी त्यांची भूमिका होती. आजच्या काळातील प्रश्न सोडवण्यासाठी संविधान हाच आधार असला पाहिजे असं त्यांचं मत होतं. "समान नागरिकत्वावर आधारलेली जातीधर्मातीत लोकशाही, तिच्यासाठी आवश्यक असणारे सामाजिक व मानसिक आधुनिकीकरण आणि समाजवाद या बाबी माझ्या श्रद्धेचे विषय आहेत," आणि "मी अधार्मिक असलो तरी माझी संविधानावर श्रद्धा आहे," असेही ते म्हणत. कोणत्याही नेत्याची अथवा व्यक्तीची चिकित्सा करण्याचा अधिकार अभ्यासकाला पाहिजे असे ते म्हणत. "माझं विवेचन सर्वांना मान्य व्हावं असा माझा आग्रह नाही. पण मला माझे विवेचन करण्याइतका निर्भयपणा वाटावा एवढे वातावरण अपेक्षिण्याचा माझा हक्क आहे. नेत्याची जात कोणती, यावर आदर बाळगणाऱ्यांची जात ठरते आणि लिहिणाऱ्याची जात कोणती यावर टाळ्यांचा अगर जोड्यांचा कार्यक्रम ठरतो, हा प्रकार चालू असेपर्यंत चिकित्सेला फारसे भवितव्य नाही," असं कुरुंदकर म्हणत. आपल्याला असलेले प्रश्न संविधानाच्याच चौकटीत सोडावावेत असा त्यांचा आग्रह होता. ही गोष्ट आजच्या काळातही तितकीच लागू होते
No comments:
Post a Comment